Saturday, October 4, 2014

बंदी मुठ्ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की



प्रत्येक गोष्टीला आपापल्या स्थानी महत्व असते, त्यालाच स्थानमहात्म्य म्हणतात. ती गोष्ट, वस्तु वा घटना; जागा बदलली मग प्रभावशून्य वाटते. परिणामशून्य होऊन जाते. राजकारणाचा घटनाक्रम तितकाच महत्वाचा असतो. त्यात अनेक घटना घडत असतात आणि घडवल्याही जात असतात. ज्या घटना घडतात आणि घडवणे आपल्या हाती नसते, अशा घटनांचा लाभ उठवणे किंवा त्यामुळे आपले शक्य असलेले नुकसान टाळणे, यालाच मुरब्बीपणा म्हणतात. त्याच्या उलट अनेकदा घटनाक्रमामध्ये आपल्याला लाभ होऊ शकेल, अशा घटना घडवायच्या असतात आणि प्रतिस्पर्ध्यांना धक्का देणे वा त्यांची हानी करण्यालाही तितकेच महत्व असते. मात्र या सर्वात वेळेला वा मुहूर्ताला निर्णायक महत्व असते. ती वेळ वा मुहूर्त चुकला, मग लाभासाठी केलेली कृती वा खेळी उलटते आणि प्रतिस्पर्ध्याला लाभ व आपल्याच पदरी तोटा येत असतो. हा सगळा तोल संभाळत केलेल्या खेळाला राजकारण म्हणतात. त्यात अनेकदा माघार घेऊन पुढली पावले सावधपणे उचलावी लागत असतात आणि त्यासाठी अपमान सोसावे लागतात, तसाच अभिमानही गिळावा लागत असतो. पंधरा सोळा वर्षापुर्वी महाराष्ट्रात प्रथमच बिगर कॉग्रेसी सरकार म्हणून युती सत्तारुढ झालेली होती, तेव्हा शिवसेनाप्रमुख आपल्या रिमोट कंट्रोलने सरकार चालवित होते. त्यात शिवसैनिक मंत्री विचलीत होण्याचे कारणच नव्हते. कारण त्यांना साहेबांच्या हस्तक्षेप वा कामपिचक्यांची सवयच होती. पण सत्तेत भाजपाचाही सहभाग होता आणि त्यांचेही मंत्री साहेबांच्या रिमोटमधून सुटत नव्हते. सहाजिकच अनेकदा काही घटना अशा घडल्या, की भाजपाच्या मंत्र्याना अवघडल्यासारखे झाल्यास नवल नाही. मग त्यातून कुरबुरी व्हायच्या आणि माध्यमातून बातम्या झळकायच्या. त्यासंबंधात भाजपा नेत्यांना सवालही केला जायचा. प्रमुख्याने उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे वा प्रमोद महाजन यांना पत्रकार मुद्दाम छेडायचे. अशाच एका पत्रकार परिषदेत याच विषयावर प्रश्न विचारला गेला, की सेनेकडून तुम्ही अवमानित कशाला होत राहिलाय? महाजन यांनी त्याला दिलेले उतर मुरब्बी राजकारणाचा नमूना होता. त्यांनी शांतपणे आपल्या सोबत बसलेल्या डझनभर मंत्र्यांकडे बोट दाखवले आणि ‘परिणाम बघा’. इतकेच उत्तर दिले.

परिणाम म्हणजे काय? कुठल्या परिणामांविषयी महाजन बोलत होते? त्यांनाच राज्यातल्या सेना-भाजप युतीचे शिल्पकार आजही म्हटले जाते. ती युती कशी व कोणत्या कारणास्तव झाली, त्याचा संदर्भ जोडला तरच ‘परिणाम’ शब्दाचा अर्थ लागू शकतो. युतीमुळेच भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचणे शक्य झाले. अन्यथा महाराष्ट्रात भाजपा इतकी मजल मारू शकला नसता, असेच त्यांना सुचवायचे होते. शिवसेनेशी युती केल्यामुळेच भाजपाने इतकी मोठी मजल पुढल्या आठ वर्षात मारली. सेनेचा पाठींबा व मदत नसती, तर भाजपाला तितकी मजल मारणे अन्य कुठल्याही पक्षासोबत जाऊन शक्य झाले नसते, हाच महाजनांचा रोख होता. कारण त्याच्याहीपुर्वी म्हणजे १९८४ सालात भाजपाने सेनेशी हातमिळवणी केली होती. पण उपयोग झाला नव्हता आणि नंतर विधानसभेला शरद पवारांच्या पुलोदशी जुळवून घेऊनही भाजपा २० आमदारही निवडून आणु शकला नव्हता. मात्र १९८६ नंतर सेनेने राज्यात धोडदौड सुरू केली आणि तिचा प्रभाव वाढत गेला, त्यात मोठ्या प्रमाणात भाजपा व संघाचे लोकच सहभागी होऊ लागले होते. त्यामुळे वेळीच सावध होऊन महाजन यांनी पुन्हा सेनेशी युतीचा पवित्र घेतला होता. १५-१६ आमदारांवर दिर्घकाळ अडकलेला भाजपा, त्या युतीने थेट चाळीशीच्या पुढे नेलेला होता. तितका लाभ अन्य कुठल्याही पक्षाशी युती मैत्री करून भाजपा मिळवू शकला नव्हता. सत्तेपर्यंत जाऊन मंत्रीपदे मिळवणे तर दूरची गोष्ट होती. पण नव्याने उदयास आलेल्या राज्यव्यापी शिवसेनेच्या पाठींब्याने वा मदतीने भाजपा मोठा राजकीय पक्ष बनला होता. तेवढेच नाही, भुजबळ यांनी सेनेत फ़ुट पाडल्यावर सेनेच्या आमदारांची संख्या कमी झाल्यावर पहिल्यांदाच भाजपाला विधानसभेतील विरोधी नेतेपदापर्यंत मजल मारता आलेली होती. अशी कल्पनाही त्यापुर्वी भाजपा करू शकलेला नव्हता. पुढल्या विधानसभा निवडणूकीत युती बहूमताच्या दारात जाऊन उभी राहिली आणि भाजपाला उपमुख्यमंत्रीपद अधिक डझनभर महत्वाची मंत्रीपदे मिळू शकली होती. इतकी मजल ज्या मित्राच्या मदतीशिवाय मिळूच शकली नसती, त्याने किरकोळ पाणउतारा हेटाळणी केली, तर फ़ारसे मनाला लावून कशाला घ्यायचे? त्यापेक्षा पदरात पडलेल्या लाभाकडे बघायला हवे. असेच ‘परिणाम बघा’ या दोन शब्दातून महाजन यांना सुचवायचे होते.

अर्थात त्याहीपेक्षा एक महत्वाची खेळी युतीचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रमोद महाजन यांनी खेळली होती, त्याबद्दल क्वचितच खुले मतप्रदर्शन त्यांनी केलेले असावे. मला नेमके आठवत असेल, तर तेव्हा महाराष्ट्र टाईम्सच्या संजीव साबडे यांनी दिल्लीत घेतलेल्या मुलाखतीमध्ये महाजन यांनी त्याबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर तसे बोलायचे महाजनांनी कटाक्षाने टाळले होते. शिवसेनेचा राज्यातील वाढता प्रभाव ओळखून महाजन यांनी युतीचा प्रस्ताव मातोश्रीपुढे मांडला. त्यावेळी सेनेकडे विधानसभेत अवघे दोन आमदार होते आणि त्यातला एक रमेश प्रभू तर पोटनिवडणूकीत जिंकलेला होता. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे नव्याने स्थापन झालेल्या औरंगाबाद महापालिकेत सेनेने प्रथमच उतरून ६० पैकी २७ जागा जिंकताना, त्या पालिकेतला भाजपा संपवला होता. नगरपालिकेत ११ नगरसेवक असलेल्या भाजपाला महापालिकेत एकही सदस्य निवडून आणता आला नव्हता. लक्षणिय गोष्ट म्हणजे सेनेच्या २७ पैकी तीन नगरसेवक मुळात संघाचे स्वयंसेवक होते. म्हणजेच भाजपाचा राजकीय वारसा मानणारा मोठा हिंदूत्ववादी कार्यकर्ता सेनेकडे झुकू लागला होता आणि तोच प्रवाह रोखण्यासाठी हिंदूत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन सेनेच्या सोबत जाण्याचा पवित्रा भाजपा व महाजन यांनी इथे घेतला होता. त्याचीच ग्वाही त्यांनी मुलाखतीतून दिली होती. आठ वर्षांनी ‘परिणाम बघा’ शब्दाचा संदर्भ त्याच्याशी जोडता येतो. पण त्याहीपेक्षा महाजन यांनी खेळलेली मोठी धुर्त राजकीय खेळी होती, शिवसेनेला स्वत:च्या राजकीय शक्तीबद्दल गाफ़ील ठेवण्याची. महाजन यांचा तोच धुर्त डाव त्यांच्याच पठडीत तयार झालेल्या त्यांच्याच वारसांनी उधळून टाकला आहे. आज महाराष्ट्रात पाव शतकापासून चालत आलेली सेना भाजपा युती तुटल्याचे अगत्याने सांगितले जाते. पण त्या युतीमागचा धुर्तपणा काय होता आणि तो कसा उलटला; त्याचे रहस्य कोणीच उलडलेले नाही. महाजनांच्याच चेल्यांनी आपल्याच गुरू चाणक्याचा डाव त्यातून कसा उलटवला?

प्रमोद महाजन यांची सर्वात मोठी धुर्त खेळी होती, ती नव्याने उदयास आलेल्या राज्यव्यापी शिवसेनेला आपल्या खर्‍या राजकीय ताकदीचा अंदाजही येऊ न देण्यातली. १९८८ सालात डॉ. रमेश प्रभू आणि औरंगाबाद पालिका निकालनंतर सेनेची राज्यव्यापी शक्ती, वाढली तरी तिच्या शहरी वा मुंबईकर नेत्यांना त्याची सुतराम कल्पना नव्हती. तिची चाहुल लागली असती तरी सेनेने कधीच भाजपाला युती करताना समान दर्जाने वागवले नसते. म्हणूनच शिवसेनेला विधानसभेच्या राज्यव्यापी निवडणूका स्वबळावर लढण्यापुर्वीच महाजनांनी युतीत गोवले. सहाजिकच सेनेला अजून आपली राज्यातली खरी शक्ती आजमावता आलेली नाही. यावेळी प्रथम सेनेला ती आजमावता येणार आहे. समजा १९९० सालात तसे झाले असते तर, सेनेला ५२ जागा जिंकता आल्या नसत्या. पण भाजपालाही सेक्युलर मित्रपक्ष वा स्वबळ वापरून ४२ जागा जिंकता आल्या नसत्या. कारण तोपर्यंत ४ ते १६ इतकीच मजल त्या पक्षाने मारलेली होती आणि सेना तर मुंबई ठाण्यापुरतीच होती. पण १९८८ नंतर विस्तारलेल्या सेनेने १९९० स्वबळावर लढवून २०-२५ आमदार नक्कीच आणले असते आणि मग प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील आपली ताकद तिला उमगली असती. तिच्या तुलनेत भाजपा किरकोळच दिसला असता आणि भाजपा समान दर्जाचा मित्र म्हणून युतीत सहभागी होऊ शकला नसता. पहिल्या दिवसापासून सेनेचा वरचष्मा राहिला असता. कितीही वादावादी झाली तरी महाजन-मुंडे यांनी युती कायम राखून सेनाप्रमुखांना आपल्या खर्‍या शक्तीचा अंदाज येऊ नये, याची काळजी धुर्तपणे घेतलेली होती. यावेळी ती अमूल्य संधी भाजपाच्या नेत्यांनी आणि विशेषत: महाजन शिष्यांनीच पुढल्या पिढीतल्या ठाकरेंना म्हणजे उद्धव ठाकरे यांना दिलेली आहे. त्यामुळे यावेळी नुसत्या जागा कुठला पक्ष जास्त जागा मिळवतो, इतकाच प्रश्न नसून सेनेला आपल्या शक्तीची चाचणी घेण्याची अपुर्व संधी लाभली आहे. पंचवीस वर्षे राज्यव्यापी पक्ष असलेला हा पक्ष, प्रथमच आपली खरीखुरी राज्यातली ताकद आजमावतो आहे. त्याचे तोटे निकालानंतरच्या राजकारणात स्थानिक भाजपाला व नेत्यांना भोगायची पाळी येणार आहे. त्याला अजून दोन आठवडे बाकी आहेत. पण पंचवीस वर्षे मुंडे-महाजनांनी झाकली मूठ ठेवली होती, ती उघडण्यात आजच्या भाजपा नेत्यांनी शहाणपणा केला की घोडचुक केली, त्याचा निकाल १९ आक्टोबरला लागणार आहे.

4 comments:

  1. भाऊराव,

    एकंदरीत शिवसेनेच्या जिवावर भाजपची मजा चालली होती. आता फक्त शिवसेनेचं नाव काढून मोदींचं नाव घालायचं. बाकी सगळा तपशील तोच.

    महाराष्ट्राने भाजपला निवडून दिलं तर त्याच्या नेत्यांचा ऐतखाऊपणा वाढेल.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. भाऊसाहेब महापालिकेत गेली अनेक वर्षं शिवसेनेची सत्ता आहे, पण मुंबईची काय अवस्था करून ठेवलीय या लोकांनी. यांच्या हाती महाराष्ट्र कसा द्यायचा? महापालिकेचे रस्ते बघा, सगेळॆ नगरसेवक गब्बर झाले पण मुंबईची रया गेली. त्या बद्दल लिहाच एकदा.

    ReplyDelete
  3. अति'शहा'णा त्याचा बैल रिकामा.

    ReplyDelete
  4. भाऊ, आपल्यामुळे आम्हाला राजकारणातील नवीन नवीन पैलुंची माहिती होते. आपले विश्लेषण पूर्ण आकडेवारीनुसार असते. आपण आम्हाला राजकीय शिक्षित करत आहात. धन्यवाद!

    ReplyDelete