काही गोष्टी समजून घ्यायच्या नसल्या तर आनंद आहे. पण धोके टाळायचे असतील, तर समजून घेण्यात शहाणपणा असतो. पण जेव्हा ‘आज काही तुफ़ानी करूया’ अशा मानसिकतेने माणुस पछाडलेला असतो, तेव्हा धोके समजून घेण्याची इच्छाच पराभव वाटू लागत असतो. कारण त्या धाडसाच्या किंवा जुगाराच्या प्रेमात माणूस पडलेला असतो. उदाहरणार्थ सध्या बंगालमध्ये गाजत असलेले शारदा फ़ंडाचे प्रकरण घेता येईल. लाखो सामान्य गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमा दुप्पट चौपट करून देण्याची अशी योजना काही पहिलीच नाही. गेल्या दोनचार दशकात अशा कित्येक भुरट्या योजना समोर आणल्या गेल्या आणि प्रत्येकवेळी त्यात लक्षावधी लोकांनी आत्महत्या केल्यासारखी आपल्या कष्टाची कमाई बुडवली आहे. मग त्यांना अशा फ़सवणूकीची कल्पनाच नव्हती काय? बहुतांश लोकांना यातल्या पुर्वीच्या फ़सवणूकीची माहिती कधीतरी कानावर पडलेली असते. पण नव्या योजनेचे संयोजक इतक्या सफ़ाईदारपणे नवा सापळा पेश करतात, की त्यावर शंका घ्यायची इच्छाच मरून जाते आणि लोक त्यात गुरफ़टत जातात. त्याला झटपट मिळू शकणार्या पैशाचे वा लाभाचे आकर्षण वेड लावणारे असते. अशावेळी कोणी सावधानतेचे इशारे देऊ लागला किंवा धोके दाखवू लागला तर त्याचा राग येतो. पुढे त्यात फ़सगत झाल्यावर धोका सांगणार्याचे इशारे पटतात. पण तेव्हा वेळ गेलेली असते. राजकारणातही त्यापेक्षा अधिक बुद्धीमान माणसे असतात, असे मानायचे कारण नाही. तिथे तर सामान्य जीवनापेक्षा अधिक मोठा भुलभुलैया असतो. आकर्षक गणिते, समिकरणे मांडली जात असतात. मग त्यात मोठे मोठे धुर्त राजकारणी फ़सले तर नवल कुठले?
१९९९ सालात अवघ्या एकाच मताने अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार लोकसभेत पराभूत झाले. जयललितांनी पाठींबा काढून घेतल्याने पराभूत झाले होते. मग त्यामुळे लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका घेण्याची पाळी आलेली होती. पण देशभरात वाजपेयी यांच्याविषयी जनमानसात सहानुभूती होती. त्यामुळेच पुन्हा भाजपाच्या एनडीएला बहूमत मिळायची शक्यता अजिबात नाकारता येत नव्हती. पण वाजपेयी यांची इतकी लोकप्रियता नव्हती, की त्यावर महाराष्ट्रात उलथापालथ होऊ शकली असती. पण युतीचे शिल्पकार व वाजपेयीच्या विश्वासातले सहकारी म्हणून समोर आलेले प्रमोद महाजन, यांना त्याची भुरळ पडली. राज्यात शिवसेना भाजपा युतीच्या सरकारची मुदत पुढल्या फ़ेब्रुवारीपर्यंत होती. मात्र युतीकडे स्वत:चे निर्विवाद बहूमत नव्हते. १९९५ सालात युतीने सत्ता हस्तगत करण्यासाठी अपक्षांची मदत घेतली होती. कारण युतीला १३८ व त्यांचे तीन बडखोर आमदार मिळालेले होते. ३० हून अधिक अपक्ष त्यांना मिळाले म्हणून युतीची सत्ता बनली होती. अशा अपक्षांच्या कुबड्या झुगारण्यासाठी युतीच्या बहूमताचा मोह चुकीचा म्हणता येणार नाही. शिवाय ऐन निवडणूकीच्या दरम्यान शरद पवार यांनी सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दा उचलून धरला आणि पक्षात फ़ूट पाडली. त्यामुळे महाराष्ट्रात कॉग्रेसची मते विभागून युतीला सहज स्पष्ट बहूमत मिळायचा मोह स्वाभाविक म्हणता येईल. तो वाजपेयींच्या लोकप्रियतेवर बहुमत मिळवायचा मोह महाजनांना झाला. त्यांनी शिवसेनाप्रमुखांना गळ घातली आणि सहासात महिने आधीच महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करण्याची खेळी उरकण्यात आली. थोडक्यात लोकसभेसोबत विधानसभा मतदानाची संधी लोकांना मिळाली. किंबहूना तो प्रमोद महाजन यांचा धुर्त डावपेच होता. काय झाले त्याचे? एकाच वेळी लोकसभा विधानसभेला मतदान करताना मतदाराने कोणता चमत्कार घडवला?
लोकसभेला युतीला चांगल्या जागा मिळाल्या, पण विधानसभेला युती चांगलीच तोंडघशी पडली. मतदानात केवळ एक मिनीटाचा फ़रक होता. पण मतांच्या टक्केवारीत मात्र चांगला आठ टक्के फ़रक पडला आणि त्यामुळे युतीच्या विधानाभेत होत्या त्यापेक्षा बारा तेरा जागा कमी झाल्या. ४८ पैकी ३० जागा युतीने लोकसभेत जिंकल्या. पण विधानसभेत त्या प्रमाणात निदान १५० जागा मिळवायला हव्या होत्या ना? मिळाल्या १२४ जागा. कारण मतदार विधानसभा व लोकसभा निवडताना वेगवेगळा विचार करतो व वेगळा निकष वापरतो. नवा पक्ष काढताना पवार यांनाही दुबळ्या कॉग्रेसला आपण संपवू असे वाटले होते. पण प्रत्यक्षात त्यांचेही फ़ासे उलटेच पडले. आधीच्या विधानसभेत असलेले ८० आमदार पवारांच्या सोबत उमेदवार म्हणून होते, पण निवडणूकीत जिंकू शकले ते ४० आमदार. थोडक्यात पवार व महाजन या दोघाही मुरब्बी नेत्यांनी खेळलेले डाव १९९९ सालात पुरते फ़सले. त्यातून महाजन यांच्यासारखा नेता किती शिकला? २००४ सालाच्या पुर्वार्धात चार विधानसभांच्या निवडणूका झाल्या आणि त्यातल्या तीन जागी भाजपाला मोठे यश मिळाले. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड अशा तीन राज्यातल्या मोठ्या यशाने पुन्हा महाजन भुलले. मोठमोठ्या पत्रकारांनी तेव्हा मध्यावधी लोकसभेच्या कल्पना मांडायला सुरूवात केली. विस्कळीत कॉग्रेस व विरोधकांच्या दुर्दशेचा भाजपाला लाभ होईल, अशा बातम्यांनी दिशाभूल झालेल्या महाजन आदी नेत्यांनी तेव्हाही लोकसभेच्या बरखास्तीचा जुगार खेळला. महाराष्ट्र विधानसभेत १९९९ सालात फ़सलेला डाव, मग पुन्हा राष्ट्रीय पातळीवर खेळला गेला. सहा आठ महिने आधीच लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूका घेण्य़ाची काय गरज होती? पण तिथे उतावळेपणा करण्यात आला. २००४ च्या अखेरीस रितसर लोकसभेच्या निवडणूका होऊ शकल्या असत्या. पण चार राज्यातील यशाच्या लाटेवर स्वार होऊन पुन्हा लोकसभा बरखास्त केली गेली आणि भाजपाच्या वाट्याला किती मोठे यश आले? अनेक मित्र पक्ष सोडून गेले आणि जे शिल्लक उरले होते, त्यांच्या सहकार्याने लढताना भाजपा १८६ वरून १३६ जागांपर्यंत खाली घसरला. मोठे यश मिळण्याच्या हव्यासापायी मुद्दाम खेळलेल्या डावात असे भाजपाने आपलेच नुकसान करून घेतले.
आज जेव्हा स्वबळाचा हव्यास भाजपाने धरलेला आहे आणि त्यासाठी युती मोडण्यापर्यंत मजल मारलेली आहे, तेव्हा त्याच्या परिणामांचा कितीसा विचार केलेला आहे? केला असेल, तर यापुर्वीच्या अशाच खेळीत आपण कशामुळे तोंडघशी पडलो, त्याचा विचार केला असेल काय? शंकाच आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी १९९९ सालात विधानसभा बरखास्तीच्या असल्या खेळीला पाठींबा दिला नसता तर? विधानसभा टिकली असती आणि फ़क्त लोकसभाच उरकली गेली असती तर? राष्ट्रवादी कॉग्रेसला (आठ जागा मिळून) फ़टका बसल्याने त्या पक्षाला पुढली विधानसभा लढवताना फ़ारशी उमेद राहिली नसती आणि कॉग्रेसलाही महाराष्ट्रात डोके वर काढण्याची संधी मिळाली नसती. पण एकत्र निवडणूका झाल्या आणि युतीने मार खाऊन तितक्याच जागा दोन्ही कॉग्रेसला एकत्रित मिळाल्या होत्या. मग अन्य लहानसहान पक्षांना सोबत घेऊन बहुमत जुळवणे शक्य झाले. त्यातूनच मग पवारांना राजकीय गरज म्हणून विदेशी मुद्दा सोडून द्यावा लागला. अपरिहार्यपणे युतीचे राजकारण तब्बल पंधरा वर्षे मागे फ़ेकले गेले. भाजपाचे धुर्त नेते व चाणक्य इतका मोठा धोका जुगार खेळले नसते, तर नैसर्गिक घटनाक्रमात युतीला यश वाढवता आले नसते, तरी टिकवणे शक्य होते. किंबहूना कॉग्रेस व पवारांना सावरण्याची, शिरजोर होण्याची संधी प्रमोद महाजन यांच्या धुर्तपणातून मिळाली नाही काय? लाभासाठी केलेली खेळी उलटली. त्याला उतावळेपणा नाही तर काय म्हणायचे? दिसणार्या वा दाखवल्या जाणार्या फ़ायद्यासाठी बेभान होऊन धावत सुटणार्यांचे असेच होते. पण त्यापासून शिकायचे की नाही? शिकला असता भाजपा, तर आज पंचवीस वर्षाची युती अशी अकस्मात तोडली गेली असती काय? दोन दशकात कार्यकर्त्यांनी पक्षाला मेहनतीतून जितके यश मिळवून दिले, त्याच्या अनेकपटीने भाजपाच्या नेत्यांनी धुर्तपणातून पक्षाचे नुकसान केले, असे निदान आजवरचा इतिहासच सांगतो आहे.
नमस्कार भाऊ.
ReplyDeleteसदर ब्लॉगपोस्ट खूपच पटली. २५ सप्टेंबरला मी हीच उदाहरणे माझ्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिली होती. ती इथे डकवतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
Good luck to BJP.
On this occasion I would like to quote 2 hindi proverbs
समय से पहले और भाग्य से ज्यादा कुछ नही मिलता.
लालच बुरी चीज है.
In 1999 state elections and 2004 national elections it was BJP tactic to go for elections 6 months ago which ultimately resulted in getting them out of power in state for 15 years and at national level for 10 years.
They just don't learn from mistakes.
Calling Sena non - accommodative sounds stupid to me, Sena reduced 18 seats from it's quote to smaller partners (adding most of them was BJP's initiative). You want more partners and more seats at the same time?
If they wanted 50:50 formula with Sena it should have been done at the time of national elections 6 months ago.
Would like to end this note with another Marathi proverb.
डूबणाऱ्याचे पाय डोहाकडे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
विनाशकाले विपरीत बुध्दी
ReplyDeleteखरेच भाजपने स्वत:च पायावर धोंडा पाडून घेतला आहे. युती तोडण्याची कडवट फळे भाजपला चाखावीच लागतील. गर्वाचे घर खाली! श्रीरंग यांनीही योग्य विश्लेषण केले आहे.
ReplyDeleteअतिशय एकतंत्रिपणा भाजपाला महागात पडेल. बोट पुढे केले तरी ते पकडणारे जवळपास कोणी मौजुद नाही अशी वेळ येते की काय! ☣️
ReplyDelete2019 मध्ये भाजपाला ही महाराष्ट्रातली युती तोडलेली तर महाग पडणारच आहे आणि बाकीच्या राज्यतल्या पण छोट्या पक्षांना दाबण्याचा केलेला प्रयत्न याची खुप मोठी किंमत चुकवावी लागणार आहेच.
ReplyDelete