Thursday, February 28, 2019

लौकरच घोषणा

EVM के लिए इमेज परिणाम

नुकतीच सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांची बैठक आयोगाने घेतलेली होती आणि त्यात देशव्यापी मतदान प्रक्रीयेच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आलेला आहे. सोळाव्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन नुकते़च पार पडले आणि सदस्यांनीही एकमेकांचे निरोप घेण्यापासून सदिच्छा देण्यापर्यंतचे सोपस्कार पार पडलेले आहेत. मात्र त्या लोकसभेची मुदत अजून संपलेली नाही. ती मुदत ३ जूनपर्यंत आहे आणि अन्य चार विधानसभांच्याही मुदती त्याच आसपास संपणार असल्याने त्यांचेही मतदान याच काळात होईल. त्यात सिक्कीम. आंध्रप्रदेश, अरुणाचल आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. त्या राज्यात लोकसभेसह विधानसभेसाठीही एकाचवेळी मतदान उरकले जाईल. सोळाव्या लोकसभेच्या निवडणूकीत देशभरच्या मतदारांची संख्या ८१ कोटी ४५ लाख इतकी होती, ती यावेळी अंदाजे ९० कोटींच्या आसपास जाईल अशी अपेक्षा आहे. ही अर्थातच मतदानाचा अधिकार असलेल्या व नोंदलेल्या मतदारांची संख्या आहे. प्रत्येक निवडणूकीच्या दरम्यान अनेक नागरिकांची आपले नाव यादीत नसल्याची वा वगळले गेल्याची तक्रार असते. त्या तक्रारी कमी करण्यासाठी आयोगाकडून सातत्याने प्रयास होत असतात. मात्र तरीही सगळ्या तक्रारी संपण्याची शक्यता कधीच नसते. कारण आधी सार्वत्रिक पातळीवर घरोघरी जाऊन मतदारांची नोंदणी होत असते आणि अशावेळी घरी हजर नसलेल्या व्यक्तींची नोंद होऊ शकत नाही. काही वेळी घर बंद असल्यानेही नोंद व्हायचे राहून जाते. तर कधी कर्मचार्‍यांच्या वेंधळेपणानेही गफ़लती होऊन जातात. ह्या गल्लती टाळायला अनेक उपाय योजले जात असतात आणि नवे उपायही शोधले जातात. आताही पुन्हा एकदा नव्याने मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्याचे काम झालेले आहे.

मतदान यंत्राविषयी तक्रारी व शंका असल्याने त्याही दुर करण्याची मोहिम काही महिने आयोगाने राबवलेली आहे. तालुका पातळीवर महसुल विभागातर्फ़े गावोगावी लोकांना या यंत्राचा तपशील समजावून सांगणारी व प्रात्यक्षिके घडवणारी पथके कामाला जुंपण्यात आलेली होती. म्हणून तक्रारी संपतील अशी अपेक्षा अजिबात नाही. नव्या काही गफ़लती व तक्रारी येऊ शकतील. त्यात दुरुस्ती पुढल्या निवडणूक काळात होऊ शकतील. कारण इतक्या मोठ्या प्रयोगाचे नियोजन करण्यासाठी आता खुप कमी अवधी राहिलेला आहे. आता प्रत्यक्ष मतदान व निवडणूक प्रक्रीयेवरून अंतिम हात फ़िरवणात आयोग गर्क आहे. त्यात निवडणूक प्रक्रियेत सहभागी करायचे विविध खात्यातील अधिकारी, कर्मचारी ठरवले जात आहेत. कालखंडासह मतदानाच्या फ़ेर्‍या ठरवण्याची तयारी चालू आहे. शिवाय इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी आवश्यक काटेकोर सुरक्षा आणि त्यासाठी पुरेसे सुरक्षा बळ उपलब्ध करून देण्याचे समिकरण मांडले जात आहे. त्यासाठीच अनेक फ़ेर्‍यांमध्ये मतदान ठेवून एका जागच्या सुरक्षा तुकड्या अन्यत्र हलवण्याची योजनाही आखावी लागत असते. सोळाव्या लोकसभेचे मतदान एकूण दहा फ़ेर्‍यांमध्ये पार पाडले गेले होते. त्यातली पहिली फ़ेरी ७ एप्रिल २०१४ रोजी झाली होती आणि अखेरची फ़ेरी १२ मे २०१४ रोजी उरकली गेली होती. त्यानंतर चार दिवसांनी देशभर एकूण मतमोजणी सुरू झालेली होती. यंदाही त्याच्याच आसपास मतदानाचे वेळापत्रक ठरवले जाईल, यात शंका नाही. अशा वेळापत्रकामध्ये विविध शाळा कॉलेज विद्यापीठाच्या परिक्षा व धार्मिक सणासुदीचाही विचार करावा लागतो. या खंडप्राय देशाच्या विविध भागात धर्मानुसार व संस्कृतीनुसार उत्सव किंवा सुट्टीचे दिवस येत असतात. त्याकडे पाठ फ़िरवून मतदानाचे वेळापत्रक बनवता येत नाही.

मागल्या खेपेस ८१ कोटी मतदार आणि ९३ लाख मतदानकेंद्रे होती. यंदा त्यात भर पडू शकेल. सुरक्षा हा अलिकडे निवडणूक कालखंडातील मोठा जिकीरीचा विषय झाला आहे. त्यात नक्षलग्रस्त वा कुठल्याही कारणाने संवेदनशील मानल्या जाणार्‍या भागात मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागतो. अशा समस्येने भेडसावलेल्या राज्यात अनेक फ़ेर्‍यांमध्ये मतदान उरकावे लागत असते. झारखंड, छत्तीसगड, ओडिशा व बिहार या राज्यातील काही मतदारसंघ अशा वर्गातले आहेत. बंगाल हा तसा नक्षलग्रस्त प्रदेश नाही. पण तिथे राजकीय गुंडागर्दी इतकी भयंकर आहे, की चारदोन जागांसाठी एक फ़ेरी अशा संथगतीने मतदान घ्यावे लागते. महाराष्ट्रात ४८ जागा असून दोन फ़ेर्‍यांमध्ये मतदान संपते आणि बंगामध्ये ४२ जागांसाठी सहा सात फ़ेर्‍या घ्याव्या लागतात. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात येथे एकाच दिवशी सर्व मतदान उरकले जात असताना ११ सदस्यांसाठी छत्तीसगडमध्ये मात्र तीनचार फ़ेर्‍या कराव्या लागतात. बंगालमध्ये गतवर्षी झालेल्या स्थानिक निवडणूकांमध्ये ७० टक्के जागा बिनविरोध भरल्या गेल्या. त्यामुळे तिथे दहशतीला पायबंद घालण्यासाठी किती सुरक्षा व्यवस्था मोठी लागत असेल, त्याचा अंदाज येतो. सहाजिकच हे सुरक्षा सैनिक पोलिसांचे बळ आणि एकूण वेळापत्रकाची सांगड घालणे सोपे काम नाही, हे लक्षात येऊ शकते. सध्या तेच काम सुरू असून त्याच्यावरून शेवटचा हात फ़िरवला जात आहे. एकदा त्याला अंतिम स्वरूप दिले गेले मग या आठवड्यात त्याची घोषणा होईल. मग त्या क्षणापासून आचारसंहिता लागू होईल.

थोडक्यात राजकीय घोषणा वा राजकीय आमिषे दाखवण्याची मुदत संपत आलेली आहे. प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आणि अर्ज भरण्याचा पहिला दिवस यात किमान २८ दिवसाचे अंतर असते. म्हणूनच ७ किंवा १० एप्रिल रोजी पहिल्या फ़ेरीचे मतदान करायचे असेल, तर त्याची प्रक्रीया ७ वा १० मार्चपुर्वी सुरू व्हावी लागेल. म्हणजेच त्याची घोषणा ७ मार्चपुर्वी व्हावी लागेल. ही कालमर्यादा लक्षात घेतली तर एकूण निवडणूकीचे वेळापत्रक साधारण ३ ते ७ मार्च दरम्यान जाहिर व्हायला पर्याय उरत नाही. ३ मार्चला रविवार आहे, त्याही दिवशी आयोग घोषणा करू शकतो किंवा पुढल्या दोन दिवसात करू शकतो. त्यानंतर सगळ्या पक्षांना आचारसंहितेची वेसण घातली जाईल.


Wednesday, February 27, 2019

युद्धस्य कथा रम्य:

imran addressing nation के लिए इमेज परिणाम

संस्कृतमध्ये असे एक वचन आहे. त्याचा अर्थ असा, की युद्धाच्या कथा ऐकायला वाचायला खुप मनोरंजक व थरारक असतात. कारण त्या आपल्या आयुष्यातल्या नसतात. ते कथाकथन असते. त्यातले नाट्य कोणालाही भावते. प्रामुख्याने त्या परिस्थितीचा अनुभव ज्यांच्या वाट्याला आलेला नसतो, त्यांच्यासाठी त्या कथा आकर्षक असतात. पण प्रत्यक्षात ज्यांनी युद्ध भोगलेले आहे, अशा लोकांसाठी त्या कथा रम्य किंवा मनोरंजक नसतात. तर अंगावर शहारे आणणार्‍या असतात. राजकीय पुढार्‍यांना किंवा समाजाला चिथावण्या देणार्‍यांना त्यात कितीही मर्दुमकी दाखवता येत असली, तरी व्यवहारात असे लोक अतिशय सुरक्षित बंदोबस्तामध्ये बसलेले असतात. सामान्य सैनिक वा राखणदार त्यात आपला जीव किंवा संर्वस्व पणाला लावत असतो. म्हणूनच मागल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानातून जी युद्धाची भाषा राजरोस बोलली जात होती, तिला अकस्मात लगाम लावला गेला आहे. मंगळवारी पहाटे भारताने पाक भूमीत घुसून जो हवाई हल्ला केला, त्यानंतर पाकिस्ताननेही भारतीय हद्दीत विमाने पाठवून नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तीन विमानांना भारतीय हद्दीतून तात्काळ पळवून लावले गेले. त्यातले एक विमान भारतीय प्रतिहल्ल्याचे शिकार झाले आणि एक भारतीय विमानही पाठलाग करताना पाकिस्तानी प्रदेशात पाडले गेले. एक भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात सापडला आहे. इतके झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची नरमलेली भाषा अनेकांना चकीत करणारी आहे.

मंगळवारच्या भारतीय हल्ल्यानंतर तावातावाने बदल्याची भाषा करणारे पाकिस्तानी नेते व सेनाधिकारी; किरकोळ हुलकावणी देणारा हल्ला केल्यावर अधिक जोशात येतील अशी अपेक्षा होती. उलट इमरानखान यांनी पुलवामा येथील घातपाती हल्ल्याची चर्चा व तपास करण्याची भाषा बुधवारी वापरली,. ती तर्काला धक्का देणारी आहे. आम्हीही प्रतिहल्ला केला. असाच भारताला चोख धडा शिकवू; असे बोलणे त्यांच्याकडून अपेक्षित होते. कारण भारताचा निदान एक पायलट त्यांच्या ताब्यात गेलेला आहे. पण तसे झालेले नाही आणि युद्ध नको असली शरणागतीची भाषा इमराननी वापरलेली आहे. त्याची मिमांसा म्हणूनच अगत्याची आहे. जगभरातून भारतीय हल्ल्याचे अनेकांनी समर्थन केले आणि पाकचा मित्र चीननेही पाकिस्तानला सबुरीचा सल्ला दिलेला आहे. आजवरचा पाठीराखा अमेरिकाही भारताच्या बाजूने बोलत आहे. त्यामुळेच पाक एकाकी पडला आहे आणि स्वत:ची लढण्याची कुवतही पाकिस्तान ओळखून आहे. मुशर्रफ़ यांनी पुलवामानंतर त्याचीच ग्वाही दिलेली होती, उठसुट अण्वस्त्रांच्या धमक्या देणारा पाक असा बादलून गेला, त्यामागे वस्तुस्थितीची जाणिव आहे. भारताच्या मुकाबल्यात आपला दोन आठवडे टिकाव लागणार नाही आणि बघता बघता पाकचे तुकडे होऊन जातील, हे त्यामागचे भय आहे. पाकिस्तान नावाचे अराजक आपल्याच अंधाधुंदीच्या ओझ्याखाली चिरडू लागले आहे. भारतापासून पाकिस्तानला धोका आहे आणि लष्करच पाकिस्तानला एकसंघ राखू शकते; ही समजूत घालून देण्यात आल्यामुळे गरीबी व दरिद्री अवस्थेतही पाकिस्तानी जनता लष्कराच्या पाठीशी राहिली आहे. त्याच बळावर पाक सेनाधिकारी सतत राजकीय सत्ता आपल्या मुठीत राखू शकले आहेत. राजकारण्यांना आपल्या बोटावर खेळवू शकले आहेत.

पाकसेनेला भारतीय हवाई हल्ला रोखता आला नाही आणि भारताला उत्तरही देता आले नाही, असे पाक जनतेच्या मनात रुजले तर पाकच्या लष्करी सत्तेचा तो अस्त असेल. म्हणूनच तात्काळ कुठलाही विचार न करता वा आखणी केल्याशिवाय पाक हवाई दलाने भारतीय हद्दीत तीन लढावू विमाने पाठवली. आपणही भारतीय हवाई हद्दीचा भंग केल्याचा देखावा उभा केला. त्यात कुणाचा बळी गेला नाही, की कुठले नुकसान झालेले नाही. तशी आखणी व रणनितीच नसेल तर दुसरे काय व्हायचे? आपणही प्रतिहल्ला केला, इतकेच त्यांना दाखवायचे होते आणि त्यात पाकिस्तान यशस्वी झाला. आपल्याच जनतेची दिशाभूल करायचा त्यातला हेतू लक्षात घेतला, तर इमरानखान युद्ध नको म्हणून गयावया कशाला करीत आहेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. युद्ध झालेच तर आठवडाभरही पाकिस्तानचा टिकाव लागणार नाही. कारण युद्ध खर्चिक असते आणि पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट आहे. अमेरिकेने भिक घालणे थांबवले आहे आणि चिनच्या कर्जाखाली पाकिस्तान चिरडलेला आहे. चिनी गुंतवणूकीला युद्ध झाल्यास मोठी हानी सोसावी लागेल आणि त्यात चिनी पैसा बुडीत जाण्याचा धोका कळलेला चीनही पाकला सबुरीचा सल्ला देतो आहे.

पाकिस्तान एक अराजक आहे आणि त्याचे चारपाच तुकडे पडले, तर भारताला हवे आहेत. पण तशा स्थितीत चीनचे कित्येक अब्ज डॉलर्स कुणाकडून वसुल करायचे; अशी भ्रांत चिनलाही सतावते आहे. सहाजिकच पाकने भारताला हैराण करावे अशी चीनची तीव्र इच्छा असली, तरी आपल्या पदराला खार नको असाही सावधपणा आहे. त्यानेच कान पकडलेला असल्याने इमरानखान यांनाही युद्ध नको आहे. कारण युद्धात पराभव होतानाही लढायची खुमखुमी मिळणार असली, तरी त्याचा खर्च उचलणारा कोणी सावकार शिल्लक उरलेला नाही. शिवाय अशा युद्धात पाकचा टिकाव लागला नाही, तर पाकसेनेचा तिथे असलेला दबदबाही संपणार आहे. त्यामुळेच लष्करालाच युद्ध नको आहे आणि त्यांची कठपुतळी असलेल्या इमरानलाही युद्ध नको आहे. पण त्याचवेळी आजवर पोसलेले जिहादी व अन्य उचापतखोरही आवाक्यात राहिलेले नाहीत. म्हणून दहशतवादही थांबवता आलेला नाही. आधी हल्ला आणि नंतर लगेच युद्ध नकोच्या गयावया, यामागची अशी चमत्कारीक मिमांसा आहे. आजवर विणलेल्या जाळ्यात पाकिस्तान आता स्वत:च फ़सलेला असून, त्यातून सुटायचा मार्गही त्यांना मिळेनासा झाला आहे. म्हणून पुढले काही दिवस पाकिस्तान किती माकडचेष्टा करतो, हे युद्धापेक्षाही मनोरंजक असेल.

Tuesday, February 26, 2019

यह तो सिर्फ़ झांकी है

balakot air strike के लिए इमेज परिणाम

मंगळवारी पहाटे पाकिस्तानी भूमीत जाऊन भारतीय हवाई दलाने जो हल्ला केला, त्यातून सूर्य मावळला तरी पाकिस्तान सावरू शकला नव्हता. म्हणूनच उजाडताना ज्या पाकिस्तानी सेनादल प्रवक्त्याने भारतीय हवाई दलाच्या विमानांनी घुसखोरी केल्याचा पहिली बोंब ठोकली; त्यांना संध्याकाळी तोंड लपवायला जागा उरलेली नव्हती. कारण जैश महंमद संघटनेच्या सगळ्या जिहादी प्रशिक्षितांना आणून कत्तलखान्यात ठेवावे, तसे बिचारे जागच्या जागी घाऊक मारले गेले आहेत. बहावलपूर येथे जैशचे प्रशिक्षण शिबीर असल्याची भारतीय माध्यमात मोठी चर्चा दहा दिवस चालली होती. त्यामुळे पाकिस्तानने भारताकडून तिथेच पुन्हा मोठा सर्जिकल स्ट्राईक होईल, अशी अपेक्षा बाळगली होती. त्यातून ह्या प्रशिक्षितांना वाचवण्यासाठी व्याप्त काश्मिरातून उचलून पाकिस्तानच्या सुरक्षित भूमीत बालाकोटला एकत्र आणले गेले होते. पाकव्याप्त काश्मिरात भारत हल्ला करील, पण हा सभ्य देश वा त्याची व्यावसायिक सेना पाकिस्तानी भूमीत घुसखोरी करणार नाही, याची पाक सेनापतींना पक्की खात्री होती. भारतीय पुरोगामी वा कॉग्रेस नेतॄत्वाला भले भारतीय फ़ौज गुंड वाटत असेल. पण पाकिस्तानी सेनेचा भारतीय फ़ौजेच्या सभ्यतेवर किती गाढ विश्वास आहे, त्याचीच यातून प्रचिती येते. त्यामुळेच त्यांनी भारतीय कमांडोकडून येऊ घातलेल्या हल्ल्यासाठी बहावलपूरच्या छावण्या मोकळ्या केल्या आणि विविध शिबीरात पसरलेले सर्व प्रशिक्षीत घातपाती जिहादी एकत्र सुरक्षित बालाकोट अड्ड्यावर आणून ठेवले. त्यांना तिथे सुरक्षेची किती खात्री का वाटत असावी? एका कुणा अधिकार्‍याने ट्वीटही केलेले होते, ‘निश्चींत झोपा, कारण पाकिस्तानी हवाई दल जागे आहे.’ बिचारे झोपेतच जन्नतमध्ये रवाना झाले. कारण त्यांना एकत्रित मारण्याची सुविधा पाकिस्तानी सेनेने व रणनितीकारांनीच भारतीय हवाई दलाला उपलब्ध करून दिलेली होती.

मागल्या आठवड्यात सोशल मीडियात या विषयावर भारताची प्रतिक्रीया काय असेल, त्यासंबंधी मी एक पोस्ट टाकलेली होती. त्यात स्पष्टपणे आता सर्जिकल स्ट्राईक होणार नाही आणि तो पाकव्याप्त काश्मिरातही होणार नाही, असे ठामपणे म्हटलेले होते. माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराला जी रणनिती व सेनेचे डावपेच कळू शकतात, तितकीही बुद्धी पाकिस्तानी सेनापतींपाशी उरलेली नाही काय? देशाची सुरक्षा वा संरक्षण लढाईचे काम अतिरेक्यांवर सोपवून विविध सरकारी खात्यातले पसे खाण्यात रममाण झालेल्या पाक लष्करी अधिकार्‍यांना आता आपल्या सैनिकी शिक्षणाचेही विस्मरण झालेले असावे. म्हणूनच भारताकडून हल्ला कुठे होऊ शकतो, त्याचा अंदाज बांधता आला नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन भारत जिथे हल्ला करण्याची शक्यता आहे, तिथेच सर्व़च्या सर्व जिहादींना गोळा करण्याची अक्कल यांना कुठे मिळाली, तेच समजत नाही. त्याची एकमेव शक्यता म्हणजे त्यांचा भारतीय सभ्यता व सुसंस्कृतपणावरचा अतिरेकी विश्वास असू शकतो. किंवा सेना व जिहादी यांच्यापेक्षा आता पाकिस्तानी सेना बहुधा भारतातल्या त्यांच्या हस्तकांवर अधिक विसंबून असावी. जे इथे बसून व भारताचे मीठ खाऊन पाकिस्तानचा बागुलबुवा सतत माजवत असतात. युद्धाला विरोध करून नेहमी वाटाघाटींचा आग्रह धरत असतात. त्यांच्यावर विसंबून रहाण्याची सवय पाकिस्तानी सेनेला महागात पडलेली आहे. अशा भुरट्यांना वचकणारे पुरोगामी आता सत्तेत नाहीत आणि अशा पुरोगाम्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भिक घालत नाहीत, हेही पाक राज्यकर्ते व सेनापतींच्या लक्षात का आलेले नाही? अन्यथा ते इतके गाफ़ील राहिले नसते आणि भारतीय हवाई हल्ल्यात इतके जिहादी आयते एका जागी आणुन भारतीय हल्ल्याच्या तोंडी देण्याचा मुर्खपणा त्यांच्याकडून झालाच नसता. एकूण काय, जो पुरोगाम्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.

अर्थात मलाही काही स्वप्न पडलेले नव्हते. व्याप्त काश्मिर सोडून पाकिस्तानी भूमीत भारतीय सुरक्षा दल हल्ले करील, असे मला कोणी भविष्य सांगितलेले नव्हते. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप व इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची विधाने मला खटकली होती. इस्त्रायलने पॅलेस्टाईनमध्ये आराफ़त यांच्या कंपाऊंडवर हवाई हल्ले केले आणि त्यांनाही मेणबत्ती पेटवून रात्र काढावी लागली. तेव्हा नेमक्या याच शब्दात अध्यक्ष बुश म्हणाले होते, इस्त्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. आता ट्रंपनी भारताविषयी तेच शब्द उच्चारले होते. नंतर दोन दिवसापुर्वी त्यांनी भारताकडून काही मोठी कारवाई अपेक्षित असल्त्याचेही म्हटलेले होते. दुसरे नेतान्याहू. त्यांनी पहिल्याच दिवशी हल्ल्याचा निषेध करताना भारताला हवी ती मदत देण्याची घोषणा करून टाकलेली होती. त्यानंतर भारताचे नरेंद्र मोदी म्हणाले, पाकिस्तानला याची म्हणजे पुलवामाच्या हल्ल्याची मोठी किंमत मोजावी लागेल. ही मोठी किंमत वसुल करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ भारतापाशी असले, तरी तंत्र व डावपेचाची मदत अमेरिका व इस्त्रायल करायला सज्ज असतील, तर किरकोळ सर्जिकल स्ट्राईक कशाला करायचा ना? इतका सोपा तर्क मी केला होता. त्यामुळेच गेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या पुढले पाऊल यावेळी टाकले जाण्याची अपेक्षा मला वाटली होती. पण ती सगळीच पुर्ण झाली असे मानता येणार नाही. उलट मला असे वाटते, की ही फ़क्त सुरूवात आहे. आपली क्षमता किती आहे त्याची नुसती झलक दाखवण्यासाठी हा हवाई हल्ला झालेला आहे. भारताला अजून राफ़ायलची भेदक लढावू विमाने मिळालेली नसली, तरी हाती असलेली विमानेही पाकिस्तानला नामशेष करायला पुरेशी असल्याचे हे प्रात्यक्षिक होते. किंबहूना ३५ वर्षे जुन्या मिराजने ही कामगिरी केली असेल, तर राफ़ायलची अत्याधुनिक विमाने भारताच्या हाती लौकर मिळू नयेत, म्हणून चाललेला आटापिटा कशासाठी आहे, त्याचाही अंदाज येऊ शकतो.

भारत तेरे टुकडे होंगे, अशा घोषणा देणारे आणि त्यांचा राजकीय कायदेशीर बचाव मांडणारेच राफ़ायलच्या विरोधात सहा महिने कशासाठी आटापिटा करीत असतील? दोन्ही बाजूचे लोक सारखे कशाला असतात? त्यातून भारतीय हवाई दल वा सुरक्षा दलावर आरोप कशाला करतात? ह्या सर्वांना या हल्ल्याने शह दिला आहे. परंतु विषय सुरू झाला तरी संपलेला नाही. अजून काही मोठी घटना घडण्याची दाट शक्यता आहे. या हल्ल्याने अझहर समर्थक चीनच्याही तोंडचे पाणी पळालेले आहे व त्याने पाकिस्तानचे समर्थन करण्यापेक्षा आपसात बसून मिटवा; असा सल्ला दिलेला आहे. कारण भारत इतकी मुसंडी मारणार असेल, तर अजहर मसूदची पाठराखण भारताला सीपेक वा ग्वादार चीन प्रकल्पावरही हल्ले करायला भाग पाडू शकते, अशी चीनला भिती वाटलेली आहे. ते हल्ले पाकिस्तानी भूमीतले असतील व मालमत्तेचे नुकसान दिसायला पाकिस्तानचे असेल. पण व्यवहारात चीनची गुंतवणूक बुडीत जाण्याचा धोका त्यात सामावला आहे. भारतीय हवाई हल्ले करणारी विमाने पाक हद्दीत पंधरावीस मैल आत घुसून हजार किलोचा बॉम्ब टाकू शकतात आणि पाक सेना त्यांना रोखू शकत नाही. त्या भारतीय हवाई दलाची वक्रदृष्टी सिपेककडे वळली तर? बालाकोटच्या हल्ल्याने पाकिस्तान काय शिकला याला महत्व नाही, इतकी चीनची तारांबळा महत्वाची आहे. हल्ल्यानंतरची चीनची प्रतिक्रीयाही बोलकी आहे, आपण सहानुभूतीदार आहोत. युद्ध झाल्यास पाकिस्तान वाचवायला हत्यार उचलणार नाही, असाच यातून चीनने दिलेला संदेश आहे. तो पाकिस्तानला समजेल असे अजिबात नाही. तो आणखी एका हल्ल्याने समजावणे भाग आहे आणि ते फ़क्त भारतीय सेना, कमांडो व हवाई दलच शिकवू शकेल. म्हणूना बालाकोट येथे घडले ती सिर्फ़ झाकी आहे म्हणायचे. खरा तमाशा अजून बाकीच आहे. चीन त्यानेच चिंताक्रांत झालेला असावा.

तामिळनाडूची गुंतागुंत

kamala hassan rajni के लिए इमेज परिणाम

महाराष्ट्राच्या पाठोपाठ भाजपाने तामिळनाडूतही लोकसभेसाठी आघाडी जुळवून घेतली आहे. त्यात अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखाली भाजपा लढणार असून, ३९ पैकी अवघ्या ५ जागा भाजपाच्या वाट्याला आलेल्या आहेत. कारण स्पष्ट आहे. तामिळनाडूत भाजपाचे संघटन तितके शक्तीशाली नाही आणि कॉग्रेसही दुबळीच झालेली आहे. गेल्या अर्धशतकात कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला तिथे पाय रोवून उभे रहाता आलेले नाही आणि हळूहळू राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांच्या वळचणील जाऊन बसलेले आहेत. आरंभी तिथेही कॉग्रेसच सत्ताधारी पक्ष होता आणि डाव्या पक्षांची थोडीफ़ार शक्ती होती. पण कॉग्रेसला पर्याय म्हणून द्रविड मुन्नेत्र कझागम हा पक्ष उदयास आला. स्वातंत्र्योत्तर काळात त्याने प्रादेशिक अस्मितेला खतपाणी घालत आपले बस्तान बसवले आणि १९६७ नंतर तिथून कॉग्रेस पक्ष नामशेष होत गेला. नंतरच्या काळात त्याही पक्षात अहंकार सोकावला आणि फ़ाटाफ़ुट झाली, तेव्हा त्यात आपले डाव साधताना कॉग्रेसने कधी स्वत:चा जिर्णोद्धार करून घेण्य़ाचा प्रयास केला नाही. स्थानिक नेतृत्व उभे केले नाही. परिणामी तामिळी राजकारण पुर्णपणे प्रादेशिक पक्ष व नेत्यांच्या कब्जात गेले. राष्ट्रीय पक्षांना आपले प्रभावी नेतृत्व निर्माण करणे शक्य झाले आणि प्रादेशिक पक्षांशी तात्पुरत्या आघाड्या करताना राष्ट्रीय पक्ष संघटनाही उभारता आलेली नाही. पण यावेळची परिस्थिती अगदी वेगळी आहे. मागल्या अर्धशतकातला प्रादेशिक नेत्यांचा प्रभावही आज अस्तंगत झालेला आहे. लागोपाठ दोन वर्षात करुणानिधी व जयललितांचा मृत्यू झाल्याने तामिळनाडूत आता कुठलाही प्रभावी नेता उरला नाही आणि कर्तृत्वहीन नेत्यांच्या हातात सगळेच पक्ष घुटमळलेले आहेत. त्यामुळे भविष्यातला तामिळनाडूचा नेता कोण, हे ठरवणारी अशीच ही लोकसभेची निवडणूक होणार आहे. सहाजिकच सर्व राजकारण दोन आघाड्यात विभागले गेले असून, त्याचे नेतृत्व प्रादेशिक पक्षांकडे आहे. तर नव्याने नेतृत्वाची पोकळी भरायला निघालेले दोन सुपरस्टार अभिनेते कोणाच्या खिजगणतीतही नाहीत.

मुंबईत अमित शहांनी शिवसेनेशी हातमिळवणी करून जगावाटप उरकल्याच्या दुसर्‍याच दिवशी तामिळनाडूत अण्णाद्रमुकशी भाजपाची युती पक्की झाली. त्यात पीएमके हा पक्ष सामील झाल्याने द्रमुक वैतागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मोदींना पराभूत करणार्‍या प्रत्येक घोषणेत पुढाकार घेणार्‍या द्रमुकच्या स्टालीन यांनी भाजपा आघाडी होताच शिव्याशाप दिलेले आहेत. पण ते अण्णाद्रमुक वा भाजपाला नव्हेत. तर पीएमके या छोट्या पक्षाच्या नावाने द्रमुक शिमगा करतो आहे. त्याचे कारण म्हणजे पीएमके आपल्याच आघाडीत सहभागी होईल असे द्रमुकने गृहीत धरलेले होते. तसे झाले असते, तर ती आघाडी निर्विवाद मोठी व मजबूत झाली असती. कारण या पीएमके पक्षाचे वणियार नामक एका समाजघटकात मोठे वजन आहे आणि जिथे तो पक्ष सहभागी होतो, त्या आघाडीला त्या समाजाची मते हमखास मिळत असतात. ती ठरलेली मते हातून गेल्याचा द्रमुकचा राग आहे. कारण तामीळनाडूच्या उत्तर भागात या समाजाची मते आठदहा मतदारसंघात केंद्रीत झालेली आहेत. ती स्वपक्षाला निवडून आणणारी नसली, तरी ज्या कोणाशी युती करतील त्याला यश देणारी असतात. त्यांच्या अभावी द्रमुक आघाडी त्या आठदहा मतदारसंघात दुबळी पांगळी होऊन जाते. दक्षिण तामिळनाडूत स्टालीन यांचा दुरावलेला व रागावलेला भाऊ अळागिरी याचा प्रभाव पाचसहा जागांवर असून, तोही द्रमुकला दगाफ़टका करायला टपून बसला आहे. त्यामुळेच दिसायला त्या राज्यात ३९ जागा असल्या तरी किमान १५ जागा गोत्यात आल्या आहेत. कॉग्रेसला सोबत घेऊन द्रमुक आघाडीची नौका किनार्‍याला लागण्याची शक्यता त्यामुळे रोडावली आहे. स्टालीन यांनी पित्याच्या पुतळ्याचे अनावरण करताना थेट राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवले होते. कारण तोपर्यंत तेच तामिळनाडूचे प्रभावी नेता मानले जात होते आणि पीएमके त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता गृहीत धरलेली होती. तो सगळा खेळ विस्कटला आहे.

एक मात्र निश्चीत अण्णाद्रमुकची आज तामीळनाडूत सत्ता असली तरी त्यांच्यापाशी जयललितांची पुण्याई खुप आहे. पण पक्षाला योग्य दिशेने घेऊन जाईल, असा कोणी नेता त्यांच्यापाशी उरलेला नाही. त्यांना अम्माइतका प्रभावी चेहरा निवडणूकीत हवा होता. तो तामिळी नसले तरी मोदींचा चेहरा असू शकतो. अम्मा आणि नरेंद्र मोदी यांचे एकत्रित फ़ोटो आपल्याला मते मिळवून देतील; अशी त्यांची अपेक्षा असावी. पण तेवढ्यावरही त्यांचे समाधान झालेले नाही. म्हणूनच अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाने भाजपासह पीएमकेला सोबत घेतलेले आहे. ३९ पैकी २५ जागा आपल्याला ठेवून १४ जागा मित्रपक्षांना दिलेल्या आहेत. त्यापैकी ७ जागा पीएमके आणि ५ जागा भाजपाला दिलेल्या आहेत. आणखी तीन जागा इतर लहान पक्षांना दिलेल्या आहेत. मग घाईगर्दीने कॉग्रेस द्रमुकने आपले जागावाटप उरकले आहे. कॉग्रेसही भाजपा इतकीच दुबळी असतानाही द्रमुकने दहा जागा देऊ कराव्यात, ह्याला आत्मविश्वास म्हणता येणार नाही. कारण मागल्या खेपेस कॉग्रेसने बहुतेक जागी अनामत रक्कम सुद्धा गमावली होती. खुद्द अर्थमंत्री चिदंबरम यांनी निवडणूकीपुर्वीच माघार घेऊन पळ काढलेला होता. त्यातून आज त्या राज्यात कॉग्रेसची अवस्था किती दयनीय आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. पण दुसर्‍या आघाडीची सज्जता बघितल्यावर घाबरलेल्या द्रमुकची कोंडी करून कॉग्रेसने अधिक जागा आपल्या पदरात पडून घेतल्या आहेत. या सर्व गडबडीत तारांबळ उडाली आहे, ती कमला हासन या अभिनेत्याची. मागल्या वर्षभर त्याने जयललिता व करुणानिधी यांच्या जागी तामिळनाडूचा प्रभावी नेता होण्यासाठी खुप कसरती केलेल्या होत्या. पण त्याची कुठलीही दखल राजकीय पक्षांनी घेतलेली नाही आणि आता एकाकी पडण्याची नामुष्की त्याच्यावर आलेली आहे. उलट त्याच्यापेक्षाही सुमार बुद्धीचा मानल्या गेलेल्या रजनीकांतने शहाणपणा केलेला आहे.

२०१७ च्या अखेरीस रजनीकांत याने आपल्या राजकारण प्रवेशाची घोषणा केलेली होती. त्यानंतर कमला हासन मैदानात आला. पण संथगतीने पावले टाकत रजनीकांत याने कालपरवाच लोकसभा लढवणार नसल्याचे जाहिर करून टाकले. तर त्यापुर्वीच हासन याने सर्व जागा लढवण्याची आधी गर्जना केली आणि नंतर कॉग्रेसला अटीही घालण्यापर्यंत मजल मारलेली होती. द्रमुकशी मैत्री सोडली तर आपण कॉग्रेसला सोबत घेऊ; असे कमला हासन म्हणाला होता. पण त्याला उत्तरही देणे कॉग्रेसला गरजेचे वाटले नाही आणि आता द्रमुकशी जागावाटप उरकून कॉग्रेसने त्या अभिनेत्याला त्याची योग्य जागा दाखवलेली आहे. नुसते माध्यमात झळकून कोणी लोकप्रिय पुढारी होत नसतो, की निवडणूका जिंकत नसतो. ह्याचा अनुभव या कलाकाराला आता घ्यावा लागणार आहे. तामिळनाडूत त्याचे चहाते अनुयायी थोडे नाहीत. पण रजनीकांत जितका अफ़ाट लोकप्रिय आहे, तितकी क्षमता कमलापाशी नाही. पण आता माघार घेतली तर तो राजकीय जीवनातून संपून जाईल. उलट या निवडणूक मतदानाचे जे आकडे येतील, ते भावी राजकारणाची महत्वाची दिशा दाखवणारे असतील. त्यात करुणानिधी व जयललिता यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या पक्षाचे जनमानसातील स्थान मतमोजणीतूनच स्पष्ट होणार आहे. त्यातून तामिळी मतदार प्रादेशिक अस्मितेतून बाहेर पडला किंवा नाही; याचीही प्रचिती येणार आहे. त्यानुसारच रजनीकांन पुढले पाऊल टाकणार आहे. किंवा राजकारणापासून दुर राहिल. कमला हासनची क्षमताही त्यातून समोर येईल. त्यानंतरच निर्णय घेण्याचॊ सुविधा रजनीकांतला उपलब्ध असेल. म्हणूनच त्याने धुर्तपणे लोकसभेपासून दुर रहाण्याचा निर्णय घेतला आहे. उलट हासन याने घाई करून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. लोकसभेची ही निवडणूक स्थानिक राजकारणात प्रादेशिक भविष्याची दिशा ठरवणारी होईल.

एक गोष्ट नात्र निश्चीत. तामिळनाडू, केरळ किंवा आंध्रप्रदेश अशा साधारण ८०-९० लोकसभेच्या जागी मोठी राजकीय उलथापालथ व्हायची आहे. चंद्राबाबू व स्टालीन अशा प्रादेशिक नेत्यांसाठी ही सत्वपरिक्षेची वेळ आहे. तर भाजपा व कॉग्रेस अशा राष्ट्रीय पक्षांना दक्षिणेत नव्याने मुख्यप्रवाहाचे राजकारण रुजवण्याची महत्वाची संधी यातून मिळालेली आहे. यातले कौतुक अशासाठी आहे, की नेमक्या याच ८०-९० जागा लोकसभेच्या संख्याबळात महत्वाची भूमिका बजावणार असल्याने, या मतदानाला अत्यंत महत्व असणार आहे. खेरीज मागल्या अर्धशतकात तामिळनाडूवर चित्रपट कलाकारांनी गाजवलेले प्रभूत्व संपुष्टात येते की कायम रहाते; त्याचीही कसोटी लागणार आहे,. करुणानिधी व जयललितांची पुण्याई त्यांच्या पक्षांना किती तारून नेते, त्याचाही निकाल लागून जायचा आहे. अवघ्या वर्षभरात तिथे विधानसभेच्या नव्या निवडणूका येणार असल्याने विविध पक्षांना आपापली शक्ती जोखून बघायची आहे. यामध्ये आज तुरूंगात खितपत पडलेल्या जयललितांच्या सखी शशिकला, यांच्याही भवितव्याचा निकाल लागायचा आहे. अम्माच्या नंतर शशिकला नेता झाल्या होत्या आणि त्यांनाच तुरूंगात जायची वेळ आल्यावर अण्णाद्रमुक सैरभैर झालेला आहे. त्यांचा एक दुबळा गट वेगळे राजकारण करू बघतो आहे. त्याच्याही खर्‍या प्रभावाची परिक्षा व्हायची आहे. बहुधा त्याही गटाने अनेक उमेदवार मैदानात असतील. पण आज तरी कोणी त्यांना गंभीरपणे घेताना दिसत नाही. त्यामुळेच मोठी संधी कॉग्रेस व भाजपा अशा राष्ट्रीय पक्षांना असेल. त्यांना आघाडीतून का होईना, चांगले यश मिळवता आले, तर अर्धशतकानंतर तामिळनाडू पुन्हा राष्ट्रीय मुख्य राजकीय प्रवाहात येऊ लागल्याचे चिन्ह मानले जाईल. तशी चाहुल लागली तरी रजनीकांत राष्ट्रीय भूमिका घेणारा प्रादेशिक नेता म्हणून विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत सर्वशक्तीनिशी उतरल्याशिवाय रहाणार नाही.


Sunday, February 24, 2019

हुंडाबळीचे पुरोगामी समर्थन

parkha sudhindra kulakarni के लिए इमेज परिणाम

एकदा मुलीचे लग्न लावून दिले, मग तिचे माहेरशी असलेले नाते संपले, ही आपल्याकडे पुर्वापार चालत आलेली धारणा आहे. जन्मापासून मुलीला आपल्या जन्मघरातच पराया धन मानले जाते आणि पुढे कधी तिच्यावर सासरी अन्याय अत्याचार झाला, तरी जन्मदातेही तिला सबुरीने घेण्याचा सल्ला देत असतात. थोडं सहन कर. हळुहळू स्थिती बदलेल वगैरे. असेच सहन करीत एकेदिवशी त्या सासुरवाशिणीला हुंडा किंवा अन्य कारणासाठी ठारही मारले जाते. त्यानंतर कल्लोळ सुरू होतो. आजच्या जमान्यात असे काही बोलणा‍र्‍या वा सल्ला देणार्‍याला प्रतिगामी मानले वा ठरवले जाते. त्या विवाहितेला नवर्‍याशी वा सासरच्या लोकांशी दोन हात करायला प्रोत्साहन देण्याला पुरोगामी म्हटले जाते. कुठलाही अन्याय सहन करण्याच्या भूमिकेला प्रतिगामी म्हणण्याची फ़ॅशन आपल्याकडे बोकाळली आहे. पण असेच सामाजिक जीवनात प्रसंग येतात, तेव्हा तशाच पुराणमतवादी भूमिकेत जाणारा पहिला बुद्धीवादी पुरोगामी असतो. हा किती विरोधाभास आहे ना? माहेरचे प्रतिगामी आपल्याच मुलीला काय सल्ले देत असतात? उद्या काय करशील? त्यांनी घरातून हाकलून लावले तर तुझे भविष्य काय? आईबाप आयुष्यभर पुरणारे नाहीत. भाऊ वा वहिनी कितीकाळ पोसतील? त्यांची मुले पुढल्या काळात काय करतील? अशी भिती घालणारे प्रतिगामी असतात. कारण ते सहन करण्याचे सोशिकतेचे सल्ले देण्यात पुढे असतात. पण असाच प्रसंग भारतीय समाजाच्या जीवनात पाकिस्तानी वा दहशतवादी संदर्भात आला मग पुरोगाम्यांचे तेच शौर्य कुठल्या कुठे अस्तंगत होऊन जाते आणि ते भारत सरकार वा भारतीय जनतेला विवाहितेला दिले जाणारे प्रतिगामी सल्ले बुद्धीच्या आवरणात झाकून देऊ लागतात. उरी, पठाणकोट वा आता पुलवामाची घटना घडल्यावरची पुरोगामी भाषा त्या विवाहितेला अन्याय सहन करण्यातले कल्याण सांगणारी नाही काय?

भारत पाकिस्तानचा संघर्ष वा विवाद सासुरवाशिण विवाहितेपेक्षा तसूभर वेगळा नाही. सतत या शेजारी देशाने भारताशी कुठलेही कारण नसताना वैर जोपासलेले आहे. कधी अकारण युद्ध पुकारून तर कधी जिहाद दहशतवादाचा पवित्रा घेऊन. जेव्हा युद्धात भारताशी दोन हात करणे शक्य नसल्याचे जाणवले तेव्हापासून पाकिस्तानने कायम दहशतवादाचा व घातपाताचा मार्ग पत्करलेला आहे. त्याला युद्धाने संपवणे अशक्य नाही. पण तसा नुसता विचार सुरू झाला, तरी आपल्याच देशातले पुरोगामी तात्काळ युद्धाचे दुष्परिणाम सांगून भारतीय जनता व सरकारला हतोत्साहित करण्याचा आटापिटा सुरू करतात. थेट पाकिस्तानशी दोन हात करण्यापेक्षा त्या मुजोर देशाला व त्यांच्या भेकड हल्ल्यांना प्रेमाने जवळ करण्याचे सल्ले प्रत्येकवेळी पुरोगामीच देत असतात. त्यातून कधी पाकिस्तान सुधारला नाही, की कुठला मस्तवाल पती सुधारत नसतो. तिथे अशा सोशिक विवाहितेचा बळी जातो. तिला जिवंत जाळले जाते आणि मग कित्येक वर्षे कोर्टात खटले चालूनही ती पुन्हा जिवंत होत नसते. इथे प्रतिवर्षाला शेकडो भारतीय जवान मारले जात आहेत आणि अधूनमधून काही नागरिकांचाही हकनाक बळी जातो आहे. पण त्याची वेदना कधीच पुरोगामी चेहर्‍यावर दिसलेली नाही. उलट सोशिकतेचे सल्ले दिले जातात. मुंबईत बॉम्बस्फ़ोट होवो किंवा कसाबचा हल्ला. त्यानंतर चिडलेल्या मुंबईकरांनी वा भारत सरकारने पाकिस्तानवर हल्ला चढवू नये, याची फ़िकीर सर्वाधिक पुरोगाम्यांनाच असते. मरणार्‍या जवान वा भारतीयांच्या जीवापेक्षाही त्यांना आपल्या तथाकथित पुरोगामी अब्रुची अधिक फ़िकीर असते. जगासमोर आपण उदारमतवादी दिसले पाहिजे, यासाठी अशाच लोकांनी हजारो निरपराध भारतीयांचा बळी घेतला आहे. अन्याय करणारा गुन्हेगार नसतो, इतका अन्याय सोसणारा व त्यासाठी सोशिकतेचे डोस पाजणारा गुन्हेगार असतो. पुरोगामी तसेच भारताचे गुन्हेगार आहेत.

मध्यंतरी अशीच स्थिती आली, तेव्हा पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्यास वा काम करण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी पुढे आलेली होती. तेव्हा राजकारण आणि कला-क्रिडा यांची गल्लत करू नका, असले सल्ले याच दिवट्यांनी दिलेले आहेत. त्यांच्या बोलण्यात किंचीत तथ्य असते, तरी भारताकडून मानधन घेतलेल्या पाकच्या कलाकार खेळाडूंनी त्यांच्याच देशातल्या दहशतवादी जिहादींचा तिथेही निषेधच केला असता. पण इमरानपासून कुठल्या पाक खेळाडूने वा कलाकाराने उरी पठाणकोटच्या घटनांचा साधा निषे़धही केलेला नव्ह्ता. यात नवे काहीच नाही. कुठलाही व्यसनी आक्रमक नाकर्ता नवरा पत्नीला मारहाण केल्याचे दु:ख व्यक्त करीत नसतो. पत्नीला मारहाण करणे हा त्याला आपला अधिकारच वाटत असतो ना? पाकिस्तानची अवस्था आज त्यापेक्षा किंचीतही वेगळी नाही. मुद्दा इतकाच आहे, की पाकशी लढायला आपली सेना सज्ज आहे. सीमेवर किंवा युद्धक्षेत्रामध्ये दहशतवादाला सामोरे जायला आपले जवानही तयार आहेत. सवाल त्यांच्याशी दोन हात करण्याचा नसून त्यांच्या पाठीशी ठाम उभे रहाण्याचा आहे. विवाहिता जशी आपल्या बळावर छळवादी सासरशी झुंजत असते, तसे आपले जवान आहेत. पण माहेरच्यांनी विवाहितेला धीर देणे आणि नैतिक पाठींब्यासाठी उभे रहाणे आवश्यक असते. तिला निराश हताश करणार्‍यांना नामोहरम करण्याची जबाबदारी अशा माहेरच्या लोकांची असते. तशीच आपण सामान्य नागरिकांची जबाबदारी व कर्तव्य सैनिकांना हतोत्साहित करणार्‍या पुरोगाम्यांना नामोहरम करण्याची आहे. युद्ध नको, पाकिस्तानला समजून घ्या. पाकिस्तानी कलाकार वा खेळाडूंवर अन्याय नको; असली भाषा इथे बोलणारे आपल्या अस्तनीतले निखारे आहेत. त्यांचा बंदोबस्त आपण करणे भाग आहे. ते काम सरकार किंवा सैनिकांचे नाही. ते पाप आपल्याला नित्यजीवनात निस्तरावे लागणार आहे.

युक्तीवाद वा बुद्धीवादाच्या सापळ्यात अडकलेल्या समाजाला त्यातून सोडवण्याचे काम सामान्य नागरिकांचे असते. अशा लोकांना आपल्या जगण्यात प्रतिष्ठीत करणे थांबवले पाहिजे. मग तो कोणी महान चित्रपट कलावंत असेल, किंवा क्रिकेटपटू असेल. साहित्यिक वा प्राध्यापक असेल, तर त्याच्या अन्य क्षेत्रातील गुणवत्तेचे कौतुक बाजूला ठेवून, अशा राष्ट्रीय सुरक्षेतली त्याची देशद्रोही ढवळाढवळ आपण रोखली पाहिजे. असे लोक मायावी असतात आणि पुराणातल्या मायावी राक्षसाप्रमाणेच विविध रुपात आपल्या समोर येत असतात. कधी ते नयनतारा बनून साहित्याच्या क्षेत्रात धुडगुस घालू लागता,त तर कधी अवार्डवापसीचे नाटक रंगवून आपल्याला भ्रमित करीत असतात. अविष्कार स्वातंत्र्याचे ढोल पिटुन आपली दिशाभूल करीत असतात. इथे त्यांच्या शब्द-वाणीच्या अधिकाराची जपणूक व्हावी म्हणून आकाशपाताळ एक केले जाते. पण भारतीय सीमेवर भारतीय सैनिकालाही संचार स्वातंत्र्य असते आणि त्याच्या जपणूकीची वेळ आली, मग हे भुरटे पाकिस्तानच़्या हल्लेखोरीला खतपाणी घालत असतील, तर आधी अशा गद्दारांचे अविष्कार स्वातंत्र्य संपवले पाहिजे. कारण जे स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्याची गळपेची करण्याला प्रोताहन देते, त्याला आधीच संपवले पाहिजे. देशाचे स्वातंत्र्य सर्वाधिक महत्वाचे आहे आणि त्यातच कला क्रिडा किंवा अन्य कुठलेही स्वातंत्र्य सामावलेले आहे. जे अन्य स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्याच्या नरडीला नख लावत असेल, आधी त्याचा गळा दाबणे भाग असते. कारण हे युद्ध आहे आणि विद्यमान स्थिती युद्धजन्य आहे. त्यात अगोदर कोण कोणाला मारतो, त्यावर जगण्याच्या स्वातंत्र्याचा निवाडा होत असतो. कारण जगलात तरच पुढली सगळी स्वातंत्र्ये असू शकतात, किंवा उपभोगता येत असतात. ज्यांना त्यात गल्लत करायची असते, ते पुरोगामी आणि जिहादी घातपाती यात तसूभर फ़रक असू शकत नाही. जिहादी घातपाती दुरचा शत्रू असतो आणि अ़़सा दिवाळखोर पुरोगामी जवळचा शत्रू झाला आहे.

Saturday, February 23, 2019

युतीची कसोटी बारामतीमध्ये

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक आणि लोकं बसली आहेत

गेल्या लोकसभेत म्हणजे २०१४ च्या मतदानात महाराष्ट्रातील अनेक राजकीय साम्राज्ये आणि बालेकिल्ले उध्वस्त होत असताना, बचावलेला एक बालेकिल्ला होता, तो शरद पवार यांच्या बारामतीचा. तिथून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे प्रथमच काठावरचे मताधिक्य घेऊन कशाबशा निवडून आल्या. त्यामुळे मोदी लाटेत खुद्द पवारांचा बालेकिल्ला थोडक्यात बचावला होता. पण तो वाचवण्यासाठी पवारांनी आधीच तहनामा लिहून दिलेला होता. सुप्रिया सुळे यांच्या विरोधत लढलेले एनडीए आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी त्याचा खुलासा नंतरही केलेला होता. देशाच्या अशा सर्व बालेकिल्ल्यात आक्रमकपणे जाऊन मोठ्या सभा घेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारामतीत सभा घेतलेली नव्हती. त्याच कारणास्तव आपण पराभूत झालो अशी कबुली जानकर यांनी दिलेली होती. अर्थात सुळे यांच्या विजयाचे तितकेच कारण नव्हते. त्यापेक्षाही त्या विजयाला कारणीभूत झाले होते, विजय शिवतारे. शिवतारे तिथे उभे राहिले नाहीत आणि सुप्रियांचा विजय निश्चीत झालेला होता, खरा सौदा वा तहनामा तोच होता. बारामतीत मोदींनी सभा घेण्यापेक्षाही विजय शिवतारेंना तिथून बाजूला करण्यातच सुप्रियाताईंच्या विजयाची खातरजमा करण्यात आलेली होती. किंबहूना उमेदवारीत शिवतारे यांचा बळी आणि नंतर बळीचा बकरा म्हणून जानकरांना तिथून उमेदवारी देण्यात आलेली होती. म्हणूनच आता नव्याने जी शिवसेना भाजपा युती झालेली आहे, त्यात बारामती संघ कोणाकडे जाणार, यावरच राज्यातील खर्‍या युतीचा खुलासा होऊ शकणार आहे. खरेच ही शिवसेना भाजपा युती आहे की पडद्याआड राष्ट्रवादी भाजपा युती झाली आहे, त्याची साक्ष बारामतीची जागा शिवसेनेला मिळते की भाजपा आपल्याकडे ती जागा ठेवून सुप्रियाताईंना अभय देते, ते बघावे लागेल.

मागल्या खेपेस मोदीलाट असल्याचे सर्वप्रथम ओळखून आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठीच पवारांनी थेट निवडणूकीतून माघार घेतलेली होती. कारण त्या त्सुनामीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघात आपलाही टिकाव लागण्याची खात्री पवारांना राहिलेली नव्हती. त्यापेक्षा मागल्या दाराने राज्यसभेत जाण्याचा मार्ग त्यांनी चोखाळला होता. त्याच्याही पुढे जाऊन कन्येच्या सुरक्षीत विजयासाठी त्यांनी बारामतीत कोणी दुबळा उमेदवार मिळावा, म्हणून आटापिटा केलेला होता. कारण तेव्हा शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे लोकसभेच्या तयारीला लागल्याचे लपून राहिलेले नव्हते. पुणे जिल्ह्यात पवारांच्या साम्राज्याला एकहाती आव्हान देण्याची हिंमत करणारा हा़च एक नव्या पिढीतला नेता आहे. त्याने बारामतीला हात घातला तर उद्या बारामती विधानसभाही हातात रहाणार नाही, याची पवारांना खात्री होती. म्हणूनच त्यांनी भाजपाशी छुपा समझोता केलेला होता. त्यातली पहिली खेळी बारामती भाजपाने शिवसेनेला देऊ नये अशी होती आणि माढ्यातून आदल्या निवडणूकीत पराभूत झालेले जानकर यांना बारामतीत उमेदवार करण्याचा खेळ झाला. दिसायला जानकर आव्हानवीर ठरत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यापेक्षा विजय शिवतारे यांना परस्पर बाजूला करणे, ही खरी खेळी होती. म्हणूनच अखेरच्या क्षणी शिवतारे यांना बाजूला व्हावे लागले. शिवसेनेला त्या जागेचा आग्रह सोडायला भाग पाडले गेले आणि पवारांना बारामती सुरक्षित करून देण्यात आली. तरीही मोदीलाटेचा प्रभाव किती होता, त्याची साक्ष मतमोजणीतून मिळालेली होती. नेहमी दोनतीन लाखाच्या फ़रकाने तिथून कोणीही पवार सहज निवडून यायचे, तिथे सुप्रियाताईंना कशाबशा पाऊण लाखाच्या फ़रकाने लोकसभेचे तोंड बघता आले. सहापैकी बहुतांश विधानसभा क्षेत्रामध्ये बाहेरचे असूनही जानकर यांनी आघाडी घेतली होती आणि स्थानिक शिवतारे असते तर सुप्रियाताईंना लोकसभेत पोहोचता आले नसते. आता काय होईल?

सोमवारी अमित शहा मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांनी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी युतीवर शिक्कामोर्तब केलेले आहे. त्यानुसार सेनेला २३ आणि भाजपाला २५ जागा लढवायच्या आहेत. आजच भाजपा़चे २३ सदस्य लोकसभेत आहेत. म्हणजेच त्या पक्षाला नव्या फ़ारतर दोन जागाच मिळणार आहेत. शिवसेनेला नव्याने एक जागा मिळयच्या आहेत आणि त्या अर्थातच पुर्वी मित्रपक्षांनी लढवलेल्या तीनपैकी असू शकतात. त्यात हातकणंगले आणि माढा यांच्यासह बारामतीचा समावेश होतो. त्यात जिथे यश हमखास मिळू शकते अशी जागा बारामती आहे. ज्या उमेदवाराला व नेत्याला पवार परिवार आपल्यासाठी मोठे आव्हान समजतो, अशाच नेत्याला मग बारामतीतून उभे करणे, ही युतीची गरज असू शकते. ते आव्हान महादेव जानकर किंवा अन्य कोणी भाजपा उमेदवार असू शकत नाही, तर शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे असू शकतात. ते पुन्हा लोकसभा लढायच्या तयारीत कितपत आहेत, त्याची कल्पना नाही. पण बारामतीचा किल्ला ढासळून टाकण्याची धमक असलेला नेता ही त्यांची ओळख आहे. सवाल त्यांनी व्यक्तीगत लोकसभा लढवण्याचा किंवा उमेदवार होण्याचा नसून, त्यांचा कोणी निकटवर्तिय तिथे युतीतर्फ़े उभे रहण्याचा आहे. म्हणूनच तिथे पवारांना पराभूत करण्यासाठी थेट आघाडीवरून लढण्याची जबाबदारी शिवतारे यांच्यावर टाकली जाण्याला निर्णायक महत्व आहे. मात्र त्यातलॊ पहिली अट ती जागा शिवसेनेच्या वाट्याला येण्याची असू शकते. म्हणजे आपली लोकसभेतील सदस्यसंख्या शिवसेनेला वाढवायची खरीच प्रामाणिक इच्छा असेल, तर सेना नेतृत्वाने त्या जागेसाठी हट्ट धरला पाहिजे. कारण त्याच पक्षाकडे बारामती पादाक्रांत करू शकणारा नेता किंवा लढवय्या आहे. मात्र खुद्द शिवतारे वा त्यांचा कोणी निकट्वर्तिय त्या आखाड्यात उतरवला गेला पाहिजे. ज्याच्यासाठी शिवतारे आपली सगळी ताकद पणाला लावतील असा कोणी हवा.

असा पहिल्या पसंतीचा उमेदवार खुद्द विजय शिवतारे असू शकतात. आमदार असताना शिवतारे यांनी बांधलेली पक्ष संघटना व मंत्री झाल्यावर आसपासच्या परिसरात निर्माण केलेल्या सदिच्छा त्यांच्यासाठी शक्ती बनलेल्या आहेत. म्हणूनच मागल्या खेपेस पवारांनाही ते मोठे आव्हान वाटलेले होते. त्यानंतर पुणे जिल्हा व बारामतीच्या आसपास परिसरात त्यांनी अजितदादांच्या राजकारणाला मोठा शह दिलेला आहे. सहकारी संस्था किंवा साखर कारखाने अशा बाबतीत हे आव्हान पवारही पेलू शकलेले नाहीत. पण एका खासदारापुरता हा विषय नाही. बारामती हा बालेकिल्ला आहे आणि तिथे सुप्रियाताईंना मोठे आव्हान ठरू शकणारा उमेदवार, शिवसेना किंवा युती देऊ शकली, तर तो देशव्यापी राजकारणातला मोठा सनसनाटी माजवणारा विषय होऊ शकतो. पण अर्थातच सुप्रियाताई व विजय शिवतारे यांच्यातली लढत तशी सनसनाटी माजवू शकणार नाही. त्यासाठी शिवतारे यांची पत्नी वा कन्या मैदानात आणावी लागेल. त्यातही कन्येला महत्व आहे. कारण शिवतारे यांची कन्या विवाहित असून तिचे पती हे पोलिस प्रशासनातील मोठे नाव आहे. शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे हे आयपीएस असून, बिहारमध्ये त्यांनी आपली कारकिर्द दबंग अधिकारी म्हणून गाजवली आहे. सध्या त्यांना महाराष्ट्रात हंगामी सेवेसाठी आणलेले असून, विभिन्न भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केलेला आहे. असा पती आणि कर्तबगार लोकप्रिय पिता, यांच्याशी थेट नाते असलेली कन्या हा बारामतीच्या बुरूजाला खिंडार पाडणारा तोफ़गोळा ठरू शकतो. पिता व पतीने या महिलेच्या मागे आपली पुण्याई उभी केली, तर सुप्रियाताईंना खरेखुरे आव्हान उभे राहू शकते आणि बारामतीची लढत निर्णायक होऊ शकते. पण त्याचवेळी हे आव्हान म्हणजे जायंट किलरसारखे असू शकेल. तिथे नवखी महिला उमेदवार दोनदा जिंकलेल्या सुप्रियाताईंना भयभीत करू शकेल आणि पवारांनाही राज्यातल्या अन्य जागांकडे पाठ फ़िरवून बालेकिल्ल्यात बंदिस्त करील.

हा अर्थात़च जरतरचा विषय आहे. नुकतीच दोन पक्षात युती झालेली असून, अजून त्यांच्यात लढवाय़च्या जागाही निश्चीत झालेल्या नाहीत. प्रामुख्याने आधीपासून ज्या जागा आहेत, त्यात फ़ारसा बदल होऊ शकणार नाही. पण ज्या विरोधी पक्षाकडे आहेत किंवा मित्रपक्षांना सोडलेल्या जागा होत्या, त्याविषयी निर्णय व्हायचा आहे. त्यात बारामतीचा समावेश होतो. अशी जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाते आणि तिथे कोण उमेदवार दिला जातो, यालाच युतीची खरी कसोटी म्हणावे लागेल. कारण तो उमेदवार लेचापेचा किंवा दुबळा असेल वा ती जागा शिवसेनेच़्या मार्गाने शिवतारे यांच्या बाट्याला येणार नसेल, तर पुन्हा एकदा पवारांना आंदण दिली; असाच काहीसा अर्थ काढावा लागणार आहे. याचा आणखी एक संदर्भ विचारात घेतला पाहिजे. आठवड्याभरापुर्वी अचानक शरद पवार यांनी आपली भीष्मप्रतिज्ञा मोडून निवडणूकीच्या रिंगणात पुन्हा उडी घेत असल्याची घोषणा केली. त्याला बारामतीच्या बालेकिल्ल्याचाही संदर्भ आहे. तेव्हा युती झालेली नव्हती तरी युती होण्याच्या वाटाघाटी झालेल्या होत्या आणि म्हणूनच शिवसेनेकडे बारामती जाऊन शिवतारे हे आव्हान आपल्या मुलीच्या समोर उभे रहाण्याचा सुगावा साहेबांना लागलेला असावा. म्हणूनच ५ वर्षापुर्वी निवडणूक न लढवण्याची प्रतिज्ञा त्यांनी विनाविलंब मोडीत काढली. माढ्यात आजही राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटिल खासदार आहेत आणि मागल्या मोदीलाटेतही त्यांनी ती जागा त्यांनी जिंकलेली होती. मग आताच पवारांना पुन्हा तिथून लढण्याची उबळ कशाला यावी? तर बारामती व माढा हे शेजारचे मतदारसंघ असून त्यापैकी एकात पवार खुद्द उभे असले, तर बारामतीवर त्यांचा कायम वावर राहू शकतो. आपल्या हजेरीने त्यांना बारामती आपण़च लढवित असल्याचा देखावाही उभा करण्या़ची संधी मिळते. त्यामुळे आगामी लोकसभेत बारामती मतदारसंघाचे महत्व लक्षात घेता येईल.

२००९ आणि २०१९ अशा दहा वर्षात किती राजकारण बदलून गेले आहे, त्याचा यातून अंदाज येऊ शकतो. तेव्हा मुलीला लोकसभेत सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी पित्याने बारामतीची जागा मोकळी केली होती, तर निर्धास्तपणे जिंकता येईल अशी माढ्याची जागा आपल्यासाठी निवडली होती. आता त्यांना बारामती वाचवण्यासाठी माढ्यातून पुन्हा लढतीमध्ये उतरावे लागते आहे. त्याचे आणखी एक कारण आहे. भाजपा वा शिवसेना हे समोरचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्याशी सौदेबाजीही करणे शक्य आहे. पण पक्षांतर्गत बेबनावाला सौदेबाजीने हाताळणे आता साहेबांच्याही आवाक्यात राहिलेले नाही. मध्यंतरी अजितदादांनी लोकसभेची निवडणूक लढविण्याची मनिषा व्यक्त केलेली होती. त्याचा अर्थ ते बारामतीतून लढणार असा होऊ शकत नाही. तिथे सुप्रियाताईंची राखीव जागा आहे. सहाजिकच दादांचा डोळा शेजारच्या माढावर असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांनी अट्टाहास केला तर नकार देणे शक्य नसल्याने खुद्द साहेबच माढ्याच्या बोहल्यावर चढायला सिद्ध झाले. कारण राष्ट्रवादीचा कारभार सध्या सुप्रियाताईंकडे गेलेला असून, त्यात अजितदादा वा अन्य नेत्यांना निर्णय प्रक्रीयेत फ़ारसे स्थान उरलेले नाही. त्यातून जो बेबनाव तयार झाला आहे, तो हाताळताना साहेबांची मोठी तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे आजही आपणच पक्षाचे निर्णयाधिकारी आहोत हे नजरेत भरेल, असे डावपेच खेळणे भाग आहे. एका बाजूला अशी पक्षात तारांबळ उडालेली असताना खुद्द बारामतीमध्ये मोठे आव्हान साहेबांना नको आहे. पण ते आकार घेताना कुठेतरी त्यांनाही दिसलेले असावे. तिथेच आपली शक्ती क्षीण झाली तर राज्याच्याही राजकारणात आपल्याला स्थान उरणारे नसल्याचे भान साहेबांना आलेले आहे. त्यामागची खरी चालना बारामतीतून आलेली असावी. मुद्दा इतकाच आहे, की शिवसेना भाजपा युती साहेबांना उरलासुरला बालेकिल्ला आंदण देणार काय?

त्याचे उत्तर फ़ार लांब नाही. पहिली गोष्ट म्हणजे युतीमध्ये ही जागा कोणाच्या वाट्याला येते आणि तिथे कोणाला उमेदवारी मिळते; याकडे खुद्द शरद पवार डोळे लावून बसलेले असतील. कारण सेना भाजपा एकेकटे लढले असते, तर त्यांना बारामतीत तितके मोठे आव्हान उभे राहिले नसते. भाजपाशी सौदा करूनही बालेकिल्ला त्यांना सहज राखता आला असता. मग त्यात राष्ट्रवादीतल्या नाराजांनी कितीही दगाबाजी केली असती, तरी त्यांना फ़िकीर नव्हती. भाजपाशी त्यांनी मागल्या खेपेस तशी सौदेबाजी केली होती आणि बारामती राखल्याच्या बदल्यात विधानसभेचे निकाल लागण्यापुर्वी बाहेरून पाठींबा देण्याची घोषणा करून त्या उपकाराची परतफ़ेड सुद्धा केलेली होती. यावेळी शिवसेना मागल्या इतकी दुबळी नाही आणि काहीशी आपल्या अटी भाजपाकडून मान्य करून घेण्याइतकी शिरजोर झालेली आहे. अशावेळी बारामती शिवसेनेच्या वाट्याला जाण्याच्या भयाने साहेबांना व्याकुळ केलेले आहे आणि त्या डोकेदुखीचे खरे कारण पुरंदरचा शिवसेनेचा आमदार मंत्री विजय शिवतारे़च आहे. पवारांच्या पुणे जिल्ह्यातील वर्चस्वाला आव्हान देणार्‍या या अश्वमेधाला रोखण्याची भ्रांत माढ्याला उभे रहाण्यापर्यंत घेऊन गेली आहे. आता फ़क्त बारामतीमध्ये आपल्या पसंतीचा उमेदवार युतीच्या गळ्यात बांधण्याची गरज आहे. तो बांधायचा असेल तर ती जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला येता कामा नये आणि गेलीच तर तिथे शिवतारे किंवा त्यांचा कोणी निकटवर्तिय उभा राहू नये; यासाठी आटापिटा चालला आहे. म्हणूनच युतीची खरी कसोटी बारामती कोणाला मिळणार आणि तिथला उमेदवार कोण; यावर लागणार आहे. नसेल तर पुन्हा जानकरांना बळीचा बकरा बनवले जाईल. तसे झाले तर बारामती पुन्हा पवारांना आंदण दिली गेली, असे खुशाल समजावे. उलट शिवतारे यांच्या वाट्याला बारामती गेली तर तिथली लढत देशाचे लक्ष वेधून घेणारी होऊ शकेल.

भविष्यवेत्त्याचे स्मरण

thackeray के लिए इमेज परिणाम

"Nothing in the world is more dangerous than sincere ignorance and conscientious stupidity." - Martin Luther King Jr. (1929-1968)


दहा वर्षापुर्वी रिदा शेख नावाची मुलगी पुण्यात मरण पावली. ती देशातली पहिली स्वाईनफ़्लुची बळी होती. पण तिचा मृत्यू त्या घातक आजाराने घेतलेला नव्हता, तर चुकीच्या निदान व उपचाराने घेतलेला होता. अत्याधुनिक रुबी इस्पितळात तिच्यावर उपचार चालले होते आणि आईबापांनी पाण्यासारखा पैसा तिला वाचवण्यासाठी खर्च केला होता. पण चुक झाली होती, ती निर्बुद्ध गाफ़ील डॉक्टरांकडून! रिदाला स्वाईनफ़्लु झालेला होता आणि रुबी इस्पितळात तिच्यावर न्युमोनियाचे उपचार चालले होते. ती त्या उपचारांना प्रतिसाद देत नसतानाही आपल्या अर्धवट ज्ञान व समजूतीचा अट्टाहास करीत डॉक्टरांनी न्युमोनियाचेच उपचार चालवले होते आणि त्याच गैरलागू उपचारांनी रिदा शेखचा बळी घेतला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आजाराने योग्य निदान झाले व देशातली ती पहिली स्वाईनफ़्लुची बळी ठरली. कश्मिरची समस्या किंवा आजार किंचीतही वेगळा नाही. स्वातंत्र्योत्तर काळात हा रोग सतत बळावत गेला आहे आणि त्या आजाराला जोजवत चाललेले चुकीचे निदान व उपचारच आजच्या भीषण परिस्थितीला कारणीभूत झालेले आहेत. मुळात आजार मानायचा नाही आणि नंतर त्यावर चुकीचे औषधोपचार करायचे, हे मृत्यूला आमंत्रण असते. काश्मिर असो की जिहादी दहशतवाद असो, त्याचे मागल्या तीन दशकापासून निदानच चुकीचे चाललेले असून; उपचार सतत निरूपयोगी ठरलेले आहेत. बाळासाहेबांनी पाकवर सर्वंकश बहिष्काराची भूमिका मांडली, तेव्हा काश्मिर जवळपास शांत होता आणि तिथला मुस्लिम तरूणही जिहादी झालेला नव्हता. पण रोगाला चुचकारण्यातून किंवा नाकारण्यातून आज तो रुग्ण किंवा प्रश्न मृत्यूशय्येवर येऊन पडलेला आहे. करोडो भारतीय बाळासाहेबांच्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. पण याचा पहिलाच इशारा देणार्‍या त्या भविष्यवेत्ता नेत्याचे स्मरण कोणाला होऊ नये याचे दु:ख होते.

अठ्ठावीस वर्षे उलटून गेली आता त्या घटनेला. तेव्हा काश्मिरात कुठे अतिरेकी घातपात घडवत नव्हते, की जागोजागी बॉम्बस्फ़ोट घडत नव्हते. पण सीमा वा नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार व्हायचा. त्यात भारतीय सैनिकांचा किंवा लगतच्या गावातल्या सामान्य नागरिकांचा बळी जायचा. आज तोंड वर करून वचवचा बोलणार्‍या महबुबा मुफ़्तीच्या भगिनी रुबाया, यांचे अपहरण झाले होते आणि तिच्या सुटकेसाठी अतिरेक्यांची चार खतरनाक कैद्यांच्या मुक्ततेची मागणी मान्य झालेली होती. पण बाकीचा काश्मिर शांत होता आणि सामान्य काश्मिरी सैन्यावर पोलिसांवर दगडफ़ेक करीत नव्हता. चकमकीही घडत नव्हत्या. थोडक्यात आजच्या तुलनेत काश्मिर खुपच शांत होता. पण तिथे आगडोंब पेटवण्याचे प्रयास पाकिस्तान करीत होता. अशावेळी एकच माणूस ठामपणे पाकिस्तानशी संवाद नको, की वाटाघाटीही नकोत; असा आग्रह धरून पाकला युद्धातून धडा शिकवण्याची भाषा ठामपणे बोलत होता. त्यानेच तेव्हाच पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये म्हणून आग्रह धरलेला होता. त्याच्याच शब्दावर शिशीर शिंदे नावाच्या विभागप्रमुखाने मुंबईच्या वानेखेडे स्टेडीयमची खेळपट्टी उखडून दोन देशांच्या सामन्यात व्यत्यय आणलेला होता. कोणाला त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण तरी आज झाले आहे काय? तेव्हा त्याच्यावर युद्धखोर हिंसेचा पूजक, असले आरोप झाले होते. दोन देशातील वैमनस्य वाटाघाटी व संवादातूनच संपवता येईल असा बुद्धीवाद जोरात झालेला होता. आता जवळपास तीन दशकांनंतर कित्येक वाटाघाटी व संवादातून काय निष्पन्न झाले? हजारो सैनिक व तितकेच सामान्य नागरिक पाकिस्तानी घातपाताचे बळी झाले आहेत. कोट्यवधी भारतीय पाकिस्तानशी कुठलेच संबंध नकोत म्हणून एकसुरात बोलू लागले आहेत. मात्र शिवसेनेलाही बाळासाहेब नावाचा तो भविष्यवेत्ता आठवलेला नाही.

खेळ आणि राजकारणाची गल्लत नको, हा तेव्हाचा युक्तीवाद बुद्धीवाद होता आणि किरकोळ स्वरूपात आजही तोच युक्तीवाद चालू आहे. मात्र किंमत मोठीच मोजली गेली आहे. हे दिडशहाणे कुठल्या अवास्तव जगात जगतात ठाऊक नाही. कारण असल्या युक्तीवादाची किंमत भारताने आपल्याच भूमीत मोजलेली आहे आणि असल्या युक्तीवादाचे प्राणघातक चटके श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी पाकिस्तानात जाऊन सोसलेले आहेत. भारत पाकिस्तानच्या संघर्षाशी किंवा जिहादशी आपला संबंध काय; म्हणून श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला. तेव्हा एका सामन्याच्या दरम्यान त्यांच्या बसवर हल्ला होऊन, त्यांना थेट खेफपट्टीवरून हेलिकॉप्टरने मायदेशी पळ काढावा लागलेला होता, सचिन तेंडूलकर किंवा सुनील गावस्करला त्याची कल्पना नाही, असे कोणाला म्हणायचे आहे काय? पाकिस्तान इस्लामी देश असून तिथला खेळाडू वा कलाकार लोकशाहीवादी उदारमतवादी असू शकत नाही. कुठल्याही प्रचलीत सभ्यतेचा गंध त्याला नाही. म्हणून कलाकार साहित्यिक वा खेळाडू आणि जिहादी यात तसूभर फ़रक नसतो. ते सगळे मुखवटे असतात आणि जिहाद हेच उद्दीष्ट असते. याची साक्ष मला देण्याची गरज नाही. २०१४ मध्ये अहमद शेहजाद नावाच्या पाक खेळाडूने खेळपट्टीवरच दिलशान तिलकरत्ने या श्रीलंकन खेळाडूला मुस्लिम धर्म स्विकारण्याचा किंवा नरकात जाण्याचा इशारा दिला होता. क्रिकेटचा धर्माशी संबंध नसेल, तर असल्या घटना कशाला घडतात? हा अनुभव कुठल्याही क्षेत्रातल्या पाकिस्तानी व्यक्तीचा असताना खुळ्यासारखे युक्तीवाद कामाचे नसतात आणि त्यातून कुठला उपाय शक्य नसतो. उलट आजार बळावत जातो. म्हणून तर १९९१ सालात बाळासाहेबांनी सांगितलेला उपाय हसवण्यावारी नेण्याची किंमत भारताला आज मोजावी लागते आहे. काश्मिर दहशतवादाच्या आहारी गेलेला आहे आणि बुद्धीवादी वर्गाला नव्हेतर सामान्य नागरिक व सैनिकांना प्राणाचे मोल मोजावे लागते आहे.

बाळासाहेबांनी जेव्हा असा अट्टाहास केला, तेव्हा त्यांच्यावर अतिरेकी राष्ट्रवादाचा आरोप झाला. बौद्धिक खिल्ली उडवली गेली होती. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शिशीर शिंदे आणि काही शिवसैनिकांनी मुंबईत होणार्‍या भारत पाक क्रिकेट सामन्याची खेळपट्टी उखडून टाकली होती. तिथे डिझेल ओतून खेळपट्टी खेळ्ण्याला्यक रहाणार नाही अशी व्यवस्था केलेली होती. तेव्हा त्यांना गुन्हेगार ठरवले गेले. त्यांच्यावर खटले भरले गेले. पण तेव्हाही कोणी मायका लाल क्रिकेटपटू बाळासाहेबांच्या समर्थनाला आलेला नव्हता. पण साहेबांच्या आग्रहातले तथ्य क्रिकेट क्षेत्रातल्या एका जाणकाराने तेव्हाही स्पष्टपणे मांडलेले होते. अनेक सामन्यात पंच म्हणून काम केलेले माधव गोठोस्कर यांनी लेख लिहून पाकिस्तानी क्रिकेटसंघ कसा त्या देशाची राजकीय धोरणे खेळातही अंमलात आणतो, त्याची ग्वाही दिलेली होती. पण तिकडे कोणी लक्ष दिले होते? श्रीनगर येथे दोन देशातील सामना ठरलेला असताना काश्मिर वादग्रस्त भूप्रदेश असल्याने ती भारताची भूमी नाही, म्हणून पाक संघाने श्रीनगरचा सामना खेळण्यास नकार दिला. तो खेळ होता की राजकारण? असा सवाल गोठोस्करांनी विचारलेला होता. कोणी त्याचे उत्तर आजपर्यंत दिले आहे काय? ती घटना १९९१ सालची आणि दोनच वर्षात बौद्धीक दिवाळखोरीची किंमत पाकिस्तानने मुंबईकडून वसुल केली होती. त्याच मुंबईत मग पाकिस्तानी कारस्थानामुळे बॉम्बस्फ़ोट मालिका घडलेली होती. सैनिकांच्या जीवाची पर्वा नसलेल्या भारतीय क्रिकेटशौकीन व खेळाडूंचा उदारमतवाद मुंबईकरांना वाचवू शकला नाही. पाठीशी घातल्याने गुन्हेगार सोकावत जातो, तसाच पाकिस्तान सोकावलेला आहे. मात्र मुर्ख युक्तीवाद आजही संपलेले नाहीत. क्रिकेट थांबवून दहशतवाद संपणार नाही आणि युद्धानेही दहशतवाद संपणार नाही, म्हणून आपण त्या हिंसेची जुळवून घ्यावे हे आता बुद्धीवादाचे सुत्र झालेले आहे.

=======================

रिदा शेखच्या मृत्यूविषयी अधिक तपशील ज्यांना हवा, त्यांच्यासाठी बातमीचा हा दुवा
https://ahmedabadmirror.indiatimes.com/ahmedabad/others/rape-victims-family-seeks-speedy-trial/articleshow/67983790.cms?utm_source=Articleshow&utm_medium=Organic&utm_campaign=Related_Stories

https://www.hindustantimes.com/india/swine-flu-victim-s-family-to-sue-hospital-for-negligence/story-UDELuPGsfWVXmyobWpb7NK.html

Friday, February 22, 2019

तो नुसता गणवेश नाही रे

Sachin Tendulkar

सचिन,

होय आज नुसते सचिन लिहावेसे वाटले. अलिकडे प्रिय वगैरे शब्द लिहायची हिंमतच झाली नाही. कशी होणार? तुझ्या बोलण्यातून आणि वागण्यातून तू तशी हिंमत कोणा भारतीयात जागवलीसच नाही ना? भारतीय सेनादलाचे अंग असलेल्या हवाई दलाने तुला ग्रुप कॅप्टन असा सन्माननीय हुद्दा दिला, आपला ब्रान्ड अम्बॅसेडर बनवलेले होते. तेव्हा तू अंगावर चढवलेला गणवेश कुठल्या आयपीएल संघाचा गणवेश नाही रे. आज भारतीय संघाकडून खेळताना निळ्या रंगाची जर्सी परिधान करावी आणि उद्या मुंबई इंडियन्सच्या संघातर्फ़े खेळताना त्यापेक्षा वेगळ्याच रंगसंगतीची जर्सी परिधान करावी; इतका तो हवाई दलाचा गणवेश स्वस्त नसतो रे सचिन! त्या गणवेशाला परिधान केल्यावर देशाचा सैनिक आपल्या घरकुटुंब किंवा सग्यासोयर्‍यांना विसरून फ़क्त देशाचा विचार करतो. त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतो. आणि तू विश्वचषकाच्या स्पर्धेतल्या दोन गुणांसाठी बोलतोस? एका क्षुल्लक पैशाच्या खेळातले गुण आणि देशाची इभ्रत, यातला फ़रक कधी कळला कारे तुला? एका स्पर्धेतले गुण देशापेक्षा मोठे नसतात आणि अशा कित्येक स्पर्धा देशाच्या अस्तित्वासाठी व तिरंग्यासाठी ओवाळून टाकायचे म्हणून शेकडो हजारो जवान आपल्या अंगावर असा गणवेश चढवत असतात. तुझ्यासारखा प्रत्येक स्पर्धा वा सामान्यानुसार त्यांच्या अंगावरचा गणवेश बदलत नसतो. त्या गणवेशामागे लाखो लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात. त्यांना तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुझ्यापेक्षाही छोटा किंवा कुठलेही विक्रम आपल्या खात्यात नोंद नसलेला तो हरभजन सिंग, मोठा म्हणायची पाळी आणलीस. त्याला पुलवामा घडल्यानंतर काही तासाचा विलंब लागला नाही, विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची मागणी करायला. आणि तू सचिन, चार दिवस उलटून गेल्यावर पाकिस्तानला दोन गुण द्यायचे काय, म्हणून विचारतोस? कुणाच्या कसल्या उपकाराची ओशाळवाणी परतफ़ेड करतो आहेस?

पुढल्या जुनमध्ये इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा व्हायची आहे आणि यापुर्वीची तिथली स्पर्धा झाली, तेव्हाची एक घटना आठवते सचिन तुला? तू त्याच स्पर्धेत सहभागी व्हायला गेला होतास आणि अकस्मात इथे तुझ्या जन्मदात्या रमेश तेंडूलकरांचे आकस्मिक निधन झाले. अवघा देश तेव्हा हळहळला होता. स्पर्धा बाजूला ठेवून सचिन तुही पित्याच्या अंत्यदर्शन व अंत्यविधीसाठी मायदेशी परतला होतास. अश्रूपुर्ण डोळ्यांनी माघारी आलेल्या तुला टिव्हीच्या पडद्यावर बघताना करोडो भारतीयांचे डोळेही पाणावलेले होते. त्याहीपेक्षा त्यानंतर पुन्हा लगेच स्पर्धेत भाग घ्यायला व भारताच्या वतीने खेळातली लढाई करायला निघालेल्या लढवय्यासारख्या तुला बघूनही, अनेक भारतीयांचा ऊर भरून आला होता. तेव्हा तू हवाई दलाचा कोणी प्रतिनिधी नव्हतास किंवा तो गणवेशही अंगावर चढवलेला नव्हतास. पण प्रत्येक भारतीयाला तो सचिन योद्धाच वाटला होता. आज तू क्रिकेटमधून निवृत्त झाला आहेस आणि आजवर देशासाठी खुप खेळलेला आहेस. आज तुझ्याकडून खेळाची अपेक्षा कोणी करीत नाही. पण अशी कसोटीची वेळ येते, तेव्हा धारातिर्थी पडलेल्यांसाठी तितक्याच आवेगाने डोळ्यात अश्रू आणण्याची अपेक्षा लोकांनी केलेली असते रे! तो अंगावर शोभेसाठी जो गणवेश चढवतोस ना? तो परिधान करणारा सैनिक आपल्या सोबत्याचा मृत्यू झाल्यावरही माघार घेत नाही, की नुकसानाचा विचार करत नाही. तर पुढेच सरसावत असतो. दोन गुण जातील वा कुठली हानी होईल ,याची फ़िकीर करीत नसतो. कारण ती कसोटीची वेळ असते. ते भान हरभजन, लक्ष्मण वा गांगुलीने दाखवले. त्यांनी कधी हवाईदल वा सेनादलाचा गणवेशही अंगावर चढवलेला नाही. पण हा क्षण देशाच्या इज्जतीचा व प्रतिष्ठेचा आहे, याचे भान त्यांना आहे आणि तुला नाही. हे बघून मनाला यातना झाल्या. म्हणून प्रिय असा शब्द तुझ्या नावाच्या अलिकडे लिहायची हिंमतही झाली नाही.

अंगावऱचा गणवेश विसरला़स सचिन, पण कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश करतानाचा पहिला अनुभवही विसरून गेलास? आठवते तुला, तेव्हा सोळा सतरा वर्षाचा सचिन पाकिस्तानच्या भूमीवर आणि स्टेडियमवर होता आणि चहूकडून कोवळा पोर म्हणून तुझी खिल्ली उडवली जात होती. अब्दुल कादिर किंवा अशा़च कुणा पाक बोलरच्या भेदक फ़ेकीने तुझे नाक रक्तबंबाळ झालेले होते. सहकार्‍यांनी व खेळपट्टीवर आलेल्या डॉक्टरने तुला तात्पुरता निवृत्त होऊन तंबूत जायला सांगितले होते. पण सल्ला झुगारून तू तिथे पाय रोवून उभा राहिलास. त्याच पाकिस्तानच्या गोलंदाजीला फ़ोडून काढत आपले भारतीयत्व पाकच्या गर्जणार्‍या जमावाला दाखवून दिलेले होतेस. तीस वर्षे होतील, त्या प्रसंगाला आता. प्रत्येक भारतीयाच्या मनावर तो प्रसंग जसाच्या तसा कोरला गेला. तो त्या कसोटीच्या प्रसंगी तूच दाखवलेल्या धैर्यामुळे. आज तुलाच तो प्रसंग आठवलेला नाही? तेव्हा तू तसाच रक्तबंबाळ होऊन माघारी आला असतास आणि तर विश्रांती घेऊन नंतर खुप चांगली फ़लंदाजी करू शकला असतास. पण तू तिथेच थांबलास आणि पुढल्याच चेंडूवर सणसणित फ़टका मारून पाकिस्तानी आक्रमणाला तिथेच चोख उत्तर दिले होतेस. तेव्हा तुला मलमपट्टी वा अन्य काही ‘गुण’कारी औषधांची गरज वाटली नव्हती. कोट्यवधी भारतीयांचा योद्धा म्हणून तू पुढेच गेलास. कित्येक लाख भारतीय जवानांना तेव्हा तू त्यांच्यातलाच एक लढवय्या वाटला होतास. त्यासाठीच तुझ्यावर अवघा भारत प्रेम करू लागला. त्या पहिल्या डावात तू केलेल्या धावा किंवा एकूण २३ वर्षात काढलेली शंभर शतके कोणी मोजली नाहीत. त्या हजारो धावा किंवा त्यातले गुण हिशोबात धरले जात नाहीत. त्या पहिल्या डावाच्या कसोटीच्या प्रसंगी ती तू ठाम उभा राहिलास ना सचिन, तो सचिन आज कुठेतरी हरवल्याचे दु:ख आहे. भारतरत्न किंवा तशा़च कुठल्या पुरस्काराची किंमत मोजतोयस कारे?

युपीएच्या दुसर्‍या कारकिर्दीत मनमोहन सरकारच्या अब्रुचे दिवाळे वाजलेले होते. त्यांची राजकारणातील आणि भारतीय जनमानसातील पत संपलेली होती. तेव्हा तुला राज्यसभा देऊन गहाण टाकला गेला. मग तुला भारतरत्न देण्यासाठी नियमात बदल करून सोनिया-राहूलनी तुला अधिक सन्मानित केले. त्याची किंमत मोजलीस कारे आज सचिन? नसेल तर तुला आजच पाकिस्तानला दोन गुण आंदण देण्याचा युक्तीवाद कुठून सुचला? त्यासाठी चार दिवस कशाला जावे लागले? देशाची अब्रु किंवा प्रतिष्ठा स्वाभिमान विश्वचषक स्पर्धेच्या दोन गुणात सामावलेला असतो कारे? स्पर्धा होतात संपतात. शिल्लक उरते ती माणसाची व समाजाची ओळख. ती ओळख गुणांच्या गणिताने होत नाही, तर आपल्या स्वाभिमानाच्या मोजपट्टीने होत असते. श्रीनगर वादग्रस्त काश्मिरचा हिस्सा आहे, म्हणून तिथे दौर्‍यावरचा पाकिस्तानी संघ सामना खेळायचा नाकारतो. म्हणून त्या देशाच्या जनतेला ते योद्धे वाटतात. तूही पाकिस्तानच्या विरोधातले षटकार हाणलेस वा शतके ठोकलीस, तेव्हा सीमेवरच्या जवानांना तूच योद्धा वाटला होतास. भीषण थंडी वा प्रतिकुल वातावरणात असह्य जीवन जगताना त्यांना तूच मोठा लढवय्या वाटलास. त्यांच्या मनातून आज सचिन तू नक्कीच उतरला असशील. ज्या घरात शहीद झाला आहे, शहीदांचे आप्तस्वकीय असतील; त्यांना तर तुला ओळखणेही कठीण होऊन जाईल. आज पैसेवाले पत्रकार किंवा माध्यमातले बुद्धीमंत तुझी पाठही थोपटतील. पण ज्यांनी आपल्या फ़ाटक्या खिशातले चार पैसे खर्चून तुझ्या शतकासाठी फ़टाके वाजवले, त्यांना ती उधळपट्टी वाटण्याची नामुष्की आणलीस रे सचिन! अनेक शतके विक्रम आणि हजारो धावांवरून तीनचार शब्दात बोळा फ़िरवलास सचिन. तुला प्रिय तरी कसे म्हणावे? तूच तुझी ओळख विसरला असशील, तर आम्ही आमचा लाडका सचिन कुठे शोधायचा?

Thursday, February 21, 2019

जैश आणि कॉग्रेसचे महागठबंधन?



पुलवामाचा घातपाती हल्ला होऊन त्यात ४० जवान शहीद झाले तर पाकिस्तान त्यातला आरोपी आहे. हे सगळ्या देशाला प्रथमदर्शनीच वाटलेले आहे आणि म्हणून तर आगामी विश्वचषक स्पर्धेतही भारताने पाकिस्तानी संघाशी क्रिकेट सामना खेळू नये, म्हणून देशव्यापी आग्रह धरला गेला. पण कॉग्रेससहीत विरोधी पक्षनेत्यांना त्यातही मोदी सरकार गुन्हेगार वाटते आहे. ही महत्वाची बाब विचारात घेतली पाहिजे. पंतप्रधानांनी सर्व विरोधकांची बैठक बोलावून त्यांना घटनाक्रमाची माहिती दिली आणि त्यांना विरोधी पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहू; अशी ग्वाही सुद्धा दिली. पण बैठकीतून बाहेर पडल्यावर सर्वच विरोधी नेत्यांची वक्तव्ये तपासून बघायला हवीत. आपण सरकारच्या पाठीशी आहोत, म्हणजे काश्मिरात जसे तिथले युवक सैनिकांच्या मागे असतात, तसेच आम्ही आहोत, याचीच आपापल्या वक्तव्यातून विरोधकांनी साक्ष दिलेली आहे. काश्मिरी युवक सैन्याच्या पाठीशी असतात म्हणजे अतिरेक्यांशी चाललेल्या चकमकीत भारतीय सैनिकांच्या मागल्या बाजून दगडफ़ेक करण्यासाठी पाठीशी असतात. विरोधी नेत्यांनी नेमकी तीच भूमिका बजावलेली नाही काय? भारत सरकार जगासमोर पाकिस्तानला दहशतवादी देश ठरवण्यासाठी डावपेच राबवित असताना कॉग्रेसचा प्रवक्ता भारत सरकारच्या निर्णयावर आणि घटनाक्रमावर शंका घेतो. हल्लेखोराला भारतातला दहशतवाद म्हणून संबोधतो. पाकचे पंतप्रधान इमरान खान तीच भाषा बोलतात आणि सुरजेवालाही तेच शब्द नेमके बोलतात. याची सुरूवात बंगालच्या मुख्यमंत्री मनता बानर्जींनी केली. हा हल्ला निवडणूकांच्याच मुहूर्तावर कसा झाला, असा प्रश्न विचारून ममतांनी जणू हा हल्ला भाजपाच्या सरकारने निवडणूकीपुर्वी भारतीयांच्या भावना चिथावण्यासाठी होऊ दिला वा केला, असाच सुर लावला. अशा लोकांच्या माहितीसाठी महत्वाचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. निवडणूकीत पाकिस्तानने हस्तक्षेप करून मोदींना पराभूत करण्याचे मुळ आमंत्रण कोणी दिले होते? तो कॉग्रेस नेताच नव्हता काय?

चार वर्षापुर्वी पाकिस्तान दौर्‍यावर गेलेले कॉग्रेसचे मजीमंत्री व ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी तिथले माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ़ यांच्या शेजारीच बसून उधळलेली मुक्ताफ़ळे आपल्या लक्षात आहेत काय? भारत पाकिस्तान यांच्यात पुन्हा वाटाघाटी सुरू व्हाव्यात, अशी मागणी पाकिस्तान सातत्याने करीत आलेला आहे. पण घातपाती हल्ले व दहशतवाद चाललेला असताना संवाद होऊ शकत नाही; अशी मोदी सरकारची भूमिका राहिलेली आहे. त्यावरचा उपाय सुचवताना पाकच्या पत्रकार परिषदेत अय्यर यांनी एक तोडगा सुचवला होता. तुम्ही (म्हणजे पाकिस्तानने) मोदी हटवण्यासाठी आम्हाला मदत करावी. त्यातून पुन्हा कॉग्रेसला सत्तेवर यायला साथ द्यावी. मगच दोन देशात बोलणी सुरू होतील आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ शकतॊल, असा तो तोडगा होता. त्यामुळे ममतांना निवडणुकीच्या मुहूर्तवर असा हल्ला कशाला झाला, त्याचे उत्तर सरकार नव्हेतर मणिशंकर अय्यर देऊ शकतॊल. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधीच देऊ शकतील. कारण त्यांच्याच पक्षाच्या वतीने तीनचार वर्षापुर्वी अय्यर पाकिस्तानची मदत मागायला गेलेले होते. मागितलेली मदत मोदींना निवडणूकीत हरवण्यासाठीची होती. या दोन गोष्टी जोडल्या, तर निवडणूकीच्या तोंडावर हा घातपात कशाला झाला व पाकिस्तानने कोणासाठी केला, त्याचे उत्तर ममतांना सहज मिळून जाऊ शकेल. ही गोष्ट लपून राहिलेली नाही आणि त्याचा अनेक जागी उल्लेख आलेला आहे. तेव्हा अय्यर यांच्या शेजारी बसलेले लष्करशहा आजही हल्लेखोर जैशे महंमद संघटनेचे व त्यांच्या कृत्याचे समर्थन करीत आहेत. मात्र उत्तर ज्याच्यापाशी आहे, ते मणिशंकर अय्यर गप्प आहेत. उलट राहुल गांधी मात्र मोदी सरकारला सवाल विचारत आहेत. बेशरमपणा इतकाही करू नये, की तोंड लपवायला उद्या जागा शिल्लक राहू नये. खरे तर यातला मोठा बेशरमपणा माध्यमांचा म्हणावा लागेल.

आज जेव्हा ममता किंवा कॉग्रेस प्रवक्ता रणदीपसिंग सुरजेवाला पुलवामा हल्ल्यातील आरडीएक्स कुठून आले? हल्लेखोरांच्या कारवाईचा प्रश्न विचारतात, तेव्हा अगोदर त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधीनी मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानच्या मागितलेल्या मदतीचा प्रतिसवाल केला पाहिजे. चार वर्षापुर्वी अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदी सरकार पराभूत करण्यासाठी काय मदत मागत होते? कोणाकडे मदत मागत होते? जैशचे इथले पुरस्कर्ते हुर्रीयतचे मुखंड असलेल्यांना अय्यर गळाभेट कशाला करीत होते? असले सवाल कोणी विचारायचे असतात? चौकस पत्रकारांनी की भाजपाच्या प्रवक्त्यांनी? पत्रकारितेत असे सवाल विचारण्याचे अधिकार असतात आणि कर्तव्यही असते. किती पत्रकारांनी राहुल वा त्यांच्या प्रवक्त्यांना असे प्रश्न गेल्या काही महिन्यात विचारलेले आहेत? त्यांनी वाटेल ती मुक्ताफ़ळे उधळावीत आणि त्या खुळ्या प्रश्नांचा उलटा भडीमार पत्रकारांनी व माध्यमांनी भाजपावर करावा, हा सुद्धा बेशरमपणाच नाही काय? ममतांना आलेली शंका चुकीची अजिबात नाही. ऐन निवडणूक मुहूर्तावर असा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवादी हस्तकाने कोणासाठी केला? त्याचा हल्ला व त्यात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांचे अंत्यसंस्कार पुर्ण झालेले नाहीत, इतक्यात कॉग्रेसच्या प्रवक्त्याने असले बेशरम प्रश्न विचारण्यातला हेतूही लपून रहात नाही. म्हणजे यांच्याच इशार्‍यावर हल्ले होणार आणि त्यांनीच मोदी सरकारला उलटे प्रश्न विचारायचे. पाकिस्तानी कलावंतांना भारतात प्रतिबंध घालण्याचा विषय आला, तेव्हा त्यांना अगत्याने आमंत्रित करून सरकारी खर्चाने त्यांचे भव्य कार्यक्रम कोणी ठेवलेले होते? ममता आणि केजरीवाल यांनीच त्यावर भारतीय जनतेचा पैसा खर्च केला होता ना? आज तेच बेशरम लोक भारत सरकारला सैनिकांच्या मृत्यूचा जाब विचारतात. कुणालाच काडीमात्र शरम उरलेली नाही काय?

पुलवामाच्या हल्ल्यानंतर किंवा उरी वा पठाणकोटच्या हल्ल्यानंतर कॉग्रेस आणि मणिशंकर अय्यर यांना एक प्रश्न विचारला जायला हवा होता. ‘तुम्ही मोदी हटावसाठी हीच मदत पाकिस्तान व मुशर्रफ़ यांच्याकडे मागितली होती काय? हाच तो प्रश्न आहे. मग त्यातून अनेक प्रश्न समोर येतात. ही मदत कोणासाठी मागितली होती? राहुलना पंतप्रधान करण्यासाठी अशी मदत हवी होती काय? मोदींना देशाचा कारभार करता येत नाही व सुरक्षा मोदींच्या आवाक्यातली नाही, हे सिद्ध करण्यासाठीच अशी जिहादी हल्ल्याची मदत अय्यरनी मागितली होती काय? कोणाच्या इशार्‍यावर अय्यर अशी मदत मागायला पाकिस्तानात गेलेले होते? त्यासाठी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर करून घेतला होता काय? कुमार केतकर म्हणतात, तो व्यापक कटाचा भाग हाच आहे काय? म्हणजे मोदी सरकार अपेशी वा नालायक ठरवण्यासाठी पाकिस्तानने घातपाती वा दहशतवादी हल्ले करावेत. मग त्याचा आधार घेऊन इथे कॉग्रेसने त्याच हल्ल्यासाठी मोदी सरकारला जबाबदार धरावे, अशी कॉग्रेसची रणनिती आहे काय? नसेल तर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि इथले कॉग्रेसी व त्यांचे मित्रपक्ष एकाच भाषेत कशाला बोलत असतात? कॉग्रेसने पाकिस्तानशी मोदींच्या विरोधात महागठबंधन केलेले आहे काय? नाहीतर अशा हल्ल्यांनी विचलीत होण्यापेक्षा कॉग्रेस व अन्य विरोधी पक्ष सुखावत कशाला असतात? पत्रकार म्हणून कोणाला असे प्रश्न पडत नसतील, तर त्या माध्यमांकडेही संशयाने बघण्याची गरज आहे. कारण कालपरवा पाकिस्तानच्या वकीलाने कुलभूषण जाधवच्या सुनावणीमध्ये भारतीय पत्रकार करण थापरच्या लेखाचे दाखले कशाला दिले असते? केजरीवालनी सर्जिकल स्ट्राईकविषयी घेतलेल्या शंकेला पाकिस्तानने आपला बचाव कशाला बनवले असते? महागठबंधनाची व्याप्ती इतकी दुरवर पसरलेली कॉग्रेसचे खासदार म्हणून कुमार केतकरांनाच ठाऊक असू शकते. म्हणून त्यांनी व्यापक कटाची थिअरी मांडली असेल काय? कितीतरी प्रश्न आहेत आणि त्यातला कुठलाही प्रश्न तथाकथित नामवंत पत्रकार संपादकांना पडत नसेल, तर त्यांची पत्रकारीताही शंकास्पद नाही का?

ज्यांना अधिक कुतूहल आहे त्यांनी साडेतीन वर्षापुर्वीचा हा माझा लेख वाचावा
http://jagatapahara.blogspot.com/2015/11/blog-post_18.html

Wednesday, February 20, 2019

हमारी नाव वहा डुबी (उत्तरार्ध)




२०११ च्या सुमारास अकस्मात एक बातमी भारतीय माध्यमातून झळकली आणि राजकारणात एकच खळबळ उडालेली होती. संरक्षणमंत्र्यांच्या फ़ोनवरील संभाषणही चोरून ऐकले जात असल्याची ती बातमी होती. तो आक्षेप भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागावर ठेवण्यात आलेला होता. त्याखेरीज आणखी एक अशीच अफ़वा वर्तमानपत्रातून सोडली गेलेली होती. प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने सेनादलाच्या अनेक तुकड्या राजधानी दिल्लीत संचलनाचा सराव करीत होत्या. त्याचवेळी उत्तरप्रदेशाच्या मेरठ येथून काही सेनादलाच्या तुकड्या इतरत्र कुच करीत होत्या. त्यातून भारतीय लोकशाही उलथून टाकत सेनादल सत्ता काबीज करायच्या प्रयत्नात असल्याची ती अफ़वा होती. तिला कुठलाही आधार नव्हता आणि गोंधळ उडवून देण्याचाच त्यामागचा हेतू होता. तो मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला. कारण तितके निमीत्त साधून दिल्लीची नोकरशाही, राजकारणी व तथाकथित बुद्धीमंतांनी मोठा हलकल्लोळ माजवला आणि तेव्हाचे लष्करप्रमुख व्हॊ. के. सिंग यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. उपरोक्त दोन बातम्या भारतीय सुरक्षा दलाच्या विविध दक्षता यंत्रणांना उध्वस्त करणाचा व्यापक कट होता. कारण तेव्हा सिंग व संरक्षणमंत्री अन्थोनी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते आणि त्याचाच आधार घेऊन गलिच्छ राजकारण खेळले जात होते. माध्यमातून मग सिंग यांना सरसकट लक्ष्य करण्याची मोहिमच हाती घेण्यात आली. काश्मिरातील पाकवादी प्रवृतीच्या राजकारण्यांनी तोफ़ा डागल्या. सिंग लष्करी अधिकारी आणि संरक्षण खात्याचा पैसा वापरून काश्मिरी राजकारणात ढवळाढवळ करीत असल्याचाही एक आरोप त्यात समाविष्ट होता. त्यासाठी मग टीएसडी हा शब्द पुढे आला, ही टीएसडी म्हणजे टेक्नीकल सपोर्ट डिव्हीजन गुप्तचर म्हणून काम करीत नसून काश्मिरातील लोकांनी निवडलेले सरकार पाडण्यासाठी उचापती करीत असल्याचा आरोप पुढे आला. लष्करी पैसे देऊन एक अपक्ष आमदाराला खरेदी करण्यात आल्याचा बिनबुडाचा आरोप ठळकपणे पुढे आला आणि त्याचा कुठलाही पुरावा कधीच कोणी दिलेला नव्हता. पर्यायाने टीएसडी ही गोपनीय बाब चव्हाट्यावर आली आणि तिचा गाशा सेनादलाला गुंडाळावा लागला. त्यात कार्यरत असलेल्या अधिकारी व हस्तकांचे चेहरे उघडे पडले आणि अनेक अधिकारी कोर्टमार्शलचे बळी झाले. पण ती बाब महत्वाची नाही. त्यातून काश्मिरात गुपचुप जी कारस्थाने शिजवलॊ जात होती, त्यांची इत्थंभूत माहिती सेनादलाला मिळण्याचा मार्गच बंद होऊन गेला. तसे नसते तर उरी, पठाणकोट वा पुलवामाचा रक्तपात होऊच शकला नसता. 

इथे टीएसडी म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल. अशा लष्करी वा गुप्तचरांच्या तुकड्या अधिकृतपणे कधीच कुठल्या संस्था संघटनेशी संबंधित असत नाहीत. किंवा त्यांचे धागेदोरे कुठल्या शासकीय व्यवस्थेशी जोडले जाऊ नयेत याची पुरेपुर काळजी घेतली जात असते. ही माणसे म्हणजे त्या तुकडीतले हस्तक, सैनिक वा कोणीही शासन मान्यतेने आपली कृती करीत होता, असे सिद्ध होऊ शकणार नाही. इतकी अलिप्तता राखली जात असते. कारण त्यांच्या सर्व कृती व कामे प्रस्थापित कायदे व नियमांच्या चौकटीत बसणार्‍या नसतात. अनेकदा तर अशा कारवाया कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरू शकणार्‍याही असतात. सहाजिकच त्यात कुठेही लहानसहान चुक राहुन गेली, तर अशा तुकडीतले सहभागी कोणीही स्थानिक पोलिस यंत्रणेच्या तावडीत सापडतात आणि त्यांना होणार्‍या कारवाईचे दुष्परिणामही भोगाव लागत असतात. पण त्यातला कोणीही आपण सेनदलाचा सैनिक वा हस्तक असल्याचे सहजासहजी मान्य करीत नसतो, की करणारही नाही. सेनादल किंवा सरकारमध्ये कार्यरत असलेल्या वरीष्ठ वा ज्येष्ठ मंत्री वा अधिकार्‍यांनाही अशा हस्तक वा व्यक्तींची ओळख नसते. थोडक्यात पाकिस्तान जसा अजहर महमूद वा सईद हाफ़ीज या लोकांविषयी हात झटकून मोकळे होतो, तशीच आपल्याही टीएसडीमध्ये काम करणार्‍यांची अवस्था होती. पण तशी वेळ निदान मायदेशी येऊ दिली जात नसते. तिकडे पाकिस्तान कितीही दडपण आले म्हणून सईद वा अजहर यांच्याशी आपला संबंध मान्य करीत नाही. पण त्याचवेळी ते‘च जिहादी कायद्याच्या कचाट्यात सापडले तर त्यांना उघडे पडू देत नाही. त्यांची स्थानिक कायदा यंत्रणा वा शासकीय यंत्रणेकडे पाकिस्तान पाठराखण करीत असते. म्हणूनच कितीही पुरावे देऊनही सईदला पाकिस्तानी कोर्टात दोषी ठरवणे शक्य झालेले नाही. उलट आपल्या देशात मात्र आपणच कर्नल पुरोहितला हिंदू दहशतवादी म्हणून डंका पिटला जात असताना अलिप्त राहिलो होतो. ना भारत सरकारने त्याची पाठराखण केली, ना भारतीय सेनादलाला आपल्याच एका धाडसी अधिकार्‍याचा बचाव करता आला. कारण दुर्दैवाने तेव्हाच्य भारतीय राजकीय नेतृत्वाला देशहितापेक्षा पक्षहिताची चिंता अधिक होती आणि त्यामुळे पाकिस्तानी घातपाताला प्रोत्साहन वा मदत होत असल्याची फ़िकीर नव्हती. आपल्या राजकीय स्वार्थ वा मतलबासाठी इथले पुरोगामीही पाकिस्तानला पुरक असलेल्या भूमिका घेऊन हिंदू दहशतवादाचा डंका पिटत राहिल्रे. पुरोहित वा टीएसडी यांनी उभारलेली दहशतवाद प्रतिकारक सज्जताच उध्वस्त करण्याला प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हातभार लावला. अन्यथा आज आपल्याला पुलवामा येथे ४० जवान ह्कनाक शहीद होताना बघावे लागले नसते. त्यांचा जीव घेणार्‍या आदिल दार किंवा पाकिस्तानचा आपल्याला खुप राग येतो. पण त्यांचेच हात मजबूत करणार्‍या समकालीन पुरोगामी दिवाळखोरीचा कान पकडण्याचा विचारही आपल्या मनत येत नाही. ही आपल्या सुरक्षेसाठी मोठी समस्या झाली आहे. 

colonel purohit के लिए इमेज परिणाम

उरीचा हल्ला आणि नंतरचा सर्जिकल स्ट्राईक या घटनाक्रमावर आधारीत ‘उरी’ नामक चित्रपट सध्या गाजतो आहे. त्यातला एक संवाद खुप लोकप्रिय झाल्रेला आहे. ‘हाऊ इज द जोश’? पुलवामा येथील ह्या हत्याकांडानंतर एका पुरोगामी विदुषीने सोशल माध्यमातून त्याच भावनेची खिल्ली उडवताना व्यक्त केलेला उपरोध पाकच्या घातपाती प्रवृत्तीचा इथला हातभार स्पष्ट करणारा आहे. उरीच्या त्या संवादातील अस्सल उपजत राष्ट्रभावनेची खिल्ली उडवित ही महिला म्हणते, ‘हाऊ इज द जैश मोदिजी?’ तिची भाषा वा उपरोध कुठल्या कायद्यात बसतो, ते ठाऊक नाही. पण अशी भावना व धारणाच मायदेशाच्या विरोधात घातपात करणार्‍याची खरी प्रेरणाच असते. आदिल दार अशाच उपरोधामुळे आत्मघाती पवित्रा घेऊन आपल्याच राखणदार सैनिकांच्या जीवावर उठत असतो. आपण आदिलसहीत पाकिस्तानचा कडकडीत निषेध करतो. पण त्याला खरी चालना देणार्‍या अशा विदुषीच्या विरोधात साधा आवाजही उठवित नाही. ही पाकिस्तानच्या अणुबॉम्बपेक्षाही भारत विरोधातली मोठी भेदक अस्त्रे‘ असतात. कधी ती घातपात्यांच्या बंदोबस्त करणार्‍यावर दगडफ़ेक होण्य़ातून आपल्याला दिसू शकतात. पण त्या दगडफ़ेक्यांचे बौद्धिक वा तात्विक समर्थन करणारे आपल्याला खरे घातक असल्याचे बघायला आपले डोळे राजी नसतात. तिथे आपण गाफ़ील होऊन जातो. इशरतसारख्या तोयबाच्या हस्तकाला आपली मुलगी म्हणून मिरवणारे खरे घातपाती आपल्याला ओळखता येत नाहीत. तिला निर्दोष ठरवायला भारतीय पोलिसांनाच मारेकरी ठरवून तुरूंगात डांबण्यासाठी आपली कायदेशीर अक्कल पणाला लावणारे जिहादी अतिरेकी आपल्याला ओळखता येत नाहीत. हा खरा धोका आहे. समोरून येणार्‍या शत्रूला वा संकटाला सामोरे जाण्याची शक्ती व बुद्धी जरूर आपल्यापाशी आहे. पण आपल्या सोबत चाललेला व आपल्याच आसपास वावरणारा प्रतिष्ठीत कोणी तोयबाच्रे वा जिहादच्र समर्थन करताना, त्याचा खरा चेहरा बघण्याला महत्व आहे. मग दुष्परिणामांना पर्याय नसतो. जेव्हा आपणच आपल्या गाफ़ीलपणातून किंवा अतिरेकी सभ्यतेच्या आहारी जाऊन सुरक्षेला लाथाडू लागतो, तेव्हा आपण आपले सुरक्षा कवच भेदत असतो. पाकिस्तानी कसाब किंवा आदिलचे काम आपणच सोपे करून ठेवत असतो. मग पुलवामा किंवा उरीसारख्या घटना रोखणार कोण? त्या रोखण्य़ासाठी ज्यांना प्रशिक्षण देऊन सज्ज ठेवलेले आहे, त्यांच्याच मुसक्या बांधणार्‍यांना रोखण्य़ाची जबाबदारी सामान्य नागरिकाची असते. सैनिक वा सेना शत्रूला रोखू शकत असते. पण आपल्यात उजळमाथ्याने मिरवणार्‍या घातपात्यांना शोधून हुडकून संपवण्याची जबाबदारी गुप्तचरांची असते आणि त्यांचे कान वा डोळे आपण सामान्य नागरिक असतो. बहिष्काराचे मोठे हत्यार आपल्या हाती असते आणि अशा उजळमाथ्याने वावरणार्‍यांची मुस्कटदाबी कायदा नव्हेतर समाजच करू शकत असतो.

जेव्हा तोच समाज अलिप्त वा नाकर्ता होतो, तेव्हा कितीही सज्ज सेना त्याचे वा देशाचे संरक्षण करू शकत नाही. तेव्हा मग त्या शायराच्या ओळी आठवतात. तो म्हणतो, शत्रू व परक्यांमध्ये कुठे दम होता? आम्हाला लुटले वा मारले आमच्याच जवळच्यांनी. आमच्या देशाची वा समाजाची नौका तिथे बुडाली, जिथे पाणी कमी होते. मित्रांनो, जेव्हा असे हल्ले लष्करावर, त्यांच्या ताफ़्यावर छावण्यांवर होतात, तेव्हा तिथे सर्वात कमी धोका असतो ना? कमी पाणी असते तिथे नौका बुडाण्याची बिलकुल शक्यता नाही, हीच वस्तुस्थिती आहे ना? पण आपल्याच सोबत बसलेला कोणी नौका उलटून पाडण्याचे उद्योग करीत असेल, तर त्याला आपण रोखले पाहिजे. तो असले उद्योग राजरोस करत असताना आपण निमूट बघत बसणार असू; तर वादळवारा किंवा महापूराचे संकट येण्याची गरज नसते. आपणच बुडायच्या प्रतिक्षेत असतो आणि आपला सोबतीच आपल्याल हसत हसत बुडवतो. त्या बुडण्याचे खापर पाण्याच्या माथी म्रारून काय उपयोग असेल? आपल्याच देशात नवज्योत सिद्धू, प्रशांत भूषण असतील, याकुब अफ़जल गुरूसाठी आक्रोश करणारे असतील, तर पाकिस्तानच्या नावाने शिमगा करून काय फ़ायदा? कधीतरी आपल्यातच मस्त बोकाळलेल्या गद्दारांना जाब विचारण्याची हिंमत आपण करणार आहोत काय?

Tuesday, February 19, 2019

हमारी नाव वहा डुबी




हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहां दम था
मेरी किश्ती थी डूबी वहां जहां पानी कम था

पण जितके संवेदनाशील असतो, तितका आपल्याला लौकर रागही येतो. पण त्यातला दोष असा आहे, की आपला राग तितक्याच लौकर शांतही होतो. कालपरवा आपण कशामुळे संतप्त वा प्रक्षुब्ध झालो होतो? त्याचे चार दिवसानंतर आपल्याला पुर्णविस्मरण झालेले असते आणि तीच खरे तर आपल्यासारख्या संवेदनशील समाजाच्या शत्रूंची मोठी ताकद असते. ते आपल्या विस्मरणशक्तीच्या बळावरच त्यांचे डावपेच खेळत असतात आणि सातत्याने आपल्याला आपल्याच क्षेत्रात पराभूत करीत असतात. कालपरवा पुलवामा येथे ४० हून अधिक भारतीय जवानांची भर ताफ़्यावर चढाई करून हत्या झाली, तेव्हा अवघा देश प्रक्षुब्ध होऊन उठला होता. पण ती तशी पहिली घटना अजिबात नव्हती. दहा वर्षापुर्वी अशीच घटना मुंबईच्या भर रस्त्यात घडलेली होती आणि सैनिकांचा नव्हेतर पावणेदोनशे सामान्य नागरिकांचा हकनाक बळी गेलेला होता. दोनतीन वर्षापुर्वी असाच हल्ला पठाणकोट व उरी येथील लष्करी तळावरही झालेला होता आणि आपण इतके़च संतप्त होऊन रस्त्यावर आपला संताप व्यक्त करण्यासाठी उतरलो होतो. पण त्यामागची कारणमिमांसा वा त्यातली रोगबाधा शोधून त्यावर कायमचा उपाय योजण्यासाठी आपल्याकडून कितीसे प्रयत्न झाले? ज्या जवानांच्या हौतात्म्यामुळे आपल्या मनाचा प्रक्षोभ झाला, त्यापैकीच काहीजणांना अधूनमधून काश्मिरात सुरक्षा कारवाई करताना मागून दगडफ़ेकीचे हल्ले सोसावे लागतात. तेव्हा आपण इतकेच रागावतो काय? नसेल तर एखाद्या मोठ्या घटनेनंतर असा प्रक्षोभ किती कामाचा आहे? कारण तशा किरकोळ वाटणार्‍या व भासणार्‍या घटनांमधून मोठ्या हल्ल्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असते. सज्जता केली जात असते. त्या किरकोळ वाटणार्‍या प्रसंगातून आपल्या संवेदना शिथील वा गाफ़ील केल्या जात असतात. परिणामी मोठ्या घटनेसाठी पुरेसे निर्धास्त वातावरण घातपात्यांसाठी तयार व्हायला हातभार लागत असतो. कारण अशा घटना रोखण्याचेच काम प्राण पणाला लावून लढणार्‍यांकडे आपण पाठ फ़िरवलेली असते. आपल्याला पुलवामानंतर कर्नल श्रीकांत पुरोहित आठवला काय? आपल्याला टीएसडी हे शब्द वा अक्षरे आठवली काय? सगळे रहस्य तिथेच तर दडलेले आहे ना?

श्रीकांत पुरोहित नऊ वर्षे तुरूंगात सडत पडलेला होता आणि त्याच्यावर हिंदू दहशतवादाचा चेहरा म्हणून सगळीकडून शिक्कामोर्तब केले गेले होते. कुठलाही सज्जड वा कोर्टात टिकणारा पुरावा विरोधात नसताना, पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग यांना दिर्घकाळ जामिन कुठल्या कारणास्तव नाकारला जात होता? आपण त्यासाठी कुणाला जाब विचारायला पुढे सरसावलेले होतो काय? त्या नुसत्या आरोप व जामिनाचे निमीत्त करून सतत हिंदू दहशतवादाचे आरोप करणार्‍यांना जाब विचारण्यासाठी आपल्यातले कितीजण पुढे आलेले होते? नऊ वर्षानंतर श्रीकांत पुरोहितला जामिन मिळाला आणि मध्यंतरीच्या काळात त्याचा पोलिसांकडून अनन्वीत छळ झाला. तेव्हा आपण मस्त झोपा काढत नव्हतो काय? श्रीकांत पुरोहित हा लष्करी गुप्तचर सेवेतला मोक्याचा अधिकारी होता आणि समाजात मिसळून तिथे गुपचुप चाललेल्या काही हालचालींची माहिती मिळवत होता. त्याच माहितीच्या आधारे भविष्यात होऊ शकणार्‍या डझनावारी घातपातांना रोखणे शक्य झालेले होते. कुठल्या वर्तमानपत्राने किंवा माध्यमाने कधी पुरोहित लष्करी सेवेत कुठले काम करीत होता, त्याची कधीच माहिती दिली नाही किंवा लपवली. आपण सामान्य वाचक वा नागरिक म्हणून अशा माध्यमे किंवा पत्रकारांचा कान पकडून सत्य माहिती मिळवण्याचा आग्रह धरला होता काय? मुंबईत कसाब टोळीचा हल्ला होऊन दिडदोनशे लोकांचा बळी पडल्यावर आपण खडबडून जागे झालो आणि शहीदांसाठी मेणबत्या लावायला पुढे सरसावलो. तेव्हाही कर्नल पुरोहित कार्यरत असता किंवा गजाआड खितपत पडलेला नसता, तर मुंबई हल्ला होऊ शकला असता काय? आपल्या मनाला हा प्रश्नही शिवला नाही. ज्यांनी पुरोहितला गजाआड टाकले त्यांनीच वास्तवात कसाब टोळीचा समुद्रमार्गे मुंबईत आरामात पोहोचण्याचा मार्ग खुला करून ठेवलेला होता. नेमके तसेच काही आता लष्करी ताफ़्यात स्फ़ोटकांनी भरलेले वाहन घुसवण्यासाठी निघालेल्या आदिल दार याला कोणीतरी मदत केलेली आहे. ती मदत पाकिस्तानी गुप्तहेरसंस्था देत नसते, तर पुलवामातील काही गद्दार तशी मदत दारला देत असतात आणि भारत्तीय लष्कराच्या ४० सैनिकांना ठार मारण्यासाठी पाकिस्तानला मदत करत असतात. आपल्या मनाला हा विषय कधी शिवला आहे काय? तो किंवा तसे हल्ले पुरोहित किंवा टीएसडी अशा सेवांमुळे शक्य होत नव्हते. पुरोहित वा टीएसडी नेमके काय काम करतात?

टीएसडी म्हणजे भारतीय सेनादलाच्या कुठल्याही कागदपत्रात नोंद नसलेली एक लष्करी तुकडी होती. तिला गुप्तचरही म्हणता येणार नाही. गुप्तचर विभागाच्या कामकाजाची निदान कुठेतरी कागदोपत्री नोंद केलेले असते. पण टीएसडी वा टेक्नीकल सपोर्ट डिव्हीजन ही तुकडी वा तिचे कामकाज कुठल्याही कागदोपत्री नोंदी्त सापडणार नाही. कारण दफ़्तरी नोंदीत अशी कुठली तुकडी नसते आणि अस्तित्वात असल्याचे भारत सरकार वा संरक्षण खातेही मान्य करणार नाही. आपण ज्याला लष्करे तोयबा वा जैश महंमद वगैरे म्हणतो, तसेच काहीस टीएसडीचे स्वरूप असते. त्या तुकडीचे काम बेकायदा व नियमबाह्य असल्याने कुठल्याही सरकारी दफ़्तरात त्यांची नोंद होणार नसते. किंवा केलेल्या कारवाईचे कसलेही श्रेय घ्यायला हे लोक पुढे येणार नाहीत. कारण ते असल्याची नोंद कुठेच नसते, तर त्यांचा पराक्रम वा कार्य याविषयी जाहिर चर्चा होणारच कशी? पण अशा तुकड्या सावलीत राहुन काम करतात आणि त्यांच्यावर कधी प्रकशझोत टाकला जात नसल्याने, त्यांची सावलीही कोणाला कुठे आढळत नाही. हे लोक देशासाठी आपले भवितव्य आणि प्राणही पणाला लावत असतात. दिर्घकाळ पाकिस्तानी माध्यमात भारताविरोधी दिलेल्या बातम्यात या टिएसडीचा उल्लेख आपल्याला बघायला मिळू शकतो. पण तसा उल्लेख एका भारतीय माध्यमात आला आणि खुद्द भारत सरकारलाच त्यांच्या विरोधात कारवाई करायची वेळ आणली गेली. म्हणजेच भारताविरुद्ध चाललेल्या घातपाती पाकिस्तानी युद्धाच्या विरोधात चाललेल्या तशाच प्रतिकाराला कमकुवत व नेस्तनाबुत करण्याचे काम इथे बसलेल्या काही पत्रकार, राजकारणी व अधिकार्‍यांनी पार पाडलेले आहे. मात्र आपल्याला त्या अधिकारी वा लष्करी तुकडीचे नामोनिशाणही ठाऊक नसते. त्यांच्यविषयी आस्था कौतुकही नसते. तुमच्यामाझ्यासाठी जे आपला जीव ओवाळून टाकतात, त्यांच्याविषयी आपल्याला किंचीत आपुलकी वा त्यांची ओळखही नसावी, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना? पण ती वस्तुस्थिती आहे आणि स्वत:च्या कौतुकासाठी हे खरेखुरे देशभक्त कधी लाचार ओशाळवाणेही नसतात. उलट आपण सामान्य लोक इतके बेछूट वा बेजबाबदार असतो, की आपल्याच नाकर्तेपणाने वा बेफ़िकीरीने त्यांच्या जीवाला धोका निर्माण करतो आणि पाकिस्तानचे काम सोपे करीत असतो.

कर्नल पुरोहित यांच्यावर मालेगाव स्फ़ोटातला संशयीत म्हणून सप्टेंबर २००८ मध्ये आरोप ठेवला गेला आणि त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात कसाब टोळी मुंबईत राजरोस येऊ शकली. कुलाब्यासारख्या वर्दळीच्या जागी कोळीवाड्याच्या वस्तीतून हे दहा मारेकरी आरामात हमरस्त्यापर्यंत चालत आले. त्यांच्याकडे असलेली हत्यारे वा स्फ़ोटके कोणाच्या नजरेत आली नाहीत? त्या वर्दळीच्या संध्याकाळी त्यांना तिथून सहजगत्या टॅक्सी मिळू शकली? इतकी मुंबई सोपी आहे? कुणीतरी आधीपासून त्यांचे स्वागत करायला व लागेल ती मदत करायला तिथे सज्ज असल्यानेच पहिल्या मुंबई भेटीत या दहा घातपात्यांना इप्सित स्थळी पोहोचता आले. पण अजूनपर्यंत अशा सहाय्य देणार्‍यांचा शोध लागला आहे काय? पुलवामा येथेही स्थानिक मदतीशिवाय इतकी मोठी हायवेवर घटना घडवणे शक्य नव्हते. कुलाब्याची स्थितीही वेगळी नाही. मुद्दा असा, की त्या सहाय्य देणार्‍या स्थानिकांचा वास काढून त्यांना आधीच नामोहरम करावे लागते आणि पर्यायाने असे घातपाती मोठी घटना घडवू शकणे रोखले जाणार असते. पुरोहित व त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी अशा शंकास्पद गट व लोकांमध्ये घुसून काढलेली गुप्त माहितीच तशा घटना मोठ्या प्रमाणात रोखू शकलेली होती. तर त्यांच्याच मुसक्या बांधणार्‍या तथाकथित मालेगाव स्फ़ोट तपासाने कुणाला मदत केली? त्या धरपकडीने कुलाब्यात कसाबला मदत करणार्‍यांना मोकळीक दिली आणि त्यापेक्षा वेगळे काहीही पुलवामा येथे घडलेले नाही. उरी वा पठाणकोटलाही वेगळे काहीही घडलेले नव्हते. कसाब वा पुलवामा येथील हल्लेखोरांची स्फ़ोटके तेव्हा़च भेदक होतात, जेव्हा ती योग्य जागी वा घटनास्थळी पोहोचू शकतात. पुरोहित वा टीएसडी अशा लोकांकडून तोच मार्ग रोखला जात असतो व होता. तर त्यांच्याच मुसक्या ज्यांनी बांधल्या, ते प्रत्यक्षात तोयबा वा जैशचे इथले एजंट वा हस्तक असू शकतात. कारण त्यांच्याशिवाय अशा हल्ले व घातपाताचा मार्ग प्रशस्त होऊ शकत नाही. करकरे यांच्या तपास पथकाने वा त्यांच्या राजकीय म्होरक्यांनी कसाबसाठी ते काम पार पाडले होते. पुलवामा उरीसाठी तेच काम, टीएसडीला निकामी करणार्‍या माध्यमे व पत्रकारांनी पाकिस्तानसाठी पार पाडलेले आहे. म्हणूनच नुसते रागावून चालणार नाही की पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या डरकाळ्या फ़ोडूनही भागणार नाही. आपल्याला वास्तविक शत्रू ओळखता आला पाहिजे. तो शत्रू पाकिस्तान नाही, किंवा कसाबसारखे घातपातीही आपले खरे शत्रू नाहीत. आपले शत्रू आजही आपल्यात उजळमाथ्याने वावरत असतात आणि युक्तीवादाच्या आडोशाने त्या हल्ल्याला समर्थनही देत असतात. त्याकडे आपण डोळसपणे बघणार आहोत काय? (अपुर्ण)

तुम रुठी रहो, मै मनाता रहू

amit shah at matoshree के लिए इमेज परिणाम

आठदहा महिन्यापुर्वी महाराष्ट्रातील दोन मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक पार पडली होती आणि त्यात भाजपाने एक तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकली होती. त्यापैकी गोंदियाची भाजपाची जागा दोन्ही कॉग्रेस एकत्र आल्याने राष्ट्रवादी जिंकून गेली. तर पालघरच्या जागेची लढत सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना भाजपा यांच्यात झाली. तिथे भाजपाचे चिंतामण वनगा यांच्या निधनाने जागा मोकळी झाली होती आणि त्यांच्या पुत्राला तिथून लढायचे होते. त्याला भाजपाने नकार दिल्याने त्याला शिवसेनेत घेऊन सेनेनेही ती जागा लढवली होती. कॉग्रेस आणि बहूजन विकास आघाडी असेही आणखी दोन उमेदवार होते. पण अटीतटीची लढाई सेना भाजपा यांच्यात होऊन अखेरीस भाजपाने बाजी मारली. त्यावर विविध वाहिन्यांवर उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या आणि दावे प्रतिदावेही चाललेले होते. अशा एका चर्चेत मीही सहभागी होतो आणि पक्षप्रवत्यांची मांडणी झाल्यावर माझे विश्लेषण विचारण्यात आले होते. यापुढे युतीचे भवितव्य काय, असाही प्रश्न त्यात सहभागी होता. त्याचे उत्तर देताना मी केलेली गंमत आज वास्तवात खरी ठरलेली आहे. युतीचे भवितव्य पन्नास वर्षापुर्वीच लिहून ठेवलेले आहे. राजकारण हा आशेचा खेळ असतो आणि हिंदीत त्याला ‘आसका पंछी’ म्हणतात. योगायोगाने १९६० च्या दशकात त्याच नावाचा हिंदी चित्रपट आलेला होता आणि त्यात नायक नायिकेच्या तोंडी असलेल्या गीतामध्ये सेना भाजपा युतीचे भाकित सांगितलेले होते. असे सांगून मी त्या गाण्याचे शब्द त्या चर्चेत सांगितले, तेव्हा हास्यकल्लोळ झालेला होता. सगळेच त्यात बुडून गेलेले होते. ते शब्द होते,
नायक:   तुम रुठी रहो, मै मनाता रहू. तो मजा जिनेका औरही आता है
नायिका:  थोडे शिकवे भी हो,कुछ शिकायतही हो, तो मजा जिनेका औरही आता है

एका लोकप्रिय सिनेमा गीतामध्ये इतका राजकीय आशय सामावलेला असतो, हे तेव्हापर्यंत माझ्याही कधी लक्षात आलेले नव्हते. पण गेल्या साडेचार वर्षात महाराष्ट्रात शिवसेना व भाजपा यांनी ज्याप्रकारचे राजकारण केले, त्यातून अर्धशतकापुर्वीच्या त्या गीताचे बोल किती खरे करून दाखवले आहेत ना? त्याची प्रचिती सोमवारी पत्रकारांना आली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले आणि मुख्यमंत्र्यांसह मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थानी पोहोचले. मग सगळे एकत्र एकाच गाडीत बसून वरळीला पत्रकारांना भेटायला आले आणि तिथे पुन्हा एकत्र निवडणूका लढण्याचा फ़ॉर्म्युला त्यांनी घोषित करून टाकला. वरिष्ठ नेत्यांसाठी आघाड्या युत्या जुळवून आणणे किंवा मोडून टाकणे किती सोपी गोष्ट आहे, त्याचे उदाहरण त्यातून मिळाले. पण नेत्यांच्या अहंकाराला पक्षाचे धोरण वा भूमिका समजून एकमेकांच्या नित्यजीवनात हल्ले प्रतिहल्ले करणा‍र्‍या त्यांच्याच अनुयायी वा कार्यकर्त्यांना त्यानुसार जुळवून घेणे किती कठीण असते? दोन्ही पक्षातल्या एका तरी नेत्याला त्याची फ़िकीर होती काय? चौकीदार चोर है, इथपासून अफ़जलखानापर्यंत शेलक्या भाषेतले सेनेचे आरोप; किंवा भाजपाच्या नेत्यांनी वारंवार सेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वासह धोरण भूमिकांवर केलेले आरोप, इतके सहजगत्या धुवून जात असतात काय? हा सगळा संघर्ष वा आटापिटा अमित शहांनी मातोश्रीवर येण्यापुरता होता काय? तसेच असेल तर शिवसेनेने किती जागा मिळवल्या त्यापेक्षाही आपले मोठे नुकसान करून घेतलेले आहे. सगळा वाद जागांचा व सत्तापदांचाच होता, याचीच साक्ष दोन्ही पक्षांनी आपल्याच वागण्यातून दिलेली आहे. तिकडे कॉग्रेस आणि राष्ट्रवादी यांनीही त्यापेक्षा काही वेगळे केलेले नाही. युती झाल्याबद्दल सेना भाजपावर शेरेबाजी करण्याचा त्यांना कुठलाही नैतिक वा तात्विक अधिकार नाही. कारण त्यांच्याही आघाडीत असली नाटके कमी झालेली नाहीत. त्याला पर्याय म्हणून मतदार सेना भाजपाकडे बघत होता आणि त्यांनीही आपण कॉग्रेस राष्ट्रवादीपेक्ष तसूभर कमी नसल्याची साक्ष मागल्या चार वर्षात दिलेली आहे.

सेनेला २३ आणि भाजपाला २५ असे लोकसभा जागांचे वाटप झालेले आहे. पण विधानसभेसाठी मित्रपक्षांना जागा देऊन झाल्यावर उरलेल्या जागा समसमान वाटून घ्यायच्या, अशी तडजोड झालेली आहे. मग तशी तडजोड तेव्हाही २०१४ मध्ये होऊ शकली असती. पण १५१ खाली यायला सेना राजी नव्हती, म्हणून युती तुटण्यापर्यंत ताणले गेले. आताही पदरात नेमके काय पडले आहे? लोकसभेत भाजपाच एक जागा अधिक घेऊन मोठा भाऊ आहे आणि विधानसभेत समसमान जागा घेऊन दोघे सारखेच आहेत. आम्हीच मोठा भाऊ ही गुर्मी कुठे गेली? लोकसभेतील बहूमत टिकवण्यासाठी भाजपा आज अगतिक आहे आणि त्याची अडवणूक करून सेनेने‘ अधिक काही पदरात पाडून घेतलेले नाही. तर जे पाच वर्षापुर्वी मिळत होते, तेच घेण्यावर समाधान मानलेले आहे. फ़रक एकाच गोष्टीचा आहे. भाजपा अध्यक्षाने मातोश्रीवर यावे, ही दिर्घकालीन मागणी मान्य झाली आणि युती पुर्ववत झालेली आहे. अण्णा हजारे यांचे उपोषण कुठल्याही मागण्या मान्य केल्याशिवाय फ़क्त यादवबाबा मंदिरात मुख्यमंत्री पोहोचले मग सुटते. त्यापेक्षा अमित शहांनी वेगळे काय केले किंवा दिले? सगळा अट्टाहास अमित शहांनी मातोश्रीवर येण्यापुरता किंवा तेवढ्यासाठीच होता काय? २०१४ मध्येच मोदींच्या विरोधात दंड थोपटून मार खाल्लेले नितीशकुमार दोन वर्षापुर्वी आपले मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी एनाडीएत आले आणि आता लोक्सभा समोर असताना त्यांनीही ४ जिंकलेल्या जागांच्या पुढे आणखी १३ जागा अधिक मिळवल्या आहेत. भाजपाने जिंकलेल्या पाच जागांवर नितीशसाठॊ पाणी सोडलेले आहे. पासवान यांनीही एक अधिकची जागा मिळवली आहे. त्याच्या तुलनेत चार वर्षे अखंड शिमगा करून शिवसेनेने मिळवले काय? मातोश्रीवर अमित शहांची पायधुळ? त्या वास्तुला जगप्रसिद्ध करणार्‍या बांळासाहेबांचे शब्द कोणाला आठवतात काय? सौ सोनारकी एक लोहारकी, हेच ना ते शब्द?

जगात कोणीही कितीही दिवस शिवसेना वा बाळासाहेबांच्या विरोधात टिकेची झोड उठवावी. मग साहेब एक सभा घेऊन असे घणाघाती भाषण ठोकायचे, की त्याखाली सगळे आक्षेप आवाज भूईसपाट होऊन जायचे. दोन आमदार वा एकही खासदार पाठीशी नसताना शिवसेनाप्रमुखांचा असा दबदबा होता. त्यामुळे़च मातोश्रीवर कोण कधी आला व काय झाले, त्याची बातमी व्हायची. मातोश्रीवर या असे आमंत्रण वा अटी साहेबांनी कोणाला कधी घातल्या नाहीत. कारण त्या वास्तुला स्थानमहात्म्य कधीच नव्हते. तिथे वास्तव्य करणार्‍या माणसाचे ते व्यक्तीमहात्म्य होते. तिथे जाणार्‍या व्यक्तीमुळे साहेबांची महत्ता कधी वाढली नाही. तर त्या वास्तुची महत्ता वाढत होती. त्यात साहेबांना कधी मोठेपणा वाटला नाही, की त्यांनी तशा अपेक्षा कोणाकडे केल्या नाहीत. राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रतिभाताई पाटिल वा प्रणबदा मुखर्जीही तिथपर्यंत आले. तिथे अमित शहांनी यावे ही अपेक्षा म्हणूनच त्या वास्तुचे महात्म्य सांगण्यापेक्षा तिची प्रतिष्ठा कमी करणारी ठरते. त्यातून अमित शहा वा भाजपा झुकले असे भासवण्याचा हेतू असेल, तर त्याला बालीशपणा म्हणावे लागेल. कारण झालेल्या युतीने व तिच्या फ़ॉर्म्युलाने शिवसेनेला अधिक काही मिळालेले दिसत नाही. २०१४ मध्ये  मिळत होते, त्यापेक्षाही घट नक्की झाली आहे. तेच स्विकारायचे होते, तर चार वर्षे झुंज कशाला दिली, त्याचेही उत्तर निदान शिवसैनिकांना मिळायला हवे. पण त्या ‘सच्चाईचा सामना’ करायचा कोणी आणि कधी? भाजपाने आज किती जागा देऊ केल्या, त्यापेक्षा स्वबळावर उभे रहाण्याची संधी शिवसेनेने याच चार वर्षात कशी गमावली, तो घटनाक्रम महत्वाचा आहे. जी तडजोड वा युती झाली ती सेनेला अधिक आवश्यक होती आणि त्याचा भाजपाने राजकीय लाभ उठवला, असेच म्हणावे लागेल. आता सवाल इतकाच आहे, की युती झाली तिचा खरा ‘सामना’ कोणाशी होणार? कॉग्रेस राष्ट्रवादीशी की दोन्ही पक्षाच्या दुभंगलेल्या कार्यकर्त्यांचा आपापसात?