Saturday, February 28, 2015

पेडन्युजचे गुलाम की विवेकाचे लढवय्ये?



आता त्याला वर्ष होईल. लोकसभेच्या निवडणूका ऐन रंगात आलेल्या होत्या आणि मुंबईतले शेवटचे मतदान व्हायचे होते. दिड दिवस शिल्लक होता आणि मुंबईतला प्रचार थंडावला होता. तेव्हा एका उमेदवाराने सोशल मीडियातून सर्व वर्तमानपत्रे व वाहिन्यांचे आभार मानले होते. कशासाठी त्याने असे आभार मानावेत? तर प्रसिद्धीच्या रणधुमाळीत त्याच्या पक्षाची वा उमेदवारीची कोणीही साधी दखलही घेतलेली नव्हती. त्या पक्षाचा कोणी उमेदवार मुंबईत उभा असल्याच्या चार ओळीही खरडाव्यात, अशी ‘विवेकबुद्धी’ कुणा पत्रकाराला झाली नाही. सगळी माध्यमे केजरीवाल आणि मोदींच्या भोवती घुमत होती. अर्थात त्यात पुन्हा मोदींच्या भोवती कारण हे मोदींचे मार्केटींग असल्याचा त्याच माध्यमांचा आरोप होता. पण तीच माध्यमे आणि तेच पत्रकार तोडीस तोड अशी प्रसिद्धी केजरीवालना कशासाठी देत होते? त्यामागचे मार्केटींग उलगडत नव्हते. कसे उलगडणार? त्यालाच तर पेडन्युज म्हणतात. आता पेडन्युज हा सर्वतोमुखी झालेला शब्द आहे. सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या विचारस्वातंत्र्यांच्या लढवय्यांसाठी मात्र पेडन्युज हीच विवेकाची लढाई असते. म्हणूनच आज ज्यांनी कोणी वैचारिक संघर्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन गोविंद पानसरे यांचा उदो उदो चालविला आहे, त्यापैकी कोणी त्यांच्याच पक्षाच्या मुंबईतील एकमेव उमेदवाराला मागल्या वर्षी चार ओळीची प्रसिद्धीही का दिलेली नव्हती? त्याचे नाव कॉम्रेड प्रकाश रेड्डी. कोण हा प्रकाश रेड्डी? तर कॉ. पानसरे यांचे समकालीन जी. एल. रेड्डी व तारा रेड्डी यांचा पुत्र. आजही आपल्या जन्मदात्यांनी खांद्यावर घेतलेला लाल बावटा निष्ठेने लढवणारा मुंबईतला एक हाडाचा कार्यकर्ता. त्यानेही पानसरे यांच्या पक्षाचा व विचारांचा मुंबईतला शिलेदार म्हणून ती लढत एकाकी दिलेली होती. त्याची दखल किती सेक्युलर पत्रकारांनी घेतली? नसेल तर कशाला घेऊ नये?

प्रकाश तेच विचार मांडत होता आणि त्याच विचारसरणीची लढाई लढत होता, ज्यासाठी पानसरे यांनी आपल्या प्राणांची शर्थ केली. मग जे त्या विचारांचा इतका उदो उदो करतात, त्यांना प्रकाशला प्रसिद्धीचा व मदतीचा हात द्यायची बुद्धी तेव्हा कशाला होऊ नये? तर प्रकाशपाशी न्युजचे बिल पेड करण्याची आर्थिक कुवत नव्हती. आणि पेडन्युज देण्याची कुवत नसेल तर त्याच्या विचारांना कोण सेक्युलर माध्यम धुप घालणार? त्यामुळेच प्रकाश व त्याची उमेदवारी त्या निवडणूकीत साफ़ दुर्लक्षित राहिले. समजा त्याच्या प्रचारासाठी तेव्हा गोविंद पानसरे मुंबईत आले असते, तर यापैकी किती सेक्युलर पत्रकारांनी त्यांच्या त्या वैचारिक लढाईत खांद्याला खांदा लावून सोबत केली असती? आज त्यांचा बळी पडल्यावर रकानेच्या रकाने त्यासाठी खर्ची घालणार्‍या अशा पत्रकारांनी, प्रकाशच्या प्रचाराला आलेल्या पाबसरे यांच्या विचार मांडणार्‍या भाषणाच्या चार ओळी तरी प्रसिद्ध केल्या असत्या काय? जे प्रकाशची दखल घ्यायला तयार नव्हते, त्यांनी पानसरेंनी त्याच्यासाठी मांडलेल्या वैचारिक भूमिका वा केलेल्या प्रचाराला तरी कशाला दाद दिली असती? विचारांचे कोणाला काही पडलेले नाही. पण आज त्यापैकी प्रत्येकजण हिरीरीने पानसरे यांच्या बहुमोल वैचारिक योगदानाची किर्तने गातो आहे. त्यातल्या कितीजणांनी पानसरे वाचले वा ऐकले आहेत? ज्या माध्यमे व बाजारू पत्रकारितेची इथे लक्तरे धुतली जात आहेत, तिचेच हे सगळे गुलाम आहेत आणि त्यांना शोषक कसे आपले हुकूमाचे गुलाम करतात, त्याचीही सविस्तर व्याख्या पानसरे यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवली आहे. असे पेडन्युज वा पेडविचारांचे गुलाम हे शोषकांनी शोषितांची दिशाभूल करण्यासाठी कामाला जुंपलेले असतात. तेव्हा आज पानसरेंच्या विवेकी वैचारिक लढाईचा उमाळा आलेले कुठल्या गोत्रातले आहेत, ते लक्षात येऊ शकेल.

अशा सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या भामट्यांना कॉ. पानसरे, कॉ. प्रकाश वा त्यांच्या पक्ष विचारसरणीशी कुठलेही कर्तव्य नसते. त्यांनी मांडलेल्या बाजारात ग्राहकोपयोगी वस्तू म्हणून विचार व विवेक हा मोसमी माल असतो. जेव्हा त्याला उठाव असतो, तेव्हा त्याची घाऊक आयात केली जाते आणि शोकेसमध्ये त्यांची आकर्षक मांडणी केली जाते. तो माल खपवण्यासाठी त्यांना विचारवंत पानसरे नको असतात, तर हुतात्मा हवा असतो. म्हणून आजवर याच माध्यमांनी कधी पानसरे वा त्यांच्या विचारांसाठी चार रकाने जागा दिली नाही. पण हुतात्मा म्हणून पानसरे यांचे जोरदार मार्केटींग मात्र चालू आहे. त्यांच्या विचारांच्या लढाईची महत्ता असती, तर त्याच विचारांचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या प्रकाश रेड्डीला चार दिवस साध्या बातमीतून लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे कर्तव्य अशा पत्रकारांनी पार पाडले नसते का? पण बाजारू मालाचा सेल लावणार्‍यांना वैचारिक गुणवत्तेशी काय घेणेदेणे असणार? तेव्हा केजरीवाल हा बाजारात जोरदार खपणारा ब्रॅन्ड होता आणि तमाम ‘आम्ही सारे पानसरे’ आणि ‘आम्ही सारे दाभोळकर’ केजरीवालच्या भजन किर्तनात मग्न झालेले होते. त्या गदारोळात विचारांसाठी लढणार्‍या प्रकाश रेड्डींचा आवाज कोणाच्या कानावर जायचा? किंबहूना त्याचाच वैचारिक आवाज दाबून टाकण्यासाठी माध्यमांतील बुद्धीमंतांना, शोषकांनी कामाला जुंपलेले असते ना? आज जे विचारवंत बुद्धीमंत आहेत, त्यांना शोषकांनीच कसे गुलाम वा लाचार केलेले असते, तेच तर पानसरे यांनी सांगितलेले आहे. ‘शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो’ (‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकातून). यावरूल लक्षात येते, की आज पानसरे यांच्याविषयी असे नक्राश्रू ढाळणारे नेमके कोण आहेत?

विक्रेत्याला आणि दुकानदारांना गुणवत्तेशी वा जनहिताशी कर्तव्य नसते. त्यांची नजर खपणार्‍या मालावर असते. म्हणून आज पानसरेंच्या वैचारिक लढ्याचा उमाळा आलेले तमाम माध्यमकर्मी वा फ़लकबाज यापुर्वी कधी पानसरेंच्या विचारांचे अध्ययन करायला सवड काढू शकले नाहीत. कारण त्यांच्याच भामटेगिरीकडे तर पानसरे सामान्य जनतेचे लक्ष वेधत होते. ज्यांनी शोषितांची व विचारांची लढाई बाजारू करून टाकली, अशाच ढोंगी पाखंडी विचारवंतांकडे पानसरे यांनी कटाक्ष टाकलेला आहे. जो आपल्याकडेच आरोपी म्हणून बोट दाखवतोय, त्याची दखल बदमाश कशाला घेतील? म्हणूनच आजवर पानसरे दुर्लक्षित राहिले आणि त्यांचा बळी पडल्यावर मात्र त्यांच्या हौतात्म्याचा बाजार मांडायला हे शोषकांचे पगारी गुलाम हिरीरीने पुढे आलेले आहेत. अशा बाजारू लोकांना माल खपवण्यासाठी दर्जा नको असतो तर आकर्षक मॉडेल लागते. तसे पानसरे यांचे हौतात्म्य हे मॉडेल आहे. नथूराम हे सुद्धा मॉडेल असते. दातातले-हातावरचे किटाणू ओरडाआरडा करून दाखवले नाहीत, तर लोशन-पेस्टचा माल खपायचा कसा? त्यासाठी आकर्षक मॉडेल आणि आक्रमक जाहिरात लागते. त्यापेक्षा आज पानसरे यांच्या हौतात्म्याचा मांडलेला बाजार किंचितही वेगळा नाही. तो मांडणार्‍यांना पानसरे ही व्यक्ती, त्याच्यावरचा अमानुष हल्ला वा त्यांचे विचार व संघर्ष यांच्याशी कवडीचे कर्तव्य नाही. त्यांचा मतलब त्या हौतात्म्यातून आपला गल्ला-धंदा साधण्याचा आहे. म्हणूनच प्रकाश रेड्डी त्याच विचारांची लढाई लढताना तिकडे जे ढुंकून बघत नाहीत, तेच आज पानसरेंच्या लढाईचे रणशिंग फ़ुंकत धावताना दिसतील. कारण त्यांच्या राजकीय अजेंड्यातले जे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना झोडण्यासाठी पानसरेंचे हौतात्म्य हे एक हत्यार म्हणून गवसले आहे. पेडन्युजचे गुलाम कधी वैचारिक लढाई लढत नसतात. ते आयत्या बिळावरचे नागोबा असतात.

Thursday, February 26, 2015

आसाराम भक्तांच्या गोत्रातले समविचारी

   

गेल्या काही दिवसापासून समविचारी कार्यकर्ते व संघटनांनी एकत्र यायला हवे, अशी भाषा पुन्हा ऐकू येऊ लागली आहे. म्हणजे ती नवी भाषा नाही. गेल्या कित्येक वर्षापासून ही भाषा बोलली जाते आहे. पण त्याचा अर्थ ते शब्द बोलणार्‍यांना तरी कितपत समजला आहे, याबद्दल शंका आहे. कारण असे समविचारी एकत्र येऊन करणार काय? ज्यांचे विचारच समान आहेत, त्यांनी आपल्याला मान्य असलेल्या विषयांवर चर्चा कसल्या करायच्या? तर आधीच मान्य असलेल्या गोष्टी व मुद्दे यांच्यावर नंदीबैलाप्रमाणे माना डोलवायच्या. एकाने कोणीतरी काही तरी सांगायचे आणि बाकीच्यांनी निमूट त्याला माना डोलवत त्याचाच पुनरूच्चार केला, म्हणजे समविचारी चिंतन-मंथन पार पडते. त्यात वेगळा विचार येऊ शकत नाही, की वेगळ्या बाजूचाही विचार समोर आणला जाऊ शकत नाही. सहाजिकच व आसपासची परिस्थिती बदलते त्याप्रमाणे जग ओळखण्याची कुवत हे समविचारी विसरून जातात. जितके असे समविचारी सातत्याने भेटत रहातात, तितका त्यांच्या वास्तविक जगाशी संपर्क तुटत जातो आणि ते कल्पनेच्या भ्रामक जगात वावरू लागतात. त्यांचे प्रश्न काल्पनिक व उत्तरेही तितकीच भ्रामक होत जातात. त्याचा परिणाम असा होतो, की वास्तवाचा दणका बसला, मग असे समविचारी भानावर येतात आणि वास्तवाला चाचपडू लागतात. तेव्हा त्यांच्यातला कोणीतरी तो दणकाही काल्पनिक असल्याचे विश्लेषण त्यांच्या पुढे मांडतो आणि त्या नशेत असे समविचारी पुन्हा निद्राधीन होऊन जातात. तसे नसते, तर मागल्या तीनचार दशकात समविचारी संघटना व पक्ष सार्वजनिक जीवनातून इतके संदर्भहीन कशाला झाले असते? पण इतकी दुरावस्था होऊनही यापैकी कोणाला आपल्या कोषातून, बिळातून बाहेर पडून वास्तविक जगाला उघड्या डोळ्यांनी बघायची हिंमत झालेली नाही.

आसाराम किंवा तत्सम बुवाबाजीचे परिणामही दिसत असतात. कोण असतात असे बुवा महाराज? आधी अशा बुवांचा चमत्कार लोकांना ठाऊक नसतो. कुठलाही महाराज-बुवा चमत्कारी असला तरी त्याचा प्राथमिक अनुभव कोणाला आलेला नसतो. म्हणूनच पहिल्या दिवशी हजारो भक्त अनुयायी कुठल्या बुवाच्या नशीबी येत नाहीत. पण जसजसे त्याचे मार्केटींग करणारे भगतगण गोळा होत जातात, तशी त्याच्या भोवतीची गर्दी वाढत जाते आणि त्यात असे मार्केटिंग करणारे आपले हितसंबंध निर्माण करत असतात. गेली दिड वर्षे आसाराम हा बुवा गजाआड जाऊन पडला आहे. त्याला कुठलाही चमत्कार त्यातून बाहेर काढू शकलेला नाही. पण आजही कुठल्या आसाराम भक्ताला जाऊन भेटा, त्याच्या मनातली समजूत वा भक्ती कमी झालेली दिसणार नाही. कशी कमी होईल? त्याचा भक्तगण व गोतावळा शेवटी एक समविचारी घोळका किंवा झुंडच असते ना? त्या झुंडीला स्वत:चा विवेकी विचार करण्याची क्षमता नसतेच. बुवा किंवा त्याच्या हस्तकांनी डोक्यात जे भ्रम जोपासलेले असतात, त्यात मशगुल रहाण्याला असे समविचारी सुरक्षित जागा मानत असतात. त्यातून त्यांना बाहेर काढायचा प्रयास केलात, तर ते तुमच्यावरच गुरगुरू लागतील. कारण त्यांच्या ज्या अंधश्रद्धा वा समजुती असतात, तेच त्यांच्यासाठी अगाध ज्ञान असते. त्याला छेद देणारे कुठलेही वास्तव त्यांच्या समोर आणून उपयोग नसतो. कारण त्यांना वास्तवाशी कर्तव्यच नसते. ते समजूतीच्या जगात सुखी असतात. मग असे भक्तगण आसारामचे असोत किंवा कुणा सेक्युलर बुवाबाबाचे अनुयायी असोत. त्यांना वास्तवाचे भय खुप भेडसावत असते. समजुतीचे भ्रामक जग त्यांच्यासाठी भूतबंगलाच असतो. विवेकबुद्धीशी त्यांचा ३६ चा आकडा असतो. म्हणूनच असे लोक बुद्धीमान म्हणून मिरवत असले, तरी व्यवहारात पक्के अंधश्रद्ध भक्तच असतात.

एक साधी गोष्ट घ्या, कुठला बुवाभगत सांगतो, की अमूक रोग झाला असेल, तर देवाचा कोप झाला आहे. त्याचे भक्तगण जितक्या आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यापेक्षा समविचारी पुरोगामी तसूभर वेगळे असू शकतात का? इथे कुठलाही पुरावा समोर नसताना एखाद्या हत्याकांडाला अमूक कोणी जबाबदार असल्याचे समविचारी बुवाने सांगायची खोटी, की तमाम समविचारी भक्त त्याचा शब्द उचलून धरतात. मध्यंतरी दाभोळकर हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पुण्याचे तात्कालीन पोलिस आयुक्त पोळ यांनी कुणा पराशक्तीच्या माणसाची मदत घेतल्याचा गवगवा झाला. त्याबद्दल दोन जाणत्यांनी मतप्रदर्शन केले होते. त्यात एक खुद्द अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे एक नामवंत श्याम मानव यांचा समावेश होता. तर त्यांच्यावरही समविचारी भक्त तुटून पडले होते. दुसरे होते परम संगणक भारतात विकसित करणारे डॉक्टर भटकर. त्यांनी अशी काही पराशक्ती असते आणि तिच्या मदतीने पाश्चात्य देशातही पोलिस गुन्हेतपास करतात, असे विधान केल्यावर तमाम समविचारी भक्त भटकरांवर तुटून पडले होते. पण भटकर सांगतात, त्याचा दाखला नॅशनल जिओग्राफ़िक किंवा डिस्कव्हरी वाहिन्यांवरच्या माहितीपटातून आलेला आहे. तिकडेही कोणी समविचारी भक्त ढुंकून बघायला तयार होता काय? आपला मठाधीश सांगतो, त्यावर अशा लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवून भटकर व श्याम मानव यांनाही धारेवर धरलेच ना? याला समविचारी वा भक्तगणांचे घोळके म्हणतात. समोरचा आपल्यातला नाही वा तसा वाटत नाही म्हटल्यावर त्याच्यावर तुटून पडण्याची झुंडशाही तशीच असते. दुसर्‍या धर्माचा वा जातीचा व विचारांचा असला, की त्याच्यात शत्रू शोधण्याला समविचारी नाव दिले म्हणून त्यातली झुंडशाही संपत नसते की लपत नसते. कारण दोन्हीकडले परिणाम सारखेच असतात.

समविचारी या शब्दातच भिन्न विचारांसाठी दरवाजा बंद करण्याची पुर्वअट सामावलेली असते. आणि नेमके असेच लोक वैचारिक सहिष्णूता व वैचारिक संघर्षाची भाषा बोलतात, तेव्हा म्हणूनच हसू येते. पण हसण्यावारी न्यावी अशी ही बाब सोपी नाही. जेव्हा असा भ्रम प्रभावी व शक्तीशाली होतो, तेव्हा तो अमानुष कृत्येही करू लागतो. म्हणूनच हिटलर, स्टालीन वा चे गव्हेरा आपल्या सहकार्‍यांकडून हिंसक हत्याकांड करून घेऊ शकले. भारतातून इसिसमध्ये सहभागी व्हायला निघालेल्या तरूणांची मानसिकता त्यापेक्षा भिन्न नाही. ते कुणाच्या रक्ताला आसूसलेले नाहीत. आपण इस्लामच्या धार्मिक कर्तव्यासाठी इराकला जावे, असे त्यांना वाटत असेल, तर त्यामागे समविचारी धारणाच असते. शेवट चांगला व उदात्त असल्याने त्यांना हिंसा गैरलागू वाटेनाशी होते. सामान्य घरातली ही मुले भारावली म्हणून त्यात सहभागी व्हायला निघालेली असतात. इस्लामचा जो अर्थ कोणीतरी त्यांच्या डोक्यात भरवलेला असतो, त्यालाच सत्य मानल्यावर अशा तरूणांची विवेकबुद्धी, सारासार विचारशक्ती नेस्तनाबूद होत असते. त्यांना समविचारी कोषात डांबून टाकले, की वास्तविक जगातले संदर्भ जाणवेनासे होतात आणि तिथून मग एखाद्या वस्तुप्रमाणे, हत्याराप्रमाणे त्यांना कुणाच्याही विरोधात वापरता येत असते. समविचारी म्हणवून घेण्यात आपण आपलीच विवेकबुद्धी गमावून बसतोय, याचेही भान त्यांना रहात नाही. समोर दिसणारे वास्तव बघायची हिंमत त्यांच्यात उरत नाही. कोणी दाखवायचा प्रयास केल्यास त्यांना सत्याची भिती वाटू लागते. त्या भितीपोटी सत्यच खोटे असल्याचा आक्रमक आरोप त्यांच्याकडून सुरू होतो. अंधश्रद्धा देवधर्माची असो किंवा समविचारी निष्ठा असोत, ती एकप्रकारची धुंदी असते आणि तिच्याच आहारी गेलेल्या व्यक्तीकडून कुठल्याही विवेकी कृतीची अपेक्षा करता येत नाही.

Wednesday, February 25, 2015

पुरोगामी-प्रतिगामी: एकूण झुंडशाहीच



Bertrand Russell — 'Collective fear stimulates herd instinct, and tends to produce ferocity toward those who are not regarded as members of the herd.'

माणूस हा मुळातच कळपात जगणारा प्राणी आहे. विविध विषयात तसा उल्लेख मुद्दाम केला जातो. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे म्हणायचा वास्तविक अर्थ काय? समाज म्हणजे तरी काय? इतर प्राणी जसे थव्याने वा कळपाने एकत्र जगतात, तसाच माणुसही कळपात वावरतो. जो भित्रा प्राणी असतो, तोच कळपाने जगतो. माणूस त्याला अपवाद नाही. आपण एकटेच आपले संरक्षण करू शकत नाही आणि समूहशक्तीनेच आपण सुरक्षित राहू शकू, अशा भयापोटी समाज नावाचा कळप माणसाने स्विकारलेला असतो. त्याही कळपात लहानमोठे समूह वा झुंडी असतात. जोवर बाहेरच्या कुठल्या धोक्याचे सावट असते, तोवर अशा समुहांची एकजिवता पक्की असते आणि जेव्हा हा बाहेरचा धोका संपुष्टात येतो, तेव्हा कळपाच्या अंतर्गत समुहातील उपजत हेवेदावे उफ़ाळून येतात. अर्थात अशा लहान समुहातही एकजीवता नसते. त्यातही व्यक्तीगत स्वरूपाचे वाद वितुष्ट असतातच. पण परस्पर गरजेपोटी एकरूपता स्विकारलेली असते. एकूण काय माणुस हा मुळातच झुंडीने जगतो आणि झुंडीसारखाच वागतो. अगदी आपल्या पांढरपेशा चेहर्‍याचे सभ्यपण मिरवणारेही त्यातलेच असतात. त्यामुळेच आधुनिक जगात ज्या काही विचारसरणी तत्वज्ञानाच्या गप्पा चालतात, त्याही झुंडीचे प्रतिक झालेले आहे. विचारांची लढाई शेवटी त्याच झुंडीपर्यंत येऊन थांबते. म्हणूनच झुंडीची मानसिकता समजून घेतली, तर आजच्याही युगातल्या वैचारिक लढाईची ढोंगबाजी उमजू शकेल. जोवर तुमच्यापाशी प्रतिकाराची शक्ती नसते, तोवर विचारांचा ढोल वाजवला जात असतो आणि तितकी हिंसक ताकद गोळा झाली, की वैचारिक झुंडीचे साम्राज्य उदयास येत असते. पण व्यवहारात सगळीकडे झुंडीनेच लोक जगत असतात आणि त्यातले मुठभर आपापल्या हेतू वा भूमिकेसाठी तत्वज्ञानाचे मुखवटे लावत असतात.

कालपरवा कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर अंत्ययात्रेत जी गर्दी उसळली होती, तिथे लाल झेंड्यासह लाल टोप्यांचा जमावडा दिसत होता. लाल सलामच्या घोषणा दिल्या जात होत्या. दाभोळकर यांच्याही संदर्भात तसेच म्हणता येईल. पण दुसरीकडे शिवसेनेच्या, बजरंगदल वा भाजपाच्या मेळाव्यातही त़सेच चित्र दिसते. सोहळा वा प्रसंग कुठलाही असो, त्यात सहभागी होणार्‍यांना प्रतिकाचे आकर्षण असलेले दिसेल. अगत्याने टोप्या, झेंडे वा ठराविक फ़लक वा वस्त्रेप्रावरणे परिधान केलेली दिसतात. अशी प्रतिके झुंडीसाठी अगत्याची असतात. कारण ती भूमिका वा विचारांचे प्रतिनिधीत्व करत असतातच. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे सामान्य व्यक्तीला अतिरीक्त उर्जा देत असतात. अंगी नसलेल्या सामर्थ्य व शक्तीची अनुभूती त्या व्यक्तीला अशा प्रतिकांमधून मिळत असते. एक तगडा गुंड असतो आणि त्याच्या तुलनेत हाडकुळा असलेला पोलिस शिपाई सुद्धा गुर्मीत बोलताना आपल्याला दिसतो. एका ठोश्यात गुंड अशा पोलिसाला झोपवू शकतो. पण त्याच्या अंगातले ते धाडस पोलिसाच्या गणवेशामुळे पांगळे पडत असते. ही प्रतिकांची किमया असते. त्या गणवेशामुळे पोलिस एकटा उरत नाही. त्याच्यामागे संपुर्ण सरकारची ताकद उभी असल्याचे भय गुंडाला गप्प ठेवीत असते. अगदी तीच बाब सार्वजनिक जीवनात बहुतांश प्रतिकांची असते. झुंडीत जगणारा माणूस म्हणूनच अशा प्रतिकांच्या आहारी जातो. त्याच्या अंगभूत नसलेल्या गोष्टी त्याला अशी प्रतिके काही काळापुरती बहाल करीत असतात. संघाच्या शाखेत गणवेशात जाणारा स्वयंसेवक आणि लाल टोपी घालून गर्जणारा कम्युनिस्ट यांची अवस्था वेगळी नसते. त्यांना विचारांपेक्षा ती प्रतिके शक्ती देत असतात. त्याच प्रतिकांच्या स्वरूपात त्यांच्या बुद्धीचे नियंत्रणही होत असते. त्यांना कार्यान्वीतही केले जात असते.

मोदींच्या विषयी काहीही लिहा वा बोला, त्यांचा भक्तगण विनाविलंब तुमच्यावर तुटून पडतो. विविध भिन्न जागी असलेला हा अनुयायी सारखाच व्यक्त होताना दिसेल. भाजपा विरोधकांचीही अवस्था त्यापेक्षा वेगळी आढळणार नाही. पानसरे यांची हत्या झाल्यावर हिंदूत्ववाद्यांच्या विरोधात असलेल्या सर्वच झुंडीतले लोक समान भाषेत सारखीच प्रतिक्रिया देताना आढळले ना? कालपरवा विधानसभेत एकमेकांचे गळे धरणार्‍या शिवसेना भाजपाच्या अनुयायांची इथे एकजीवता दिसून येईल. कारण पुरोगामी व प्रतिगामी असे दोन तट पडले, मग अंतर्गत झुंडी विरघळून एकजीव होऊन जातात. पानसरे यांच्या हत्येनंतर असेच अनेक गट एकसुरात बोलताना दिसतील, इतर प्रसंगी त्यांचे सूर परस्पर विरोधात दिसतील. झुंडीत जगणार्‍यांना स्वयंभूपणे विचार करण्याची मोकळीक नसते. त्यांना प्रसंगानुसार वहावत जावेच लागते. पुरोगामी असले मग हिंदू संघटनांच्या विरोधात काहीही असले, मग एकत्र येऊन बोलावेच लागते. विषय मदर तेरेसाचा असो किंवा बाबरीचा असो. नेमके तेच हिंदू संघटनांच्या बाबतीत आपल्याला बघता येईल. झुंडीत रहायचे तर झुंडीच्या प्रतिकांना व ओळखीला जपावे लागत असते. सहाजिकच कुठल्या झुंडीचे प्रतिनिधीत्व करता, त्यानुसार तुमची भूमिका ठरत असते. तिथे विवेकाला स्थान नसते. पुरोगामी ओळख असलेल्यांवर हल्ला झाला, मग विनाविलंब प्रतिगामी मानल्या गेलेल्यांनीच तो केल्याचा ओरडा सुरू करायचा असतो. तेच प्रतिगामी उलट परिस्थितीत करताना दिसतील. त्यात योग्य अयोग्य असला भेदभाव करायला वाव नसतो. तसा विवेक दाखवायला गेल्यास तात्काळ तुम्ही गद्दार असल्याचा आरोप तुमच्याच झुंडीतले लोक एकमुखाने करू लागतात. किंबहूना त्याचीच भिती असते, म्हणून झुंडीत जगावे लागते. आज विवेकाची भाषा केली आणि उद्या एकटे पडलो तर आपलेच सहकारी मदतीला येणार नाहीत, याची भिती असते ना?

म्हणून तर झुंडीतले लोक एका झुंडीतून दुसर्‍या झुंडीतही जातात आणि मग आपल्याच जुन्या झुंडीवर बेछूट आरोपही करू लागतात. कारण अशा सर्वांना एकटेपणाची असुरक्षितता भेडसावत असते. विचार, धर्म, जात, संघटना वा तत्सम विविध झुंडी म्हणूनच मानवी जीवनाचे यशस्वी नियंत्रण करत असतात. त्यातले काही गट वा झुंडी आपण झुंड नसल्याचे दावेही करतात. विवेकाचे मुखवटेही लावतात. पण वास्तवात तेही झुंडीनेच जगत असतात आणि झुंडीसारखेच वागत असतात. त्यांच्यातला वाद चर्चेने कधीच संपत नाही की निकाली लागत नाही. त्याचा निचरा शेवटी कुठली झुंड अधिक शक्तीशाली असते, त्यानुसारच होत असतो. मग त्याच शक्तीच्या बळावर सत्याचा विजय झाल्याचा डांगोरा पिटला जात असतो. भिन्न विचारांची कत्तल होत असल्याचा दावा करणार्‍या कम्युनिस्टांची जिथे सत्ता आली, त्यांनी कुठल्या दुसर्‍या राजकीय विचार वा तत्वज्ञानाला डोके वर काढू दिले काय? फ़ॅसिस्ट लोकांच्या सत्तेत मतभिन्नतेला स्थान असू शकते काय? भारतातल्या कुठल्या लोकशाही पक्षात नेत्यांच्या विरोधात बोलून वा भूमिका घेऊन पक्षसदस्य रहाणे शक्य आहे? सोमनाथ चॅटर्जी कशाचा बळी होते? विचारांचा की विवेकाचा? तेही झुंडीचाच बळी नव्हते का? शरद पवारांना वेगळी चुल कशाला मांडावी लागली? रा. स्व. संघात त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. मग ते फ़ॅसिस्ट आणि बाकीचे लोकशाहीनिष्ठ कसे? सगळ्याच झुंडी असतात. मात्र आपण झुंड आहोत, हे मान्य करायची कोणाची तयारी नसते. हजारो वर्षापुर्वी आपले पुर्वज झुंडी व कळपाने जगले आणि आपणही आज तसेच जगतो. पुर्वजांपेक्षा आजचे आपण अधिक पाखंडी व ढोंगी आहोत इतकेच. बाकी आपल्यात त्यांचेच सारे गुणदोष तसेच ठासून भरलेले आहेत. आजही इतक्या वैज्ञानिक भौतिक प्रगतीनंतर आपण आपल्यातल्या ‘समाजप्रिय’ जनावरावर मात करू शकलेलो नाही. आजही आपण कळपातले जनावरच आहोत.

Tuesday, February 24, 2015

विचारांसाठी माणसांना कोण ठार मारतो?


 (इद्दूकी जिल्ह्याचे मार्क्सवादी चिटणिस मणी)

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर पुन्हा एकदा बिनबुडाच्या आरोपांचा कांगावा सुरू झाला आणि विनाविलंब डझनावारी ‘आम्ही सारे’ म्हणत भोंदू लोक रस्त्यावर आले. अर्थात त्यात आता नवे काही राहिलेले नाही. ताबडतोब खुन्यांना हल्लेखोरांना अटक करायच्या मागण्याही आता नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यात जणू खुन होताना बघितले आहे, असा आवेश असतो. पण नुसते आरोप करायचे आणि धुरळा उडवायचा. मग ज्याची हत्या झाली त्याच्याविषयीची सहानुभूती जागवून आपल्या राजकीय पोळ्या त्यावर भाजून घेण्याचा उद्योग आता नित्याचा झालेला आहे. त्यात बळी पडलेल्याविषयी किंचितही आत्मियता नसते. त्यापेक्षा अशा दुर्घटनेची इव्हेन्ट करण्या्ची जणू स्पर्धाच चालू होते. पानसरे यांच्या हत्येनंतर त्याला उधाण आले तर नवल नव्हते. कारण ती नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडानंतरची पुनरावृती होती. खरेच अशा हत्या व हल्ले राजकीय असतात आणि त्यामागे नेमके काही हेतू असतात, याबद्दल शंका नाही. पण कुठल्याही गुन्हा व खुनामागे काहीतरी हेतू असतो. कोणाचा तरी लाभ अशा हत्याकांडामागे असतो. असा कुठला हेतू असु शकतो, त्याचे विवेचन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळातील नेते एम एम मणी यांनी केलेले आहे. त्यावरून तीनच वर्षापुर्वी काहुर माजलेले होते. अर्थात केरळ इथून खुप लांब असल्याने इथले विवेकवादी तेव्हा ढाराढूर झोपा काढत होते. त्यांनी त्याबद्दल चकार शब्द उच्चारला नाही. त्यांचा विवेक झोपेतून जागा होण्यासाठी दाभोळकरांना आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागली. तरीही अजून यापैकी कोणी मणी नामक मार्क्सवादी नेत्याने केलेले मार्गदर्शन अभ्यासायला तयार दिसत नाही. राजकीय हत्या करण्याचे धोरण व कारस्थान डाव्यांनी कसे पुर्वापार चालविले आहे, त्याचा तपशीलच मणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितला होता.

२००८ सालात केरळमध्ये मार्क्सवादी पक्ष सोडून गेलेल्या आणि वेगळा प्रादेशिक पक्ष स्थापन करणार्‍या टी. पी. चंद्रशेखरन या आपल्याच जुन्या सहकार्‍याची डाव्या नेत्यांनी कशी वैचारिक लढाई केली? त्यांनी त्याला ठार मारून संपवले. त्याचे प्रकरण २०१२ मध्ये खुप गाजत होते. डाव्या किंवा पुरोगाम्यांची वैचारिक लढाई कशी असते? त्यांचे काही विचार आहेत आणि तत्वज्ञान आहे. तेच अंतिम असून त्याला मान्यता देण्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नसते. ते अमान्य करणे किंवा त्याच्या विरोधात लढायला उभे रहाणे, म्हणजे प्राणांची बाजी लावणे होय. चंद्रशेखर हत्याकांडाचे प्रकरण गाजत असताना इद्दूकी जिल्ह्याचे मार्क्सवादी चिटणिस मणी यांनी आपल्या पक्षाने चंद्रशेखर यांची हत्या केलेली नाही, असा निर्वाळा भाषणातून दिला होता. पण तेवढ्यावर न थांबता, तसे असते तर आपला पक्ष खुनाची जबबादारी घ्यायला कचरला नसता अशीही ग्वाही देऊन टाकली. त्याला दुजोरा देण्यासाठी मणी यांनी त्यापुर्वी पक्षाने तीन हत्या कशा पद्धतशीरपणे घडवून आणल्या, त्याचाही तपशील याच भाषणातून दिला. पुरोगाम्यांच्या दुर्दैवाने कोणीतरी त्याचे चित्रण करून ठेवले आणि त्याचा बभ्रा झाला. सहाजिकच तिथल्या विधानसभा व राजकारणात डावे कुठल्या ‘माळेचे’ मणी आहेत त्यावर चर्चा झाली. आपल्या राजकारणात आडव्या येणार्‍यांना आपण कसे खड्यासारखे बाजूला करतो, याची कबुलीच मणी यांनी दिलेली होती. मुद्दा इतकाच, की लेनीन स्टालीन वा चे गव्हेरा यांच्यापर्यंत जाण्याची गरज नाही. नक्षलवाद्यांच्या जंगलातही शिरायचे कारण नाही. लोकशाहीत विचार जोपासण्यासाठी विचार कसे जीवानिशी मारावेत, याचे मार्गदर्शन मार्क्सवादी नेत्याने केलेले आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या विवेकवादी परिवर्तनाच्या चळवळीने कुठली अफ़ुची गोळी घेऊन गाढ झोपणे पसंत केले होते?

आज उपोषणे करणारे वा फ़लक मिरवणारे तेव्हा विवेकशून्य होऊन बिळात दडी मारून बसले होते काय? जगातली कम्युनिस्ट चळवळ आणि भारतातली महाराष्ट्रातली कम्युनिस्ट चळवळ वेगळी नाही. सर्वांच्याच विचार धोरणात प्रसंगी हिंसा करण्याचा सारखाच अंतर्भाव आहे. त्यातले काही पानसरे यांच्यासारखे निव्वळ वैचारिक वाद प्रतिवादात रमणारे असतात, तर काही थेट कृती करणारे हिंसकही असतात. म्हणून प्रत्येक कम्युनिस्ट वा पुरोगामी हिंसक हल्लेखोर होत नाही. पण हिंदूत्ववाद्यांना जर सरसकट नियम लावला जाणार असेल, तर कम्युनिस्टांनाही सरसकट तोच नियम लावावा लागेल ना? दोनचार हिंदूत्ववादी हिंसक कृती करतात, म्हणून त्यांची संपुर्ण संघटनाच खुनी ठरवायची असेल, तर दोनचार खुनी कम्युनिस्टांसाठी संपुर्ण चळवळच हल्लेखोर म्हणावी लागेल ना? कारण कुठल्याही विचारांचा अतिरेक व्हायला लागला, मग त्यातून हिंसेचा उदभव होत असतो. आपला तो विचार आणि तोच बाकीच्यांनी निमूट मान्य केला पाहिजे, असा अट्टाहास असहिष्णूतेला जन्माला घालत असतो. त्याची सुरूवात भिन्न विचारांना वा वेगळ्या मतांवर झुंडीने हल्ला करण्यातून होत असते. दाभोळकर-पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर एका संघटना विचारांच्या लोकांवर ज्याप्रकारे आरोप सुरू झाले, तेच मुळात असहिष्णू वृत्तीचे द्योतक आहेत व होते. ते आपल्या विचारांचे नाहीत वा समविचारी नाहीत, म्हणूनच ते हल्लेखोर आहेत असा एकसुरी प्रचार त्यांच्या विरोधातील हिंसेला प्रेरणा देणारा असतो. कारण अशी एकसुरी प्रतिक्रियाच कळपाची वा झुंडीची मानसिकता जोपासत असते. आपले नाहीत वा समविचारी नाहीत, म्हणूनच ते शत्रू आणि आपले शत्रू म्हणूनच त्यांच्यापासून जगाला धोका असल्याचा मानसिक प्रवास आपोआप होत जातो. केरळचे डावे मार्क्सवादी नेते मणी त्यातूनच मग हिंसेचे समर्थन करतात व कृतीही करतात.

सवाल इतकाच आहे, की तसेच असेल तर विवेकाचे व वैचारीक संघर्षाचे नाटक कशाला? प्रतिकार वा प्रतिहल्ल्याची शक्ती नसल्याने मग वैचारिक मुखवटा चढवला जातो. पुढे शक्ती जमा झाली, तर तितकाच हिंसक प्रतिकार करायची इच्छा त्यातून लपत नाही. ‘हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है’ अशा घोषणा विवेकाचे प्रतिक आहेत काय? कातील जिंदा है म्हणून शरम वाटत असेल, तर शरम संपवायचा कुठला मार्ग असतो? तो मार्ग चोखाळण्याची इच्छा त्यातून व्यक्त होत नाही काय? अशा घोषणा कायदा व शिक्षा देण्याचा अधिकार हाती घेण्याची अतीव इच्छा व्यक्त करत नाहीत काय? त्यालाही हरकत नाही. पण मग उगाच संयमाचे वा विवेकाचे नाटक कशाला? कालपरवापर्यंत बंगालमध्ये डाव्यांची सत्ता कशाच्या बळावर होती? आज तीच झुंडशाही ममताच्या गोटात गेल्यावर डाव्यांना विवेक आठवू लागला आहे. पण आता त्यांची सद्दी संपली असून ममताची झुंडशाही मोकाट आहे. तिच्याशी भाजपा झुंज देतो आहे. उद्या तीच झुंडशाही भाजपाच्याही गोटात दाखल होईल आणि मग ममताला विवेकाचे महत्व आठवेल आणि विचारांची लढाई विचारांनी करण्याचे शहाणपण सुचेल. विवेक वगैरे गोष्टी सोयीच्या असतात. जेव्हा आपल्या मनगटात हल्ला करायची शक्ती नसते, तेव्हा विवेकाच्या गप्पा करायच्या आणि रक्त सांडण्याची कुवत आली, मग दुसर्‍यांची मुस्कटदाबी करायची हा सर्वच राजकीय चळवळी व संघटनांचा खाक्या राहिला आहे. तेव्हा कोणीही उगाच वैचारिक संघर्षाच्या गमजा करण्याचे कारण नाही. दाभोळकर पानसरे अशा लोकांच्या संगतीत असले, तरी व्यक्ती म्हणून विवेकी होते. त्यांचा हकनाक बळी गेला ही वस्तुस्थिती आहे. त्याचे भांडवल व इव्हेन्ट करून कोणी किती राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या, हा निव्वळ बेशरमपणा होत चालला आहे. तो कुठेतरी थांबवला पाहिजे.

Monday, February 23, 2015

लहान तोंडी मोठा घास घेणे भाग आहे



पोर लाडावलेले असले, मग त्याला वेळीच वठणीवर आणावे लागते. अन्यथा असे पोर शेफ़ारत जाते आणि अतिरेक करू लागते. आपल्यालडे पुरोगामीत्व किंवा सेक्युलर नावाचे पोर असेच दिवसेदिवस खुप शेफ़ारले आहे. ते ओळखण्याची अक्कल स्वत:ला बुद्धीमंत मानणार्‍यांना नसली, तरी सामान्य जनतेला पुरेशी आहे. म्हणूनच कुठल्याही शेफ़ारत जाणार्‍या पोराला वेळीच वठणीवर आणायचे कौशल्य आजवर सामान्य बुद्धीच्या भारतीयांनी दाखवले आहे. अलिकडेच दिल्लीच्या निकालातून त्या जनतेने भाजपाच्या शेफ़ारत चाललेल्या मस्तवालपणाला वठणीवर आणले. पण ते भाजपाचे पोर तरी कशामुळे शेफ़ारले होते? आठ महिने आधी लोकसभेच्या निवडणूका झाल्या, त्यात जो पुरोगामीपणाचा अतिरेक झालेला होता, त्याचे पाय जमीनीला लागावेत म्हणूनच मतदाराने देशभरात सर्वाधिक बदनाम असलेल्या जातियवादी हिंदूत्ववादी ठरवल्या गेलेल्या नरेद्र मोदी यांनाच देशाच्या पंतप्रधान पदावर बसवले होते. त्याचा अर्थ सेक्युलर धर्मनिरपेक्षतेचे जे भयंकर थोतांड मागल्या दहा बारा वर्षात चालले होते, त्यालाच वठणीवर आणायचे होते. पण दुसरीकडे भाजपावाल्यांना आपल्याला मतदार जनतेने अढळपदाचा ताम्रपट बहाल केल्याची स्वप्ने पडू लागली आणि दिल्लीपासून थेट गल्लीपर्यंतचा भाजपावाला कुठल्याही दगडाला शेंदूर फ़ासून ‘पाया पडा’ असे आदेशच देत सुटला. मग त्याला कोणी वठणीवर आणायचे? ती नैतिक ताकद पुरोगामीत्वाचे उपरणे पांघरून निषेधाची होमहवने करण्यात गर्क असलेल्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे आठ महिन्यात भाजपाला दिल्लीतल्या जनतेने त्याची औकात दाखवून दिली. याचा अर्थ आता भाजपा वा मोदींचा शेवट सुरू झाला, असल्या धुंदीत पुन्हा तथाकथित सेक्युलर पुरोगामी शेफ़ारल्यासारखे वागू लागले तर नवल नाही. आजकालच्या पुरोगाम्यांची अवस्था तर आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, अशीच असते.

अशा एकूण धुंदीतल्या पुरोगाम्यांना पुन्हा शेफ़ारून जायला नुसती संधीच हवी होती. दिल्लीने तो मोका दिला आणि कालपरवाच्या कोल्हापुरातील एका हिंसक घटनेने तर हे लाडावलेले पोर पुन्हा शेफ़ारल्यागत भरकटू लागले. अजून कुठला पुरावा हाती नाही की तपासाला दिशाही मिळालेली नाही, अशा स्थितीत बेलगाम आरोपांची बरसात सुरू झाली. जगातल्या कुठल्याही दुर्घटनेला हिंदूत्ववादी वा हिंदू संघटनाच जबाबदार असतात, असा त्यांचा एक आवडता सिद्धांत आहे. त्यामुळे मग विनाविलंब कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचे खापर हिंदू संघटनावर फ़ोडण्याची स्पर्धाच सुरू झाली. इथपर्यंतही ठिक म्हणता येईल. कुठेही असे बेछूट आरोप आपल्या प्रतिस्पर्ध्यावर होतच असतात. पण त्यासाठी थेट नथूरामपर्यंत जाणे आणि आपण कसे अहिंसेचे पुजक असल्याचा आव आणणे; म्हणजे डोक्यावरून पाणी झाले. ज्यांच्या अशा वल्गना चालू आहेत, त्यांना त्यांचीच वंशावळ मग सांगणे भाग होते. पण दुर्दैवाने स्वत:ला जाणकार व विश्लेषक म्हणवून घेणारी मोठमोठी तोंडे अशावेळी मुग गिळून गप्प बसतात, हाच आजवरचा अनुभव आहे. मग ते काम कोणी तरी करायला हवे ना? आज जे कोणी अहिंसेचे गोडवे गात आहेत आणि विचारांचा संघर्ष हा विचारांनीच व्हायला हवा, असे हिरीरीने सांगत आहेत, त्यांचा इतिहास कितीसा ‘निरमा’ पावडरने धुतलेला आहे? की त्यांच्या घरात सर्फ़ वापरले जाते आणि म्हणूनच त्यांच्या अंगासह कपड्यांवर असलेले रक्ताचे-हत्येचे ‘डाग अच्छे’ असतात? नथूरामसाठी सगळा रा. स्व. संघ खुनी प्रवृत्तीचा म्हणायचा असेल, तर प्रत्येक कम्युनिस्ट वा त्या विचारांचा पुरस्कर्ताही रक्तलांच्छितच असणार ना? जो नियम संघाला लावाल, त्यापासून कम्युनिस्ट वा पुरोगम्यांची सुटका कशी होईल? गेल्या काही वर्षात केरळमध्ये डझनावारी हत्या कोणाच्या झाल्या व कोणी केल्या?

आपल्या विचारांशी व भूमिकेशी सहमत नसतील त्यांना खुन पाडून संपवायची लढाई कम्युनिस्टांनी गेल्या शतकात जगभर अंमलात आणलेली आहे. त्याला भारत सुद्धा अपवाद नव्हता. त्यामुळे जो कोणी कम्युनिस्ट तत्वज्ञानाचे गोडवे गातो, त्याने उगाच विचारांचा संघर्ष विचारांनीच करायवी मानभावी भाषा करण्यात अर्थ नाही. मजेची गोष्ट म्हणजे असे आज कोणी म्हटले, मग तमाम पुरोगामी एकाच बापाचे वारस असल्यासारखे अंगावर येतात. पण वास्तवात ते एकाच पित्याची संतान नाहीत आणि कालपरवा त्यांचेच पुर्वज एकमेकांवर असेच अरोप करत होते. दाभोळकरांनी ज्यांचा वारसा चालविला, ते एस एम जोशी, नानासाहेब गोरे किंवा बॅरिस्टर नाथ पै यांनी अर्धशतकापुर्वी कोणाकडे खुनी व रक्तपिपासू म्हणून बोटे दाखवली होती? त्याचा त्यांच्याच आजच्या वंशजांनी शोध घेतला आहे कधी? नथूरामची वंशावळ आणि पिलावळ शोधण्यापेक्षा अशा पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी स्वत:चाच वारसतपास करून घ्यावा. ज्या ट्रॉटस्की, केरेन्स्की वा इम्रे नाझ यांच्या सांडलेल्या रक्ताने तेव्हाचे समाजवादी आक्रंदून रडत होते, ते रक्त सांडणारे कुठले हिंदूत्ववादी होते? त्यांनी गोळवलकर गुरूजी यांची पुस्तके वाचली होती, की लेनीन-स्टालीनचा वारसा पत्करला होता? छत्तिसगडच्या सुकमा भागात विद्याचरण शुक्ला यांच्यासह दोन डझन कॉग्रेसच्या नेत्यांचे सामुहिक हत्याकांड करणारे माओवादी संघाच्या शाखेतले स्वयंसेवक होते, की दास कॅपिटल या धर्मग्रंथाचे पठण करणारे होते? तेव्हा त्यांनी चोखाळलेला मार्ग हिंदुत्ववादाचा व धर्माचा होता, की वैचारिक लढाईचा होता? वैचारिक संघर्ष विचारांनी करायचा अशी पोपटपंची करणार्‍यांनी तेव्हा कम्युनिस्ट हिंसक तत्वांचा हिरीरीने निषेध केला होता काय? केरळात एका मार्क्सवादी नेत्याने विरोधकांना ठार मारण्याचा जो ‘विचार’ मांडला, त्याचे चित्रणही प्रसिद्ध आहे. त्याचा निषेध यापैकी कितीजणांनी केला होता?

संवेदनाशील असणे म्हणजे काय असते बुवा? चित्त्याची वा सिंहाची मादी आपल्या पिलांचे पोट भरण्यासाठी हरण व झेब्र्याच्या पिलावी निर्घृण शिकार करते. तिची ती ममता असते काय? त्यापेक्षा आपल्या हिंसाचाराला वैचारिक दागिने घालणार्‍यांच्या मिरवण्याला कुठला वेगळा अर्थ असू शकतो? ज्या चे गव्हेराचे मुखवटा छापलेले टीशर्ट मोठ्या अभिमानाने मिरवले जातात, त्याच्या भूतदयेच्या कहाण्य़ा काय सांगतात? आपल्या विरोधकांवर नुसते आरोप ठेवून त्यांचे शिरकाण करणार्‍या कॅस्ट्रो वा गव्हेराने कोणती वैचारिक लढाई हत्याराशिवाय लढवली होती? नथूरामच्या नामजपाची जपमाळ अहोरात्र ओढत बसलेल्या पुरोगामी संतमहंतांना आपलाच इतिहास कसा आठवत नाही? त्यांच्याच मागे हुरळलेल्या त्यांच्या सावत्र वा अनौरस समाजवादी बांधवांना आपल्या पुर्वजांच्या शब्दांचेही स्मरण उरलेले नाही. अशा सगळ्या उपटसुंभांनी किती खोटेपणा करावा यालाही मर्यादा असतात. सभ्यपणा म्हणून कोणी गप्प बसत असेल वा मौन बाळगत असेल, तर त्यालाच दुबळेपणा मानला जाणे चुकीचे आहे. कम्युनिस्टांचा भारतातला व जगातला इतिहास हिटलर वा तालिबानांपेक्षाही भीषण रक्तलांच्छित आहे. त्यांनी गांधीच्या वारश्याची उसनवारी करून भोळसट समाजवादी वंशजांना बगलेत मारून किती नाटक रंगवावे याला मर्यादा आहेत. आज जे आरोप दाभोळकर व पानसरे यांच्या हत्याकांडानंतर हिंदूत्ववाद्यांवर चालू आहेत. त्यापेक्षा अधिक गंभीर आरोप १९५०-६० च्या दशकात कम्युनिस्टांवर समाजवाद्यांनी केलेले होते. त्यावरून राजकारणही केलेले होते. १९४८ चा नथूराम आठवणार्‍यांना त्यानंतर बारा वर्षांचा इतिहास कसा आठवत नाही? इतिहासाचा तो कोळसा उगाळण्याची इच्छा नव्हती. पण शेफ़ारलेल्यांना शुद्धीवर आणण्यासाठी तोच कोळसा उगाळणे भाग आहे. मोठ्या तोंडांची दातखिळी बसली असेल, तर लहान तोंडी मोठा घास घेणेही भाग आहे. (अपुर्ण)

Sunday, February 22, 2015

ह्या मुक्ताफ़ळांचे फ़लोद्यान कोणाचे?


मुंबईच्या प्रथम नागरिक व महापौर सौ. स्नेहल अंबेकर यांच्या विविध विधानांमुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे. लेख व अग्रलेख लिहून अनेकजण आपल्या पांडित्याचे प्रदर्शन मांडण्यात आघाडीवर आहेत. पत्रकार संपादक हा जगातल्या सर्वच गोष्टीतला जाणता असतो, अशी एक समजूत आहे. त्यामुळे नित्यनेमाने सार्वजनिक जीवनात मान्यवर म्हणून वावरणार्‍यांना भलतेसलते प्रश्न विचारून त्याची खिल्ली उडवणे, हा आजकाल पत्रकारांचा एक छंद बनून गेला आहे. त्यात कधी महापौर सापडतात, तर कधी एखादा मंत्री वा पुढारी गळाला लागतो. सध्या स्नेहल आंबेकर हे अशा पत्रकारितेचे गिर्‍हाईक झाले आहे. मग त्यांनी डेंग्युबद्दल केलेले वक्तव्य असो किंवा स्वाईन फ़्लू या साथीच्या आजाराविषयी केलेले भाष्य असो. त्यांचे विधान हास्यासद आहे यात शंकाच नाही. पण तेवढ्यावरून त्यांची खिल्ली उडवणारे शहाणे ठरतात काय, असाही प्रश्न कधीतरी विचारण्याची गरज आहे. मुळात अशा कुठल्याही अत्यंत तांत्रिक वा गहन विषयावर महापौरांना जाणकार असल्याचे समजून प्रश्न विचारण्याची आवश्यकता काय? आणि प्रश्न विचारला नसताना त्यांनी असे काही बरळले असेल, तर दोष कुणाचा? आपल्या देशात कुठल्याही महत्वाच्या पदाला कसली पात्रता आवश्यक नाही. त्याच्या पाठीशी बहूमताचा आकडा असावा लागतो. असा माणूस महापौर मुख्यमंत्री व अगदी पंतप्रधान होऊ शकतो. त्याच्या बुद्धीमत्तेचा संबंध कुठे येतो? जीतनराम मांझी बिहारचे मुख्यमंत्री कशामुळे झाले? त्यांच्यामागे नितीशकुमार यांनी बहूमताचा आकडा विधानसभेत केला म्हणून ना? त्याचे कौतुक किती झाले होते? अतिदलित समाजातला हा माणुस मुख्यमंत्रीपदापर्यंत भिडला, याचे कौतुक करताना पात्रतेचा कोणी विषय तरी काढला होता काय? पुढल्या काळात त्यांनी मुक्ताफ़ळे उधळली असतील तर मग दोष कुणाचा?

आपण जगातले एक महान पंडित आहोत आणि कुठल्याही विषयावर आपले प्रभूत्व आहे, असा दावा मांझी यांनी कधीच केला नव्हता. मग त्यांची जी काही बुद्धी असेल, त्यानुसार त्यांनी एखाद्या विषयात मतप्रदर्शन केल्यास थयथया नाचायची गरज आहे काय? विवाहित महिला गर्लफ़्रेन्ड असली तर काय बिघडले? बिहारमध्ये नव्वद टक्के पुरूष दुसर्‍याच्या पत्नीला घेऊन फ़िरतात, असे वादग्रस्त विधान मांझी यांनी केल्यावर लगेच मुक्ताफ़ळे उधळल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्यांनी प्रत्यक्ष असे बघितले असेल तर तसे बोलण्यात गैर ते काय? भले ते व्यवहारी सभ्यतेमध्ये बसणारे नसेल, तरी त्यांचा तसा अनुभव असेल, तर मांझी यांचा गुना कोणता? त्यांना तसे दिसणे हा त्यांचा गुन्हा असू शकत नाही. पण ज्या प्रतिष्ठीत समाजाकडे बुद्धीमत्तेची मक्तेदारी असते, त्या वर्गाला असे व इतके खरे बोललेले चालत नाही. तोंडदेखले खोटे बोलून समाजात सभ्यता कायम असल्याचे नाटक टिकवण्याचा त्या वर्गाचा आग्रह असतो. बिचार्‍या मांझींना तसे खोटे पण सभ्य बोलण्याची सवय नाही यासाठी गुन्हेगार ठरवणे किती न्याय्य आहे? त्यांची बुद्धी व कुवत यापेक्षा त्यांच्याकडून अधिक अपेक्षा बाळगणे, हा अन्यायच नाही काय? तीच कथा मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आहे. महापौर होण्यासाठी कुठली पात्रता ठरलेली नसेल आणि महिला आरक्षणामुळे त्यांच्यावर ते पद भूषवण्याची सक्ती झालेली असेल, तर दोष कुणाचा? त्यांच्या विधानांना मुक्ताफ़ळे म्हणायचे असेल, तर अशा ‘फ़ळांचे’ उत्पादन करणारे फ़लोद्यान ज्यांनी उभारले, त्यांना दोष द्यावा लागेल. पदावर बसल्यामुळे कोणी बुद्धीमान होऊ शकत नाही किंवा विविध विषयातला जाणकार होऊ शकत नाही. त्याच्या ज्या मर्यादा असतात, त्यानुसारच त्याच्याकडून अपेक्षा बाळगाव्यात. जास्त अपेक्षा बाळगणार्‍याची चुक असते.

दलित उद्धाराचे नाटक रंगवण्यासाठी नितीशनी मांझी यांना आपला वारस म्हणून निवडले होते. त्यांच्यापेक्षा अधिक गुणी व जाणता दलित मिळालाच नसता असेही नाही. पण तो दलित नितीश यांच्या कब्जात राहिला असता असेही नाही. स्वयंभू वा बुद्धीमान दलित मात करू शकेल, या भयाने मांझी यांची निवड नितीश करतात, तेव्हा गुन्हेगार मांझी नव्हेतर नितीश असतात. आरक्षणाने पिछड्या वा दलितातील गुणी लोकांना संधी मिळतेच असेही नाही. दिसायला दलिताला न्याय द्यायचा असतो. पण व्यवहारात तो आपल्या हुकूमाचा ताबेदार असावा लागतो. लालूंनी महिलांना संधी म्हणून आपल्याच पत्नीला मुख्यमंत्रॊपदी बसवले होते. त्यातून बिहारचे काय झाले, ते आपण जाणतोच. कित्येक मतदारसंघ महिलांचे म्हणून राखीव केल्यानंतर नवर्‍याने तिथून पत्नीला निवडून आणायचे आणि तिच्या नावाने कारभार स्वत: चालवायचा हे जग बघते. तरीही आपण त्याला महिला सशक्तीकरण म्हणून गोडवे गातोच ना? नगराध्यक्ष, सभापती वा महापौर अशी पदे जेव्हा आरक्षणाने भरली जातात व त्यासाठी सक्ती असते, तेव्हा तिथे येऊन बसणार्‍याकडून अमूक एका गुणवत्तेची अपेक्षा करणे हा मुर्खपणा असतो. जात वा लिंग ही पात्रता केल्यावर तशी अपेक्षा बाळगणे हाच अन्याय आहे. कोल्हापुरच्या महिला महापौरांनी लाच खाण्यात पात्रत्ता दाखवली. अशी गुणवत्ता आत्मसात करणे सोपे असते. बुद्धीमत्ता आत्मसात करणे कष्टाचे काम असते. आणि जे अशा मागास पिछड्या वर्गातले तितकी मजल मारतात, ते मुठीत राहून काम करण्याशी शक्यता नसते, मग त्यांना संधी दिलीच जात नाही. तेव्हा दोष अशा पदावर बसणार्‍यांचा नसतो. तर त्यांना तिथे नेऊन बसवणार्‍यांचा असतो. त्याचे खोटेनाटे कौतुक करणार्‍यांचा दोष असतो. कारण तेच अशा मुक्ताफ़ळांचे उत्पादन करणार्‍या फ़लोद्यानाचे निर्माते असतात.

बरोबर एक महिन्यापुर्वी देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर मुंबईत एका कार्यक्रमानिमीत्त आलेले होते. त्यांनी देशाच्या सुरक्षेसंबंधी एक महत्वाचे सूचक विधान केलेले होते. त्याच्या बातम्या देताना अनेक पत्रकारांनी अकलेचे तारे तोडले होते. ‘डीप असेट’ असा शब्द पर्रीकर यांनी वापरला आणि माजी पंतप्रधानांनी त्याबाबतीत हेळसांड केली असे वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानातल्या त्या शब्दाचा अर्थ किती पत्रकारांना कळला होता? पण त्यावरून काहूर माजवण्याची पत्रकारांमध्ये स्पर्धाच माजली होती. पर्रीकर म्हणाले काय आणि पत्रकारांना समजले काय? राईचा पर्वत करणार्‍या पत्रकारांनी तेव्हा उधळली ती मुक्ताफ़ळे नव्हती तर कुठली फ़ळे होती? दोनच दिवसात मुर्खणाला लक्षात आल्यावर सर्वच पत्रकार, माध्यमांनी तो विषय बासनात गुंडाळला होता. मग तेव्हा मुक्ताफ़ळांची बाजारपेठ इतक्या लौकर कशाला उठवण्यात आली? असा अर्धवटपणा महापौर वा मंत्री पुढार्‍यांनी केल्यावर लगेच नेमबाजी करणारे शहाणे, त्यांच्यातले काहीजण असे अकलेचे तारे तोडतात, तेव्हा अवाक्षर कशाला बोलत नाहीत? माध्यमाचा मुक्त फ़ैलाव झाल्यानंतर मुक्ताफ़ळांची फ़लोद्याने बहरली आहेत. जितकी माध्यमे त्याची बळी आहेत, तितकेच राजकारणही त्याचे बळी झाले आहे. तेव्हा कुणा एका महापौर वा पुढार्‍याला कोंडीत पकडून आपला शहाणपणा मिरवण्यात अर्थ नाही. पात्रता गुणवत्ता यांची अपेक्षाच असेल, तर यासाठी सर्वानीच प्रयत्नशील असणे अगत्याचे आहे. स्नेहल आंबेकरांच्या अकलेचे तारे मोजणार्‍या संपादकांनी अग्रलेखातून तोडलेले तारेही दाखवता येतील. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात याचा विसर पडता कामा नये. एकूणच सार्वजनिक जीवनात जो उथळपणा आलेला आहे, त्याचा खळखळाट प्रत्येक क्षेत्रात दिसला तर नवल नाही. कोणा एकाने शहाणपणाच्या मक्तेदारीचा दावा करण्यात म्हणूनच अर्थ नाही.

Saturday, February 21, 2015

आम आदमी पार्टी की तिसरी शक्ती?

आम आदमी पक्षाच्या सव्वा वर्षापुर्वीच्या यशाने अनेकजण भारावले होते आणि तेव्हाच त्यांनी केजरीवाल मोदींचा विजयरथ रोखण्याची भाकिते केलेली होती. ती तेव्हा कशी फ़सली, हे आपण मागल्या मे महिन्यातच बघितले. ती फ़सणारच होती. कारण दिल्लीतल्या तेव्हाच्या निकालांचे योग्य विश्लेषण झाले नव्हते आणि आज देखील दिल्लीतील त्या पक्षाच्या अपुर्व यशाने भारावलेल्यांना वास्तवाचे भान राहिलेले नाही. मात्र खुद्द केजरीवाल व त्यांचे राजकीय मार्गदर्शक योगेंद्र यादव, यांनी आपल्या भावी वाटचालीचा नेमका आराखडा तयार केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे २०१३ च्या अखेरीस केजरीवाल यांनी दिल्लीतही भाजपाला पराभूत केले नव्हते. तर कॉग्रेस पक्षाला दणका दिलेला होता. पण तो धक्का देताना त्यांनी तिसरी शक्ती वा आघाडी मानले जाणार्‍या पक्षांची दिल्लीतली जागा व्यापलेली होती. त्यात प्रामुख्याने त्यांनी तिथे तिसरी शक्ती म्हणून उदयास आलेल्या मायवतींच्या बहुजन समाज पक्षाची मते पुर्णत: खाल्लेली होती. तोपर्यंत मायावतींनी दोन आमदार व दहापंधरा टक्के मते तिथे मिळवलेली होती. पण केजरीवाल जिंकत असताना मायवतींच्या पक्षाचा दिल्लीत साफ़ अस्त होऊन गेला. यावेळी त्यांना एक टक्काही मते तिथे मिळवता आलेली नाहीत. पण वैफ़ल्यग्रस्त मरगळल्या कॉग्रेसची मते ओढून केजरीवाल इतकी मोठी मजल मारू शकले. अर्थात त्यासाठी त्यांना डाव्यांपासून नितीशपर्यंत अन्य प्रादेशिक पक्षांनी पाठींबा दिलेला होता. त्यामागे अर्थातच भविष्यकाळात आपापल्या राज्यात भाजपा विरोधात ‘आप’चा पाठींबा मिळवण्याची अपेक्षा अशा पक्ष व नेत्यांना असली तर नवल नाही. पण योगेंद्र यादव यांनी कुठल्याही पक्षाशी युती आघाडी नाही, तर आपला मतांचा हिस्सा निर्माण करणे, हेच पक्षाचे उद्दीष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच अस्तंगत होणारी कॉग्रेस व विस्कळीत बेशिस्त सेक्युलर पक्षांचा मतदार हे त्यांचे लक्ष्य असणार आहे.



लालूंपासून मुलायम, मायावती, मुलायम, नितीश वा डावे इत्यादी सेक्युलर म्हणवणार्‍या पक्षांचे विविध राज्यात वा तिथल्या नागरी भागात काही किरकोळ समर्थक असतात. पण पक्ष म्हणून त्यांचे कुठलेही संघटन तिथे नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रात पुर्वाश्रमीचे समाजवादी, जनता दलीय विस्कळीत गट अनेक तालुक्यात शहरात विखुरलेले आहेत. त्यांना कोणी नेताच नसल्याने अनाथ असल्याप्रमाणे ते भरकटलेले आहेत. अण्णा आंदोलन व पुढे आम आदमी पक्षाच्या रुपाने त्यांच्या नव्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. लोकसभा निवडणूकीत लढलेले व उत्साहाने बोलणारे चेहरे तपासले, तर त्यात जुन्या समाजवादी वारश्यातील लोकांचा भरणा दिसेल. आताही भाजपाच्या पराभवाचे चित्र बघायला आसूसलेल्या अनेक सेक्युलर संघटना, गट यांना केजरीवालच्या यशापेक्षा भाजपाचे नाक कापले गेल्याने आनंदाला उधाण आलेले आपण बघू शकतो. असे जे आपल्या नेतृत्व व संघटनात्मक अपयशाने पिचलेले आहेत, त्यांना एकत्र येण्याची संधी देण्यातून भविष्यातला आम आदमी पक्ष उभारला जाऊ शकतो. योगेंद्र यादव यांनी म्हणूनच कुणाशीही युती आघाडी नाही, असा इशारा दिलेला आहे. त्याचा अर्थ असा, की या पक्षाला व त्यांच्या नेत्यांना विस्कळीत अशा तिसर्‍या पर्यायाला पक्ष म्हणून संघटित करायचे आहे. ते शक्य झाले, तर कॉग्रेसच्या बर्‍याच निराश हताश कार्यकर्त्यांनाही आम आदमी हा पर्याय म्हणून स्विकारणे शक्य होईल. हा मोठा मतदार व कार्यकर्त्यांचा गट आहे. तो एकत्रित झाला तरी दहाबारा टक्के मतांचा गठ्ठा होऊ शकतो. असा गठ्ठा उभा राहू शकला, तर सेक्युलर पर्याय म्हणून मुस्लिम व ख्रिश्चन मतांचा आणखी तितकाच गट त्याच्याकडे भाजपाला पर्याय म्हणून येऊ शकतो. अशारितीने देशव्यापी सेक्युलर पर्याय उभा राहिला, तर तो व्यवहारत: भाजपाला राष्ट्रव्यापी पर्याय होत कॉग्रेसची जागा व्यापू शकतो.

आतापर्यंत डावी वा तिसरी आघाडी म्हणून जे गट व मतदार एकत्र आणण्याचे प्रयास झाले, ते नेत्यांना एकत्र आणायचे प्रयत्न होते. म्हणूनच ते नेत्यांच्या अहंकाराच्या खडकावर येऊन फ़ुटत राहिले. मुलायम, मायावती, जयललिता, ममता, करूणानिधी, लालू, नितीश, पासवान, देवेगौडा इत्यादी नेत्यांनी, आपल्या पाठीराख्यांना भाजपा व कॉग्रेसच्या विरोधात उभे रहाण्याचे गाजर जरूर दाखवले. पण प्रसंगोपात त्यांनी आपापले अहंकार व स्वार्थासाठी पाठीराख्यांचा पुरता भ्रमनिरास केलेला आहे. कारण स्वार्थ असेल, त्यानुसार आघाड्या केल्या, मोडल्या वा बदलल्या आहेत. असा मतदार वा पाठीराखा कुठल्यातरी राष्ट्रीय पक्ष व नेत्याच्या पर्यायाचे स्वप्न दिर्घकाळ बघत राहिलेला आहे. म्हणूनच त्याने जनता दल वा जनता पार्टी अशा प्रयोगांना भरभरून प्रतिसाद दिलेला होता. मात्र नेत्यांमुळे ते पर्याय फ़ुसके ठरले. त्या चुका होऊ नयेत अशी आखणी योगेंद्र यादव यांनी आपल्या प्रयोगामध्ये केलेली दिसते. म्हणूनच ते कुणाशीही युती आघाडी करायचे साफ़ नाकारत आहेत. पण आवाहन मात्र त्याच अन्य पक्षांच्या तिसर्‍या शक्तीचे करीत आहेत. मागल्या वेळी कॉग्रेसचा पाठींबा घेतला, तरी सत्ता टिकवण्यासाठी खुर्चीला चिकटून बसत नाही आणि कॉग्रेसला शरणही जात नाही, असे त्यांनी कृतीतून दाखवले आहे. थोडक्यात सत्तेची वेळ आली, मग अलिप्तता आपण सोडत नाही, याची ती ग्वाही आहे. जे आजवरच्या सेक्युलर पक्षांना व नेत्यांना सिद्ध करता आलेले नव्हते. ही आपली ओळख केजरीवाल व योगेंद्र यादव यांनी अतिशय काळजीपुर्वक निर्माण केलेली आहे. म्हणूनच ते भाजपासाठी आव्हान नसून, आधी तिसरी शक्ती म्हणून वावरणार्‍या प्रादेशिक व सेक्युलर पक्षांसाठीचे आव्हान आहे. त्यानंतर ते कॉग्रेससाठीचे आव्हान आहे. मात्र त्याचा धोका आज जितका दाखवला जातो आहे, तितका भाजपासाठी राष्ट्रीय पातळीवरचे ते आव्हान नाही.

दिल्लीप्रमाणेच काही राज्यात आपला मतदार पाया उभारण्यासाठी आम आदमी पक्ष दिल्लीत बसपाचा पाया बळकावला, तसाच छोट्या सेक्युलर पक्षांचा पाया गिळंकृत करणार आहे. दिल्लीचे निकाल पहाता आगामी काळात निवडणूका व्हायच्या उत्तरप्रदेश व बिहारमध्ये या पक्षाचा धोका लालू, नितीश, मायावती व मुलायम यांना अधिक आहे. ज्या समस्यांना त्यांनी दिल्लीत हात घातला आणि लोकांना भुरळ घातली; त्याच समस्यांवर या दोन्ही उत्तर भारतीय राज्यात मतदाराला भुलवणे सोपे आहे. मात्र लगेच त्याला दिल्लीसारखे मोठे यश अन्य राज्यात मिळण्याची सुतराम शक्यता नाही. पण तितकी केजरीवाल यांची महत्वाकांक्षाच नाही. या राज्यात भाजपाच्या मतांमध्ये हिस्सा मिळवणे त्याला शक्य नाही. पण अन्य प्रादेशिक पक्षांनी त्यालाच दिल्लीत पाठींबा दिला व त्याच्या यशाचे कौतुक केल्याने, त्यांच्याच मतदाराला केजरीवालची भुरळ पडली तर नवल नाही. त्यांचा मतदार काही प्रमाणात या नव्या पक्षाकडे वळणारच. त्यातून या प्रादेशिक नेत्यांना भाजपासमोर पराभूत व्हायला, हा पक्ष हातभार लावील. त्याचा आज भाजपाला लाभही होईल. पण पुढल्या काळात पराभवाने खचलेल्या त्या प्रादेशिक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या नव्या पक्षाच्या आश्रयाला जातील. तीच आगामी निवडणूकीत या पक्षाची रणनिती असेल. समविचारी पक्षांना खच्ची करून त्यांची जागा व्यापणे आणि त्याचा लाभ मिळालेल्या भाजपाने सताधारी म्हणून पुढल्या काळात केलेल्या चुकांचा राजकीय लाभ पाच वर्षानंतर उठवणे; असे डावपेच योगेंद्र यादव यांनी आखलेले असावेत. अर्थात त्यांनी त्यात लपवाछपवी केलेली नाही. अनेकदा त्यांनी आपली ही निती बोलून दाखवली आहे. प्रथम पराभूत व्हायचे, मग पराभूत करायचे आणि नंतर विजय मिळवायचा, हे आपले राजकारण असेल, हे त्यांनी पुर्वीच सांगून ठेवलेले आहे. म्हणूनच एकत्र येऊन फ़ुटत राहिलेल्या तिसर्‍या शक्तीला एका झेंड्याखाली एक पक्ष म्हणून संघटित करायची रणनिती व्यवहारात तिसर्‍या आघाडीची पोपटपंची करणार्‍या सेक्युलर पक्षांसाठीच आव्हान असेल ना?

Thursday, February 19, 2015

भारत-पाक यांच्यातली सेक्युलर समस्या

mohmed shami साठी प्रतिमा परिणाम

भारत पाकिस्तान यांच्यातले क्रिकेट हा नाही म्हटले तरी राजकारणाचाच विषय आहे आणि होतो. त्याला अर्थातच इथले मुस्लिम वा हिंदू जबाबदार नसून, विकृत सेक्युलर राजकारण जबाबदार आहे. त्याची साक्ष उत्तरप्रदेशच्या एका मुस्लिमानेच दिली आहे. मोहंमद तौसिफ़ असे त्याचे नाव असून, ते भारतीय क्रिकेटपटू मोहंमद शमी याचे अब्बाजान आहेत. विश्वचषक स्पर्धेत रविवारी खेळल्या गेलेल्या भारत विरोधी पाकिस्तान या सामन्यात, त्यांच्या मुलने भेदक गोलंदाजी करून पाकिस्तानी फ़लंदाजी मोडून काढली. त्यामुळे भारताला मोठा विजय मिळवता आला. सहाजिकच त्याचा आनंद प्रत्येक भारतीयाला झाला, तसाच तो शामीच्या अब्बाजानला झाला तर नवल नाही. पण माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू वा त्यांच्यासारख्या काही सेक्युलरांना मात्र त्याच्या अतोनात वेदना झाल्या. त्यांना दोन्ही देशातील सौहार्दासाठी भारताने असा आनंद साजरा करू नये असेच वाटते. दुसरीकडे काही सेक्युलरांना तर भारताने पराभव स्विकारायला हवा होता असेही वाटले. मात्र तसे महंमद तौसिफ़ यांना वाटत नाही. आणि तसे न वाटण्याचे कारणही त्यांनी सुस्पष्ट शब्दात मांडले आहे. ते सेक्युलर डोळ्यात अंजन घालणारे आहे. अर्थात सेक्युलर डोळे तेवढ्यासाठी उघडे ठेवायची हिंमत असेल तर त्याचा उपयोग असेल ना? भारताच्या वतीने आपला मुलगा सैनिकासारखा लढला. कारण पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे युद्धच असते आणि माझा मुलगा मायदेशासाठी लढला, असे अब्बाजान यांना वाटते. त्याच्या तशा लढण्याचा मुस्लिम असण्याशी संबंध नाही. भारतीय मुस्लिम आधी भारतीय म्हणजे राष्ट्रवादी आणि नंतर मुस्लिम असतो, अशीही ग्वाही तौसिफ़ यांनी दिलेली आहे. सेक्युलर शहाण्यांना मात्र भारतीय मुस्लिम नंतर भारतीय आणि आधी मुस्लिम असतो असेच वाटते.

अर्थात असेही वाटायला एकवेळ हरकत नाही. पण हे तर्कट पुढे इतके भरकटत जाते, की भारतीय मुस्लिम आधी मुस्लिम असल्यामुळे, त्याचा ओढाही पाकिस्तानकडेच असतो अशीही अशा सेक्युलर शहाण्यांची समजूत आहे. म्हणूनच त्यांना पाकिस्तानला दुखावणे वा पराभूत करणे, म्हणजे भारतीय मुस्लिमांच्या भावना दुखावणेच वाटते. मात्र तशी मानसिकता भारतातल्या मुस्लिमांची नाही, याची शेकडो उदाहरणे देता येतात. पण त्या बिचार्‍यांना कधी समोर आणले जात नाही. प्रत्येक वेळी भारतीय मुस्लिम हा धर्माचा निष्ठावान म्हणून भारतापेक्षा धर्माशी एकनिष्ठ असल्याचे दाखवण्याचा अट्टाहास चालतो. त्यांच्यामागे शमीच्या पित्यासारखे अस्सल भारतीय मुस्लिम जाणिवपुर्वक लपवले जातात. लोकसभा निवडणूकीपुर्वी १९६५ च्या भारत-पाक युद्धातला महापराक्रमी योद्धा अब्दुल हमीद याची वृद्ध पत्नी मुद्दाम गुजरातला नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद द्यायला गेलेली होती. एक मुस्लिम वृद्धा पाकला धडा शिकवण्याची भाषा बोलणार्‍या मोदींना आशीर्वाद द्यायला जाते, याला किती प्रसिद्धी मिळू शकली होती? पण जेव्हा कोणी पाकिस्तानची वकीली करणारा मुस्लिम असतो, त्याला ठळक प्रसिद्धी देऊन त्याचे अगत्याने कोडकौतुक चालते. त्यातून भारतीय मुस्लिम पाकधार्जिणाच असल्याचे चित्र उभे करण्याचा कटाक्ष असतो. पण वास्तव असे अजिबात नाही. मुठभर तसे मुस्लिम असतीलही. पण बहुतांश भारतीय मुस्लिम कडवे राष्ट्रवादी आहेत. म्हणूनच कुठलीही तमा न बाळगता शमीचे अब्बाजान आपला मुलगा सैनिकासारखा लढला असे अभिमानाने सांगतात आणि त्याच्या पुढे जाऊन भारत-पाक सामना म्हणजे युद्धच असते असेही सांगतात. मग सेक्युलरांना तो खेळ कशाला वाटतो? तर ही वास्तवात सेक्युलर समजूतीची समस्या आहे. सेक्युलर मानसिकतेची समस्या आहे. त्यात मुस्लिमाचा कसलाही संबंध नाही.

सेक्युलर असणे म्हणजे हिंदू संस्कृती, धर्म वा हिंदू म्हणून जे काही असेल, त्याचा द्वेष अशी समजूत काही लोकांनी करून घेतली आहे आणि तशाच लोकांना आजकाल सेक्युलर मानले जाते. मग अशा लोकांनाही तसेच वागावे लागत असते. तुम्ही कितीही धर्मनिरपेक्ष असा वा सहिष्णू असा, त्यामुळे तुम्ही सेक्युलर मानले जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला हिंदू शब्दाचा द्वेष करावा लागतो. आताही बघा, भारताने पाकला पराभूत केल्यावर इथले मुस्लिमही खुश झालेले असताना सेक्युलर मात्र कमालीचे विचलीत झाले आहेत. कारण अर्थातच इथल्या हिंदू संघटना वा संस्थांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला. हिंदूंचा आनंद म्हटला, की सेक्युलर असेल त्याला पोटदुखी व्हायलाच हवी. सुदैवाने इथले बहुतांश मुस्लिमही त्या अर्थाने सेक्युलर नाहीत. म्हणूनच त्यांना पाकिस्तान व भारत यापैकी कशाशी निष्ठावंत असावे हे नेमके कळते. महंमद शामी वा त्याचे अब्बाजान तसेच असल्याने त्यांना दोन देशातील क्रिकेट म्हणजे काय ते कळू शकते. मात्र सेक्युलर लोकांना खेळातला हा उत्साह म्हणजे धार्मिक उन्माद वाटतो. यामागची मानसिकता लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्या देशात तसा हिंदू-मुस्लिम भेदभावही तसा मुलभूत नाही, ती एक सेक्युलर समस्या आहे. देशातला बहुसंख्य समाज हिंदू आहे आणि सर्वात मोठा अल्पसंख्य समाज मुस्लिम आहे. त्यांच्यात भिंत घालून उभा आहे त्याला सेक्युलर विचार म्हणता येईल. अशा दोन समाज वा श्रद्धावान वर्गामध्ये लढाई संघर्ष झालाच नाही, तर सेक्युलर या शब्दाला अर्थच उरणार नाही. हिंदीत म्हणतात ना? घाससे दोस्ती करेगा तो घोडा खायेगा क्या? घोड्याला गवताशी, चार्‍याशी दोस्ती करता येत नाही. त्यामुळे सेक्युलर नेहमी भिन्न समाजातल्या सौहार्दाच्या गप्पा मारतात. पन हे सौहार्द कसे बिघडेल यासाठी झटत असतात.

सेक्युलर दुकानदारांना दोन समाजात सख्य वा सौहार्द झालेले चालत नाही. त्यांच्यात सामंजस्य निर्माण झाले तर सेक्युलर राजकारणाच्या पोळ्या कशावर भाजायच्या? त्यासाठी मग सेक्युलर राजकारणात भिन्न श्रद्धा व धर्माच्या नावावर लोकांना लढवावेच लागत असते. नसलेले दुखणे शोधून त्याचे भय निर्माण करावे लागते. तरच यांचे दवाखाने चालतील ना? जिथे सेक्युलर नसतात, तिथे भिन्न धर्मियातला संघर्ष कमी असतो आणि धर्माच्या नावाने होणारा रक्तपातही कमीच असतो. गुजरातमध्ये दंगलीचे काहूर माजवण्यात बारा वर्षे खर्ची पडली. पण त्याच काळात त्या राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली जवळपास थांबल्या आहेत. उलट त्याच काळात जिथे म्हणून सेक्युलर सरकारे होती, तिथेच अधिक हिंसक दंगली होऊ शकल्या आहेत. जर सेक्युलर सरकार आहे तर दंगली झाल्याच कशाला? आणि धर्मांध सत्ता आहे, तिथे दंगली कशाला होऊ शकल्या नाहीत? कारण गुजरातसारख्या राज्यात सेक्युलर नामोहरम होऊन गेले आहेत. तीस्ता सेटलवाड यांच्यासारख्या आगलाव्या सेक्युलर आदर्शाची पापे आता चव्हाट्यावर येत आहेत. बारा वर्षे इतरांना कोर्टात खेचणार्‍या या महिलेला आता कोर्ट व कायद्यापासून तोंड लपवून बसायची पाळी आलेली आहे. तिने केलेल्या प्रत्येक आरोप व खटल्यात मोदी निर्दोष ठरण्यापर्यंत कोर्ट व कायद्याला सामोरे गेले. आज तीच महिला कायद्यापासून फ़रारी झाली आहे. कारण ज्यांना सहाय्य देण्याच्या वल्गना केल्या जात होत्या, त्यांनीच आपली फ़सवणूक केल्याचा आरोप तिच्यावर केला असून त्यापासून तीस्ताला पळ काढावा लागतो आहे. यातून सेक्युलर हा देशातील किती किफ़ायतशीर चिथावणीखोर व्यापार झालेला आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. शामी वा त्याच्या अब्बाजानसारखे भारतीय मुस्लिम अशा सेक्युलर भामट्यांची डाळ शिजू देत नाहीत, हीच भारतीय एकात्मतेची हमी असते.

Wednesday, February 18, 2015

‘आपण सारे पानसरे’ होऊ शकतो?


सोमवारी सकाळी कोल्हापुरात वर्दळ नसलेल्या जागी एकाकी गाठून कॉम्रेड गोविंद पानसरे यांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यात त्यांना ठारच मारायचे होते. पण हल्लेखोरांना ते शक्य झाले नाही आणि आयुष्यभर प्रतिकुल परिस्थितीशी झुंजलेला हा शेलारमामा, मृत्यूशीही दोन हात करत खंबीरपणे या संकटाला सामोरा गेला. पण त्याने जी झुंजारवृत्ती आयुष्यभर दाखवली, त्याचे किती कौतुक करायचे आणि किती अनुकरण करायचे, याचे ताळतंत्र असायला नको काय? आपल्यासाठी लढणारा कोण आहे, अशी प्रतिक्षा करत पानसरे यांच्यासारखी माणसे बसली असती, तर समाजातले परिवर्तनाचे लढे कधी उभेच राहिले नसते. म्हणूनच त्यांच्या लढ्याचे व धाडसाचे कौतुक करण्यापेक्षा, त्यांचे अनुकरण करणे अगत्याचे ठरावे. दिड वर्षापुर्वी असाच हल्ला पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर झाला होता. त्यातून ते बचावले नव्हते. निदान त्यानंतर तरी असा हल्ला करायची कोणाची हिंमत व्हायला नको होती. पण त्यांच्या हौतात्म्याचे कौतुक करताना आपण झुंजायचे मात्र विसरून गेलोत. ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे फ़लक घेऊन मिरवण्यात धन्यता मानली गेली. पण खर्‍या अर्थाने अशा खुनी हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यापेक्षा नुसतेच मिरवण्यात वेळ गेला. त्यातूनच मग अशा हल्लेखोरांची भीड चेपत असते आणि पुढले हल्ले होत असतात. पानसरे त्याचेच शिकार झाले. दुर्दैव इतकेच, की आपण त्यातून काही शिकलो नाही. म्हणूनच सोमवारी तिथे पानसरे मृत्यूशी झुंज देत असताना, त्यांच्या चहात्यांनी मात्र ‘आम्ही सारे पानसरे’ असे फ़लक मिरवण्यात पुढाकार घेतला. अशा घोषणांचा अर्थ नेमका काय असतो आणि त्यातून काय साधले जाते? आपण सगळे झाडलेल्या गोळ्यांची शिकार व्हायला पुढे सरसावलेले असतो काय? खरेच असा कोणी माथेफ़िरू बेछूट गोळ्या झाडत सामोरा आला, तर आपले हे फ़लक किती शाबुत असतील?

अशा घोषणा वा फ़लक मिरवण्याचा एक खेळ झाला आहे. म्हणूनच त्याला कुठलाच मारेकरी दाद देत नाही आणि मनचाही हत्याकांडे करू शकतो. मनात येईल तसे हल्ले करू शकतो आहे. म्हणूनच आपण सर्वांनी दाभोळकर वा पानसरे होण्यापेक्षा दक्ष नागरिक म्हणजे अघोषित पोलिस होण्याची गरज आहे. आपल्या अवतीभवती जे गुन्हे घडत असतात आणि आपल्या साक्षीने गुन्हेगार सोकावत असतात, त्यांना निदान हटकण्याचे धाडस आपण अंगी बाणावले पाहिजे. ज्यांच्यावर असे हल्ले झालेत, त्यांच्या अशा धाडसालाच खरी गोळी घालण्यात आलेली आहे, हे विसरता कामा नये. त्यांनी जागरुक नागरिक म्हणून अन्यायाला वाचा फ़ोडण्यात पुढाकार घेतला नसता आणि अन्यायाला वाचा फ़ोडण्याचे धाडस केले नसते, तर कोणीही त्यांच्यावर गोळ्या झाडायला पुढे सरसावला नसता. गोळ्या त्यांच्या शरीरावर झाडल्या गेल्या हे वास्तव नाकारता येत नाही. पण त्यांच्याच देहावर अशा गोळ्या झाडल्या, ते देहापेक्षा त्यातून प्रदर्शित होणार्‍या हिंमतीवर व धाडसावर झालेला तो हल्ला आहे. म्हणूनच पानसरे वा दाभोळकर होणे दाखवले जाते, तितके सोपे नाही. नुसता फ़लक हाती मिरवून कोणी पानसरे होत नाही. उलट ती त्यांच्या धाडसाची विटंबनाच असते. असे फ़लक घेऊन चौकात घोषणा देणार्‍यांवर कोणी तसाच बेछूट गोळ्या झाडत आला, तर किती जण फ़लक तसाच हाती धरून तिथेच ठामपणे उभे राहतील? गरज तशा हिंमतीची आहे. ती हिंमत असते, तिला दाभोळकर वा पानसरे म्हणतात. त्यासाठी त्यांच्यासारखी व्यासंगी भाषणे देता येण्याची गरज नाही, किंवा नेतृत्वाचे गुण अंगात असायची आवश्यकता नाही. गरज असते त्यांच्यातल्या जिद्दी धाडसाची. हे धाडसच हल्लेखोर वा समाजाच्या शत्रूंना भयभीत करत असते. म्हणूनच त्यांच्यावर भेकड हल्ले होतात. त्यांच्या मदतीला कोणी धावून येणार नसल्याच्या खात्रीमुळे असे हल्ले होऊ शकतात.

दोन्ही बाबतीत गोळ्या झाडल्यानंतर आसपासचा समाज आपल्याला जिवंत सोडणार नाही, अशी खात्री असेल वा भय असेल, तर कोण हल्लेखोर त्यांच्यावर हल्ला करू शकला असता? कितीही बंदुका वा पिस्तुले घेऊन आलेल्या हल्लेखोराचा दारूगोळा काही वेळाने संपणार असतो आणि त्यानंतर आपण लोकांच्या हाती लागलो, तर आपण सुखरूप सुटणार नाही, असे भय असते. मग कुठला हल्लेखोर गोळ्या झाडण्याचे धाडस करू शकेल? इवलासा मुंगी हा प्राणी बघा. त्याच्या वारूळावर कुणाचा हल्ला झाला, तर इतक्या संख्येने शत्रूवर तुटून पडतो, की हत्तीलाही मुंग्या बेजार करू शकतात. आपल्या हजारो पटीने मोठ्या आकाराच्या प्राण्यालाही मुंग्या ठार मारून टाकतात. म्हणूनच वारूळ उठले, की भले भले प्राणीही तिथून पळ काढतात. मुंग्यांच्या वाट्याला मोठे प्राणी जात नाहीत. आपल्यात तितकी हिंमत आहे? दाभोळकर वा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यावर आसपासचे लोक सामोरे येऊ शकत नाहीत, ते भित्रे असतात, हीच अशा हल्लेखोरांची खरी हिंमत असते. कसाबच्या दहा जणांच्या टोळीने एक कोटी लोकसंख्येच्या मुंबईला ५० तास ओलीस ठेवून त्याची साक्ष दिली. त्यात फ़लक मिरवणार्‍यांचाही समावेश होतो. किती फ़लकवाले त्या बंदुकधार्‍यांना सामोरे जायला धजावले होते? एका तुकाराम ओंबाळेने ते धाडस केले आणि कसाबचा खेळ संपला. आपण सारे ओबाळे होऊ शकलो होतो काय त्या दिवशी? कितीजण तेव्हा ‘आम्ही सारे तुकाराम ओंबाळे’ म्हणत त्यावेळी पुढे सरसावले होते? कारण हल्लेखोर कसाब कुठे पळाला नव्हता, तर राजरोस मुंबईत किडामुंगीप्रमाणे नागरिकांना ठार मारत फ़िरत होता. यातला कोणी आपल्याला सामोरा येण्याची हिंमत बाळगत नाही, हेच त्याचे सर्वात मोठे भेदक शस्त्र होते आणि तेच दाभोळकर पानसरे यांच्या हल्लेखोरांचे मुख्य शस्त्र आहे. त्याचे उत्तर कॅमेरापुढे मिरवण्याचे फ़लक असू शकत नाही.

कुणी कुठल्या गावात, शहरात, नाक्यावर, धावत्या वहानात, मुलीमहिलांवर अन्याय करत असतो. छेड काढत असतो, तेव्हा आपण कोण असतो? आपण कितीजण अशावेळी पुढाकार घेऊन त्याला रोखायला हस्तक्षेप करतो? अतिशय प्रामाणिकपणे या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपल्या मनाकडे मागावे. तिथे दाभोळकर वा पानसरे असते, तर त्यांनी अशा घटनाक्रमात हस्तक्षेप केला नसता काय? मुलीवर हल्ला वा अत्याचार होताना, तिची छेड काढली जात असताना, दाभोळकर-पानसरे बघत बसले असते काय? त्यांनी तिथून काढता पाय घेतला असता काय? नसेल, तर दाभोळकर पानसरे असण्याचा अर्थ काय होतो? हातात फ़लक मिरवणे असा होतो काय? अशा व्यक्ती असणे म्हणजे त्यांच्या इतकी हिंमत असणे. अन्याय अत्याचाराच्या प्रसंगी हस्तक्षेप करण्याचे धाडस म्हणजे पानसरे किंवा दाभोळकर असणे होय. हे मान्य असेल, तर मग नुसते फ़लक मिरवण्याला विंटंबना म्हणायचे की सन्मान म्हणायचा? कसाबच्या हल्ल्याप्रसंगी जीव मुठीत धरून पळणारे, सगळा धोका संपला तेव्हा असेच फ़लक व मेणबत्त्या घेऊन गेटवेपाशी जमलेले होते. त्यांच्यात आणि आता ‘आम्ही सारे’ फ़लक घेऊन मिरवणार्‍यात कितीसा फ़रक असतो? सवाल शिकार झालेल्या धाडसी लोकांच्या सन्मानाचा नसून, त्यांच्या अनुकरणाचा आहे. दाभोळकर वा पानसरेच नव्हेत, तर तुकाराम ओंबाळेही नंतर मिळणार्‍या सन्मानासाठी काहीही करत नसतात. आपल्या धाडसाचे व कृतीचे अनुकरण समाजात व्हावे, म्हणून आदर्श निर्माण करत असतात. त्या आदर्शाचे पालन आवश्यक व अपेक्षित असते. त्याची नक्कल नको असते. म्हणूनच असे फ़लक घेऊन दाभोळकर वा पानसरे होण्यापेक्षा त्यांची अपेक्षा पुर्ण करण्यासाठी जागरूक कृतीशील नागरिक होऊन आसपासच्या अन्याय अत्याचारात हस्तक्षेप करण्यात पुढाकार आपण घेऊ शकलो, तर खरेच फ़लकाशिवायही आपण पानसरे होऊ शकतो. व्हायची तयारी आहे?


Monday, February 16, 2015

मग पोलिस हवेतच कशाला?

Anti-Toll Tax Campaigner Govind Pansare, Wife Shot At During Morning Walk

दाभोळकरांच्या हत्येला दीड वर्ष होत असताना कोल्हापुरात तसाच हल्ला कॉम्रेड गोविंद पानसरे या विचारवंतावर झालेला आहे. जसे दोन्ही हल्ल्यात साम्य व साधर्म्य आहे, तसेच त्यावरच्या उतावळ्या प्रतिक्रियांमध्येही साम्य आहे. म्हणूनच त्याची अधिक भिती वाटते. खरे तर असा हा पहिलाच हल्ला नाही, की अशा प्रतिक्रियाही पहिल्याच नाहीत. पुणे जिल्ह्यातील तळेगावच्या सतीश शेट्टी या माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याची अशीच हत्या काही वर्षापुर्वी झाली आणि आजवर त्याचेही मारेकरी पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. म्हणूनच अशा प्रकरणात हल्ल्याची पद्धती बदलत नसेल, तर निदान प्रतिक्रियांची पद्धत बदलून बघावी काय? प्रतिक्रिया म्हणजे कुठल्याही हल्ल्यानंतर प्रक्षुब्ध प्रतिसाद हा उमटणारच. कार्यकर्त्यावरचा वा नेत्यावरचा हल्ला निषेधार्हच असतो आणि त्याचा शक्य तितका कठोर शब्दात निषेध व्हायलाच हवा. पण निषेध आणि तपासकामात हस्तक्षेप, यात मोठा फ़रक असतो. प्रक्षुब्ध प्रतिक्रिया हल्ल्याच्या विरोधात असायला हव्यात. पण जोवर कुणी हल्लेखोर वा त्याचा सुत्रधार पुराव्यानिशी हाती लागत नाही, तोवर त्यासंबंधात वावड्या उठवणे वा आपल्या पुर्वग्रहानुसार आरोपबाजी सुरू करणे घातक असते. प्रामुख्याने माध्यमातून अशा वावड्यांना प्राधान्य मिळते, तेव्हा तपास व पोलिस यंत्रणेवर दबाव येत असतो. असा दबाव गुन्हेगार शोधून काढण्यासाठी असलाच पाहिजे. पण अमूक एक संस्था संघटना यांच्यावरच पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याचा अट्ताहास झाला, मग पोलिसांना त्यांच्या अनुभव वा प्रस्थापित मार्गाने तपास करण्यात अडथळे येतात. जे धागेदोरे घटनास्थळी वा अन्य मार्गाने पोलिस जमा करू शकत असतात, त्यांचा मागोवा घ्यायचे सोडून पोलिसांना आपल्या मागे लागलेला माध्यमांचा ससेमिरा सोडवण्यासाठी भलत्याच गोष्टींचा पाठलाग करावा लागत असतो.

मागल्या खेपेसे म्हणजे दाभोळकर हत्येनंतर सनातन या संस्थेच्या विषयी पुर्वग्रहाने पोलिसांवर इतके दडपण आणले गेले, की गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्यापेक्षा पोलिसांनी माध्यमातून अफ़वा उठतील अशा कुठल्याही सनातनच्या अनुयायाला उचलून आणण्यात वेळ दवडला. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. पण जे खरे हल्लेखोर होते, त्यांना मात्र निसटून जाण्यास पुरेशी सवड मिळू शकली. काही महिने उलटून गेल्यावर दाभोळकर प्रकरणात कुठलाच सनातनवाला सापडत नाही म्हटल्यावर, आरोपांचे रान संपले. मगच पोलिसांना अन्य धागेदोरे शोधण्याची संधी मिळू शकली होती. गुन्हेतपासामध्ये नेहमी हल्ला वा गुन्हा यामागच्या हेतूचा शोध घ्यावा लागतो. नुसता आरोपी पकडून उपयोगी नसतो. ज्यांना पकडले त्यांच्या विरोधातले पुरावे, हेतूशून्य असल्यास काहीही सिद्ध होत नाही. म्हणूनच घटना घडल्यावर त्यामागचा हेतू शोधून त्याच्याशी जुळणारे पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर असतो. इंग्रजीमध्ये अशा हेतूला ‘मोटीव्ह’ असे म्हणतात. दाभोळकर असोत की पानसरे, त्यांच्यावर हल्ला करण्यामागचा हेतू महत्वाचा आहे. नुसते मतभेद वा भांडणे-धमक्या गुन्हा सिद्ध करायला पुरेसे नसतात. सहाजिकच आरोपी पकडून चौकशीअंती सोडुन द्यावे लागतात. दाभोळकर प्रकरणात तोच पोरखेळ झालेला आहे. त्यापासून कोणीच धडा शिकलेले दिसत नाही. म्हणूनच पानसरे यांच्यावरील हल्याची बातमी येताच विनाविलंब आरोपींना पकडण्याचे काहुर सुरू झालेले आहे. पण आरोपी म्हणजे कोण, त्याला कुठे जाऊन पकडावे, याचा खुलासाही अशी मागणी करणार्‍यांनी केला, तर पोलिसांना मदतच होईल. अशा हल्ल्यामागचा हेतू आणि पुरावे कोणाकडे असतील, तर त्यांनी त्या आरोपीची ओळख पोलिसांना जाउन द्यावी. मग पोलिसांनी त्याला पकडण्याचा आग्रह धरावा. अन्यथा नुसताच कल्लोळ माजवून तपास विचलीत होण्यापेक्षा काय अधिक साध्य होऊ शकणार आहे?

गुन्हेगाराच्या शैली वा कार्यपद्धतीला मोडस ऑपरेंडी असाही शब्द वापरला जातो. शेट्टी, दाभोळकर वा पानसरे या तिघांच्या हल्ल्यातील मोडस ऑपरेंडी सारखीच दिसते. यात कोणी माथेफ़िरू वा दबा धरून बसलेला शत्रू हल्ला करून पळालेला नाही. अतिशय काळजीपुर्वक नियोजन करून हे हल्ले झाल्याचे दिसते. गोळ्या घालणारे नेमबाज व व्यावसायिक मारेकरी असल्याचे हल्ल्याच्या नेमकेपणातूनच सिद्ध होते. म्हणजेच हे कोणी वैचारिक शत्रू वा विरोधक असू शकत नाहीत. ते सुपारीबाज मारेकरी आहेत आणि कोणाला मारतोय याच्याशी त्यांना कर्तव्य नसल्याचे स्पष्ट होते. कोणीतरी त्यांना ठराविक रक्कमेचा मोबदला देऊन हे हल्ले घडवून आणलेले आहेत. म्हणजेच नुसते हल्लेखोर पकडून भागत नाही, त्यामागचा सुत्रधार महत्वाचा आहे. पण तो अज्ञात आहे आणि आजतरी हल्लेखोरही अज्ञातच आहेत. जोपर्यंत हल्लेखोर हाती लागत नाहीत, तोपर्यंत सुत्रधारापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. हे काम नुसते आरोप वा संशयाचे धुके निर्माण करून साधणारे नाही. त्यातून राजकारणाची हौस भागवली जाईल. एकमेकांना गुन्हेगार ठरवण्याचा कंडू शमेल. पण खरे हल्लेखोर व त्यांचा बोलविता धनी मात्र अज्ञातच राहिल. कारण शेट्टी व दाभोळकर यांच्या प्रकरणातला तोच अनुभव आहे. मग नुसते आरोपांचे बुडबुडे उडवून पोलिस तपासात व्यत्यय आणण्याने आपण कोणाला मदत करत आहोत, त्याचा विचार करायला नको काय? गुन्हेगार व हल्लेखोरांना गुन्हा उरकल्यावर निसटून जाण्यासाठी काही काळाची सवड हवी असते. जेव्हा असा संशयकल्लोळ केला जातो, तेव्हा हल्लेखोरांना सहीसलामत निसटण्याचा अवधी पुरवला जात असतो. कारण काहूर माजवणारे हितचिंतकच तपासात व्यत्यय आणुन गुन्हेगाराला सवड मिळवून देत असतात. शेट्टी वा दाभोळकर प्रकरणात काय वेगळे झाले होते?

गुन्हे तपास हे पोलिस कौशल्याचे काम आहे आणि त्यात कुठल्याही राजकीय पुर्वग्रह वा आरोपबाजीला स्थान नसते. गुन्हेगाराला पकडून भागत नाही, तर त्याच्याविरुद्ध पुरावे जमवून शिक्षापात्र ठरवणे भाग असते. बातमी म्हणून वाटेल ती बकवास करण्याचे ‘अविष्कार स्वातंत्र्य’ पोलिसाना नसते. कायद्याच्या कसोटीवर गुन्हा सिद्ध करून आरोपीला दोषी ठरवण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. शोधपत्रकारितेइतके ते काम सोपे नाही. असते तर पोलिसांची गरजच काय होती? आजही जो कल्लोळ चालला आहे वा दाभोळकर प्रकरणी होता, त्यातून कोणी खरा आरोपी हल्लेखोर शोधून देऊ शकला काय? नसेल, तर तपासात व्यत्यय आणण्यापलिकडे काय साधले गेले? पोलिसांनाच नाकर्ते म्हणून नामोहरम करायचे, प्रशासनालाच गुन्हेगार म्हणायचे, राज्यकर्त्यांनाच हल्लेखोरांचे पाठीराखे ठरवायचे आणि पुन्हा त्यांनीच अज्ञात अशा हल्लेखोरांना शोधायलाही हवे, हे कुठले अजब तर्कशास्त्र आहे? इतकेच असेल तर आरोप व संशयाचे रान उठवणार्‍यांनीच आरोपी पकडून आणावेत आणि पोलिसांच्या हवाली करावेत. पुरावेही शोधून द्यावेत. त्यानंतर पोलिस निष्क्रीय राहिले, तर त्यांच्यावर दोषारोप करावेत. नसेल, तर निदान आपल्या पद्धतीने पोलिस जे काम करीत असतात, त्यात व्यत्यय आणायचे पाप तरी अशा उतावळ्यांनी करू नये. कधीकधी हितचिंतकच अधिक धोकादायक असतात त्यातलाच हा प्रकार होऊन बसला आहे. आपापले पुर्वग्रह आणि राजकीय हेतू घेऊन अशा हल्लेखोरीत नाक खुपसणारेच गुन्हेगाराला बहूमोलाची मदत करतात आणि बळी पडलेल्यांवर अन्याय करत असतात. सरकार व पोलिसांनी आता अशा लोकांना काही खडेबोल ऐकवण्याची गरज आहे. ‘तुम्हीच इतके शहाणे असाल तर गुन्हेगारांचा शोध तुम्हीच घ्या. आम्ही त्यांना बेड्या ठोकू. नाहीतर बकवास बंद करा’, असे या अतिशहाण्यांना सांगणे भाग आहे.

Sunday, February 15, 2015

धडा भाजपाला, शिकले केजरीवाल



दिल्ली विधानसभेच्या मतदानातून मतदाराने भाजपाला धडा शिकवला, हे आता सर्वांनी सांगून झाले आहे. पण भाजपावाले त्यापासून किती धडा शिकले, त्याचे संशोधन करावे लागेल. कारण निकालानंतरच्या भाजपा नेते वा प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया धडा शिकल्याचे दर्शवत नाहीत. उलट एखादी निवडणूक हरलो, म्हणजे पक्ष संपत नाही, अशी उद्दाम भाषा आहे. जणू दिल्लीच्या मतदाराने आम आदमी पक्षाला कौल दिलाय आणि त्यापेक्षा या निकालाचा फ़ारसा अर्थ काढण्याची गरज नाही, असाच एकूण भाजपावाल्यांचा सूर दिसतो. म्हणूनच मागल्या विधानसभेच्या वेळी असलेली मतांची टक्केवारी कायम असल्याचे निर्ढावलेले दावे पुढे करण्यात आलेले आहे. पण हा कौल आपल्या बाजूने लागला असला आणि त्यात भाजपाला मतदाराने धडा दिलेला असला, तरी त्यातही आपल्यासाठी असलेला धडा शिकण्याची जागरूकता केजरीवाल यांनी दाखवली, ही बाब लक्षणिय आहे. तसे मागल्या वेळी म्हणजे प्रथमच निवडणूक लढवून केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मिळवलेले यश नगण्य अजिबात नव्हते, तर मोठेच होते. त्याच पायावरचे आजचे यश अधिक मोठे नाही. पण अशा यशातून अधिक मोठी जबाबदारी येते, याचे भान तेव्हा केजरीवाल यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना व समर्थकांना राहिलेले नव्हते. म्हणूनच पुढल्या चुका होत गेल्या आणि पक्षाची घसरगुंडी होत गेली. त्याला खुद्द केजरीवाल व त्यांचा पक्षच जबाबदार होता. याचे भान त्यांना लोकसभेतील पराभवानंतर आले आणि त्याची अल्पशी कबुली देतच केजरीवाल पुन्हा विधानसभा लढवताना मतदाराला सामोरे गेले होते. आपण तडकाफ़डकी राजिनामा देऊन बाहेर पडलो, ही चुक होती असे त्यांनी यावेळी मतदाराला पदोपदी समजावून सांगितले आणि यावेळी पाच वर्षे सलग कारभार करू, असे सातत्याने सांगत रहिले होते. फ़क्त एक चुक त्यांनी आजपर्यंत लपवून ठेवली होती.

इतका अभूतपुर्व विजय केजरीवाल यांनी यावेळच्या निवडणुकीत मिळवला आणि त्यानंतर शपथ घेताना त्यांनी आपल्या सर्वात मोठ्या चुक वा गुन्ह्याची कबुली शपथ घेताच दिली. मागल्या वेळी विजयाचा उन्माद आपल्यात व सहकार्‍यांमध्ये संचारला होता आणि त्याचेच दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागले, हीच ती कबुली आहे. शपथविधी संपल्यावर तिथेच उपस्थितांसमोर भाषण करताना केजरीवाल यांनी आपल्या सहकारी समर्थकांना सावधानतेचा इशारा दिला. कारण मागल्या विजयानंतरच्या उन्मादाची पुनरावृत्ती लगेच दिसू लागली होती. योगेंद्र यादव यांच्यासह अनेकांनी इतर निवडणूका लढवून विरोधकांना संपवण्याची उतावळी भाषा लगेच सुरू केली होती. त्यांना खाजगी बैठकीत वा भेटीतही केजरीवाल कानपिचक्या देऊ शकले असते. पण त्यासाठी त्यांनी शपथविधीचा मुहूर्त शोधला, हे धडा शिकल्याचे लक्षण आहे. आपण लगेच आता उत्तर प्रदेश पादाक्रांत करायच्या दिग्विजयाला सिद्ध झालोय, अशी शेखी यादव यांनी मिरवली होती. तर त्यांचेच मुंबईतील सहकारी मयंक गांधी यांनीही मुंबई महापालिका जिंकायचे मनसुबे बोलून दाखवले होते. त्यांचे केजरीवालांनी जाहिरपणे शपथविधी समारंभातच कान उपटले आहेत. मागल्या खेपेस विधानसभेच्या यशाने झिंग चढली आणि लोकसभा जिंकायच्या वल्गना केल्या. त्याची मतदाराने शिक्षा दिली, अशी कबुली केजरीवाल देतात, याचा अर्थच दिल्लीत पराभूत भाजपाला मतदाराने दिलेला धडा विजयीवीर असूनही केजरीवाल शिकले असे म्हणावे लागते. मतदाराला कोणी गृहीत धरू नये किंवा मिळालेल्या मताला आपली शक्ती समजून मस्तवालपणा करू नये, असा तो धडा आहे. मतदार संधी देत असतो आणि त्यानुसार किती जबाबदारी पार पाडली, त्याप्रमाणेच पुढल्या खेपेस तुम्हाला बक्षीस वा शिक्षा देत असतो. हाच तो धडा आहे, तो यावेळी भाजपासाठी असला तरी त्यांचे तिकडे अजून लक्षच गेलेले दिसत नाही.

अर्थात केजरीवाल आज शपथविधीनंतर काय बोलले, तेवढेच महत्वाचे नाही. इतके प्रचंड बहूमत आणि निर्विवाद सत्ता, हीच आपल्या परीने भयंकर नशा असते. त्यातून आपल्या सहकारी अनुयायांना सावरणे, हे केजरीवाल यांच्यासाठी सत्ता राबवण्यापेक्षा अधिक जिकीरीचे काम असणार आहे. कारण असे अनुयायी व सहकारी सत्तेने बेताल होत असतात. नरेंद्र मोदी यांनाही त्याचे पुर्ण भान होते. म्हणूनच १६ मे रोजी लोकसभेचे निकाल लागल्यावर जो सोहळा सुरू झाला, त्याला दुसर्‍याच दिवशी लगाम लावणारा इशारा त्यांनी दिल्लीत पोहोचताच दिलेला होता. दुर्दैवाने त्यांच्याच चहाते व अनुयायांना त्याचा लौकरच विसर पडला आहे. १७ मे रोजी विजयीवीराच्या थाटात दिल्लीत पोहोचलेल्या नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद स्विकारण्यापुर्वीचे पक्षाच्या मुख्यालयातील भाषण, आज किती भाजपावाल्यांना स्मरते आहे? ‘हा विजय माझा वा जिंकून आलेल्या उमेदवारांचा नाही. ज्यांनी या निवडणूकीत शर्थीचे प्रयत्न केले व मेहनतीची पराकाष्टा केली, त्यांचाही हा विजय नाही. जनसंघाच्या स्थापनेपासून ज्या चार पिढ्यांनी पक्षाचा विस्तार करण्यासाठी अपरंपार कष्ट उपसले, त्यांच्या मेहनतीचे हे फ़ळ आहे’, अशी सावधानतेची भाषा मोदींनी केलेली होती. पण आजच्या भाजपा कार्यकर्त्यांना मोदी हे व्हिसा क्रेडीट कार्ड आणि अमित शहा ही जादूची कांडी वाटते आहे. तिथून भाजपाची घसरगुंडी सुरू झाली होती. त्याचा तळ दिल्लीत गाठला गेला. म्हणूनच आज केजरीवाल यांची भाषा जितकी वास्तव आहे, तितकाच ती भाषा हा कार्यकर्ते व अनुयायांना किती उमजणार, हा गहन सवाल आहे. भाजपावाल्यांना मोदींनी इशारा समजला नाही आणि त्यांनी मागल्या आठ महिन्यात मस्तवालपणाचे प्रदर्शन घडवले, तिथे दिल्लीच्या पराभवाची निश्चिती झालेली होती. कारण तिथूनच आपल्या मित्रांना हीन लेखण्यापासून कस्पटासमान वागवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

भाजपाला ३१ टक्के मते मिळाली तरी जागा २८३ मिळाल्या, त्याला मित्रांना मिळालेली १० टक्के मते कारण होती. त्या मित्रांशिवाय त्या ३१ टक्क्यात सव्वाशे दिडशे जागांच्या पुढे भाजपा जाऊ शकला नसता. आजही दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा खरा पाया २५-२७ टक्केच्या पलिकडे नाही. पराभूत कॉग्रेसची १०-१५ टक्के अधिक लहानसहान पक्षांची आठ-नऊ टक्के मते मिळून ५० टक्क्यांचा पल्ला ओलांडताना, केजरीवाल ६७ जागा जिंकू शकले आहेत. त्या जागा व वाढलेली मते ह्या सदिच्छा आहेत. याचे भान त्यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्याच भाषणात जाहिरपणे दाखवले आहे. तिथेच परिस्थितीचे भान आल्याची कल्पना येते. यशाने नेहमी माणसे इतकी भारावतात, की त्यांचे पाय जमीन सोडतात आणि तिथून कपाळमोक्षाची शक्यता निर्माण होते. जसजशी हवा डोक्यात जाते, तसतशी कपाळमोक्षाची खात्री स्वत:च करून घेतली जात असते. दिल्लीच्या अपयशानंतरही भाजपा नेत्यांचे पाय जमीनीला लागलेले नाहीत. म्हणूनच राज ठाकरे यांनी चितारलेले उत्तम व्यंगचित्रही आशिष शेलार या नेत्याला उमजले नाही आणि त्याने उर्मटपणाची भाषा वापरलेली आहे. त्यात भाजपा धडा शिकला नसल्याची साक्ष मिळते, तर इतक्या अपुर्व विजयानंतरही केजरीवाल धडा शिकत असल्याचा पुरावा मिळतो. मागल्या वर्षभरात आम्ही केजरीवालना इशारे देत होतो, ते त्यांच्या समर्थकांना भाजपाची प्रशंसा वाटली होती. आज त्याच केजरीवालची पाठ थोपटली, तर भाजपावाल्यांना आम्ही बाजू बदलली असेही वाटू शकते. त्याने कुठलाच फ़रक पडणार नाही. मुद्दा लोकशाहीत राजा असलेल्या मतदाराच्या निर्णायक अधिकाराचा आहे. त्याच्यापेक्षा शिरजोर होऊ बघणार्‍यांना तो इशारा देतो, तो भाजपाने आज शिकला नाही, तर बिहार व अन्य राज्यात काय वाढून ठेवले आहे, ते वेगळे सांगण्याची गरज उरणार नाही.