Wednesday, April 24, 2013

‘वन फ़ाय’ आणि ‘नाईन्टी नाईन’




  आजच्या पोरांना खरे सुद्धा वाटणार नाही. पण आमच्या शाळकरी वयात सिनेमा बघायला मिळत नव्हता. माझीच गोष्ट घ्या. १९६५ सालात शालांत परिक्षा म्हणजे अकरावी मॅट्रीक झालो. तोपर्यंत तीनच सिनेमे बघायला मिळाले होते. त्यातले दोन शाळेत सरकारच्या समाजकल्याण विभागातर्फ़े फ़ुकट दाखवले जाणारे ‘श्यामची आई’ आणि दुसरा ‘अंतरीचा दिवा’. पहिला बालकांवर चांगले संस्कार करणारा म्हणून आणि दुसरा दारूचे कुटुंबावर होणारे दुष्परिणाम दाखवणारा म्हणून. याखेरीज तिसरा सिनेमा आमच्या नशीबी आला तो पौराणिक ‘मायाबाजार’. त्यात सगळेच अदभूत होते, इतकेच आठवते. बाकी सिनेमा म्हणजे पोस्टर्स किंवा प्रचारासाठी केलेल्या व फ़िरणार्‍या फ़्लोटसारख्या सजवलेल्या गाड्या. तेवढ्यापुरता सिनेमा आमच्या शाळकरी जीवनात होता. त्यापैकी ‘कोहीनूर’ या चित्रपटाची एक जीपगाडी चिंचपोकळी महापालिका शाळेच्या बाहेर (आता व्होल्टासची इमारत आहे त्यासमोर) अनेकदा उभी असायची. त्यात तोफ़ेच्या तोंडाला लटकणारी एक बाहूली होती. ती मधुबाला की मीनाकुमारी असे आमच्यापेक्षा दोनचार वर्षांनी मोठी मुले वाद घालताना ऐकली होती. त्यावरून एकच लक्षात आले, की सिनेमात नट-नट्या असतात, त्यांना आपल्या घरच्यासारखी नावे, आडनावे वगैरे नसतात. पण ज्यांना ती नावे ठाऊक होती, त्यांच्या सामान्य ज्ञानाचे कौतुक वाटायचे. असो

   त्या काळातले अजून न सुटलेले एक कोडे आहे. चित्रपटगृहाची तिकीटे आजच्या तुलनेत नगण्यच म्हणायची. कुठे आठ आणे, बारा आणे अशी तिकिटे असायची ती चढत दोन अडीच रुपयांपर्यंत जात. त्यात एक तिकीट ‘वन फ़ाय’ किमतीचे असायचे. म्हणजे एक रुपया पाच आणे. बाकी सगळे दर चार आण्याच्या पटीत असताना एकच वर्ग असा एक रूपया पाच आण्याचा कशाला असेल? त्याचे उत्तर ओळखीचे गावडेमामाही देऊ शकले नाहीत. ते जयहिंद चित्रपटगृहात नोकरी करायचे. शिवाय ‘वन फ़ाय’ हा शब्द कशाला होता? अनेक थिएटरात हे मधल्या दरातले ‘वन फ़ाय’ तिकीट तेव्हा असायचे.

   तसाच एक प्रकार १९६०-७० च्या दशकात ‘बाटा’ नावाच्या पादत्राण कंपनीने केला होता. त्या उद्योगातली बाटा ही मोठीच मक्तेदार कंपनी होती. जागोजागी त्यांची स्वत:ची विक्रीकेंद्रे होती. काचेच्या कपाटात म्हणजे शोकेसमध्ये ठेवलेल्या बुट, चपलांवर त्यांची किंमत ठळकपणे लिहीलेली असायची. ‘करोना’ नावाच्या कंपनीचेही तेच होते. पण बाटाचे वैशिष्ट्य असे, की तिच्या सर्वच किंमती नव्याण्णव पैशात असायच्या. कुठलीही चप्पल वा बूट पुर्ण रुपये किंमतीचे नसायचे. दहा रुपये नाही तर ९.९९ म्हणजे नऊ रुपये नव्याण्ण्व पैसे, अशा किंमती असायच्या. पंचवीसाऐवजी चोवीस रुपये नव्याण्णव पैसे असेच असायचे. त्यामुळे कोणी ९९ हा आकडा बोलला तरी त्याची त्याकाळात ‘बाटा प्राईस’ अशी टवाळी व्हायची.

   आज इतकी वर्षे झाली आणि त्या गोष्टी मागे पडल्या, काळाच्या पडद्याआड गेल्या. पण ते ‘वन फ़ाय’ आणि ‘नाईन्टी नाईन’चा अर्थ कधी कळला नाही आणि अजून कधीतरी त्यांचा अर्थ लावण्याचा, शोधण्याचा पोरखेळ मनातल्या मनात सुरू होतो.

Tuesday, April 23, 2013

भाकडकथा

एक भाकडकथा

खुप लहानपणी आजीने सांगितलेली एक भाकडकथा आठवते. एकदा म्हणे ब्रह्मा, विष्णू, महेश यांना नेहमीच्या कामाचा कंटाळा आला. झक मारले ते जग आणि विश्व, त्याचे व्हायचे ते होईल, असे म्हणून ते तिघेही जबाबदार्‍या सोडुन निघून गेले. पण आता काम नाही तर काय करायचे तेच त्यांच्या लक्षात येईना. ( तेव्हा फ़ेसबुक ट्विटर असते तर कदाचीत त्यांच्यावर अशी पाळी आली नसती). वैतागलेल्या अवस्थेत ते भटकत भरकटत एका माळावर पोहोचले. तिथे एक थेरडी टोपलीत अंडी घेऊन बसली होती. त्या उजाड, निर्जन माळावर ही म्हातारी काय करते; याचे त्या तिघांना कुतूहल वाटले. आसपास शुकशुकाट होता. चालून थकल्याने विश्रांतीसाठी बसली असेल, असे त्यांना वाटले. पण बराच वेळ ती म्हातारी जागच्या जागी. शेवटी या तिघांना रहावले नाही. त्यांनी जाऊन म्हातारीकडे चौकशी केली. बाजार नाही, वर्दळ नाही, घेणारा देणारा नाही, मग इथे बसून ती काय करते त्याची विचारणा केली. तेव्हा त्या म्हातारीने शांतपणे उत्तर दिले, ही अंडी घेऊन मी विकायला बसलेली नाही. वेळप्रसंगाची प्रतिक्षा करते आहे. विश्वाची रचना झाली तेव्हापासून बसलेली आहे इथे. कसल्या वेळप्रसंगाची प्रतिक्षा होती त्या म्हातारीला? जेव्हा विश्वाचा पसारा चालवणारे ब्रह्मा, विष्णू व महेश काम करीनासे होतात, तेव्हा टोपलीतले एक अंडे फ़ोडायचे, की त्यातून दुसरे ब्रह्मा, विष्णू, महेश बाहेर पडतात आणि कामाला लागतात. मग पुन्हा त्यांना कंटाळा येईपर्यंत पुढले अंडे फ़ोडायची प्रतिक्षा करावी लागते. पण ते उत्तर ऐकायला हे पठ्ठे तिघे कुठे थांबले होते. उलट पावली पळत येऊन कामाला लागले होते. मी बावळटासारखा आजीला प्रश्न केला, त्या म्हातारीचे नाव काय होते? तर आजी म्हणाली आदिमाया. आता वाटते आज आजी असती तर आणखी एक प्रश्न तिला विचारला असता. त्या म्हातारीच्या टोपलीत रेनेसॉ, क्रांती, परिवर्तन, रिवॉल्युशन अशा गोष्टी बाहेर पडणारी अंडी असतात का?

============================


कुमार केतकर उजळमाथ्याने फ़िरतात त्याचे काय?

देशमुख साहेब, आपण लिहिता, ‘एक हल्ला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या घरावरही झाला होता. मात्र या पैकी एकाही आरोपीला प्रचलित कायद्यानुसार शिक्षा झालेली नाही. पत्रकारांवर हल्ले करणारे उजळमाथ्याने फिरताना दिसतात.’ खरे आहे. पण केतकर तरी काय मोठे सभ्य लागून गेलेत? पंधरा वर्षापुर्वी रमेश किणी प्रकरणात त्यांनीही राज ठाकरे यांच्या विरोधात जी अफ़वांची राळ उडवली होती. ते काय निखळ सत्य होते आणि समाजहिताची केलेली लढाई होती? ती सुद्धा सुपारीबाजी नव्हती का? पत्रकारितेचा बुरखा पांघरून एका मान्यवर व्यक्तीच्या चरित्र्याचे हनन म्हणजे हत्येचाच तो प्रयत्न होता ना? त्यातून राजविरोधात अक्षरही खरे ठरले नाही. पण एकदा तरी झाल्या अपराधाबद्दल चार शब्दांची माफ़ी मागण्य़ाची सभ्यता केतकर अथवा कुण्या पत्रकाराने दाखवली आहे काय? त्यातले तमाम बदमाश पत्रकार सुपारीबाज पत्रकार आजही उजळमाथ्याने समाजात वावरत आहेत ना? मग राज ठाकरे यांच्यासारख्या पत्रकारी हल्ल्यातल्या अनंत बळींना कोणते संरक्षण आहे? की आपण पत्रकार झालो म्हणजे कोणालाही आयुष्यातून उठवण्याचा परवाना मिळत असतो?

देशमुखजी, आपल्या युक्तीवादाला दुसरी बाजू सुद्धा आहे. ज्या पत्रकारांचा सामान्य लोकांना त्रास होतो, त्यांच्यासाठी अशा खास कायद्यात तरतूद आहे असावी. कारण समाजात प्रत्येकजण नविन जिंदालसारखा पैसेवाला नाही, की पत्रकारांवर खटले भरून वेळ व पैसा वाया घालवू शकतो. उदाहरणार्थ धडधडीत अफ़वा व कंड्या पिकवून सामान्य नागरिकांच्या जीवनात व्यत्यय आणणार्‍या पत्रकारांचे व माध्यमांचे काय करायचे? कारण आपल्यासारखे पत्रकारांची वकीली करणारे; कधी बदमाश पत्रकारांचा साधा निषेधही करायलापुढे येत नाहीत. तेव्हा मात्र सार्वत्रिक मौनव्रताचा अवलंब होतो. बहुतांश हल्ल्यांना अशा अफ़वा कारणीभूत होतात हे नाकारता येत नाही. म्हणूनच जेवढे हल्ल्यापासून पत्रकारांना संरक्षण आवश्यक आहे; तेवढेच पत्रकारांच्या ‘हल्ल्या’पासून अन्य नागरिकांनाही संरक्षण आवश्यक आहे. आपण म्हणता त्या कायद्यात त्याची सोय आहे काय? जिंदाल-झी प्रकरणात वाहिन्यांच्या संघटनेने निदान सुधीर चौधरी या संपादकाला संघटनेतून बडतर्फ़ केले. आनंद अडसूळ अफ़वा प्रकरणात इथल्या पत्रकार संघटनांनी महाराष्ट्र टाईम्स विरुद्ध अशी कुठली कारवाई केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. अशी दुतर्फ़ा तरतूद असलेला कायदा मागत असाल, तर त्याचे सर्वच समाजाकडून स्वागत होईल.
===========================
डॉबरमना सज्जना श्वान पंथेची जावे

श्वान हे अत्यंत इमानदार जनावर असते असे अवघ्या जगात मानले जाते. पण त्याचे इमान हे त्याला पाळणार्‍याशी असते. मग तो पाळणारा गुन्हेगार आहे किंवा चारित्र्यसंपन्न माणुस आहे, याच्याशी श्वानाच्या इमानाला कर्तव्य नसते. अलिकडे ही इमान दारी बांधण्या्ची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात मानवी जमातीनेही आत्मसात केली आहे. त्यामुळे ज्या पैसेवाल्यांना चार पायांचे श्वान म्हणजे कुत्रे पाळण्य़ाचा किंवा त्यातले जातिवंत कुत्रे पाळण्याच साफ़ कंटाळा आलेला आहे, त्यांनी असे मानवी श्वानपंथीय पाळण्याचा श्रीमंती छंद जोपासलेला दिसतो. त्यातले काही श्वान मग भुंकण्यात वाकबगार म्हणून ख्यातकिर्त झालेले आहेत तर काहींनी सामुहिक भुंकण्याचे नवनवे विक्रम करुन दाखवले आहेत. मग अशा श्वानांच्या मालकांनी त्यांच्यासाठी खास थेट प्रक्षेपणाच्या सुविधाच उभ्या करून दिल्या आहेत. उपग्रहवाहिन्या म्हणून त्या ओळखल्या जातात. अशा वाहिन्यांमध्ये कायबीइन लोकमत आघाडीवर असेल तर नवल नाही. कारण ज्यांचा जन्मच लायका कुत्रीने अवकाशात झेप घेण्याच्या युगात झाला, त्यांच्याकडून तशीच अपेक्षा करायला हवी ना?

जेव्हा उपग्रहाचा जमाना सुरू झाला नव्हता आणि नुसतेच अग्नीबाण सोडून प्रक्षेपणाची क्षमता वाढवली जात होती, तेव्हा अवकाशात ज्या पहिल्या सजीव प्राण्याला पाठवण्याचा प्रयोग यशस्वी झाला, त्याचे श्रेय लायका नावाच्या कुत्रीला होते. सोवियत युनियनच्या अवकाशयानातून सर्वप्रथम तिनेच अवकाशात झेप घेतली. बहुधा त्याच वर्षी निखिल वागळेचा जन्म झालेला असावा. त्यामुळे उपग्रहाच्या वाहिनीवरून भुंकण्याचे नवनवे विक्रम तो नेहमी प्रस्थापित करत असतो. सोमवारी ३ सप्टेंबर रोजी त्याने मनसेचे आमदार प्रविण दरेकर यांच्यावर सलग पाच मिनिटे भुंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. अर्थात जो खरे बोलतो त्याला भुंकण्याची गरज नसते. आणि दरेकर खरेच बोलत असल्याने त्यांना आवाज चढवावा लागला नाही. पण समोर येण्यार्‍या सत्याला भेदरल्यामुळे निखिलला भुंकण्याखेरीज गत्यंतर नव्हते. म्हणूनच की काय हा डॉबरमन श्वान पंथेची गेला.

केरळ व अन्य राज्यात स्थलांतरीत कामगार म्हणजे अन्य राज्यातून येणार्‍या कामगार श्रमिकांची रितसर नोंद केली जाते. पोलिसांकडे तशी नोंद व्हावी लागते, असा मुद्दा आमदार दरेकर मांडत होते. तर निखिलने थेट त्यांच्यावर डॉबरमन या जातिवंत कुत्र्यालाही मागे टाकील, एवढ्या भसाड्या आवाजात भूंकायला आरंभ केला. जेणे करून प्रेक्षकांना दरेकर सांगत असलेले सत्य ऐकता येऊ नये. उलट दरेकर खोटे बोलत असल्याचे निखिल भुंकून भुंकून सांगत होता. आणि ज्याअर्थी निखिल खोटे म्हणतो त्याअर्थी दरेकर खरे सांगत असणार याची मला खात्री पटली होती. म्हणूनच मी मंगळवारी इन्टरनेटवर शोध घेऊन सत्यशोधनाचा प्रयास केला. आणि दरेकरच खरे असल्याचा पुरावाच मला मिळाला. मला आश्चर्य वाटले ते कॉग्रेस आमदार व प्रवक्ते भाई जगताप यांचे. कारण मी त्यांना बुद्धीमान व विवेकी अभ्यासू नेता म्हणून ओळखतो. त्यांनीही निखिलच्या धडधडीत खोटेपणाला दुजोरा देण्याचा प्रमाद केला, त्यात माझी मोठी निराशा झाली. कारण जगताप स्वत: कामगार नेता आहेत आणि त्यांनी निखिलच्या नादी लागून आपले अज्ञान असे जगासमोर आणायला नको होते. कारण केरळा्त अशी स्थलांतरीत परप्रांतिय कामगारांची नोंद होते, ही नुसती बातमीच नाही तर त्यावर तिथल्या विधानसभेत चर्चाही झालेली आहे. इथे त्या बा्तमीचा इंतरनेट दुवा मी देत आहे तो निखिल बघेल असे मला वाटत नाही. कारण तो अज्ञानातच आनंदी आहे व राहो. पण जगताप यांनी जरूर बघावा.

प्रेस ट्रस्टने ११ जुलै २०१२ रोजी दिलेल्या बातमीत केरळमध्ये सरकारच्या हुकूमान्वये पोलिसांनी ६३,२०० परप्रांतिय स्थलांतरीत कामगाराची नोंद केल्याची माहिती गृहमंत्री तिरुवंकूर राधाकॄष्णन यांनी विधानसभेत दिल्याची ही बातमी आहे. तिथे केरळात मनसेचे राज्य नाही, तर भाई जगताप यांच्याच कॉग्रेस पक्षाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या अघाडीचे सरकार आहे. तेव्हा निखिलच्या भुंकण्याला दाद देऊन जगताप यांनी आपली प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये एवढीच अपेक्षा. मुद्दा इतकाच, की दरेकर देत असलेली माहिती शंभरटक्के खरी होती. मग निखिल त्यांच्यावरच खोटेपणाचा आरोप करून भूंकत का होता? कारण सोपे होते. त्याच दिवशी त्याच्या मालक दर्डा फ़ॅमिलीच्या कंपनीवर सीबीआयच्या धाडी पडल्या होत्या ना? ते जे कोणी सीबीआयवाले तिथे आले वा धाडी घालत होते, त्यांच्यावर भूंकायची हिंमत नसली मग या डॉबरमनाने दुसरे काय करावे? निदान मालकाची अब्रू जाते आहे त्यावरचे लोकांचे लक्ष उडवण्याचे इमान तरी दाखवायला नको काय? त्यासाठी मग दरेकरना ‘दर्डा’वत शिकारीचा आव आणणे त्याला भाग होते. कारण बाकी सगळ्या चॅनेलवर दर्डा कंपनीचे धिंडवडे निघत असताना त्याची लपवाछपवी करायची, तर अन्य कुणाच्या अंगावर भुंकायला नको का? राज ठाकरे कोण लागून गेलेत; असे म्हणतानाचा निखिलचा आवेश असा होता, की सीबीआयवाले कोण लागून गेलेत. असेच त्याला भुंकताना म्हणायचे असावे. पण तिकडे तोंड वळवले तर कायबीईन लोकमतच्या शेअर्सचीही तपासणी व्हायची भिती असेल ना? त्यापेक्षा दरेकरवर भुंकण्यात डॉबरमना सज्जनाने आपली ताकद व बुद्धी खर्ची घातली. तिथे आपली खोटेपणाची भूक भागवून घेतली

आवडले तर लाइक बरोबर शेअर सुद्धा करा

http://www.ndtv.com/article/south/kerala-police-to-identify-lakhs-of-unregistered-migrant-labourers-208005



http://www.dailypioneer.com/state-editions/kochi/90613-kerala-mulls-law-for-migrant-workers-registration.html


http://www.mid-day.com/news/2012/sep/030912-mumbai-Raj-Kerala-govt-registers-migrants-so-why-cant-we.htm


http://www.ndtv.com/article/south/over-60-000-migrant-workers-register-with-kerala-police-242172


http://bhautorsekar.blogspot.in/2012/02/blog-post_27.html
 — with Vinay Mali and 3 others.

चप्पल मारणारी दोषी असते?


विधीमंडळात मंगळवारी घडलेली घटना शोभादायक नव्हती याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. पण तेवढे निमित्त घेऊन एकूणच लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांवर जी झोड उठवली जात आहे, त्याची थोडी गंमत वाटते. ज्याला मारहाण झाली वा जखमा झाल्या; त्याच्या बाजूने समर्थनाला उभे रहाणे हा मानवी स्वभाव आहे. रस्त्यात कुठे शाळकरी मुले वा बालकासह, दारूड्याला धावत्या गाडीचा धक्का बसला; तर एका क्षणात गाडीचा चालक त्यातला गुन्हेगार असतो. प्रसंग कसा ओढवला याकडे बघायला कोणी राजी नसते. तात्काळ जमलेला जमाव त्या चालकावर तुटून पडत असतो. त्यापेक्षा विधीमंडळात घडलेल्या घटनेनंतरचा प्रकार वेगळा वाटत नाही. आमदारांनी कुणाला लाथाबुक्क्यांनी मारणे योग्य अजिबात मानता येणार नाही. पण ते आमदार असले तरी तुमच्याआमच्या सारखीच तीही माणसे आहेत आणि अनवधानाने माणसाप्रमाणे वागणे शक्य आहे, याचा विचार कोणाच्या मेंदूला कसा स्पर्ष करीत नाही याचेच नवल वाटते. कोणी निवडून आला, मंत्री वा लोकप्रतिनिधी झाला; म्हणजे त्याला रागलोभ आवरण्याचे काही खास अवयव उपलब्ध होतात, अशी कोणाची समजूत आहे काय? याच विधीमंडळात चार दशकांपुर्वी सभापतींच्या दिशेने एका आमदाराने पेपरवेट भिरकावल्याचे उदाहरण आहे. त्याने सभापतीला ठार मारायला किंवा जखमी करायला तशी कृती केलेली नव्हती. रागाच्या आवेशात माणसे अशीच वागतात. आपण कुठल्या पदावर आहोत याचे भान प्रत्येकाला राखता येतेच असे नाही. ज्याला इतका संयम वा समतोल राखता येतो, तो महात्माच असू शकतो. म्हणजेच निवडून येणारे सगळेच महात्मे असू शकत नाहीत, हे विसरता कामा नये. म्हणूनच असे प्रकार घडतात. त्याचा निषेध जरूर झाला पाहिजे. पण त्याचे अवडंबर मात्र माजवले जाते ती निव्वळ अतिशयोक्ती आहे.

विरारचे तरूण आमदार क्षितीज ठाकूर यांचा कुठल्या टोलनाक्यावर पोलिसांशी खटका उडालेला होता. त्यातून त्यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. त्याचवेळी सभागृहाच्या प्रेक्षक कक्षामध्ये तोच पोलिस अधिकारी उपस्थित होता आणि त्याने काही चिडवणारे इशारे व संकेत केल्याचा दावा आहे. त्यानंतर ठाकूर यांच्यासह काही आमदार धावत सभागृहाबाहेर पडले व त्यांनी त्या अधिकार्‍याला गाठून मारहाण केली. अगदी इस्पितळात दाखल करण्यापर्यंत मारहाण झालेली आहे. अशी इजा करणारी मारहाण निषेधार्ह आहेच. पण आमदारांना विधीमंडळात असताना व आसपास सतत कॅमेरे चित्रण करत असतानाही भान सुटावे, असे काय घडले, त्याचा विचारच करायचा नाही काय? या संबंधीचा जो एक व्हिडीओ संबंधित टोलनाक्याच्या परिसरातला उपलब्ध आहे; त्यात हा पोलिस अधिकारी सतत आमदाराला अरेतुरेची उर्मट भाषा बोलताना दिसतो आहे. उलट त्याच्याशी जो कोणी आमदार वा अन्य व्यक्ती बोलतेय ती त्याला अहोजाहो, असे आदरार्थी बोलताना ऐकू येते. ते शब्द व संवाद स्पष्टपणे पोलिसाच्या मस्तवालपणाची साक्ष देणारे आहेत. ज्याला विधान भवनात मारहाण झाली; तोच हा अधिकारी आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी तो उर्मट व उद्धटपणे कुरापत करणाराच वाटतो. आपल्याला शिवी दिली, असा त्या संवादात तो सातत्याने दावा करतो आहे. पण ज्याला शिवी दिल्याचा इतका संताप आहे, त्याला स्वत: आमदाराशी अहोजाहो बोलायचे भान का नसावे? जी अपेक्षा आपण इतरेजनांकडून करतो, तसे आपणही वागले पाहिजे ना? व्हिडीओ बघितल्यास पोलिसाला व्यक्तीगत अभिमान वा गणवेशाचा सन्मान यापेक्षाही आपल्या अधिकाराचा माज चढल्याचे स्पष्टपणे जाणवतो. त्याच्या वतीने तमाम माध्यमांनी इतका गळा काढणे म्हणूनच नवलाचे वाटते.

एक गोष्ट कोणी नाकारू शकणार नाही. जेव्हा मूळ घटना घडली, तेव्हा ठाकूर हा एकच आमदार दुखावलेला होता. पण सभागृहात अन्य आमदार त्यांच्यासोबत असताना प्रेक्षक कक्षातले असे काय त्यांनी पाहिले, की ते सर्वच खवळले? ठाकूर या एका आमदाराच्या अपमानासाठी हे अन्य आमदार आपली प्रतिष्ठा पणाला लावून असे पोलिस अधिकार्‍याच्या अंगावर धावून जाण्याची अजिबात शक्यता नाही. सामान्य बुद्धीच्या माणसाला हे लक्षात येऊ शकते, की इतक्या आमदारांचा संताप अनावर व्हावा, असे काहीतरी घडलेले आहे. आणि त्यांनी प्रतिष्ठा वा कारवाईची फ़िकीर न करता धाव घेतली व त्याला मारहाण केलेली आहे. एका आमदाराचा सूड म्हणून इतकी किंमत बाकीचे कशाला मोजतील? स्वत: त्यांनाही कुठेतरी इजा झाल्याशिवाय पुढला प्रकार नक्कीच घडलेला नाही. पण दिवसभरची चर्चा, बातम्या व दुसर्‍या दिवशीचे त्यावरील विवेचन पाहिल्यास असे वाटते, की आमदारांना मारामारी व हिंसा करण्याचीच उबळ आल्याने विधीमंडळातील प्रसंग घडला असावा. हे निखळ असत्य आहे. जे घडले ते कितीही अश्लाघ्य असले तरी, त्याला संबंधित पोलिस अधिकार्‍याचा काही तरी खोडसाळपणा नक्कीच जबाबदार आहे. त्याबद्दल अवाक्षर बोलायचे नाही, त्याचा तपशील तपासायचा नाही, आणि नियम वा सभ्यता सोडली म्हणून आमदारांना फ़ाशी द्यायला पुढे सरसावायचे; ही पत्रकारिता नाही की सुसंस्कृतपणाही नाही. गर्दीत मुलीची छेड काढलेली दिसत नाही, पण खवळून तिने उलट हाणलेली चप्पल मात्र नजरेत भरते, त्यातला हा प्रकार नाही काय? मग चप्पल मारणारीला गुन्हेगार व दोषी मानायचे काय?
  

आठवणीतला गारवा



झाली त्याला आता पन्नास पंचावन्न वर्ष. ‘लालबागचा राजा’ जिथे स्थानापन्न होतो ना, तिथे हमरस्त्यावरून एक वळण चिंचपोकळी रेल्वे स्थानकाकडे जाते. त्याच वळणावर जरा पुढे गेल्यावर गणेश टॉकीज आहे. नेमक्या याच वळणाच्या फ़ुटपाथला लागून काही मसाल्याची व कोंबड्यांची दुकाने आहेत. त्यांच्याच डोक्यावर किमान तीनचारशे फ़ुट लांबीचे व पंधरा एक फ़ुट उंचीचे भव्यदिव्य अगडबंब पोस्टर लागलेले आठवते. त्या काळात आजच्यासारखी वहानांची गर्दी नव्हती. एक बस वा ट्रक कशीबशी जाऊ शकेल इतकाच रुंद रस्ता असायचा. पण दोन्ही बाजूंना आणि मध्यंतरी तेवढीच रुंदी ट्रामच्या रुळांनी व्यापलेली असायची. अशा त्या वळणावर ते पोस्टर दोनचार दिवस तरी लोकांना खिळवून ठेवणारे होते. तिथे थबकून व संथगतीने चालत लोक पोस्टर न्याहाळत पुढे जायचे. आम्ही आठदहा वर्षाची पोरे तर शाळेत जाता येताना कित्येक दिवस ते बारकाईने बघत त्यातल्या कलावंतांना डोळ्यात साठवत होतो. कारण त्या काळात व त्या वयात चित्रपट बघण्याची रीतच नव्हती. कुठे कोणाच्या घरी बारसे निघाले वा चाळीचा सत्यनारायण असला, तर रेकॉर्डीवर सिनेमाची गाणी वाजायची. आणि ज्यांच्याकडे रेडीओ होता, त्यांच्या घरातल्या आजोबांच्या शिस्तीमुळे सिनेमाची गाणी वाजवणारे स्टेशन लागतच नसायचे. अशा काळातले ते अवाढव्य पोस्टर म्हणजे आम्हा पोरांसाठी पर्वणी होती. महिनाभरापेक्षा अधिक काळ आम्ही पोरं आशाळभूतासारखी तिथे टाईमपास करीत ते न्याहाळण्यात कित्येक तास खर्ची घातलेले आहेत. तो चित्रपट होता ‘मुगले आझम’.

त्याच चित्रपटाने आमच्या मागल्या बाजूच्या रस्त्यावर असलेल्या गणेश टॉकीजचा मुहूर्त झाला. तो तिथे झळकलेला पहिला चित्रपट. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे ते आम्ही ऐकलेले पहिले एअरकंडीशन्ड थिएटर होते, मध्य मुंबईच्या गिरणगावातले. कदाचित एकुलते एक. खरे तर आमच्या ज्ञानात एअरकंडीशन या शब्दाची भर घालणारी ती पहिली वास्तू. चित्रपट तिथे किती चालला माहित नाही. पण टॉकीज सुरू झाल्यापासून कित्येक महिने मग आम्हा पोरांसाठी त्या थिएटरच्या प्रवेशाचा भाग अड्डाच झालेला होता. कारण काचेची दारे व त्यांची आपोआप उघडझाप झाल्यावर बाहेर डोकावणारी गार झुळूक, हे अप्रुप होते. साली ही गार हवा येतेच कुठून? काचेतून आत कुठे पंखा दिसायचा नाही, पण बर्फ़ाने फ़ुंकर घालावी तशी ती हवा वेड लावून गेली होती आम्हा पोरांना. रिकामा वेळ मिळाला, की सर्वकाही सोडून आम्ही गणेश टॉकीजच्या दारात हजर. मग तिथला गुरखा गर्दीच्या वेळी हुसकून लावायचा. पण काही आठवड्यातच एक मोठा शोध लागला. काचेच्या पार गेले, की अडव्हान्स बुकींगची रांग असायची. एकदा किशाने बापाची पाटलोण चढवून थेट काचेच्या पार जाण्याची हिंमत केली. काचेच्या आतल्या जगात बुकिंगच्या रांगेत उभा राहून थंडगार हवेची लूट केली त्याने आणि आम्ही बाहेर उन्हातून त्याला बघतोय. दुसर्‍या दिवसांपासून आणखी चारपाच जणांनी बापाच्या काकाच्या लांबड्या पाटलोणी चढवून काचेच्या पार प्रवेश मिळवला. माझ्या नशीबी ते सुख नव्हतेच. म्हणजे तिथे जाऊन रांग धरायची आणि खिडकीपाशी जवळ दोनतीन नंबर असले, मग रांग सोडून पुन्हा मागे शेवटी येऊन उभे रहायचे. मात्र दोनतीन दिवसातच गुरख्याला चेहरे ओळखीचे झाले आणि लांबड्या पाटलोणीची जादू संपली. पण पुढे कित्येक महिने आम्ही त्या दारात काचेच्या बाहेर राहूनही त्या थंड हवेची यथेच्छ लुटमार करीतच होतो.

पुढे वय वाढले, जग बदलले. एअरकंडीशनचा एसी झाला. ऑफ़िसमध्ये वा केबीनमध्येही एसीची सुविधा आली. पण पन्नास वर्षापुर्वीच्या त्या गणेश टॉकीजच्या दारात जी थंड हवेची मौज लुटली होती, तो गारवा परत कधी अनुभवता आलाच नाही. एक साधा एअरकंडीशन हा विषय आम्हाला वर्ष दिडवर्ष तरी कौतुकाचा वा अपुर्वाईचा ठरला होता. ते नाविन्य पचवण्याला दिर्घकाळ लागला होता. नवनव्या गोह्टी सुविधा येण्याचा वेगच खुप संथ होता. आज त्याहीपेक्षा कोवळ्या वयात मोबाईल वा आयफोन हजम करणारी मुले बघितली; मग आपण खुपच बावळट होतो, असे वाटू लागते. पण अजूनही त्या गणेश टॉकीजच्या बाजूने कधी गेलो किंवा कधी कुठे दाराच्या फ़टीतून एसीची गार झुळूक आली, मग ते आनंदाचे क्षण धावत येऊन मिठीच मारतात.

कलम कसाई



मोगलाईत पगारी सैनिक असायचे त्यांना वेळच्यावेळी पगार देण्याचे काम कारकुनाकडे असायचे. एकदा एका दांडग्या शिपायाचा कारकुनाशी कसला वाद झाला. तर त्या शिपायाने याला दम भरला. ‘हाडं मोडून हातात देईन म्हणून’. बिचारा किरकोळ अंगयष्टीचा कारकुन गप्प बसला. करतो काय? पण तेव्हापासून त्याने डूख धरला होता. कधीतरी या शिपायाला अद्दल घडवायचा. आतासारखी तेव्हा नव्हती ओळखपत्रे किंवा अन्य कसल्या खाणाखुणा. मग नेमक्या शिपायाला वा चाकरालाच पगार देणार कसा? तर शरीरावरची काहीतरी खूण नोंदवून ठेवलेली असायची. त्याही शिपायाची अशीच काही पाठीवरच्या डागाची खूण होती. वर्षभरात कारकुनाची नेमणूक बदलली, तेव्हा जाण्यापुर्वी त्याने दांडगाई केलेल्या शिपायाला धडा शिकवण्याची संधी साधून घेतली. अधिकार सुत्रे नव्या कारकुनाला देण्यापुर्वी त्याने दफ़्तरात त्या शिपायाच्या शारिरीक खुणेची नोंद बदलून टाकली. पुढल्या महिन्यात शिपाई पगार घ्यायला आला, तर पाठीवरचा डाग दाखवूनही त्याला नवा कारकुन पगार देईना. कारण दफ़्तरी शारिरीक खुण वेगळीच नोंदलेली होती.

नाव अमूक तमूक आणि शारिरीक खुण होती समोरचे वरचे दोन दात पडलेले. आता काय करायचे? शिपाई दात लपवू शकत नव्हता आणि ओळख पटत नसल्याने नवा कारकुन त्याला पगार देत नव्हता. पण शिपाई थोडाच ऐकतो? चार शतकांनंतर प्रस्थापित होणार्‍या चळवळीच्या वंशजांचा तो आद्यपुरूष होता. त्याने कारकुनाची ‘वर’ तक्रार केली आणि दाद मागायचा पवित्रा घेतला. थेट आपल्या जमादार, फ़ौजदार यांच्यापासून सरदार मनसबदारापर्यंत दार ठोठावण्यात वर्षभराचा काळ खर्च केला तरी उपयोग झाला नाही. कारण आधीच्या कारकुनाने केलेली नोंद बदलणे कोणाच्याच हाती नव्हते. अखेर बादशहाच्या विश्वासातल्या एका खुशमस्कर्‍याने त्याला मुक्तीचा मार्ग दाखवला आणि चौदाव्या महिन्यात त्याचा सगळा थकलेला पगार एकरकमी मिळाला. कारण दफ़्तरी नोंदलेली खुण पटवण्याचा मार्ग त्याने चोखाळला होता. निमूट वैद्याकडे जाऊन शिपायाने वरचे पुढले दोन दात पाडून घेतले. खुण पटली आणि पगार मिळाला.

सरकारी दफ़्तरात कारकुन होत्याचे नव्हते व नव्हत्याचे होते करू शकतो आणि अवघे प्रशासन त्यात अवाक्षर बदलू शकत नाही, ही तेव्हापासूनची थोर परंपरा आजही स्वतंत्र भारतात तशीच नांदते आहे. आता तर बादशाही सुद्धा राहिलेली नाही. कारकुनच राजे व मंत्री, मुख्यमंत्री व पंतप्रधान होतात. तेव्हा आधार कार्ड असो की साधार कार्ड असो, आपण सगळे सामान्यजन निराधारच असतो. कारण कलम चालवू शकणार्‍यांच्या कसाईखान्यात आपण कत्तल होणारी मूक जनावरेच असतो. कारण आपल्यावर ‘कलम कसाई’ राज्य करतात.