
महाराष्ट्रात आपली मुलूखगिरी संपवून शरद पवार दिल्लीत गेले आणि त्यांनी तिथल्या पत्रकारांना देशातील राजकारणाविषयी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते देशातले विरोधी पक्ष मोदींना पर्याय उभा करू शकलेले नाहीत. विरोधी पक्षांचे हे मोठे अपयश आहे, असा आपला निष्कर्ष पवारांनी सांगितला. पण त्यात नवे काय आहे? लोकसभेच्या निवडणूकांचे निकाल लागून आता सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे आणि मतदारानेच मोदींना पर्याय नसल्याचा कौल दिला आहे. मात्र तो समजून घ्यायला वा लक्षात यायला पवारांना इतका उशिर झाला आहे. कारण लोकसभेचे निकाल लागल्यावर पवारांना त्यात काहीतरी काळेबेरे दिसलेले होते. त्यांनी भाजपा वा मोदींचा तो विजय मान्य केला नव्हता, किंवा विरोधकांचे अपयश प्रामाणिकपणे मान्य केलेले नव्हते. उलट त्या निकालानंतर आयोगाकडे मतदान यंत्राविषयी तक्रार करण्यात त्याचाही पक्ष आघाडीवर होता. त्यात तक्रारीत तथ्य असेल, तर ती मोदींची वा भाजपाची लबाडी होती. यंत्राद्वारे जनमत आपल्या खिशात घालून मोदी विजयी झालेले होते. त्यामुळे पर्याय उभा करण्याचा विषयच येत नव्हता. सहाजिकच आज पवार खोटे बोलत असावेत किंवा त्यावेळी लोकसभा निकालानंतर त्यांनी खोटेपणा केलेला असावा. अर्थात पवार सहसा खरे बोलत नाहीत. ते नेहमीच आपल्या शब्दात अशी गफ़लत करून ठेवतात, की त्याचे प्रत्येकाला वेगवेगळे अर्थ काढता यावेत. त्यामुळे आताही मोदींना पर्याय उभा करण्यात विरोधक अपेशी ठरले, असे त्यांचे बोलणे किती गंभीरपणे घ्यायचे, हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. आपल्या अशा बोलण्यातून व वागण्यातून त्यांनी आपल्याच संपुर्ण राजकीय कारकिर्दीचा सत्यानाश करून घेतला आहे. त्यामुळे आताही आपण निदान वयाला शोभणारी विधाने करावीत, इतकेही त्यांना भान रहात नसेल तर ठिकच आहे. त्यांच्याकडून तशी अपेक्षाही कोणी करीत नाही. अन्यथा त्यांनी बाकी निष्कर्ष काढण्यापेक्षा अगोदर पर्याय म्हणजे काय; त्याचा तरी अभ्यास केला असता. मग मोदींना पर्याय वगैरे मुक्ताफ़ळे उधळली असती. पण तसे वागण्या बोलण्यापलिकडे पवारांना तरी पर्याय कुठे आहे?
उदाहरणार्थ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचे निकाल लागल्यापासून त्यांनी आपल्याला जनतेने विरोधातच बसायचा कौल दिला असल्याची भाषा वारंवार केलेली होती. सरकार कोण बनवणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तरी पवारांनी महायुतीकडे बोट दाखवलेले होते. ती जबाबदारी शिवसेना भाजपाची असल्याचे आवर्जुन सांगणारे पवार, तेव्हा प्रत्यक्षात तीन पक्षांची मोट बांधून सत्तासुत्रे आपल्या हाती येण्यासाठी अखंड धडपडत होते. पण तोंडावर बोलताना मात्र विरोधी पक्षात बसायची भाषा चालू होती. आताही ते मोदींना पर्याय म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ काय घ्यावा मग? मुळात मोदी भाजपाच्या नेतॄत्वपदी कशामुळे आले, त्याकडे तरी पवारांनी कधीतरी गंभीरपणे बघावे. त्याला आता सहा वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. २०१३ च्या मध्यापासून मोदी राष्ट्रीय राजकारणात उतरले. तेव्हा ते यशस्वी किंवा सत्ताधारी भाजपाचे दिल्लीतील राष्ट्रीय नेता वगैरे नव्हते. देशामध्ये युपीए नावाची आघाडी धुमाकुळ घालत होती आणि त्या राजकीय अराजकाला रोखण्यासाठी कुठलाच विरोधी पक्ष पुढाकार घेत नव्हता. बाबा रामदेव किंवा अण्णा हजारे अशा राजकारणबाह्य लोकांना जनतेचा प्रक्षोभ दृगोचर करण्याचे काम हाती घ्यावे लागलेले होते. विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते सरकार विरोधातला आवाज उठवू लागले होते. पण त्या विस्कळीत राजकीय विरोधाला संघटित करून पर्यायी राजकारणाची दिशा देऊ शकणारा कोणीच नेता दृष्टीपथात नव्हता. त्या परिस्थितीतून नरेंद्र मोदींचा राजकीय क्षितीजावर उदय झाला आणि जनतेला हवा असलेला पर्याय उभा राहिला. थोडक्यात शरद पवार ज्या युपीएचे मंत्री होते व राज्यकारभारात सहभागी झालेले होते, त्यावर जनतेला पर्याय हवा होता, म्हणून मोदींना दिल्लीच्या राजकारणात यावे लागले. म्हणजे मोदीच मुळात राजकीय पर्याय म्हणून आलेले आहेत. त्यांना पर्याय जनतेला हवा आहे, हे पवारांना कधी उमजले?
खरे सांगायचे तर युपीएमध्ये सत्तेच्या एका नगण्य खुर्चीत बसून पवार दिवाळखोरी निमूटपणे बघत होते. त्यावेळी त्यांना पर्याय हवा असल्याचे समजायला हवे होते. तर मोदींना राष्ट्रीय राजकारणात यावेच लागले नसते. युपीएचा कारभार इतका अराजकाचा झालेला होता, की जनता हैराण होऊन गेली होती आणि रामदेव वा अण्णांमध्ये पर्याय बघू लागली होती. अशावेळी पवारांनी पुढाकार घेतला असता, तरी त्यांना मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांना पर्याय उभा करता आला असता. जनतेलाही दिल्लीबाहेरच्या कुणाचा शोध घेण्याची पाळी आली नसती. पण तेव्हा पवार आपल्या क्षुल्लक सत्तापदासाठी गप्प बसून राहिले आणि मोदींना पर्याय होऊन पुढे यावे लागले होते. जनता अजून मोदींना कंटाळलेली नाही. असती, तर ‘चौकीदार चोर’ असल्या बाष्कळ प्रचाराला प्रतिसाद देऊन मतदाराने भाजपाचे केंद्रातील सरकार जमिनदोस्त केले असते. त्यापेक्षा मतदाराने महागठबंधन म्हणून मंचावर हात उंचावणार्यांना जमिनदोस्त करून टाकले. त्यातून जनतेने आपल्याला मोदी हवे असल्याचा कौल दिलेला नाही, तर पर्याय म्हणून जे काही दशावतारी नाटक रंगवले जात होते, तसे काहीही नको असल्याचाच निर्वाळा दिला आहे. त्याच्या परिणामी पुन्हा नरेंद्र मोदी एकहाती बहूमताने पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत. त्यातला एक संदेश असा आहे, की पवार ज्याला पर्याय म्हणतात, तो पर्याय नसल्याचाही निर्वाळा मतदाराने दिला आहे. त्यामुळे असली विधाने करून उथळ प्रसिद्धी मिळवण्याचा खेळ करण्यापेक्षा पवारांनी राज्यात उभी केलेली महाविकास आघाडी चांगले काम करून उत्तम पर्याय कसा ठरू शकेल, यासाठी आपली बुद्धी खर्ची घालावी. तेही छोटे काम नाही. कारण दोन आठवडे उलटले तरी राज्याला पर्यायी मंत्रीमंडळ मिळू शकलेले नाही. सहा मंत्र्यांना खातीही मिळू शकलेली नाहीत. मंत्रालयाला विविध खात्याच्या फ़ायली कुठे पाठवाव्यात याची भ्रांत पडलेली आहे.
महाराष्ट्रात तीन पक्षांना एकत्र आणून सत्तेत बसवताना पवारांची आपल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री ठरवताना दमछाक झालेली आहे. अजितदादा या पुतण्याला पर्याय असू शकेल, असा कोणी उपमुख्यमंत्री देण्यात ज्यांना अपयश आले आहे. त्यांनी देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानाला पर्याय देण्याच्या गमजा कराव्यात, यातच पवारांची राजकीय प्रगल्भता समजू शकते. बाकीचे विरोधक सोडून द्या. खुद्द पवारांनी गेल्या साडेपाच वर्षात भाजपा वा मोदींना राजकीय पर्याय उभा करण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले? ममता किंवा जगन रेड्डी अशा तुलनेने अल्पवयीन नेत्यांनी आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये भाजपाशी टक्कर तरी दिली आहे. पण महाराष्ट्राच्या एका विभागात आपले बस्तान टिकवताना पवारांची दमछाक होते. त्यामुळे पर्याय शब्दाची त्यांची व्याख्या कोणती असा प्रश्न पडतो. जुगाड राजकारण करून आयुष्य खर्ची घालण्याला ते यश मानत असतील, तर विरोधकांचे अपयश मोठेच म्हटले पाहिजे. अगदी राहुल गांधी सुद्धा तीन राज्यात भाजपाशी टक्कर देऊ शकले. पण स्टॉन्ग मराठा म्हणून मिरवणार्या पवारांना जुगाडच्या पलिकडे झेप घेता आलेली नाही. दिड वर्षापुर्वी बंगलोरच्या मंचावर कुमारस्वामी यांच्या समवेत हात उंचावून पवार स्वत: उभे होते. तेव्हाही त्यांना तोच महागठबंधन मोठा पर्याय वाटलेला होता. कारण त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकणार नसल्याचे त्यांनी एकदाही कुठे म्हटलेले नव्हते. उलट आज महाविकास आघाडीची गोधडी शिवतानाचा उत्साहच तेव्हाही त्यांच्या अंगी दिसलेला होता. मग आज हे पर्यायाचे शहाणपण कुठून सुचलेले आहे? कुठेही पर्याय उभा करण्यात सातत्याला महत्व असते आणि विश्वासार्हता हाच त्याचा मजबूत धागा असतो. त्यातच दिवाळखोरी करण्याला राजकारण समजणार्या पवारांनी पर्याय हा शब्द वापरण्याने विनोद नक्की होऊ शकतो. त्यामुळे अशा गंभीर राजकीय प्रश्नातले गांभिर्य मात्र संपून जाते.