चला, प्रचाराची रणधुमाळी संपली. प्रत्येक पक्षाने व उमेदवाराने आपल्यालाच मते मिळावीत म्हणून उठवलेले रान, आता शांत झाले आहे. कारण प्रचाराची मुदत संपली आहे. पण अजून खरी निर्णायक लढाई बाकीच आहे. खरे सांगायचे तर आजवर रान उठवले, त्याची शिकार उद्या व्हायची आहे. रान उठवणे म्हणजे झाडाझुडपात लपून बसलेल्या जनावराला उघड्यावर आणणे व त्याची शिकार करणे. निवडणूकीच्या लढाईत प्रचाराला कितीही दिवस असोत. त्यातला निर्णायक दिवस मतदानाचा असतो. कारण त्याच दिवशी खरीखु्री तुंबळ हाणामारी होत असते. ज्यांचे उंबरठे झिजवले, त्यांनी त्याच दिवशी ठरल्या वेळेत मतदान केंद्रात जाऊन मत देणे आअश्यक असते. असे जे मतदार तिथे जाऊन आपले मत नोंदवतात, त्यांचाच प्रभाव निवडणुक निकालावर पडत असतो. अन्यथा किती नोंदलेले मतदार आहेत आणि कितीजण कुठल्या पक्ष उमेदवाराचे समर्थक असतात, त्याने काडीमात्र फ़रक पडत नाही. जी मते नोंदवलेली म्हणजे यंत्रात बंदिस्त होतात, त्यांच्याच मोजणीवर शेवटी निकाल लागणार असतो. म्हणूनच लोकशाहीच्या आखाड्यात मतदानाचा दिवस व पराक्रम खरा निकाली सामना असतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व नरेंद्र मोदी यांनी तिथेच मोठी बाजी मारली होती. त्यानंतरही अनेकदा मोदींनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्याचाच उल्लेख केलेला होता. मतदान केंद्रात आपल्या पाठीराख्यांना घेऊन येईल, तोच खरा निवडणूकीतला लढवय्या असतो. त्याला कार्यकर्ता म्हणतात. त्याच्याकडून जितके मतदान घडवले जाते, त्यावर निकाल अवलंबून असतो. कारण जितके आपले पाठीराखे अनुयायी अधिक मतदान करतील, तितका मतातील आपला हिस्सा वाढत असतो. त्यामुळेच त्या त्या मतदारसंघात आपला वा पक्षाचा उमेदवार जिंकू शकत असतो. म्हणूनच उद्याचा दिवस खुप निर्णायक महत्वाचा आहे.
तुम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असा पाठीराखे असा. तुम्ही कुणाचाही प्रचार करायला कष्ट उपसलेले असोत, किंवा कुणाला निवडून आणायची इच्छा असो, त्यासाठी उद्याचा दिवस खुप महत्वाचा आहे. कारण इथे मतदानाची लढाई आहे आणि त्यात ज्याला हरायचे वा जिंकायचे आहे, त्यापैकी कोणीच लढू शकत नसतो. लढायचे असते ते मतदाराला. कारण ही मतदानाची लढाई आहे. त्यातला खरा लढवय्या मतदारच असतो. कारण जितकी मते अधिक तितका, उमेदवार विजयी होण्याची शक्यता वाढत असते. सहाजिकच प्रचारातून विविध पक्ष व उमेदवार आपल्या पाठीराख्यांना आवाहन करत असतात. पण तेवढ्यावर सामान्य नागरिक बाहेर पडून मतदान करीलच, याची सहसा हमी नसते. साधारणपणे निम्मे मतदार स्वेच्छेने मतदानाला जात असतात. त्यात मग सर्वच पक्षांचे पाठीराखे सहभागी असतात. म्हणुन अशा मतांची नैसर्गिक विभागणी होत असते. त्यात ज्याचे पारडे जड असते, त्याला सहज विजय मिळू शकतो. पण इथे जो उमेदवार आपल्याला मिळावे म्हणून खुप प्रयत्नशील असतो, त्याच्यामुळे मतदानात वाढ होते. उदासिन रहाणारा वा कंटाळा म्हणुन घरीच बसणारा आपल्या परिचयातला मतदार कार्यकर्ता बाहेर काढू शकला, तर मतदानात मोठी घसघशीत वाढ होते. अशा प्रकारे वाढवलेले सर्वच मतदान आपल्याच पारड्यात पडायची शक्यता असतेच असेही नाही. पण जो मतदार कुणाच्या आग्रहाला बळी पडून मत द्यायला घराबाहेर पडतो, तो सहसा त्याच उमेदवाराला मत देण्याची शक्यता अधिक असते. साधारणत: दहापैकी सात आठ मतदार याप्रकारे कार्यकर्त्याच्या आग्रहाने बाहेर पडल्याने, त्याच पक्षाच्या झोळीत आपले मत टाकतात. कारण कार्यकर्तेही अशाच लोकांच्या गळी पडू शकत असतात. म्हणुनच कार्यकर्त्याचे प्रयास उद्या खुप महत्वाचे ठरतील. कारण उद्याच निर्णायक दिवस आहे.
गेल्या लोकसभा निवडणूकीत आजवरच्या इतिहासातले विक्रमी मतदान झालेले होते. ते व्हावे यासाठी भाजपाने योग्य रणनिती आखलेली व राबवलेली होती. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्र हे युद्धक्षेत्र असल्याप्रमाणे व्युहरचना केलेली होती. परिणाम म्हणून अंदाजे देशभरात चौदा कोटी मतदान संख्येने वाढले, त्यासाठी भाजपाने खुपच प्रयास केलेला असल्याने त्याच्या मतांमध्ये भरघोस म्हणजे साडे नऊ कोटी मतांची वाढ झाली. जवळपास २००९च्या तुलनेत भाजपाची मते दुप्पट झाली. तितके प्रयास कॉग्रेस वा अन्य पक्षांकडून झाले नाहीत. सहाजिकच त्याचा योग्य लाभ भाजपाला मिळू शकला. अपेक्षेपेक्षा प्रचंड मतांनी भाजपाचे उमेदवार निवडून आलेच. पण जिथे म्हणून मतदान वाढले, तिथे भाजपाला यश सहजगत्या मिळवता आले. याची उलट बाजू अशी, की तीनच महिन्यांनी उत्तर प्रदेश, बिहार वा गुजरातमध्ये रिकाम्या जागी पोट निवडणूका झाल्या. या बहुतेक जागा भाजपाच्याच हक्काच्या होत्या. पण तिथे मोठ्या प्रमाणात भाजपाचा दारूण पराभव झाला. यातल्या बहुतेक जागा विधानसभा निवडणूकीत भाजपाने जिंकलेल्या होत्या. पण तेच आमदार लोकसभेत पुन्हा निवडून गेल्याने रिकाम्या जागी पोटनिवडणूका झालेल्या होत्या. मग तीन महिन्यात तिथली मोदींची जादू वा लाट संपलेली होती काय? तसे अजिबात नव्हते. लोकसभेसाठी जे रान उठवण्यात आलेले होते आणि मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी जितकी मेहनत घेतली होती, तितका प्रयास पोटनिवडणूकीच्या वेळी झाला नाही. मतदान खुपच रोडावले आणि त्याचेच प्रतिबिंब निकालावर पडले. हक्काच्या जागा भाजपाच्या उमेदवारांना गमावण्याची नामुष्की आली. त्याचे प्रमुख कारण जबाबदारी म्हणून मतदान करणारा सर्वत्र समान विभागला जातो आणि अगत्याने घराबाहेर काढून केंद्रात नेलेला मतदार आपल्याला साथ देत असतो. त्याचा विसर पडलेल्या भाजपाला फ़टका बसला.
कॉग्रेस किंवा राष्ट्रवादी हे पक्ष एकच गोत्रातले आहेत आणि शतायुषी पुर्वेतिहास त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे गाधी-नेहरूंची पुण्याई त्यांच्या पदरात ठराविक मते घालत असते. तितकी पुण्याई अजून भाजपा, शिवसेनेकडे नाही. त्यांचाही एक ठराविक मतदार आहे. पण तो बहुतांश मतदारसंघात निर्णायक नाही. या पक्षांना आपला चहाता केंद्रात आणावा लागतो. त्यासाठी जितकी मेहनत बिगर कॉग्रेस पक्ष घेतात, तितका त्यांचा लाभ होत असतो. तामिळनाडू, बंगाल, बिहार यासारख्या राज्यात कॉग्रेसची पुण्याई संपुष्टात आलेली असल्याने त्यांचा मतांचा टक्का घसरलेला आहे आणि चहात्याला घराबाहेर काढणार्या कार्यकर्त्याची फ़ौज त्यांच्यापाशी राहिलेली नाही. म्हणूनच तिथे अजून कॉग्रेसला मतांचा नगण्य हिस्सा प्रयत्नाशिवाय मिळतो. पण विजयापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रात बिगर कॉग्रेसी पक्षांची आहे. त्यांची ठराविक मते पक्की असली, तर घरबसल्या मिळतील इतकी पुण्याई पदरी नाही. म्हणुनच मोजके मतदारसंघ सोडल्यास सेना भाजपा यांना प्रचंड मेहनत घेऊन मतदार घराबाहेर काढणे आवश्यक ठरते. नुसत्या प्रचारावर विसंबून भागत नाही. यावेळी तर निवडणूका चौरंगी आहेत. त्यामुळे ज्याला २५-३५ टक्के मते मिळतील, त्याच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडणार आहे. सहाजिकच मतदान जितके वाढवता येईल, तितकी त्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता वाढणार आहे. उलट जो आळशीपणा करील वा ज्याचे कार्यकर्ते ढिले रहातील किंवा आपला मतदार उदासिन राहू देतील, त्यांच्या पराभवाची हमीच देता येईल. म्हणूनच गेला महिनाभर काय रामायण झाले, त्यापेक्षा उद्या होणारे मतदान वा त्याची वाढणारी टक्केवारी, खरा परिणाम घडवणार आहे. म्हणून दिवस वैर्याचा आहे समजून प्रत्येक कार्यकर्ता आणि उमेदवार किती मोठ्या संख्येने मतदार बाहेर काढणार, त्यावर त्यांचे भविष्य अवलंबून असेल.
भाऊ, १००% खरे आहे!
ReplyDelete