Friday, September 25, 2020

‘जया’ अंगी मोठेपण तया यातना कठीण

 कंगना राणावत या अभिनेत्रीने जी धमाल उडवलेली आहे, त्यामुळे संपुर्ण हिंदी चित्रसृष्टी हादरून गेलेली असून त्यांच्या समवेतच राज्य सरकारही गडबडले आहे. वास्तविक अशा बाबतीत राज्यकर्त्यांनी संयम दाखवण्याची गरज असते. नुसती कोणी टिका केली म्हणून तात्काळ उलट अंगावर धावून जाण्याचे काहीही कारण नसते. त्यामुळे समोरची व्यक्ती अधिकच जोशात येते आणि अधिकच झोड उठवू लागत असते. उलट तुम्ही त्या टिकेला दुर्लक्षित केले, तर निदान समोरच्याला नवनवे खाद्य पुरवले जात नाही. पण अर्णब गोस्वामी असो वा कंगना असो, त्यांना नवनवे मुद्दे पुरवून आपल्या विरोधात कंबर कसून उभे करण्याची मोठी कामगिरी शिवसेनेच्या सरकार व पक्ष प्रवक्त्यांनी अगत्याने पार पाडली. अन्यथा हा सगळा प्रकार सुशांत राजपूतच्या शंकास्पद मृत्यूच्या तपासापुरता राहिला असता. निदान तो चित्रसृष्टी व महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीसाठी प्रतिष्ठेचा गळफ़ास बनला नसता. आता ज्याप्रकारे त्या घटनाक्रमाने वळण घेतले आहे, त्याकडे बघता, हा एक राजकीय पेच बनलेला आहे. त्यात खुद्द राज्य सरकार व एकूण प्रशासन यंत्रणेची अब्रुच पणाला लागलेली आहे. त्यात पुन्हा बॉलीवुडचे पहिले कुटुंब अशी धारणा असलेल्या अमिताभ बच्चन यांच्याही प्रतिष्ठेला त्यांच्या अभिनेत्री पत्नीने पणाला लावलेले आहे. कारण त्यांनी संसदेत म्हणजे राज्यसभेत बोलताना ह्या़च विषयावरून कंगनावर तोफ़ डागली आणि आता तीच उलटली आहे. कारण आवेशात बोलताना जया बच्चन यांनी अतिशयोक्ती करून टाकलेली आहे. त्याचा बचाव मांडणेही अशक्य झाल्याने इतरांनाही त्यांच्या मदतीला धावता आलेले नाही. बघता बघता या मनोरंजन क्षेत्रात उभी दुफ़ळी माजताना दिसत आहे. त्याला कंगनापेक्षाही ह्या उथळ लोकांनी आग लावली आहे.


जी व्यक्ती डोक्याला कफ़न बांधून मैदानात उतरलेली असते, तिच्यासमोर तुम्ही अधिकाराचे हत्यार उपसून काही उपयोग नसतो. सुशांतच्या शंकास्पद मृत्यूनंतर कंगनाने चित्रसृष्टीतल्या घराणेशाही व भाऊबंदकीवर हल्ला केला होता. पण पुढे त्याला अंमली पदार्थाच्या सेवनाच्या व्यसनाचे वळण लागले. ह्यात कोणी कशा चुका केल्या, तेही समजून घेण्यासारखे आहे. मुळात सुशांतचा मृत्यू शंकास्पद ठरू लागल्यावर कंगनाच्या आरोपानुसार पोलिसांनी त्या उद्योगातील घराणेशाहीने त्याचा बळी घेतला असावा, याच दिशेने चौकशी सुरू केलेली होती. पण त्यामध्ये कुठलीही प्रगती होत नव्हती. त्यामुळे पोलिसच झाकपाक करत असल्याचा संशय घेतला जाऊ लागला आणि तिथे शिवसेनेने नको असताना नाक खुपसले. मुंबई पोलिसांवर विश्वास म्हणजेच महाराष्ट्राची अस्मिता; असला खुळा पवित्रा घेऊन सेनेने जी वाचाळता सुरू केली, त्यामुळे सुशांतची प्रेयसी आणि शिवसेना एकत्र असल्याचा संभ्रम तयार होऊन प्रकरण चिघळत गेले. त्याच्याशी दिशा सालीयान नामक एका अन्य मृत्यूचा धागा जोडण्याची स्पर्धा सुरू झाली. असे विषय मीठमिरची लावून रंगवले तर प्रेक्षक अधिक मिळतात. म्हणून रिपब्लिक वृत्तवाहिनीने त्याचा सपाटाच लावला आणि जेव्हा त्यातून काही धागेदोरे संशयास्पद आढळले, तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणा व अन्य गुप्तचर संघटनांनी त्यात रस घ्यायला सुरूवात केली. त्यातूनच मग पाटणा येथे सुशांत प्रकरणातला पहिला एफ़ आय आर नोंदवला गेला. तिथेच महाराष्ट्रातले सत्ताधारी सावध झाले असते, तरी त्यांचे शेपूट त्यात अडकण्याचे काही कारण नव्हते. पण शिवसेनेने आगावूपणा करून आपला युवानेता आदित्य ठाकरे यांचे नाव गोवले जाण्याची जणू संधीच उपलब्ध करून दिली. परिणामी बॉलिवुडची घराणेशाही बाजूला पडून शिवसेनाच लक्ष्यावर आली. हे कमी होते म्हणून की काय आणखी खुळेपणा सुरू झाला.


सगळीकडून आपल्यावर टिकेची व शंकेची झोड उठली असताना रिया चक्रवर्तिला मुलाखत देऊन आपली बाजू मांडण्याचा सल्ला कोणी दिला ठाऊक नाही. पण त्यामुळे माध्यमातही विभागणी होऊन सगळे प्रकरणच चिखलात रुतत गेले. जेव्हा असे होऊ लागते, तेव्हा आपली सफ़ाई देण्यापेक्षा आपले शेपूट अडकणार नाही याची सर्व संबंधितांनी काळजी घ्यायची असते. पण इथे अतिशहाण्याची मांदियाळी असल्यावर काय व्हायचे? रियाच्या मुलाखतीने तिची सुटका होण्यापेक्षा अधिकाधिक लोक त्यात गुंतत गेले आणि संशयाचे जाळे फ़िटण्यापेक्षा जास्त गुंतागुंतीचे होत गेले. एका बाजूला शिवसेना व तिच्यासोबत सत्ताधारी महाविकास आघाडी यात फ़सत गेली आणि दुसरीकडे नवनव्या खुलासे गौप्यस्फ़ोटातून अवधी चित्रसृष्टी त्यात खलनायक बनत गेली. म्हणुन तर जगातल्या कुठल्याही घटनेवर मसिहा म्हणून भाष्य करायला धावत सुटणारे महेश भट्ट वा जावेद अख्तर यांच्यासारख्यांना थेट बिळात जाऊन लपण्याची नामुष्की आली. आता सुशांतच्या मृत्यूला तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे. पण त्याच्या न्यायाच्या गोष्टी कोणी बोलला नाही. पण तेच लोक सुशांत प्रकरणी संशयित असलेल्या रिया चक्रवर्तिच्या समर्थनासाठी बाहेर येऊन अधिकच फ़सलेले आहेत. त्यामुळे रियाला कुठला दिलासा वा सहानुभूती मिळू शकली नाही. पण अवघे बॉलिवुड मात्र संशयाच्या सापळ्यात येऊन अडकले आहे. जसजसे दिवस जात आहेत, तसतशी अनेक विख्यात नावे उजेडात येत आहेत आणि त्यांना चौकशी व तपासासाठी फ़तवे पाठवले जात आहेत. अशा बाबतीत गुन्हा सिद्ध होवो किंवा निर्दोष सुटका होवो, एकदा ठपका बसला मग कायमची काळीमाच लागत असते. त्यापेक्षा काहीही वेगळे होताना दिसत नाही. कारण ज्या उतावळ्यांनी रियाचा बचाव मांडलेला होता, त्यांनाच तिच्या अटकेनंतर अधिक संशयाच्या घेर्‍यात आणून सोडलेले आहे. जया बच्चन त्यातच फ़सलेल्या आहेत. 


प्रत्येक उद्योगात व क्षेत्रामध्ये काही लोक बदमाश वा नासका आंबा असतात. एकट्या चित्रसृष्टीला गुन्हेगार ठरवू नका, हा त्यांचा दावा योग्यच आहे. पण अन्य क्षेत्रामध्ये जेव्हा असा नासका आंबा समोर येतो वा पकडला जातो, तेव्हा तो उद्योग वा क्षेत्र कंबर कसून त्याच्या पाठीशी उभे रहात नाही. श्रीसंत वा अजय जाडेजा नावाचे क्रिकेटपटू जेव्हा मॅचफ़िक्सींगच्या आरोपात फ़सलेले होते, तेव्हा किती मान्यवर खेळाडू त्यांची पाठराखण करायला उभे होते? कालपरवा नीरव मोदी वा विजय मल्ल्या यांचे घोटाळे उघडकीस आल्यावर किती नामवंत उद्योगपतींनी समर्थनाला पुढाकार घेतला होता? त्या फ़रारी दिवाळखोरांवर कारवाई चालू झाली, म्हणून कोणी व्यापारी वा उद्योजकांच्या नावाने शंख चालला असताना एकूण उद्योगाला कशाला बदनाम करता; असा कांगावा करायला पुढे आले नव्हते. इथेच जया बच्चन यांनी तीच घोडचुक केली. सुशांत प्रकरणात वा रियाच्या पापाचा पाढा वाचला जाताना कोणी संपुर्ण बॉलिवुडला नशेबाज म्हटलेले नाही. तिथल्या गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी कुणा निष्पाप व्यक्तीला दोषी मानलेले नाही. पण चित्रपटाच्या झगमगाटात अनेक हिडीस चेहरे लपलेले आहेत, इतकेच म्हटलेले होते. तो आरोप जया बच्चन यांनी आपल्या अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती. कंगनाला त्यासाठी दोषी ठरवण्याचे काहीच कारण नव्हते. उलट तिच्या साथीला उभे राहून चित्रसृष्टीला ग्रासणार्‍या या भयंकर व्यसनातून मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. असतील चार व्यसनी लोक असे बोलण्यातून जया बच्चन कोणाला पाठीशी घालत आहेत? त्यांच्याच तर्काने जायचे म्हटले तर मागल्या पाचसहा महिन्यात कोट्यवधी लोकांनी उगाच हाल सोसले का? कारण १३५ कोटी लोकांच्या देशात अवघ्या ५२ लाख लोकांना आजवर बाधा झाल्याचे आढळून आले आहे. मग त्यांच्यासाठी बाकीच्या १३४ कोटीहून अधिक लोकांनी लॉकडाऊन कशाला सोसला?


मार्च महिन्यात पहिला रुग्ण पुण्यात सापडला होता आणि त्यानंतर एप्रिल उजाडून संपण्यापर्यंत संपुर्ण देशभरात पाच हजारही रुग्ण आढळलेले नव्हते. मग उगाच लॉकडाऊनचा खेळ चालला होता काय? गेल्या सहा महिन्यात पुण्यातल्या एकापासून सुरू झालेली बाधा आज ५२ लाखापर्यंत जाऊन पोहोचली. जया बच्चन यांच्यासारखाच सरकारने व जनतेने विचार केला असता तर? म्हणजे मुठभर बाधित असतील म्हणुन कोरोनाचा गाजावाजा का? असा विचार करून अन्य उपायांकडे पाठ फ़िरवली असती, तर आज किती लाख मुडदे पडले असते? चित्रसृष्टीत मुठभर व्यसनी लोक असतील आणि त्यांना असेच मोकाट वागू दिले, तर पुढल्या काही वर्षात अवघे बॉलिवुडच नशेत बुडालेले बघायला वेळ लागणार नाही. कोरोनाची बाधा आणि अंमली पदार्थाच्या व्यसनाच्या आहारी जाणे यात कितीचा गुणात्मक फ़रक आहे? हे समजण्यासाठी फ़िल्मफ़ेअर पुरस्कार मिळवण्याची गरज नसते. अभिनय यायला लागत नाही. सामान्य बुद्धीच्या व्यक्तीलाही ते समजू शकते. जया बच्चन यांना तितकेही समजत नसेल का? की दृष्टीआड सृष्टी या उक्तीप्रमाणे त्यांना ही व्यसनाधीनता बोकाळावी असे वाटते? अन्यथा त्यांनी ‘थालीमे छेद’ ही भाषा कशाला वापरली असती? ज्या थाळीतून जेवता त्या थाळीतच बाधा असेल तर सुधारणा नको काय? हल्लीच खुद्द बच्चन कुटुंबाला कोरोनाची बाधा झालेली होती. त्यांच्या तिन्ही बंगल्यात त्यांचे वास्तव्य नसते ना? तरीही सर्व बंगल्यांचे तात्काळ निर्जंतुकीकरण कशाला करण्यात आले? असेल एखादा कोपरा कोरोना बाधित, म्हणून त्यांनी तिकडे काणाडोळा कशला केला नाही? अवघ्या कुटुंबाने इस्पितळात जाऊन आपल्या चाचण्या कशाला करून घेतल्या? काही दिवस महानायक व सुपुत्र अभिषेक उपचार कशाला घेत राहिले? जया बच्चन यांना इतकेही कळत नसेल का? की वेड पांघरून पेडगावला जायचे?


थालीमे छेद म्हणताना जी मग्रुरी दिसते, ती दृष्टीआड करता येणारी नाही. म्हणूनच त्या कालच्या मुलीने कंगनाने जयाजींच्या तपस्येलाच चुड लावून टाकली. तुमच्या मुलीला अशी वागणूक मिळाली वा मुलगाच व्यसनात फ़सल असेल तर चालणार आहे काय? असे सवाल कंगना विचारते. त्याचे उत्तरही जया देऊ शकलेल्या नाहीत. उलट त्यांनाच थाळी म्हणजे काय त्याची आठवण जयाप्रदाने करून दिलेली आहे. एबीसीएल कंपनीच्या दिवाळखोरीने उध्वस्त व्हायची वेळ आली, तेव्हा त्यातून बाहेर काढणार्‍या माणसाचे नाव होते अमरसिंग. बदल्यात त्याने बच्चन कुटुंबाला समाजवादी पक्षाच्या दावणीला बांधले आणि त्यातूनच जया बच्चन यांना राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले आहे. पण जेव्हा अमरसिंग शेवटच्या घटका मोजत होते, तेव्हा याच कुटुंबाने त्यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही, याची आठवण जयाप्रदाने करून दिली. त्याला काय म्हणतात? अमरसिंगांच्या थाळीतून जेवायची वेळ कोणावर आलेली होती? त्या थाळीला कार्यभाग उरकल्यावर छेद कोणी केला? कधीतरी श्रीमती बिगबी त्याचा खुलासाही करतील काय? जेव्हा तुम्ही असले मोठे शब्द वापरता, तेव्हा ते आपल्याच अंगावर चिखलाच्या शिंतोड्यासारखे उलटणार नाहीत याचीही खबरदारी घ्यावी लागत असते. पण बहुधा मोठेपणाचा तोरा मिरवताना जया बच्चन यांना त्याचा विसर पडलेला असावा. मग पत्नीच्या उथळपणाची सारवासारव करताना महानायकाची तारांबळ उडालेली आहे. ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ असे संतवचन आहे. पण जयाजींना चार दशके मुंबईत राहून देखील मराठी शिकता आलेले नसेल तर त्यातल्या उक्ती व आशय कुठून कळायचा? मोठेपणा संयमात व सबुरीत असतो. नुसती वाचाळता कामाची नसते. अन्यथा आपण ज्याच्या प्रतिष्ठेवर सन्मानित होतो, त्यालाच संशयाच्या पठडीत आणून बसवण्याची घोडचुक या ‘गुड्डी’ने कशाला केली असती?


No comments:

Post a Comment