विधानसभेचे निकाल लागल्यावर त्यातून हैद्राबादच्या एम आय एम पक्षाचे दोन आमदार निवडून आल्याची खुप चर्चा झाली आहे. ते कसे आले किंवा मतविभागणीचा लाभ त्यांना कसा मिळाला, त्याचाही उहापोह झाला. पण स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेणार्या कितीजणांना त्याच संदर्भातले शिवसेनाप्रमुखांचे अखेरचे बोल आठवले? आज सत्तापदांसाठी धावपळ करणार्या शिवसेनेच्या नेत्यांना तरी २०१२ च्या दसरा मेळाव्यातील बाळासाहेबांचे शब्द लक्षात आहेत काय? सत्तेच्या राजकारणात शिवसेनाच आपल्या जनकाला विसरून गेल्यासारखे वाटते. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्या मेळाव्यात हजेरी लावून बाळासाहेब भाषण करू शकले नव्हते. त्याबद्दल खंत व्यक्त करीतच त्यांनी दूरसंचार माध्यमातून थेट प्रक्षेपित होणारे शेवटचे भाषण मातोश्रीवरून केले होते. त्यात अनेक गोष्टींचा उहापोह करताना अगत्याने नांदेडच्या पालिका निवडणूकीचा उल्लेख केला होता. तिथे हैद्राबादच्या इस्लामिक पक्षाचे दहाबारा नगरसेवक निवडून आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. हे संकट महाराष्ट्रात येऊ घातल्याचा इशारा आपल्या आयुष्य़ाच्या अखेरच्या टप्प्यावर असतानाही दिला होता. आजच्या विधानसभा निवडणूका लढवणार्या शिवसैनिक वा त्यांच्या नेतृत्वाला त्याचे कितीसे भान होते? असते तर त्यांनी मतविभागणीचा लाभ अशा धर्मांध शक्तींना मिळू शकतो, याचा विचार करून जागांचा विषय अहंकाराचा बनवला नसता व युती तुटू दिली नसती. आणि जर शिवसेनेच्या सन्मानाचाच विषय असेल, तर निकालानंतर सेनेच्या नेतृत्वाने मुठभर सत्तापदांसाठी दिल्लीवार्या केल्या नसत्या. पण कुणाला आज बाळासाहेब आठवत नाहीत, की त्यांचे शब्द आठवत नाहीत. मग ओवायसीच्या दोघांनी इथे आमदारकी मिळवणे वा चारपाच जागी दुसर्या क्रमांकाची मते मिळवण्याचे वैषम्य कुणाला कशाला असेल?
प्रश्न साधा सोपा सरळ असतो. सत्तेच्या राजकारणात सत्तेला मोल असते आणि सत्तासंपादनासाठी वाटेल त्या तडजोडी करायच्या असतात. पण सत्तेच्या स्पर्धेत यायला मात्र जनभावनांचा आधार घ्यायचा असतो. म्हणूनच शिवसेना नेतृत्वाने आपल्या अहंकाराला मराठी अस्मिता बनवले आणि दंगलीचा आडोसा घेऊन आरोप व्हायचे तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यालाच गुजराती अस्मितेचा अपमान असल्याचे चित्र उभे करून, गुजरात आपल्या पाठीशी उभा केला होता. तेव्हा कुणाला त्यात मोदी म्हणजे प्रादेशिक अस्मिता अशी हेटाळणी करायचे भान नव्हते. अर्थात त्यासाठी मोदींनी आपला अट्टाहास सोडला नाही, की शरणागती पत्करली नाही. इतर पक्ष स्वपक्ष वा अन्य टिकाकारांच्या भडीमारापुढे ताठ मानेने मोदी उभे राहिले. खुर्चीसाठी त्यांनी कुठेही शरणागती पत्करण्यास साफ़ नकार दिला होता. म्हणूनच त्यांच्या गुजराती अस्मितेला देशभरात राष्ट्रीय अस्मिता म्हणून मान्यता मिळत गेली. हा माणूस झुकणारा नाही, म्हणून त्याला भारतीयांनी स्विकारला. त्यातला विकासाचा मुद्दा दुय्यम होता. आपले शब्द मागे न घेणारा व ताठ्याने उभा रहाणारा नेता हीच शिवसेनेची शक्ती होती. ती बाळासाहेब दाखवू शकले आणि ती कुवत आजच्या पक्षप्रमुखांना दाखवता आलेली नाही. असती तर त्यांनी सन्मानाची भाषा करीत सत्तापदांसाठी शरणागती पत्करली नसती. मोदींचे बाळासाहेबांना झुकून अभिवादन करणारे छायाचित्र अनेकदा दाखवले जाते. त्यात मोदी शिवसेनेच्या पक्षप्रमुखा समोर झुकलेले नाहीत, तर अवघे जग आपल्या विरोधात बोलत असताना भीडभाड न ठेवता मोदीचे समर्थन करणारा आपल्यापेक्षा ताठ वडीलधारा म्हणून मोदी अभिवादन करत असतात. त्यासाठीच लोक मातोश्रीच्या पायर्या झिजवायचे. मात्र आज भाजपा सेनेला सत्तावाटपात हिस्सा द्यायला निघाला असेल तर मित्र वा उपकार म्हणून नव्हेतर अपरिहार्य गरज म्हणून युती होते आहे.
एक गोष्ट साफ़ आहे, की भाजपाला अल्पमत असले तरी बहूमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी पाठीशी आहे. म्हणूनच स्थीर सरकार स्थापन करायला वा चालवायला सेनेच्या पाठींब्याची अजिबात गरज नाही. पुर्वापार भाजपाला शरद पवार अधिक जवळचे राजकीय मित्र वाटत राहिले आहेत. १९९९ सालात त्यांच्यासह युतीचे सरकार स्थापन करायला भाजपा उत्सुक होता. पण बाळासाहेबांमुळे ते शक्य झाले नव्हते. त्यामुळेच आज परिस्थिती भाजपाला पोषक होताच पवारांनी आपली विश्वासू फ़ौज निवडणूकीपुर्वीच भाजपाकडे रवाना केलेली होती आणि तरीही संख्येत त्रुटी आल्यावर बिनमांगे पाठींबा जाहिरही करून टाकला आहे. तो घेण्यात भाजपाला अडचण येऊ नये, म्हणून बाहेरून पाठींबा दिलेला आहे. पण केवळ लोकलज्जेस्तव भाजपाला खुलेआम पवारांच्या मदतीने सरकार स्थापन करणे व चालवणे अशक्य झालेले आहे. ज्या पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांवर गेलॊ पाच वर्षे घोटाळे व भ्रष्टाचाराची झोड उठवली, त्याच्याच मदतीने वा सोबतीने सत्ता चालवणे, बेशरमपणाचे ठरण्याचा धोका आहे. त्याचे दुष्परिणाम पक्षाच्या देशव्यापी प्रतिमेवर होऊ शकतात. ते भाजपाला परवडणारे नाही. म्हणुनच पंचवीस वर्षे जुना मित्रपक्ष अगतिक होऊन सोबत घेतला, तर काम भागू शकते. घटनात्मक वा संख्यात्मक राजकारणात म्हणूनच भाजपाला शिवसेनेला सोबत घेण्याची काडीमात्र गरज नाही. पण लोकलज्जेस्तव राष्ट्रवादी सोबत जाणेही शक्य नाही. त्यासाठी सेनेला सोबत घेणे ही भाजपाची अगतिकता आहे. शिवसेनेला त्याचाच लाभ घेऊन सत्तेचीही सौदेबाजी शक्य होती. पण त्यासाठी आवश्यक तितका संयम आजच्या सेना नेतृत्वापाशी नाही. त्यामुळेच सत्तेची तयारी भाजपा परस्पर करताना बघून सेनेचा धीर सुटला आणि त्यांनी दिल्लीला धाव घेतली. सत्तेच्या खेळात कुणाला अभिमान सन्मान नसतो. सबळांची हुकूमत चालते. मात्र त्यासाठी ‘सन्मान्य’ तोडगा निघाल्याचे चित्र उभे करावे लागते.
१९९९ सालात भाजपा-सेनेशी जुळेना, तेव्हाही शरद पवार मान खाली घालून सोनियांना शरण गेलेच होते ना? अर्थात आधी आढेवेढे घेणार्या शरदरावांनी मग जातीयवादी पक्षांना सत्तेबाहेर ठेवायचे तत्वज्ञान किती आग्रहाने मांडले होते? पाच वर्षांनी सोनिया लोकसभेपुर्वी दारी आल्यावर, पवार २००४ च्या निवडणूकांचे जागावाटप करायला सोनियांच्या दारी पोहोचले होते. इतकेच कशाला, निकालानंतर सोनियांची नेतेपदी निवड होऊनही त्यांनी पंतप्रधान व्हायला नकार दिल्यावर, त्यांची मनधरणी करायलाही पवार आघाडीवर दिसले नव्हते का? मग तेव्हा त्यांनी सन्मान गुंडाळून ठेवला होता काय? सन्मान अभिमान वगैरे गोष्टी सत्तेच्या राजकारणात भेळीच्या कागदासारख्या असतात. खाईपर्यंत हातात ठेवायच्या आणि कार्यभाग उरकला, की टोपलीत फ़ेकून द्यायच्या. त्यापेक्षा सत्तापद अधिकारपद मोलाचे असते. शिवसेनेकडून आपण पंचवीस वर्षे खुप अपमानित झालो, असे आज भाजपावाले सांगतात. मग तेव्हा त्यांनीही सन्मानाला भेळीचा कागदच बनवला नव्हता काय? सत्तेसाठी सेनेची गरज होती, म्हणून सन्मान गिळून अपमान सोसला. म्हणूनच आज तेच भाजपाचे नेते सेनेला ‘सन्मानाची व्याख्या’ समजावत आहेत. असो, मुद्दा इतकाच, की आजही जितकी सेनेला भाजपाची गरज आहे, त्यापेक्षा सत्ता चालवायला लोकलज्जेस्तव भाजपाला सेनेची गरज आहे. कारण भाजपा उघडपणे राष्ट्रवादीला सोबत घेऊ शकत नाही, की आत सरकारमध्ये समाविष्ट करून घेऊ शकत नाही. व्यवहारात पवारांची सोबत घ्यायची असली तरी लोकांसमोर राष्ट्रवादीचा भ्रष्ट कारभार संपवल्याचा देखावा रंगवायचा आहे. सत्तेची सुंदरी कुणालाही व्याभिचारी बनवू शकते. तिथे भाजपा काय आणि शिवसेना काय? सगळेच पवारांच्या पंगतीत मांडीला मांडी लावून मिरवत असतात. सामान्य जनता, कार्यकर्ते बिचारे उगाच भारावून जात असतात. या महाभारतात लढणारे सगळेच कौरव असतात. जिंकतात त्यांना आपण ‘पांडव’ म्हणून डोक्यावर घेऊन नाचणारे मुर्ख असतो. मग त्यांनी तरी पावित्र्य पातिव्रत्याची कशाला फ़िकीर करावी?
"सत्तेची सुंदरी कुणालाही व्याभिचारी बनवू शकते. तिथे भाजपा काय आणि शिवसेना काय?"
ReplyDeleteवाह भाऊ वाह! क्या बात है। वैश्विक सत्य!
भाऊराव,
ReplyDeleteसन्मान्य तोडग्याचं चित्र उभं करण्यात शिवसेना कमी पडतेय हे मान्य. तुम्ही म्हणता की सत्तासंपादनासाठी वाटेल त्या तडजोडी करायच्या असतात. अगदी बरोबर. या निकषावर भाजपने निर्विवाद सत्तेत येण्यासाठी म्हणून शिवसेनेशी युती तोडली. मात्र तरीही भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही. नेमक्या याच फाटाफुटीमुळे एमायेमचे २ आमदार निवडून येऊ शकले.
भाजपने सत्तेसाठी जे काही केलं त्याचे परिणाम सामान्य लोकांना भोगावे लागणार. हा मुद्दा शिवसेनेकडून उचलला गेला पाहिजे. 'सन्मानजनक तोडग्या'चा एक भाग हा असू शकतो.
आपला नम्र,
-गामा पैलवान
NICE
ReplyDelete