पाच वर्षापुर्वी अशाच लोकसभा व विधानसभा निवडणूका पाठोपाठ आलेल्या होत्या. तेव्हा कोणकोणते मुद्दे मतदारापुढे होते? कसल्या विषयावर राजकीय पक्ष लोकांकडे मताचा जोगवा मागत होते? अशा गोष्टी व घटना जुन्या होतात आणि विस्मृतीच्या कप्प्यात गडप होतात. त्यापासून माणूस शिकायला सहसा तयार नसतो. कारण पुढल्यास ठेच मागचा शहाणा असे म्हटले जात असले तरी मागचा नुसताच शहाणा असतोच असे नाही. तो बहुधा अतिशहाणाच असतो. म्हणुन तो पुढाल्याला मुर्ख समजतो. तो मुर्ख होता म्हणून खड्ड्यात पडला वा त्याला ठेच लागली, अशी मनाची समजूत घालून पुढला त्याच खड्ड्यात मोठ्या आत्मविश्वासाने उडी घेत असतो. अर्थात त्यालाही ठेच लागून काहीही उपयोग नसतो. कारण त्याच्याही पुढला सावध शहाणा निघेलच असे कुठे असते? म्हणूनच आज पाच वर्षानंतर तेव्हाच्या निवडणूका किंवा त्यातले निकाल आपल्याला कशाला आठवतील? त्याची कारणे वा परिणाम तरी कसे आठवतील? तेव्हा राज्य सरकार खुपच बदनाम झालेले होते. लोकसभेला सामोरे जाण्यापुर्वी तेव्हाच्या सरकारला मुख्यमंत्री व गृहमंत्री बदलावा लागला होता आणि केंद्रातला गृहमंत्री सुद्धा तडकाफ़डकी हाकलावा लागला होता. त्याचे कारण याच मुंबईत घडलेली भीषण घटना होती. २००८ च्या नोव्हेंबर महिन्यात कसाब टोळीने मुंबईत येऊन उच्छाद मांडला होता. किडामुंगीसारखी रस्त्यावर, स्थानकात माणसे मारली होती. मोठे पोलिस अधिकारी ठार झाले होते. अडीच दिवस अवधी मुंबई मोजक्या दहा जिहादींनी ओलीस ठेवली होती. त्यामुळे सत्ताधारी पुरते बदनाम व नाकर्ते ठरले होते. त्याचा सोपा परिणाम म्हणून आपण सहज निवडणूका जिंकू शकतो, अशा भ्रमात विरोधी पक्ष गमजा करीत होते. पण मतदानाचे निकाल समोर आले, तेव्हा विरोधकांना डोळे पांढरे करायची वेळ आलेली होती. कारण त्याच मुंबईत त्याच नाकर्त्या सरकारला लोकांनी पुन्हा कौल दिला होता.
ज्या मुंबईकरांना कसाब टोळीने केलेल्या भयावह जखमा अजून सुकलेल्या व भरलेल्या नाहीत, त्याच मुंबईच्या मतदाराने तेव्हा नाकर्त्या सरकारला पुन्हा कौल कशाला दिलेला होता? त्याने नाकर्त्या सरकारच्या कर्तबगारीवर पुन्हा विश्वास व्यक्त केला नव्हता. तर त्याच मुंबईकराने महाराष्ट्रातील बेजबाबदार निष्क्रिय विरोधी पक्षावर अविश्वास आपल्या मतदानातून व्यक्त केला होता. त्याचा परिणाम म्हणून कॉग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला मुंबई परिसरात मोठे यश मिळताना दिसले होते. मात्र तसे निकाल समोर येईपर्यंत विरोधक गमजा करीत राहिले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तेव्हा सेना भाजपाला अपशकून केला होता. लोकसभा निवडणूकीत मुंबई ठाण्याच्या दहापैकी नऊ जागी युतीला जबरदस्त फ़टका बसला होता. पण त्यापासून धडा घेऊन युतीने सहा महिन्यात आलेल्या विधानसभा निवडणूकीत आपली रणनिती वा डावपेच बदलले नव्हते. वैतागलेल्या जनतेला अन्य पर्यायच नाही, अशा मस्तीत विरोधक राहिले आणि लोकसभेचेच प्रतिबिंब विधनसभेच्या निकालात पडले. त्याला मग तेव्हाचे सत्ताधीश म्हणजे सोनिया, राहुल वा कॉग्रेस पक्षीय आपले यश समजून बसले. विरोधक नालायक म्हणजे आपले बळ अशी समजूत करून घेणार्याची अशीच अवस्था होत असते. दिल्लीत बसलेल्या भाजपा नेत्यांना नामोहरम करून टाकल्याने आपल्या विरोधात कोणीच उभा राहू वा टिकू शकत नाही, अशा समजूतीने कॉग्रेस इतकी मस्तवाल झाली होती, की सोनिया व राहुल यांना बहूमत नसलेले सरकार चालवताना मित्र पक्षांशी सल्लामसलत करायचीही गरज वाटेनाशी झाली होती. थेट हाकलून लावले नाहीत तरी मित्र पक्षांना साथ सोडुन जाण्याची पाळी आणली होती. त्याचे परिणाम तात्काळ दिसले नाहीत, तरी पाच वर्षांनी समोर आले. यावेळी त्यांनी कल्पना केली नाही असा नेता मोदींच्या रुपाने समोर आला आणि पाच वर्षापुर्वीचे तेच विजयीवीर जमीनदोस्त होऊन गेलेत.
अशा आठवणी आज कशाला सांगायच्या? तर आज विधानसभेचे मतदान होते आहे आणि लोकशाहीच खरा कर्ताकरविता मतदार उद्याचा राजकीय इतिहास आज यंत्रावर आपला ठसा उमटवून घडवतो आहे. त्याचे परिणाम वा स्वरूप येत्या रविवारी आपल्याला कळणारच आहेत. पण ते किती चमत्कारीक असू शकतात, त्याची उदाहरणे म्हणून अशा आठवणी जागवाव्या लागतात. तेव्हा लोकसभेतील स्वच्छ बहूमत कॉग्रेसपाशी नव्हते, पण भाजपाच्या विरोधातील सेक्युलर लाचारीचा लाभ उठवत, कॉग्रेस इतर पक्षांना ब्लॅकमेल करीत मनमानी करीत सुटलेली होती. तेव्हा निवडून आलेल्या पक्ष व त्यांच्या मोजक्या प्रतिनिधींना ओलिस ठेवणे शक्य असले तरी असल्या लबाड्या सामान्य जनतेला ओलिस ठेवायला पुरेशा नसतात, याचे भान कॉग्रेसला राहिलेले नव्हते. त्या मतदारानेच आज कॉग्रेसला विरोधी पक्ष म्हणून मान्यतेच्याही लायकीचे ठेवले नाही. त्यापासून नव्या सत्ताधीशांनी धडा घ्यायचा असतो. असे दिवस त्या कालच्या सत्ताधीशांवर कशामुळे आले? तर सोनिया आपल्या पक्षतल्या किंवा मित्र पक्षातल्या लोकाच्या भावना जुमानत नव्हत्याच. पण विरोधकांच्या भावनाही तुडवत होत्या. त्याच भावनांची किंमत त्यांना मोजावी लागली. सेक्युलर मतदाराला आपल्याखेरीज पर्यायच नाही, असल्या मस्तीने तितकी बेफ़िकीरी त्यांच्यात आलेली होती आणि खाली कॉग्रेस पक्षात झिरपली होती. पण तशी परिस्थिती येऊ घातलीय याचे भान १६ मे उजाडेपर्यंत कुठे आलेले होते? सोनिया राहुलच नव्हेतर त्यांचे भाट भक्तही मोदींसह भाजपाच्या इशार्यांची टवाळी करण्यात दंग होते. लोकसभेच्या मोठ्या यशानंतर भाजपाची मनस्थिती त्यापेक्षा वेगळी राहिलेली नाही. त्यातूनच मग हरयाणा असेल, महाराष्ट्र असेल, तिथल्या मित्रपक्षांना लाथाडण्यापर्यंत भाजपाने मजल मारली आहे. त्याचे परिणाम कितीसे वेगळे असू शकतील?
माणसाचा सर्वात जवळचा शत्रू त्याचा खोटा आत्मविश्वासच असतो. त्याच आत्मविश्वासाने लालकृष्ण अडवाणी व नितीशकुमार यांना मोदी विरोधातल्या कारस्थानातून पराभूत केले. मोदींना त्यासाठी कुठले मोठे डावपेच खेळावे लागले नाहीत. कॉग्रेस वा सोनियांच्या घसरणीसाठी मोदी वा भाजपाला फ़ार मोठे प्रयास करावे लागले नाही. अशा लोकांचा खोटा आत्मविश्वासच त्यांना पराभवाकडे घेऊन जात असतो आणि त्यात विरोधकांनी हस्तक्षेप केला नाही, तरी खुप मोठी मजल मारता येत असते. भाजपाने लोकसभा यशानंतर आपल्या यशाचे मूल्यमापन करण्यापेक्षा यशाची नशा उपभोगण्याचा पवित्रा घेतलेला दिसतो. म्हणूनच कॉग्रेसने ओढवून आणलेल्या पराभवावर स्वार झालेल्या भाजपाला, ती आपलीच शक्ती व पराक्रम असल्याचे भास होत आहेत. जसे पाच वर्षापुर्वी लोकसभा विधानसभा जिंकणार्या कॉग्रेसला झालेले होते. फ़रक इतकाच आहे, की कॉग्रेसला दोन्ही निकालानंतर नशा चढलेली होती आणि आपल्या यशातला मनसेचा सिंहाचा वाटा कॉग्रेस विसरली होती. पा़च वर्षानंतर त्याची सव्याज परतफ़ेड त्या पक्षाला करावी लागली. भाजपाच्या नेतृत्वाला तितकाही संयम दाखवता आलेला नाही. त्यांना लोकसभा यशानंतर आता जिंकायला काहीच शिल्लक उरलेले नाही, अशा भ्रमाने ग्रासले आहे. आणि ही अवस्था सामान्य मतदार बारकाईने बघत तपासत असतो. त्यावरच सामान्य नागरिक आपले मत बनवत व दान करत असतो. असा मतदार कुठल्या चाचणीकर्त्याकडे जात नाही, की माध्यमात येऊन आपले इशारे देत नाही. तो न्यायाधीशाप्रमाणे तटस्थ बसून निरीक्षण करतो, बाजू व युक्तीवाद ऐकतो आणि अखेरीच अंतिम निर्णय देत असतो. त्या निकालानंतर कुठला युक्तीवाद कामाचा उरत नाही. पाच वर्षापुर्वीच्या गोष्टी, नशा, झिंग म्हणून आठवतात. कारण आज त्याचेच परिणाम दिसत असताना नव्या सत्ताधीशांची नशा मात्र तितकीच बेफ़ाम दिसतेय.
Bhau vishleshan mast... pan 19 tarkhelach kalel baki...
ReplyDeleteयावर्षीच्या लोकसभा निवडणूकीनंतर कॉंग्रेसला विरोधीपक्षाची भूमिका चोखपणे बजावता आली नाही. त्यांना याकरीता संधीही मिळाली नसले किंवा केवळ विरोध करणे हे धोरण समोर ठेवून कॉंग्रेस कार्य करीत आहे. अशावेळी महत्वांकाक्षी भाजपा मात्र जे होईल ते होईल आता काहीही सोडायचे नाही ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतांना दिसत आहे. या दोन्ही प्रमुख पक्षांना कोणत्याही प्रादेशिक पक्षाचा दबाव नको आहे. या परिस्थितीतही राज्यात भाजपाचे सरकार आले तर त्यांची महत्वकांक्षा पुन्हा जोर धरणार आहे.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteभाऊराव,
ReplyDeleteसावधगिरीच्या आणि नियोजनाच्या बाबतीत शिवाजीमहाराजांची आठवण होणं अपरिहार्य आहे. एव्हढा अफझलखानसारखा मातब्बर सरदार धुळीस मिळवला तरीही क्षणभराचीही विश्रांती न घेता महाराज लगेच दुसऱ्या दिवशी पहाटे नव्या मोहिमेवर निघाले. सोबत नेतोजी पालकर लक्ष्मेश्वरावर चालून गेले. कोल्हापूरावर आणि पन्हाळ्यावर स्वत: महाराजांनी चढाई केली. कोकणातून दोरोजी (का दौलोजी) पाटील यांची नौसेना अफझल्याची जहाजं ताब्यात घ्यायला राजापुरात येऊन थडकली. काय अप्रतिम नियोजन होतं महाराजांचं!
त्यांच्यासमोर आजचे राजकारणी अगदीच केविलवाणे दिसतात.
आपला नम्र,
-गामा पैलवान