Saturday, March 24, 2012

इतक्या वर्षानंतर का?


  येत्या ३१ ऑक्टोबरला त्या घटनेला २८ वर्षे पुर्ण होतील. ज्या दिवशी इंदिरा गांधींना त्याच्याच अंगरक्षकांनी जवळून गोळ्या घालून ठार मारले, त्या घटनेला. तेव्हा मी त्यावर एक लेख लिहिला होता. त्यात किशोरकुमारच्या ’चिंगारी कोई भडके’ या गाण्याचा उल्लेख केला होता. ते काव्य लिहिणार्‍या आनंद बक्षींचे कौतुकसुद्धा केले होते. मात्र तरी मला त्या क्षणी मरणार्‍या इंदिराजींच्या मनात, त्या अंतिम क्षणी काय भावना असतील त्याचा कधीच थांग लागला नव्हता. ज्यांनी जीव वाचवायचा, त्यांनीच जीव घेतला तर काय वाटत असेल? विश्वासघात, दगाबाजी असे शब्द खुप तोकडे असतात.

   तेव्हा खलिस्तानी दहशतवाद्यांनी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात ठाण मांडले होते. त्यांना बाहेर काढायच्या सर्व योजना अपयशी ठरल्यावर, इंदिराजींनी तिथे सैन्य पाठवायचा धाडसी निर्णय घेतला होता आणि अंमलात आणला होता. त्यानंतार शिखांच्या भावना भडकल्या होत्या. त्याचा फ़ायदा उठवण्यासाठी खलिस्तानवादी अतिरेक्यांनी इंदिराजींना ठार मारण्याच्या धमक्या दिलेल्या होत्या. त्यामुळे मग पंतप्रधान असलेल्या इंदिराजींच्या भोवतीची सुरक्षा वाढवण्य़ात आली होती. शिवाय धोका नको म्हणून त्यातले शिख पोलिस व जवान काढून घेण्यात आले होते. पण इंदिराजींनी त्याला साफ़ नकार दिला. विशेषत: त्यांच्या सुरक्षेत दिर्घकाळ असलेल्या बियांतसिंग नावाच्या अधिकार्‍याला त्यांनी हट्ट करून परत तैनात करायला भाग पाडले होते. शेवटी त्यानेच घातलेल्या गोळ्यांनी त्यांची इहलोकीची यात्रा संपली.

   जेव्हा तो त्यांना गोळ्या घालत होता तेव्हा व त्या लागल्यावर, काही क्षण तरी त्या जिवंत नक्कीच असतील. त्यांना काय वाटले असेल? ज्याला आपण इतक्या विश्वासाने आपल्या सुरक्षेत पुन्हा आणले तो? यु टू ब्रूटस? हे शब्द आपण अनेकदा वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत. इंदिराजींनी सुद्धा ऐकलेले असतील. पण त्यांना ते प्रत्यक्ष अनुभवावे लागले. शेवटचे काही क्षण का असेनात, पण त्यांना ते शब्द नक्की आठवले असणार. बियांतसिंग? ज्याने आधीच्या दहा वर्षात त्यांचे संरक्षण करण्यात धन्यता मानली, कर्तव्य मानले, ज्याला सुरक्षेतून बाजूला केल्यावर विश्वास दाखवून त्यांनी परत आणले, त्यानेच बेसावध गाठून त्यांचा जीव घ्यावा? ती शेवटच्या क्षणाची वेदना त्या जीवघेण्या गोळीपेक्षा भयंकर असेल ना? कदाचीत ती जिव्हारी लागलेली गोळी त्यांना अधिक प्रेमळ वाटली असेल. कारण तिनेच ती मनाची असह्य वेदना संपवली असेल. अशा जगात जगण्यापेक्षा त्यातून सुटका इंदिराजींना अधिक सुरक्षित वाटली असेल. विश्वासघाताने गोळी घालणार्‍या बियांतपेक्षा ती जीवघेणी गोळी जास्त विश्वासू वाटली असेल त्यांना. कारण तिने देहाच्या वेदनांपेक्षा भयावह अशा मानसिक यातनांमधून त्यांना मोक्ष दिला होता.

   खरेच देहाच्या वेदना, यातना खुप सौम्य असतात. त्यापेक्षा मनाला, काळजाला भेदणार्‍या; जखमी जायबंदी करणार्‍या वेदना भयंकर असह्य असतात. त्यापेक्षा मरण मोठे सुखद असू शकेल. त्या यातना सोसत जगणे मरण्यापेक्षा घाणेरडे मरण असते. झाडलेल्या गोळीपेक्षा ती झाडणारा जिव्हारी जखम करून गेला होता. तेव्हा मला ते कळले नव्हते. कित्येक वर्षे कळले नाही. इतक्या वर्षांनी ती वेदना मला आजच का कळावी? कोण जाणे? पण आज मी इंदिराजींच्या त्या दु:खाने मनसोक्त रडलो. त्या वेदनेसाठी रडलो. कधी कुणासाठी रडलो नसेन, इतका रडलो आज. नियतीच्या मनात काय असेल? हीच माझ्या माणुस असण्याची खुण असेल काय? की मला माणुस असण्याचा साक्षात्कार घडवण्यासाठी आताच त्या वेदनेचा अर्थ समजला असेल?

Wednesday, March 14, 2012

मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दुध किती, अठरा रांजण भरून गेले प्याले चौदा हत्ती



   लहानपणी ऐकलेली एक छान गोष्ट आठवते. एक वेडसर राजपुत्र असतो. तो राजपुत्र असल्याने त्याला कोणी शहाणपण शिकवू शकत नसतो किंवा सल्ला देऊ शकत नसतो. कारण सत्ता हाती असल्याने आपल्याला सर्व काही कळते अशी त्याची ठाम समजूत असते. मग त्या सर्वज्ञ राजपुत्राने काहीही मुर्खपणा केला तरी त्याचे कौतूक करण्यापलिकडे दरबारी लोकांना दुसरे काही काम नसते. पण आपले पद व सत्ता टिकवायची तर ते त्याची तोंड फ़ाटेस्तोवर स्तुती करतच असतात. एके दिवशी तो वेडा राजपुत्र झाडावर चढतो आणि ज्या फ़ांदीवर बसलेला असतो तीच कुर्‍हाडीने तोडू लागतो. ती तुटली तर त्याचाच कपाळमोक्ष होणार असतो. पण हे त्याला समजवायचे कोणी? सगळे एकजात ’निष्ठावान’ असतात ना? मग ते त्याला धोका दाखवण्याऐवजी त्याच्या त्या पराक्रमाचे कौतुक करत रहातात, म्हणून व्हायचा तो परिणाम चुकत नाही. ती फ़ांदी कोसळते आणि राजपुत्र जमीनीवर येऊन आदळतो. मात्र आपले काय चुकले ते त्याला कळत नाही की त्याला कोणी सांगू धजत नाही.

   बालपणी ऐकलेली ही कथा तेव्हा मनोरंजक वाटली होती. पुढे अक्कल थोडी आल्यावर त्यात फ़ारसे तथ्य नसल्याचे जाणवले. कारण बुद्धी वा अक्कल तर्कबुद्धीवर चालते, निष्ठेवर चालत नाही. इतक्या वर्षांनी आता लक्षात आले की, अशी गोष्ट खोटी नसते. काळ कितीही बदलला वा परिस्थिती बदलली म्हणून अशा गोष्टी खोट्या नसतात. त्यातला तपशील बदलतो. पण सुत्र खरे असते. पाच राज्यातील विधानसभांचे निकाल लागत गेले तशी ही बालपणीची गोष्ट नव्याने घडताना मला बघायला मिळाली. म्हणजे ती गोष्ट तशी गेली दोनचार वर्षे घडतच होती. माझे किंवा इतर कोणाचे त्याकडे नेमके लक्ष नव्हते इतकेच. ६ मार्चला ती फ़ांदी तुटून पडली, तेव्हा त्यातला वेडसर राजपुत्र मला स्पष्ट दिसला. ती फ़ांदी कुठली? तो राजपुत्र कोण?

   गेली दोनचार वर्षे युवराज राहुल गांधी उत्तरप्रदेश या आपल्या वडिलार्जित राज्यात आपली सत्ता नव्याने प्रस्थापित करण्यासाठी धडपडत होते. लोकसभा निवडणूकीत त्यांना थोडेफ़ार यश मिळाले. पण ते त्यांचे कर्तृत्व असण्यापेक्षा त्यांनी मुलायमच्या दुखावलेल्या सहकार्‍यांना सोबत घेतल्याने मिळवलेले यश होते. त्यामुळेच मग ह्या युवराजांना आपल्या थोर कर्तबगारीचा साक्षात्कार घडला होता. त्यांनी दोन अडिच वर्षात उत्तरप्रदेश विधानसभा काबीज करण्याचा मनसुबा रचून मोहिम हाती घेतली. मागल्या चार महिन्यात त्याला वेग आला. मध्यंतरी अण्णा हजारे यांनी लोकपाल मागणीसाठी आंदोलन पुकारून त्या मोहिमेत व्यत्यय आणला होता. पण एकदाचे अण्णांच्या आंदोलनाचे दिवाळे वाजवल्यानंतर युवराजांचा मार्ग मोकळा झाला होता. त्यांनी दिग्विजयसिंग नावाची कुर्‍हाड हातात घेतली आणि तोडकाम सुरू केले. उत्तरप्रदेशातून व देशातून भ्रष्टाचाराचे समुळ उच्चाटन करण्याचा चंग बांधला. पण ते युवराज ज्या फ़ांदीवर बसले होते तिचे नाव कॉग्रेस असे होते आणि तेच भ्रष्टाचाराचे दुसरे नाव होते. मग जे कुर्‍हाडीचे घाव घातले जात होते, ते कॉग्रेसवरच पडणार ना? दोन महिन्यांच्या मेहनतीचे फ़ळ ६ मार्चला आले. राहुल गांधी यांच्या मोहिमेला दाद देत मतदाराने भ्रष्टाचार समुळ नष्ट करून टाकला. त्याने कॉग्रेसला जवळपास सर्वच राज्यात जमिनदोस्त करून टाकले. भ्रष्टाचाराची फ़ांदी तुटली. पण युवराज राहूल त्याच्यावरच बसलेले होते. त्यामुळे फ़ांदी तुटण्याने तेच जंमिनीवर आले आहेत.  


उत्तरप्रदेश असो, की भारतीय जनता असो, ती मुर्ख आहे आणि तिला कुठ्ल्याही थापा मारून आपण जिंकू शकतो असे पिढीजात वाटणारी जी मोजकी मंडळी आहेत, त्यात गांधी कुटुंबाचा समावेश होतो.  त्यामुळेच राहुल यांनी भ्रष्टाच्राराच्या विरोधात कुर्‍हाड चालवण्याचे नाटक करणे स्वाभाविकच होते. ज्यांचे सरकार रोजच्या रोज कोर्टाकडून भ्रष्टा्चाराच्या कुठल्या तरी प्रकरणासाठी जोडे खाते आहे, त्यानेच आवेशात उत्तरप्रदेशात मायावती सरकार विरुद्ध आरोपांची सरबत्ती करावी, हा विनोद म्हणायचे; की क्रुर थट्टा म्हणायची? पण युवराज बोलणार आणि भाटगिरी करण्यातच पत्रकारीतेचे इतिकर्तव्य सामावले आहे, असे मानणार्‍यांना त्यांचे ढोल वाजवण्यात धन्यता वाटली असेल तर नवल नाही. हे युवराज कुठल्याही इवल्या खेड्यात पोहोचले, मग त्यांना बघायला किती गर्दी झाली त्याची वर्णने सांगताना वाहिन्या व वृत्तपत्रे थकत नव्हती. राहुल आले, राहुल निघाले, राहुलच्या मदतीला भगिनी प्रियंका आली. तिची दोन बाळे सभास्थानी आली, असे सगळे वर्तमान देशभरच्या लोकांना घरबसल्या ऐकावेच लागत होते. आणि वर्तमान तरी कसले? प्रियंका गर्दी खेचते आहे. जाईल तिथे लोक तिला बघायला लोटतात. ती खेडूतांशी सहज संपर्क साधू शकते. गांधी कुटुंबाने लोकांना जिंकले. असे ते वर्तमान. त्यावरून पुन्हा बालपणी ऐकलेल्या एका मजेशीर गाण्याच्या ओळी आठवल्या.

आम्ही लटिके ना बोलू वर्तमान खोटे !
   मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दुध किती
   अठरा रांजण भरून गेले प्याले चौदा हत्ती
आम्ही लटिके ना बोलू वर्तमान खोटे !

   असले वर्तमान नियमितपणे आपण गेले काही महिने ऐकत नव्हतो का? भट्टा परसोल गावातल्या हत्याकांड बलात्कारापासून काय काय वर्तमान आपल्याला वाहिन्या व माध्यमे ऐकवत होत्या? त्यातले किती व काय खरे होते? कारण ज्या भट्टा परसोलच्या गावकर्‍याना मायावतीच्या तावडीतून सोडवायला राहुल थेट पंतप्रधानांच्या निवासात घेऊन आले, तिथे बलात्कार वगैरे काहीच झाले नसल्याचे नंतर उघडकीस आले. आता तर त्याच भट्टा परसोलमधून त्याच ’अत्याचारी’ मायावतींच्या बसपाचा आमदार निवडून आला आहे. कसे वर्तमान आहे? माध्यमांना हाताशी धरून काहीही खोटेनाटे लोकांच्या गळी मारता येते, असे ज्यांना वाटत होते, त्यांचाही या निवडणूकीत युवराजांसोबत कपाळमोक्ष झाला आहे. कारण त्यात युवराज एकटेच तोंडघशी पडलेले नाहीत. त्यांच्या लव्याजम्यात फ़िरताना धन्यता मानणार्‍या माध्यमांचाही या निकालांनी धुव्वा उडवला आहे. कारण त्याच माध्यमांना आता राहुलचे काय व कुठे चुकले ते शोधायची पाळी आली आहे. राहुलची गोष्ट बाजूला ठेवा. माध्यमांचे काय चुकले? त्यांना या होऊ घातलेल्या चमत्काराचा अंदाज आधी का येऊ शकला नाही? कारण ही माध्यमे ’मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दुध किती’ त्याची वर्णने करण्यात रममाण झालेली असताना, मुलायमची समाजवादी म्हैस काय करते आहे, ते बघायला सुद्धा त्यांना सवड मिळत नव्हती ना?

   मुलायम या निवडणुकीसाठी गेल्या दोन वर्षापासून कामाला लागले होते, आपल्या पक्षाची गुंडांची टोळी ही प्रतिमा पुसून काढतानाच त्यांनी मुलाला पुढे करून तरूणांना आपल्याकडे ओढण्याचे पद्धतशीर प्रयास चालविले होते. त्यांचा पुत्र अखिलेश गेले तीन महिने संपुर्ण राज्यात रथयात्रा करत गावोगाव फ़िरत होता. पण युवराज राहुल व राजकन्या प्रियंका यांच्या कौतुकात रमलेल्या माध्यमांना अखिलेशच्या यात्रेचे वृत्त टिपायला व दाखवायला सवड कुठे होती? मग त्यांना यादवाची व्यायला आलेली म्हैस दिसणार कशी? तिचे दुध कळणार कसे? ते बसले शिंगीचे दुध मोजत आणि सांगत. खरे रहिले बाजूला आणि लटिके (म्हणजे शुद्ध खोटे) वर्तमान सांगण्यातच माध्यमे रमलेली होती.

   मग मतदान संपल्यावर चाचण्या झाल्या आणि त्यातूनही काही हाती लागले नाही. मुंगीचे दुध असायचे किती? आणि मुंगी सस्तन प्राणीच नसेल तर दुध देणार तरी कुठून? पण सांगणार्‍यांचे तोंड धरायचे कोणी? जेव्हा ते दुध निकालाच्या डेअरीत घालायची वेळ आली, तेव्हा माध्यमांचेही पितळ उघडे पडले. कारण कॉग्रेस उत्तरप्रदेशच नव्हे तर सर्वच राज्यात दणकून आपटली. ती का आपटली? ज्यांना अण्णा हजारे कॉग्रेस विरुद्ध प्रचार करणार म्हणून चिंता होती, त्यांनी अण्णा विरुद्ध मोहिम उघडली होती. पण अण्णांनी कॉग्रेसविरुद्ध निवडणुकीत प्रचार करण्याची गरजच नव्हती. तो आधीच झालेला होता. या निवडणुकीत युवराजांना खरा दणका बसला आहे तो अण्णांच्या आंदोलनाचाच आहे. मात्र तो माध्यमांना कळणारसुद्धा नाही. कारण अण्णा प्रचारात उतरले नाहीत तर त्यांचा प्रभाव कसा असेल? बघायचे असेल तर दिसते. बघायचे नसेल तर तो दिसणार नाही.

   अण्णांचे आंदोलन संपल्यासंपल्या निवडणुका सुरू झाल्या होत्या. अण्णांनी या निवडणुकीत कॉग्रेसला पाडावे असे लोकांना आधीच आवाहन केले होते. त्याचा परिणाम होणार नव्हता, तर त्यांच्याविरुद्ध माध्यमांनी काहुर कशाला माजवले होते? म्हणजे प्रचार केल्यास कॉग्रेसाला धोका असल्याच्या भितीनेच ओरडा चालू झाला होता. अण्णा प्रचाराला बाहेर पडले नाहीत. पण त्याची काहीच गरज नव्हती. त्यांनी आपले आवाहन आधीच करून टाकले होते. कॉग्रेस लोकपाल विधेयक अडवून बसली आहे. त्यांच्या मनात असेल तर विधेयक संमत होऊ शकेल. सरकार कॉग्रेसचेच आहे. पण कॉग्रेस भ्रष्टाचाराला वाचवते आहे, तर मग इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा या नियमानुसार कॉग्रेसला पाडा असे अण्णांनी आधीच सांगितले होते. आणि तसेच झाले आहे. कोणाला  निवडून आणा असे अण्णांनी सांगितले नव्हते. कॉग्रेस पाडण्यापुरते हे आवाहन होते. तसेच तर झाले आहे. अगदी उत्तरप्रदेशात अजितसिंग यांना सोबत घेऊनही कॉग्रेस आपली अब्रु वाचवू शकलेली नाही. अण्णांवर संघाशी संबंध असल्याचा आरोप केला, म्हणून त्याचा लाभ भाजपाला मिळू शकला नाही. कारण माध्यमे काय म्हणतात वा दिग्विजय काय आरोप करतात, यावर लोक आपले मत बनवत नाहीत. कॉग्रेस पाडा म्हणजे भाजपा निवडा असा सोपा अर्थ काढायला मतदार पत्रकार थोडाच असतो? त्याला कळते, की ज्याला पाडायचे आहे, त्याला पाडू शकेल अशाच पक्षाला मत द्यायचे असते. त्याप्रमाणे जिथे जो पर्याय होता त्याप्रमाणे मतदाराने कॉग्रेसला पाडायला तो तो पर्याय निवडला. पंजाबात अकाली, गोव्यात भाजपा, उत्तरप्रदेशात मुलायम. पण जिथे शक्य आहे तिथे कॉग्रेसला मतदाराने अण्णांच्या आवाहनानुसार पाडलेच. अण्णांचा हेतू कॉग्रेसला धडा शिकवायचा होता आणि मतदाराने तो शिकवला. तो धडा आहे ए आता सोनिया व राहुल यांनीही मान्य केले आहे.

   अर्थात तेवढ्यावर या निवडणुकीचे विश्लेषण संपत नाही. या निवडणुकीतुन मतदाराने एक संदेश दिला आहे. तो स्पष्ट असला तरी तो उथळ विश्लेषण करणार्‍यांना कळणे शक्य नाही. उत्तरप्रदेशसारख्या मोठ्या राज्यात दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा दारूण पराभव झाला आहे. मायावती व मुलायम या दोघातच विधानसभा वाटली गेली आहे. एका एका राज्यातून राष्ट्रीय पक्षांचा वरचष्मा संपत चालला आहे. स्थानिक व प्रादेशिक पक्ष डोके वर काढत आहेत. याची कारणे राष्ट्रीय पक्षांनी शोधण्याची गरज आहे. दिल्लीत सता राबवणारे प्रादेशिक अस्मितेला पायदळी तु्डवत असल्याचा तो परिणाम आहे. राज्यातल्या मुख्यमंत्र्याला चाकराप्रमाणे वागवण्याच्या दिल्लीश्वरांच्या उर्मटपणातून ही स्थिती उद्भवली आहे. कॉग्रेसने आधी हे सुरू केले आणि भाजपानेही त्याचेच अनुकरण केल्याचा हा दुष्परिणाम आहे. कल्याणसिंग, उमा भारती, वसुंधा्रा राजे, करिया मुंडा, खंडुरी, अशा आपल्याच राज्यातील प्रभावी नेत्यांना भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनीच संपवले ना? दोन दशकांपुर्वी कल्याण सिंग यांनीच भाजपाला उत्तरप्रदेशात सत्तेवर आणले होते. त्यांचे खच्चीकरण कोणी केले? मध्यप्रदेशात भाजपाला पुन्हा उभारी देणार्‍या उमा भारतीला पक्षातून बाहेर पडायची वेळ कोणी आणली? शंकरसिंह वाघेला यांची कोंडी गुजरातमध्ये कोणी केली? आजही नरेंद्र मोदी विरोधी डावपेच दिल्लीत बसून कोण खेळत असतात?  

   कॉग्रेसने त्याची सुरुवात केली. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, शरद पवार यांचे खच्चीकरण दिल्लीश्वरांनीच केले ना? आंध्रामध्ये नरसिंहराव, संजीव रेड्डी, उत्तरप्रदेशात हेमवतीनंदन बहुगुणा, राजस्थानात मोहनलाल सुखाडिया, कर्नाटकात देवराज उर्स, मध्यप्रदेशात शुक्ला बंधू, केरळात करुणाकरन, हरयाणात बन्सीलाल अशा एक ना दोन, कित्येक प्रादेशिक नेत्यांचे कॉग्रेस हायकंमांडने शिरकाणच केले आहे. त्यांना संपवण्यासाठी लोकप्रिय नसलेल्या नेत्यांना आशिर्वाद देऊन जे डाव खेळले गेले त्यातून राज्याराज्यातील पक्ष संघटना खिळखिळी होऊन गेली आहे. मग गांधी घराण्यातील वारसाशी निष्ठा, हीच पक्षनिष्ठा होऊन बसली आहे. त्यांच्यावर विसंबून रहाणार्‍यांना पक्षात स्थान आहे. स्वयंभूपणे पक्ष उभारतील, चालवतील, राज्यातील जनतेवर हुकूमत गाजवतील, अशा नेत्यांना कॉग्रेसमध्ये स्थानच उरले नाही. त्यातून माग तृणमूल कॉग्रेस, बिजू जनता दल, राष्ट्रवादी कॉग्रेस असे पक्ष उदयास आले. जिथे ते शक्य नव्हते तिथे समाजवादी, द्रमुक, अण्णा द्रमुक, बसपा, शिवसेना, संयुक्त जनता दल, अशा स्थानिक अस्मिता जपणार्‍या पक्षांचे नेतृत्व उदयास आले आहे. त्याचे कारण राष्ट्रीय पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाची प्रादेशिक अस्मितेला लाथाडण्याची मानसिकता हेच आहे. आता हेच प्रादेशिक नेते स्थानिक सत्ता मिळवतात आणि त्याच्याखेरीज संसदेत जागा जिंकून तिथल्या समिकरणात पंतप्रधानाला शरण आणत असतात. भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्याच्या गप्पा मारणार्‍या युवराज राहुल गांधींचा पंतप्रधान मनमोहन सिंग, आपल्याच मंत्रिमंडळातील दुरसंचार मंत्र्याला दम देऊ शकत नव्ह्ता, की त्याचा राजीनामा घेऊ शकला नव्हता. कारण तो द्रमुकच्या १९ खासदारांच्या पाठींब्यासाठी लाचार होता.

   कशी गंमत आहे बघा. इकडे महाराष्ट्राच्या स्वपक्षीय मुख्यमंत्र्याला चाकराप्रमाणे वागवणारे पक्षश्रेष्ठी तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यासमोर मात्र मान खाली घालून उभे होते. हे राजकीय विश्लेषकांना कळत नसेल वा दिसत नसेल तरी सामान्य माणसाल दिसते आणि कळते. ते सेक्युलर प्राध्यापकांना वा भाजपाच्या चाणक्यांना समजत नसले तरी सामान्य मतदाराला जाणवते. त्यातूनच मग पंतप्रधान वा राष्ट्रीय नेतृत्वाला आव्हान देणारे नितीशकुमार, नरेंद्र मोदी, ममता बानर्जी, नविन पटनाईक, जयललिता, प्रकाशसिंग बादल, येदीयुरप्पा, मुलायम. मायावती उदयास आले आहेत. प्रादेशिक अस्मिता जपायला उत्सूक मतदार त्यांना दाद देऊ लागला आहे. एक एक राज्य राष्ट्रीय मुख्य प्रवाहापासून दुरावत चालले आहे. राष्ट्रीय अस्मितेच्या नावाखाली स्थानिक नेतृताचे खच्चीकरण त्याचे खरे कारण आहे. १९७७ नंतर बंगालमध्ये, १९६७ नंतर तामिळनाडूत, १९९१ नंतर उत्तरप्रदेशात व बिहारमध्ये, १९८० नंतर महाराष्ट्रात, १९९५ नंतर गुजरातमध्ये, २००२ नंतर मध्यप्रदेशात व कर्नाटकात कॉग्रेस पक्षात नव्या पिढीचे नेतृत्वच उभे राहू शकलेले नाही. ज्यांना स्वयंभू कर्तृत्व गाजवायचे आहे त्यांच्यासाठी कॉग्रेस पक्षात स्थानच राहिलेले नाही. पाच सहा वर्षाची दिल्लीतील सत्ता भोगल्यावर भाजपाची अवस्थाही तशीच होऊन गेली आहे. दिल्लीतले मुठभर चाणक्य मैदानात पक्षाची लढाई लढणार्‍या स्वपक्षीयांवर कुरघोडी करणारे दरबारी राजकारण करीत प्रादेशिक नेत्यांना संपवण्याचे खेळ करू लागले, तर दुसरे काय होणार? त्यांना मुलायम, मायावती, ममता किंवा नविन पटनाईकप्रमाणे आपापले स्वतंत्र पक्षाचे तंबू थाटूनच राजकारणात आपली छाप पाडावी लागणार ना? गांधी कुटूंबाचे लांगुलचालन एवढ्याच पुंजीवर केंद्रात मंत्रीपद भुषवणारा राजीव शुक्लासारखा उपटसूंभ नेता ’उत्तरप्रदेशात आमचे कार्यकर्त्यांचे जाळे नव्हते म्हणुन मते मिळाली नाहीत’ असे मंगळवारी म्हणाला, त्यापेक्षा कॉग्रेसची शोकांतिका काय असू शकते? जेव्हा त्याच्यासारख्यांना खिरापत म्हणुन सत्तापदे वाटली जातात, तेव्हा कार्यकर्ता कुठून तयार होणार? खुशमस्करे, लोचट, भामटे, मतलबी लोकच त्या पक्षात जमा होणार ना?  

या निवदणुकीचा प्रचार सुरू झाला तेव्हा राहुल गांधी यांच्या एका विधानाने सनसनाटी माजवली होती. महाराष्ट्रात कशाला भिक मागायला जाता, असा सवाल त्यांनी उत्तरभारतीयांना केला होता. त्यातून वादंग माजले होते. ज्यांचा जनतेशी जनजीवनाशी काडीमात्र संबंध उरलेला नाही आणि ज्यांना सतत हाती वाडगा घेतलेलेच दारात व स्वागताला उभे असलेले दिसतात, ते दुसरे काय बोलणार? ही आजच्या कॉग्रेस कार्यकर्त्याची दुर्दशा आहे. त्याला नेहरू कुटुंबावर अवलंबून रहाण्याची इतकी अगतिक सवय झाली आहे. की स्वयंभूपणे काही करण्याची इच्छाच तो गमावून बसला आहे. पक्षनेतृत्व आणि कार्यकर्ता यांच्यात नेता व अनुयायी असे नातेच उरलेले नाही. मालक याचक अशा नात्यातून पक्ष उभा रहात नसतो, की देशाला घडवू शकत नसतो. मग माध्यमातुन त्यांच्या नसलेल्या कर्तृत्वाचा कितीही डांगोरा पिटला, म्हणुन सत्य कितीकाळ लपवता येईल? सोनिया, राहुल व प्रियंका ही कॉग्रेसची ताकद आहे म्हणुनच कॉग्रेस दुबळी बनत गेली आहे. त्यांनी कितीही ’लटिके बोलणारे’ कामाला जुंपले म्हणून मतदारांची डेअरी त्यांच्या मुंगी वा शिंगीचे दुध घ्यायला मुर्ख नाही.

१५ मार्च २०१२