Friday, October 3, 2014

बुद्धीमंत असण्यातली समस्या



"Any intelligent fool can make things bigger, more complex, and more violent. It takes a touch of genius -- and a lot of courage -- to move in the opposite direction."  -Albert Einstein

माणूस नेहमी अनुभवातून शिकत असतो. एखाद्या अनुभवाने आपण सुखावतो किंवा दुखावतो. त्यातून आपल्या मनावर काही प्रभाव निर्माण होतात. मग तो प्रभाव हळुहळू आपल्या मनाचा कब्जा घेतो आणि सुखावणार्‍या अनुभवाच्या आहारी माणुस जाऊ लागतो. तिथे विवेकबुद्धी काम करत असते. प्रत्येकवेळी अनुभवाची कसोटी लावण्याने विवेकबुद्धी शाबुत रहाते. पण अनुभवाने संमृद्ध होणार्‍या माणसाला आपण शहाणे झालो अशी खात्री वाटू लागते; तेव्हा तो विवेकबुद्धीला झुगारू लागतो आणि समजुतीच्या आहारी जाऊ लागतो. उदाहरणार्थ दिर्घकाळ एका जागी तुमचे वास्तव्य असेल, तर समोर दिसत असते त्याकडे ‘लक्ष’ नसतानाही तुम्ही येजा करू शकत असता. म्हणजे समजा अकस्मात वीज गेली तरी आपल्या घरात वा इमारतीमध्ये आपण अंदाजाने वावरतो. चाचपडत का होईना वावरू शकतो. अशावेळी आपल्या स्मरणात तिथले जे अनुभव असतात, त्याच्या आधारे आपल्या हालचाली सुरू असतात. समोरचे काही डोळ्यांना दिसत नसतानाही आपण वावरत असतो. पण अंधारात चाचपडतानाही आपण सावध असतो. त्या चाचपडण्याला विवेकबुद्धी कारण असते. जागेविषयी जे अनुभव स्मरणात आहेत, तसेच समोर असावे अशा भरवशावर आपल्या हालचाली होत असतात. पण तशाच सर्व वस्तू त्याच जागी असतील आणि जे अंतर तोडले जाते आहे ते अंदाजानुसारच असेल; याविषयी मनातली सावधानता त्या विवेकातून येत असते. यात थोडी जरी गफ़लत झाली, तरी आपण धडपडतो. अगदी उजेडात सुद्धा अशा स्मरणावर आधारीत वा समजुतीच्या आधारे वागले, मग धडपडण्याचे प्रसंग येतात. त्या फ़ाजील आत्मविश्वासालाच अंधश्रद्धा म्हणतात. सामान्य माणूस इतका अनुभवाच्या आधारे जगत असतो, की त्याचा विवेक कायम सावध असतो. म्हणूनच तो जुन्या अनुभवांच्या आहारी सहसा जात नाही. पण शहाण्यांची गोष्टच वेगळी असते.

एकदा आपण अनुभवसंपन्न झालो आणि म्हणूनच पर्यायाने शहाणे झालो अशी समजूत करून घेतली; मग विवेकबुद्धी आपोआपच क्षीण व निकामी होत जाते. अशा स्थितीत माणसे डोळ्यांना दिसणार्‍या वास्तवावर विचारही करायला तयार नसतात. मग ते वास्तव स्विकारणे वा त्यानुसार वागणे दुरापास्तच ना? मग असे शहाणे सतत त्याच चुका करत जातात आणि त्यावर पांघरूण घालण्यासाठी सारवासारव करताना दिसतात. त्यातून मग साध्या विषयातही वितंडवाद होताना दिसतात. याप्रकारे माणूस समजुतीच्या आहारी गेला, मग त्याला जुन्या अनुभवाशी जुळत नाही ते वास्तव बघायचीही भिती वाटू लागते. जितका माणुस शहाणा तितकी अशी समस्या अधिकच जटील असते. कारण सामान्य बुद्धीची माणसे डोळ्यांना दिसणारे वास्तव व येणारा नवा अनुभव लौकर स्विकारून बदलत असतात. पण बुद्धीमान लोकांची अवस्था मोठी दयनीय असते. आपण आजवर ज्या जुन्या अनुभवाच्या आधारे बोललो-वागलो, ते कालबाह्य वा चुकीचे ठरले तर आपण निर्बुद्ध ठरण्याच्या भयाने असे शहाणे पछाडलेले असतात. सहाजिकच ते अवास्तविक होत जातात. एखादा सामान्य माणूस कुठल्या हरिनाम सप्ताहात सहभागी होतो वा आध्यात्मिक कार्यक्रमात भाग घेऊन समाधानी होतो. त्याला मिळणारी मन:शांती त्याला सुखद वाटते. पण जेव्हा आजाराने सतावलेले असते, तेव्हा असा कोणी बुवा महाराज देणारे सल्ले नाकारून तोच सामान्य माणूस डॉक्टरकडे धाव घेतो. त्याचा अर्थ असा माणूस विज्ञाननिष्ठ होत नसतो किंवा अगोदर तो अंधश्रद्ध नसतो. आपल्या गरजेनुसार त्याला उपलब्ध सोयींचा वापर त्याने चालविलेला असतो. विज्ञान मन:शांती देण्याची शक्यता नसते आणि आरोग्याच्या समस्येवर अध्यात्माकडे उपाय नाही, याचे भान सामान्य माणसाला असते. ज्याचा सरसकट अभाव शहाण्यांमध्ये दिसतो.

म्हणून मग अनंतमुर्ति यांच्यासारखा गाढा विद्वान साहित्यिक नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून पळून जाण्याची वेळ येईल असे अत्यंत बालीश वेडगळ विधान करू शकतो. किंवा पिस्तुल मिळाले तर मोदींना गोळ्या घालीन, असे अतिरेकी वक्तव्य विजय तेंडूलकर यांच्यासारखा जाणता लेखक करू शकतो. मग त्यांचे अंधभक्तही त्याचे समर्थन करण्यात आपली बुद्धीमत्ता खर्ची घालू लागतात. कारण त्यांना अनंतमुर्ति वा तेंडूलकर यांचे साहित्य-लिखाण वा विचार आवडलेले असतात. पण अशांचे विचार वा मार्गदर्शन कुठल्या क्षेत्रापुरते मर्यादित आहे, याचा विवेक उरलेला नसतो. आसारामचा भक्तगण त्यांचे प्रवचन ऐकतो. पण त्याने सांगितलेल्या आरोग्यविषयक उपायांना किंमत देत नाही. किंबहूना त्या साधूकडे अशा गैरलागू विषयातले मतही मागत नाही. पण बुद्धीमान भक्तांची अगतिकता बघा, त्यांना आपल्याला भावलेला विद्वान, विचारवंत जगातल्या सर्वच विषयातला सर्वज्ञ वाटत असतो. म्हणूनच अर्थशास्त्रातले अमर्त्य सेन वा साहित्य क्षेत्रातले अनंतमुर्ति नाट्यक्षेत्रातले तेंडूलकर किंवा अशा कुणाचे राजकीय मतप्रदर्शनही शहाण्या अंधभक्तांना अंतिम सत्य वाटत असते. तिथेच गल्लत होऊन जाते. परिणाम असा होतो, की अडाणी अंधभक्तांपेक्षा अनेक शहाणे बुद्धीमान अंधभक्तच अधिक वेडगळ वागताना दिसतात. सार्वजनिक पातळीवर येऊन मुर्खपणाचे प्रदर्शन करताना दिसतात. जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यासारखे मोठेच व्यवहारी आव्हान अशा लोकांपुढे येऊन उभे ठाकते, तेव्हा सर्वच बुद्दीमंतंची बुद्धी लयाला गेल्याचे अनुभव येत असतात. कारण असे शहाणे एका अनुभवाने शिकत नाहीत. फ़सलेल्या जिद्दी जुगार्‍यासारखे ते अधिकच आपल्या मुर्खपणाचे प्रदर्शन मांडू लागतात. त्यातून अधिकच हास्यास्पद होत जातात. सामान्य माणसावर मग अशा थोरामोठ्यांना पोरकट वागताना बोलताना बघायची पाळी येत असते.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची जपमाळ ओढणार्‍या कॉग्रेस पक्षाने त्यांच्या हयातीत बाबासाहेब लोकसभेत निवडून येऊ नयेत यासाठी राजकीय डावपेच खेळले होते. त्यांच्या राजकीय संघटनेला नेस्तनाबुत करण्यासाठी अन्य जाती उपजातीच्या दलित नेत्यांना पुढे करून बाबासाहेबांना नामोहरम करण्याचे डाव खेळलेले होते. पण आज त्याच कॉग्रेसचा वारसा सांगणारा प्रत्येक राजकीय गट आंबेडकरांचा वारसा आपणच पुढे नेल्याचे नाटक रंगवताना दिसतील. गांधीजींनी आणलेले स्वातंत्र्य म्हणजे भांडवलशाही आणि कॉग्रेस म्हणजे देशी भांडवलदार; अशी शेलकी टिका करणार्‍या डाव्यांचा आजचा पवित्रा काय आहे? असे प्रत्येक शहाणे आपापल्या जुन्या अनुभवातून फ़सत आलेले दिसतील. पण आपल्या जुन्या चुका कबुल करणे वा आज होणार्‍या चुका थांबवणे, त्यांना कधीच शक्य झालेले नाही. अंधभक्ताने दैवताची मनोभावे आराधना तपस्या करावी, तितक्या आंधळेपणाने असे जाणते जुन्या अनुभवाच्या आहारी जाऊन कालबाह्य गोष्टीचे अनुकरण करताना दिसतात. पण त्यात संपुर्ण पाडाव झाला, मग नव्याने प्रस्थापित झालेल्या दैवतांच्या पुजापाठाचे नवे कर्मकांड सांगत पुन्हा आपणच शहाणे असल्याचे समाजाच्या गळी उतरवायला खेळी खेळू लागतात. सहा महिन्यांपुर्वी मोदींना हा देश सत्ता देणार नाही आणि स्विकारणार नाही, याची ग्वाही देणार्‍या बुद्धीमंतांची अवस्था आज काय आहे? त्यांची भाषा कोणती आहे? मोदींना लोकांनी कशासाठी मते दिलीत, त्याची आठवण तेच लोक करून देत आहेत, ज्यांनी मोदींना लोक मतेच देणार नसल्याची हमी दिलेली होती. पण त्यातला एक शहाणा तरी आपण लोकसभेचे निकाल लागण्यापुर्वी मुर्खासारखे बडबडत असल्याचे मान्य करतो आहे काय? आजही त्यांच्याकडून तितकाच आंधळा मुर्खपणा इमानेइतबारे चालूच आहे ना? बुद्धीमान असल्याचा भ्रम होण्यातून येणारी ती समस्या आहे.

4 comments:

  1. भाऊ तुमचे काही लेख इतके विचार करायला लावणारे असतात कि तासंतास विचार केला तरी नवे नवे अर्थ समजत जातात.

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख.

    ReplyDelete
  3. भाऊ, एकदम लाजबाब! No तोड at all!

    ReplyDelete
  4. BHAU,,, AAMACHI VIVEK-BUDHI KAMI PADATE SAMAZUN GHYAYALA...

    ReplyDelete