Wednesday, October 30, 2019

एक वेगळे समिकरण

Image result for uddhav thackeray pawar

सत्तेच्या किल्ल्या किंवा हुकूमाचा पत्ता तुमच्या हाती आहे म्हणून सगळा डाव तुमच्याच हाती नसतो. तर ज्या किल्ल्या किंवा हुकूमाचा पत्ता हाती आलेला आहे, तो धुर्तपणे वा खुबीने वापरण्याची चतुराई वा धाडसही अंगी असावे लागते. विधानसभेचे जे निकाल समोर आलेत, त्यातली आमदारसंख्या बघता हुकूमाचा पत्ता शिवसेनेच्या हाती आलाय. हे कोणी नाकारू शकत नाही. पण नुसता पत्ता हाती आहे म्हणून मिरवून चालत नाही. तो योग्यवेळी व योग्य संधी निर्माण करून शिवसेनेला वापरता आला पाहिजे. त्यासाठी वेगळी समिकरणे मांडण्याची व त्यातून आपल्याला हवे ते साधण्याची कुवतही असायला हवी. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाशी ती कुवत आहे काय? २०१४ च्या विधानसभा निकालात राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाचा धुव्वा उडालेला होता. पवारांपाशी तर अवघे ४१ आमदार निवडून आलेले होते. पण त्या उध्वस्त अवस्थेत जो किरकोळ पत्ता हाती लागला होता, तो त्यांनी अशा खुबीने खेळला, की त्याचे दुष्परिणाम आजही सेना भाजपाला भोवत आहेत. आज तसा पत्ता उद्धव यांच्या हाती आहे. ते ज्या बाजूला झुकतील, तिथे बहूमत म्हणजे सत्ता आहे. दोन्ही कॉग्रेस मिळून ९८ आमदार आहेत आणि भाजपाकडे १०५ आमदार आहेत. म्हणजे जिकडे सेना झुकेल, त्याचे सरकार होऊ शकते. पवारांनी १२२ आमदारांच्या भाजपाला बाहेरून पाठींबा घोषित करून शिवसेनेच्या पाठींब्याची गरज नसल्याचे चित्र निर्माण केले आणि दोन्ही मित्र पक्षातच लावून दिलेली होती. अर्थात भाजपाला हिणवताना अर्ध्या चड्डीकडे कारभार देणार काय? असा सवाल पवार त्यावेळी सलग चार महिने मतदाराला करीत होते. पण प्रत्यक्ष निकाल लागले, तेव्हा त्यांनी त्याच चड्डीवाल्यांना सत्ता देऊ केलेली होती. त्याला धाडस किंवा चतुराई म्हणतात. कारण हिंदूत्ववादी भाजपाला पाठींबा देण्यातून आपल्या पुरोगामी प्रतिमेला मोठा धक्का बसेल, ही शक्यता पवारांनाही कळत होती. पण तशी वेळ येणार नाही. पण नुसती हुलकावणी दिल्याने भाजपा शेफ़ारून जाईल आणि शिवसेनेशी त्यांचे कायमचे बिनसून जाईल, याची पवारांना खात्री होती. त्यांनी ४१ आमदारांचा दुबळा पत्ता फ़ेकून दोन्ही प्रतिपक्षांना एकाचवेळी गारद करून टाकले. शिवसेना असे काही आज करू शकते काय?

सत्तेचे राजकारण खेळताना हातचे राखून खेळण्याला पर्याय नसतो. पण सगळेच हातचे राखून सत्तेच्या स्पर्धेत उतरता येत नाही. तिथे काहीप्रसंगी जुगार खेळण्याची हिंमत करावीच लागले. शिवसेनेने गेल्या पाच वर्षात तरी तशी भाषा अनेकदा केली. ‘सामना’तून वल्गना खुप केल्या. पण प्रत्यक्ष ‘सामना’ करायची वेळ आल्यावर सेनेने प्रत्येकवेळी माघार घेतली. म्हणून भाजपाला सेनेची कधीच पर्वा करण्याची गरज भासलेली नाही. आजही इतक्या टोकाला परिस्थिती गेली असतानाही भाजपा बिनदिक्कत आपल्या नेत्याची निवड करून मोकळा झालेला आहे. सत्तास्थापनेसाठी सेनेकडे कुठला निरोप पाठवण्याचीही भाजपाला गरज वाटलेली नाही. सेनेची स्थिती गरजते वो बरसते नही, अशी असल्यानेच भाजपाला इतकी हिंमत आलेली आहे. शिवाय आपल्या हाती कुठला पत्ता आहे आणि तो कुठे चतुराईने वापरावा; ह्याची बुद्धी ‘सामना’तून येऊ शकत नसते. वल्गना करून काही साधत नसते. तिथे धाडसाची व मुरब्बी खेळीची गरज असते. भाजपाला धडा तर शिकवायचा आहे, पण दोन्ही कॉग्रेस सेनेला सत्ता स्थापनेसाठी मदत करू शकत नाहीत. ही व्यवहारी वास्तविकता आहे. पण शिवसेना तर दोन्ही कॉग्रेसला कधी अस्पृष्य मानुन राहिलेली नाही ना? अनेकदा युतीत असतानाही शिवसेनेने भाजपाला झुगारून कॉग्रेसला साथ दिलेली आहे. कॉग्रेसने सेनेची मदत घेतलेली आहे. प्रतिभाताई पाटिल वा प्रणब मुखर्जी राष्ट्रपती पदाचे उमेदवार असताना मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन गेले होतेच ना? मग त्यांना पाठींबा देताना साहेब कुठे डगमगले होते? कॉग्रेसलाही शिवसेनेचा पाठींबा घेताना कुठली अस्पृष्यता पाळण्याची गरज वाटलेली नव्हती. तोच फ़ॉर्म्युला आजही लागू होऊ शकतो ना? दोन्ही कॉग्रेस पर्यायी सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठींबा देऊ शकणार नाहीत, हे जगजाहिर आहे. अगदी बाहेरून पाठींबा देणे त्यांना अशक्य आहे. राजकीय सक्ती आहे. पण त्यांना शिवसेनेने सरकार स्थापनेसाठी पाठींबा देऊ केला, तर ते नाकारण्याची बिलकुल गरज नाही. ९८ आणि ५६ मिळून संख्या १५४ होते आणि दोन्ही कॉग्रेसचे सरकार स्थापन होऊन भाजपाला निमूट विरोधी पक्षात बसवता येते ना?

अर्थात हा नुसत्या अंकगणिताचा विषय नाही. भलत्यालाच सत्तेचा घास देऊन शिवसेनेला काय मिळणार आहे? भाजपाला धडा शिकवला जाऊ शकेल. पण सेनेचा लाभ कुठला? नुसता धडा शिकवण्यासाठी सेनेने इतके टोकाचे पाऊल उचलावे काय? हे आता प्रत्येक पक्षाला आपापले भवितव्य व ध्येय निश्चीत करूनच ठरवावे लागत असते. अंतिम निर्णय हा प्राधान्यानुसार होत असतो. सर्वात आधी काय साध्य करायचे आहे? ते साध्य करताना आपले मोठे नुकसान होणार नाही ना? नुकसान किमान आणि उद्दीष्ट मोठे असेल्, असा जुगार खेळावा लागत असतो. त्यामुळे भाजपाला धडा शिकवायचा असेल आणि त्यालाच प्राधान्य असेल तर? दोन्ही कॉग्रेसनी सरकार स्थापन करावे आणि आपण बाहेरून त्याला पाठींबा देतो, अशी भूमिका शिवसेनेला घेता येईल. परिणामी ‘सत्तेची मस्ती चढलेल्या’ मित्र भाजपाला धडा शिकवता येईल. पण सेनेच्या पदरात त्यामुळे काय पडणार? आज सेना मुख्यमंत्रीपद मागते आहे, अर्धी सत्ता हवी म्हणून अडून बसलेली आहे. बाहेरच्या पाठींब्याने त्यापैकी काहीच मिळणार नाही. मग हा कसला जुगार? हे कसले समिकरण? असेही चटकन मनात येणारच. तर या समिकरणातून दोन्ही कॉग्रेसचे सरकार सेनेच्या पाठींब्यावर स्थापन झाले, तरी त्याचे भवितव्य शिवसेना पक्षप्रमुखांच्या मर्जीवरच अवलंबून असेल. जितका काळ उद्धव ठाकरेंची मर्जी असेल, तितकेच अशा आघाडी सरकारचे आयुष्य असेल. ज्याक्षणी सेना पाठींबा काढून घेईल, त्याक्षणी असे दोन्ही कॉग्रेसचे सरकार कोसळलेले असेल. शिवाय जोपर्यंत असे सरकार सत्तेत असेल, त्याचा रिमोट कंट्रोल आपोआप मातोश्रीवर असेल. त्यातून मुख्यमंत्र्याला सुटकाही नसेल. त्यातून एका बाजूला भाजपाला धडा शिकवला जातोच, पण दुसरीकडे कसलीही जबाबदारी न घेताही सरकारवर उद्धव ठाकरे आपली मर्जी लादू शकतात. त्याचवेळी भाजपाला विरोधात बसायला भाग पाडून शिवसेना त्या मित्र पक्षाला खिजवूही शकते. गाजराची पुंगी, जोवर वाजली तोवर वाजवायची आणि नको असेल तर मोडून खाण्याची सुविधाही कायम उरते. कारण सत्तेला बाहेरून पाठींबा दिला वा सहभागी होऊन दिला, तरी कुठल्याही क्षणी त्यातून बाहेर पडण्याची मोकळीक सेनेला कायम रहाते.

सवाल सत्तेबाहेर बसून सत्ता नियंत्रित करण्याचा आहे. त्यामुळे मंत्री व्हायला उतावळे झालेल्या आपल्या सहकारी आमदार नेत्यांना उद्धवना आवर घालावा लागेल. ते कितपत शक्य आहे? सत्तेची सुत्रे सेनेच्या किंवा मातोश्रीच्या हाती नक्की येतील. पण कोणाही शिवसैनिकाला प्रत्यक्ष सत्तेच्या कुठल्याही गादीवर बसता येणार नाही. गणितच असे आहे, की भाजपा त्याला शह देऊ शकत नाही. शिवाय दोन्ही कॉग्रेस कितीही आगावूपणा करीत असल्या, तरी त्यांना सेनेच्या मर्जीवर पाऊल टाकावे लागेल. अर्थात त्यांनी अशी ऑफ़र सेनेकडून आल्यावर स्विकारली पाहिजे. सेनेने तशी ऑफ़र दिली पाहिजे. सेना पक्षप्रमुखांना आपले सहकारी व आमदारांना त्यासाठी संयम राखण्यास भाग पाडता आले पाहिजे. हे शक्य झाले तर सत्तेसाठी उतावळा असलेल्या भाजपाची मिजास कमी करता येईल आणि कदाचित मुख्यमंत्रीपद सेनेला देण्यापर्यंतही नमवता येईल. जेव्हा तितके गुडघे टेकायला भाजपा राजी होईल, तेव्हा दोन्ही कॉग्रेसचे बाहेरून पाठींबा दिलेले सरकार कोसळून आपल्या मुख्यमंत्र्याचा मार्ग प्रशस्त करण्याची मोकळीक उद्धवरावांपाशी कायम रहाते. एक पत्र राज्यपालांना पाठवले की विषय संपला. हिंदीत म्हणतात ना? चीत भी मेरा पट भी मेरा! अर्थात हा हिंमतीचा व संयमाचा खेळ आहे. त्यासाठी तितके धाडस करता आले पाहिजे. एका बाजूला मिजासखोर मित्राला धडा शिकवता येऊ शकतो आणि दुसर्‍या बाजूला जुन्या जाणत्या कॉग्रेस आघाडीलाही आपल्या बोटावर खेळवता येऊ शकते. शिवाय गमावण्यासारखे त्यात काहीच नाही. मुद्दा आहे तो पवारांसारख्या नेमक्या वेळी आपले पत्ते खेळण्याचा! सगळी बाजी आपल्या हाती आणण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा. शिवसेना वा उद्धव ठाकरे यांच्यापाशी ती इच्छाशक्ती आहे काय? त्यांना शिवसेना राजकारणातून चालवायची आहे, की ‘सामना’तून नुसत्याच वल्गना करायच्या आहेत? समोर भाजपासारखा मुरब्बी मित्रपक्ष आहे आणि आणि दुसरीकडे पाताळयंत्री पवार व कॉग्रेस आघाडी आहे. त्या दोघांना खेळवता येऊ शकेल, असा पत्ता हाती आलेला आहे. गरज आहे, ती हिमतीची, धाडसाची. फ़ुशारक्या मारून काहीही साध्य होत नसते.

हीच ती वेळ आहे हुकूमाचा पत्ता टाकण्याची. 

Tuesday, October 29, 2019

दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष

devendra uddhav के लिए इमेज परिणाम

भाजपाच्या अपयशाचेही मूल्यमापन झाले पाहिजे. माझा कल भाजपा किंवा काहीसा शिवसेनेच्या बाजूने असतो, हे मी कधीच लपवलेले नाही. पण याचा अर्थ त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणे, मला योग्य वाटत नाही. किंबहूना जिथे खरोखर आपल्या नजिकच्या व्यक्तीची चुक होत असते, तेव्हा अगत्याने त्यावर बोट ठेवण्याला महत्व असते. पण चुकांवर बोट ठेवण्याचा अर्थ कुठल्याही गैरलागू आरोप वा टिकेचे समर्थन असाही होत नसतो. सत्ताधारी पक्ष आहे म्हणून त्याच्यावर टिका केली, म्हणजेच परखड असा नसतो. किंवा विरोधकांच्या कसल्याही खुळेपणाचे समर्थन करण्यालाही निर्भीड समजणे खुळेपणा असतो. त्यामुळे मला मोदीभक्त वा भाजपाला विकला गेलेला ठरवण्याचा राग येत नाही. तसे म्हणणार्‍याची कीव नक्की येत असते. असो, मुद्दा भाजपाच्या चुकांचा आहे आणि त्याचेही पोस्टमार्टेम योग्यरित्या अजून झालेले नाही. भाजपाला आपल्या असलेल्या जागा जिंकता आल्या नाहीत वा घोषित २२० जागांचा पल्ला युतीला गाठता आला नाही. इतके निमीत्त पकडून पराभवाचा आनंदोत्सव साजरा करणेही मुर्खपणाचे आहे. कारण त्यातून भाजपाचेच विरोधक निश्चींत होत असतात. किंबहूना म्हणूनच गेल्या पाच वर्षात विरोध मरगळले आहेत वा पुर्णत: निष्क्रीय होऊन गेलेले आहेत. तथाकथित निर्भीड परखड पत्रकार विश्लेषकांकडून भाजपाच्या नसलेल्या अपयशाचा डंका इतका पिटला गेला आहे, की भाजपा आपोआप पराभूत होणार आणि आपल्याला आयते यश मिळणार; असल्या भ्रमात विरोधकांची पाच वर्षे निघून गेली. म्हणूनच त्या खोट्या वा पक्षपाती टिकेने व टिकाकारांमुळे भाजपाचे नुकसान झाले नाही. पण खर्‍याखुर्‍या राजकीय विरोधकांचे नुकसान झालेले आहे. कारण अशा बोगस टिकेने आरोपबाजीने विरोधकांना गाफ़ील करण्याचे पाप त्यांच्या समर्थक माध्यमे व भाटभक्तांनीच केलेले आहे. असो, यावेळच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला पोषक वातावरण असूनही त्यांचा पराभव नाही तरी नुकसान कशाला झाले आहे?

लोकसभा सहजगत्या वा मोठ्या फ़रकाने जिंकली गेली असताना विधानसभेत भाजपाला पोषक वातावरण असल्याचे भाकित करण्यासाठी कोणा ज्योतिषाची वा विश्लेषकाची गरज नव्हती. पण परिस्थिती अनुकुल असली म्हणून आपोआप चमत्कार घडत नाही. त्यासाठी करायचे प्रयत्न, कष्ट व सावधानता सोडून चालत नाही. ते अपयशाला वा हानीला आमंत्रण असते. ते आमंत्रण भाजपाने दिलेले होते, हे कोणी नाकारू शकणार नाही. लोकसभेनंतर चार महिने विधानसभा मतदानाला होते आणि आधीच्या यशावर स्वार होण्यासाठीची तयारी करायला तो भरपूर अवधी होता. युती लोकसभेतच झालेली होती, तर विधानसभेसाठीही जागावाटप उरकून घ्यायला ती उत्तम संधी होती. त्यातून पुढली तारांबळ टाळता आली असती. भले युती करायची नसेल तरी आधीच तसा निर्णय घ्यायचा होता. किंवा युती करायची असेल, तर जागा निश्चीत करून इच्छुकांना उगाच टांगून ठेवण्याचे काहीही कारण नव्हते. पण शिवसेना किंवा इतरांना खेळवण्याच्या उत्साहात किंवा धुर्तपणाचे प्रदर्शन करताना भाजपाने उत्तम संधी मातीमोल करून टाकली. समोर कोणी लढायला नव्हता, हे सत्य असले तरी तो खराखुरा पहिलवान भाजपाच्या मस्तीतूनच निर्माण करण्यात आला, ही वस्तुस्थिती आहे. कारण निकाल सांगतात, दुसर्‍या क्रमांकाच गट वा पक्ष ‘इतर’ म्हणजे अपक्ष बंडखोर आहेत. ज्यांनी प्रचंड मते खाल्ली आणि विरोधकांना कमी मतातही यशाचा पल्ला गाठणे सोपे करून दिले. त्याचा दोष बंडखोरांच्या माथी मारता येणार नाही. त्यांना बंडखोरीला प्रोत्साहित करणारे नेतृत्व त्यातला खरा गुन्हेगार आहे. कारण उशिरापर्यंत त्यांच्या अपेक्षा आकांक्षा टांगून ठेवण्यात आल्या आणि त्यातून अशा इच्छुकांना बंडखोरीला प्रवृत्त करण्यात आले. जणु डिवचण्यात आले. शिवसेना हा धाकटा भाऊ असेल तर थोरला म्हणून भाजपाने समजूतदार वागले पाहिजे. तो शहाणपणा वा परिपक्वता भाजपाला दाखवता आलेली नसेल, तर अपेक्षाभंगाचे खापर भाजपा नेतृत्वावरच फ़ोडले पाहिजे.

जुन वा जुलै महिन्यात युतीपक्षांच्या जागा निश्चीत करण्यात कुठली अडचण होती? बिहारमध्ये नितीश सोबत झालेल्या युतीनंतर लोकसभेच्या दोन महिने आधीच प्रत्येकी १७ जागा आणि इतर मित्रांना ६ जागा असा निर्णय होऊ शकला. मग महाराष्ट्रात जागावाटपाला विलंब लावण्यात कसलाही शहाणपणा असू शकत नाही. किंबहूना तो अतिरेकी मस्तवालपणा म्हणता येईल. आपल्याला कोणी पराभूत करू शकत नसल्याची मस्ती चढली, मग आपणच आपल्या अपयशाची तजवीज करू लागतो. आपला शत्रू आपणच निर्माण करतो. भाजपाने यशाची झिंग चढल्यामुळे ही गंभीर चुक केली. कॉग्रेस व राष्ट्रवादी आपल्याला पराभूत करू शकत नसल्याने जणू आपल्या पराभवासाठी भाजपाच्या मुत्सद्दी नेतृत्वाने बंडखोर अपक्ष नावाचा आपलाच शत्रू उभा केला आणि पदरात अपयश पाडून घेतलेले आहे. वेळीच जागावाटप झाले असते तर सेना वा भाजपा यांच्या इच्छुक उमेदवारांची नाराजी शमवायला भरपूर वेळ मिळाला असता आणि उपलब्ध असलेले यश संपादन करता आले असते. पण ते करण्यापेक्षा भाजपा शरदनितीकडे झुकत गेला अणि पवारांप्रमाणेच स्वत:च्या अपयशाची तजवीज करीत गेला. आपले काही उभे करण्यापेक्षा अन्य कुणाला घरी बसवणे वा त्याचे नुकसान करण्याच्या नादात पवारांनी आयुष्यभर अनेक सुवर्णसंधी मातीमोल करून टाकल्या. भाजपा विधानसभा लढवताना त्याच शरदनितीचा अवलंब करीत गेला नाही का? अन्य पक्षातले नेते फ़ोडून आपल्याकडे आणणे, मित्रपक्षाला जागांच्या वाटपात ताटकळत ठेवणे आणि आपल्याविषयी सहानुभूती वा आपुलकी असलेल्या मतदाराच्याही मनात संभ्रम निर्माण करण्याला रणनिती म्हणत नाहीत. आत्मघातकी हट्टीपणा म्हणतात. निकालांच्या आकड्यावर नजर टाकली तरी भाजपा व शिवसेनेने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्याचेच निष्पन्न होते. प्रत्येक पक्षाला मिळालेली मते व बंडखोरीला गेलेली मते त्याचे साक्षीदार आहेत.

भाजपाला मिळालेली मते एक कोटी ४२ लाख इतकी आहेत आणि त्यानंतर क्रमांक लागला आहे तो कुठल्या मान्यताप्राप्त पक्षाचा नसून इतर अपक्षांचा आहे. त्या खात्यात एक कोटी २ लाख मते गेलेली आहे. बाकी मित्र वा विरोधी पक्ष कोणी एक कोटीचा पल्लाही गाठू शकलेला नाही. राष्ट्रवादी (९२), शिवसेना (९०) आणि कॉग्रेस (८७) अशी लाखातली मते आहेत. अपक्ष इतरांना इतकी भरघोस मते तेव्हाच मिळतात, ज्यावेळी असे अपक्ष बंडखोर हमखास लोकप्रिय पक्षातून आलेले असतात. म्हणजेच जी एक कोटी मते इतर अपक्ष खात्यात दिसतात, त्यातील ५०-७० लाख मते तरी भाजपा व शिवसेनेच्या बंडखोरांनी खाल्लेली आहेत. त्याला आळा घातला गेला असता आणि त्यातली निम्मी मते जरी भाजपा व शिवसेना आपल्या खात्यात राखू शकले असते, तरी आज दिसणारे जागांचे आकडे कुठल्या कुठे बदलून गेले असते. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत तब्बल तीन महिन्यांचा अवधी त्यासाठी होता आणि आपापल्या इच्छुकांना विश्वासात घेऊन युतीपक्षांनी बंडखोरीला मोकाट रान मिळणार नाही अशी काळजी घेतली असती तर? ती घेतली नसेल तर तो आपल्याच इच्छुकांच्या भावनांशी खेळ केलेला असतो. त्याला नेतृत्वाचा माजोरीपणा म्हणावा लागतो. समर्थ शत्रू समोर नसेल तर आपला नवा शत्रू निर्माण करण्याचा तो मस्तवालपणा म्हणणे भाग आहे. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या किंवा अन्य काही बेछूट आरोपांमुळे युतीला मतदाराने दणका दिला, हा भ्रम आहे. युतीला त्यांच्या मस्तवालपणाने दणका दिला आहे. त्यांच्यातल्याच दुखावलेल्या नाराजांनी युती पक्षांच्या पायात पाय घालून धडा शिकवला आहे. त्यात नवे काहीच नाही. पुर्वी हेच कॉग्रेसच्या बाबतीत व्हायचे. हल्ली भाजपाच्या बाबतीत होऊ लागले आहे. मतदाराला कॉग्रेसच्या मस्तवाल मानसिकतेचा दुसरा पक्ष पक्ष हवा होता, म्हणून जनता भाजपाकडे वळलेली नाही, इतके जरी यातून त्या पक्षाच्या नेतृत्वाल उमजले तरी खुप आहे. अन्यथा त्यांच्या जागी नवा पर्याय उभा करायला मतदार समर्थ असतो, हे विसरता कामा नये. ज्याने सत्तर वर्षात कॉग्रेसला पर्याय म्हणून भाजपा उभारला, तो मतदार भाजपालाही पर्याय निर्माण करू शकतो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. मात्र तो पर्याय कालबाह्य झालेली कॉग्रेस नक्कीच नाही. म्हणून तर भाजपाच्या इतक्या चुका होऊनही कॉग्रेस वा राष्ट्रवादीचे पुनरुत्थान होऊ शकलेले नाही.

बुद्धीजिवी अंधश्रद्धा

abhijit banerjee modi के लिए इमेज परिणाम

कालपरवा नोबेल पारितोषिक मिळालेले अभिजित बानर्जी भारतात आलेले असताना त्यांना अगत्याने आमंत्रण देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावून घेतले आणि त्याचे खास अभिनंदन केले. बानर्जी वंशाने भारतीय असले तरी आज भारताचे नागरिक नाहीत. पण त्यांच्या कार्याचा गौरव करणे मोदींना आवश्यक वाटले. मात्र तेच बानर्जी कधी भाजपाच्या वा संघाच्या विचारांशी सहमत होणारे विचारवंत अभ्यासक नाहीत. म्हणूनच मग इथल्या तथाकथित डाव्या विचारवंतांना बानर्जी यांचे कौतुक असले तर नवल नाही. कारण बानर्जी यांचे कार्य किंवा अभ्यास यापेक्षाही इथल्या विचारवंत डाव्यांसाठी त्यांचे कौतुक हे ते संघ विचारांचे विरोधक असल्यानेच अधिक आहेत. किंबहूना आजकाल आपल्या देशात संघाला उगाच उथळ विरोध करून वा शिव्याशाप देऊन कोणालाही विचारवंत म्हणून प्रमाणपत्र मिळवता येत असते. सहाजिकच बानर्जी यांचे कौतुक स्वाभाविक आहे. मोदींची गोष्ट वेगळी आहे. त्यांना कोणी आपल्या विचारांचा वा समर्थक असण्यापेक्षाही व्यक्तीच्या गुणवत्तेची महत्ता वाटते. म्हणून त्यांनी बानर्जींचा गौरव केलेला आहे. पण अशा प्रसंगातून आपल्या देशातील वैचारिक दिवाळखोरीचे पुरावे मिळत असतात आणि त्याचेच सार्वत्रिक परिणामही बघायला मिळत असतात. आता कालपरवा आलेले एक्झीट पोल व त्यावरील चर्चा बघितल्या, तरी अशा दिवाळखोरीची साक्ष मिळतच असते. देशासमोर इतके भेडसावणारे प्रश्न व समस्या असतानाही सामान्य मतदार भाजपाला, मोदींना वा फ़डणवीसांना मते कशाला देतो? याचेही उत्तर ज्याला शोधता येत नाही, त्याची गणना आपल्या देशात अभ्यासक विचारवंतामध्ये होत असते. असे बहुतांश विचारवंत बौद्धीक अंधश्रद्धेचे बळी असतात. ते समजुतीच्या जगात जगत असतात. म्हणूनच चुकून कधी वास्तव जगात आले, तर त्यांना जगातले वास्तव भयभीत करून सोडते. निवडणूकीचे निकाल किंवा एक्झीट पोल ही तशीच एक वास्तविकता आहे.

उदाहरणार्थ देशाच्या अर्थव्यवस्थेत येऊ घातलेली मंदी किंवा विकासदरात झालेली घसरण, वाढती बेरोजगारी किंवा शेती व्यवसायाची झालेली दैना; ह्या खोट्या वा कपोलकल्पित समस्या अजिबात नाहीत. त्या अभ्यासकांनी मांडल्या व कुठल्या आकडेवारीतून सादर केल्या, म्हणून खोट्या बिलकुल नाहीत. त्या खर्‍याच आहेत. पण त्या समस्या जोपर्यंत जनतेला भावत नाहीत वा भयभीत करीत नाहीत, तोपर्यंत सामान्य जनता त्यावर प्रतिसाद देत नसते. मुंबईच्या गजबजलेल्या वस्त्या व गलिच्छ वस्त्यांमध्ये निम्मेहून अधिक जनता नित्यजीवन मुठीत धरूनच जगत असते. तिला पर्यावरण व त्याचा आरेमधल्या जंगलातील झाडांशी असलेला संबंध समजत नाही. कारण ज्याला असे जाणकार मुंबईचे फ़ुफ़्फ़ूस म्हणतात. त्याची कल्पनाही कधी सामान्य लोकांना जगायला मिळालेली नसते. मानखुर्द वा आणिक अशी चेंबूरच्या पलिकडली जुनी गावे आता वस्त्यांनी गजबजली आहेत. अनेक गलिच्छ वस्त्या हटवताना किंवा जुन्या चाळी सपाट करताना, तिथल्या लाखो लोकांना तिकडे नेऊन टाकलेले आहे. त्यांना कचर्‍याचे ढीग वा तेलशुद्धी कारखान्याच्या परिसरात जगावे लागते. तो परिसर चोविस तास धुराने माखलेला असतो आणि शुद्ध हवा कशाशी खातात, तेही तिथला रहिवासी जाणत नाही. मग त्याला आरेमधील २७०० झाडांमध्ये वसलेले फ़ुफ़्फ़ूस कसे समजावे? त्यामागचे विज्ञान वा शास्त्र ज्याला ठाऊकही नाही, त्याला ती झाडे तोडण्याने होणारे नुकसान समजू शकत नाही. पण मेट्रोमुळे वाहतुकीचे साधन विस्तारले तर प्रवासात होणारी घुसमट कमी होऊ शकेल, इतकेच विज्ञान समजू शकते. कारण ते त्याच्या नित्य जगण्याला भिडणारे असते. म्हणून पर्यावरणाची शुद्धता चुकीची वा खोटी अजिबात नाही. पण अशा विषयात सामान्य माणूस मनाने व शरीराने बधीर झालेला असतो आणि सुखवस्तु स्थितीत नुसते अभ्यास करणारा संभाव्य परिणामांच्या कल्पनेनेही भयभीत होऊन जातो. ही दोन जगातली तफ़ावत आहे.

तफ़ावत कुठे व कशी आहे? दोघेही आपापल्या जागी योग्यच आहेत आणि खरेही आहेत. पण एकाला प्रसिद्धीचा झोत मिळतो आणि म्हणून त्याला विचारवंत वा संवेदनशील मानले जाते. उलट ज्याला प्रसिद्धीच मिळत नाही, त्याचे मत दबलेले रहाते. कारण दोघांच्या आयुष्यातील वस्तुस्थिती भिन्न असते. पण यातला अधिक वास्तववादी सामान्य माणुस असतो. तो वास्तव अनुभवातून आपल्या समस्या निश्चीत करतो आणि त्याचे प्राधान्य निवडून त्यानुसार निर्णय करीत असतो. उदाहरणारर्थ मेट्रोमुळे त्याला गाडीतली गर्दी कमी होईल आणि वाहतुकीची सुविधा अधिक सुटसुटीत होईल हा दावा लौकर पटतो. एकूण मुंबईची हवा शुद्ध असण्यापेक्षाही त्याच्या जगण्याशी संबंधित असलेल्या परिसरातील हवा घुसमटण्यासारखी नसली, तरी त्याच्या पर्यावरणाची शुद्धता पुर्ण होत असते. कारण त्याचे जग जगण्यात असते आणि अभ्यासक किंवा त्यांच्या अहवालाने भारावून जाणार्‍यांचे जग कागदोपत्रात सामावलेले असते. घुसमटलेल्या व्यक्तीला मोकळा श्वास घेता आला तरी वातावरण शुद्ध झाले असेच वाटणार. उलट ज्यांना घुसमटणेच ठाऊक नाही, त्यांना नुसते अहवाल किंवा अभ्यासाचा डेटा बघूनही गुदमरल्यासारखे वाटणार. ही दोन समाज घटकातील खरी तफ़ावत आहे. त्यामुळे दोघांना भेडसावणार्‍या समस्या एकदम भिन्न आहेत. एकदा हा भेद समजून घेतला, मग मतदान करणारा सामान्य नागरिक कसा विचार करून आपले मत बनवतो आणि कशा कलाने दान करतो, त्याचा अंदाज येऊ शकेल. त्याला भिडणार्‍या समस्यांचा उहापोह भाजपा करीत असेल आणि बाकीचे पक्ष व त्यांचे नेते केवळ अहवालाचे आधार घेऊन समस्यांचा गदारोळ करीत असतील, तर मतांचा कौल विरोधातच जाणार ना? या विधानसभा निवडणुकीत खर्‍या भेडसावणार्‍या प्रश्नांची चर्चाच झाली नाही, असे आता विविध संपादक. अभ्यासक व विरोधी नेतेच सांगत आहेत. पण ती चर्चा करण्यापासून त्यांना कोणी रोखले होते? त्यांनी जे प्रश्न वा समस्या लोकांसमोर मांडल्या किंवा ज्याप्रकारे मांडल्या, त्यांचा सामान्य जनतेच्या जीवनाशी काडीमात्र संबंध नव्हता ना?

मंदी वा बंद पडणारे कारखाने किंवा उद्योग यांचा जनतेच्या प्रत्यक्ष जीवनावर होणारा परिणाम कितीसा उलगडून समजावला गेला? इतके हजार वा इतके लाख रोजगार गेले वा आत्महत्या झाल्या, असे आकडे फ़ेकून चालत नाही. त्याला थेट जीवनातील अनुभवाशी जोडायला हवे. ते काम सत्ताधारी पक्ष करीत नसतो. खरी ती विरोधकांची जबाबदारी असते. जिथे तुम्ही प्रचाराला जाता, तिथल्या आसपासच्या गावातील आत्महत्या, बेरोजगारी वा उपासमारी यांची उदाहरणे देऊन असे प्रश्न मतदाराच्या मनावर बिंबवले; तर त्याचा परिणाम होत असतो. त्याच्या उलट मेट्रोचे हायवेचे सर्वत्र उभे रहाणारे जाळे किंवा काही हजार लाख लोकांपर्यंत पोहोचलेल्या सरकारी योजनांचे लाभ; सत्ताधारी सांगत गेले. त्यातला कोणीतरी लाभार्थी आसपास असेल, तर तो मुद्दा प्रभावी ठरत असतो. पण हे लक्षात यायला जनतेशी संपर्कात रहावे लागते आणि तिच्या सुखदु:खात सहभागी व्हावे लागते. तिथूनच खरी माहिती मिळते आणि ती प्रभावी ठरू शकते. उलट विविध अहवाल, आकडे यातून जनतेशी फ़ारकत होऊन जाते. त्या अंधश्रद्धा असतात. कारण ती माहिती कितीही दाहक असली तरी जनतेला भावणारी नसते, तर विचारवंत अभ्यासकांना चिंतीत करणारी असते. असे जाणकार त्यावर भानाविवश होऊन बोलतात आणि त्यांना ज्या समस्या वाटतात, त्याच जनतेच्या समजून बोलतात, मांडतात. त्यातून एक तुटलेपण येत असते व हळुहळू असे पक्ष, विचारवंत किंवा चळवळी सामान्य जनतेपासून दुरावत जातात. त्यांचा अभ्यास वा आकडेवारी ही अधश्रद्धा असल्याप्रमाणे काम करू लागते आणि सामान्य जनता मतदार त्यांच्यापासून चार हात दुर होतो. कारण त्यांनी कथन केलेले सत्य असले तरी ते सामान्य जनतेच्या नित्य जीवनातील वास्तव नसते आणि म्हणूनच लोक त्यांच्यापासून अलिप्त होत जातात. त्यांच्यावर आंधळी श्रद्धा ठेवून राजकारण करणारेही मग अंधश्रद्ध असल्यासारखे एकाकी पडत जातात, फ़सत जातात.


Sunday, October 27, 2019

एकलव्याची गोष्ट

Image result for fadnavis cartoon

विधानसभा निवडणुका ऐन भरात आल्या आणि प्रचाराचा अंतिम टप्पा गाठला गेला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस आणि शरद पवार यांच्यात थेट जुंपलेली होती. त्यात फ़डणवीसांनी एक विधान केले होते. आमचे मल्ल अंगाला तेल लावून तयार आलेत आणि आखाड्यात लढायला कोणीच नाही. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले होते, कुस्ती ‘तशांची’ लढता येत नाही. ते बोलताना पवारांनी तृतियपंथी व्यक्तीमत्वाचा सूचक इशारा केला होता. त्यासाठी आपण कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असल्याचाही दावा केला होता. त्यावरून खुप चर्चा झाली. पण फ़डणवीसांना आखाड्यात लढत कुठल्या मल्लाशी आहे, ते निकालापर्यंत कळलेले नव्हते आणि पवारांना नेमके तेच ठाऊक असल्याने त्यांनी पावसात भिजूनही शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे प्रदर्शन मांडलेले होते. आपण जिंकणार नसून जिंकल्याचा आभास निर्माण करू शकतो, हे त्यांचा अनुभवच त्यांना सांगत होता. तर अननुभवी फ़डणवीसांना खरा मल्ल जवळ असूनही बघता आलेला नव्हता. तो कोणी परका नव्हता, तर त्यांच्याच पक्षातला वा युतीतला नाराज वा बंडखोर नावाचा होता. त्याने दगाफ़टका केला तरी चितपट केल्याचा विजय फ़डणवीस मिळवू शकत नव्हते आणि आपोआप कुस्ती बरोबरीत सुटल्याचा निकाल येणार होता. आखाड्यात उतरल्यावर अंगाला नुसते तेल लावून वा माती अंगाला लावून भागत नाही. त्यात डाव महत्वाचा असतो, तितकाच समोरच्याने टाकलेला पेच उधळून लावण्याला महत्व असते. इथे पवारांनी डाव टाकल्याचा आव जरूर आणला होता. पण पेच अजिबात टाकलेला नव्हता. पेच फ़डणवीसांच्याच गोटातून टाकलेला होता आणि त्यांना तो ओळखताही आलेला नव्हता. भाजपा शिवसेनेतील बंडखोरीच त्यांना मोठे यश मिळवण्यासाठी रोखणार आहे, हे आखाड्यात असूनही मुख्यमंत्र्यांना ओळखता आले नाही. पण अनुभवातून गेलेले असल्याने पवारांना समजू शकले होते. नुसते आखाड्यात उभे राहिले तरी कुस्ती बरोबरीत सुटल्याचा आभास उभा रहाणार, याची त्यांना खात्री होती आणि झालेही तसेच. बंडखोरांनी सत्ताधीशांच्या पायात पाय घालून पाडले आणि समोरचा मल्ल नुसता उभा राहिला म्हणून कुस्ती झाल्याशिवाय बरोबरीत सुटल्याचा निकाल समोर आला.

फ़डणवीसांना आपल्या पक्षातले वा युतीतले बंडखोर किती नुकसान करू शकतील, याचे आकलन झाले नाही. किंबहूना ती बंडखोरी रोखण्याची गरज वाटली नाही, हा राजकारणातला कच्चा दुवा होता. त्याहीपेक्षा लोकसभेत इतके मोठे यश मिळवल्यानंतर प्रतिपक्षातून आमदार फ़ोडून आणण्याची गरज नव्हती. मराठीतली एक म्हण आहे. घरचं झालं थोडं आणि व्याह्यानी पाठवलं घोडं. इथे आणखी विचीत्र परिस्थिती होती. गेल्या विधानसभेत युती मोडल्याने दोन पक्षांत आलेले वितुष्ट संपलेले नव्हते. दोनशेहून अधिक मतदारसंघात आपापले उमेदवार सज्ज ठेवण्यात आलेले होते. त्या वितुष्टाला आधीच्या चार वर्षात सतत खतपाणी घालण्यात आलेले होते. अशा इच्छुकांनी युती झाल्यावर आपल्या तलवारी निमूट म्यान कराव्यात, ही अपेक्षा असू शकते. पण खात्री कोणी देऊ शकत नाही. म्हणजेच नुसती युती व जागावाटप केल्यावरही शिवसेना व भाजपामध्ये बंडखोरीचे तुफ़ान येणार, हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना समजायला हवे होते. त्यामुळे आपल्याच इच्छुकांच्या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याची वेळ समोर होती आणि इतर पक्षातून अधिकचे भागिदार त्यात आणले गेले. त्यातून अधिकाधिक बंडखोरी होण्याला पोषक स्थिती सत्ताधारी युतीनेच निर्माण केलेली होती. तेही कमी म्हणून आपापल्या जागा व उमेदवार अखेरच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवून संकटात भर टाकली गेली. अशा बंडखोरीतून काय उदभवते, हे पवारांनी पंचवीस वर्षापुर्वी अनुभवलेले होते आणि तेव्हा प्रथमच महाराष्ट्रात युतीला सत्ताही दिलेली होती. कॉग्रेसचे मुख्यमंत्री व प्रमुख नेता म्हणून पवारांनी अनेक नावडत्यांना दिल्लीच्या आग्रहास्तव पक्षाचे तिकीट दिले आणि आपल्या विश्वासूंना तिथे बंडालाही प्रोत्साहन दिलेले होते. त्यात ३८ बंडखोर निवडून आले आणि कॉग्रेस बहूमताला वंचित होऊन ८० इतकी खाली घसरली. त्याचीच याहीवेळॊ पुनरावृत्ती झाली. मात्र तितके नुकसान झाले नाही. १९९९ सालात पवारांनी वेगळी राष्ट्रवादीची चुल मांडली, तेव्हा त्या बंडखोर अपक्ष आमदारातले बहुतांश त्यांच्या नव्या पक्षात दाखल झाले होते. पण त्यातून बेजार झालेली कॉग्रेस पुन्हा कधी सावरली नाही. त्याचीच पुनरावृत्ती युतीच्या नेत्यांनी यावेळी केली आणि एकमेकांना न मिळालेल्या जागी बंडखोरांना उभे करून आपलीच संख्या घटवण्याचा डाव छान खेळलेला होता.

१९९५ सालात पवारांनी बंडखोरीला उत यावा, असेच डावपेच इतके बेमालून खेळले होते, की तिथे विलासराव देशमुखांचाही बालेकिल्ल्यात पराभव झालेला होता. यावेळी सेना भाजपाचाही आपल्या अनेक बालेकिल्ल्यात तसाच पराभव झालेला आहे. मुद्दा इतकाच की फ़डणविसांना आपल्या समोरचा मल्ल दिसत नव्हता, कारण समोर खरेच कोणी मल्ल नव्हता. ज्याच्याशी खरी झुंज द्यायची होती, तो दगाफ़टका करायला त्यांच्याच पाठीशी बंडखोर म्हणून तयारीत उभा होता. तो दिसायचा कसा? पण समोरच्या पवारांना तो दिसत होता. म्हणून त्यांनी त्या बंडखोरीचा जितका लाभ उठवता येईल, तितका उठवण्याचा आतापीटा केला. त्याचा लाभही त्यांना पन्नाशी ओलांडून मिळू शकला. पण कुस्ती जिंकणे शक्य झाले नाही. कारण ते अशक्य असल्याची त्यांनाही खात्री होती. म्हणून तर मतदान उरकून आल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अतिशय सुचक विधान केलेले होते. ‘निवडणूक एकतर्फ़ीच होणार नाही, याची आपण काळजी घेतली’ असे पवार म्हणाले, त्याचा अर्थ विजयाची त्यांनी अपेक्षाही केली नव्हती. पण फ़डणवीस म्हणतात वा समजतात तितका सहज विजय त्यांनाही मिळणार नव्हता, हे ओळखूनच लढण्याचा आवेश पवारांनी दाखवला होता. फ़डणवीस वा उद्धव ठाकरे उत्साहात ज्या चुका करीत  होते, त्या ओळखुनच पवारांनी सावधपणे आपला पवित्रा घेतला होता. झुंज दिल्याशिवाय कुस्ती बरोबरीत सुटण्याचा फ़ायदा घेण्यातला मुरब्बीपणा मान्य करावाच लागेल. जिंकण्याची शक्यता नसते, तेव्हा बरोबरी सुद्धा विजय मानला जातो. त्यामुळेच दणदणित विजयाची शक्यता असताना बरोबरीपर्यंत युतीला खाली यावे लागले, तो पराजय मानला गेला. युतीने २३ जागा गमावल्या आणि तितक्या आघाडीला जादा जिंकता आल्या नसतील तर तो आघाडीचा विजय कसा ठरू शकेल? सत्ता युतीकडेच राहिली व बहूमताचा आकडाही घटला, तरी बहूमत टिकलेच ना? हरलो नसल्याचा आनंदोत्सव करण्याची संधी आघाडीला व पवारांना मिळालीच. विराट कोहलीच्या शतकाचे कौतुक होण्यापेक्षा हुकलेल्या शतकाची निर्भत्सना अधिक होते. उलट दिर्घकाळ चांगली खेळी न केलेल्या रोहित शर्माच्या शतक द्विशतकाचे गुणगान अधिक होते. त्यापेक्षा परवाच्या निकातातले कौतुक व टिकेमध्ये फ़ारसा फ़रक नाही.

जी स्थिती आज फ़डणवीसांची आहे त्यापेक्षा वाईट स्थितीत १९९० सालात शरद पवार होते. चार वर्षापुर्वी त्यांनी समाजवादी कॉग्रेसचा गाशा गुंडाळून कॉग्रेसमध्ये घरवापसी केलेली होती. मुळात आधीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सर्व पक्षाची पुलोद नावाची मोट बांधून ५५ पेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या आणि तरीही वसंतदादांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसने विधानसभेत १६२ जागांसह बहूमत मिळवलेले होते. अशा कॉग्रेसमध्ये १९८६ सालात पवार आपल्या पन्नासहून अधिक आमदारांसह सहभागी झाले. त्यामुळे १९९० सालची विधानसभा निवडणुक समोर आली असताना, कॉग्रेसच्या गोटात २२० पेक्षा अधिक आमदार होते आणि नंतर पक्षात आलेल्या पवारांकडेच पक्षाचे नेतृत्व होते. पण काही महिने आधी झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना भाजपा युती व जनता दलातर्फ़े जागावाटपाचा समझोता होऊन त्यांना मोठे यश मिळालेले होते. त्याचा फ़टका विधानसभेत आपल्याला बसेल, हे ओळखून पवारांनी रिपब्लिकन ऐक्य झालेल्या दलित मतांमध्ये फ़ुट पाडण्याचे डाव खेळले आणि त्यातल्या आठवले गटाल सोबत घेतले होते. इतकी त्यांना युतीच्या मतांची व शक्तीची धडकी भरलेली होती. प्रथमच कॉग्रेसने आघाडी करून आठवले गटला सोबत घेतले आणि तरीही पवारांच्या नेतृत्वाखाली बलवान कॉग्रेसला बहूमत गमवावे लागलेले होते. २२० हून अधिक आमदार संख्या असलेल्या कॉग्रेसला पवारांनी तेव्हा १४१ इतके खाली आणून दाखवले. फ़डणवीसांनी अल्पमताचे सरकार २०१४ अखेरीस बनवले आणि नंतर त्यात शिवसेना सहभागी झाली. त्या दोघांच्या आमदारांनी परस्पर विरोधात लढून संख्या १८५ होती आणि आज १६२ इतकी झाली आहे. २९ वर्षापुर्वी तशीच स्थिती पवारांची होती. आपल्या आमदारांसह ते कॉग्रेसमध्ये १९८६ सालात दाखल झाले, तेव्हा त्यांच्याशिवाय कॉग्रेस बहूमतात होती. पण चार वर्षात आलेल्या विधानसभा निवडणूकीत पवारांनी कॉग्रेसला २२० वरून १४१ इतके खाली आणून दाखवण्याची किमया केलेली होती. पण पवार आजच्या इतकेच तेव्हाही नशिबवान होते. पुरोगामी माध्यमांना त्यांच्या त्या दारूण पराभवातही मुरब्बीपणा दिसला होता आणि आज कुठलेही लक्षणिय परिवर्तन झाले नसताना पवारांच्या पराभवातही किमया दिसतेच आहे. पण १८५ वरून १६२ इतकी नगण्य घसरण होऊनही फ़डणवीस मात्र टिकेला पात्र आहेत.

मुद्दा कोण किती काय गमावून बसला असा असेल तर १९९० सालात मुरब्बी अनुभवी पवारांनी ८० आमदार गमावण्यात मोठा पराभव होता आणि अननुभवी फ़डणवीस यांनी पाच वर्षात २३ आमदार गमावण्यात नगण्य पिछाडी आहे. पण पटकथा लेखकामध्ये नायक खलनायक रंगवण्याचे अधिकार सामावलेले असतात. तो पराभवालाही विजयाचे रुप देऊ शकणारा कलाकार असतो आणि विजयालाही पराजयाची नामुष्की सिद्ध करू शकत असतो. पवार १९७२ सालात मंत्री व १९७८ सालात मुख्यमंत्री झाले. त्यांचा दांडगा अनुभव १९९० च्या निवडणूकीत पाठीशी होता आणि देवेंद्र यांच्या पाठीशी प्रशासनाचा फ़क्त पाच वर्षाचाच अनुभव होता. पण तो पडला एकलव्य. आधुनिक द्रोणाचार्यांचा नावडता नाकारलेला विद्यार्थी. त्यामुळे त्याने कितीही उत्तम नेमबाजी दाखवली, तरी त्याच्याकडे अंगठा कापून मागला जाणे स्वाभाविकच आहे. आपला अर्जुन वा त्याचे अपयश झाकण्यासाठी एकलव्याचा बळी घेण्यालाच तर महाभारत म्हणतात. तो पक्षपात करणारे तर द्रोणाचार्य वा आचार्य बुद्धीमंत मानले जातात. म्हणून तर १९९० सालात बहूमत गमावणारे पवार किमयागार असतात. आज इतके भिजून व इडीचा गाजावाजा करूनही ४१ ते ५४ गाठणारे पवार महान योद्धा असतात. पण तारेवरची कसरत करीत पाच वर्षे सरकार चालवणारा वा युतीतून बहूमताचे आकडे टिकवणारा देवेंद्र अपयशी ठरवला जाऊ शकतो. कारण स्पष्ट आहे. कसोटी एकलव्याची होत असते, अर्जुनाची नाही. अर्जुन लाडका असतो. निकष वगैरे झुट असतात. सर्व निकष पटकथा लेखकाच्या इच्छेनुसार बदलत असतात. केंद्रीय वा राज्यातलाही कोणी नेता सगळीकडे न फ़िरता कॉग्रेसला मिळालेल्या जागा खर्‍या पक्षीय ताकदीचा पुरावा आहे. पण त्याही पक्षाची तितकीच निर्भत्सना चालू आहे. उलट सहानुभूतीचा वाडगा घेऊन इतका आटापिटा करूनही पन्नाशीच्या पाढ्यातच अडकून पडले, तरी गुणगौरव पवारांचाच होणार. कारण ती श्रींची इच्छा असते. आणि अशा कथानकात पटकथा लेखक हाच ‘श्री’ असतो. ज्याला आधुनिक जमान्यात प्रसार माध्यम अशा नावाने ओळखले जाते. अर्थात त्यामुळे भाजपा, त्यांचे श्रेष्ठी, त्यांचे तथाकथित डावपेच वा फ़डणवीसांच्या चुका यावर पांघरूण घातले जाऊ शकत नाही. त्याचा समाचार पुढल्या भागात घेऊ. आज उठलेल्या भुलभुलैयाच्या धुरळ्याला खाली बसवण्याला प्राधान्य आहे.

एकाच वर्गात ४० वर्षे

Image result for bal thackeray cartoon on sharad pawar

जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणतात. हे सामान्य लोकांच्या बाबतीत किती खरे आहे ठाऊक नाही. पण राजकीय नेते व विश्लेषकांच्या बाबतीत नक्कीच खरे आहे. कारण दिसणारी घटना वा घटनाक्रम एकच असला, तरी त्याचे प्रत्येक पक्ष व अभ्यासकाकडून होणारे वर्णन भिन्न असते. तसे नसते तर दोन विधानसभांच्या निकालानंतर वेगवेगळ्या टोकाच्या प्रतिक्रीया आपल्याला बघायला व ऐकायला मिळाल्या नसत्या. अर्थातच या प्रतिक्रीया प्रामुख्याने विविध पक्षांनी निवडणूकपुर्व असे दावे केले, त्याच्या संदर्भाने दिल्या जातात. किंवा त्यांच्या आजवरच्या कारवाया कारभाराचा आधार घेऊन व्यक्त केल्या जातात. त्याखेरीज ज्या जागा जिंकल्या वा गमावल्या, त्यापुरत्या प्रतिक्रीया वा विश्लेषण मर्यादित रहाते. त्यामुळे नंतरच्या काळात होणार्‍या निवडणुका किंवा वाटचाल, यांच्या बाबतीत अशा प्रतिक्रीयांचा काहीही उपयोग होत नाही. त्या तात्कालीन ठरतात आणि पुढल्या काळातले राजकारण भलत्याच दिशेने सरकताना दिसते. आताही दोन दिवसात ज्या प्रतिक्रीया आलेल्या आहेत, त्यापैकी किती वास्तववादी आहेत, त्याची भिंगातून तपासणी करावी लागेल. कारण एकूण सुर असा आहे, की भाजपाला हरयाणा व महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यातल्या जनतेने नाकारलेले असावे. पण वस्तुस्थिती भिन्न असते. आपल्या निवडणूक पद्धतीमध्ये सर्वाधिक मते मिळवणारा जिंकत असला, म्हणून त्याला अर्ध्याहून अधिक मतदाराने स्विकारले असे गृहीत असते. वास्तवात त्याला अर्ध्याहून अधिक मतदारांनी नाकारलेले असते. पण तोही दावा सोयीस्करपणे केला जातो. अन्यथा आधीची पाच वर्षे मोदींना ३१ टक्के मतांचा पंतप्रधान म्हणून कशाला हिणवले गेले असते? कारण तोच निकष लावायचा तर मनमोहनसिंग २५ किंवा २७ टक्क्यांचे पंतप्रधान होते आणि मायावती किंवा अखिलेशही ३० टक्क्याहून कमी मतांचेच मुख्यमंत्री होते. पण युक्तीवाद हे सत्य नसते, ती सोय असते.

गेल्या दोन दिवसांपासून सगळ्या निकालांचे श्रेय शरद पवार यांच्या ‘इडीला वा पावसात भिजण्याला’ दिले जात आहे. पण व्यवहारात राष्ट्रवादीची मते किती वाढली वा घटली; याची चर्चा होणार नाही. कारण ते आकडे सोयीचे नसतात. सोय असते जागांच्या संख्येची. मोदींच्या जागा मोजायच्या नसतात आणि पवारांचे टक्के मोजायचे नसतात. उदाहरणार्थ भाजपाच्या १२२ जागा होत्या आणि यावेळी अवघ्या १०५ जागाच टिकवता आल्या. तर राष्ट्रवादीच्या ४१ जागा होत्या आणि यावेळी ५४ जागा आल्या. पण त्या दोन्ही पक्षांना मिळालेली मतांचे प्रमाण किती आहे? शरद पवारांच्या त्या पावसात भिजण्याने लोक इतके गहिवरले असते, तर निदान एक तरी टक्का मतांमध्ये वाढ व्हायला हवी होती ना? तसेच भाजपाला लोक नाकारत असतील, तर त्यांच्या पुर्वीच्या मतांमध्ये लक्षणिय घट दिसायला हवी होती ना? वास्तवात जे प्रारंभिक आकडे समोर आलेले आहेत, त्याकडे बघता सर्व चार प्रमुख पक्षांच्या मतांमध्ये घट झालेली आहे. सर्वात मोठा भाजपा नुसता जागांमुळे झालेला नाही, त्याला २५.७ टक्के मते मिळालेली आहेत आणि २०१४ च्या तुलनेत त्याचा मतांमध्ये २.१ टक्का घट झालेली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जागा १३ वाढल्या, पण २०१४ च्या तुलनेत त्याला अर्धा टक्का मते गमवावी लागलेली आहेत. २०१४ मध्ये १७.२४ टक्के असलेली राष्ट्रवादीची मते यंदा १६.७ टक्के इतकी झालेली आहेत. तेच शिवसेनेच्याही बाबतीत झालेले आहे. तेव्हा सेनेला १९.३५ टक्के मते होती आणि आज १६.४१ टक्के मते मिळालेली आहेत. म्हणजेच सेनेची तीन टक्के मते घटलेली आहेत. कॉग्रेसला २०१४ मध्ये १७.९५ टक्के मते होती आणि आता १५.९० मते मिळालेली आहेत. म्हणजेच कॉग्रेसचीही दोन टक्के मते घटलेलीच आहेत. ही सगळी मते गेली कुठे? किंबहूना त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे कुठल्याही पक्षाला मतदाराने सोडलेले नाही. तर प्रत्येकाला धडा शिकवलेला आहे. पण तो सांगायचा, तर आपल्या लाडक्याचे अपयश कुठे लपवायचे? म्हणून मग सगळी चर्चा जिंकलेल्या हरलेल्या जागांभोवती केंद्रीत करायची असते.

२०१४ सालात युती तुटल्यावर अर्ध्या तासात आघाडीही मोडण्यात आलेली होती. त्याचा फ़टका दोन्ही कॉग्रेसला बसला. असे होणार हे न कळायला शरद पवार हा दुधखुळा माणूस नाही. कारण आघाडी मोडण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता आणि भाजपाने शिवसेनेशी युती मोडावी, या सौद्यानुसारच नंतर आघाडी मोडली गेलेली होती. इतके करूनही भाजपा बहूमतापर्यंत पोहोचला नाही, तेव्हा निकाल पुर्णपणे हाती येण्याआधीच पवारच भाजपाला सरकार बनवण्यासाठी बाहेरून पाठींबा द्यायला पुढे सरसावले होते. मग आजचा त्यांचा भाजपा विरोध किती खरा मानायचा? तेव्हा आघाडी मोडली नसती, तर दोन्ही कॉग्रेसच्या एकत्रित मतांच्या बेरजेने आघाडीच सत्तेत येऊ शकली असती. पण पवारांना आघाडी सत्तेत नको आणि भाजपाच सत्तेत हवी होती. म्हणून त्यांनी आघाडीत मोडता घातला आणि कॉग्रेसलाही तोंडघशी पाडले. अन्यथा दोन्ही कॉग्रेसच्या बेरजेसमोर भाजपाला १२२ चा पल्ला एकट्याच्या बळावर गाठता आलाच नसता. कारण तेव्हा दोन्ही कॉग्रेसच्या मतांची बेरीज  ३५ टक्के मतांच्याही पुढे होती आणि भाजपाला स्वबळावर मिळालेल्या मतांची टक्केवारी २७.८१ टक्के होती. मोडलेल्या युतीसमोर लढताना कॉग्रेस आघाडी आरामात बहूमत घेऊन चौथ्यांदा सत्तेत आली असती आणि फ़डणवीस मुख्यमंत्रीही होऊ शकले नसते. पण उचापत आपण करायची आणि नंतर ती उचापत निस्तरण्याचे श्रेयही आपणच घ्यायचे; असे एकूण शरदीय राजकारण असते. आज पवार पावसात भिजून भाषणे करतात, त्याचे श्वास रोधून कौतुक करणार्‍यांनी, तेव्हा पाच वर्षापुर्वी आघाडी मोडून पवारांनी भाजपा कशाला वाढवला होता, हा प्रश्न कशाला विचारला नाही. जर तेव्हा ती चुक केली नसती, तर आज पावसात भिजण्याची वेळ कशाला आली असती? आधी भाजपाला शिरजोर करायचे, त्यालाच खतपाणी घालायचे आणि परत आपणच त्याचे निर्दालन करू शकतो; म्हणूनही पाठ थोपटून घ्यायची. अशी पाठ थोपटणार्‍या बुद्धीमंताच्या अकलेचेही कौतुक करावे तितके थोडेच आहे. मात्र ज्याला भाजपा म्हणतात, तो आता पवारांच्या आवाक्यात राहिलेला नाही, हे निखळ सत्य आहे.

कारण तेव्हा संपादन केलेले राजकीय यश भाजपाने जोपासले आहे आणि टिकवूनही ठेवलेले आहे. त्याच्या जवळपास जाण्याइतकी मते पवारांना मिळवता आलेली नाहीत, की जागाही गाठता आलेल्या नाहीत. दोन्ही कॉग्रेसच्या एकत्रित जागा १०४ होतात आणि एकटा भाजपा १०५ जागांपर्यंत आजही पोहोचला आहे. आणि ऐंशी वर्षाचे पवार कुठे आहेत? कधीपासून पवार स्वबळावर शंभरी गाठायला धडपडत आहेत? युती करूनही आज भाजपाने शंभरी पार केली आहे. पवारांना अर्धशतकाचे राजकारण करताना आपल्याच राज्यात कधी प्रमुख पक्ष होण्यापर्यंत मजल मारता आली आहे काय? योगायोगाने भाजपाने आपल्या स्थापनेनंतर लढवलेली पहिली निवडणूक १९८० सालची होती. कारण जनता पक्षातून पुर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी बाजूला होऊन या पक्षाची १९८० च्या आरंभी स्थापना केली. तेव्हाही पवार कॉग्रेसपासून बाजूला होऊन समाजवादी कॉग्रेस नावाचा पक्ष राज्यात चालवित होते. इंदिराजींनी १९८० सालात जनता पक्षाचा बोजवारा उडवून पुन्हा देशाची सत्ता काबीज केली; तेव्हा पवार जनता पक्षासह पुलोद नावाची आघाडी चालवित होते. कॉग्रेसच्या हाती सत्ता नसलेल्या राज्यातल्या विधानसभा इंदिराजींनी एक वटहुकूम काढून थेट बरखास्त करून टाकल्या. त्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या आणि तेव्हा पवार पुलोद नावाचा खेळ रंगवित होते. त्यांना आघाडी करून त्या विधानसभेत किती जागा जिंकता आल्या होत्या? त्यावेळी समाजवादी कॉग्रेस म्हणून पवारांनी ५५ च्या आसपास आमदार निवडून आणलेले होते आणि आता ३९ वर्षानंतर पुन्हा उतारवयात तशीच झुंज देऊन ५६ आमदार निवडून आणलेले आहेत. एकूण राजकारण अभ्यासले, तर आज पवार कुठे पोहोचले आहेत? ५५ पासून ५६ पर्यंत किती जबरदस्त भरारी आहे ना? कौतुक अशा भरारीचे करावे. भाजपाचे काय? त्याच चार दशकात १५ पासून १०५ वर गाडी अडली म्हटल्यावर पराभवच ना?

तपशील सोडला तर कुठलाही भुलभुलैया उभा करता येत असतो. फ़रक इतकाच, की तेव्हा म्हणजे १९८० सालात जुन्या जनसंघाचे भाजपात रुपांतर झालेले होते आणि त्यातला त्यांचा जवळपास कोणीही नेता आज राजकारणात उरलेला नाही. पण स्थापनेपासून अवघ्या काही महिन्यातच ती विधानसभेची निवडणूक लढवताना भाजपाला १५-१६ जागा कशाबशा मिळालेल्या होत्या. पवारांच्या समाजवादी कॉग्रेसला ५५ आमदार मिळालेले होते. तेच पवार आज राष्ट्रवादी म्हणून ५६ आमदारांवर आहेत आणि तोच भाजपा आज १०५ आमदारांपर्यत पोहोचला आहे. कौतुक कसले व कोणाचे करायचे? ज्या वयात किती पावसाळे बघितले, म्हणून नवोदितांना अनुभव सांगायचे. तेव्हा पवार पावसात भिजून भाषण करतात आणि ५६ आमदार निवडून आणतात. किती मोठा पराक्रम आहे ना? तेव्हा तर बंगालच्या ममता बानर्जी राजकारणात आल्या नव्हत्या, किंवा चंद्राबाबूंचा तेलगू देसम पक्ष स्थापनही झालेला नव्हता. आणखी मजेची गोष्ट म्हणजे शिवसेना हा पक्ष मुंबई ठाण्यापलिकडे फ़ारसा पसरला नव्हता आणि पुणे नाशिकातही त्याचे नगण्य अस्तित्व होते. मुंबई महापालिकाही एकट्याने  जिंकण्याचा मनसुबा सेनेने कधी बाळगलेला नव्हता. तिथून आज सेना कुठवर पोहोचली आहे? आज बाळासाहेब हयात नाहीत आणि त्यांच्या अनुपस्थितीत उद्धव ठाकरे सात वर्षे सेनेची सुत्रे हलवित आहेत. त्यातूनही राज ठाकरे बाजूला झाले व त्यांनी वेगळी चुल मांडलेली आहे. अशा सेनेलाही आज ५७ आमदार निवडून आणणे शक्य झाले आहे आणि पवार कुठे आहेत? ३९ वर्षानंतरही पवार पन्नाशीत अडकून बसले आहेत. त्यासाठीही कॉग्रेस किंवा अन्य पुरोगामी पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत. कौतुक अशा दिग्गजांचे करावे. जग इथले तिथे होऊन गेले आणि पवार मात्र पन्नाशीत अडकून पडले आहेत. गेल्या खेपेस एकट्या बळावर उद्धव ठाकरे यांनीही ६३ आमदारांचा पल्ला गाठून दाखवला. पवारांना तितके स्वबळ कधी सिद्ध करता आले आहे काय? मोजपट्टी कुठली असते? पावसात भिजण्याची की आमदार खासदार निवडून आणण्याची?

कॉग्रेस सोडून आपली वेगळी चुल मांडणारे पवार एकटेच नेता नाहीत. ममता बानर्जी. जगनमोहन रेड्डी असे अनेक आहेत. त्यानी आपापल्या राज्यात किती मोठा पल्ला गाठला आहे? त्याचे भान तरी पवार प्रशंसकांना आहे काय? बंगालमध्ये डाव्यांशी कॉग्रेस समर्थपणे लढत नाही, म्हणून तृणमूल या नव्या पक्षाची स्थापना ममता बानर्जींनी केली. त्यांच्याशी तरी शरद पवार यांची तुलना होऊ शकते काय? त्यांनी १९९८ सालात प्रथमच वेगळा पक्ष स्थापला आणि पवारांप्रमाणेच त्यांच्याभोवती कॉग्रेसचे कंटाळलेले कार्यकर्ते दुय्यम नेते एकत्र येत गेले. २००६ सालात त्यांनी बंगालमध्ये विरोधी पक्ष होण्यापर्यंत मजल मारली आणि २०११ सालात त्या थेट बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांची किमया छोटी नव्हती. सलग ६ विधानसभा जिंकणार्‍या डाव्या आघाडीला कोणी पाडू शकत नसल्याचा सिद्धांत ममतांनी मोडीत काढला. एकहाती विधानसभेत बहूमत संपादन केले. २०१६ मध्ये तर त्यांनी अधिक बहूमताने विधानसभा जिंकली आणि आज बंगालमधून डावी आघाडी नामशेष होऊन गेली आहे. २००४ सालामध्ये आंध्रप्रदेशात राजशेखर रेड्डी या कॉग्रेस नेत्याने पवारांप्रमाणेच विविध पक्षांची आघाडी करून चंद्राबाबूंच्या तेलगू देसमकडून सत्ता हिसकावून घेतली आणि २००९ सालातही एकट्या कॉग्रेसच्या बळावर पुन्हा बहूमत संपादन केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचाच सुपुत्र मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून कॉग्रेसमधून बाजूला झाला आणि २०१९ पर्यंत संघर्ष करत राहिला. त्यालाही दहा वर्षात आपल्या एकट्याच्या बळावर आज आंध्रामध्ये बहूमत संपादन करता आलेले आहे. पवारांच्या तुलनेत ममता किंवा जगनमोहन ही कालची पोरे आहेत. पण त्यांच्यात जितका संयम व मुरब्बीपणा आहे, तितके पवार कायम उतावळे राहिले आहेत. त्यांना राज्यातही आपला ठसा उठवता आला नाही आणि नुसत्या कसरती व कोला<ट्या उड्या मारण्यात पन्नास वर्षाचा कालावधी उलटून गेला. आज पुन्हा त्यांचे पावसात भिजणे ज्यांना कौतुकाचे वाटते, त्यांच्या बुद्धीची कींव करावी तितकी थोडी आहे.

१९८० साली ५५ आमदार आणि २०१९ साली पुन्हा ५६ आमदार निवडून आणण्याचा अर्थ काय? एकाच वर्गात मुलगा चाळिस वर्षे बसला आणि अन्य शेजारपाजारची मुले मात्र शाळा कॉलेज करून परदेशात पोहोचली. तरी मातापित्यांना आपल्या पोराचे गुणगान करण्याखेरीज पर्याय सुचत नाही. पवारांच्या गुणवत्ता व मुरब्बीपणाचे कायम गुणगान करणार्‍या आणि त्याच पावसात कायम चिंब भिजलेल्यांना यापेक्षा अधिक काय सुचणार आहे? चाळीस वर्षांनी एक विद्यार्थी कुठे पोहोचला, त्याची कसोटी कशी लावायची असते? २००२ सालात निवडणूकीच्या राजकारणात उतरून बारा वर्षे गुजरातचा मुख्यमंत्री व गेली साडेपाच वर्षे देशाचा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींची निंदानालस्ती करण्यात आपली बुद्धी खर्ची घालणारे, म्हणून धन्य आहेत. दुर्दैव इतकेच आहे, की असल्या भुलभुलैया उभा करणार्‍यांच्या गोतावळ्यात पवारही आपली गुणवत्ता वा क्षमता विसरून गेले आहेत. त्यांनाही अशा कौतुकाची आता चटक लागली आहे आणि त्यातून सुटकेचीही भिती वाटू लागलेली असावी. अन्यथा त्यांनी पावसात भिजून दिलेल्या भाषणाचे इतके कौतुक करणार्‍यांचा कान पकडला असता आणि आपल्या अपुर्‍या यशाची प्रामाणिक कबुली दिली असती. पण असल्या यशातच मशगुल रहाणार्‍याला कधी वास्तव बघता येत नाही, किंवा स्विकारता येत नाही. त्याला भुलभुलैयाच पसंत असतो आणि त्यातच त्याचे भवितव्य झाकोळून जाते. मग अशा खुशमस्कर्‍यांना आनंदी ठेवण्यासाठी तो गुणी माणुसही विदुषक होऊन बागडू लागतो, हातवारे व हावभावांनी त्यांच्या टाळ्या मिळण्यात धन्यता मानू लागतो. कालपरवाच्या विधानसभा निवडणूकीतले हे वास्तव सर्वात भीषण आहे. करुणास्पद आहे. एका क्षमता असलेल्या राजकारण्याचा भाट खुशमस्करे कसा विदूषक करून टाकतात, त्याची ही शोकांतिका मनाला अस्वस्थ करून टाकणारीच आहे. कारण त्यातून भाजपाचे यश संपत नाही, की पवारांचे यश व्यवहारी जगात उपकारक ठरू शकत नाही. बुद्धीमंतांच्या अब्रुचे धिंडवडे मात्र त्यातून नक्कीच निघतात.

Friday, October 25, 2019

इतिहासाची पुनरावृत्ती?

Image result for bhajanlal devilal bansilal

हरयाणा विधानसभा पुन्हा एकदा त्रिशंकू अवस्थेत गेली असून आता ३७ वर्षे जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती होते काय, हे बघण्यासारखे ठरेल. कारण राजकारण ही सत्तेची साठमारी असते आणि त्यात नैतिक अनैतिक असे काहीही नसते. हेच आजवर सत्ता टिकवण्यासाठी सगळ्या पक्षांनी केलेले असून, भाजपाही त्याला अपवाद नाही. हरयाणात आज जशी विधानसभा निवडली गेली आहे, जवळपास तशीच विधानसभा १९८२ सालात निवडली गेलेली होती. तो काळ असा होता, की हरयाणा म्हणजे तीन लाल असे म्हटले जाई. त्यात कॉग्रेसचे बन्सीलाल, विरोधातले देवीलाल आणि नंतर उदयास आलेले भजनलाल, हेच प्रमुख नेते होते. त्यातले भजनलाल हे १९७७ सालात जनता पक्षातर्फ़े विधानसभेत निवडून आलेले होते व पुढल्या काळात मुख्यमंत्री झाले. मुळात जनता पक्षाने देशाची सत्ता मिळवल्यानंतर नऊ विधानसभा बरखास्त करण्यात आल्या व तिथे नव्याने निवडणूका घेण्यात आल्या. त्यात जनता पक्षाला बहूमत मिळाल्याने देवीलाल मुख्यमंत्री झालेले होते, तर बन्सीलाल हा कॉग्रेसनेता आणिबाणीमुळे पुरता नामोहरम होऊन गेलेला होता. मात्र कॉग्रेस संपली या मस्तीत वागणार्‍या जनता पक्षात देशभर जी धुसफ़ुस व लठ्ठालठ्ठी सुरू झाली; त्यात हरयाणाही होता आणि वर्षभरातच देवीलाल यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याची पाळी आली. त्यांच्या जागी भजनलाल हे मुख्यमंत्री झाले आणि पुढल्या काळात एकूण जनता पक्ष अंतर्गत विवादांनी रसातळाला गेला. त्यामुळे दिल्ली पुन्हा इंदिराजींच्या हाती आली आणि त्यांनी त्या सर्व विधानसभा नव्याने बरखास्त करण्याचा पवित्रा घेतला. मात्र त्यातून बचावलेली एकमेव विधानसभा होती हरयाणाची. कारण भजनलाल यांनी जनता पक्ष आणि सरकार यांच्यासहीत इंदिरा कॉग्रेसमध्ये पक्षांतर केलेले होते. जिथे ते शक्य झाले नाही, तिथल्या विधानसभा बरखास्त करून इंदिराजींनी वेगळ्या मार्गाने आपल्या पक्षाला तिथे सत्तेत आणले. ही १९८० सालची गोष्ट. मुद्दा आहे १९८२ सालचा. कारण तेव्हा हरयाणा विधानसभेची मुदत संपली व नव्याने निवडणूका झाल्या होत्या.

कालपरवा आपल्याकडे भाजपात झालेल्या मेगाभरतीच खुप गवगवा झाला. जणु भाजपाने कॉग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक विद्यमान आमदार आपल्या पक्षात आणले म्हणजे लज्जास्पद वाटमारीच केली, अशा सुरात बहुतांश विश्लेषक व कॉग्रेस नेते बोलत होते. पण त्याचे सर्वात किळसवाणे स्वरूप म्हणजे हरयाणातील भजनलाल यांचे पक्षांतर होते. आज शरद पवारांपासून सगळे इडी इडी असले रडगाणे लावतात. पण तेव्हा भजनलाल तसे का वागले होते? त्यांना आपले मुख्यमंत्रीपद टिकवायचे होते आणि ते टिकायचे, तर मुळात बहूमतासह विधानसभा टिकायला हवी होती. पण इंदिरा गांधी सरसकट नऊ विधानसभा बरखास्त करायला निघाल्या होत्या. त्या घटनात्मक वरवंट्याखालून आपले मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी भजनलाल सगळा पक्ष व मंत्रीमंडळच घेऊन कॉग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे इडी वा सीबीआयचा घाक घालून ब्लॅकमेल भाजपा करतो, असे म्हणायची गरज नाही. त्यापेक्षा नंगेपणाने कॉग्रेसने विविध पक्षांचे आमदार व नेते आपल्याकडे आणलेले आहेत. पुढे १९८२ साल उजाडले आणि विधानसभेची मुदत संपत आलेली होती. त्यातून जेव्हा निवडणूका झाल्या, त्यात भजनलाल व कॉग्रेसला आपले बहूमत टिकवता आले नाही, की सर्वात मोठा पक्ष म्हणूनही निवडून येणे शक्य झाले नाही. कॉग्रेसला ३६ जागा मिळाल्या. पण भाजपासह युती केलेल्या देवीलाल यांच्या लोकदल पक्षाला एकत्रित ३७ जागा मिळालेल्या होत्या. त्यांची निवडणूकपुर्व युती असल्याने मोठा गट म्हणून राज्यपालांनी देवीलाल यांना आमंत्रण दिले. पण नंतर तिथे भजनलाल येऊन राजभवनात धडकले. त्यांनीही बहूमताचा दावा केला आणि राज्यपालांनी देवीलाल यांना संधीही न देता भजनलाल यांचा शपथविधी उरकून घेतला होता. थोडक्यात सत्ता हाती आल्यावर अपक्ष वगैरे आमदारांना फ़ोडण्याचा अधिकारच राज्यपालांनी भजनलालना दिला. त्यावरून खुप काहूर माजलेले होते.

थोडक्यात आज हरयाणात भाजपाने बहूमत गमावल्याचे सांगताना कॉग्रेसचे जे युक्तीवाद करीत आहे, तेव युक्तीवाद तेव्हा देवीलाल व भाजपावाले करीत होते. उलट विधानसभेत दाखवता येणारे संख्याबळ आम्ही जमवले म्हणून भजनलाल यांना मुख्यमंत्री करणे कसे घटनात्मक आहे, त्याचा दावा कॉग्रेसवाले करीत होते. हे युक्तीवाद नेहमी फ़सवे असतात. कारण जेव्हा संख्याबळ आपल्या पाठीशी नसते किंवा नियम कायदे आयल्याला समर्थन देणारे नसतात, तेव्हा नैतिकतेचा मुखवटा चढवला जातो. पण जेव्हा नैतिकता ओलांडून पुढे जायचे असते, तेव्हा घटनात्मक वा कायद्याचे हवाले द्यायचे असतात. ते पाप प्रत्येक पक्ष करतो. कारण राजकारणात नैतिकतेला स्थान नसते तर व्यवहारी सत्तेला महत्व असते. सत्तेच पाठबळ मिळाले, मग कुठलीही बाब नैतिक ठरवता येत असते आणि पापालाही पुण्य घोषित करता येत असते. सवाल असतो आज आपण कुठल्या बाजुला उभे आहोत, किंवा आपल्याला काय सिद्ध करायचे आहे. योगायोग असा आहे, की आज हरयाणामध्ये नेमकी १९८२ सालची स्थिती आलेली आहे. फ़क्त दोन बाजू बदलल्या आहेत. तेव्हा कॉग्रेस जो युक्तीवाद करीत होती, तोच आज भाजपा करीत आहे आणि मनोहरलाल खट्टर यांनी भजनलाल यांची भूमिका घेतलेली आहे. सहाजिकच कॉग्रेसला नैतिकता मोलाची वाटते आहे आणि भाजपाला घटनात्मक तरतुदी महत्वाच्या वाटत आहेत. यालाच राजकारण म्हणतात. प्रत्येक गोष्ट आपल्या सोयीनुसार वळवायची किंवा वाकवायची असते. भाजपा आज सर्वात मोठा पक्ष म्हणून हरयाणात निवडून आलेला असला, तरी त्याचे बहूमत हुकलेले आहे आणि मुख्यमंत्री होण्यासाठी अपक्षांपैकी सहाजण पाठीशी उभे राहिले तरी भाजपाचे सरकार कायम होणार आहे. तेव्हा देशाची सत्ता कॉग्रेस राबवित असल्याने राज्यपालही भजनलाल यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले. आज हरयाणाचे राज्यपाल मनोहरलाल खट्टर यांचा शपथविधी उरकून घ्यायला पुढे आले तर नवल नाही.

राजकीय सत्तेची साठमारी अशीच असते. ती सत्ता मिळवताना कोणाला नैतिकता आठवत नाही आणि सत्ता गमावली, मग प्रत्येकाला नैतिक मूल्ये मोलाची वाटत असतात. असले शब्द व्यवहारी जगापासून मैलोगणती दुर बसलेल्या व जगाची चिंता वहाणार्‍या बुद्धीजिवी लोकांना खुप कौतुकाचे असतात. म्हणून राजकारणी त्यांना अशा शब्दांनी खेळवित असतात. तसे नसते तर चौथ्यांदा भाजपाने गुजरात विधानसभा जिंकताना जागा कमी झाल्या, म्हणून तमाम राजकीय विश्लेषकांनी राहुल गांधींचा तिथे नैतिक विजय झाल्यासा डंका कशाला पिटला असता? पण त्याच ढोलकरी बुद्धीमंतांना कर्नाटकात १२४ आमदारांवरून कॉग्रेस ८० आमदार इतकी घसरली, त्यातला नैतिक वा घटनात्मक पराभव दिसलाही नव्हता. विरोधी पक्षात पाच वर्षे बसलेला भाजपा तिथे सर्वात मोठा पक्ष झाल्याचे कौतुक कोणाला होते? त्यापेक्षा चार जागांनी भाजपाचे बहूमत हुकल्याचा मोठा आनंदोत्सव बौद्धिक प्रांतामध्ये साजरा झाला होता. लगेच दुसर्‍या क्रमांकावर फ़ेकल्या गेलेल्या कॉग्रेसने तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या जनता दलाला मुख्यमंत्रीपद देऊ केले, ती नैतिकता होती? तेव्हा सर्वात मोठा पक्ष भाजपा असूनही त्याला सत्तेपासून वंचित ठेवणे, किंवा सत्तेतून बाहेर फ़ेकलेल्या कॉग्रेसने सत्तेसाठी केलेली कसरत घटनात्मक ठरवण्यातच सगळी बुद्धी खर्ची पडत होती ना? इतकी बौद्धिक प्रांताची प्रतिष्ठा लयाला गेलेली असेल, त्या समाजात नैतिकतेच्या गोष्टी बोलणेही विनोद नाही, तर हलकटपणा असतो. हमाममे सब नंगे म्हणतात, तसे राजकारण झालेले असल्यावर कुणा एकाला नागडा ठरवण्यासाठी बुद्धी राबू लागली; मग बुद्धीभ्रंश झाला असे खुशाल समजावे. आपोआप राजकीय पक्ष या सत्ता बळकावणार्‍या टोळ्या होतात आणि अशा झुंडशाहीत कोणालाही नैतिक पाठींबा देण्यात शहाणपणा नसतो. जो जीता वही सिकंदर असली अवस्था आलेली असते. याच निकषावर आता सगळे खेळ चालू आहेत.

हरयाणामध्ये बहूमत हुकले तरी भाजपाला सत्ता मिळणार आहे. कारण बंडखोर अपक्ष म्हणून त्यांचेच सहा आमदार निवडून आलेले आहेत. त्यांना एकत्र करून सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत कॉग्रेस नाही. जननायक जनता पार्टी नावाचा नवा पक्ष जे आमदार घेऊन पुढे आला आहे, त्यांना सोबत घेऊनही कॉग्रेस बहूमत सिद्ध करू शकत नाही. बंडखोर अपक्षांच्या हातीच सत्तेची किल्ली आहे. पण जनादेश गमावूनही पुन्हा भाजपा कसा सत्तेला चिकटून बसला आहे, त्याचे युक्तीवाद आपल्याला आता ऐकायला मिळणार आहेत. कारण सोपे सरळ आहे. ज्यांना कॉग्रेसचा आजवरचा इतिहास ठाऊक नाही, किंवा १९९० पुर्वीचे राजकारणही माहित नाही, त्यांना यातला गंध नसतो. पण तेच विश्लेषक म्हणून शेखी मिरवत असतात. त्यांना भारतीय संसदीय राजकारणात कॉग्रेसनेच निर्माण करून ठेवलेल्या परंपरा व पायंडेही ठाऊक नाहीत. किंवा तिकडे दुर्लक्ष करायचे असल्याने ते भाजपाला गुन्हेगार ठरवण्यात कायम रमलेले असतात. त्याला कॉग्रेस व पुरोगामी शहाण्याचे खतपाणी मिळाले मग त्यांची बकवास सुरू होत असते. भाजपाही कुठे दुधाने धुतलेला पक्ष नाही. जे राजकारण व डावपेच कॉग्रेसने केले आहेत आणि इतर पक्षांनी घटनात्मक म्हणून रेटून नेलेले आहेत, त्याचा आधार घेऊनच भाजपा आता आपले डाव साधतो आहे. त्यासाठी भाजपाने पावित्र्याचा व शुचितेचा आव आणलेला नाही व आणायचे कारणही नाही. सत्ता हा नंगेपणाचा बेशरम खेळ असतो आणि समोरचे जितका नंगेपणा करतील, त्यांच्यापेक्षा अधिक नंगेपणा केल्याशिवाय मात करता येत नाही. भजनलाल यांना पक्ष व मंत्रीमंडळासह कॉग्रेसमध्ये आणणार्‍या इंदिराजींचा गौरव ज्यांना वाटतो; अशा लोकांनी इडी सीबीआय वा राज्यपालांच्या अनैतिक वापराविषयी तक्रार करण्यात अर्थ नसतो. आज सत्ता भाजपाच्या हाती आहे आणि तेव्हा सत्ता कॉग्रेसच्या हाती होती. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे आपले वडीलधारे सांगून गेले. पण इथल्या देशी बुद्धीजिवींचा बाप स्वदेशी असला तर ना?

Tuesday, October 22, 2019

विश्लेषक आणि मतदार

exit poll maharashtra के लिए इमेज परिणाम

गेले दोन आठवडे विविध माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूकीचे विश्लेषण व चर्चा होत राहिल्या आहेत. कालच प्रचाराची मुदत संपल्यामुळे राजकीय पक्षांनी करायचा प्रचार थांबला असला, तरी माध्यमे व अन्य साधनांनी निवडणूक प्रचार वा अपप्रचार चालूच आहे. उद्या मतदान होईल आणि गुरूवारी मतमोजणीने हा निवडणूक मोसम संपुष्टात येईल. तेव्हा कुठल्या पक्ष व नेत्यांनी केलेल्या वल्गना खर्‍या ठरल्या वा कोणाचे बार फ़ुसके ठरले, त्याचा खुलासा दिवाळीपुर्वीच होऊन जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत बहुतांश माध्यमे व राजकीय विश्लेषकांना तोंडघशी पडावे लागलेले आहे आणि याहीवेळी अनेकजण पुन्हा तोंडघशी पडायला पुढे सरसावलेले आहेत. अशी विश्लेषणे व त्यातून व्यक्त केलेले अंदाज कशामुळे फ़सतात, हे मात्र सामान्य वाचक वा श्रोता प्रेक्षकाला कधी उलगडत नाही. त्याला बिचार्‍याला एक प्रश्न पडतोच. आपण सामान्य माणूस वा मतदार असताना आपल्याला दिसणारे सत्य अभ्यासक वा विश्लेषक कशाला बघू शकत नाहीत? त्यांना दिसलेले मान्य कशाला करता येत नाही? तिथेच सगळी गफ़लत होऊन जाते असते. कारण सामान्य माणुस सामान्य बुद्धीचा असतो आणि सत्याकडे पाठ फ़िरवून त्याला जगता येत नसते. पण अभ्यासकांची गोष्ट वेगळी असते. त्यांना सत्याशी कसलेही कर्तव्य नसते. म्हणूनच त्यांना सत्याशी सामना करता येत नाही आणि कल्पनांचे झोके घेताना घसरगुंडी अपरिहार्य असते. म्हणूनच प्रत्यक्ष मतदान करून निवडणूकीचा निकाल निश्चीत करणारा मतदार आणि विश्लेषक, नेते व अभ्यासक यांच्यातला फ़रक समजून घेतला पाहिजे. तर गफ़लतीचे खरे कारण लक्षात येऊ शकेल. नेते दिशाभूल करतात, की विश्लेषकच लोकांची फ़सवणूक करतात? की दोघेही भोळेभाबडे असतात? मतदार नेमके अभ्यासकांना झुगारून लावणारे मतदान कशाला करतो? अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणूनच अगत्याचे आहे. कुठे गफ़लत होते?

मराठीतल्या एका वृत्तवाहिनीने विविध जिल्ह्यात बाजार वा चौकात रस्त्यावर फ़िरणार्‍या फ़ेरीवाल्यांशी चर्चा करून त्यांचे विविध राजकिय पक्षांवर मत आजमावले आणि कुठे कुणाचा जोर आहे त्याचा अहवाल प्रेक्षकांसमोर जसाच्यातसा सादर केला. त्या़च वाहिनीने विविध जिल्ह्यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एका सभागृहात बसवून सत्ताधारी व विरोधी मतांची सरबत्ती घडवून आणली. त्याकडे बघितले तर आपल्याला लगेच वाटले, आपल्या देशातील व राज्यातील मतदार खुपच सुबुद्ध झालेला आहे. त्याला राजकीय पक्ष, त्यांचे नेते किंवा सत्ताधारी व विरोधक यांच्या धोरणांविषयी पक्के ज्ञान आहे. त्याने आपापल्या हिताशी संबंधित अशा विषयांचा अभ्यास केलेला आहे. त्या कॉलेज युवकांच्या हमरातुमरीवर येऊन केलेल्या चर्चा वा वादातील आरोप प्रत्यारोप थोडे बारकाईने तपासले, तर बहुतांश मुलांनी आपण माध्यमातून वा अन्यत्र कुठून काही ऐकलेले असते, त्याचीच पुन्हा पोपटपंची केलेली होती. मंदी, आर्थिक घसरण वा जलशिवार कर्जमाफ़ी असल्या माध्यमातुन व्यक्त झालेल्या मतांच्या पलिकडे जाऊन बहुतांश मुलांना नवे काही खरेखुरे आपल्याला भिडणारे मुद्दे कथन करता आले नाहीत. पढवलेले पोपट म्हणतात, तशी ही मते होती. म्हणूनच मतमोजणी होते, त्यादिवशी अशा सर्व गोष्टी खोट्या पडतात. त्यातून व्यक्त झालेला संताप किवा कौतुक यांचे कुठलेही प्रतिबिंब मतमोजणीत पडत नाही. पण याच ओघात दुसर्‍या एका वाहिनीचा कार्यक्रम मला आवडला. त्यांच्या कार्यक्रमात कॉलेज बाहेर रेंगाळलेल्या वा पुस्तके मोबाईल चाळत बसलेल्या मुलांना एका वार्ताहर मुलीने विविध राजकीय प्रश्न विचारून तोंडी परिक्षाच घेतली. त्यामध्ये ९० टक्के मुलांना राज्याचा मुख्यमंत्री कोण, तेही सांगता आले नाही आणि एकदोघांनी तर नरेंद्र मोदीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचे अडखळत सांगून टाकले. बाजारगप्पा किंवा यातही अनेकांना अशी आपल्या राज्यकर्त्यांची नावे माहित नाहीत. किंबहूना अनेकांना मंदी म्हणजे काय तेही ठाऊक नाही. पण पोपटपंची करताना अशीच मुले माणसे अगत्याने बंद पडलेले कारखाने, वाढती बेरोजगारी किंवा जलशिवारचे यश वगैरे ठामपणे सांगतात.

मुळात अशा कार्यक्रमातून सामान्य लोकांचे मत आजमावता येऊ शकते का? जितके राजकीय खुमखुमी असलेले मुठभर लोक राजकारणाविषयी तावातावाने बोलतात, त्याच्या पलिकडल्या ९५ टक्के लोकांना त्याचा गंध नसतो, की त्यावर चर्चा चघळण्याची इच्छा नसते. तरीही त्यांना त्यावरच प्रश्न विचारले जातात. त्यांच्या जगण्यातले प्रश्न विचारले जात नाहीत. कारण अशा प्रश्न समस्यांचा पत्रकार माध्यमांनाही थांगपत्ता नसतो. त्यांनाही कोणी अर्थशास्त्री वा राजकीय विश्लेषकाने मांडलेले मुद्देच सामान्य माणसाच्या जगण्याचे विषय वाटतात आणि मग त्यावरच जनतेचे मत समजून घेण्याचे कार्यक्रम योजले जातात. गेले दोनतीन महिने अतिवृष्टीने महाराष्ट्रात धुमाकुळ घातला आहे. पण त्या महापुराने बुडालेली जनता वा त्यांचे उध्वस्त झालेले जीवन याची कितीशी चर्चा अशा मिमांसेतून आली? मुंबई वा अन्यत्रच्या रस्त्यातले खड्डे किंवा आरे कॉलनीतील तोडलेल्या झाडांचा प्रचंड उहापोह झाला. पण पुराने उध्वस्त झालेल्या अंदाजे दहावीस लाख घरे म्हणजे किमान पन्नास लाख पुरग्रस्तांच्या निवडणूक विषयक मतांचा उहापोह कुठे किती झाला? कारण मुंबई दिल्लीच्या वातानुकुलीत केबिनमध्ये बसून पुरग्रस्त जनतेची कल्पना करता येऊ शकते. पण त्यामधली दाहकता भीषणता समजूही शकत नाही. मग त्यावरून चर्चा उहापोह करण्याचा मुद्दा येतोच कुठे? त्यापेक्षा दिल्ली मुंबईतल्या अर्थशास्त्र्यांनी मंदी म्हणून केलेला कल्लोळ माध्यमांचा अजेंडा बनून जातो. त्यावरून लोकमत आजमावल्याच्या गर्जना होतात. पण मतदार मात्र आता भेडसावणार्‍या विषयावर आपले मत बनवित असतो आणि त्या संकटाच्या क्षणी कोणी काय हात दिला वा मदत केली, त्यावरून आपले मत बनवित असतो. इथेच सगळी खरी गफ़लत होऊन जाते. चर्चांमधून बातम्यातून उपस्थित केलेले प्रश्न वा समस्या खोट्या नसतात. पण त्यावर कोण उपाय करू शकेल किंवा त्यावर दिलासा देण्याची क्षमता कोणामध्ये आहे, त्यानुसार मतदानातला प्रतिसाद मिळत असतो. ज्याचे निकाल मतमोजणीच्या दिवशी मिळत असतात. केबिनमधून जन्माला आलेल्या समस्यांचे प्रतिबिंब त्यात पडत नाही.

उदाहरणार्थ गेल्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान मतचाचणी व मतदानानंतर एक्झीट पोल अनेकांनी सादर केलेले होते. त्यात सर्वाधिक नेमका आकडा एक्सीस नावाच्या संस्थेने दिलेला होता. इंडियाटूडे या वाहिनीवरून तो प्रक्षेपितही झालेला होता. त्याचे म्होरके प्रदीप गुप्ता यांनी जे आकडे सांगितले, त्यांची खुप हेटाळणी झालेली होती. त्यांच्यावरही मोदीभक्त असल्याचे आरोप करण्यात आले. भाजपाला विकला गेलेला पत्रकार म्हणूनही टिका झाली. पण त्याचे आकडे खरे ठरल्यावर त्यामागची संकल्पना समजून घेण्याचा किती प्रयास झाला्? बेरोजगारी, मंदी. बंद पडणारे कारखाने, किंवा डबघाईला आलेला शेती व्यवसाय; असे प्रश्न सामान्य लोकांसाठी जिव्हाळ्याचे असतात आणि त्यावर उपाययोजना झालेली नसली मग लोक सत्ताधारी पक्षाला शिव्याशाप देतच असतात. पण त्याचा अर्थ तेवढ्यासाठी ती जनता सरकारला सत्ताभ्रष्ट करत नाही. त्या समस्या विरोधी पक्षाकडून सोडवल्या जाण्याची खात्री नसेल, किंवा विरोधक नाकर्तेच असतील, तर दगडापेक्षा वीट मऊ म्हणून लोक त्याच सत्ताधार्‍यांना कायम करतात. हेच प्रदीप गुप्ताने मोदींच्या दुसर्‍या यशामागचे कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. पण कोणाला समजून घेण्याची इच्छा आहे? तोच एक चाचणीकर्ता नाही. यशवंत देशमुख हे सी-व्होटर नावाची एक संस्था चालवितात. जनतेची मतचाचणी कशी घ्यावी त्याचे, नेमके मार्गदर्शन त्यांनी केले आहे. ते दर महिन्याला देशव्यापी मत आजमावत असतात. फ़ेब्रुवारी मार्च महिन्यात मतदाराला पुलवामा आणि बालाकोटचा हवाईहल्ला महत्वाचा ज्वलंत प्रश्न वाटत होता. पण एप्रिल उजाडण्यापर्यंत बेरोजगारी हा सर्वात ज्वलंत प्रश्न असल्याचे निष्कर्ष हाती आले आणि त्याचा आधार घेऊन मोदी विरोधकांनी सत्तापरिवर्तनाची भाकिते करायला सुरूवात केली. पण असा प्रश्नच अर्धवट असतो, ह्याकडे देशमुख यांनी लक्ष वेधलेले होते. बेरोजगारी हा ज्वलंत प्रश्न २९ टक्के मतदाराला वाटत होता, म्हणून तो सगळा मतदार मोदी विरोधात मतदान करत नाही. त्यालाच विचारले, तो प्रश्न कोण समर्थपणे सोडवू शकतो? तर त्यातले ९० टक्के लोक मोदी असे उत्तर देतात, तेव्हा मतांचा खरा कौल मिळत असतो.

आपल्या देशातीलच नव्हेतर जगभरच्या अभ्यासक व विश्लेषकांची आज ती दुर्दशा झालेली आहे. त्यांचा सामान्य जनतेशी कुठलाही संबंध उरलेला नाही. तर त्यांना जनतेच्या मनाचा सुगावा लागणार कसा? सामान्य जनतेच्या समस्या भावना यापेक्षाही त्याविषयी विविध अभ्यास अहवाल किंवा जाणकारांनी व्यक्त केलेली ‘अभ्यासू’ मते; हाच आधार झालेला आहे. सहाजिकच त्यांची विश्लेषणे किंवा मिमांसा पुर्णपणे निराधार असतात अथवा वल्गना होऊन गेल्या आहेत. जनतेला खर्‍याखुर्‍या भेडसावणार्‍या समस्या प्रश्न आणि माध्यमातून उडवले जाणारे फ़टाके, यातली तफ़ावत मग मतमोजणीतूनच समोर येत असते. राज ठाकरे यांच्या ‘लावरे तो व्हिडीओ’ने माध्यमे प्रभावित झाली होती आणि त्याचे प्रतिबिंबच बातम्यात उमटत होते. पण त्याचा कुठलाही प्रभाव मतदानात दिसला नाही, त्याचे हेच कारण आहे. राफ़ायल खरेदीतला घोटाळा, सुप्रिम कोर्टापर्यंत गाजला आणि माध्यमांनाही सत्तापरिवर्तनाची स्वप्ने पडलेली होती. परिणामी माध्यमे व अभ्यासकांचा ‘राहुल गांधी’ झाला. याचा अर्थ विषय चुकीचे नव्हते, किवा त्या समस्या प्रश्न गैरलागू नव्हते. पण तेवढ्यावरून जनमत बनत नाही किंवा निर्णायक मतदान होत नाही. याचे संबंधितांना भान राहिलेले नव्हते. आता शरद पवार यांच्या इडीला खुप महत्व मिळाले, पण माध्यमांसह विरोधकांनी अतिवृष्टी वा त्यातून उध्वस्त झालेल्या पुरग्रस्तांना ढुंकून पाहिले नाही. उलट ज्याची तितकीशी अनुभूती सामान्य जनतेला येत नाही वा आलेली नाही, त्या आर्थिक मंदी व बेरोजगारीचे प्रचंड ढोल पिटले गेले. मग त्यात मतदाराच्या मताचे व मनाचे प्रतिबिंब कशाला पडावे? सगळी निवडणूक विषयक चर्चा व उहापोह आणि विश्लेषकांची मिमांसा मतमोजणी होईल त्या दिवशी जुन्या जीर्ण इमारतीसारखी म्हणूनच कोसळून पडणार आहे. फ़ार वेळ नाही, येत्या गुरूवारी संध्याकाळपर्यंतच आपल्याला ह्याची प्रचिती येईल. कारण निकाल त्याच दिवशी आहेत ना?

Sunday, October 20, 2019

कुस्ती आणि क्रिकेट



गेल्या आठदहा दिवसात विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला चांगला रंग भरला असे म्हणता येईल. कारण राजकीय नेते व पक्षांनी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याला आपल्याकडे प्रचार मानले जाते. खरे मुद्दे बाजूला पाडण्याचे डावपेच चाललेत, असा आरोप सत्ताधारी पक्षावर विरोधकांनी करणे स्वाभाविक आहे. कारण सामान्य मतदार जनतेला पटणारा खुलासा उपस्थित विषयावर उपलब्ध नसेल; तर त्या विषयालाच टांग मारणे भाग असते. ३७० कलमाचा विषय जेव्हा ऐरणीवर आला, तेव्हा त्याचा महाराष्ट्राशी संबंध काय? असे विचारून प्रादेशिक पक्षाचे नेते म्हणून पवारांनी त्यापासून अलिप्त रहाण्याचा शहाणपणा दाखवायला हवा होता. तेव्हा तर त्या विधेयकाला विरोध करण्याचा महाराष्ट्राशी संबंध असेल; तर आता विधानसभेच्या प्रचारात ३७० चा संबंध शोधण्यात अर्थ नसतो. तसाच एक मुद्दा आहे तेल अंगाला लावलेल्या पहिलवानाचा. मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला; तेव्हा पवारांनी आपल्या कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष असण्याचा आधार घेऊन अतिशय खोचक विधान केले व हातवारेही केले होते. फ़डणवीस म्हणाले, आमचे म्हणजे भाजपाचे पहिलवान (उमेदवार) अंगाला तेल लावून आखाड्यात उतरलेले आहेत. पण समोर लढायलाच कोणी नाही. त्याला उत्तर देताना आपल्या एका भाषणात पवार (तृतियपंथी हावभाव हातवारे करीत) म्हणाले, कुस्ती ‘अशांशी’ होत नसते. कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष असल्याचा हवाला त्यासाठी पवारांनी दिला. पण तेच पवार मुंबई क्रिकेट संस्थेचे अध्यक्ष आहेत. मग तिथे त्यांची बुद्धी का चालत नाही? कुस्तीच्या खेळाचे नियम अगत्याने कथन करणार्‍या पवारांना क्रिकेट कसे व कोणाची खेळतात, हे ठाऊकच नाही काय? असते तर त्यांनी मोदी-शहा इतक्या सभा कशाला घेत आहेत, असा उलटा प्रश्न नक्कीच विचारला नसता. क्रिकेट कसे खेळतात? कुस्ती व क्रिकेटमधले साधर्म्य काय आहे?

कुस्तीचे तंत्र सांगताना पवार म्हणतात, ‘अशांशी’ लढत नाही. मग क्रिकेटमध्ये तरी ‘अशां’चा पुरूषार्थ कितीसा आहे? सध्या दक्षिण आफ़्रिका व भारत यांच्यात कसोटी मालिका चालू आहे आणि त्यातल्या पहिल्या दोन सामन्यात भारताने निर्णायक आघाडी घेतलेली आहे. पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत आणि त्यातल्या दुसर्‍या सामन्यात तर आफ़्रिकेचा एक डाव दिडशेहून अधिक धावांनी दणदणित पराभव केला आहे. पण नशिब दक्षिण आफ़्रिकन संघाच्या कर्णधाराचे नाव शरद पवार नाही. अन्यथा तोही म्हणाला असता, क्रिकेट विश्वात खरोखरच भारतीय संघ इतका अजिंक्य असेल, तर रोहित शर्मा व विराट कोहली कशाला फ़लंदाजीला आणावे लागत आहे? कुस्ती असो वा क्रिकेट, कुठल्याही सामन्यात संघ मैदानात उतरवला जातो, त्यात आपल्याकडले उत्तम खेळाडू वा मल्ल आणले जात असतात. मग तो संघ कितीही बलवान असो आणि समोरचा संघ कितीही दुबळा असो. दुबळा संघ वा त्यांचा कर्णधार समोरच्या संघात जिंकू शकणार्‍या उत्तम खेळाडूंना कशाला समाविष्ट केले; असा ‘उलटा’ सवाल करीत नसतो. जे कोणी समोर येतील, त्यांची दाणादाण उडवून सामना जिंकायला मैदानात येत असतो. तुमच्या उत्तम खेळाडू वा मल्लांना आखाड्याबाहेर ठेवण्याचा आग्रह धरत नाही, किंवा तक्रार करीत नाहीत. पवारांनी तीनचार दशके विविध खेळ संघटनांची अध्यक्षपदे मिरवताना त्यातली ही मूलभूत बाजू समजूनच घेतलेली नाही काय? की फ़क्त त्यातल्या आर्थिक उलाढाली व खेळाडूंच्या लिलावाचाच अर्थ समजून घेतला आहे? पवारांच्या पक्षापाशी राज्याबाहेरून व्यासपीठ गाजवू शकणारा कोणी वक्ता आणायची कुवत नसेल; तर भाजपाचा तो गुन्हा असू शकत नाही. मोदी शहा हे भाजपाचे विराट कोहली वा रोहित शर्मा आहेत. त्यांना भाजपाने कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसवून निवडणूका लढवाव्यात, अशीच पवारांची अपेक्षा आहे काय? असेल तर त्यांना कुस्ती वा क्रिकेट किती कळते, असा प्रश्न विचारला गेला पाहिजे.

पण असे प्रश्न विचारण्यासाठी खरेखुरे पत्रकार समोर असायला हवेत. त्याचाच दुष्काळ असेल, तर पवारांच्या हातवारे व हावभावांनाच ‘भाव’ मिळून जाणार ना? अर्थात सामान्य जनता तितकी बुद्धीजिवी पत्रकार नसल्याने तिला कुस्ती व क्रिकेट आवश्यक तितके समजत असते. म्हणूनच मतदान करताना योग्य कौल देणेही शक्य होत असते. गेल्या आठवडाभरात पवारांच्या व अन्य विविध राजकीय नेत्यांच्या सविस्तर मुलाखती मराठी वाहिन्यांवर वारंवार दाखवल्या जात आहेत. त्यात पवार एक गोष्ट मुलाखत घेणार्‍यालाच अगत्यानेच सुचवतात. माध्यमांवर किंवा प्रचार साधनांवर भाजपाचा दबाव आहे. खरे मुद्दे बासनात गुंडाळून मतदाराची दिशाभूल करण्याचा डाव खेळला जात आहे. माध्यमेही दबावाखाली आहेत. असे असेल तर त्याच कालखंडात बहुतांश मराठी माध्यमांनी व वाहिन्यांनी प्रफ़ुल्ल पटेल व इक्बाल मिरची विषयात गुळणी कशाला घेतलेली आहे? दोनतीन इंग्रजी वाहिन्या सलग चारपाच दिवस पटेल व १९९३ च्या मुंबई स्फ़ोटातील एक प्रमुख आरोपी इक्बाल मिरची; याच्या आर्थिक संबंधाची लक्तरे काढत आहेत. पण कुठल्याही मराठी वाहिनीने त्यावर उहापोह करायचे टाळलेले आहे. वास्तविक पटेल हे पवारांचे कुटुंबाइतकेच निकटवर्तिय आहेत. म्हणूनच यावेळी ती लक्तरे मराठी माध्यमात ठळकपणे मांडली गेल्यास मतदानावर त्याचाच मोठा परिणाम होऊ शकतो. पटेल हे राष्ट्रवादीचे मोठे नेते व माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे वादग्रस्त व्यवहार राष्ट्रवादीच्या प्रचाराला मोठी इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे त्याविषयीचे मौन माध्यमांनी धारण करणे म्हणजेच खर्‍या विषयावरून जनतेला गाफ़ील ठेवणेच नाही काय? मग त्या विषयावर काही गाजावाजा नको म्हणून कोणी दबाव आणलेला असू शकतो? मोदी सरकार वा फ़डणवीस सरकार त्यासाठी दडपण आणेल काय? नसेल तर मराठी माध्यमे कोणाच्या दबावाखाली असतात? असा ‘उलटा’ प्रश्न एकाही मुलाखतकाराला कशाला सुचत नाही? कशाला विचारला गेला नाही?

पवारांचे कुस्तीविषयक ज्ञान व हातवारे अगत्याने दाखवून त्यावर प्रदिर्घ चिंतन करणार्‍या मराठी माध्यमांना’ इक्बाल मिरची इतकी घुसमटून का टाकत असावी? की त्या मिरचीचा जबरदस्त ठसका लागल्यानेच घटाघटा पाणी प्यावे, तसे सातार्‍याच्या सभेत पडणार्‍या मुसळधार पाववाचे पाणी मराठी माध्यमे पिण्यात गुंग झालेली होती? इंग्रजी माध्यमे एकामागून एक ‘मिरची’च्या फ़ोडण्या देऊन धमाल उडवून देत असताना, मराठी माध्यमे मात्र पवारांच्या पावसात भिजून दिल्या गेलेल्या भाषणात ओथंबून गेली होती. कुठे आणून ठेवलीय मराठी पत्रकारिता साहेबांनी? राष्ट्रवादीच्याच एका जाहिरातीतल्या टॅगलाईनवर विश्वास ठेवायचा, तर महाराष्ट्र सोडणार नाही, अशा माध्यमांना. चार दिवसाचा तर मामला आहे. २४ आक्टोबर रोजी दुध आणि पावसाचे पाणी वेगळे झालेले दिसेलच. कारण सामान्य मतदार आता तितका दुधखुळा राहिलेला नाही. एका बाबतीत मात्र पवारांचे कौतुक करावे लागेल. आपण सातार्‍यातून उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात चुक केली, हे त्यांनी कबुल केले आहे. निदान एकदा तरी आपल्या चुकीची कबुली दिली, हे अभिनंदनीय आहे. पवारांसाठीच नाही, तर मराठी पत्रकारितेसाठीही कौतुकास्पद आहे. कारण पवारांच्या घोडचुकातही मुरब्बीपणा शोधण्यातच बुद्धीजिवी पत्रकारीता मागल्या दोनतीन दशकात डुंबत राहिली होती. त्यांनाही पवारांची चुक सांगण्याची भिती वाटली नाही, हे कौतुकास्पदच नाही काय? पण चुक उदयनराजे यांनीही मांडलेली आहे. आजवर आत्मपरिक्षण व आत्मविंतन केले असते, तर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन आत्मक्लेश करावे लागले नसते’ असे राजे म्हणाले होते. आत्मचिंतन पवारांनी कधी केले नाही आणि मराठी माध्यमे पत्रकारांनी त्यांना करू दिले नाही. मग दोघांवर सतत आत्मक्लेश सहन करण्याची वेळ येत राहिली, तर दुसर्‍या कोणाला दोष देता येईल? देवेंद्राला कुस्ती शिकवण्यापेक्षा साहेबांनी क्रिकेट समजून घेतले असते, तर पावसात खेळ थांबवायचा असतो, इतके औचित्य तरी राखता आले असते ना?

Saturday, October 19, 2019

निवडणूक ‘विरोधी’ पक्षाची

Image result for raj thackeray

संयुक्त महाराष्ट्राचे राज्य स्थापन होऊन आता सहा दशकाचा कालावधी उलटून गेला आहे. त्यावेळी किंवा समितीच्या आंदोलन काळात आचार्य अत्रे ही सत्ताधारी कॉग्रेस विरोधात्र धडाडणारी सर्वात प्रभावी तोफ़ मानली जायची. अत्र्यांची जाहिर सभा म्हणजे श्रोत्यांसाठी पर्वणीच असायची. लोक नालायक कॉग्रेसला मते कशाला देतात, असा प्रश्न अत्रे नेहमीच श्रोत्यांना विचारायचे. समितीचे अनेक नेते त्या काळात अत्र्यांची उपस्थितांना ओळख करून देताना कॉग्रेसचा कर्दनकाळ अशीच करून देत. कारण तितका सत्ताधारी कॉग्रेस विरोधातला दणदणित वक्ता कधी महाराष्ट्रात झालाच नाही अशी एक ठाम समजूत दिर्धकाळ होती. आता अत्र्यांना जाऊनच अर्धशतकाचा काळ होत आला असल्याने पन्नाशीसाठीतल्या जुन्या पिढीलाही आचार्य अत्रे किती आठवतील व त्यापैकी कितींनी त्यांना प्रत्यक्षात ऐकले असेल, याची शंका आहे. दहा वर्षापुर्वीपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाविषयी तशीच ख्याती होती. आज नव्या पिढीतल्या तरुणांना राज ठाकरे यांच्याविषयी तसेच कुतुहल आहे. पण या तिन्ही नेत्यांमध्ये एक समान धागा आहे. त्यांना ऐकायला जितकी गर्दी लोक करतात, त्याचे प्रतिबिंब मतदानात पडत नाही, अशी ती ख्याती आहे. आचार्य अत्र्यांचा अस्त होत असताना मराठी राजकारणात बाळासाहेबांचा उदय झाला होता आणि त्यांनाही दिर्घकाळ ऐकायला लोक जमत असले तरी मतदानात मात्र तितका प्रतिसाद मिळत नसे. आजकाल राज ठाकरे यांच्याविषयी नेमके तेच बोलले जाते. पण याखेरीज आणखी एक साम्य या तिन्ही नेत्यात आढळून येते, ते म्हणजे गर्दी करणार्‍या श्रोत्यांची तिथेच निष्क्रीयतेसाठी निर्भत्सना करण्याची या नेत्यांची हिंमत! गेल्या आठवडाभरात मनसेच्या प्रचाराची सुरूवात केल्यापासून राज यांनी तशीच काहीशी भूमिका घेतली असताना आचार्य अत्र्यांचे स्मरण झाले. कारण मतदाराच्या शैथिल्याचॊ हेटाळणी करताना अत्र्यांच्या भाषणात वारंवार आलेली एक उपमा पुन्हा इतक्या वर्षांनी आठवली.

वर्षभर दिसेल तिथे साप आणि नागाला मारून टाकता आणि नागपंचमी आली मग त्याच सापाला दुध कशाला पाजता? असा सवाल अत्रे अगत्याने प्रत्येक निवडणूक प्रचारात उपस्थित श्रोत्यांना विचारीत. लोकांना सत्ताधारी कॉग्रेसची लक्तरे काढलेली ऐकायला आवडतात आणि कामधंदा बाजूला ठेवून लोक अत्र्यांच्या सभेला गर्दी करतात, तर मतदान कशाला कॉग्रेसच्या विरोधात करत नाहीत? तो काळ असा होता, की कॉग्रेसला आव्हान देऊ शकेल वा सत्तापरिवर्तन घडवू शकेल, इतका कुठलाही अन्य राजकीय पक्ष मतदाराला उपलब्ध नव्हता. किंबहूना अडीचशे आसपास विधानसभेच्या जागा होत्या आणि त्यापैकी पन्नासहून अधिक जागा लढवणाराही कुठला पक्ष नव्हता. आघाडी वा संयुक्त समिती स्थापन केली, तरी सगळ्या जागी उमेदवार टाकणे शक्य नसायचे, इतके विरोधी पक्ष दुबळे होते. विधानसभेतही दोनशेहून अधिक आमदार कॉग्रेसचेच असायचे. बाकी विरोधी पक्ष म्हणून अर्धा डझन जे पक्ष होते, त्यांच्या सगळ्या आमदारांची बेरीज पन्नाससाठच्या पलिकडे जात नसे. पण जे मूठभर विरोधी आमदार विधानसभेत पोहोचायचे, त्यांच्या विरोधी भूमिकेला भक्कम बहूमताचे सरकारही वचकून असायचे. जनसंघाचे चारसहा, शेकापचे दहापंधरा, समाजवादी दहाबारा तितकेच कम्युनिस्ट वगैरे विरोधी पक्षातले आमदार असायचे. पण त्यांच्या वैधानिक कामाला सरकार वचकून असे. आज राज ठाकरे आपल्याला भक्कम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या असे आवाहन करतात, त्यामध्ये कसला भक्कमपणा असा प्रश्न आहे. कारण त्या साठ वर्षापुर्वीच्या विखुरलेल्या विरोधी पक्षाचे आमदार संख्येने खुपच विरळ असायचे आणि संख्याबळावर त्यांना कोणी मोजतही नसे. त्यांचा भक्कमपणा भूमिकेतला असायचा. कम्युनिस्ट वा जनसंघ (म्हणजे आजचा भाजपा) यांच्यात तात्विक मतभेद असले, म्हणून जनहिताच्या विषयात सरकारला ते एकत्र येऊन धारेवर धरायचे, जनसंघ प्रतिगामी म्हणून कम्युनिस्ट वा समाजवाद्यांनी कधी कॉग्रेसच्या गैरलागी जनहितविरोधी धोरण भूमिकांचे समर्थन केलेले नसायचे.

राज ठाकरे यांना कसा विरोधी पक्ष अभिप्रेत आहे, ते ठाऊक नाही. तो भक्कम म्हणजे संख्याबळाने बलदंड असे त्यांना वाटत असेल, तर वेगळी गोष्ट आहे. कारण संख्याबळाने कुठल्याही सरकारला वाकवता येत नाही किंवा वाचवताही येत नाही.आजकाल निवडणुक निकालाने मिळालेले वा गमावलेले बहूमतही बदलता येत आणि तिथे संख्याबळाने बलवान असलेला विरोधी पक्षही कुठल्या कुठे बारगळून जातो. कर्नाटकातले उदाहरण आपल्यासमोर ताजे आहे. सत्ता गमावलेल्या कॉग्रेसने भाजपाला मोठा पक्ष असतानाही सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जनता दलाशी आघाडी करून संख्येने वर्चस्व स्थापन केले. तर त्यांच्याच आमदारांच्या राजिनाम्यातून विधानसभेची संख्याच बदलून  वेगळे बहूमत सिद्ध करण्यात आले. म्हणून विरोधी पक्ष संख्याबळाने बलवान असून सरकारला ताळ्यावर आणता येत नाही किंवा चांगला कारभार करायला भाग पाडता येत नाही. त्यासाठी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या उक्तीप्रमाणे नेमके ध्येय समोर ठेवून वैधानिक आयुधांचा उपयोग करू शकणारे लढवय्ये विधानसभेत पाठवता आले पाहिजेत. त्याविषयी आचार्य अत्र्यांनी सांगितलेला विनोदी किस्सा विसरता येत नाही. १९६० सालात संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावर विविध पक्षांची मिळून बनलेली संयुक्त महाराष्ट्र समितती मोडीत निघाली. त्यात विविध पक्षच सहभागी असल्याने त्याम्नी आपापले वेगवेगळे संसार थाटले. त्यामुळे विरोधी एकजुट मोडली आणि कुठल्याही पक्षात नसूनही समितीच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आलेले आचार्य अत्रे एकटेच समितीचे आमदार म्हणून शिल्लक उरले. पण अत्रे तितक्याच आग्रहाने कॉग्रेसच्या विरोधात तोफ़ा डागत होते आणि समिती मोडणार्‍या पक्षांना झोडपूनही काढत होते. नव्याने समिती उभी करून कॉग्रेसला शह देण्याची भाषाही अत्रे बोलत होते. सहाजिकच अत्र्यांची राजकीय टिंगल व्हायची. इतक्या दोनशे आमदारांच्या कॉग्रेसला एकटे अत्रे काय तोंड देणार असेही विचारले जायचे.

अशा कालखंडात भिवंडी येथे कुठेतरी अत्र्यांची सभा होती आणि आपल्या आक्रमकतेची ग्वाही देताना त्यांनी केलेला एक विनोद आठवतो. त्यांना विचारल्या जाणार्‍या एकट्या आमदाराच्या गोष्टीचा उल्लेख करून अत्रे तिथे श्रोत्यांना म्हणाले. ह्या भागात आसपास भरपूर गौळॊवाडे आहेत. म्हशी व गुरांचे गोठे आहेत. तुम्ही बघता ना? श्रोत्यांकडून होकार आल्यावर अत्रे म्हणाले, तिथे दोनशे म्हशी असतात. पण रेडा एकच असतो ना? म्हणून काम अडते का? ह्यावरून प्रचंड हास्याचा खळखळाट झालेला होता. तेव्हा अत्रे म्हणाले, तुम्ही गावठी लोक असून तुम्हाला मी काय म्हणाला ते कळले, पण सवाल करणार्‍या विद्वानाला मात्र कळले नाही. कारण तो समाजवादी होता. समाजवादी पक्षानेच समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय केल्याने समिती मोडली असा अत्र्यांचा आक्षेप होता. कम्युनिस्ट समिती काबीज करून आपला पसारा वाढवित आहेत असा समाजवादी आरोप होता आणि त्यातून समिती दुभंगली होती. त्यामुळे अत्र्यांचा समाजवादी मंडळींवर डुख होता. पण तयतला विनोद बाजूला ठेवून विरोधी पक्षाची शक्ती  संख्येत नसून परिणामांमध्ये असते, याचे भान येऊ शकते. त्याही नंतरच्या काळात कॉग्रेस कायम प्रचंड संख्येने निवडून येत राहिली. तर विरोधी पक्ष एकत्र येऊन वा वेगवेगळे लढूनही कधी शंभरी गाठू शकले नाहीत. मात्र म्हणून विधानसभेतील विरोधकांचा डंका दबदबा कधी कमी झाला नाही. एखाद्या जनहिताच्या विषयावर विरोधकांनी सरकारची इतकी कोंडी केलेली असायची की मध्यरात्रीपर्यंत बैठक चालायची. दुष्काळ हा आजचा नाही. १९७३ सालात दुष्काळ इतका भीषण होता, की हजारो बैलगाड्यांचा मोर्चा विरोधकांनी विधानसभेवर आणलेला होता. पण तो मोर्चा आणला गेला त्याही दिवशी विधानस्बहा शिस्तीने चालली होती आणि सरकारला धारेवर धरणार्‍या विरोधकांनी दुष्काळावर मात करायला सरकारला साथ दिली. त्यातून रोजगार हमई योजनेचा जन्म झाला होता.

राज ठाकरे यांच्या डोळ्यासमोर विरोधी पक्षाची कुठली कल्पना आहे, ते मला ठाऊक नाही. पण आज २०१९ च्या विधानसभेची निवडणूक वयाची नव्वदी पार केल्याने निवृत्ती पत्करून न लढवणारे गणपतराव देशमुख त्याच काळातले आणि त्याच पिढीततले आहेत. सहा दशके निवडणुकीच्या राजकारणात घालवून आणि नऊवेळा आमदार होऊनही त्याना आपला शेतकरी कामगार पक्ष सोडून अन्यत्र कुणाच्या वळचणीला जावे वाटलेले नाही. तसे बघायला गेल्यास दिर्घकाळ आमदार असूनही त्यांच्या मतदारसंघाचा कितीसा विकास झाला आहे? तो विकास करून घेण्यासाठी त्यांनी पक्ष बदलला नाही किंवा तिथल्या मतदारालाही गणपतराव नाकर्ते आमदार वाटले नाहीत. हा केवढा मोठा फ़रक आहे ना? आमदाराने करायच्या विकासाच्या कल्पना तेव्हा बहुधा मागासलेल्या होत्या आणि गणपतरावांच्या मतदारसंघातही अजून तो मागासलेपणा कायम असावा. शरद पवार आपल्याला सोडून गेलेल्यांना इतकी वर्षे गवत उपटत होता काय असा उपरोधिक सवाल करतात, त्यांच्याच पुलोद मंत्रीमंडळात गणतपराव प्रथम मुख्यमंत्री झालेले होते. पण तरीही विकास झालेला नाहीच. मग गवत उपटण्याविषयी काय म्हणायचे? पण तो मुद्दा नाही. सवाल आहे, गणपतराव देशमुखांनी विरोधी आमदार म्हणून गाजवलेल्या कारकिर्दीचा. त्यांना इतक्या वर्षात विरोधी आमदार म्हणून काम करताना अडचण आली नाही वा कुठे ते कमी पडले असे त्यांच्या मतदारालाही वाटलेले नाही. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आणखी एक मुद्दा म्हणजे भाजपाने वा फ़डणवीस यांनी विरोधी नेता़च पळवून सत्ताधारी पक्षात नेल्याची. खरेच विरोधी नेता वा विरोधी पक्षातला आमदार सत्तेत सहभागी झाल्याने लोकशाही दुबळी होते का? तसे असेल तर महाराष्ट्रात अशी परंपरा खुप जुनी आहे. समितीचे विरोधी नेता म्हणून रा. धों भंडारे यांनी काम केलेले होते. पुढे त्यांनीच सत्ताधारी कॉग्रेस पक्षात आश्रय घेतला. त्याला आता अर्धशतकाचा कालावधी होऊन गेला आहे. म्हणजे हा नवा प्रघात पडलेला नाही, तो जुनाच पायंडा आहे.

विरोधी नेत्यांवरून आठवले. जवळपास पुर्ण विधानसभा कालावधी राधाकृष्ण विखेपाटील कॉग्रेस गटाचे नेता म्हणून सभागृहात विरोधी नेतेपदी बसलेले होते. त्यांनी अखेरच्या सत्रात सत्ताधारी पक्षात जाऊन मंत्रीपद उपभोगले. पण त्यांच्यापेक्षाही अधिक काळ विरोधी नेतेपद उपभोगलेले नारायण राणे सत्ताधारी पक्षात जाण्यापुर्वी सहा वर्षे तरी सलग विरोधी नेतेपदीच विराजमान झालेले होते. त्यांच्या जागी शिवसेनेत नेता बदलीच्या हालचाली सुरू झाल्या आणि पक्षांतर्गत बेबनावाला काटशह देण्यासाठी राणे यांनी पक्षांतर केलेले होते. किंबहूना राज ठाकरे यांनीही अशाच अंतर्गत राजकारणाला विटून राणे यांच्या पाठोपाठ शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. विखेंनी भंडारे व राणे इत्यादींचीच परंपरा पुढे चालवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्यावरून किंवा आजकालच्या राजकीय घडामोडीवर विसंबून विरोधी पक्षाची भूमिका निश्चीत करून चालणार नाही वा भक्कम विरोधी पक्ष उभा करता येणार नाही. विधानसभेत मुद्देसुद बोलून वा तिथली घटनात्मक आयुधे कुशलपणे वापरूनच विरोधी पक्षाचा दबाव निर्माण करता येईल. कधीकाळी गणपतराव, रामभाऊ म्हाळगी, उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळूप, मृणाल गोरे इत्यादिकांनी जो दबदबा आमदार म्हणून उभा केला, तितक्या ताकदीचे चारपाच आमदारही सरकारला धाकात ठेवू शकतात. त्यासाठी संख्याबळाची गरज नसते. अशा अभ्यासू व आपल्या भूमिका नेमक्या असलेल्या विरोधी आमदार सदस्यांची मोठी गरज असते आणि आज त्यांचाच दुष्काळ पडलेला आहे. किंबहूना कुठल्या पक्षाकडे विरोधात बसायची इच्छाच उरलेली नाही. प्रत्येकाला सत्तेत जायचे आहे. म्हणूनच अभ्यासू वा धाक निर्माण करणारा विरोधी पक्ष उरलेला नाही. जे कोणी कुठल्याही पक्षातर्फ़े निवडणूका लढवतात, त्यांना पक्ष व आरंभीची निवडणूक आपल्या सत्तेच्या शिडीची पहिली पायरी वाटत असते. मनसेचे पहिल्या फ़ळीतले अनेक आमदार नेते म्हणून अवघ्या पाचसहा वर्षात अन्यत्र गेले ना?

इथे एक गोष्ट वा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. पन्नास वर्षापुर्वीच्या विरोधी पक्षांपाशी सत्तेत जाण्याची इच्छा नव्हती किंवा इर्षाही नव्हती. आपण ज्या विधारधारेचे आहोत, त्याची राज्य करण्याविषयीची भूमिका घेऊन ते विधानसभेत, लोकसभेत जायचे आणि त्यांना कुठलेही सत्तापद भुलवू शकत नसायचे. त्यामुळे आपल्याला अमान्य असलेल्या सरकार वा सत्ताधारी पक्षाला कैचीत पकडून त्याल जनहितासाठी भाग पाडणारा कारभार करण्यासाठी झटणार्‍या आमदारांचा विरोधी पक्षात भरणा असायचा. सत्ताधारी पक्षातही मंत्री वा मुख्यमंत्री होण्याची इर्षा नसायची. तर आपल्याच पक्षाच्या भूमिका वा जनहितासाठी आपापल्या भागातील जनतेला पक्षाच्या मागे उभे करण्याला राजकीय कार्य मानले जात होते. त्यातूनच आजचे सत्ताधीश सत्तेपर्यंत पोहोचले आहेत आणि ज्यांना सत्तेची आमिष बळी पाडू शकते, त्यांना गळाला लावण्याची खेळी हा धुर्तपणा वा मुत्सद्देगिरी मानली जाऊ लागली आहे. जनहिताशी कोणाला कर्तव्य उरले आहे? प्रत्येकाला सत्तेच्या खुर्चीत पोहोचण्यासाठी पहिली पायरी म्हणून पक्षात यावे लागते. कारण पक्षही तीच विचारधारा घेऊन बनलेले आहेत. जुन्या काळात डांगे, अत्रे वा एसेम जोशी इत्यादी नेत्यांनी आमच्या हाती सत्ता देऊन बघा असे आवाहनही मतदाराला कधी केले नाही. त्यामुळे मतदार त्यांच्याकडे आपले हित जपणारे चौकीदार म्हणूनच बघत होता आणि निवडून देत होता. १९९० नंतरच्या काळात आपल्या हाती सत्ता देऊन बघा, परिवर्तन घडवू अशी भाषा विरोधी राजकारणात बाळासाहेब व शिवसेनेतर्फ़े बोलली गेली. तोपर्यंत जे कोणी विरोधी पक्ष होते, त्यांची निवडणूका लढवण्याची भूमिकाच मुळात सरकारला लगाम लावणारा विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत बसायची असे. तसे त्यांनी कधी बोलून दाखवले नाही, की मतदाराला जाहिर आवाहन केले नाही. राज ठाकरे यांनी तसे जाहिरपणे प्रथमच सांगितले हे खरे आहे. पण आपण विरोधी पक्ष म्हणूनच जन्माला आलोत हीच १९९० पुर्वीच्या विरोधी पक्ष व नेत्यांची भावना होती आणि त्यांनी ती पुर्ण शक्तीनिशी वठवलीही होती. गेल्या पाच वर्षातल्या विरोधी पक्षांना आपली भूमिकाच कधी कळली नाही. मग वठवण्याचा विषयच कुठे येतो?

कॉग्रेस पंचविशी तरी गाठेल?

Image result for EVM

कुठल्याही लढाईत हरण्याची तयारी करूनच जिंकायला उतरावे लागते. आताही दोन्ही कॉग्रेस पक्षांची स्थिती त्यांना वाटते तितकी किंवा चर्चेतून मांडली जाते, तितकी खराब नाही. ज्या दोन पक्षांकडे एकत्रित ३४ टक्के मते लोकसभा हरतानाही असतात, त्यांना त्यातून नव्या उमेदीने उभे रहाण्यासाठी आवश्यक इतकी शक्ती ताकद नक्कीच असते. मुद्दा असतो, ती ताकद वापरून लढतीला सामोरे जाण्याचा. त्यात होणार्‍या परिणामांची चिंता करून लढता येत नाही. पराभवाच्या भयाने लढतीतून माघार घेतल्यासारखे वागण्याने देखावा उभा रहातो. पण लढाई होत नाही. जिंकण्यासाठीच लढाई असते, हे खरेच आहे. पण सतत विजय मिळवणाराही संभाव्य पराभव होण्याची शक्यता लक्षात घेऊनच लढाईत उतरत असतो. फ़क्त विजयासाठीच लढायचे, अशी कुठलीही लढाई नसते. जेव्हा तेवढ्या पुरतीच लढाई मर्यादित होऊन जाते तेव्हा प्रत्यक्षात लढायची इच्छाच मरून गेलेली असते. जिंकणारच नाही, तर लढायचे कशाला? अशी धारणा मग मनाला घेरते आणि पराभवाची प्रतिक्षा सुरू होते. आज युतीपक्ष जितके आवेशात नाहीत, त्यापेक्षा विरोधी पक्ष मरगळलेले आहेत. अन्यथा त्यांनी लोकसभेतील पराभवानंतरच विधानसभेच्या लढाईसाठी कंबर कसली असती. पण तसे होताना दिसलेले नाही किंवा दिसण्याची शक्यताही नाही. कारण ही इच्छा कधीच मरून गेलेली होती. कॉग्रेसने दिर्घकाळ महाराष्ट्रात निवडणूका जिंकल्या, किंवा सत्ता मिळवली, त्याची अनेक कारणे दिली जातात. संस्थात्मक कामाचेही नको तितके कौतुक होते. पण वास्तवात कॉग्रेसने यापुर्वीही कधी निवडणूका जिंकण्याच्या इर्षेने वा हरण्याची शक्यता असूनही आवेशात लढवलेल्या नव्हत्या. विरोधात कुठले सबळ आव्हान नव्हते, म्हणून कॉग्रेस जिंकत होती व जिंकत राहिली. जेव्हा आपले सर्वस्व पणाला लावण्याची परिस्थिती निर्माणा झाली, तेव्हा कॉग्रेसच्या नेत्यांचे व संघटनेचे हातपाय गळालेले आहेत.

नेहरू वा इंदिराजी, राजीव गांधी आपल्याला जिंकून देणार आहेत. आपण फ़क्त सत्ता उपभोगायची या मानसिकतेने कॉग्रेसमधला आवेश कधीच संपलेला होता. भाजपात तो आवेश नव्याने संचारलेला आहे आणि म्हणूनच एका विजयानंतर दुसरा विजय संपादन करण्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे. सत्तापदे वा अधिकारपदे मिळवण्यासाठी झुंजणारा जमाव अशी कॉग्रेसची या कालखंडात स्थिती होऊन गेली. विचारधारा मागे पडली. त्याच काळात पक्षाला विचारधारेला विजयी करण्याची जिद्द बाळगणार्‍यांची मांदियाळी भाजपात मोदी शहांच्या नेतृत्वाखाली एकत्रित होत गेली. त्याने मोठा फ़रक पडलेला आहे. त्यातील उत्साहाचे व संघटनेचे अक्राळविक्राळ स्वरूप बघूनच अन्य पक्ष व कॉग्रेस गडबडून गेली आहे. अशा संघटनात्मक मोहिमेतून मिळणारे यश, कॉग्रेससहीत त्यांनीच बाटवलेल्या अन्य पक्षांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे सोपी कारणमिमांसा करून पळवाटा शोधल्या जातात. लढायची इच्छाच मेली मग, आपल्या अंगभूत शक्तीचाही साक्षात्कार होत नाही, की कुवत लक्षात येत नाही. लोकसभा निवडणुकीत दोन्ही कॉग्रेसला मिळालेली ३४ टक्के मते ही छोटी बाब नाही, हे मला दिसू शकत असेल, तर दोन्ही कॉग्रेसच्या मुरब्बी नेत्यांना त्यातली क्षमता कशाला समजत नाही? झेप घेण्य़ासाठी ती पक्की जमिन आहे. तेच पंख सुद्धा आहेत. आपण उड्डाण केले आणि कोसळून पडलो तर? असा भयगंड असलेल्यांना अवकाशात झेपावता येत नसते आणि म्हणूनच दोन्ही कॉग्रेसला ३४ टक्के मतांची महत्ता उमजलेली नाही. त्याच आधारावर विधानसभा जिंकण्याचा मनसुबाही करता आलेला नाही. आपल्याच गोतावळ्यातील खर्‍या कार्यकर्त्याला सशक्त करून मैदानात उतरण्याची इच्छा नेतृत्वामध्ये उरलेली नाही. म्हणून तर भाजपा व शिवसेना यांच्यासाठी आगामी विधानसभेत सर्वात मोठी जमेची बाजू विरोधकातली मरगळ हीच आहे.   

या प्रकरणाच्या आरंभीच जी आकडेवारी मांडलेली आहे, तिचा जरा उलट्या दिशेनेही अभ्यास तपासून बघता येईल. ६० टक्केहून अधिक मते युतीला लोकसभेत मिळाली त्या जागा युतीसाठी हक्काच्या असतील तर ५५ टक्केहून जास्त मते विरोधात गेलेल्याही ६८ जागा आहेत आणि तिथे युतीला सहजगत्या जिंक्ण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणजेच त्या विरोधकांसाठी हक्काच्या व जिंकायला सोप्या जागा आहेत. अशा दोन्ही बाजूच्या १२८ जागा बाजूला काढल्या, तर खरी लढाई उरलेल्या १६० जागांसाठी होऊ शकते. युती वा विरोधी पक्षांना अटीतटीची लढाई होण्या़साठी ही रणनिती म्हणता येईल. ज्याला तुम्ही प्रतिस्पर्धी समजता किंवा लढायला उभे ठाकता, त्याच्याशी नेमके कुठे दोन हात करता येतील; त्याची योजनाबद्ध तयारी करण्य़ालाच युद्धनिती म्हणतात. थोडक्यात खिंडीत गाठणे असे म्हणता येईल. लोकसभेने युतीतल्या शिवसेना व भाजपाला ६० जागी अभय दिलेले असले, तरी १६० जागी अटितटीची लढाई करण्यातून अभय दिलेले नाही आणि तिथेच युतीला खिंडीत कसे गाठावे, त्याची तयारी गेल्या दोन महिन्यात दोन्ही कॉग्रेस पक्षांनी पुढाकार घेऊन करायला हवी होती. १९९६ सालात युतीने लोकसभेच्या ३३ जागा जिंकल्या, तेव्हाही असेच काहीसे समिकरण शरद पवार यांनी महाराष्ट्रात यशस्वी करून दाखवलेले होते. त्यांनी तमाम विरोधी पक्षांना एकत्र करून १९९८ साली युतीविरोधात एकास एक लढती होतील यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. त्यात रिपब्लिकन गटाचे चार चेहरे लोकसभेत पोहोचले होते. युतीला अवघ्या १० जागी समाधान मानावे लागलेले होते. एकास एक लढतीमध्ये त्या आघाडीला ४८ टक्के मतेही मिळालेली होती. मग आज ती इच्छाशक्ती पवार कुठे हरवून बसले आहेत? मुद्दा इतकाच, की लढायची इच्छा व जिद्द महत्वाची असते. त्याचाच अभाव असेल, तर आपले बलस्थानही बघता येत नाही.

आजचे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष तिथेच तोकडे पडलेले आहेत. १९९८ सालचे उदाहराण इतक्यासाठी दिले, की तेव्हाही पवारांचे अनेक एकनिष्ठ अपक्ष आमदार म्हणून सत्तेतल्या युतीच्या पाठीशी उभे होते आणि त्यांच्यासाठी पवार रडत बसलेले नव्हते. त्यांनी एकजुटीचा जो चमत्कार घडवला, त्याच्याच परिणामी वर्षभराने राष्ट्रवादी नावाच्या नव्या पक्षाचा तंबू थाटल्यावर त्यापैकीच् बहुतांश अपक्ष आमदार त्यांच्या पक्षात सत्ता सोडून सहभागी झालेले होते. पण पवारांना किंवा त्यांच्याच निकटवर्ती सहकार्‍यांना आजकाल आपलाच इतिहास आठवत नसेल, मग काय व्हायचे? त्यांना आपल्याच पाठीशी असलेली ३४ टक्के मत किती मोलाची असू शकतात, याचे भान कसे यावे? त्यांना लोकसभा मतदानातील जमेची बाजू कशी समजून घेता येईल? युतीने ५२ टक्के मते मिळवलेली असली तरी लढण्यासारख्या १६० जागा निवडणूक व निकालांचा चेहरामोहरा बदलू शकतात, हे कसे कळावे? मुद्दा लढण्याची इच्छा इतकाच असतो, एकदा लढायची इच्छा असली, मग कुठल्याही प्रतिकुल परिस्थितीत उडी घेता येते आणि परिस्थितीला परतून लावण्याचे बळ अंगात संचारत असते. नेत्याच्या अंगात बळ संचारले, मग त्याच्या प्रभाव पक्षावर आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसू लागतो. २०१४ सालात मोदींनी भाजपाची सुत्रे हाती घेतल्यावर भारतीयांनी तो चमत्कार आपल्या डोळ्यांनी बघितलेला आहे. गुजरातचा माध्यमांनी बदनाम केलेला मुख्यमंत्री पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरला आणि मरगळलेल्या भाजपामध्ये जणू विजेचा संचार झाला. विस्कळीत वा विखुरलेला भाजपाचा कार्यकर्ता, समर्थक किंवा पाठीराखा एकासुरात गर्जू लागला, डरकाळ्या फ़ोडू लागला. विश्लेषक वा माध्यमांनी कितीही प्रतिकुल बातम्या वा अहवाल दाखवले, म्हणून त्या कार्यकर्ता किंवा त्यांच्या नेत्याचा भ्रमानिरास करणे कोणाला शक्य झाले नाही. आठ लोकसभा निवडणूकांनंतर एकाच पक्षाला बहूमत मिळण्याचा चमत्कार घडून गेला.

तेव्हापासून मोदींनी वा नंतर त्यांच्या मदतीला आलेल्या अमित शहांनी आपल्या कार्यकर्ता पाठीराख्याला किंचीतही मरगळ येऊ दिलेली नाही. काही जागी अपयश आले तर बाकी ठिकाणी जबरदस्त विजय संपादन केले. पण ज्यांच्या बळावर पक्ष व संघटना चालतात, त्या कार्यकर्ता अनुयायांना निराश होण्याची उसंत देऊन चालत नसते. एका पराजयातून बाहेर पडण्यासाठी नव्या विजयाची स्वप्ने दाखवून पुन्हा लढायला कटीबद्ध करायचे असते. एकामागून एक प्रांत पादाक्रांत करताना त्या विजयाची मजा चाखण्यापेक्षा मोदी-शहांनी नवनवी आव्हाने आपल्या फ़ौजेसमोर उभी केली. त्याच्याच परिणामी बंगाल त्रिपुरा ह्या अशक्य वाटणार्‍या पुरोगामी बालेकिल्ल्यात भाजपाचा झेंडा फ़डकवून दाखवला. त्यामागे खरी शक्ती कार्यकर्ता व त्यांना मिळालेले नेतृत्व याची होती. त्यांनी पराजयातही संधी शोधण्याची तयारी ठेवली. म्हणून तर तीन महिन्यात तीन राज्यातला विधानसभेचा पराभव पचवून लोकसभेत तिथेच मोठे यश मिळवता आले. त्यांनी गमावलेल्या जागांपेक्षा मिळालेल्या मतांची टक्केवारी अभ्यासली व त्यातली संधी साधली. मग महाराष्ट्रात दोन्ही कॉग्रेस वा विरोधकांना संधी नाही, असा दावा कोण करू शकतो? निदान मी तरी करणार नाही. पण विरोधी पक्ष लढायला सज्ज असतील वा प्रयत्न करणार असतील, तरचा विषय आहे. ती लढण्याची इच्छाशक्तीच लोकसभा निकालानंतर दिसलेली नाही आणि विधानसभेचे वेध लागलेले असताना, त्यांना इव्हीएम विरोधी आंदोलनाचे डोहाळे लागलेले आहेत. मग राजकीय चमत्काराची अपेक्षा कोण करू शकेल? म्हणूनच इव्हीएम ही पळवाट वाटते. पराभूत मानसिकतेचे लक्षण वाटते. अन्यथा ३४ टक्के मते व लढण्यासारख्या १६० जागांची आखणी करताना कॉग्रेस आघाडी दिसली असती. त्यांनी वंचित आघाडी वा अन्य कोणाच्या कुबड्या मिळतील काय, याची आशाळभूत प्रतिक्षा केली नसती.

शिवसेना व भाजपा युतीचा प्रचार व त्यांच्यातला आत्मविश्वास त्याच विरोधकांच्या अनिच्छेतून आलेला आहे. आपल्यासमोर लढायला कोणी उभे नाही, म्हणून सहज जिंकणार याची युतीला खात्री आहे. ती खात्री एका बाजूला जिंकण्यासारख्या २५० जागातील मतांच्या टक्केवारीतून आलेली आहे. तशीच दुसरीकडे ती हमी विरोधी पक्षांच्या मरगळीतून आलेली आहे. एकूण विधानसभा निवडणूका यावेळी तरी केवळ उपचार बनून गेला आहे. म्हणूनच इर्षेने लढू बघणार्‍या दोन दुबळ्या किंवा लहान पक्षांसाठी ही निवडणूक मला मोलाची वाटते आहे. त्यात सत्तेत कोण येणार असा सवालच नाही. युती सत्तेत येईल आणि भरभक्कम बहूमताने येईल, असे ठामपणे सांगायला अजिबात हरकत नाही. पण विरोधात कोण बसणार आणि नंतरच्या पाच वर्षात कुठले पक्ष महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचा अवकाश व्यापणार, त्याचा निकाल यावेळच्या विधानसभा निवडणूकीतून लागायचा आहे. १९९० च्या विधानसभेसारखी काहीशी स्थिती आहे. तोपर्यंत राज्यात जनता दल, समाजवादी, कम्युनिस्ट, शेकाप, रिपब्लिकन असे विरोधी पक्ष होते. १९९० नंतर त्यांचे नामोनिशाण पुसले गेले. मग कॉग्रेस उरली आणि विरोधात शिवसेना व भाजपा अशा नव्या विरोधी पक्षांचा राजकीय उदय झाला. कारण सगळे तात्कालीन विरोधी पक्ष लढण्याच्या मनस्थितीत नव्हते, किंवा राजकीय इच्छशक्ती गमावून बसलेले होते. आजही राष्ट्रवादी किंवा कॉग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणूनही लढायला राजी नसतील, तर अन्य कुणाला ती जागा भरून काढावी लागणार आहे. मतदारही कदाचित त्याच नव्या विरोधी पक्षाच्या प्रतिक्षेमध्ये बाहेर पडणार असेल, तर दोन्ही कॉग्रेस पक्षांचे राज्यातील भवितव्य काय असेल? किंबहूना त्यांना आगामी विधानसभेनंतर काही भवितव्य आहे का? आक्टोबर अखेर आपल्याला राज्याचा मतदार त्याचेच उत्तर मतमोजणीतून देणार आहे. कारण सत्तेत कोण येणार, हे दोन्ही कॉग्रेसने आधीच मान्य केलेले आहे ना? सवाल दोन आहेत. युती २२०+ की एकटा भाजपा १५०? आणि विरोधी पक्षात कोणाचा उदय होणार आहे?  .  (संपुर्ण)

Friday, October 18, 2019

२२० आमदार कुठून येणार?

महायुतीला जागा किती?  (३)
pawar fadnavis के लिए इमेज परिणाम

आपल्याकडे जी निवडणूक पद्धती आहे, तिथे कुठलाही उमेदवार पन्नास टक्केहून अधिक मते मिळाली म्हणून निवडून येत नाही. तर जितके उमेदवार मैदानात उभे असतात, त्यातल्या ज्याला सर्वाधिक मते मिळतात तोच जिंकला असे जाहिर होत असते. अर्थात तीही झालेल्या मतदानातील सर्वाधिक मते असतात. त्यामुळे अनेकदा एकूण मतदारांच्या संख्येतील दहा टक्के मतेही न मिळालेला उमेदवार विजयी घोषित होत असतो. त्यालाच मतविभागणीचा फ़ायदा किंवा तोटा असे म्हटले जाते. पण म्हणूनच सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष बहूमताच्या समिप असतो आणि त्यातही किमान मतदारसंघात केंद्रीत मतांचा गठ्ठा असलेला पक्षही बहुमताचा पल्ला गाठू शकत असतो. मोदींना २०१४ नंतर ३१ टक्के मतांचा पंतप्रधान म्हटले गेले. कारण त्यांनी पक्षाला ३१ टक्के मतांमध्ये ५२ टक्के जागा जिंकून दिल्या होत्या. जिथे मतांची विभागणी अधिक होते, तिथे अशा रितीने सहज सत्ता संपादन शक्य असते. म्हणून तर दिर्घकाळ उत्तरप्रदेशात २७-३१ टक्के मतांच्या बळावर मुलायम वा मायावती सहज बहूमत मिळवू शकत होत्या. पण मोदींच्या आगमनाने ३५ टक्क्याहून अधिक मते मिळताच भाजपने तिथे चमत्कार घडवला. ही एका मतदारसंघ वा एकूण मतदारसंघाची स्थिती असते आणि म्हणूनच निकालांचे आकडे खुप काही शिकवतात व सांगतात. एक सव्वा टक्का मतांमध्ये शिवसेनेला लोकसभेत १८ जागा मिळतात आणि १९ टक्के मते मिळवूनही कॉग्रेसला अवघ्या ५२ जागांवर समाधान मानावे लागते. लोकसभेत मतदारासमोर दोनतीन उमेदवारातून निवड करण्याचेच आव्हान असते. पण विधानसभेत ते अधिक विभागणीचे होऊन जाते. म्हणजे गेल्या खेपेस महाराष्ट्रात जशा चौरंगी लढती झाल्या तशी निवडणूक. चारपाच् उमेदवारात मते विभागली जाताना २५-३० टक्केवालाही मोठी बाजी मारून जातो. मग ५१ टक्के मते एकत्रित मिळवणार्‍या शिवसेना भाजपा युतीला यावेळच्या विधानसभेत किती जागा मिळतील? लोकसभेचे आकडेच त्याचे उत्तर देतात.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत आणि प्रत्येक लोकसभा जागा सहा विधानसभा मतदारसंघात विभागली गेलेली आहे. म्हणूनच विधानसभेच्या मतदारसंघाची संख्या २८८ आहे. एप्रिल मे महिन्यात झालेल्या लोकसभेच्या मतदानात या सर्व मतदारसंघात जनतेने कसा कौल दिला, त्याचे केंद्रानुसारचे आकडे उपलब्ध आहेत. मग त्यांची मोजणी विधानसभा जागेनुसार तपासल्यावर काय हाती लागते? त्यापैकी ६० मतदारसंघ असे आहेत, तिथे युतीच्या उमेदवाराला ६० टक्केहून अधिक मते मिळाली आहेत. म्हणजेच कितीही उलथापालथ झाली, तरी त्या ६० जागी युतीपक्षांचाच उमेदवार नक्की जिंकून येणार. हे आजच सांगता येईल. अशा मतदारसंघांची नावेही आजच देता येतील. त्यातल्या फ़ारतर एकदोन जागीच गडबड होऊ शकेल. अन्यथा निवडणूकीपुर्वीच त्या जागा युतीने जिंकल्या, असे छातीठोकपणे सांगता येईल. ह्या ६० जागा वगळल्या तर उरतात २२८ जागा. त्यापैकी आणखी ९० जागा अशा आहेत, जिथे युतीच्या उमेदवाराला लोकसभेत जनतेने ५० टक्केहून अधिकची मते दिलेली आहेत. म्हणजेच सगळे विरोधक एकजुट करून उभे असले, तरी तिथे युतीच्याच उमेदवाराचे यश जवळपास निश्चीत आहे. पण त्याला डोळे झाकून यश मिळेल असे म्हणता येत नाही. त्याने ती जागा लढवली पाहिजे आणि डोळसपणे तयारीही केली पाहिजे. फ़क्त त्या ९० जागा युतीपक्षांसाठी सहजशक्य आहेत, असे नक्कीच म्हणता येते. थोडक्यात राज्यातील १५० जागा अशा आहेत, जिथे लोकसभेत मतदारानेच युतीच्या एकजुटीला निर्विवाद कौल देऊन ठेवलेला आहे. युतीने एकदिलाने त्या जागा लढवाव्यात, इतकीच मतदाराची अपेक्षा आहे. सहाजिकच बहूमत कोणाला मिळणार हा विषय उत्सुकतेचा उरलेला नाही. युती करा आणि सत्ता निश्चीत मिळवा, असाच संकेत मतदारानेच दिलेला आहे. या दिडशे जागा विरोधकांनी लढवायच्या आहेत. पण यशाची अपेक्षाही न करता. हे सत्य आहे.

गणित इतके सोपे आहे. त्यामुळे विरोधकांनी लढवाव्यात अणि जिंकण्याची आकांक्षा बाळगावी; अशा जागा उरतात फ़क्त १३८. यातही सत्ताधारी शिवसेना भाजपा युतीला संधी नाही काय? नक्कीच आहे. भरपूर संधी आहे. कारण या उरलेल्या १३८ जागांपैकी आणखी ७० जागा अशा आहेत, की जिद्दीने लढवल्या तर युतीला तिथेही प्रयत्नांनी यश मिळणे निश्चीत आहे. कारण या सत्तर मतदारसंघात युतीच्या उमेदवाराने लोकसभेत ५० टक्क्यांपेक्षा कमी, पण ४५ टक्केहून अधिक मते मिळवलेली आहेत. त्यापैकी काही जागी तर एकदोन टक्क्यांनीच पन्नाशी गाठायचे राहून गेलेले आहे. म्हणजेच तिथेही युतीपक्षांचेच पारडे जड आहे. याचा साधासरळ अर्थ इतकाच होतो, की महाराष्ट्र विधानसभेच्या लढतीमध्ये विरोधी पक्ष कुठेही सत्ताधार्‍यांशी तुल्यबळ लढत देण्याच्या स्थितीत नाहीत. कारण ४५ ते ६० टक्के मते मिळवलेल्या युतीच्या जागांची संख्याच २२० इतकी झालेली आहे. ज्या तयारीने शिवसेना व भाजपा मैदानात उतरलेले आहेत, त्याकडे बघत्ता अशा २२० जागी विरोधकांना किंचीतही वाव असू नये, अशीच त्यांची सज्जता आहे. आता या २२० जागा वगळल्या तर विरोधकांना खरीखुरी लढत देण्यासाठी उरलेल्या जागा अवघ्या ६८ असून तिथेही आरामात विरोधकांना बाजी मारत येण्याची सुविधा मतदाराने ठेवलेली नाही. कारण त्या ६८ जागांपैकी आणखी ३० अशा जागा आहेत, की सेना भाजपाला त्यात बाजी मारण्याची संधी मतदाराने राखून ठेवलेली आहे. कारण त्या ६८ जागांपैकी ३० जागी युतीच्या उमेदवाराने लोकसभेत ४० टक्केहून अधिक मते मिळवली आहेत. याचा एकत्रित अर्थ समजून घेतला पाहिजे. ४० ते ६०+ टक्के मते युतीने मिळवलेले विधानसभेचे एकूण २५० मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी एकाही जागी सैलपणे निवडणूक लढवण्याची युतीपक्षांची तयारी नाही. हा २५० आकडा मोठा गंमतीशीर आहे.

ओगस्ट महिन्याच्या आरंभी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी अमरावती येथून महाजनादेश म्हणून प्रचारयात्रा सुरू केली. तिच्या शुभारंभासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंग अगत्याने उपस्थित होते आणि त्यांनी युती २५० जागा जिंकून सत्ता कायम राखणार, असा आत्मविश्वास त्यावेळच्या भाषणातून व्यक्त केला. तो आकडा त्यांनी मनातले मांडे म्हणून व्यक्त केलेला नाही, हे उपरोक्त विवेचनातून लक्षात आलेले असेल. आजवरच्या निवडणूकीच्या इतिहासात महराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाला इतक्या मोठ्या संख्येने मतदारसंघात असे मताधिक्य मिळालेले असेल किंवा नाही, याची शंका आहे. पण युतीने तो पराक्रम केला आहे आणि त्याची पुनरावृत्ती होण्याला सध्या तरी पर्याय दिसत नाही. कारण युतीच्या विरोधात ज्यांनी लढाई लढवायची आहे, त्यांच्यापाशी यापैकी कुठलीही माहिती असल्याचे संकेतही अजून मिळाले नाहीत. किंबहूना लढायच्या कुठल्या जागा आणि जिंकायची संधी कुठे आहे, त्याचा कुठलाही तपशील विरोधकांनी जमवलेलाही नसावा. २५० जागी युती ताकदीने लढवून सर्वच जागा जिंकण्याची स्थिती असेल, तर विरोधकांसाठी अवघ्या ३८ जागा जिंकायची आशा दाखवणार्‍या उरतात. त्यांचे मनसुबे तर सत्तापालट करण्याचे आहेत. याचा सरळ अर्थ विरोधकांना आपण कुठल्या लढाईच्या मैदानात उतरतो आहोत, त्याचाही थांगपत्ता नसावा. २०१४ सालच्या लोकसभेत विरोधकांची स्थिती यापेक्षा खुप चांगली होती. यावेळी ती आणखी खालावलेली आहे. पण काम करण्यापेक्षा वल्गना करण्यातच कालापव्यय केला असेल, तर त्याचे खापर सत्ताधारी पक्ष वा इव्हीएम यंत्रावर फ़ोडून काय मिळणार आहे? जिंकायच्या जागा या लढायच्या जागांमधून येतात आणि लढायच्या जागा अटीतटीने लढवाव्या लागत असतात. नुसते उमेदवार उभे करून लढती होत नाहीत वा बाजी मारता येत नसते. त्यासाठी खुप मोठे धाडस व तयारीही करावी लागत असते. 

राज्यातील लोकसभा मतदानाच्या आकड्यांची महत्ता अशा जागा शोधल्यावर कळत असते. युतीचे ४१ खासदार निवडून आले, याला जितके महत्व नसते तितकी त्या लढतीमध्ये युतीने मिळवलेल्या मतांच्या टक्केवारीची महत्ता असते. ती मते कुठे साठलेली व संचित आहेत किंवा विखुरलेली आहेत, त्याचा मोठा प्रभाव जय पराजयावर पडत असतो. तीन राज्यातील विधानसभा निवडणूकीत भाजपाला बहूमत गमावण्याची पाळी आल्याचा खुप डंका पिटला गेला. पण तरीही त्याही राज्यात जिंकलेल्या कॉग्रेस पक्षाला तुल्यबळ मते भाजपाने मिळवली होती. नंतर आलेल्या लोकसभा मतदानात तिथे योग्य ती डागडुजी करून भाजपाने मतांची टक्केवारी वाढवून आपले यश पुन्हा अबाधित केले. एक गोष्ट मात्र नक्की असते. लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठी मतदान होत नाही. म्हणूनच चार महिन्यापुर्वी ज्यांनी युतीच्या उमेदवाराला मते दिली, तो प्रत्येकजण तसाच्या तशा पुन्हा युतीला मत देईल, अशा भ्रमात शिवसेना वा भाजपानेही राहुन चालणार नाही. यातला ठराविक मतदार आपली निवड विधानसभेला बदलतही असतो. अनेकदा त्याला राज्यातले त्याच पक्षाचे नेतृत्व मान्य नसते, पण लोकसभेतील नेतृत्व आवडत असते. किंवा अनेकदा पक्षापेक्षाही स्थानिक पातळीवरचा वेगळा उमेदवारही त्याचे मत बदलून युतीपासून दुर घेऊन जाऊ शकत असतो. म्हणूनच युतीलाही लोकसभेचे आकडे फ़क्त संकेत म्हणूनच घ्यावे लागतात. अनेकदा लोकप्रिय पक्षाचा नावडता उमेदवार नाकारण्यासाठीही स्थानिक मतदार दुसर्‍या नावडत्या पक्षाची पर्याय म्हणून निवड करू शकत असतो. शिरजोर व बलवान सत्ताधारी पक्षाशी दोन हात करताना विरोधातल्या पक्षांनी म्हणूनच अशा अनेक गोष्टीचा अभ्यास करून आपली रणनिती बनवायची असते. जिथे तोकडे पडले तिथे थोडी डागडुजी करून लढाईला सामोरे जायचे असते. पण इथे विरोधक इव्हीएमचे रडगाणे रडण्यात रमलेले आहेत.

पराभूत मानसिकतेने कोणी समोर लढायला उभा असेल, तर शक्तीमान माणसाला त्याच्याशी तुल्यबळ लढत देण्याचीही गरज उरत नाही. ज्या पद्धतीने राज्यसभेत विविध विधेयके व प्रस्ताव अमित शहांनी रेटून संमत करून घेतले, त्यातून संख्याबळानेही विरोधकांना जिंकता येत नसल्याची ग्वाहीच दिली गेली आहे. २०१४ नंतरच्या मोदी सरकारला पदोपदी ज्या राज्यसभेत कॉग्रेस आणि विरोधकांनी नमवले होते, त्याचा मागमूस आजच्या मोदी सरकारला होणार्‍या विरोधात आढळून येत नाही. तेव्हा तिहेरी तलाक विरोधातल्या विधेयकाला विरोधकांनी राज्यसभेत रोखून धरले होते. तेव्हापेक्षा आज राज्यसभेतील विरोधकांची शक्ती फ़ार कमी झालेली नाही. आजसुद्धा राज्यसभेत भाजपाचे बहूमत नाही वा अगदी एनडीएचेही बहूमत नाही. किंबहूना संख्याबळाने बघितले तर विरोधकांचे राज्यसभेत बहूमत आहे. म्हणूनच मनात आणले तर या पहिल्याच अर्थसंकल्पी अधिवेशनातही मोदी सरकारची काही प्रमाणात कोंडी करणे विरोधकांना अशक्य नव्हते. किमान माहितीचा अधिकार कायदा वा तलाक अशा विधेयकात विरोधकांना सरकारची कोंडी करता आली असती. पण तलाक प्रकरणात कॉग्रेसने साधा आपल्या सदस्यांसाठी व्हीपही काढला नाही आणि युएपीए ह्या कायद्यात दुरूस्ती करणारे विधेयक तर प्रचंड बहूमताने राज्यसभेत संमत झाले. त्यातून विरोधकांची पराभूत मानसिकताच समोर येते. जी स्थिती तिथे आहे, त्यापेक्षा काडीमात्र वेगळी स्थिती आज महाराष्ट्राच्या विधानसभा लढतीमध्ये दिसत नाही. भाजपा किंवा युतीने आजच निवडणूका जिंकलेल्या आहेत, अशाच मनस्थितीत केवळ निवडणूकांचा उपचार पुर्ण करण्यासाठी विरोधी पक्ष हातपाय हलवित असल्याचे साफ़ नजरेत भरते आहे. पण म्हणून भाजपा किंवा शिवसेना हे सत्ताधारी पक्ष अजिबात गाफ़ील नाहीत आणि निर्विवाद विजय मिळवण्यासाठी कंबर कसून उभे ठाकले आहेत.   (अपुर्ण)

पराभवाची मस्ती

महायुतीला जागा किती?  (२)
Image result for rahul in maharashtra
लागोपाठचे पराभव आणि गमावलेली सत्ता यामुळे कॉग्रेससहीत विरोधी पक्ष कमालीचे विचलित आहेत. पण त्यांना वास्तविक विचार करण्याची बुद्धी सुचलेली नाही. अन्यथा त्यांनाही समजू शकले असते, की २०१४ सालात युतीला अधिक जागा मिळाल्या, तरी मतांची टक्केवारी मोठी नव्हती. जागा कमी झाल्या, तरी दोन्ही कॉग्रेस पक्षांच्या एकत्रित टक्केवारीत फ़ार मोठी घट झालेली नव्हती. २००९ सालात चांगल्या जागा फ़क्त ३९ टक्के मतांवर मिळाल्या होत्या आणि २०१४ मध्ये फ़क्त ४ टक्के मतांची घट होताच, मोठा फ़टका बसलेला होता. त्यातून सावरणे अवघड नव्हते. कारण कारंण शिवसेना भाजपा यांच्या महायुती पक्षांची टक्केवारी ४० टक्क्याहून अधिक नव्हती. पाच वर्षात पुन्हा ३८-४० टक्केपर्यंत मजल मारण्याचे उद्दीष्ट दोन्ही कॉग्रेसनी राखले असते आणि विरोधी पक्षाची चांगली भूमिका बजावली असती, तर ताज्या लोकसभा निवडणूकीत त्या पक्षांना पुन्हा दारूण पराभवाचे तोंड बघायची पाळी आली नसती. इव्हीएमच्या नावाने शिमगा करावा लागला नसता. पण मरगळलेल्या पक्षांना पंधरा वर्षाच्या सत्तेची नशा संपतच नव्हती, की अजून संपलेली नाही. म्हणूनच सत्ताविरोधी मते संपादन करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केल्याशिवाय दोन्ही पक्ष लोकसभेला सामोरे गेले आणि आणखी चार टक्के मतांची घट करून पराभूत झाले. पण त्यातून तरी धडा घेतला काय? घेतला असता, तर राज ठाकरे यांच्या बाजूला बसून त्यांनी मतपत्रिकांवरील मतदानाची मागणी करण्यात वेळ दवडला नसता. किंवा पक्ष सोडून जाणार्‍यांच्या नावाने शिमगाही केला नसता. त्यापेक्षा मतमोजणीतून कुठल्या मतदारसंघात कमी पडलो वा कुठे डागडुजी शक्य आहे; त्याचा अभ्यास करून विधानसभेची तयारी पुढल्या दोन महिन्यात हाती घेतली असती. इव्हीएम यंत्राचा दोष शोधला, पण लाभ मात्र यापैकी एकालाही बघता आलेला नाही. याला कर्मदरिद्रीपण नाही तर काय म्हणायचे?

नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रत्येक केंद्रातील मतांची पक्षवार मोजणी व आकडेवारी उपलब्ध आहे. त्यामुळे कुठल्या बुथवर आपापल्या पक्षाला किंवा अन्य पक्षांसह कुणाही उमेदवाराला मिळालेल्या मतांचे आकडे उपलब्ध आहेत. त्यातून प्रत्येक पक्षाला आपली रणनिती बनवणे सोपे आहे. कुठल्या बुथवर आपण कमी पडलो वा मतदार अधिक विरोधात गेला, त्याचा तपशील गोळा करून पुढली लढत देण्याला रणनिती म्हणता येते. पक्षश्रेष्ठींना सरसकट निकाल हवे असतात. पण उमेदवार म्हणून लढणार्‍यांना प्रत्येक मतदानकेंद्रात बुरूज लढवणार्‍या बुथप्रमुख व पन्नाप्रमुख अशा लढवय्यांची फ़ौज आवश्यक असते. भाजपाने सोशल मीडियावर लढाई लढवली हे खरे असले, तरी त्यापेक्षा मोठी फ़ौज बुथप्रमुख पन्नाप्रमुखांची उभी केलेली होती आणि त्यांनीच खरी लढाई जिंकून दिलेली आहे. प्रकरण तिथेच संपत नाही. याही निकालानंतर भाजपाच्या रणनितीकारांचा एक वेगळा गट निकालांचा अभ्यास करून कुठल्या केंद्रात वा बुथवर आपल्यापेक्षा अन्य पक्ष उमेदवाराला अधिक मते मिळाली, त्याचा तपशील गोळा करण्याता गर्क होता. विधानसभेला पुन्हा त्याच बुथवर मतदान व्हायचे आहे आणि जिथे लोकसभेत तोकडे पडलो, तिथला बुरूज आणखी भक्कम करून त्रुटी भरून काढण्याच्या कामाला भाजपाची अशी फ़ौज लागलेली होती. तर शरद पवार किंवा कॉग्रेसचे नेते प्रभारी, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात रमलेले होते. दोन्ही कॉग्रेसला जिंकून येणार्‍या उमेदवारांमध्ये रस आहे, तर भाजपाला उमेदवार जिंकून देऊ शकणार्‍या बुथवरल्या लढवय्यांची चिंता असते. तिथे मोठा फ़रक पडलेला आहे आणि तो फ़रक ज्यांना समजतो वा समजलेला आहे, त्यांना त्या लढवय्यांच्या आश्रयाला जाण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही. कारण आकडे बोलत असतात आणि बुथप्रमाणे मिळालेले लोकसभेतील मतदानाचे आकडे ओरडून हे सत्य सांगता आहेत.   

मागल्या पाच वर्षात पक्षाध्यक्ष म्हणून अमित शहांनी पक्षाची संघटना तळागाळापर्यंत नेली. त्याचा अर्थ ती मतदानकेंद्र म्हणजे बूथप्रमुख इतकी खोलवर विणून काढली आहे. एक बुथच नव्हेतर एका बुथच्या मतदारयादीत एका पानावरच्याच मतदारांशी संपर्क साधू शकतील, अशा कार्यकर्त्यांची देशव्यापी फ़ौज उभी केलेली आहे. त्याचेच परिणाम निकालात व मतमोजणीत दिसतात. ते जसे निकालात दिसतात, तसेच इतर पक्षांच्या उमेदवार व त्यांच्या स्थानिक सहकार्‍यांनाही दिसत असतात. म्हणूनच शिवेंद्रराजे भोसले पक्ष सोडतात, तेव्हा त्यांना आपल्या मतदारसंघातील बुथवरील मतदान सत्य सांगत असते. संदीप नाईक पक्षाला कशाला रामराम ठोकतात, त्याचे उत्तर ऐरोली या मतदारसंघाचे आकडेच देतात. पवारनिष्ठेपेक्षा मतदार वेगळे मत दाखवून देतो, तेव्हा उमेदवार उमेद गमावून बसतो. २०१४ ची लोकसभा असो अथवा विधानसभा असो, त्यातील आकड्यांचा असा अभ्यास इव्हीएमच्या नावाने शिमगा करणार्‍यांनी केला आहे काय? असता तर आपण कुठे कमी पडलो त्याची जणिव झाली असती. मग फ़ुटणार्‍या आमदारांना रोखण्याची वेळ आली नसती आणि मधल्या पाच वर्षात याही पक्षांनी आपापल्या प्रभावक्षेत्रात तरी मतदानकेंद्रागणिक लढवय्ये असलेली फ़ौज उभी केली असती आणि त्यातून भाजपशी खरी टक्कर दिली असती. अमित शहा किंवा मोदींची लोकप्रियता भाजपाला यश मिळवून देते, हे अर्धसत्य अहे. त्यांनी उभारलेली अशी कार्यकर्त्या लढवय्यांची फ़ौज विजयाचा मार्ग प्रशस्त करीत असते. दिसायला नरेंद्र मोदी असतात आणि खराखुरा निनावी लढवय्या कार्यकर्ता कुठे पडद्यामागे असतो. ज्याची साधी कल्पनाही इतर पक्षांच्या नेत्यांना नाही, ते पक्षश्रेष्ठी म्हणून नक्कीच मिरवू शकतात. पण पक्षाला विजयापर्यंत घेऊन जाण्यात मात्र अपेशी होतात. त्यात जसा राहुल गांधींचा समावेश होतो, तसाच शरद पवार यांचाही समावेश होतो.

लोकसभेचे निकाल बारकाईने अभ्यासले तर त्यात विधानसभा क्षेत्रानुसार झालेल्या मतदानाचे आकडेही उपलब्ध आहेत. इव्हीएम विरोधी आंदोलन पेटवायला निघालेल्या एकातरी पक्षाने त्याचा अभ्यास केला आहे काय? त्यापैकी एका तरी नेत्याला लोकसभेत मतदाराने दिलेला कौल समजून घेता आला आहे काय? ते आकडे साफ़ सांगतात, की मतदान कसेही घेतले तरी युतीपक्षांना म्हणजे शिवसेना भाजपा एकत्रित लढल्यास मतदार २८८ पैकी १५० जागा द्यायला आधीच सज्ज होऊन बसला आहे. कारण लोकसभा निकाल विधानसभा क्षेत्रानुसार अभ्यासला तर त्यात किमान १५० जागी युती उमेदवाराला ५० टक्केहून अधिक मते मिळालेली आहेत. त्याचाच अर्थ तिथे युतीची मते किरकोळ घटली तरी तिथे युतीचा असेल, तो उमेदवार डोळे झाकून निवडून येणार आहे. अशीच काहीशी स्थिती २०१४ च्या विधानभेतही होती. युती मोडली नसती व आघाडीही कायम राहिली असती, तर युतीतल्या शिवसेना भाजपाने तेव्हाच दोन्ही कॉग्रेसचा सुपडा साफ़ केला असता. म्हणजे युतीतल्या दोन्ही पक्षांना एकत्रित लढून २१० पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या आणि दोन्ही कॉग्रेस वेगवेगळ्या लढून युती एकत्र असती, तर २४० इतकी मोठी मजल युतीला मारता आली असती. पण तो इतिहास आहे आणि आता बदलता येणार नाही. आजची स्थिती अशी आहे, की युती व आघाडी एकत्र लढणार, हे निश्चीत आहे. त्यामुळेच त्यावर विचार करणे योग्य आहे. त्यामुळेच लोकसभेच्या मतदानाची आकडेवारी अभ्यासून एक निष्कर्ष काढता येतो. विरोधकांनी कितीही बाजी पणास लावली तरी युतीला दोनशेहून अधिक जागा मिळण्याला आजतरी पर्याय राहिलेला नाही. अर्थात हा आकडा किमान आहे. म्हणजे विरोधी पक्ष जितका मुर्खपणा करीत जातील, तितकी हीच संख्या अधिक वाढत जाऊ शकते. कदाचित २४० च्याही पुढे जाऊ शकेल.

अनेकांना मतचाचण्या किंवा निवडणूकांच्या अभ्यासातून मांडल्या जाणार्‍या अंदाज व भाकितांविषयी कुतुहल असते. कशाच्या आधारे असे आकडे काढले जातात? त्याची विश्वासार्हता कितीशी असू शकते? तशी विश्वासार्हता कुठलीच देता येत नाही. कारण ही भाकिते असतात. रोहित शर्मा वा विराट कोहली त्यांच्या कुवतीनुसार खेळतील हे जसे गृहीत असते, तसेच वेगवेगळे राजकीय पक्ष प्रत्येक निवडणुकीत कसे वागतील वा कोणता मुर्खपणा करून प्रतिस्पर्ध्याला मदत करतील; यावर खरा निकाल ठरत असतो. प्रत्येक पक्ष व त्याचा नेता भाकितकर्त्याच्या अपेक्षेनुसार वागला, तर अदाज पुर्णपणे बरोबत येऊ शकतात. त्याच्या उलट भाकितकर्त्याच्या अपेक्षेविरुद्ध नेते वा पक्ष वागत गेले, तर अंदाजाचा पुरता बोजवारा उडून जातो. ताजे लोकसभेचे निकाल आणि त्यात युतीचे रणनितीकार काय करू शकतील, त्यावर माझे अंदाज अवलंबून आहेत. खेरीज विरोधी पक्ष शहाणपणानेच वागतील अशीही माझी अपेक्षा आहे. पण त्यांना मला खोटेच पाडायचे असेल तर विचित्र वागून ते शिवसेना भाजपा युतीचे काम सोपेही करू शकतात. पण सामान्य वाचक वा नागरिकाला निकालातून पुढल्या निवडणूकांचे भाकित कसे करावे, किंवा निकाल कसा अभ्यासावा हे समजणेही खरे गरजेचे आहे. योगायोगाने आता निकालांचे बारीकसारीक आकडे इंटरनेटवर सहज उपलब्ध असतात आणि म्हणूनच बारकाईने कुणालाही आपापला अभ्यास करण्याची उत्तम संधी मिळालेली असते. युतीला निर्विवाद १५० हून अधिक जागा मी कुठून काढल्या? विरोधी पक्षांच्या मुर्खपणातून त्या २४० पर्यंत जाण्याचा अंदाज कसा निघू शकतो? त्याचे उत्तर पुढल्या प्रकरणात उलगडले आहे. किंबहूना तोच उद्याच्या विधानसभेचा निकाल माबावा, इतके हे आकडे स्वच्छ व स्पष्ट आहेत. आकडे खुप बोलतात. आपल्यामध्ये फ़क्त ऐकण्याची व समजून घेण्याची क्षमता व इच्छा असायला हवी.     (अपुर्ण)