Monday, October 6, 2014

इतिहास कोणाच्या बाजूने साक्ष देतो?



फ़ाजील आत्मविश्वास हा नेहमीच सर्वात जवळचा दगाबाज असतो आणि गेल्या दोन दशकात भाजपाला त्यानेच अनेकदा दगा दिलेला आहे. त्याचा सर्वात मोठा पुरावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हाच आहे. गेल्या दोन वर्षात मोदी यांनी भाजपाच्या तमाम दिग्गज नेत्यांना गुंडाळून व दिल्लीतल्या भाजपाच्या चतूर चाणक्यांना बाजूला सारून लोकसभा जिंकून दाखवली आहे. त्यासाठी त्यांना झुंज द्यावी लागली, ती भाजपाच्याच धुर्त नेत्यांशी आणि त्यांच्या चाणक्यनितीशी. मोदी यांच्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एनडीए सोडायची धमकी देईपर्यंत आणि विभक्त होण्याचा निर्णय घेईपर्यंत, बहुतेक दिल्लीतले भाजपाचे चाणक्य निमूट अपमान सहन करत होते. मुठभर दुय्यम दर्जाचे नेते मात्र मोदींच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले होते. गुजरातची विधानसभा तिसर्‍यांदा सलग जिंकल्यावर मोदींच्या नावाची पंतप्रधान पदासाठी खुली चर्चा सुरू झाली होती. पण कोणीही भाजपा चाणक्य ठामपणे मोदी बहूमत मिळवू शकतात, असे बोलायचे धाडस करीत नव्हता. पत्रकार त्यासाठी छेडायचे, तेव्हा आपल्या पक्षात अनेक पंतप्रधान होऊ शकणारे उमेदवार आल्याची मखलाशी केली जायची. कधीकधी तर पत्रकार हिंमत असेल, तर मोदींचे नाव जाहिर करा असेही धमकावत होते. पण कुणा भाजपानेत्याने वाजपेयींच्या काळात मिळालेल्या जागाही मोदी टिकवू शकतात, इतके बोलायचे धाडस केलेले नव्हते. पण त्यापैकीच बहुतांश नेते आज मोदींच्या लोकप्रियतेवर कुठल्याही राज्यात बहूमत मिळवायच्या वल्गना करीत असतात. म्हणूनच त्यांच्यात ही हिंमत कुठून व कशामुळे आली, ते समजून घेणे अगत्याचे आहे. नुसतीच अशा नेत्यांची टिंगल करून वा त्यांचे दावे खोडून उपयोग नसतो. जेव्हा आत्मविश्वासाचा कडेलोट होतो, तेव्हा यापेक्षा वेगळे काही शक्य नसते. याचे प्रमुख कारण हुकमाचे सर्वच पत्ते आपल्या हाती आहेत आणि बाकीच्या स्पर्धकांपाशी साधे पत्तेही नाहीत, असा भ्रम निर्माण होतो. त्यामुळे एकप्रकारचा उन्मत्तपणा येतो. साध्या सरळ गोष्टीही समजून घेण्य़ाची इच्छाच मरून जाते. त्याचेही एक जुने दहा वर्षापुर्वीचे उत्तम उदाहरण देता येईल.

२००४ सालात जेव्हा लोकसभा आधीच विसर्जित करून मध्यावधी निवडणूका घेण्याची बाजी लावण्यात आली; तेव्हा पुन्हा एकदा युतीचे शिल्पकार प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात नवी खेळी खेळून बघितली होती. तेव्हाही विधानसभेची काही महिन्यांची मुदत शिल्लक होती. पण पुन्हा लोकसभेसोबत विधानसभेचे मतदान घ्यावे, यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. पण यावेळी सत्तेवर कॉग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी होती आणि त्यांनी विधानसभा विसर्जनाला ठामपणे नकार दिला. तेव्हा महाजनांनी मोठा धुर्त हुकूमाचा पत्ता फ़ेकला होता. युतीचे सर्व आमदार राजिनामा देतील, असा पवित्रा त्यांनी घेतला आणि त्यासाठी शिवसेनाप्रमुखांना राजी केले होते. मग त्याची घोषणा महाजनांच्या सोबत उद्धव ठाकरे यांनीच मातोश्री नजिकच्या एम आय जी क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेली होती. मात्र त्याला सत्ताधारी आघाडीने दाद दिली नाही. ती दिली जाणार नाही हे पत्रकारांना ठाऊकच होते. म्हणून पुढले पाऊल काय, असा प्रश्न विचारला गेला होता आणि महाजन आमविश्वासाने उत्तरले होते, मग युतीचे सगळे आमदार सामुहिक राजिनामे टाकतील. मग इतक्या सदस्यांशिवाय सभागृह चालवावे लागेल किंवा दडपणाखाली विधानसभा बरखास्त करावी लागेल. यासारखी घोषणा करताना कितपत खाचाखोचांचा विचार झाला होता? त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार या धुर्त नेत्याने महाजनांचे स्वागत केले आणि लौकर राजिनामे द्यावे असे सूचवले. कारण युतीचे आमदार राजिनामे टाकून मोकळे झाल्यास, लोकाभेनंतर व्हायच्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सर्वच जागा सत्ताधारी आघाडीला जिंकणे सोपे जाईल. कारण मग युतीचे आमदारच नसतील. कारण आमदारच राज्यसभा निवडणूकीतले मतदार असतात. पवारांनी जाहिरपणे ही चुक लक्षात आणून दिल्यावर युतीच्या आमदारांना शेपूट घालून विधानसभेत बसावे लागले आणि विधानसभा पुर्ण मुदत टिकली.

इथे मुद्दा लक्षात घ्यायला हवा, की प्रमोद महाजन यासारखा हुशार धुर्त नेता इतका सहजगत्या कशाला फ़सला होता? तर आपल्यापाशी आमदारांच्या राजिनाम्याचे प्रभावी हत्यार असल्याचा फ़ाजील आत्मविश्वास त्याला विवेकी विचार करायची सवडच देत नव्हता. परिणामी राज्यसभा निवडणूकात आपलेच नुकसान व्हायची शंकाही मनाला शिवलेली नव्हती. पण पवारांनी ती लक्षात आणून दिल्यावर विधानसभेच्या बरखास्तीचा मुद्दा कुठल्या कुठे गायब झाला. अर्थात त्यानंतर लोकसभेच्या अकारण घेतलेल्या मध्यावधी निवडणूकीचा जुगारही भाजपावर उलटला आणि वाजपेयींना जावे लागलेच. पण पुढली दहा वर्षे निवडूनही येऊ न शकणारा व सोनियांच्या तालावर नाचणारा बाहुला पंतप्रधान देशाच्या माथी मारला गेला. महाराष्ट्र विधानसभा असो किंवा लोकसभा असो, दोन्हीकडे मुदतपुर्व निवडणूकांचा जुगार भाजपाच्या अंगी आला.  राजकीय घटनाक्रमात भाजपाच्या नेत्यांनी तेव्हा उतावळेपणा केला आणि त्यांनी स्वार्थापायी केलेली घाईच त्यांच्या तोट्याला कारणीभूत झाली. आपल्याला हरवण्याची सुवर्णसंधीच त्यांनी सोनियासारख्या नवख्या महिलेला बहाल केली. एका बाजूला भाजपाचा मुजोर फ़ाजील आत्मविश्वास आणि दुसर्‍या बाजूला सोनियांनी स्वाभिमान गुंडाळून पासवान, पवार, मायावती यांच्या दारी जाण्यापर्यंत दाखवलेली लवचिकता; यातून राजकारणाचे चित्र झपाट्याने तीन महिन्यात पालटून गेले. भाजपाच्या तमाम विरोधकांना एकत्र करण्यात पुढाकार घेऊन व त्यासाठी कमीपणा पत्करून सोनियांनी केलेले प्रयास, त्यांना सत्तेपर्यंत घेऊन गेले. उलट वाजपेयींच्या लोकप्रियतेच्या उत्तुंग भ्रामक कल्पनेवर स्वार झालेल्या भाजपा नेत्यांना थेट निकालाच्या आकड्यांनीच भानावर आणले. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. खरे सांगायचे तर सोनियांपाशी भाजपाला पराभूत करण्यासारखे कुठलेही हुकमी पत्ते नव्हते. किंबहूना भाजपा विरोधकांपाशी साधा आशावादही नव्हता. पण धुर्तपणा व आपणच मोठे चलाख असल्याच्या भ्रमात मशगुल झालेल्या भाजपा नेतृत्वाने, सोनिया व अन्य विरोधकांना एकामागून एक संधी उपलब्ध करून देण्या़चा सपाटा़च लावला होता. ज्या संधी भाजपा बहाल करीत होता, त्यांचा सावधपणे उपयोग करण्यापलिकडे सोनियांना अधिक काहीच करावे लागले नाही. मग वाजपेयी निवृत्त झाले आणि अडवाणी यांच्या भोवती महाजन यांच्यापेक्षा धुर्त सुधींद्र कुलकर्णी इत्यादी दांडगे चाणक्य गोळा झाले. त्यांनी भाजपाला तब्बल वीस वर्षे म्हणजे १९९१च्या लोकसभा निवडणूकी इतके मागे नेवून ठेवले. गेल्या सप्टेंबर महिन्यात मोदींनी तिथून सुरूवात करून भाजपाला २८२ जागांच्या बहूमतापर्यंत आणले आहे. पण इतक्या वाईट अनुभवातून शिकण्यापेक्षा भाजपा नेते पुन्हा २००४ इतके मागे भरकटले आहेत. त्यातून मग हरयाणात आघाडी किंवा महाराष्ट्रात युती तोडण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने पावशतक चालू असलेली जी युती मोडली, त्यातून कितपत शहाणपणा सिद्ध झाला, त्याचे उत्तर १९ आक्टोबरला मिळू शकणार आहे. पण यापूर्वी जेव्हा भाजपातल्या चाणक्यांनी अशी चलाखी व चतुराईची खेळी केली, त्याचा इतिहास चांगला वा लाभदायक नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्या इतिहासाकडे पाठ फ़िरवून नव्या घटनाक्रमाचे विश्लेषण करता येत नाही, की होऊ शकत नाही. याचा अर्थ तसेच अपयश नक्की मिळेल, असे ठामपणे सांगता येत नाही. पण जशाच्या तशा चुकांची पुनरावृत्ती होते, तेव्हा त्याच्या परिणामांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. जेव्हा घटनाक्रमात हस्तक्षेप करून उतावळेपणाने डावपेच खेळले जातात आणि ते तर्काच्या पलिकडे जाऊ लागतात, तेव्हा इतिहासाच्या निकषावरच त्याची तपासणी करावी लागते. इथे इतिहास आजच्या भाजपाच्या स्वबळवर लढाई करण्याला साथ देताना दिसत नसेल, तर तसे साफ़ सांगण्याची गरज आहे. कारण अनुभवच माणसाला शिकवत असतो. मग तो राजकारणी असो किंवा विश्लेषक वा पत्रकार असो. परिस्थिती, राजकीय संदर्भ आणि घटनाक्रम बघितल्यास पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते आहे. तिला जबाबदार कोण? मोदी की राज्यातले भाजपा नेते? ज्यांनी असे धाडस केले असेल, तेच त्याला जबाबदार असतील, वा यशस्वी ठरल्यास श्रेयही त्यांचेच असेल. मात्र इतिहास त्यांच्या बाजूने साक्ष देताना आजतरी दिसत नाही. त्याची आकडेवारी आपण पुढल्या काही लेखातून तपासूया.

2 comments:

  1. खुपच छान भाऊ, योग्य आणि डोळे उघडवणारे विश्लेषण!

    ReplyDelete
  2. भाऊ,


    लहान तोंडी मोठा घास घेतो आहे त्यामुळे आधीच क्षमा मागतो. महाराष्ट्रातील निवडणुका आणि भाजप-सेना युती यावर छोटा लेख लिहिला आहे. खर तर तुमचे बहुतांश विचारांशी मी सहमत असतो पण यंदा युती तुटण्याबद्दलचा आपला नूर मला पटला नाही, म्हणुन हा लेख लिहिला. वेळ मिळाल्यास आपला अभिप्राय किंवा मत अवश्य कळवावे ही विनंती


    http://marathimauli.blogspot.in/2014/10/blog-post.html

    ReplyDelete