Friday, May 29, 2020

पत्रकारीताच रुग्णशय्येवर ?

Uddhav govt stable, allies met CM over Covid-19: Maharashtra ...

मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आणि एप्रिल महिन्यात क्रमाक्रमाने त्या विषाणू बाधेचे रुग्ण सापडू लागल्यापासून आज मुंबईने व महाराष्ट्राने कुठवर मजल मारली आहे? त्या टाळेबंदीचा चौथा टप्पा आज संपतोय आणि आणखी काही काळ त्यातून सुटका नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यातच अजूनही नवनवे रुग्ण सापडत असून तो आकडा खाली येत नसताना रुग्णसेवा किंवा वैद्यक सेवेतील शेकडो उणिवा समोर येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर थोडीफ़ार झाडाझडती घेण्याला पर्याय नाही. संकट जागतिक आहे आणि जगातल्या मोठमोठ्या व्यवस्था उलथून पडलेल्या असताना एकट्या महाराष्ट्र सरकार वा सत्ताधार्‍यांना धारेवर धरण्यात अर्थ नाही. पण सत्ताधीशांकडून येत असलेली माहिती आणि वस्तुस्थिती यांचीही सांगड घालायला हवीच ना? कारण प्रतिदिन मृत्यूमुखी पडणार्‍यांचा आकडाही थोडाथोडका नाही. इथे मग पत्रकारितेची कसोटी लागत असते. फ़क्त विविध पक्षाचे नेते प्रवक्ते यांच्यात झुंज लावून, किंवा त्यांच्या भांडणाच्या बातम्या देऊन पत्रकारिता साजरी होणार नसते. म्हणूनच आजचा प्रश्न राज्यातील महाआघाडी सरकार वा त्यांच्या म्होरक्यांना नसून, मराठी पत्रकारिता करणार्‍यांसाठी आहे. मे महिना सुरू व्हायच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी महिना अखेरीस सगळ्या जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये आणायची भूमिका मांडलेली होती. पण त्याच कालखंडात उर्वरीत ऑरेन्ज झोनसहीत ग्रीन झोन जिल्हेही रेड झोनमध्ये कसे गेले? त्याचा शोध कोणी घ्यायचा? त्याहीपेक्षा सरकार देत असलेल्या माहितीची शहानिशा कोणी करायची? कोणी त्यासाठी पुढे येणार आहे काय?

मे महिन्याच्या आरंभापासून आपण वाढत्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी किंवा रुग्णांच्या उपचारासाठी महाआघाडी सरकार कसे कंबर कसून राबते आहे आणि त्यात विरोधी पक्ष कसा व्यत्यय आणतो आहे; त्याच्या रसभरीत चर्चा माध्यमातून ऐकत आलो. पण जे दावे राज्य सरकारने केले, ते कधीतरी माध्यमांनी तपासले आहेत काय? उदाहरण म्हणून आपण इस्पितळात रुग्णशय्या कमी पडत असल्याने अतिशय वेगाने नवी तात्पुरती इस्पितळे वा उपचार कक्ष उभारण्याच्या अनेक बातम्या मे महिन्यात सातत्याने बघत आलो. त्यापैकी बीकेसी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या शेजारी असलेल्या विस्तीर्ण मैदानावर उभारलेल्या काही हजार रुग्णशय्यांचे वृत्त प्रत्येक वाहिनीवर बघून झालेले आहे. कोरोनाचा उदभव झाल्यापासूनच्या प्रदुषित वातावरणात दिसेनासे झालेले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे त्या ‘नवजात’ बीकेसी रुग्णालयाला भेट देताना दिसले. अधिकार्‍यांचा ताफ़ा सोबत घेऊन त्यांनी त्या व्यवस्थेची पहाणी केली. ते चित्रण बघून लोकांना खुप हायसे वाटल्यास नवल नाही. सरकार काही करीत असल्याचा तो दिलासा होता. पण त्या ऐसपैस व्यवस्थेची दृष्ये बघून कुणाचा कोरोना ठिकठाक होणार नव्हता. कारण त्यानंतर अनेक भागातून बाधा झालेल्यांना रुग्णवाहिका मिळत नाहीत वा जिथे रुग्ण मृत्यूमुखी पडला, तिथेही त्याचा मृतदेह हलवायला जागा नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्याच दरम्यान मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बीकेसीत जाऊन आल्याची बातमी बघायला मिळाली. तशीच सुविधा गोरेगावच्या नेस्को मैदानात झाल्याचेही कानी येत होते. या बातम्यांचा ओघ चालूच राहिला. पण तेव्हाच रुग्णाला घेऊन इस्पितळांच्या दारोदारी फ़िरणार्‍या रुग्णवाहिकांच्या बातम्याही मागोमाग येऊ लागल्या. कारण काय होते?

एका बाजूला रुग्णांना बेडस् नाहीत म्हणून बहुतांश इस्पितळात दाखल करून घेत नाहीत आणि अनेक ठिकाणी एकाच शय्येवर दोन दोन रुग्ण असल्याच्या बातम्यांचा ओघ सुरू झाला. यातली गफ़लत कुठल्याच पत्रकारांना वा माध्यमांना खरेच कळत नव्हती का? कारण हजारोच्या संख्येने याच काळात नव्या रुग्णशय्यांची उभारणी झालेली असेल, तर रुग्णांना दारोदार फ़िरायची वेळ कशाला आलेली आहे? तितकेच नाही. आदित्य वा उद्धव ठाकरे यांच्या मागोमाग एकेदिवशी ज्येष्ठ नेते शरद पवारही बीकेसीमध्ये रुग्णशय्यांची पहाणी करून पाठ थोपटायला गेल्याच्या बातम्या झळकल्या. या तीन भेटींमध्ये किमान दहाबारा दिवसांचे अंतर होते. पण नव्याने सज्ज केलेल्या शय्यांवर एकदाही कोणी रुग्ण विसावलेला दिसला नाही. मग त्या शय्या प्रदर्शनासाठी मांडलेल्या होत्या काय? योगायोगाने ते मैदानच प्रदर्शनासाठी राखीव भूखंड आहे. याच दरम्यान वरळीचा डोम, झेवियर्स कॉलेज. रेसकोर्स अशा अनेक जागी नव्याने रुग्णशय्या सज्ज होत असल्याच्या बातम्याही झळकत होत्या. पण साधारण तीनचार आठवड्यात उभारलेल्या या नव्या व्यवस्थेचा लाभ कोण वा कुठला कोरोनाग्रस्त घेतो आहे, त्याची किंचीतही झलक सामान्य लोकांना देण्याची इच्छा माध्यमांना होऊ नये, हे आश्चर्यच नाही काय? कारण तितकी दृष्येही मुंबईकरांना दिलासा देणारी ठरली असती. सायन किंवा अन्य कुठल्या इस्पितळात मृतदेहाच्या शेजारीच रुग्णावर उपचार चालू असल्याच्या भयावह दृष्याला, तितके चोख उत्तर दुसरे असू शकत नव्हते. काही त्रुटी आहेत, पण त्यापेक्षाही सज्जता अधिक असून त्याचाही लाभ मुंबईकर कोरोनाग्रस्तांना मिळत असल्याचे लोकांना आपल्या डोळ्यांनी दिसले असते आणि बघताही आले असते. परंतु कुणाही पत्रकाराला तितके सोपे काम करावे वाटले नाही, किंवा राज्यकर्त्यांनाही आपल्या कर्तबगारीच्या ‘लाभार्थी’ नागरिकांचे असे योग्य प्रदर्शन मांडण्याची गरज वाटली नाही.

या सबंध महिन्यात वा पाचसहा आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी लाइव्ह संबोधनातून दिलासा देण्यापेक्षा नव्या शय्यांवर पहुडलेले वा उपचार घेणारे रुग्ण दिसल्याच्या मोठा परिणाम होऊ शकला असता. टिकाकार वा विरोधकांना चोख प्रत्युत्तर मिळून गेले असते. किंबहूना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांची वाचा अशी बसली असती, की त्यांना पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पक्षावर आरोप करण्याची हिंमतही झाली नसती. पण ती झाली आणि मग त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी तीन ज्येष्ठ मंत्र्यांना वेगळी पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली. त्यातही देण्यात आलेले आकडे किंवा माहिती तपासून बघितली तर वस्तुस्थिती दुजोरा देताना दिसत नाही. त्याही संवादात नव्या हजारो रुग्णशय्यांवर किती रुग्ण उपचार घेत आहेत, त्याविषयी कुणा पत्रकाराने प्रश्न विचारला  नाही किंवा उत्तर मिळाले नाही. शिवाय नुसत्या रुग्णशय्या पुरेशा असतात काय असाही प्रश्न आहेच. कारण नुसत्या शय्येचा प्रश्न असता, तर प्रत्येक वस्तीतही मोकळ्या जागी खाटा टाकून ती सुविधा उभी राहू शकते. हजार नाही तरी पाचपन्नास खाटा टाकून मुंबईत काही लाख रुग्णशय्या रातोरात नवरात्रोत्सव किंवा गणेशोत्सवाचेही कार्यकर्ते उभारू शकतात. मुद्दा असतो, तो रुग्णशय्येवर येणार्‍या व्यक्तीवर उपचार करणार्‍या कर्मचारी व वैद्यक जाणकाराचा. त्या बाबतीत काय सोय आहे? बीकेसी वा नेस्को अशा जागी हजारो रुग्णशय्या सज्ज केल्या, तरी तिथे येणार्‍या रुग्णांची सेवा किंवा उपचार करण्यासाठीचे कर्मचारी कुठे आहेत? त्यांची संख्या किती आहे? उपलब्धता किती आहे? त्याची काही माहिती अनिल देशमुख, थोरात वा अनील परब इत्यादी मंत्र्यांनी कुठे दिल्याचे कोणाच्या ऐकीवात आहे का? त्याची विचारणा कुणा पत्रकाराने केल्याचे तरी ऐकीवात आहे काय? की पत्रकारिताच रुग्णशय्येवर मुर्च्छित  होऊन पडलेली आहे?

Tuesday, May 26, 2020

राष्ट्रपती राजवट कशला हवी?

क्या महाराष्ट्र सरकार पर है खतरा ...

गेल्या काही दिवसात राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये म्हणून गदारोळ करण्यात आला आणि हळुहळू करीत सगळेच राजभवनात फ़ेर्‍या मारू लागलेले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस अनेकदा राज्यपालांना भेटायला गेले आणि त्यांनी आपल्या अनेक मागण्या व तक्रारी तिथे मांडल्या. खरे तर त्याची गरज नव्हती. उद्धव ठाकरे जुने सहकारी मित्र असल्याने नुसता फ़ोन लावूनही आपल्या अपेक्षा वा मागण्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणे फ़डणवीसांना शक्य होते. मग त्यांनी त्यासाठी राजभवनात धाव कशाला घ्यावी? हा मला पडलेला प्रश्न नाही, तर जलसंपदा मंत्री जयंत पाटिल यांना सतावणारा सवाल आहे. कोणालाही तो सवाल रास्त वाटणाराच आहे. पण अनेकदा आपली स्मृती दुबळी असते, त्यामुळे दुसरा कोणी अनुभवातून शिकतो हे आपण विसरून जातो ना? बहुधा पाटलांची तीच कथा असावी. अन्यथा त्यांना आपले महाविकास आघाडीचे सरकार फ़ोन घेतला न जाण्यामुळे सत्तेत येऊ शकले; या घटनेचा कशाला विसर पडला असता? मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वापरलेली एक महत्वाची युक्ती म्हणजे त्यांनी त्या काळात फ़डणवीसांचा फ़ोनच उचलायचा नाही; असा केलेला निर्धार होता. अर्थात हे उद्धवरावांनीच मोठ्या अभिमानाने पत्रकारांना सांगितले होते. जयंत पाटलांना ते ठाऊकच नाही काय? उद्धवरावांनी देवेंद्रचा फ़ोन उचलला असता, तर कदाचित महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता आणि पाटिल जलसंपदा मंत्रीच होऊ शकले नसते. जी व्यक्ती देवेंद्रचा आहे, म्हणून त्या अटीतटीच्या कालखंडात फ़ोनच घेत नाही, ती व्यक्ती आज कोरोनाच्या आणिबाणीत त्याच देवेंद्र फ़डणवीसांनी फ़ोन केला, म्हणून तो उचलून त्यांच्या मागण्या ऐकून घेईल काय? म्हणून मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या मागण्य़ा पोहोचवण्यासाठी फ़डणवीसांना राजभवनाचे खेटे घालावे लागत आहेत.

गेल्या वर्षीच्या आक्टोबर महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका झालेल्या होत्या. त्यात सत्तारूढ भाजपा शिवसेना महायुतीला स्पष्ट बहूमत मिळालेले होते. पण त्यातल्या दोन पक्षांपैकी कोणाला मुख्यमंत्रीपद मिळावे, असा वाद सुरू झाला आणि जनतेने दिलेल्या बहूमताचा फ़ज्जा उडवला गेला होता. आपल्याला सत्तेत अर्धी भागिदारी हवी आणि त्यात मुख्यमंत्रीपदाचाही समावेश होतो; असा हट्ट उद्धवराव धरून बसलेले होते. त्याच फ़ज्जाकडे सज्जातून बघत बसलेल्या राष्ट्रवादी व कॉग्रेसला त्यामुळेच सत्तेची लॉटरी लागलेली होती. कारण खर्‍या मतदाराने त्या दोन्ही पक्षांना विरोधात बसण्य़ाचा आदेश मतदानातून दिलेला होता. हे अर्थात मतदाराने कुठल्या पत्रकार परिषदेत येऊन सांगितलेले नाही. तर त्या काळात जयंत पाटलांपासून शरद पवारांपर्यंत दोन्ही कॉग्रेसचा प्रत्येक नेता पत्रकारांना हेच सांगत होता. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे आणि महायुतीला सरकार बनवण्यास बहूमत दिलेले आहे. त्यामुळे सरकार कसे व कधी बनणार, ते त्यांनाच विचारा असा बहूमोल सल्ला हीच मंडळी पत्रकारांना देत होती. पण सरकार बनवण्यासाठी युती म्हणून निवडून आलेल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये संवाद होण्याची गरज होती. त्याच्या दोन शक्यता होत्या, फ़डणवीस यांनी वा उद्धव ठाकरे यांनी बोलणे आवश्यक होते. त्यापैकी एकाने दुसर्‍याला फ़ोन करून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवे होते. त्यापैकी उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी कधीच फ़डणवीसांना फ़ोन केला नाही. तसे त्यांनीच सांगितलेले आहे. पण देवेंद्रनी मात्र अनेकदा मातोश्रीवर फ़ोन केलेले होते. मात्र आपला फ़ोन उद्धवराव घेत नाहीत, अशी त्यांची तक्रार होती. नंतरच्या कालखंडात त्याची ठाकरे यांनीही कबुली दिलेली आहे. फ़डणवीसांचे फ़ोन आले, पण आपणच घेतलेले नाहीत असे छाती फ़ुगवून उद्धवरावच पत्रकारांना म्हणल्याचे कोणालाच आता आठवत नाही काय?

त्यामुळे आता तेच फ़डणवीस कुठल्या अनुभवाने मातोश्रीवर फ़ोन करतील? विरोधी नेता म्हणूनही त्यांनी मातोश्री येथे फ़ोन लावला तर उद्धवराव उचलणार आहेत काय? जयंत पाटलांनी त्याचाही खुलासा करून टाकला असता, तर काम सोपे होऊन गेले असते. पण तसे होणार नाही. कारण जयंत पाटिलही आपण दिशाभूल करणारे बोलत आहोत हे जाणुन आहेत. शिवाय आताच त्यांना कोरोनाच्या संकट काळात असे राजभवनावर जाणे घाणेरडे राजकारण वाटते आहे. बहुधा सरकार बनवण्याच्या वा महायुतीला फ़ोडण्याच्या काळात महाराष्ट्रात स्थिती एकूण सुखरूप व आनंददायी असल्याचे वाटत असावे. की त्याही बाबतीत त्यांच्यासह शिवसेना प्रवक्त्यांना स्मृतीभ्रंश झालेला आहे. फ़डणवीस सोडून द्या आपले शतजन्मातही कधी न समजणारे जाणता नेता शरद पवार शेतकर्‍यांना भेटायला बांधावर कशाला जात होते? ते यांना आठवतच नसतील काय? जेव्हा बहूमताची मोडतोड करून सत्ता बळकावण्याचे खेळ दोन्ही कॉग्रेस व शिवसेनेचे चाणक्य करीत होते. तेव्हा अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने अवघा महाराष्ट्र बेजार झालेला होता. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चीम महाराष्ट्र किंवा कोकणाला पावसाने झोडपले होते, पुराने थैमान घातलेले होते. कोल्हापुर सांगलीच्या भागात तर हायवेही बुडालेले होते. गावात शहरात घराघरात पाणी शिरलेले होते आणि गुरेढोरेही वाहून गेलेली होती. नदीलगतच्या अनेक गावात छपरावर मगरी बागडत होत्या. त्यातले काहीही जयंत पाटलांना अजिबात आठवत नाही काय? त्या काळात महाराष्ट्रात निवडणूका संपून निकाल लागलेले होते आणि एका राजकीय आघाडीला मतदाराने बहूमत बहाल केलेले असतानाही पुरोगामी महाराष्ट्र सरकारविना राष्ट्रपती राजवटीत खितपत पडलेला होता. त्यातून त्याला दिलासा देण्यापेक्षा जयंत पाटिल वा सेनेचे प्रवक्ते कोणते उदात्त कार्य करण्यात रमलेले होते?

महायुतीला मतदाराने बहूमत दिलेले होते आणि त्याला लाथाडून सत्ता बळकावण्याचा क्रुर राजकीय खेळ चालला होता. तेव्हा बुडालेल्या, उध्वस्त होऊन गेलेल्या शेतकरी गावकर्‍याला तातडीची मदत देणे आवश्यक होते. म्हणूनच पंचनामे केल्याशिवायच मदत माफ़ी वा अनुदान देण्याच्या मागण्या शरद पवारच करीत होते. पण सरकार स्थापन होऊन त्याने ठामपणे निर्णय घ्यावेत, यात टांग अडवण्याचेही कर्तव्य मोठा शक्तीने पार पाडत होते. अतिवृष्टीने शेतकरी गावकरी बेजार झाला होता, ती स्थिती कोरोनाच्या संकटापेक्षा किती वेगळी होती? लाखो लोक उध्वस्त झालेले होते ना? तेव्हा केलेल्या घातक राजकारणाला कुठले नाव किंवा विशेषण द्यायचे जयंतराव? ते मदतकार्यात वा शासकीय कामातले अडथळे व्यत्यय नव्हते का? की अशा उचापती कोण करतो, त्यानुसार त्यातले पाप वा पुण्य शोधायचे असते? सामान्य माणूस वा नागरिक बेअक्कल असतो. त्याची स्मृती दुबळी असते. त्याला कालचे किंवा सहा महिन्यापुर्वीचे राजकारण आठवतच नाही. सहाजिकच आजचे राजकारण घाणेरडे म्हटल्यावर डोळे मिटून त्याचा विश्वास बसतो, असे या महाभागांना वाटते काय? नसेल तर आज फ़डणवीसांनी राजभवनात जाण्याबाबत जाब विचारण्यापेक्षा त्यांनीच सहासात महिन्यापुर्वी आपण केलेल्या उदात्त राजकीय खेळी-मेळीच्या आठवणी जागवाव्यात ना? आपण कसे शेतकरी बुडालेला असताना गावे उध्वस्त झालेली असतानाही सत्तेची साठमारी खेळत बसलेलो होतो, त्याचे प्रवचन करावे. लोक त्यालाही टाळ्याच वाजवतील जयंतराव. एक मात्र खरे. त्यावेळी निदान ‘हंगामी’ मुख्यमंत्र्यापासून शरद पवार व उद्धवरावांपर्यंत सगळेच बांधावर जाऊन गावकर्‍यांना दिलासा देत होते. आज त्याचाही थांगपत्ता नाही. अवघा महाराष्ट्र आजाराने भयभीत सैरभैर झालेला असताना, मंत्री नेतेमंडळी आपापल्या सुरक्षा कवचात अंग चोरून बसलेली आहेत.

ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली किंवा समजून घेतली, तर नारायण राणे यांची चमत्कारीक वाटणारी मागणी समजू शकते. जर अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व ग्रामिण जनजीवन उध्वस्त असतानाही राज्यातले सर्व राजकीय पक्ष व नेते सरकार स्थापनेपेक्षाही राजकीय साठमारी करण्यात सहासात महिन्यापुर्वी रमलेले होते आणि राज्याचा एकूण कारभार उत्तम चालला होता. कोणालाही कसली फ़िकीर नव्हती तर आज त्यापेक्षाही मोठे संकट म्हणून कोरोना समोर उभा ठाकलेला आहे. अशा वेळी त्यालाही राष्ट्रपती राजवटच परिस्थिती योग्य हाताळू शकते, असे कोणालाही वाटणारच ना? कारण दोन्ही काळातली स्थिती जवळपास सारखीच आहे. लोकनियुक्त सरकारची निदान महाराष्ट्राला गरजच नाही, असे सर्व राजकीय पक्षांनी आपल्या तेव्हा सिद्ध करून दाखवले आहे. मग राणे यांची मागणी कशी अयोग्य मानता येईल? तेव्हा शेतकरी गावकरी तडफ़डत ठेवून सत्तेचे वाटप करण्यामध्ये तिन्ही पक्ष रममाण झालेले होते आणि बांधावर जाऊन नुसते कोरडे दिलासेच वाटले जात होते ना? आजही खुद्द मुख्यमंत्री लाईव्ह संबोधनातून वेगळे काय करीत असतात? पवारांनाही आजकाल शेताचा बांध आठवेनासा झाला आहे. अशा काळात महाराष्ट्राचा कारभार राज्यपाल उत्तम करू शकतील, यात शंका नाही. कारण निवडणूका होऊनही आणि मतदाराने स्पष्ट कौल देऊनही दोन महिने इथे राष्ट्रपती राजवट राहिल; याची सर्वच पक्षांनी काळजी घेतली होती. याचा अर्थच आपल्यापेक्षा राष्ट्रपती राजवटीत राज्यपाल उत्तम कारभार करतात, अशी महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांची व नेत्यांची खात्री आहे. नारायण राणे यांनी ती शब्दात व्यक्त केली इतकेच. किंबहूना लोकांचे प्रतिनिधी सरकार स्थापन करतात तेव्हाच घाणेरडे राजकारण होते; असाच सर्वांचा दावा ऐकू येत असतो. नारायण राणे यांचे आकलन म्हणून मोलाचे नाही काय?

Saturday, May 23, 2020

युद्धपातळी म्हणजे काय?

Shefali Vaidya. on Twitter: "#1/3 This @MumbaiPolice cop is Amol ...

मागल्या पन्नास वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी देखील अनेकदा युद्धपातळीवर काम चालले आहे, किंवा व्हायला हवे, अशी भाषा वापरली आहे. पण व्यवहारात ह्या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, त्याचा अंदाजही मला नव्हता. आज कोरोनाच्या कृपेने त्याची अनुभूती येत आहे असे म्हणायला हरकत नाही. याचे कारण एका विद्यमान सेनाधिकारी व्यक्तीने जनता कर्फ़्यु किंवा नंतरचा लॉकडाऊन सुरू होण्यापुर्वी केलेले भाष्य आहे. माझ्या निकटवर्तियांशी संबंधित या अधिकार्‍याने येऊ घातलेल्या परिस्थितीचे वर्णन करताना म्हटले होते, या किंवा आधीच्या पिढीने जे बघितलेले वा अनुभवलेले नाही, त्या अनुभवातून आपण पुढला काही काळ जाणार आहोत. त्याचा अर्थ आपण प्रत्यक्ष युद्धभूमीवर नसलो तरी व्यवहारी युद्धजन्य परिस्थितीत असणार आहोत, असा होता. पण तो आशय मलाही तेव्हा कळला नव्हता आणि सर्वसामान्य जनतेला समजणेही अशक्य होते. किंबहूना आज विविध राज्यात वा प्रशासनात कार्यरत असलेल्या अनेक उच्चपदस्थ व्यक्तींनाही त्याची जाणिव झालेली नसावी. युद्धपातळी म्हणजे तिथे चर्चेला वा विचारविनिमयाला वेळ नसतो, सेनापतीने आदेश दिला मग त्याची चिकित्सा करून पुढे जाता येत नाही. तर संकट वा मृत्यू समोर दिसत असतानाही भावना किंवा शंका गुंडाळून पुढे जायचे असते आणि प्रसंगाशी सामना करायचा असतो. त्यात आपलाही कपाळमोक्ष होऊ शकतो. पण एकूण समाजाच्या भल्यासाठी तितका त्याग करणे अपरिहार्य असते. त्यात शंका घेणे वा प्रश्न विचारणेही गैरलागू असते. तितकी शिस्त अंगी बाणलेली असेल तरच युद्ध लढता येत असते आणि जिंकताही येत असते. कारण नेहमीच्या व्यवस्था व सुविधांचा अभाव असतानाही समोर येईल त्या प्रसंगाशी झुंजण्याला पर्याय नसतो. आज या बिगरसैनिकी युद्धात म्हणूनच सर्वांचा पुरता गोंधळ उडालेला आहे. ते युद्ध लढत आहेत आणि रणभूमीवर आहेत. पण युद्ध कुणाशी व कशासाठी याची साधी जाणिव कोणापाशी दिसत नाही.

कुठल्याही संस्था संघटनेत वा कुटुंब परिवारातही सर्व बाबतीत एकवाक्यता नसते. पण हे सर्व मतभेद बेबनाव युद्ध सुरू झाल्यावर बाजूला ठेवुन चालावे लागते. त्यात जो सेनापती असतो त्याच्या आदेशावर विश्वास ठेवूनच चालायचे असते. त्यातले दोष वा आक्षेप घेण्याने अधिक नुकसान संभवत असते. उलट सेनापतीने सर्व वादविवाद गुंडाळून आपल्या सहकारी सोबत्यांशी सल्लामसलत करून पाऊल उचलायचे असते. दिल्लीत बसलेला सेनापती लडाख वा काश्मिरातील आपल्या सहकारी सैनिकांना आदेश देतो, तेव्हा त्याच्या आदेशावर शंका घेऊन चालणार नसते. काही प्रमाणात स्थानिक सेनाधिकारी व्यवहारी निर्णय घेत असतात. त्यात आपल्या निर्णयाचा खुलासा वा विवरण प्रत्येक सैनिकाला देत बसल्यास युद्ध संपून गेले तरी चर्चा संपत नसतात. कारण शत्रू बाजी मारून जातो आणि युद्ध न लढताच हरल्याने पुढल्या चर्चेची गरज उरत नसते. बांगला देशचे युद्ध इंदिराजींनी कशाला पुकारले किंवा बांगला देशात पाक सेनेने शरणागती पत्करल्यावर युद्धबंदी अकस्मात कशाला घोषित केली, त्याविषयी जाब त्यांना कोणी कधी विचारला नाही. राजकीय विरोधकांनी विचारला नाही, किंवा सेनादलाच्या प्रमुखांनी देखील विचारला नाही. जनरल कॅन्डेथ नावाच्या पश्चीम सीमेवरील अधिकार्‍याने तसा संतप्त सवाल केला, त्याला तात्काळ निवृत्त करण्यात आलेले होते. आज बघितल्यास त्याची शंका वा आक्षेप रास्त ठरूही शकतो. कारण पश्चीम पाकवर तेव्हा हल्ला थांबवला नसता, तर हाती आलेला पाकप्रदेश अधिक विस्तारून नंतर बदल्यात सगळा काश्मिर परत घेऊन सौदा करता आला असता. आज पाकव्याप्त काश्मिर हा विषय शिल्लक उरला नसता, किंवा त्यावरून इतकी हिंसा व घातपात भारताला अनुभवावे लागले नसते. पण ही चर्चा आज रंगवणे व तेव्हा त्यावरून गहजब करणे, यात फ़रक असतो. म्हणून त्यावेळी कोणी सेनाधिकारी कॅन्डेथ यांच्या समर्थनाला पुढे आले नाहीत. कारण निर्णयप्रक्रीया युद्धपातळीवर चालली होती. तिथे वादविवादाला स्थान नसते.

कोरोना विरोधातल्या लढाईत सगळे नागरिकच सैनिक आहेत आणि आपापल्या पातळीवर लोकप्रतिनिधीच त्यांचे सेनापती आहेत. स्थानिक वरीष्ठ कनिष्ठ प्रशासकीय अधिकारीही सामान्य जनतेचे सेनापती आहेत. त्यांच्या आज्ञा पाळणे व पर्याय निघण्यापर्यंत होणारे हाल सहन करण्याला पर्याय नसतो. अशाही स्थितीत लॉकडाऊन झाला तर अनंत अडचणींना नागरिकांना त्रास सहन करावा लागणे अपरिहार्य होते. इवल्या जागेत दहापंधरा लोक वास्तव्य करतात, अशा मुंबईत झोपडपट्ट्य़ा वस्तीमध्ये सोशल डिस्टंसिंग शक्य नव्हते. पण तिथे अपुर्‍या जागेतही रोगाला विषाणूला फ़ैलाव होण्यापासून रोखण्यासाठी पर्याय शोधले जाऊ शकत होते. तसे काही करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी माध्यमांची पत्रकारांची होती. अगदी पुरेसे खाणेपिणे धनधान्य हाताशी नसतानाही कळ काढायला लोकांना प्रवृत्त करणे, ही विश्लेषक पत्रकारांची जबाबदारी होती. ती सुद्धा युद्धभूमीच होती. सैनिक ३६-४० तास अथक भुकेलाही काम करतो. विश्रांतीची अपेक्षाही बाळगत नाही. त्याला युद्धपातळी म्हणतात. पुरात भूकंपात निवारण कामासाठी सैनिक आणले जातात, तेव्हा त्यांचे कष्ट अतुलनीय भासतात. पण त्यातली अनुभूती कधी नागरी जीवनातल्या सुविधांनी लंगडे झालेल्यांना असते काय? नसते म्हणूनच लॉकडाऊनचा फ़ज्जा उडालेला आहे. सगळे जीवन आणि देशच युद्धभूमी झालेले असताना कायदे नियम वा शिस्त बेशिस्त यांना अर्थ उरलेला नसतो. त्यातून प्रत्येकजण वाट शोधण्याचा प्रयास करीत असतो. तेव्हा पोलिस वा सार्वजनिक सेवेतील कोणी कर्मचारी अमानुष वागला वा त्याच्या मनाचा अतिकष्टाने तोल गेला, तर राईचा पर्वत करू नये. इतकेही भान ठेवले जात नाही? मृतदेहाच्या बाजूला रुग्णावर उपचार चालल्याचे चित्रण व्हायरल करून दोन महिने अहोरात्र राबलेल्या डॉक्टर कर्मचार्‍यांना आरोपी बनवले जाते, तेव्हा युद्धपातळीचा अर्थ समजला नाही असाच अर्थ होतो. कारण आजची परिस्थिती नेहमीची वा सुटसुटीत नाही. इथे अनेक नियम बाबी गुंडाळून जमेल तितके करायचे आहे. हे लोकांच्या डोक्यात कोणी घालायचे असते?

कपडे फ़ाटले तर ते सुईदोरा घेऊन शिवता येतात, किंवा ठिगळ लावूनही झाकपाक करता येते. पण आभाळच फ़ाटले तर ते शिवायला सूईदोरा कुठून आणायचा? अशी परिस्थिती समोर आहे. तिथे कशाला सुई म्हणायचे आणि कशाला दोरा म्हणायचे, तेही सांगता येणार नाही. पण आभाळ फ़ाटले हा नुसता शब्द असेल तर त्याला काही अर्थ नसतो. त्यातला आशय लक्षात घेतला तर विषय समजू शकतो. अन्यथा युद्धपातळीवर हा शब्द नुसता निरर्थक म्हणूनच वापरला जात रहाणार. युद्धात सैनिक सीमेवर किंवा रणांगणात लढतो, तेव्हा त्याला शक्य तितके सामान साहित्य पुरवण्याची व्यवस्था शासन व त्यांचे इतर विभाग करीत असतात. पण जेव्हा असे सैनिक लढताना शत्रू प्रदेशात किंवा वेढ्यात सापडतात, तेव्हा त्यांना आपल्याच बळावर प्रतिकार करण्याखेरीज पर्याय नसतो. उपलब्ध साहित्य व साधनांचा मिळेल तसा वापर करून झुंज द्यावी लागत असते. त्याला युद्धपातळीवरचे काम म्हणतात. आज विविध इस्पितळे, शासकीय यंत्रणा, पोलिस वा सफ़ाई कामगार इत्यादी आपल्या परीने अथक काम करतात, तेव्हा त्यांना अशा विपरीत स्थितीतही काम करण्याचे कुठलेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. २०-२५ पोलिसांचा त्यात बळी गेला आहे. तेही आपल्या घरात कुटुंबात लॉकडाऊनमध्ये सुरक्षित जगू शकले असते. पण त्यांनी पुढे येऊन एकूण समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावलेले आहेत. अमोल कुलकर्णी नावाचा धारावीमध्ये बंदोबस्ताला अखंड राबलेला पोलिस अधिकारी काही दिवस आधी सोशल मीडियातून म्हणाला होता. ‘कोणी ५ कोटी तर कोणी ५० कोटी देणग्या दिल्यात कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी. आम्ही आमच्या प्राणांची देणगी देतोय’. त्याचे शब्द गेल्या आठ्वड्यात खरे झाले. या युद्धपातळीने त्याचे ‘दान’ घेतले. कोरोनाच्या निमीत्ताने किती संपादक, पत्रकार, बुद्धीजिवी, अर्थशास्त्री वा तथाकथित शहाण्यांपासून राजकारण्यांपर्यंत लोकांनी कोरोनाच्या निमीत्ताने कसले दान केले आहे? कारण युद्धपातळी म्हणजे काय ते समजून घेण्यापर्यंतही त्यांच्या बुद्धीची पातळी गेलेली नाही.

Wednesday, May 20, 2020

गिधाडांचा बंदोबस्त

How the Vulture and the Little Girl Ultimately led to the Death of ...

जागतिक आरोग्य संघटनेचे अखेरीस वार्षिक परिषदेत पुरते वाभाडे निघालेले आहेत. कोरोनाने घेतलेला तो सर्वात मोठा बळी मानावे लागेल. कारण कोरोनाचा जनक असलेल्या चीनला पाठीशी घालताना या संस्थेचा बळी गेलेला आहे. ज्या चौकशीचा प्रस्ताव नुकताच वार्षिक परिषदेत मंजूर करण्यात आला, ती चौकशी केवळ कोरोनाचा उगम वा त्यातली लपवाछपवी इतकीच मर्यादित नाही. त्यात विविध राजकीय हितसंबंधांचाही वेध घेतला जाणार आहे. कारण आरोग्य संघटनेची स्थापना ज्या हेतूने झाली होती, त्यालाच त्या संस्थेच्या विद्यमान नेतृत्वाने काळीमा फ़ासला आहे. कोरोनाचा उदभव झाल्यापासून त्याला यशस्वीरित्या पायबंद घालण्यात यश मिळवणार्‍या तैवान या देशाने त्यावर पहिला आवाज उठवला होता. पण ह्या संस्थेने त्याकडे काणाडोळा केला. अधिक तैवानला त्या संस्थेच्या बैठकीत निरीक्षक म्हणूनही सहभागी करून घ्यायला नकार दिला होता. उलट त्याकडे वेळीच लक्ष दिले गेले असते आणि चीनमध्ये उदभवलेल्या कोरोनाचा वेळीच तपास घेतला गेला असता, तर आज दिसते तसे जग उध्वस्त होऊन पडले नसते. ते अन्य कोणाचे काम नसून आरोग्य संघटनेचे कर्तव्य आहे. त्यात अक्षम्य हेळसांड झालीच. पण तैवानने इशारा दिला असताना त्याचीच मुस्कटदाबी करण्याला संस्थेने प्राधान्य दिले. त्याचे कारण उघड आहे. तैवान हा कम्युनिस्ट चीनचा सर्वात इवला शत्रू आहे. ‘वन चायना’ ह्या धोरणानुसार चिनी नेतृत्वाच्या मते तैवान हा वेगळा देश नसून चीनचेच एक बेट आहे. त्यामुळे त्याला देश मानला जाऊ नये व त्याचे मुख्यभूमीत विलीनीकरण झाले पाहिजे. ही चीनची भूमिका असली तरी आरोग्य संघटनेची असू शकत नाही, याचे त्या संस्थेला भान उरले नाही, तिथेच सगळा घोळ होऊन गेला.

या संघटनेचे विद्यामान नेते व पदाधिकारी यांना पदावर आणुन बसवण्यात चीनने आपली राजकीय ताकद पणाला लावलेली होती. अर्थात त्यात नवे काहीच नाही. यापुर्वीही अशा जागतिक संस्था संघटनांना आपल्या मुठीत ठेवायला रशिया अमेरिकेनेही तेच केलेले आहे. नाणेनिधी वा जागतिक बॅन्क या संस्था अमेरिकेच्या इशार्‍यावरच चालत असतात आणि निर्णय घेत असतात. मग चीनने त्याच मार्गाने जाणे अयोग्य म्हणता येणार नाही. पण चीनने त्या संस्थांचा खर्चही उचलावा. बोजा अमेरिकेने उचलावा आणि तिथे सिंहासनावर आरुढ झालेल्यांनी अमेरिकेच्या विरोधातले फ़तवे काढण्यापासून अमेरिकेलाच वाकुल्या दाखवाव्या; असे चालणार नाही. इथे तर आरोग्य संघटनेने जगालाच खाईत लोटून देण्यापर्यंत चीनला साथ दिली आणि सर्वाधिक अनुदान देणार्‍या अमेरिकेलाही मरणाच्या जबड्यात ढकलून दिलेले आहे. कारण तैवानसारख्या देशाने इशारा दिल्यावर या संस्थेने चीनमध्ये कोरोनाच्या फ़ैलावाने मृत्यूचे तांडव चालविले असल्याची सर्वात पहिली दखल घेणेच त्या संस्थेचे कर्तव्य होते. जगात कुठलीही आजाराची साथ वा प्राणघातक आजार सरसकट फ़ैलावत जाऊ नये, याची देखरेख करण्यासाठीच या संघटनेची स्थापना झालेली होती आणि नेमक्या त्याच कर्तव्याला तिने यावेळी हरताळ फ़ासलेला होता. तसा इशारा देण्यार्‍या तैवान देशाची मुस्कटदाबी केली आणि त्याच विषाणूविषयी लपवाछपवी करणार्‍या चीनला मोकाट रान दिले. त्यामुळेच अवघे जग गाफ़ील राहून कोरोनाच्या जबड्यात जाऊन घुसमटले. लाखो लोकांचा बळी गेला आहे आणि लक्षावधी आजारी पडले असून जगाची अर्थव्यवस्थाही कोलमडून पडली आहे. मग एकटा चीन जबाबदार कसा? गुन्हेगारीत साथ देणारा वा त्यावर पांघरूण घालणाराही तितकाच गुन्हेगार असतो ना?

अर्थात कोरोना हाताबाहेर जातोय आणि जागतिक आरोग्य संघटनाच त्यातली भागिदार असल्याचे उघड झाल्यावर कोणी ते स्पष्ट बोलायची हिंमत करत नव्हता. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ़टकळ असल्याने खुलेआम त्यांनी पहिला आरोप केला. आधी चीन व नंतर आरोग्य संघटनेलाही आरोपीच्या पिंजर्‍यात ट्रम्प यांनीच उभे केले. तर त्यांच्याच देशातही ट्रम्प यांची हेटाळणी झाली होती. पण हळुहळू हा वेडा काय म्हणतो, त्याकडे जगाला कान उघडे ठेवून बघावे ऐकावे लागले आणि आता कोरोनाची जागतिक तपासणी चौकशी करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यातून अनेकांची अंडीपिल्ली बाहेर येतीलच. पण त्यासाठी अमेरिकेसारख्या दांडग्या देशाही किती आक्रमक पवित्रा घ्यावा लागला ते विसरता कामा नये. अन्यथा हे पाप खपून गेले असते आणि चीनची मस्ती चालूच राहिली असती. मात्र जागतिक आरोग्य संघटनाच एकमेव आरोपी वा गुन्हेगार नाही. आजकाल जगात ज्या काही प्रतिष्ठीत संस्था, पुरस्कार वा ज्यांचा दबदबा आहे, अशा अनेक व्यक्ती संशयास्पद झालेल्या आहेत. त्यांनी आपले इमान विकून जगालाच गंडा घालण्याचा धंदा राजरोस चालू केलेला आहे. त्यात नोबेल, मॅगसेसे किंवा पुलित्झर अशा पुरस्कारांचाही समावेश आहे. जगाचे चिंतन करणार्‍या व जगाला विषाचेही डोस अमृत म्हणून दिवसाढवळ्या पाजणार्‍या थिंकटॅन्क मोकाट झालेल्या आहेत. त्यांचेही पितळ उघडे पडण्याची गरज आहे. कारण अशा पुरस्कार वा गाजावाजा करण्यातून जगाला संभ्रमात टाकण्याचा धंदा माजला आहे. अमूक पुरस्कार मिळाला म्हणजे त्याच व्यक्तीचे पाखंड सुरू केले जात असते आणि त्याच्या माध्यमातून अब्जावधी लोकांना चक्क उल्लू बनवले जात असते. त्यांनाही यापुढे धारेवर धरण्याची गरज आहे.

कालपरवा काश्मिरमध्ये चाललेल्या तथाकथित अमानुष व्यवहार कारभारावर छायाचित्रे प्रसिद्ध करणार्‍या तिघांना पुलित्झर पारितोषिक देण्यात आले. वरकरणी ते मानवतावादी कार्य दिसेल. पण त्यामागचा अजेंडा लपून रहात नाही. ज्यांना भारतीय काश्मिरात पाकप्रणित जिहादींनी मारलेली माणसे दिसत नाही, त्यांच्या कॅमेराने टिपलेली किरकोळ हाल वा दुर्दशेची चित्रे मुद्दाम पुढे आणली जातात. पण व्याप्त काश्मिर वा बलुचिस्तानचे परागंदा लोक पाश्चात्य देशातच पाक लष्कराचे अत्याचार कथन करीत असतात, त्यांचे कोणी ऐकून तरी घेतो काय? तो टाहो ज्यांच्या कानी पडतच नाही, त्यांना असे पुरस्कार दिले जातात. कारण तो अजेंडा असतो. सौदी अरेबियात तलवारीने मुंडके धडावेगळे करून शिक्षा अंमलात येते, त्यावर मूग गिळून गप्प बसणारे भारतातल्या याकुब मेमनच्या फ़ाशीवर काहूर उठवत असतात. त्यांचे पाश्चात्य देशात बसलेले धनी पुरस्काराची बरसात करीत असतात. त्यांना चीनमध्ये तिआनमेन चौकातली कत्तल विचलीत करीत नाही. कारण तो अजेंडा नसतो. त्यांना श्रीलंकेतील दहशतवाद्यांचा बिमोड अमानुष वाटतो, पण भारतात नक्षलींनी सामान्य गावकरी वा पोलिसांचे मुडदे पाडलेले बघता येत नाहीत. कारण असे पुरस्कार वा मानवी हक्काच्या संस्थाही अजेंडानुसार चालत असतात. मॅगसेसे पुरस्कार, किंवा बुकर नावाचे पुरस्कार अजेंडा पुढे नेणार्‍यांना दिले जातात. मग पुरस्कारप्राप्त म्हणून त्या फ़डतूस लेखकांचा माध्यमातून गवगवा केला जातो आणि नंतर त्यांनाच मॉडेल म्हणून राजकीय अजेंडा राबवायला पुढे आणले जाते. अरुंधती रॉयपासून रवीशकुमारपर्यत सगळेच एका माळेचे मणी कसे असतात?

म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेचे पितळ उघडे पाडण्यासाठी सुरू झालेल्या या मोहिमेची व्याप्ती तेवढ्यापुरती मर्यादित रहाता कामा नये. त्यातून चीनने कोणकोणत्या देशात किंवा क्षेत्रामध्ये आपले हस्तक घुसवून ठेवले आहेत, त्याचीही झाडाझडती घेतली गेली पाहिजे. फ़क्त चीनच कशाला? त्यांच्याप्रमाणेच अमेरिका, रशिया किंवा अगदी पाकिस्तानसहीत मोठमोठ्या धर्मदाय संस्थाही कोणकोणत्या अभ्यास संस्थांमध्ये घुसून ब्लॅकमेलींगचा धंदा राजरोस उजळमाथ्याने करतात, त्यांचाही पर्दाफ़ाश होणे अगत्याचे आहे. आताही भारतात कोरोनाची लागण सुरू होताच मे-जुनपर्यंत किती कोटींना बाधा होईल आणि किती लाख मुडदे पडतील; त्याची भाकिते मार्चपासून सुरू करणारे त्याच पठडीतले आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनापेक्षा अधिक लोकसंख्या भूकबळी म्हणून भारतात मरणार असले भविष्य वर्तवणारे कुठे आहेत? कारण मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला असून आता कुठे भारताची रोगबाधा लाखाच्या घरात पोहोचली आहे. मृतांचा आकडाही पाच हजारापर्यंत पार जाऊ शकलेला नाही. मग कोट्यवधींना बाधा होणार वा लाखो मरतील, असा टाहो फ़ोडण्याचा अजेंडा कशासाठी होता? चीन वा आरोग्य संघटनेइतकेच असे लोकही बदमाश असून त्यांचेही मुखवटे फ़ाडले गेले पाहिजेत. आरोग्य संघटनेच्या मागोमाग गरीबांच्या यातना वेदना वा भावनांची खेळून आपली तुंबडी भरणार्‍यांना कोणीतरी धडा शिकवला पाहिजे. १९९३ सालात सुदानमध्ये एका छायाचित्रकाराने हृदयद्रावक दृष्य टिपले होते आणि त्यालाही पारितोषिक मिळाले होते. अन्नमदत केंद्राकडे जाताना अंगातले त्राण संपलेले बालक आणि त्याच्या मागे टपून बसलेले गिधाड, असेच ते चित्र होते. त्याला एकाने विचारले, तिथे किती गिधाडे होती? ‘एकच’ असे फ़ोटोग्राफ़रने उत्तर दिल्यावर प्रश्नकर्ता उत्तरला, ‘चुक! दोन गिधाडे होती. एक खरेखुरे गिधाड, ते बालकाच्या मृत्यूची प्रतिक्षा करीत होते आणि दुसरा तू. मरणापुर्वीच त्या बालकाचा घास घेऊन पोट भरणारा’.

Shocking images of drowned Syrian boy show tragic plight of ...

आजकाल राहुल गांधी, प्रियंका वाड्रा तरी वेगळे काय करीत आहेत? पायपीट करणार्‍या स्थलांतरीत मजुरांच्या यातना वेदनांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी त्यांनी चालविलेले राजकारण, कुठे किती वेगळे आहे? गिधाडेही खुप दयावान असतात. प्राणी मरण्याची प्रतिक्षा करतात. माणसे स्वार्थी झाली, मग मरणयातनांचेही खाद्य बनवतात.

Saturday, May 16, 2020

आत्मनिर्भर म्हणजे काय?

Image may contain: 1 person

ज्यांना सतत परावलंबी जगायला शिकवलेले असते, त्यांना स्वावलंबी म्हणजे काय ते समजू शकत नाही. तो त्यांचाही दोष नसतो. मानसिक किंवा बौद्धीक विकास होताना ज्या गोष्टी ज्ञान म्हणून त्यांच्या मेंदूमध्ये ‘डाऊनलोड’ केलेल्या असतात, त्यांना नव्या गोष्टी समजूही शकत नाहीत. किंबहूना दुसर्‍या सोफ़्टवेअरचे आदेश समजणे शक्य नसेल, तर त्याचे आकलन होऊन तसे काम करणेही अशक्य असते. सहाजिकच पत्रालंबीत्व म्हणजेच स्वावलंबन असे मनात भिनलेले असेल, तर आत्मनिर्भर म्हणजे काय त्याचे आकलन अशा लोकांना खुळेपणा वाटणे स्वाभाविक आहे. हातात वाडगा घेउन कुठल्याही दारात उभे रहाणे हाच त्यांना रोजगार वाटत असतो. एकदा तेच धोरण वा विचारधारा बनली, मग तेच तत्वज्ञान होऊन जाते. सहाजिकच कुठल्याही समस्या वा उपायांवर वाडगा घेऊन भिक मागणे, हा हक्क मानला जाऊ लागतो. कोरोनानंतर जी परिस्थिती उदभवली आहे, त्यावरचा उपाय म्हणून देशातले वा प्रस्थापिताचे बहुतांश समर्थक प्रत्येक बाबतीत पॅकेजसाठी वाडगा घेऊन रांगेत उभे ठाकले, तर नवल नाही. पण त्यांच्या वाडग्यात कोणीतरी काहीतरी टाकायचे, तर ते आणायचे कुठून व कसे, याचा पर्याय उपाय त्यांना सांगता येत नाही. त्यामुळेच पंतप्रधानांनी जाहिर केलेले २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज रोखीतली रक्कम नसेल, तर त्यांना सगळे पॅकेज देखावा वाटल्यास आश्चर्य मानण्याचे कारण नाही. कारण त्यांनी आजवर हातात वाडगा घेण्यालाच गरीबी दुर करण्याला उपाय मानलेले आहे. त्यांना कष्टातून संपत्ती निर्माण होते वा त्यातून सबलीकरण होऊ शकते, हे कसे कळावे? कारण त्यांना अमर्त्य सेन वा रघुराम राजन किंवा अभिजित बानर्जी ठाऊक असतात, वाचलेले असतात. पण समावेशी विकासाचा जाणकार म्हणून ओळखला जाणारा रॉबर्ट चेंबर्स ठाऊकही नसतो वा नसावा. ठाऊक असता, तर त्यांना मोदींनी पॅकेजमधून काय योजलेले आहे, त्याचा अंदाज आला असता.

रॉबर्ट चेंबर्स हा जगातला एक प्रमुख विकास अर्थशास्त्र जाणकार आहे. त्याने गरीब, वंचित व दुर्लक्षितांना विकास योजनेत मुख्यस्थानी आणून बसवले. विकासाचा विचार करताना व धोरण आखताना अशा दुर्लक्षित वर्गाला मुख्य केंद्र मानले नाही तर संतुलित विकास होऊ शकणार नाही, याचे भान असलेला तो अर्थशास्त्रज्ञ होता. म्हणूनच त्याने गरीबाला भिक घालणे वा उपकार वा दान म्हणून त्याच्या अंगावर काही फ़ेकण्याची कल्पना झुगारली. त्याच गरीब वंचिताला मानवी विकासाच्या मुख्यप्रवाहात सहभागी करून घेण्याची भूमिका हिरीरीने मांडली होती. ती मांडताना विकासाची फ़ळे त्याच गरीबाच्या वाट्याला यावीत, असा विकास करताना त्याला स्वयंभू स्वावलंबी बनवण्याचा विचार मांडलेला होता. आर्थिक शोषणावर आधारलेल्या अर्थकारणाला बाहेर काढून समावेशक विकास व त्यासाठी वंचितालाही त्यातला भागधारक बनवण्याची ही संकल्पना म्हणजेच आत्मनिर्भरता असते. असा सामान्य दुर्लक्षित, कष्टकरी आपल्या श्रमातून नवी संपदा निर्माण करतो आणि आर्थिक व्यवहारातली श्रीमंती एकूण समाजाला संपन्नतेच्या मार्गावर घेऊन जाते. त्याच्या निम्नस्तरीय जीवनातले स्थैर्यच वरच्या वर्गाला श्रीमंतीकडे घेऊन जाणारे यंत्र असते. त्याची मांडणी चेंबर्सच्या विचारातून पुढे आली आणि त्याचा सगळा भर हा पायाभूत सुविधांच्या उभारणीवर होता. ग्रामिण पायाभूत सुविधा व त्यातही प्रत्येक गाव शहरांना जोडणारे सुसज्ज रस्ते हा त्याचाच आग्रह होता. पण इथे अर्थशास्त्री म्हणून मिरवणार्‍या किंवा विश्लेषक म्हणून नाचणार्‍यांनी कधी चेंबर्सच्या गरीबी हटावचा अभ्यास तरी केला होता काय? भारतातल्या गरीबीलाही हटवण्यात त्याच्याच विचारांनी मोठा हातभार लावलेला आहे. पण वाडगा संस्कृतीलाच अर्थकारण समजून बसलेल्यांना चेंबर्स ठाऊकच नव्हता किंवा बोलायचेच नसेल. मग त्याच दिशेने पुढले पाऊल टाकणार्‍या मोदींचा आत्मनिर्भर पॅकेज कळण्याची
शक्यता किती असेल?

तब्बल बारा वर्षापुर्वी या संदर्भात इकॉनॉमिक्स टाईम्सचे संपादक स्वामीनाथन अय्यर यांचा एक खास लेख प्रसिद्ध झाला होता. तेव्हा सत्तेत असलेल्या सोनियाप्रणित युपीए सरकारने सरकारी तिजोरी खुली करून ज्या खिरापत वाटण्याच्या अनेक योजना सुरू केल्या, त्यात अन्न सुरक्षा वा मनरेगा नावाने लाखो कोटी रुपयांची उधळण सुरू झालेली होती. गरीबी हटवण्याच्या गर्जना चालल्या होत्या. पण त्यातून किती गरीबी दुर होते? तत्पुर्वी वाजपेयी सरकारने ज्या पायाभूत योजनांवर पैसा खर्च करण्याचा सपाटा लावला होता. त्यातून किती गरीबी दुर होऊ शकते, त्याची तुलनात्मक आकडेवारी अय्यर यांनी त्या लेखात मांडलेली होती. स्वातंत्र्योत्तर काळात देशामध्ये अशी गरीबाला मदत देण्यावर अफ़ाट रक्कम खर्च करण्यात आली. पण त्यातून किती गरीब त्या गरीबीच्या रेषेतून वर आले? उलट गरीबीऐवजी पायाभूत सुविधांवर झालेल्या खर्चातून किती गरीब सावरले, त्याची तुलना त्यात आढळते. या संपुर्ण कालावधीमध्ये अशा गरीब कल्याणाच्या योजनेत प्रत्येक दहा लाख रुपये खर्चले, तर त्याचा किती गरीबांना लाभ मिळू शकला आहे? प्रत्येक दहा लाख खर्च रुपये शिक्षणाचे अनुदान म्हणून खर्च केल्यावर १०९ लोक गरीबीतून मुक्त होऊ शकले. तर तितकीच रक्कम जलसंधारणावर खर्च केल्याने ६७ लोकांना गरीबीतून मुक्ती मिळू शकली. प्रत्येक दहा लाख रुपयांचा खर्च कर्जमाफ़ीत केल्यावर ४२ जण, वीजदरात सवलत दिल्याने २७ जण आणि खताच्या अनुदानातून फ़क्त २४ जण गरीबीच्या बाहेर पडू शकले. याच्या उलट परिस्थिती
पायाभूत सुविधांनी गरीबांना दिलेल्या लाभाची आहे. प्रत्येक दहा लाख रुपयांचा खर्च रस्ते बांधणीवर झाला, तेव्हा तब्बल ३२५ लोक गरीबीच्या रेषेखालून वर आले. तर संशोधन विकासावर तितकीच रक्कम खर्च झाल्यामुळे ३२३ लोक गरीबीमुक्त व्हायला हातभार लागला. ह्या तुलनेला समजून घेतले पाहिजे. तर आत्मनिर्भर पॅकेजचे आकलन होऊ शकेल.

वर जी उदाहरणे दिलेली आहेत, त्यात दोन प्रकारच्या खर्चाची तुलना आहे. एक खर्च हा थेट सामान्य माणसाला मिळू शकणारा पैसा आहे, किंवा त्याच्या नावावर सरकारी तिजोरीतून काढला जाणारा पैसा आहे. त्याच्या उलट दुसर्‍या गटातला खर्च हा गरीबांच्या नावाने सरकारी तिजोरीतून खर्च झालेला पैसा नाही. ज्याला सरसकट विकासखर्च म्हणता येईल अशा सर्वांगिण विकासाच्या योजनेवर दहा लाख खर्च झाले, तर अधिक लोक गरीबीमुक्त झाले आहेत. त्याच्या उलट जी रक्कम गरीबाच्या नावाने खर्च झालीच नाही, तिने अधिक लोक गरीबीतून मुक्त झालेले आहेत. मग दिर्घकाळ गरीबांच्या नावाने चाललेली खिरापत कशासाठी चालली वा उधळली गेली? आजही तशाच पद्धतीने मोदी सरकारने गरीबांच्या नावाने तिजोरी खुली करण्याचा आग्रह कशासाठी आहे? राहूल गांधींचे पिताजी राजीव गांधी ३५ वर्षापुर्वी म्हणाले होते, शंभर रुपये गरीबांसाठी पाठवले किंवा खर्च केले; तर त्याच्यापर्यंत केवळ १२-१५ रुपये पोहोचतात. त्यातली ८५ टक्के रक्कम मधल्यामध्ये हडपली जाते. आजही तेच चालते. म्हणूनच फ़क्त खताच्या अनुदानाला लगाम लावण्याची पावले मोदी सरकारने उचलली आणि युरीयाची टंचाई संपली. त्याही खर्चातली ६० हजार कोटींची बचत झाली. पायाभूत सुविधांवर किंवा संशोधन विकासावर खर्च केल्यामुळे गरीबी संपते म्हणजे काय? त्यालाच साध्या भाषेत आत्मनिर्भरता म्हणतात. पण वाडगा घेऊन फ़िरण्यालाच गरीबांचे कल्याण ठरवून बसलेल्यांना आत्मनिर्भर शब्दाचे आकलन म्हणूनच होऊ शकणार नाही. कोरोनातून अर्थव्यवस्था बाहेर काढताना मोदी सरकारने आणलेले पॅकेज, ही नुसती उधळपट्टी वा खिरापत नसून विकास, पायाभूत सुविधा यातून गरीबांना सुसह्य जीवनाकडे घेऊन जाण्याची योजना आहेच. पण त्यातून त्यांना रोजगाराची हमी व उत्पन्नाची कायम हमी देणारीही आहे. मनाने परावलंबी व विचारांसाठीही वाडगा घेऊन पाश्चात्य देशात भिक मागणार्‍यांच्या आवाक्यात येणारी ती गोष्ट नाही.

Friday, May 15, 2020

पृथ्वीराज आणि गझनी

Somnath temple history in hindi - YouTube

पत्रकारिता आणि राजकारण हे दोन भिन्न प्रांत आहेत. पत्रकारिता करताना जे समाजाला हितावह व उपकारक आहे, ते बेधडक लिहिण्याची व बोलण्याची मोकळीक असते. कारण त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नसतात. तुमची मते लोकांना आवडणारी नसली तरी फ़रक पडत नाही. त्यामुळे नावडते बोलायची मुभा असते. फ़ार तर ठराविक वाचक तुमच्यावर बहिष्कार घालू शकतो. पण राजकारणात सत्य कितीही हितावह वा उपकारक असले तरी ते राजरोस बोलण्याची मुभा नसते. त्यासाठी खुप आडवळणे घेऊन सत्यकथन करावे लागत असते. विशेषत: जे बहुतांश लोकांना नावडते सत्य असते, ते बोलण्याची सोयच नसते. म्हणूनच त्याला ‘पोलिटीकली करेक्ट’ अशी एक शब्दावली वापरली जात असते. ते सत्य किंवा योग्य नसते, पण बहुतांश लोकांच्या पचनी पडणारे असल्याने तसे बोलणे भाग असते. किंवा मग राजकारणात वावरणार्‍यांना तसे विषय टाळावे लागत असतात. हल्ली आपण माध्यमातून अनेकजण तसे बोलताना लिहीताना ऐकत वाचत असतो. पण जे राजकारणात मुरलेले असतात, ते अशाही परिस्थितीत नावडते सत्य बोलण्याची हिंमत करू शकतात. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना असे धडे कोणी दिलेले नाहीत काय? अन्यथा त्यांनी लॉकडाऊन वा कोरोनाच्या कालखंडात लोकांचा रोष ओढवून घेणारे विधान वा वक्तव्य कशाला केले असते? देशाची अर्थव्यवस्था व एकूण कारभाराची डागडुजी करण्यासाठी देशाच्या विविध मंदिरात वा धर्मसंस्थांपाशी असलेले अब्जावधी रुपये किंमतीचे सोने सरकारने ताब्यात घ्यावे. किमान व्याजावर सक्तीने घ्यावे, अशी मुक्ताफ़ळे त्यांनी का उधळली असती? असे काही बोलताना त्यांनी निदान आपले नाव तरी लक्षात घ्यायला हवे होते आणि त्या नावाचा इतिहास आठवायला हवा होता? की आयडीया ऑफ़ इंडियात वावरताना पृथ्वीराज नावातला इतिहासही विसरला गेला आहे?

२०१४ साली कॉग्रेसचा दारूण पराभव करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले व प्रथमच भाजपाला लोकसभेत स्पष्ट एकपक्षीय बहूमत मिळालेले होते. तेव्हा बहुधा विश्व हिंदू परिषदेने नेते अशोक सिंघल यांनी केलेले एक विधान आठवते. ते म्हणाले होते, बारा-तेराशे वर्षानंतर दिल्लीच्या सत्तेवर हिंदू राजा स्थानापन्न झाला आहे. त्यातून सिंघल काय सांगत वा सुचवू पहात होते? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बहुतांश पंतप्रधान निदान नावावरून तरी हिंदूच असल्याची नोंद आहे. मग पहिला हिंदू राजा वा राष्ट्रप्रमुख अशी मोदींची कहाणी सिंघल कशाला सांगतात? तर तितक्या शतकांत दिल्लीच्या सिंहासनावर विविध सत्ताधीश आरुढ झाले असले तरी ते स्वत:ला हिंदू राजा मानत नव्हते किंवा भिन्न धर्माचे राज्यकर्ते होते. स्वातंत्र्योत्तर काळातले पंतप्रधान व्यक्तीगत धर्माने हिंदू असले तरी ते हिंदू राजा म्हणून मिरवत नव्हते आणि नरेंद्र मोदी आपण हिंदू असल्याचे जगाला अभिमानाने सांगतात. परंतु इतकाच त्याचा संदर्भ होता काय? बिलकुल नाही. जे कोणी हिंदूत्ववादी असतात व आहेत, त्यांच्या भूमिकेनुसार महंमद घोरीने दिल्लीची सत्ता काबीज केल्यापासून खंडप्राय भारतावर परक्यांचे राज्य राहिलेले आहे. तेव्हा पराभूत झालेला वा मारला गेलेला पृथ्वीराज चौहान हा शेवटचा हिंदू राजा होता. त्यामुळेच अभिमानाने आपल्या हिंदूत्वाचा डंका पिटणारा नरेंद्र मोदी हा एकविसाव्या शतकातला हिंदू राज्यकर्ता अवतरला आहे, अशीच धारणा हिंदू धर्माभिमानी लोकांच्या मनातली आहे. त्याचे कारण एकच आहे. आपलीच जन्मभूमी व मातृभूमी असून नेहमी आपल्याच धर्माला अन्याय सहन करावा लागतो, अशी बहुतांश लोकांची धारणा आहे. त्याला चुचकारतच हिंदूत्वाचे राजकारण पुढे आले आहे आणि त्याला अलिकडल्या काळात बहुसंख्य मतदाराकडून प्रतिसाद मिळत असतो. सहाजिकच त्या धारणेला दुखावण्यातून निदान मते गमावली जात असतात, हे नावाने पृथ्वीराज चव्हाण असलेल्या नेत्याला वेगळे समजावण्याची गरज आहे काय?

कुठल्याही  भूमीशी निगडित समाजाच्या आठवणी दिर्घकालीन असतात आणि पिढीजात जपलेल्या जोपासलेल्या असतात. तशीच ही एक अंतर्मनात जपली गेलेली धारणा आहे आणि तिला लाथाडून कोणाला निदान लोकमतावर सत्ता संपादन करणे अशक्य आहे. किंबहूना भाजपा वा नरेंद्र मोदी तीच धारणा चुचकारत इथपर्यंत पोहोचले आहेत. मग अशा काळात त्याच लोकभावनेला दुखावणे म्हणजे लोकमताला सतत लाथाडत रहाणे असते. त्या पद्धतीने पुन्हा कोणीही नेता वा पक्ष सत्तेपर्यंत पोहोचणे अशक्य आहे. हा संदर्भ घेतला, मग पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य कसे राजकीय दृष्टीने त्यांच्याच पक्षाला हानिकारक आहे, ते लक्षात येऊ शकेल. आपल्या या सुपुत्राचे पृथ्वीराज नाव त्यांच्या जन्मदात्यांनी ठेवण्यामागेही वेगळा इतिहास नाही. एक पराक्रमी राजा म्हणूनच जन्मदाते अशी नावे आपल्या संततीला ठेवत असतात. चव्हांणांना त्याचा अंदाजही नाही काय? असेल तर त्यांना आणखी एक इतिहास अशाच मंदिरांच्या संपत्तीचा ठाऊक असायला हरकत नाही. भारतीय इतिहासामध्ये महंमद घोरी जसा सामुहिक मानसिकतेत दबा धरून बसलेला असतो, तसाच गझनीचा महंमदही ठाण मांडून बसला आहे. अन्यथा भारताचा सतत द्वेष करणार्‍या पाकिस्तानने आपल्या क्षेपणास्त्राचे नाव ‘घोरी मिसाईल’ असे कशाला ठेवले असते? त्याची पुर्वकहाणी तीच आहे. तशीच मंदिरातले सोनेनाणे हा विषय नुसता आर्थिक नाही, त्याच्याशी गझनी महंमदाचा इतिहास जोडलेला आहे. म्हणूनच अशा विषयाला हात घालताना अर्थकारण निरूपयोगी असते आणि इतिहास व त्याच्याशी जोडलेल्या भावना अधिक मोलाच्या असतात. गुजरातमध्ये असलेले सोमनाथाचे मंदिर याच गझनीच्या महंमदाने सतरा वेळा लुटले असा इतिहास आहे. त्याने प्रत्येक स्वारीत हे मंदिर लुटले व तिथली देवतेची मुर्ती फ़ोडून उध्वस्त केली. ही गोष्ट दंतकथा नाही. तेव्हा मंदिरातील सोन्याचा विषय काढताना त्याचे जनमानसावर होणारे परिणाम विचारात घ्यावे लागतात. निदान लोकशाहीच्या राजकारणात त्याला प्राधान्य असते.

स्वातंत्र्योत्तर काळात सातत्याने पुढल्या पिढ्यांना सेक्युलर बनवण्यासाठी ह्या इतिहासात फ़ेरफ़ार आणि हेराफ़ेरी करण्यात आलेली आहे. इतिहासाच्या नोंदी व वस्तुस्थितीही सेक्युलर करण्याला पर्याय उरत नाही. गझनीच्या महंमदाने सोमनाथाचे मंदिर लुटले, त्यावर हल्ला केला व मुर्ती फ़ोडल्याचे नाकारता येणार नव्हते. सहाजिकच त्यातल्या धार्मिक वेदना व रोष कमी करण्यासाठी त्याने धर्माचा विरोध म्हणून सोमनाथाची मुर्ती फ़ोडली नाही असा प्रचारी इतिहास मांडला जाऊ लागला. म्हणजे मंदिरावरचा हल्ला वा मुर्ति फ़ोडल्याचा इतिहास वा नोंदी सेक्युलर इतिहासात कायम आहेत. पण त्यातला धार्मिक उद्देश वा हेतू लपवण्यासाठी कसरत करण्यात आलेली आहे. ती कसरत काय आहे? महंमदाने हिंदूंच्या धर्मभावनांना पायदळी तुडवण्यासाठी सोमनाथाची मुर्ति सतरा वेळा फ़ोडली हे सत्य लपवताना ती मुर्ती सोन्यारुप्याची असल्याने लूट म्हणून फ़ोडल्याचा दावा करण्यात आला. पर्यायाने मंदिरातील संपत्ती लुटण्याचा त्याचा उद्देश होता आणि त्याच्या आक्रमण वा स्वारीमागे कुठलाही धार्मिक हेतू नसल्याचे सांगितले गेले. आज तेही सत्य मानले तर स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षांनी पृथ्वीराज नामे कॉग्रेस नेता कसली ‘मोहिम’ हाती घ्यायचे बोलतो आहे? मंदिरातले सोने सरकारने सक्ती करून घेणे व गझनीच्या महंमदाने सोमनाथाची मुर्ति सोन्यासाठी फ़ोडण्यात नेमका काय फ़रक आहे? आपले हे वक्तव्य सामान्य भारतीय हिंदूच्या मनात गझनीच्या आठवणी जागृत करील, इतकेही या माजी मुख्यमंत्र्याला समजू शकत नाही काय? आधीच कॉग्रेस पक्षाची प्रतिमा हिंदूंचा शत्रू अशी झालेली आहे. संपुर्ण उत्तर भारतात कॉग्रेस पक्षाची निवडणूकीत धुळधाण उडालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर कॉग्रेसच्या पृथ्वीराजाने मंदिरातील सोने सक्तीने ताब्यात घेण्याविषयी बोलणे, म्हणजे बुडत्याचा पाय खोलात घेऊन जाणेच नाही काय?

राहुल गांधी यांनी गेल्या दोन लोकसभा निवडणूकीत पक्षाची व घराण्याची आजवरची सर्व पुण्याई मातीत घातली आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी दोन वर्षापुर्वी त्यांना अनेक मंदिरांच्या पायर्‍या झिजवाव्या लागल्या आहेत. त्यात त्याच सोमनाथ मंदिराचाही समावेश आहे. तरीही अजून कॉग्रेस पक्ष मतांच्या बाबतीत गेलेला तोल सावरू शकलेला नाही. पण इतके होऊनही जो काही थोडा मतदार कॉग्रेसपाशी शिल्लक उरला आहे, त्यातला बहुतांश हिंदूच मतदार आहे आणि त्यालाही पक्षापासून पळवून लावण्याची सुपारी पृथ्वीराज चव्हाणांनी घेतलेली आहे काय? कारण मंदिरातले सोने वा दागदागिने फ़क्त सराफ़ा बाजारातील मूल्यवान धातू नसतात. घरातले सोने वा हिरेमोती विकावू असतात. मंदिरातले भक्तांनी देवाला अर्पण केलेले सोने दागिने अमूल्य असतात. त्याच्याकडे बाजारू दृष्टीने बघणारा माणूस भक्त श्रद्धाळूंच्या भावना  तुडवित असतो. अकारण त्या लाखो करोडो लोकांच्या रोषाला पात्र होत असतो. इतकेही या कॉग्रेस नेत्याला समजू शकत नाही काय? इथे तर नुसती मंदिरातील संपत्ती म्हणजे भक्तांचा ठेवा नाही, तर इतिहासाची सुप्त जखम आहे. ती नव्या पिढीच्या विस्मरणात गेलेली असेल तर पृथ्वीराज त्या जखमेवरची यातून खपलीच काढत असतात ना? कारण चव्हाणांच्या असल्या बोचर्‍या विधानांनी लोकांच्या मनातचा प्रक्षोभ होतो. त्यांच्याकडून दिल्लीच्या त्या पृथ्वीराजाचा अपमानास्पद अंत आणि गझनीच्या सोमनाथ लुटमारीला उजाळा दिला जाणे स्वाभाविक आहे. हे एकविसाव्या शतकातील पृथ्वीराज चव्हाणांना कळत नसेल तर ते लोकशाहीत राजकारण करायला अपात्र आहेत. कारण त्यांनी अशा एका वक्तव्यातून काही लाख वा कोटी हिंदूंची मते पक्षाच्या खात्यातून गमावली आहेत. त्याची नेमकी काय गरज होती, त्याचाही उलगडा होत नाही. त्यांचा पक्ष सत्तेत नाही आणि देशाच्या अर्थकारणासाठी कसा व कुठून पैसा उभारावा, ही त्यांची पक्षीय विवंचनाही असू शकत नाही. मग अशी वक्तव्ये कशासाठी? फ़क्त हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी? बहुसंख्य हिंदूंना विचलीत करण्यासाठी?

Wednesday, May 13, 2020

ना समझे वो अनाडी है



मागल्या जवळपास पन्नास दिवसांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे आणि पहिल्या दिवसापासून जे लोक गरीबातल्या गरीबाच्या नावाने हातात वाडगा घेऊन पॅकेजची मागणी करीत होते, त्यांना २० लाख कोटीचे पॅकेजही समाधानी करू शकलेले नाही. याचा अर्थ सहज लक्षात येऊ शकतो. किंबहूना मागल्या सहा वर्षापासून ही मंडळी कायम रडगाणेच गात बसलेले आहेत. त्यांच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मोदींना देता आलेले नाही, किंवा शंकांचे निराकरण करता आलेले नाही. याचे कारण मोदींपाशी वा सरकारकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत असा अजिबात नाही. ज्यांना समाधान करूनच घ्यायचे नसते, त्यांच्यासाठी कुठल्याही प्रश्नांचे उत्तर नसते आणि असले तरी त्यांचे समाधान होऊ शकत नसते. कारण त्यांना उत्तर वा समाधानाशी कर्तव्यच नसते. त्यांना फ़क्त तक्रारी करायच्या असतात आणि जे उपाय योजले जातात, त्यातले लाभ बघण्यापेक्षाही त्रुटीच शोधायच्या असतात. म्हणून तर तब्बल वीस लाख कोटींचे पॅकेज पंतप्रधानांनी मंगळवारी जाहिर केल्यानंतरही अशा रडतराऊतांचा आक्रोश संपलेला नाही. त्यातही बराच काळ अर्थमंत्री म्हणून काम केलेल्या चिदंबरम यांचे रडणे आता अतिशय हास्यास्पद बनुन गेलेले आहे. मोदी सरकारच्या इतक्या मोठ्या पॅकेजवरची चिदंबरम यांची प्रतिक्रीया त्यांच्या अनाडीपणाची साक्ष मानावी लागेल. ते म्हणतात, ‘हे पॅकेज म्हणजे हेडलाईन व कोरे पान असे आहे.’ आपल्या परदेशी शिक्षणाचा सतत डंका पिटणारे असे लोक, तिथली तरी वर्तमानपत्रे कधी वाचत होते किंवा नाही, याची शंका येते. कारण पाश्चात्य वृत्तपत्रातही पहिले पान फ़क्त बटबटीत हेडलाईन्सने व्यापलेले असते आणि बाकीचा मजकूर आतल्या पानातच पसरलेला असतो. त्यासाठी वर्तमानपत्र उघडावे लागते आणि पहिल्याच पानावरची हेडलाईन वाचून प्रतिक्रीया व्यक्त करायची नसते. पंतप्रधानांनी मंगळवारी पॅकेजची रक्कम जाहिर केली व अर्थमंत्री सविस्तर तपशील नंतर सांगतील असेही सांगितले होते. पण चिदंबरम यांनी हेडलाईन वाचून प्रतिक्रीया देऊन टाकली.

ही प्रतिक्रीया ऐकल्यावर चिदंबरम यांच्या अकलेची कींव करावीशी वाटली. कारण अनेक वर्षे देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनीही अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि त्यासाठी प्रदीर्घ भाषणेही संसदेत केलेली आहेत. त्यातली गोळाबेरीज ऐकूनच कोणी प्रतिक्रीया दिल्या असत्या, तर त्यांना कसे वाटले असते? अर्थात त्यांनी लोकसभेच्या निवडणूक प्रचारात ‘न्याय’ नावाच्या राहुल गांधी यांच्या क्रांतीकारी पॅकेजचे ढोल पिटलेले होते. त्यातच चिदंबरम यांच्या आर्थिक बुद्धीचा पुरावा मिळालेला होता. कुठलेही काम केल्याशिवाय देशातल्या पाच कोटी कुटुंबांना दरवर्षी थेट ७२ हजार रुपये खात्यात जमा करण्याची ती अतिशय प्रगल्भ विकास योजना राहुलनी मांडलेली होती.  मनमोहन सिंग यांच्यासह चिदंबरम यांनीही तिचे कौतुक केलेले होते. पण त्यासाठीचे लाखो कोटी रुपये सरकारी तिजोरीत कुठून आणायचे, त्याचा खुलासा त्यांनी कधीच दिलेला नव्हता. तेव्हा चिदंबरम यांनी राहुलनी सादर केलेली हेडलाईन ऐकून खालचे कोरे करकरीत पान धडधडा वाचलेले होते. त्यातला न छापलेला मजकूरही त्यांना चष्मा न लावताही वाचता येत होता. मात्र आज त्यांना अर्थमंत्र्यांकडून तपशील वा मजूर येईपर्यंत प्रतिक्षा करता आली नाही. कॉग्रेसचा बट्ट्याबोळ कशाला झाला आणि राहुलचे ७२ हजार रुपये मतदाराने नाकारून मोदी सरकारला भरभरून मते का दिली; त्याचा खुलासा चिदंबरम यांच्या ताज्या वक्तव्याने झालेला आहे. त्याचे सरळ कारण त्यांच्यासह राहुल नाट्य मंडळीचा पुरता भ्रमनिरास झालेला आहे. कारण मोदी इतके धाडसी पाऊल टाकून २० लाखाचे पॅकेज जाहिर करतील, असे त्यांना स्वप्नातही वाटलेले नव्हते. मंगळवार उजाडण्यापर्यंत अशा लोकांनी सातत्याने अमूक घटकाला पॅकेज द्या, तमूकाला तितके पॅकेज देण्याच्या मागण्या चालविल्या होत्या. त्यासाठी नोबेल विजेते अभिजित बानर्जी, रिझर्व्ह बॅन्केचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, इत्यादिकांही गप्पागोष्टीही केल्या होत्या.

त्यांचे टुमणे एकच होते, गरीबांच्या खात्यात काही हजार रुपये भरून टाका. खिरापत वाटणे सुरू करा. थोडक्यात त्यांची मतदाराने नाकारलेली ‘न्याय’ योजना मोदींनी कोरोनासाठी अंमलात आणाव; अशी मागणी होती. पण मोदी सरकारने त्यांच्या अपेक्षेलाही मागे टाकून थक्क करून सोडणारे पॅकेज जाहिर केले आहे. त्यांना वाटले होते, मोदी दोनपाच लाख कोटीच्या पुढे झेप घेऊ शकणार नाहीत. पण मोदींनी त्यांच्या अपेक्षेच्या वा मागणीच्या चौपटीने मोठ्या रकमेचे पॅकेज घोषित करुन टाकले आहे. मात्र ती खिरापत नाही, हे अशा दिवाळखोर अर्थशास्त्रींचे दुखणे आहे. त्यांना आत्मनिर्भर वा तत्सम गोष्टी कधी कळणारही नाहीत. जनतेला स्वयंभू करणे व स्वावलंबी बनवण्यातून विकासाची दिशा शोधणे, त्यांच्या डोक्यात येऊ शकणार नाही. त्यापेक्षा लोकांना कायम आशाळभूत ठेवून अनुदान व त्यासाठी वाडगा हातात घेऊन उभे ठेवणे, याला असे लोक अर्थशास्त्र वा अर्थकारण समजतात. हे वीस लाखांचे पॅकेज देताना त्याची व्याप्ती मोदींनी सविस्तर कथन केलेली आहे. त्यात त्यांनी जमिन. रोखीची रक्कम, मजुरी व कायदे यांच्या दिशेने जात नवी अर्थव्यवस्था उभारण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यासाठी खर्च होणारी इतकी अफ़ाट रक्कम गरीबाला चुल पेटवण्यास मदत म्हणून असणार आहे. पण त्यातही ती गुंतवणूक असणार आहे. त्यात आडवे येणारे कायदे व नियम धोरणांना बाजूला करून वाटचाल करावी लागेल, अशी भूमिका मोदींच्या भाषणातून आलेली आहे. गरीबाला आपल्या पायावर उभे करणे व त्यासाठी विविध उद्योग व्यापारात रोजगार संधी निर्माण करण्याला प्रोत्साहन देणे; असे या पॅकेजचे स्वरूप आहे. त्याचवेळी कोरोनामुळे जगाची व्यवस्था उध्वस्त झालेली असताना तिच्या नव्या रचनेत भारताचे स्थान निर्माण करण्यालाही प्राधान्य आहे. लोकल व ग्लोबल असे मोदींच्या भाषणातले शब्दच चिदंबरम यांना समजलेले नाहीत. किंबहूना त्यातही जागतिक व्यवहारात उत्पादन, पुरवठा व त्यातला दुवा होण्याची मनिषा ज्याला कळली नाही, त्याला अर्थशास्त्रातले काय कळते, असा प्रश्न पडतो.

अजून लॉकडाऊन सुरू आहे आणि तो उठण्यापुर्वीच पश्चीम भारतातील विकसित प्रगत राज्यातून कष्टकरी लोंढे उत्तर पुर्वेकडील मागास राज्यांकडे धावत सुटलेले आहेत. त्याच्या दुर्दैवाला पारावार उरलेला नाही. ती परिस्थिती त्यांच्यावर आज आली, तरी त्याला मुख्यत: कोरोना जबाबदार नाही. चिदंबरम ज्याचे गुणगान नित्यनेमाने करतात. त्या विषम अर्थकारण वा आर्थिक विकासाने तशी परिस्थिती उभारून ठेवली होती. तिच्यावर कोरोनाचा फ़क्त बोजा पडला आणि दहापंधरा कोटी असे स्थलांतरीत मजूर उध्वस्त होऊन गेलेले आहेत. आता जन्मगावी व पुर्वेच्या उत्तरेच्या राज्यात परतलेले हे मजूर नजिकच्या काळात माघारी पश्चीमेच्या राज्यात येण्याची शक्यता नाही. जिथे पोहोचले आहेत, तिथे त्या अर्धकुशल अकुशल कष्टकर्‍यांना रोजगार मिळाल्यास आपापल्या राज्यात ते स्थायीक होऊ शकतात. तर नव्या पॅकेजमध्ये त्यासाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यातून त्यांना नजिकच्या काळात रोजगार उपलब्ध होऊ शकेल आणि दिर्घकालीन अर्थकारणात त्या मागास राज्यात नव्याने उद्योग व्यापार उभारले जाऊन, त्यांच्यासाठी तिथेच रोजगार उभा राहू शकेल. नेमक्या शब्दात सांगायचे तर चीनमधून मोठ्या प्रमाणात पाश्चात्य गुंतवणूकदार व उत्पादक कंपन्या बाहेर पडत असून, त्यांना नजिकच्या देशात आश्रय हवा आहे. त्यासाठी जागा जमिन संधी व कष्टकरी उपलब्ध असलेल्या स्थानी पोहोचायचे आहे. ती संधी त्यांना महाराष्ट्र, गुजरात किंवा तामिळनाडू वा कर्नाटकपेक्षा उत्तरी राज्यात मिळू शकते. ह्या मागास राज्यात जमिन व परतलेला कष्टकरी मोठ्या संख्येने आता उपलब्ध होणार आहे. तिथेच गुंतवणूकदार आल्यास त्यांना सोयीस्कर असे कायदे व धोरणांची सुरूवातही झालेली आहे. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशने अनेक कायदे सध्या स्थगीत केले असून, गुंतवणूक व व्यापाराला पोषक अशी भूमिका आधीच जाहीर केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्या पॅकेजचे आशय शोधण्याची गरजा आहे.

कर्नाटक, गुजरात व उत्तरेतील बिहार उत्तरप्रदेश या राज्यांनी आपल्या अधिकारात अनेक कायदे शिथील केलेले आहेत. ज्यामुळे नवे उद्योग उभे करणे वा व्यवहार चालवणे नोकरशाही जाचक करून टाकते, त्याला या राज्यांनी लगाम लावण्याचा पवित्रा पॅकेज येण्यापुर्वीच घेतलेला आहे. त्याचा अर्थच या अर्थशास्त्र्यांना लागलेला नाही. लागला असेल तर त्याकडे जाणिवपुर्वक काणाडोळा केला जात असावा. ही तयारी चिनी उद्योग क्षेत्रातून बाहेर पडणार्‍या गुंतवणूकदार व कंपन्यांसाठी पायघड्या घालण्याची सज्जता आहे. आजवर मागल्या तीन दशकात चीनमध्ये जगाची गुंतवणूक येत गेली आणि तितकीच कुशल अर्धकुशल लोकसंख्या असूनही भारतात त्या कंपन्या आलेल्या नाहीत, याचे प्रमुख कारण इथले जाचक कायदे व सतावणारी नोकरशाही असेच आहे. त्यापेक्षा चीनने व्यापार उद्योगाला पोषक अशी स्थिती तयार करताना असल्या जाचक गोष्टी गुंडाळून ठेवल्या. जगभरच्या ४५ टक्के उत्पादनाची मक्तेदारी आपल्याकडे घेतली. अगदी अनेक भारतीय कंपन्याही आपला कारभार चीनमध्ये घेऊन गेलेल्या आहेत आणि त्यांनीही आता माघारी येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जोडीला कोरोनाचा दगाफ़टका सोसलेल्या विविध प्रगत देशांच्या कंपन्या व गुंतवणूकदार नजिकच्या देशात आश्रय शोधत आहेत. त्यांना भारतीय भूमीइतकी सुखावह जागा असू शकत नाही. अडचण जाचक कायदे व धोरणांची होती. ती हटवली तर चिनच्या उत्पादनाचा मोठा हिस्सा भारतात सहज येणार आहे आणि त्याला पोषक स्थिती ही उत्तरेची राज्य आधीच करायला लागली आहेत. त्यालाच पुरक अशी स्थिती कोरोनाच्या स्थलांतरीत मजूरांनी निर्माण केली आहे. त्यावरचा दुहेरी उपाय म्हणून हे अफ़ाट रकमेचे पॅकेज आणले गेले आहे. ती खिरापत नसून अनुदान भासणारी दिर्घकालीन गुंतवणूक आहे. पण कालबाह्य झालेल्या अर्थकारणात व निकषात गुंतून पडलेल्यांना त्यातला आशय कसा समजू शकेल? राजकपूरच्या त्या गीताच्या शब्दात सांगायचे तर.

समझने वाले समझ गये है,
ना समझे वि अनाडी है

Monday, May 11, 2020

मुंबई हाताबाहेर जातेय

 Migrant workers evacuation: Workers' exodus spells chaos, strains ...

गेल्या आठवड्यात मुंबईचे पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांना तडकाफ़डकी बाजूला करून त्यांच्या जागी इक्बालसिंग चहल या अधिकार्‍याला आणून बसवण्यात आले. याचा अर्थ लॉकडाऊनच्या सहा आठवड्यात मुंबईची जी स्थिती झाली, त्याला जबाबदार धरून परदेशी यांना शिक्षा फ़र्मावण्यात आली, असेच मानावे लागते. पण ही स्थिती हाताबाहेर गेलेली असेल तर इतके दिवस त्यांच्यावर कोणी देखरेख ठेवत नव्हता काय? सरकार म्हणून काम करणारे स्थिती इतकी आवाक्याबाहेर जाण्यापर्यंत प्रतिक्षा करीत होते, असेच मानावे काय? कारण ऐन संकटात वा युद्धात असताना नेतृत्व बदलणे योग्य नसते आणि त्यामुळे खरोखर संकटाशी झुंजणार्‍या निम्नस्तरीय कर्मचारी अधिकार्‍यांचा धीर सुटत असतो. याचे एक कारण म्हणजे सायन इस्पितळात एका मृत रुग्णाच्या बाजूलाच दुसर्‍या रुग्णावर चाललेल्या उपचाराचा व्हायरल झालेला व्हिडीओ आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. यात पहिली गोष्ट म्हणजे संबंधित व्हिडीओ एका आमदारानेच आपल्या सोशल मीडिया खात्यावर टाकल्याने गाजावाजा झाला. पण तो बनवणार्‍याचीही मुलाखत आलेली आहे. त्याने आपल्याला हे व्हायरल करायचे नव्हते असेही म्हटले आहे. पण लक्ष वेधण्यासाठी व तात्काळ सुधारणा होण्यासाठी काही निवडक लोकांना तो पाठवण्यात आला. तरीही काही हालचाल झाली नव्हती, असा खुलासा त्याने केला आहे. म्हणजेच व्हिडीओ बनवणार्‍याच्या हेतूविषयी शंका घेता येत नाही. पण तेवढ्याच कारणासाठी इतकी मोठी कारवाई वा बदली होणेही योग्य वाटत नाही. कारण हा विषय दोन सनदी अधिकार्‍यांपुरता मर्यादित नसून, जगाला भेडसावणार्‍या संकटकाळातील एक गंभीर विषय आहे. त्यावर नेहमीप्रमाणे बदल्या करून वा हात झटकून परिणाम साधला जाऊ शकत नसतो. परिणाम म्हणजे कोरोनाला पायबंद घालण्यातले यश असते. त्याचे भान संबंधितांना आहे काय? असते तर पहिल्यापासून अतिशय काटेकोर कारभार होऊ शकला असता व परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकली नसती.

सत्ता राबवणार्‍यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची असते. कितीही कठोर टिकेचे प्रहार होत असतात, तेव्हाही डोके शांत ठेवून परिस्थितीचा ‘सामना’ करावा लागतो. प्रामुख्याने जेव्हा स्थिती युद्धजन्य असते, तेव्हा तर अत्यंत थंड डोक्याने निर्णय घ्यावे लागतात आणि कठोर अंमलबजावणीला प्राधान्य द्यावे लागते. त्यात कोणाही आपल्या परक्याने खोडसाळपणा केला, तर त्यावर तात्काळ आघात करून शिस्तीला महत्व द्यायचे असते. ते पहिल्यापासून झाले असते व होताना दिसले असते, तर अशी हातघाईची वेळ आली नसती. ज्या दिवशी गृहसचिवांनी वाढवान कुटुंबाला घरचे मित्र म्हणून पळून जायला मदत केली आणि त्यात पोलिस यंत्रणेचाही गैरवापर होऊ दिला, तिथेच कारवाईचा बडगा उगारला जायला हवा होता. त्यांना रजेवर पाठवून पांघरूण घातले गेले आणि त्यावेळी गृहमंत्री राजकारण करू नका म्हणून सारवासारव करीत राहिले. तो चुकीचा संदेश होता आणि आहे. त्यानंतरच अशा शासकीय बेशिस्तीची व हलगर्जीपणाची साखळी सुरू झालेली होती. आपण कसे उत्तम कारभारी आहोत आणि केंद्रातील मोदी सरकार कसे नालायक आहे, ते सिद्ध करण्यात महाराष्ट्राचे गृहमंत्री गुंतलेले होते. अन्यथा आपल्या गृहसचिवावर देखरेख ठेवण्याऐवजी त्यांनी दिल्लीत तबलिगच्या मर्कझला परवानगी कशी देण्यात आली; असले प्रश्न विचारण्यात वेळ घालवला नसता. राजकारण वा बेशिस्त तिथून सुरू होत असते आणि हळुहळू कारभाराचे गांभिर्य संपून सर्वच अधिकारी व सत्ताधारी परिस्थिती विसरून वागू लागतात. फ़क्त वाढवान हाच विषय नव्हता. रिपब्लिक वाहिनीच्या संपादकावर अवेळी अपरात्री दोघांनी हल्ला केला आणि त्यांना लॉकडाऊनच्या काळात तिथपर्यंत येण्यासाठी परवानगीही मिळू शकली होती. त्याला कोणीही जबाबदार नव्हते का? लाखो नागरिकांसाठी मुंबई बंद होती. पण काही पक्ष कार्यकर्त्यांसाठी तेव्हाही राजकीय साहस करण्याची संपुर्ण मोकळीक होती ना?

आजही लॉकडाऊन आहे आणि हजारोच्या संख्येने स्थलांतरीत मजूर आपले सामान कुटुंब घेऊन मैलोगणती दुर आपल्या राज्यात जायला निघालेले आहेत. कोणी आपली मालकीची रिक्षा घेऊन निघाला आहे, तर कोणी भरपूर भाडे मोजून ट्रक वा अन्य वहानातून प्रवासाला निघालेले आहेत. त्यांना रोखण्याची कुवत वा हिंमत पोलिस गमावून बसले आहेत. ह्याला कारभार म्हणायचे असेल तर आनंद आहे. नाशिकला घाटामध्ये अशा वहानांची गर्दी झालेली वाहिन्या दाखवत आहेत आणि काही जागी अपघातही झालेले आहेत. त्याचे कारण लोकांचा धीर सुटला हे सत्यच आहे. पण तरीही वर्दीतल्या पोलिसाचे वा निर्बंधांचे भयसुद्धा संपलेले आहे. ते फ़क्त पोलिस थकल्याने संपले असे नक्कीच म्हणता येणार नाही. एका जागी ढिलाई झाली व दाखवली गेली; मग दुसर्‍या ठिकाणी कंटाळलेले लोक कायद्याला जुमानत नाहीत. पण त्याची सुरूवात मग वाढवान वा अर्णबवरच्या हल्यापासून सुरू होते, याचा विसर पडून चालणार नाही. असा शिस्तभंग कशामुळे होतो? तर इतकी मोठी हल्ल्याची घटना होते आणि त्यातला पिडीत म्हणून अर्णबची साधी तक्रार नोंदवून घेतानाही राजकारण खेळले गेले व टाळाटाळ झाली. त्यातूनच कारभाराची सुत्रे हातून निसटत असतात. कारण वाढवान यांना मोकळीक देणार्‍याला रजेवर पाठवून सारवासारव झाली आणि अर्णबची जबानी बारातेरा तास चालू होती. मुंबईत कडेकोट लॉकडाऊन सुरू असताना ज्येष्ठ वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांना अशा राजकीय हेतूने प्रेरीत तक्रारीची जबानी घेण्यासाठी इतकी सवड असू शकते का? मग त्यांचा प्राधान्यक्रम सामान्य माणसालाही कळतो. आजही पोलिस व शासन यंत्रणा राजकीय हेतूने चाललेली असून, आपणही कायद्याचे काटेकोर पालन करण्याची काही गरज नाही; असे सामान्य माणसाला वाटले तर नवल कुठले? कधी याचा विचार तरी झाला आहे काय? परिस्थितीचे गांभिर्य व संकटकालीन जाणिवा, प्रशासक वा सत्ताधारीच कृतीतून दाखवणार नसतील, तर लोकांनी अनुकरण कोणाचे करायचे?

सत्ता कोणाच्या हातात वा पक्षाकडे आहे त्याला किंचीतही महत्व नाही. होणार्‍या परिणामांचे खापर शेवटी सत्तेत बसलेल्यांच्या माथी फ़ुटणार असते. तेव्हा राजकीय दोषारोप तुम्हाला वाचवू शकत नाहीत. एका वाहिनीच्या चर्चेत अर्णब काही बोलला असेल, तर त्यावर देशाच्या कानाकोपर्‍यात दोनशेच्या वर तक्रारी पोलिसात नोंदवणारे नेमके काय करीत असतात? अशा तक्रारीची तात्काळ दखल घेऊन बारातेरा तासाची जबानी घेण्यात गुंतून पडलेली पोलिस यंत्रणाही कोणता संदेश सामान्य लोकांना देत असते? तर कोरोना वा लॉकडाऊन दुय्यम असून राजकीय हेवेदावे व भांडणे प्राधान्याचा विषय आहे. हे एका खात्यात वा विभागात होत असेल व खपवून घेतले जात असेल, तर बाकी खात्यात व शासकीय विभागात त्याचेच अनुकरण सुरू होत असते. मग महापालिका रुग्णालये वा आरोग्य विभागातील डॉक्टर्स वा कर्मचारी थोडेफ़ार सैल वागले तर नवल कसले? निदान ही मंडळी अपुरी साधने व उपकरणांनी काम करीत आहेत. अधिक तास कामे करून थकूनभागून गेलेली आहेत. सायन वा अन्य इस्पितळात काही चुकीचा प्रकार घडला असेल व गफ़लत झालेली असेल, तरी समजू शकते. त्यांच्यावर बेफ़िकीर व्यवहार केल्याचा सरसकट आरोप गैरलागू आहे. कारण परिस्थितीच इतकी नाजूक आहे, की एका जागी तोल संभाळताना दुसरीकडला तोल जातच असतो. त्याचे खापर आयुक्तावर फ़ोडून वा डीनला बाजूला करून भागणार नाही. त्यांच्या पाठीशी वरीष्ठ वा सत्ताधार्‍यांनी उभे राहून त्यांचा कान पकडला पाहिजे. पण अपमानित व्हायची पाळी कुठल्याही प्रशासनिक अधिकारी वा व्यक्तीवर आज येणे योग्य नाही. कारण त्या यंत्रणेकडून ही लढाई लढवली जात असून, त्यातल्या प्रत्येक व्यक्तीचे मनोधैर्य शाबूत राखण्याला महत्व आहे. एकाला बाजूला करून दुसर्‍याला आणल्याने पदाची भरती होते, पण अनुभवाचे व कामाच्या आवाक्याचे महत्व त्याहीपेक्षा मोठे असते. 

आजच्या घडीला राज्य सरकारच्या अनेक वरीष्ठ अनुभवी सनदी अधिकार्‍यांना तसे काम उरलेले नाही. सरकारची दोनचार महत्वाची खाती वगळता अन्य कारभार ठप्प आहे. तशा अधिकार्‍यांना महत्वाच्या खात्याच्या जादा जबाबदार्‍या सोपवूनही त्यावर पर्याय काढला जाऊ शकतो. आयुक्त वा अन्य बाबतीत तशा ज्येष्ठ  जोडीदारांची नेमणूक करून कामाचा बोजा हलका करता येऊ शकतो. ज्या खात्यांचे काम लॉकडाऊन व कोरोनामुळे वाढलेले आहे, त्या खात्यात हंगामी काही इतर खात्याचे अधिकारी आणुन ती कसर भरून काढली जाऊ शकते. आजवर त्याच खात्यात काम करून अन्यत्र बदली झालेल्यांना, अशा जागी आणुन त्यांच्या जुन्या अनुभवाचाही फ़ायदा घेणे अशक्य नाही व नव्हते. किंबहूना त्यामुळे कामाची वाटणी करून असलेले अधिकारी व यंत्रणा अधिक प्रभावाने वापरता आली असती. पण त्यासाठीचा विचार झाला नाही आणि राजकीय कुरघोडीलाच प्राधान्य मिळत राहिले. त्याचे दुष्परिणाम समोर आल्यावर धावपळ सुरू झालेली आहे. कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी आपापल्या खात्यात अपुर्‍या साधनांनिशी अधिक जबाबदार्‍या पेलून दाखवीत आहेत. मोठी आधुनिक इस्पितळे कोसळली असताना दुबळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिकचा बोजा पेलून वाटचाल करीत आहे. मग त्यांचे सुत्रधार मानली जाते ती नोकरशाही इतकी निराशाजनक कामगिरी कशाला करते, हा विचारण्यासारखा प्रश्न आहे. नोकरशाहीला दिशा देण्यात नेतृत्व कमी पडले, की प्रशासनावर मांड ठोकण्यात राजकीय नेतॄत्व तोकडे पडते; याचा शोध घेण्याची गरज आहे. नुसते कोणाला बदलून वा रजेवर पाठवून परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा करता येणार नाही. युध्दपातळीवर काम करण्याची जबाबदारी असून सैनिक व सेनापतींच्या एकदिलाने काम करण्यातूनच ते साध्य होऊ शकणार आहे. कारण मुंबई दिवसेदिवस हाताबाहेर चालली आहे. तोल तेव्हाच संभाळायचा असतो, जेव्हा तोल जात असतो. हे प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या महाआघाडीच्या सुत्रधार वा रिमोट कंट्रोल असलेल्या शरद पवारांना हे सत्य अन्य कोणी समजावण्याची आवश्यकता आहे काय?

Saturday, May 9, 2020

देशाला धोका कोणापासून?

The Place of Abraham Lincoln in History - The Atlantic

सध्या पाकव्याप्त काश्मिरची भूमी भारत कधी परत घेणार, असा एक विचार अनेकांच्या मनात घोळतो आहे आणि त्याचवेळी भारतीय काश्मिरात होणार्‍या घातपात व जिहादी हिंसाचाराने अनेकांना व्यथीत केले आहे. सहाजिकच आपण असे हतबल का आणि अमेरिका वा इस्त्रायल यासारखे देश इतके स्वयंभू कशाला, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्याचे कारण सोपे आहे. उपरोक्त दोन्ही देश खरेच स्वयंभू आहेत आणि त्यांना राष्ट्रप्रेम व राष्ट्रवाद ही निरूपयोगी बाब वाटत नाही. उलट भारतात आता तेच दोन शब्द हास्यास्पद मानण्याला बुद्धीवाद समजले जाते. त्यापैकी इस्रायल तर इवला देश असून त्याला चहूबाजूंनी शत्रू देशांनीच घेरलेले आहे आणि कायम युद्धस्थितीतच जगावे लागलेले आहे. पण भारताप्रमाणे त्याला कोणी स्वातंत्र्य आंदण दिलेले नाही. खरोखरीचे रक्त सांडूनच देशाची स्थापना करावी लागलेली आहे. मागली सात दशके सातत्याने रक्त सांडूनच त्याचे अस्तित्व टिकवावे लागले आहे. त्याच्या तुलनेत भारताची भूमी खंडप्राय व लोकसंख्या अफ़ाट असली, तरी देशासाठी व अस्तित्वाला आवश्यक असलेला अभिमान ही गोष्ट आपण काहीसे विसरून गेलो आहोत. पॅलेस्टाईन व हिंदूस्तान यांची दोनतीन वर्षाच्या फ़रकाने फ़ाळणी झाली आणि ब्रिटीश दोन्हीकडून सत्ता सोडून गेले. त्याचे परिणाम हिंदूस्तानला जसे भोगावे लागले, तसेच पॅलेस्टाईनलाही भोगावे लागले. कारण दोन्हीकडे फ़ाळणीचा वरवंटा सारखाच फ़िरलेला होता. हिंदूस्तानची फ़ाळणी निदान दाखवायला अधिकृत होती. पण पॅलेस्टाईनची फ़ाळणी अरब आणि ज्य़ु यांच्या तुंबळ लढाईने झाली आणि आजही अनेक अरब देशांनी इस्रायलचे अस्तित्व मान्य केलेले नाही. आपण शस्त्रबळाने इस्रायल नामशेष करू, अशी त्यांची भूमिका होती आणि अजूनही ती मागे घेण्यात आलेली नाही. त्यामुळे देश समाज व राष्ट्र म्हणून टिकून रहायचे, तर कायम युद्धसज्ज रहाणे ह्यालाच इस्त्रायलचा कारभार असे मानले जाते. परिणामी हल्ला झाला किंवा नुसती तशी शक्यता वाटली; तरी इस्रायलच्या फ़ौजा थेट शेजारी अरब देशांवर हल्ले करून त्यांना नामोहरम करीत असतात. उलट तशीच परिस्थिती असून भारत मात्र शेजारी पाकिस्तान ह्या विभक्त देशाकडून होणार्‍या हल्ल्यांना फ़क्त उत्तर देतो किंवा त्यावरून वाताघाटी करीत असतो. हा भयंकर फ़रक आहे व त्याची किंमत सैनिकांचे नागरिकांचे रक्त सांडून मोजावी लागत असते. मग भारत इस्रायलप्रमाणे आधीच हल्ला करून पाकला नामोहरम कशाला करीत नाही? मागल्या दोनतीन पिढ्यातील भारतीयांना सतावणारा असा हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर इतिहासापेक्षाही भारतीय भूमिकेत व राजकीय विचारधारेत सामावलेले आहे.

तब्बल १८२ वर्षापुर्वी म्हणजे १८३८ साली अब्राहम लिन्कन यांनी इलिनॉय राज्यातील स्प्रिंगफ़िल्ड येथील विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना अमेरिकेचा शेवट कुठल्या आव्हानातून होऊ शकेल, यावर केलेले भाष्य प्रसिद्ध आहे. ते नंतरच्या काळात अमेरिकेचे अध्यक्षही झाले. कदाचित आजच्या उदारमतवादी अमेरिकनांनाही ते आठवत नसावे. अन्यथा तो जगातला महाशक्ती म्हणून गणला जाणारा देश कोरोनाने इतका हतबुद्ध झालेला दिसला नसता, किंवा चीनला नुसत्या पोकळ धमक्या देतांना बघायला मिळाला नसता. त्यापेक्षा भारताची परिस्थिती अजिबात वेगळी नाही. कारण कोणालाच लिन्कन यांच्या शब्दांचे स्मरण राहिलेले नाही, किंवा त्यातला स्वतंत्र राष्ट्रांना दिलेल्या उपदेशातला आशय लक्षात राहिलेला नाही. लिन्कन म्हणाले होते, ‘अमेरिकेला कुठून धोका संभवतो? युरोप, आफ़्रिका व आशियाच्या सर्व सेना एकत्रित होऊन नेपोलियन बोनापार्ट सारख्या कर्तबगार सेनापतीच्या नेतृत्वाखाली चाल करीत आल्या. त्यांच्या पाठीशी पृथ्वीतलावरची सर्व साधनसामग्री असली आणि त्यांनी अटलांटीक महासागर ओलांडला; तरी त्यांना हजारो वर्षे लढूनही ओहायो नदीतले घोटभर पाणीही पिता येणार नाही. कारण आपण स्वातंत्र्यप्रेमी स्वयंभू समाज व राष्ट्र आहोत. मग आपल्यावर तशी पाळी कधी व कुठून येऊ शकते? आपला पराभव किंवा विनाश आपल्यालाच ओढवून आणावा लागेल. आपला शत्रू आपल्यातूनच जन्मावा लागेल. स्वतंत्र माणसांच्या समाजाचा विनाश त्याच्यापैकीच लोक घडवून आणत असतात. त्यांना बाहेरचा कोणी कधी संपवू शकत नाही, त्यांचा पराभव करू शकत नाही.’ हे शब्द लिन्कन यांनी नवजात राष्ट्रातल्या अमेरिकनांसाठी बोलले असले तरी ते कुठल्याही स्वतंत्र समाज व राष्ट्रासाठी तंतोतंत लागू होतात आणि आजची हतबल अमेरिका त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. कारण इतकी परावलंबी अमेरिका तिथल्याच उदारमतवादी अमेरिकन राजकीय नेत्यांनी व धोरणांनी बनवलेली आहे. भारताची परिस्थिती वेगळी कशी असेल?

आपल्याला प्रश्न पडतो, इवला इस्रायल पाच बलदंड अरब राष्ट्रांना पुरून उरतो आणि एकदा आवेशात आला, मग त्यांना नामोहरम करूनच थांबतो. इस्रायली हल्ले इतके भेदक असतात, की पुढली दोनचार वर्षे तो शेजारी अरब देश पुन्हा कुरापत काढण्याची हिंमतही करीत नाही. मग भारत पाकव्याप्त काश्मिरात पाकला अशा धडा कशाला शिकवू शकत नाही? भारतापाशी इस्रायलच्या शंभर पटीने अधिक सेनादल वा शक्तीशाली अस्त्रे शस्त्रे आहेत. मग दुबळा पाक भारताला वाकुल्या कशाला दाखवू शकतो? त्याचे उत्तर अलिकडेच राहूल गांधींच्या वागण्यातून मिळालेले आहे. राहुल गांधी कॉग्रेसचे एक ज्येष्ठ नेता आहेत. देशात पन्नास वर्षाहून अधिक काळ कारभार केलेल्या पक्षाचे ते सर्वोच्च नेता आहेत. पण त्यांनीच काश्मिरच्या फ़ुटीरवादाचे जाहिर समर्थन चालविले आहे. कालपरवा पुलवामा हंदवारा येथे चकमकी झाल्या आणि त्यात काही भारतीय सैनिक अधिकारी हुतात्मा झाले. त्यांना साधी श्रद्धांजली वहायला राहुलना सवड मिळाली नाही. पण त्याच काश्मिरात ३७० कलम हटवल्यामुळे नागरिकांना कसे हलाखीचे गुलामीचे जीवन जगावे लागते, त्याचे कौतुक मात्र राहुल करू शकतात. तशा आशयाची छायाचित्रे व पुस्तक पाकिस्तानच्या पुढाकाराने प्रकाशित झाले आहे. त्यालाच पुलित्झर पारितोषिक मिळाल्यावर राहूलनी अगत्याने त्यांची पाठ थोपटलेली आहे. थोडक्यात ज्यांनी भारतासाठी व काश्मिरसाठी रक्त सांडले त्यांच्याविषयी तुच्छता आणि जे राजरोस गद्दारीची भूमिका हिरीरीने मांडतात, त्यांचा गुणगौरव भारतात इतक्या उजळमाथ्याने होऊ शकतो. हे खरे दुखणे आहे, त्याचे उत्तर वा त्यावरचा उपाय सेनादल वा शस्त्रास्त्रांमध्ये नाही. ते दुखणे इथल्या धोरण, राजकारणात सामावलेले असून आजवरच्या कारभारातून हे भारतीय पराभूत मानसिकतेमध्ये प्रस्थापित झालेले आहे. दुखणे पाकिस्तानात नसून लिन्कन म्हणतात, तसे भारतीय बुद्धीमध्ये रुजलेले व जोपासले गेलेले आहे. उपाय इथे व त्यावर करणे आवश्यक आहे.

काश्मिरात कालपरवा चकमकीत मारला गेलेला रियाझ नायकू याच्या गद्दारीचे उदात्तीकरण आपले संपादक व अभ्यासक माध्यमे करतात. तसे करताना राष्ट्रवादाला उन्माद ठरवले जाते आणि त्यातून राष्ट्रप्रेमाची भावना मारली जात असते. पाकच्या जिहादी हिंसाचाराविषयीचा तीव्र संताप बोथट होऊन गेला आहे आणि आपोआप सेनादलाचे मनोबल खच्ची करण्यात आलेले आहे. इथे काश्मिरातील जनतेला आपल्याच अशा बुद्धीवादी लोकांनी भारताच्या विरोधात उभे केले आहे आणि पाकिस्तान त्याचा फ़ायदा उठवित असतो. त्यांचा बंदोबस्त करायला गेलेल्या सैनिक वा जवानांच्या बाजूने इथला कायदा वा न्यायालयेही उभी रहात नाहीत. मग शस्त्रे व साधने हातात असून उपयोग काय? सेनेच्या शस्त्रास्त्रे व सैनिकाच्या हातातील हत्याराला कायद्याचे समर्थन धार देत असते आणि उदारमतवाद नावाच्या आपल्यातल्याच मुठभरांनी ती धार बोथट करून टाकलेली आहे. इस्रायलमध्ये ते होऊ शकलेले नाही. म्हणून त्यांची एक कोटीहून कमी असलेली लोकसंख्या वा काही लाखांपुरती मर्यादित सेनाही शेजारी अरब देशांना भारी पडू शकते. तिथला कोणी शहाणा वा बुद्धीमान नेता बालाकोट हवाईहल्ला व सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेत नाही. इस्रायलची ताकद त्याच्या ठाम भूमिकेत सामावलेली आहे. भारतापाशी अधिक मोठी संख्या व ताकद नक्की आहे. पण तिचे शत्रू समोर सीमेपार नसून इथेच आपल्यात वसलेले वा मिसळलेले आहेत. उजळमाथ्याने भारताच्या पाठीत वार करीत आहेत आणि तरीही प्रतिष्ठीत म्हणून जगू शकतात. इस्रायलमध्ये असे काही होण्याची शक्यता आहे काय? म्हणून लिन्कन समजून घ्यावा लागतो. कुठल्याही राष्ट्राचा वा समाजाचा शेवट शत्रू करीत नसतो. त्यांच्यातले जयचंद वा घरभेदीच विनाश ओढवून आणत असतात. ते ओळखण्याची वा त्यांना निदान जाब विचारण्याची हिंमत आपल्यात असली पाहिजे. बाकीचे काम जीवाची पर्वा नसलेले सैनिक करीतच असतात.


जागतिकीकरणाचे भूत

 Journalists Capture Heartbreaking Images of Jobless Migrants ...

साधारण १९९० नंतरच्या काळात जागतिकीकरण व मुक्त अर्थव्यवस्थेने जी व्यवस्था विविध देशात उभी केली, त्यातून सर्वच जगात पुर्वकालीन सामाजिक जाणिवा बोथट होऊन गेल्या आहेत. परिणामी तिथे मुळात जी आर्थिक सामाजिक व्यवस्था उपजत उभी राहिलेली होती, ती क्रमाक्रमाने कोसळून पडलेली आहे. नवेपणा व त्यातले लाभ उपभोगताना आपली पाळेमुळे सर्व समाज व देश हरवून बसले आहेत. देशांतर्गत नव्हेतर परदेशात मोठ्या प्रमाणात आर्थिक कारणाने स्थलांतरीत होण्याला वेग मिळाला. त्यातून कुठल्या समस्या उदभवतील याचा विचारही समाजातील धुरीणांनी केला नव्हता. अशा आर्थिक सुधारणा वा बदलातून सामाजिक समस्या कशाप्रकारे उभ्या रहातील, याचाच गंध नसलेल्या आर्थिक उलथापालथी होत गेल्या. कोरोनाने सर्वच मानव जमातीला थेट आभाळातून जमिनीवर आणुन आदळले आहे. गरीब असो वा श्रीमंत असो, प्रत्येक माणूस आपली पाळेमुळे शोधू लागला आहे. त्याला आपले गाव, आपले घर आणि आपला वारसा आठवू लागला आहे. त्यामुळे परदेशातून अनेकांना मायदेशी येण्याची ओढ लागली आहे आणि देशांतर्गत बहुतेकांना आपल्या राज्यात, जिल्हा गावात जावे म्हणून पुर्वज आठवू लागले आहेत. घर वा आपले लोक, ही कल्पना अतिशय पुरातन आहे. ज्याला जीवनातील सुरक्षा म्हणतात, ती आर्थिक नव्हेतर मानवी भावनांचा आधार असल्याचा नवा साक्षात्कार होऊ लागला आहे. म्हणून तर इतर राज्यात अडकलेले व तिथे सरकार खाण्यापिण्याची सोय देत असलेल्या भागातूनही स्थलांतरीत मजुरांचे घोळके मिळेल त्या साधनांनी वा चक्क पायपीट करीत आपल्या जन्मगावाकडे जाताना दिसत आहेत. आजवर ‘फ़ॉरेनमध्ये’ असल्याचा टेंभा मिरवणारेही मायदेशाच्या सरकारला साद घालत आहेत. ही सर्व कोरोनाचीच कृपा आहे. कारण हे संकट आलेच नसते तर आजही आपण सगळेच मस्तीत जगत राहिलो असतो आणि माणूसकीच्या जाणिवांना झुगारत राहिलो असतो. मग याला जबाबदार कोण?

अर्थातच जगात असे संकट पहिल्यांदाच आलेले नाही, किंवा स्थलांतरीत लोकसंख्या ही नवी बाब नाही. भारतातून परदेशात गेलेले वा परदेशातून भारतात आलेले हजारो लाखो लोक आहेत. जे कित्येक पिढ्यांपासून उगमस्थान सोडून अन्यत्र कायमचे वसलेले आहेत. मात्र अशा स्थलांतरीतांनी स्वेच्छेने मायभूमी सोडलेली होती आणि त्यांच्या तशा स्थलांतरीत होण्यामागे कुठले सरकारी धोरण वा योजना नव्हत्या. १९९० नंतरच्या काळात अर्थव्यवस्थेत जी एका धोरणामुळे उलथापालथ झाली, त्याने जगातल्या बहुतांश समाजांचा व देशांची भूमीत रुजलेली पाळेमुळेच उखडून टाकली. पर्यायाने अशा भूमीत रुजलेल्या व वास्तव्य केलेल्या लाखो करोडो लोकांना इच्छा नसतानाही संसार पाठीवर घेऊन घरगाव सोडावे लागलेले आहे. भारतात बोकाळलेली महानगरे नियोजनबद्ध नाहीत आणि त्यांचा विस्तार एखाद्या आजारासारखा झालेला आहे. मुळच्या बाजाराच्या गावाचे रुपांतर छोट्या शहरामध्ये आणि आणि मुळच्या शहरांचे रुपांतर वाढत्या वस्तीने महानगरात होऊन गेले. आसपासची गावे जवळच्या मोठ्या गावात सहभागी करून ही शहरे विस्तारली. तिथे कसेही उद्योग व्यापार उभे रहात गेले आणि त्यासाठी जमाणार्‍या गर्दीला नागरिक ठरवून विकास होत गेला. थोडक्यात आर्थिक लाभासाठी वा पोटपाण्याच्या सोयीसाठी लोकांनी आपले पिढीजात गाव सोडून अन्यत्र आसरा घेतला आणि त्यांनाच नागरीक ठरवण्यात आले. त्यामध्ये अर्थकारण विचारात घेतले गेले. पण सामाजिक व सांस्कृतिक बाजूंचा विचारही कुठे झाला नाही. भिन्न संस्कार व सामाजिक जीवनशैली असलेल्यांना एकत्र कोंडताना, त्यांच्या मनावर हजारो वर्षापासून असलेला पुर्वजाणिवांचा प्रभाव कोणी विचारत घेतला नाही. विकासात विस्तारात त्याचा अंतर्भावही झाला नाही. आज दिसत आहेत ते त्याच बेशिस्तीचे परिणाम आहेत. असाध्य समस्या येण्याच्या प्रतिक्षेत अवघी व्यवस्था उभी होती आणि कोरोनाने त्या कडेलोटावरून सर्वांना ढकलून दिलेले आहे.

आज जवळपास अर्धा कोटी स्थलांतरीत परप्रांतिय महाराष्ट्रात होते आणि त्यांना कधीतरी असे संकट येऊन परत पाठवण्याची वेळ येऊ शकते; याचा विचार तरी महाराष्ट्राच्या नियोजनात झाला होता काय? उलट उत्तरप्रदेश किंवा बिहार बंगालच्या सरकारांनी आपल्या प्रदेशातून गुजरात महाराष्ट्रात जाणार्‍या दोनचार कोटी स्थलांतरीत मजुरांना पुन्हा आणायचा आटापिटा करावा लागेल, याची पुर्वकल्पना तरी केली होती काय? कारण तेव्हा माणसांचा विचारही झाला नाही. आर्थिक औद्योगिक धोरणांना प्राधान्य देताना त्यातला मानवी घटक पुर्णपणे विसरला गेला होता. म्हणूनच कोरोनाने मानवी घटक महत्वाचा झाल्यावर सगळ्यांचेच डोके चालेनासे झालेले आहे. म्हणून तर ही समस्या कोणालाही कशी सोडवावी, तेच लक्षात येत नाही. कारण आजवरच्या नियोजनात कुठेही माणूस नावाच्या घटकाला भावना असतात, याचा विचार नव्हता. त्याच्या भावनिक गरजा कुठल्याही तत्वज्ञान विचारधारेच्या हिशोबात नव्हत्या. सहाजिकच जसा कोरोना सगळ्याच सरकार धोरणकर्त्यांसाठी नवा आहे, तसाच हा मानवी घटकही नव्याने सरकारे बघू लागलेली आहेत. त्याच्या गरजा, त्याला असलेली घराची किंवा आपल्या पाळामुळांची ओढ, सत्ताधार्‍यांना चकीत करीत आहेत. इथे खायलाप्यायला देऊनही त्यांना घरी-गावी कशाला जायचे आहे, तेच सत्ताधारी नेत्यांना व पक्षांना समजेनासे झाले आहे. किंबहूना सामान्य जनता आणि पाळीव जनावरे यातला फ़रक राजकारण्यांना व अंमलदारांना नव्याने कळत असावा. मात्र तोच मोठी समस्या म्हणून दारात उभा राहिलेला आहे. कायदा वा पोलिसी दंडुका उगारला, मग जमाव मुठीत ठेवता येत होता. पण हाताला काम नाही आणि संपुर्ण वेळ मोकळा मिळाल्यावर त्याच मानव समुहामध्ये कळपाची मानसिकता आकार घेऊ लागलेली आहे. अशा कळपाला नुसते कायदे, आदेश वा धमक्या शस्त्रास्त्रे रोखू शकत नसतात. रिकामी मने व रिकामे हात, पाशवी रौद्ररुप धारण करतात, तेव्हा आधुनिक व्यवस्था कोसळून पडत असतात. कोरोनाने तेच सत्य समोर आणलेले आहे.

ज्यांना आजवर खाऊपिऊ घालून वा पैशाचे आमिष दाखवून पाळीव जनावरासारखेच नियोजनात वागवलेले आहे, त्याच्यातला पशू जागा होतो आहे आणि त्याला कागदी कायद्यांनी पायबंद घालणे जगातल्या बहुतेक देशात नव्याने अनुभवास येते आहे. त्याचे मुख्य कारण त्यांना आजवर माणूस म्हणून प्रगल्भ करण्यात जगातल्या बहुतेक राज्य व्यवस्था तोकड्या पडल्या आहेत. कोरोनाने त्या सर्व राज्यव्यवस्था किती तकलादू आहेत, त्याचीच प्रचिती आणून दिलेली आहे. पोलिसांचे दंडुके रस्ते रोखतात, तेव्हा रेल्वेच्या रुळावरून लोक अन्य प्रांतात जायला निघतात. किंवा थेट पोलिसांवरही हल्ले करण्यापर्यंत जातात. याला अन्य कुठलेही कारण नसून चुकीचा विकास वा आर्थिक बाजूचाच विचार करून झालेली वाटचाल जबाबदार आहे. संपुर्ण देशाचा समतोल विकास किंवा राज्यवार योजनांचा विचार झालाच नाही. जिथे रोजगार मिळेल तिथे लोक स्थलांतरीत होत राहिले. नसेल तर नवनव्या जागा प्रदेश शोधत राहिले. कसेही पाशवी जीवन जगताना त्यांना नव्या जागी बस्तानही बसवता आलेले नाही. त्यामुळे अशी काही कोटींची लोकसंख्या समस्या बनलेली आहे. ती समस्या होऊ शकते आणि अक्राळविक्राळ होऊन जबडा पसरू शकते, हे कधी विचारात घेतले नव्हते ना? कशीही व कुठूनही आर्थिक उलाढाल महत्वाची मानली गेली. मग माणूस कोंडला गेला वा कोंडीत सापडला तर पशू होईल, हे समजूच शकले नाही. त्यावरचे उपाय योजलेच गेलेले नाहीत. तो आता समोर येऊन डरकाळ्या फ़ोडू लागला आहे. कदाचित आतापर्यंत पोटापुरते मिळाल्यावर सुखी होणारा व आपल्या भावनांना गुंडाळून जगण्याच्या कडेकोटावर जीवन कंठणारा माणुस जागा होतोय. नव्याने याचा विचार करावा लागणार आहे. खरेतर कोरोनाचे संकट येण्यापुर्वीच त्याचा विचार झाला असता, तर आजच्या परिस्थितीवर सहज मात करता आली असती. निदान इतकी तारांबळ उडाली नसती. जगाच्या चिंता करताना व उपाय योजताना माणूस हा प्राणी असला तरी बुद्धीच्या विकासाअभावी त्याच्यातला पशूच शिल्लक राहिल, असा विचारही केला नाही. त्याचे हे दुष्परिणाम असावेत. की जागतिकीकरणाचे भूत म्हणावे याला?

Friday, May 8, 2020

बंगालचा सुप्त ज्वालामुखी

ममता के कुशासन से बंगाल में कोरोना संक्रमण चौगुना

प्रत्येक बाबतीत तुम्ही राजकारण खेळायला लागलात, मग तुमचा कपाळमोक्ष व्हायला वेळ लागत नाही. फ़क्त निर्णायक वेळ येण्याची तुमच्या प्रतिस्पर्ध्याला प्रतिक्षा करावी लागते. भाजपा बंगालमध्ये तशाच प्रतिक्षेत दबा धरून बसला आहे. कारण तिथल्या समर्थ मुख्यमंत्री व तृणमूल कॉग्रेसच्या सर्वोच्च नेत्या ममता बानर्जी इतिहास विसरून इतिहासाचीच पुनरावृत्ती करीत आहेत. अवघ्या अकरा वर्षापुर्वी त्याही अशाच दबा धरून बसल्या होत्या. परंतु तेव्हा तिथे शिरजोर असलेली डावी आघाडी इतकी बेफ़ाम झालेली होती, की त्यांना पराभूत करण्यासाठी ममतांना फ़ार कष्ट उपसण्याची वा डावपेचही खेळायची गरज नव्हती. फ़क्त डाव्यांचा कपाळमोक्ष होण्याची प्रतिक्षा होती. ती पुर्ण झाली आणि ममता बंगालच्या सर्वेसर्वा होऊन गेल्या. अर्थात त्यातूनही डाव्यांना सावरणे अशक्य अजिबात नव्हते. पण सावरण्यासाठी मुळातच आत्मपरिक्षण करून आपल्या चुका ओळखाव्या लागतात आणि त्यानुसार आपल्यामध्ये सुधारणा करावी लागत असते. त्याच्या उलटी बाजू अशी, की चुकाच नाकारत गेलात तर सुधारण्याची प्रक्रीया सुरू होत नाही आणि नामशेष होऊन जाण्याची नामुष्की येत असते. ममतांनी त्याच इतिहासाची नव्याने पुनरावृत्ती करायचा चंगच बांधलेला असेल तर भाजपाने उगाच डावपेच खेळायची गरज कुठे उरते? डाव्यांप्रमाणे ममता आता कुठे चुकत आहेत? २००९ च्या दरम्यान डाव्या आघाडीच्या गुंडगिरीने बंगालभर थैमान घातले होते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सामान्य माणसाला जगणेही अशक्य करून टाकलेले होते. कायदा व प्रशासनात कुठेही डाव्यांचे कार्यकर्ते इतका हस्तक्षेप करीत होते, की लोकांना सरकार बदलून टाकण्याखेरीज पर्याय उरला नव्हता. लोकांना ममतांचे कौतुक असण्यापेक्षा डाव्यांच्या तावडीतून सुटण्याची सोय हवी होती आणि म्हणून मग तृणमूल कॉग्रेस विजयी होत गेली. आज नेमकी डाव्यांची जागा ममतांनी घेतली असून डाव्यांवरही लोकांचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे अकस्मात भाजपा हा सत्तांतराचा पर्याय म्हणून समोर आला आहे. पण ममतांचे डोके कुठे ठिकाणावर आहे? त्या कोरोनाच्या विळख्यातही अतिरेकी राजकीय गुंडगिरी करून आपल्याला हाकलून लावायची जणू सक्तीच सामान्य नागरिकांवर करीत आहेत.

कोरोनाने जगाला विळखा घातलेला आहे. त्यात भारतातही कोरोनाने जनजीवन ठप्प झालेले आहे. त्याखेरीज अन्य पर्याय नसल्याने प्रत्येक पक्षाला राजकीय भूमिका गुंडाळून केंद्राशी सहकार्य करीत आपापल्या राज्यात स्थैर्य निर्माण करणे भाग आहे. पण ममतांना त्यातही आपला भाजपा विरोध वा मोदींच्या विरोधात लढायची खुमखुमी आवरता आलेली नाही. परिणामी बंगालमध्ये कोरोनाचा धुमाकुळ हाताबाहेर गेला असून राज्यातले डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यक कर्मचारी व संस्थाही ममतांच्या कारभाराने हवालदिल झाल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये बेशिस्त, चाचण्यांचा घोळ आणि वाढत्या रुग्णांच्या संख्येतही गफ़लती करून आपण उत्तम कारभार करीत असल्याचा एक देखावा ममतांनी उभा करायचा प्रयत्न केला. त्यातील उणिवा किंवा त्रुटी दाखवणार्‍या माध्यमांची व पत्रकारांची मुस्कटदाबीही केलेली आहे. पण बंगाली माध्यमात गोंधळ लपवता आला असला तरी मरणार्‍यांना रोखणे ममता कसे साध्य करणार होत्या? त्यामुळे महिनाभराचा कालावधी उलटून जाताना अकस्मात कोरोना मृतांची संख्या वाढू लागली. त्याआधी वैद्यकीय उपचार व कामे करणार्‍या संस्थांनी ममतांच्या हडेलहप्पीवर टिका केली होती. त्यातल्या त्रुटी व गैरकारभाराची लेखी तक्रार केंद्राकडे पाठवली होती. पण त्यांना गद्दार म्हणून किंवा खोटे पाडून ममतांनी सारवासारव केली. गुंडांना हाताशी धरून तक्रार करणार्‍या नागरिकांनाही गप्प केले. पण जोवर पिडीत संख्या मर्यादित असते, तोपर्यंत गुंडगिरी चालून जाते. पण पोलिसांच्याही दंडेलशाहीला लोक जुमानायचे थांबत नाहीत तिथे पितळ उघडे पडू लागते. आता तशीच वेळ आलेली आहे आणि दहा महिन्यांवर विधानसभा मतदान असल्याने ममतांना खडबडून जाग आलेली आहे. कारण अशा रितीने माणसे मरू लागली आणि रुग्णांची संख्या हाताबाहेर गेली; तर निवडणूकही गेली समजा असे कान सल्लागारांनी टोचले. तेव्हा ममतांची झिंग उतरली आहे.

दोनतीन आठवड्यापुर्वी ममतांनी सत्य दडपण्यासाठी हॉस्पिटल्स वा दवाखान्यातही दडपशाही केली. मृतांच्या नातलगांना न कळवता कोरोना मृतांचे देह परस्पर स्मशानभूमीत नेऊन क्रियाकर्म उरकण्यात आले. कोरोनाने मरण पावलेल्यांना भलत्यासलत्या आजाराचे कारण दाखवून मृत घोषित करण्यात आले. चाचण्या घेण्याचे टाळून केंद्राने साहित्य पुरवले नसल्याचाही कांगावा करून झाला. मुस्लिम वस्तीमध्ये लॉकडाऊनचे पालन धुडकावले गेल्यानेही कोरोनाचा विस्तृत फ़ैलाव होऊन गेला. त्यावर पांघरूण घालण्यासाठी डॉक्टरांनी मृत्यूचे कारण किंवा प्रमाणपत्र देण्यावर निर्बंध घातले. ते काम आपल्या राजकीय नेत्यांच्या समितीकडे सोपवले. त्याचा एकत्रित परिणाम आता समोर येऊ लागला आहे. आरंभी देशातील सर्वात कमी रुग्णबाधा असलेले राज्य म्हणून ममतांनी मिरवले व त्यांच्या प्रवक्त्यांनी केंद्रावर तोफ़ा डागल्या. फ़ार कशाला शेवटी केंद्राला विशेष पथके पाठवून बंगालच्या रुग्णांच्या हेळसांडीची दखल घ्यावी लागली. तर त्यांच्याशी असहकार्य करून ममतांनी आणखी गोंधळ घातला. म्हणून सत्य कुठे लपणार होते? अर्थात अशा लोकांचे काम सोनाराने टोचावे लागतात. ममतांना बाकी कोणाचीही पर्वा नसली तरी पुन्हा विधानसभा जिंकण्याची चिंता नक्कीच आहे. त्यासाठी त्यांनी या क्षेत्रातील जाणकार रणनितीकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रशांत किशोरला हाताशी धरलेले आहे. कंत्राटच दिलेले आहे. त्याने़च कान टोचल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानुसार असेच चालत राहिले तर कोरोनाच्या थैमानाने पुढल्या दोनतीन महिन्यात काही हजार बंगाली नागरिक मृत्यूमुखी पडतील. मग २०२१ सालाच्या आरंभी व्हायची राज्य विधानसचेची निवडणूक गमवावी लागेल, असे किशोरनेच समजावल्यावर ममतांची झिंग उतरली आहे. अचानक त्यांनी कोरोनातून माघार घेऊन काम राज्याच्या आरोग्य अधिकार्‍यांकडे सोपवले आहे. पण व्हायचे ते नुकसान होऊन गेले आहे. कारण झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या बंगालमध्ये वाढू लागली आहे.

सवाल इतकाच आहे, की आगामी दोनतीन महिन्यात ही संख्या आवरली नाही आणि मृतांचा आकडा फ़ुगत गेला, तर त्याची छाया दहा महिन्यानंतरच्या मतदानावर नक्कीच पडणार आहे. भाजपाविषयी बंगाली मतदाराला आस्था वा प्रेम नसले तरी कोरोनाची हेळसांड जाहिरपणे बोलणारा तेवढाच पक्ष मतदारांनी सध्या बघितला आहे. तेच तर २०१७-१८ सालातही चालू होते. ममतांची मनमानी व तृणमूलच्या गुंडांचा धुडगुस यावर एकट्या भाजपाच बोलत होता. त्याचाच फ़ायदा लोकसभा मतदानात त्या पक्षाला मिळाला आणि ममतांना जबरदस्त दणका बसला. त्यांची लोकसभेतील संख्या ३३ वरून २२ इतकी खाली आली, तर भाजपाचे संख्याबळ बंगालमधून लोकसभेत ४ वरून १८ पर्यंत पुढे गेले. ती भाजपाची मेहनत असण्यापेक्षाही ममतांची कृपा होती. त्यांच्या मनमानीला कंटाळलेले लोक आपोआप भाजपाकडे वळले होते. खरे तर त्यापासून धडा घेऊन ममतांनी मनमानी थांबवायला हवी होती आणि कुठलेही खुसपट काढून केंद्राशी भांडण्याचे तंत्र सोडायला हवे होते. कोरोनाच्या संकट काळात तर केंद्राशी सहकार्य करायला पर्यायच नव्हता. अगदी हाडवैर असलेले डावेही केरळात केंद्राशी जुळवून घेत बाजी मारून गेले आहेत. मग ममतांना इतकेही कशाला समजू शकलेले नाही? किंबहूना डाव्यांपासून इतकाच धडा मिळालेला नाही. मुळात २०११ सालात ममतांनाही डाव्यांच्या तशाच कृपेने सत्ता व बहूमत मिळालेले होते. त्यांची बंगालमध्ये तितकी संघटनात्मक शक्ती नव्हती. आजच्या भाजपाइतकाच तृणमूल नवखा व विस्कळीत पक्ष होता. पण डाव्या आघाडीच्या गुंडगिरीतून मुक्त व्हायला उतावळ्या झालेल्या मतदाराने डाव्यांच्या मुख्यमंत्र्यालाही पराभूत करून बंगाल ममतांकडे सोपवला होता. आपल्याच यशातून बंगाली जनतेने दिलेला धडा ममतांना शिकता आलेला नाही, इतकाच याचा अर्थ आहे. त्यातून त्यांच्यासमोर २०११ सालची परिस्थिती त्यांनीच उभी करून ठेवलेली आहे.

नंदीग्राम व सिंगूरच्या हिंसक गुंडगिरी व शासकीय दडपशाहीने डाव्या आघाडीची राज्यातील प्रतिमा डागाळलेली होती. तेव्हा हतबल झालेल्या सामान्य जनतेचा आवाज होऊन ममता पुढे सरसावलेल्या होत्या आणि २००९ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांना मतदाराने उत्स्फ़ुर्त प्रतिसाद दिला. डाव्यांना ठामपणे नाकारत मतदाराने ममतांच्या पक्षाला प्रचंड यश दिले. बरोबर दहा वर्षांनी त्याचेच प्रतिबिंब २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत पडलेले दिसते. पण तेव्हा डाव्यांना जाग आली नाही व गुंडगिरीला कंटाळून मतदार ममतांकडे झुकलेला असतानाही डाव्यांनी हडेलहप्पी कायम ठेवली. मग २०११ सालात विधानसभेला डाव्यांचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्यही विधानसभेच्या आपल्या मतदारसंघात पराभूत होण्यापर्यंत परिस्थिती ओढवली. २००९ च्या लोकसभेतील आपले यश ममता आज विसरल्या आहेत आणि तेव्हाच्या डाव्यांप्रमाणे अधिकच मस्ती व धांगडधिंगा करीत आहेत. मग २०११ चे प्रतिबिंब २०२१ साली पडले तर नवल कसे असेल? प्रशांत किशोर याला ते कळत असल्याने त्यानेच ममतांना कोरोनाची बाधा राजकारणात कशी होऊ शकते, त्याचे कान टोचलेले आहेत आणि अचानक ममता नरम पडल्या आहेत. पण दोन महिने हाताबाहेर गेलेली परिस्थिती सावरण्याइतका वेळ त्यांच्यापाशी उरला आहे काय? मागल्या दोनतीन महिन्यात त्यांनी बंगालच्या आरोग्याला केंद्राशी चाललेल्या जुगारात पणाला लावून झालेले आहे. त्यामुळे बंगालभर वाढलेल्या कोरोना बाधेची प्राथमिक लक्षणे समोर आलेलीच आहे. हे प्रकरण आणखी सहा आठ महिने चालणार आहे आणि तोपर्यंत आपल्या चटावलेल्या गुंड पाठीराख्यांना ममता कसे रोखणार व आवरणार; याला महत्व आहे. त्यात कसूर झाली तर ममता मतांच्या ज्वालामुखीवर बसलेल्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. माध्यमांची गळचेपी वा कांगावा करून चर्चा बंद पाडता येतात. गुप्त मतदानात असल्या गुंडगिरीने बाजी मारता येत नाही. भाजपाचे बंगालमधले वाढते प्रस्थ त्यांची मेहनत असण्यापेक्षाही बानर्जींची माया, किमया व ‘ममता’ असणार आहे.

Tuesday, May 5, 2020

तो शिवसैनिक कुठे हरवलाय?

Amitabh Bachchan: I am Alive because of Bal Thackeray | FilmiBeat ...

अडचणी कोणाला नसतात? पण त्या अडचणीवर मात करणार्‍याला माणूस म्हणतात. त्यात आपल्या अडचणींवर मात करून पुढे इतरांच्या मदतीला धाव घेणार्‍याला कार्यकर्ता म्हणतात. तो कुठल्या सरकारी सेवेत नसतो किंवा त्याला इतरांना मदत करण्यासाठी कुठेही वेतन वगैरे मिळत नसते. पण शेजारीपाजारी वा परिसरातल्या लोकांच्या सदिच्छा मिळण्यावर तो समाधानी असतो. कुठलीही संघटना वा राजकीय पक्ष व संस्था अशाच कार्यकर्त्याच्या बळावर पायावर उभी रहात असते. जेव्हा अशा कार्यकर्त्यांचा दुष्काळ पडतो, तेव्हा समाजावर खरेखुरे संकट येत असते. लॉकडाऊनच्या कालखंडात त्याचा मोठ्या प्रमाणात प्रत्यय आलेला आहे. कोरोना हे नवे संकट नाही. अशी कमीअधिक लहानमोठी अनेक संकटे भारतीय समाजाने सहज पेललेली आहेत. पण त्याला कधी सरकारच्या दारी लाचार होऊन उभे रहाण्याची वेळ आली नाही. कारण भारतात कार्यकर्ता नेहमी भक्कमपणे जनतेच्या मदतीला उभा राहिलेला आहे. त्याच कार्यकर्त्यांच्या बांधिलकी वा हिंमतीतून अनेक संस्था व राजकीय पक्षही उभे राहिलेले आहेत. पण असे अनेक पक्ष नावारूपाला आल्यावर आज आपले पायच विसरून गेलेत असे वाटू लागले आहे. दिल्लीत अलिकडल्या काळात उदयास आलेला आम आदमी पक्ष असाच लोकपाल आंदोलन वा तत्पुर्वीच्या काही कामातून आकाराला आला आणि पन्नास वर्षापुर्वी मुंबईत शिवसेना त्यातूनच नावारुपाला आली. अगदी शतकापुर्वी कॉग्रेसही कार्यकर्त्यांचे मोहोळ होते आणि पुढल्या काळात कम्युनिस्ट, समाजवादी वा अन्य पक्षांचाही उदय कार्यकर्त्यांच्या बांधिलकीतून झाला आहे. पण असे सर्व कार्यकर्ते वा त्यांचे कार्य फ़क्त सरकार विरोधातले नव्हते तर शासकीय यंत्रणा जिथे कमी पडते तिथे धाव घेऊन लोकांना संकटात हात देण्यासाठीच त्यांची जनतेला ओळख होती. आज तो शिवसैनिक कुठे गायब झालाय असा म्हणूनच अनेकांना प्रश्न पडलेला असेल. सत्तरीच्या पुढे गेलेले अनेक मुंबईकर तो शिवसैनिक नक्कीच शोधत असतील. तो बाळासाहेबांनी घडवलेला शिवसैनिक असता तर मुंबईत परप्रांतिय मजूर वा सामान्य गरीब रहिवाशांना इतके लाचार अगतिक व्हावे लागले असते का?

गेल्या दोनतीन आठवड्यात मुंबईत अडकलेल्या लाखो परप्रांतीय मजूरांची समस्या प्रकर्षाने समोर आली. त्यांना इतका दिर्घकाळ मुंबईत रोखून धरणे प्रशासनाला शक्य नव्हते आणि लॉकडाऊन यशस्वी करताना त्यांना योग्य रितीने हाताळणेही आवश्यक होते. बंदोबस्ताचा बोजा डोक्यावर असताना पोलिस वा शासकीय यंत्रणा तोकडी पडणार, हे कोणी वेगळे सांगायची गरज नाही. ती उणिव किंवा त्रुटी नसून अपवादात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे तिथेच कार्यकर्ता महत्वाचा असतो. मुंबईत बॉम्बस्फ़ोट झाले वा कसाब टोळीचा हल्ला झाला, तेव्हा रक्तदानाच्या मोहिमेपासून रुगणवाहिकेच्या सेवेपर्यंत आघाडीवर शासकीय यंत्रणेपेक्षाही शिवसेना होती. हे मुंबईकराने पाहिले आहे व अनुभवलेही आहे. रेशनकार्ड असो वा कुठल्याही अशा लहानमोठ्या शासकीय योजनांचे खरेखुरे लाभ सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यातला पुढाकार असो, तो शिवसेनेच्या गल्लीबोळातल्या शाखांनी नेहमी घेतलेला होता. किंबहूना शिवसेना ही पहिली राजकीय सामाजिक संघटना असेल, जिच्यामुळे गल्लीबोळातल्या शाखा वा मदतकार्य करणारी कार्यालये सुरू झाली. आरंभापासूनच शिवसेना ही भागाभागातील शाखांच्या गजबजण्यातून लोकांपर्यंत पोहोचली. एकवेळ नजिक कुठे पोलिस चौकी वा प्रशासनाचे कार्यालय नसले तरी चालेल, पण सेनेशी शाखा, उपशाखा असायलाच हवी, ही मुंबईकराची धारणाच होऊन गेलेली होती. कारण केव्हाही अडल्यानडल्या
कामासाठी सामान्य नागरिक त्या शाखेत धाव घेऊ शकत होता. आधार कार्डसाठी अर्ज भरणे असो किंवा वीजेची जोडणी वा शाळा कॉलेजच्या प्रवेशाच्या वेळी हवी असलेली प्रमाणीत कागदपत्रे असोत, शिवसेनेच्या शाखेत लोक धावायचे. त्याच मुंबई वा सर्व उपनगरात कालपरवा साधे प्रवासासाठी आवश्यक असलेले कागदपत्र, परवाने वा वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी उडालेली बेशिस्त बेवारस झुंबड बघून वाटले; शिवसेना कुठे आहे? तो जुना अशा प्रसंगी धावून येणारा शिवसैनिक कुठे आहे?

खरे तर हा प्रश्न एकट्या शिवसेनेलाही विचारण्याचे कारण नाही. कारण हळूहळू बहुतेक राजकीय पक्षांनी आपल्या कामात व कार्यशैलीत शिवसेनेचे अनुकरण केलेले होते. रुग्णवाहिका शिवसेनेने सार्वजनिक क्षेत्रात आणल्या. वॉर्ड वा गल्लीबोळात पक्षाची कार्यालये, आमदार नगरसेवकांची संपर्क कार्यालये, ही शिवसेनेची कार्यशैली इतर पक्षांनी अनुसरली. अशी कार्यालये म्हणजे कुठल्याही उद्यमी वा कार्यतत्पर लोकप्रतिनिधीचे प्रतिक बनुन गेले. त्याचे श्रेय शिवसेनेला असले तरी अलिकडे सर्वच पक्षांनी त्यांचे अनुकरण केलेले होते. पण हळुहळू असे बहुतेक नेते आणि लोकप्रतिनिधीच निवडणूकांच्या मतांमध्ये अडकून गेले. मतदाराला फ़ुकटातल्या वह्या पुस्तके गणवेश वाटणे किंवा यात्रा सहली करण्यात गुंतले. आपण संकट प्रसंगी धावून जाण्यासाठी आहोत, अडचणीच्या प्रसंगी मदतीला जाणे, हे आपले कर्तव्य असल्याचा त्या सर्वांनाच विसर पडला. मग निवडणूक जिंकण्यासाठी ग्राहक सेवेप्रमाणे आमिषे दाखवून नामानिराळे होण्याकडे कल गेला. त्याचे दुष्परिणाम आज मुंबईला भोगावे लागत आहेत. सगळ्याच पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांना आज सरकार वा प्रशासनाकडे काहीतरी मागण्यात धन्यता वाटू लागली आहे. पण आपणही तुटपुंज्या साधनांसह उणिवा त्रुटी भरून काढण्यासाठी असतो व आपली तितकी क्षमता आहे, त्याचेच विस्मरण झालेले आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९६८ सालात पहिल्यांदा निवडून आलेला परळचा विजय गावकर नावाचा कोवळा पंचविशीतला तरूण नगरसेवक वर्षभरात कोयना भूकंप झाल्यावर आपल्या घरात गप्प बसला नव्हता. त्याने आपल्या सहकार्‍यांना जमवून विभागात मदतफ़ेरी काढली व मिळेत तितके साहित्य घेऊन ट्रकभर माल गरजूंना वाटण्यासाठी सातार्‍याला धाव घेतली होती. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्‍यातून काढलेल्या जखमींना इस्पितळात न्यायला रुग्णवाहिका मिळाली नाही, म्हणून गजानन वर्तक या शाखाप्रमुखाने पुढल्या सहा महिन्यात वर्गणी जमवून शिवसेनेची पहिली रुग्णवाहिका रस्त्यावर आणली होती. शतकाचा महानायक अमिताभ बच्चनही त्या रुग्णवाहिका सेवेचा कायम ॠणी राहिलेला आहे



कोणाला आठवते का ती शिवसेना? तो गावकर किंवा गजाभाऊ वर्तक यांना बाळासाहेबांनी आदेश द्यावा लागला नव्हता किंवा कार्यक्रम म्हणून असे काही सुचवले नव्हते. अडचणीतल्या नागरिक रहिवाश्यांच्या मदतीला धावून जाणे, हा मंत्र होता आणि संकट आले की म्हणूनच लोकांना शिवसेना आठवायची. त्याच पुण्याईवर शिवसेना ही जादू उदयास आली. अनेक शाखांमध्ये रक्तदानाची शिबीरे़च होत नव्हती, तर कायमस्वरूपी रक्तदान करणार्‍या लोकांच्या रक्तगटाच्या याद्याही सज्ज असायच्या. अशी शिवसेना वा तिचे अनुकरण केलेले अनेक पक्ष कार्यकर्ते आज कोरोनाला शरण गेलेत काय? नसतील तर मुंबई वा अन्यत्र अडकलेल्या परप्रांतिय नागरिकांच्या घरवापसीचा विषय इतका अराजकाचा वा गोंधळाचा कशाला झाला? आज शिवसेना सत्तेत आहे आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्रीही आहे. पण लोकांना हवीहवीशी वाटणारी ती शिवसेना किंवा तो शिवसैनिक कुठे आहे; असा म्हणूनच प्रश्न पडतो. अर्थात ज्यांनी ती विजय गावकर वा गजानन वर्तकची शिवसेना बघितलेलीच नाही, अशा विशीतिशीतल्या शिवसैनिकांना वा सोशल मीडियातल्या बोलघेवड्यांना, ह्या प्रश्नाचा आशयही कळणार नाही, शिवसैनिकच कशाला? कुठल्याही पक्षाच्या अशा तावातावाने भांडणार्‍या, प्रत्युत्तर देण्यास उतावळ्या असलेल्या समर्थक व्यक्तीला यातली आपुलकीही समजू शकणार नाही. कारण हे तोंडाळ लोक कुठल्याही पक्षाचे कल्याण करीत नसतात वा प्रचारही करीत नसतात. त्यांना भांडण्यात रस असतो आणि समोरच्याला अपमानित करण्यात धन्यता वाटत असते. पण आपणच आपल्या पक्षाचे संघटनेचे जनमानसातील स्थान संपवित असतो, याचेही भान उरलेले नाही. संघटनेची महत्ता किंवा उपयुक्तता अशाचवेळी नजरेत भरणारी असते. आपुलकीचे नाते जोडून पक्षाचा जनमानसातील पाया भक्कम करण्याची हीच संधी असते आणि त्याचा सर्वच पक्षांना विसर पडला आहे. हे खरे तर कोरोनापेक्षाही मोठे संकट आहे. असो, आम्ही किंवा आमची पिढी भाग्यवान होती, ज्यांना असा कार्यकर्ता व शिवसैनिक अनुभवायला मिळाला.

Sunday, May 3, 2020

उद्धव-मोदी यांच्यात शिजले काय?

Election campaign brings Modi, Uddhav together after 3 years

साधारण तीनचार आठवडे रंगवण्यात आलेला मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेचप्रस्ंग अकस्मात निकालात निघाला असे वरकरणी वाटते. कारण घटनाक्रम तसा आहे. ९ एप्रिल रोजी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दोनपैकी एका रिक्त जागी आमदार म्हणून नियुक्त करून हा पेच संपवावा, असा पर्याय सत्ताधारी आघाडीने शोधला होता. पण ती नुसतीच पळवाट नव्हती, तर आजचे मरण उद्यावर ढकलण्याचाच प्रकार होता. कारण अशा नियुक्तीने समस्या संपणार नव्हती. ज्या नेमणूकीसाठी इतका द्राविडी प्राणायाम करण्यात आला, त्या सदस्यत्वाची मुदत अवघी काही दिवसांची होती आणि पुन्हा पुढल्या महिन्यात तोच पेच पुढे आला असता. म्हणूनच नेमणुकीचा प्रस्ताव दुर्लक्षित केल्याबद्दल राज्यपालांना दोषी ठरवणे नुसताच उथळपणा नव्हता तर अपरिपक्वतेची साक्ष होती. पण अखेरीस उद्धवरावांनी पंतप्रधानांनाच फ़ोन करून साकडे घातले आणि विनाविलंब पर्याय काढण्यात आला. चुटकीसरशी विषय निकालात निघाला, असे वरकरणी दिसते. कारण कोरोनामुळे बेमुदत पुढे ढकललेली विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी प्रक्रीयाही सुरू झाली आहे. पण केवळ मुख्यमंत्र्यांनी मोदींना विनंती केली म्हणून विषय संपला आहे काय? त्यात कुठलेच राजकारण नाही काय? असेच असेल तर राज्यातील विरोधी नेते देवेंद्र फ़डणवीस यांच्यावर राज्यपालांना भेटून डाव शिजवल्याच्या आरोपांचे काय? कारण असे राजभवनातील कारस्थान राज्यातील नेते परस्पर शिजवू शकत नसतात. त्याला केंद्रातील नेते व राज्यपालांचे संगनमत असावे लागते. ते नसेल तर कारस्थान होऊ शकत नाही आणि असेल तर पंतप्रधानांनी राज्यातील भाजपा नेत्यांना वार्‍यावर सोडून उद्धवरावांना असे अभय देण्याचे पाऊल उचलले नसते. मग दोघांमध्ये शिजले तरी काय, असा प्रश्न शिल्लक उरतोच.

पहिली गोष्ट म्हणजे अशा वेळी राजभवनातील डावपेच खेळून विरोधी पक्षाचे सरकार पाडण्यातून पंतप्रधानांचीच प्रतिमा मलिन झाली असती. त्यासाठी फ़डणवीसांना दिल्लीतून वा राजभवनातून प्रोत्साहन मिळूच शकणार नव्हते. पण राज्यपालांनी प्रस्ताव रोखल्याने तशा शंका काढल्या गेल्या. प्रस्तावातील त्रुटी वा उणिवांचा विचार झाला नाही. अशा आमदारकीची अपुरी मुदत व अनुचित पायंडा, यामुळे राज्यपालांनी वेगळ्या पर्यायाचा विचार केला होता. राजभवनाचा सतत केंद्राशी संपर्क असतो. म्हणूनच त्यांनी उद्धवरावांना उचित सल्ला देऊन मोदींशी संपर्क साधण्याचा सल्ला दिलेला असणार. त्याप्रमाणे अकस्मात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना फ़ोन केला आणि सर्व सुत्रे हलू लागली. राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीले आणि त्यांनीही कोरोनाच्या छायेत मतदानाचा कार्यक्रम योजून मार्ग प्रशस्त केला. त्याप्रमाणे आता सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू होईल आणि १४ मेपर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रीया चालेल. एकूण ९ जागांसाठी मतदान व्हायचे असून, सर्वच पक्षांनी समजूतदारपणा दाखवला तर मतदानाशिवायच बिनविरोध निवडी होऊन जातील. बहूधा तोच सौदा झाल्यावर हा तिढा सुटलेला आहे. पण त्याची कुठे कोणी वाच्यता केलेली नाही. विधानसभेचे आमदार यातले मतदार असून संख्याबळ बघता भाजपाचे तीन व आघाडीचे पाच उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. अनिश्चीत जागा नववी आहे. दोन्ही बाजूंनी अधिकचा उमेदवार उभा केल्यास मतदान घ्यावे लागेल आणि विषय अटीतटीचा होऊ शकेल. थोडक्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही आणि कुठल्या बाजूचे आमदार फ़ुटून मतदान करू शकतात, त्याचा बोभाटा होऊ शकतो. ते सत्ताधारी बाजूला परवडणारे नाही. भाजपाला चौथी जागा जिंकण्यासाठी पंधराहून अधिक आमदार फ़ोडावे लागतील आणि आघाडीला सहावी जागा जिंकायला भाजपाच्या गोटातले सहासात आमदार फ़ोडावे लागतील.

म्हणजेच फ़ोडाफ़ोडी न करता बिनविरोध निवडणूका करायच्या, तर दोन्ही बाजूंपैकी कोणाला तरी काही पावले मागे येणे भाग आहे. मग तसा कोणी माघार घेऊन हा मार्ग प्रशस्त केला आहे काय? म्हणजे कोरोना विरुद्धच्या जागतिक लढाईत राष्ट्रीय नेता म्हणून आपली प्रतिमा उजळ राखण्यासाठी मोदींनी माघार घेतली आहे का? तसे असेल तर भाजपाला निमूट तीन जागांवर समाधान मानावे लागेल. किंवा मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेचप्रसंग सोडवायला आघाडीला सहाव्या जागेचा हट्ट सोडावा लागेल. तरच प्रत्यक्ष मतदानाशिवायच निवडणूक उरकली जाऊ शकते. ती माघार कोणी घेतली आहे, हा म्हणूनच प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर अर्ज भरण्याची मुदत संपताना मिळू शकते. कारण फ़क्त नऊच उमेदवारांनी अर्ज भरले, तर कोणाचे किती तो आकडा समोर असेल. निकाल तिथेच लागलेला असेल. भाजपाने तीन व आघाडीने सहा उमेदवार दाखल केले तर ती आघाडीने मारलेली बाजी असेल. उलट भाजपाने चार व आघाडीने पाचच उमेदवार मैदानात आणले; तर ती भाजपाने मारलेली बाजी असेल. कारण चौथा उमेदवार निवडून आणण्याइतके त्याचे विधानसभेत आमदार मतदार नाहीत. उलट सहावा उमेदवार जिंकण्यासाठी अधिक शिलकीची मते आघाडीपाशी आहेत. तसे असूनही सहाव्या जागेवर आघाडीने पाणी सोडले, तर ती माघार मानावी लागते. उलट भाजपाने तीनच उमेदवार उभे केले तर ती भाजपाची राजकीय माघार मानावीच लागेल. अर्थात ही बाब अर्ज भरणे व त्यांची छाननी संपण्यापर्यंत उघड होणार आहे. त्यातही उमेदवारी मागे घेण्याचा दिवस संपल्यावर त्याचे चित्र स्पष्ट होईल. म्हणजे १४ मार्च रोजी. जागा तितकेच अर्ज असतील तर निकाल जाहिर करणे हा निव्वळ उपचार असेल आणि खरे राजकारण उघड झालेले असेल. पण खरोखर सर्वच पक्षांना कोरोनाच्या संकटात मतदान टाळून बिनविरोध निवडणूका टाळायच्या असतील व तसा सौदा झालेला असेल तरची ही गोष्ट आहे.

आता यातल्या राजकीय गुंत्याचा विषय समजून घेतला पाहिजे. भाजपा विरोधी पक्षात आहे आणि त्याच्यापाशी फ़ारतर ११० आमदारांची संख्या असू शकते. उलट सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस यांची संख्या सत्तास्थापना प्रसंगी १६९ अशी असल्याचे सांगितले गेले आहे. म्हणजेच तिघाही पक्षांचे मिळून पाच उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात. तर भाजपाचे तीन जिंकतात. आघाडीपाशी सहावा उमेदवार लढवायला पंधरावीस मते अधिकची आहेत आणि भाजपाला चौथा उमेदवार लढवायला तितकीही मते नाहीत. म्हणजेच चौथा आमदार निवडून आणायला त्या पक्षाला सत्ताधारी आघाडीतल्या पंधरावीस आमदारांना फ़ोडावे लागेल. नाराज असलेले आमदार असे आदेशाला झुगारून मतदान करू शकतात. पण तसे झाल्याने महाआघाडीचे सरकार कोसळण्याची बिलकुल शक्यता नाही. पण आघाडीचे बहूमत भक्कम बहूमतावर उभे नसल्याची बाब चव्हाट्यावर येऊन जाईल. आघाडीत बेबनाव किंवा नाराजी खुप असल्याचे ते चिन्ह असेल. सहावा उमेदवार उभा करून त्याला अपेक्षित मते मिळाली नाहीत, तरी सत्ताधारी गोटातील नाराजीचे चित्र समोर येऊन जाईल. त्यासाठी आजच्या स्थितीत मुख्यमंत्र्यांच्या आमदार होण्याला प्राधान्य देऊन भाजपाला चौथी जागा सोडण्याची तडजोड झालेली असू शकते. नसेल तर आपला सहावा उमेदवार आघाडी उभा केल्याशिवाय राहू शकत नाही. कारण आघाडीकडे भाजपापेक्षा शेवटच्या जागेकरीता अधिक मते आहेत. पण आमदारांच्या नाराजीची शंका मनात असल्यास आघाडी बिनविरोध निवडणूक उरकायला प्राधान्य देऊ शकते. भाजपाही मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीच्या बदल्यात अधिकचा विधान परिषदेतला आमदार मिळवून राजकीय बाजी मारून जाऊ शकतो. हे सर्व १४ मे रोजी स्पष्ट होईल. कारण मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा मार्ग प्रशस्त होताना नेमके काय राजकारण शिजले आहे, ते गुलदस्त्यात आहे. त्याचा खुलासा नऊ आमदार कोणाचे कसे निवडून येतात, त्यानुसार होणार आहे.

Saturday, May 2, 2020

डुप्लिकेट मालाची बाजारपेठ

कारोबारियों की कर्ज माफी की बात करके ...

डुप्लिकेट माल बनवणार्‍यांची एक खासियत असते. ते वाटेल तेव्हा आपला माल बाजारात आणत नाहीत वा कुठल्याही पक्क्या मालाचे उत्पादन करीत नाहीत. जेव्हा एखाद्या मालाची बाजारात मागणी वाढते आणि टंचाई सुरू होते, तेव्हाच असे भामटे त्या मालाचे वेगाने उत्पादन सुरू करीत असतात. कारण त्यांनाही पक्के ठाऊक असते, की त्यांच्यासाठी ही हंगामी बाजारपेठ आहे. जितक्या लौकर उत्पादन काढले जाईल व बाजारत चढ्या भावाने विकले जाईल, तितका फ़ायदा अधिक. त्यात किंचीतही विलंब झाला तर त्यांचे पितळ उघडे पडून ते पकडले जाण्याची शक्यता असते. शिवाय टंचाई संपण्याइतका खराखुरा माल बाजारात आला, तर त्यांचे बोगस उत्पादन मातीमोल होणार असते. सहाजिकच असे डुप्लिकेट मालाचे उत्पादक वा व्यापारी कायम गिधाडासारखे बाजारावर घिरट्या घालत असतात आणि कसली टंचाई आहे वा तुटवडा आहे, त्याची चाहुल घेतच असतात. मध्यंतरी कोरोनाच्या भयगंडाने देशाला पछाडले असताना अशा भामट्यांनी वेगाने सॅनिटायझरचे बोगस उत्पादन सुरू केले होते आणि वेगाने त्याची विक्रीही आरंभलेली होती. पकडले जाण्यापर्यंत त्यांनी किती कमाई केली ते ठाऊक नाही. पण असा व्यवहार व्यापार तसाच चालत असतो. हा जगाचा नियम असेल तर माध्यमे व पत्रकारिता वा बुद्धीवादसुद्धा आता एक माल वा ग्राहक सेवाच झालेली आहे. तिथेही डुप्लिकेट माल बनवून तात्काळ अफ़वा पसरवणे व दिशाभूल करणारी माहिती संबंधितांना पुरवणे, व्हायरल करणे हा धंदा झाल्यास नवल नाही. या आठवड्यात अशाच एका डुलिकेट मालाचा बाजारात गवगवा झालेला होता. कुणा साकेत गोखले नावाच्या व्यक्तीने माहिती अधिकाराच्या मार्गाने रिझर्व्ह बॅन्केकडून माहिती घेतली आणि ६८ हजार कोटी रुपयांची कंपन्या उद्योगपतींची कर्जे माफ़ केल्याचा डुलिकेट माल बाजारात आणला. बघता बघता त्यासाठी व्याकुळलेल्यांनी त्यावर उड्या टाकल्या आणि बातमी व्हायरल होऊन गेली. मात्र राहुल गांधी वगळता बाकी कोणी त्या डुप्लिकेट मालाला ग्राहक मिळू शकला नाही.

कोरोनाच्या संकटातून देश वा अवघे जग जात असताना असे करावे काय? असला साळसूद प्रश्न विचारण्याची गरज नाही. डुप्लीकेट माल बनवणारे व विकणारे विपरीत परिस्थितीचाच फ़ायदा उठवित असतात. त्यामुळे अशी संधी त्यांनी सोडावी ही अपेक्षाच गैरलागू आहे. शिवाय कुमार केतकर वा तत्सम काही बाजारात पत असलेले थापांचे विक्रेते सज्ज बसलेले असल्यावर हा डुप्लिकेट बाजार चालणारच ना? एका व्हिडीओमधून केतकरांनी त्या अफ़वेवर काहूर माजवलेले आहे आणि इतरही माध्यमातून ती अफ़वा सुसाट फ़िरलेली आहे. सोशल माध्यम तर अफ़वांचे कुरणच असते. त्यामुळे त्यावरून उलटसुलट चर्चा रंगल्या व विविध पक्ष समर्थकांमध्ये जुंपली, तर अजिबात नवल नाही. अर्थखात्याने वा अर्थमंत्र्याने खुलासे देण्यापर्यंत बाजार आटोपलेला होता. एकदोन दिवसातच या डुप्लिकेट मालाची विक्री थंडावली. मालही बाजारात दिसेनासा झाला. पण असा डुप्लिकेट माल ओळखण्याविषयी लोकांना सतत जागृत करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने कुमार केतकर यासारखे बाजारात पत असलेले व्यापारी त्याचा गवगवा करतात, तेव्हा त्यावर धाड टाकणे अपरिहार्य होऊन जाते. पहिली गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बॅन्केच्या नावावर हा सगळा कर्जमाफ़ी नावाचा डुप्लिकेट माल खपवला गेला होता. पण जी बॅन्के कुठल्या कंपनीला वा संस्थेला कुठलेही कर्ज देतच नसेल, तर तिच्याकडून कुठलेही कर्ज माफ़ केले जाण्याचा प्रश्नच कसा उदभवू शकतो? पण रेटून खोटेच बोलायचे असल्यावर डुप्लिकेट मालाचे उत्पादन करावेच लागणार ना? असा डुप्लिकेट माल बनवला जातो, तेव्हा त्याच्या आवरणावरचे लेबल सराईतपणे खोटे बनवावे लागत असते. अशा लेबलात किंचीत फ़ेरफ़ार करून खर्‍या मालासारखे रंगरूप द्यावे लागते. एकदोन अक्षरे बदलून माल पेश केला जातो. रिझर्व्ह बॅन्केने कर्जाविषयी ‘राईट ऑफ़’चा निर्णय घेतला आहे आणि कर्जमाफ़ीला ‘वेव्ह ऑफ़’ म्हणतात. नेमकी तशीच गल्लत या डुप्लिकेट मालाच्या व्यापारीऊ उत्पादकांनी केलेली आहे.

अर्थात अशा डुप्लिकेट मालासाठी आजकाल कॉग्रेस पक्ष व त्याचे लहानमोठे विक्रेते सज्ज असल्याने उत्पादकांना वितरणासाठी फ़ार धावपळ करावी लागत नसते. अमेझॉन वा इतर ऑनलाईन कंपन्यांसारखे अफ़वांचे वितरण वेगाने होत असते. राफ़ेलमधला भ्रष्ट्राचार तुम्हाला आठवत असेल. दहा महिने त्या अफ़वेचा बाजार तेजीत चालला होता. त्यात अरूण शौरी वा यशवंत सिन्हा यांच्यासारखे दिग्गजही फ़सलेले होते. मग सामान्य माणसाची काय कथा? पर्यायाने त्या अफ़वेच्या मार्केटींगसाठी टॅगलाईन म्हणून ‘चौकीदार चोर है’ अशी गर्जनाही झालेली आठवते ना? त्यातलाच नवा प्रकार म्हणजे रिझर्व्ह बॅन्केने ६८ हजार कोटींची कर्जे माफ़ केली आणि लॉकडाऊनमध्ये फ़सले आहेत त्यांच्यासाठी पैसे नाही म्हणून सरकार रडते आहे, वगैरे. तेव्हापेक्षा हा आरोपही वेगळा नाही. जी बॅन्क कर्जच देत नाही, तिने कर्ज माफ़ केल्याची थाप मारणे म्हणजे निव्वळ शब्दछल आहे. राईट ऑफ़ ही हिशोबी भाषेतली एक  टर्म आहे. जी अडकलेली रक्कम वसुल होत नाही आणि त्यात काही हालचाल नाही, त्याला पुढले व्यवहार करण्यासाठी योग्य नाही मानून खाते स्थगीत केले जाते. त्याला राईट ऑफ़ म्हणतात. सतत मनमोहन सिंग वा चिदंबरमसहीत रघुराम राजन यांचे कोडकौतुक करणार्‍या केतकरांना वा अन्य संपादकांना त्या शब्दाचा अर्थ उलगडत नाही, असे अजिबात नाही. त्यांनाही त्याचा अर्थ कर्जमाफ़ी नसल्याचे नेमके कळते. पण युधिष्ठीर होऊन नरोवा कुंजरोवा म्हणणे, हा त्यांच्या भामटेगिरीचा मंत्र झाला आहे. कुठल्याही संरक्षण विषयक खरेदीचा करार व त्यातल्या अटीशर्तीचा तपशील जगजाहिर करता येत नाही, हे त्यांनाही पक्के ठाऊक होते, पण त्यांनीच राफ़ेल कराराचा तपशील जाहिर करायचा हट्ट धरलेला होताच ना? त्यांचेच संरक्षणमंत्री अन्थोनी व वा शरद पवार यांनाही त्यातली गोम ठाऊक आहे. पण अफ़वांचा बाजार चाललेलाच होता ना? रिझर्व्ह बॅन्केची कर्जमाफ़ी त्यातलाच प्रकार आहे.

आता प्रश्न असा येतो, की अशा अफ़वा कशाला पिकवल्या जातात? चोराच्या मनात चांदणे असे त्याचे खरे उत्तर आहे. आधीच्या दहा वर्षात आपणच युपीए सरकार म्हणून देशातील बहुतांश बॅन्कांचे दिवाळे वाजवले आहे, त्याचे पितळ उघडे पडण्याच्या भयगंडाने ह्या कॉग्रेस परिवाराला पछाडले आहे. त्याच्याच सावलीत दिर्घकाळ पहुडलेल्या शहाण्यांना पत्रकारांनाही आपले हातपाय त्यात अडकलेले सापडण्याचा भयगंड कायम सतावत असतो. सहाजिकच आपण चोर ठरण्याची भिती असल्याने आपलीच पापे भाजपाचे मोदी सरकारी करीत असते, असा देखावा निर्माण करणे अपरिहार्य आहे. ज्यांचे अशा कॉग्रेसी बुद्धीमंतांना प्रचंड कौतुक आहे, त्या राघुराम राजन या माजी रिझर्व्ह बॅन्क गव्हर्नरनेच त्यांचे पाप आधीच जाहिर केलेले आहे. सोळाव्या लोकसभेतील आर्थिक संसदीय समितीने एनपीए विषयात राजन यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते आणि त्यात त्यांनी साफ़ युपीएच्या सरकारनेच आपल्या कारकिर्दीत अधिकाधिक बुडीत कर्जे देऊन एनपीए नावाचा बकासूर जन्माला घातल्याचा खुलासा केलेला आहे. कुमार केतकरांना वा तत्सम लोकांना हे ६८ हजार कोटी रुपये राईट ऑफ़ केल्याचा म्हणून अर्थ कळतो. पण त्याचीच भितीही सतावते आहे. त्यामुळे आपल्या पापाचे खापर मोदी सरकारवर फ़ोडण्याचा हा खेळ चालू असतो. जे वसुल होणार नाहीत अशी कर्जे द्यायची आणि तशाच व्यवहारात आपला हिस्सा अलगद बाजूला काढण्याच्या प्रकरणात त्यांचेच माजी अर्थमंत्री तुरुंगाची हवा खाऊन आलेले आहेत ना? पण त्यांनाच क्लिन चीट देऊन नसलेल्या कर्जमाफ़ीचा डंका पिटणे केतकरांनाही भाग आहे. अन्यथा त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देऊन राहुलचा फ़ायदा काय? सहाजिकच केतकरांसारखे लोक अगत्याने ६८ हजार कोटी माफ़ झाल्याचा खोटा दावा करतात आणि ते हमखास बुडणारे कर्ज कोणी दिले होते, त्याविषयी गुळणी घेऊन गप्प बसतात. हीच डुप्लिकेटचा धंदा करणार्‍यांची खासियत असते.

आपला माल अस्सल असल्याचे सिद्ध करता येत नसल्याने त्यांना अस्सल मालाविषयी बाजारात संशय शंका यांचे रान पिकवावे लागत असते. अन्यथा आता अचानक हे ६८ हजार कोटी कर्जमाफ़ीचे प्रकरण अफ़वांच्या बाजारात विक्रीस आलेच नसते. कोरोनाच्या काळात प्रत्येक राज्याला वा केंद्रालाही पैशाची चणचण भासत असताना मोदी सरकारने बुडव्यांची कर्जे माफ़ केल्याचा डंका म्हणून पिटला जातोय. बिचार्‍या सामान्य माणसाला खरा वा खोटा सॅनिटायझर कुठे ओळखता येत असतो? तो नुसता लेबल बघून माल खरेदी करतो. हे ६८ हजार कोटींचे बालंट त्यापेक्षा वेगळी बाब अजिबात नाही. त्याविषयी रिझर्व्ह बॅन्केकडून माहिती मागवण्यात आली आणि त्यातल्या शब्द व आकड्यांची हेराफ़ेरी करून हा डुप्लिकेट माल तयार करण्यात आलेला आहे. त्यामागचा हेतूही समजून घेतला पाहिजे. ह्या डुप्लिकेट व्यापार्‍यांची अशी अपेक्षा होती, की लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधी लोक कुठेना कुठे अडकून पडलेले असतील. त्यांचे खाण्यापिण्याचे कमालीचे हाल होऊन रोष निर्माण झालेला असेल. मग त्यांच्या प्रक्षोभाच्या आगीत कर्जमाफ़ीचे तेल ओतून आगडोंब भडकवता येईल. पण गणित तिथेच फ़सले. सरकारी अपुरी साधने व सुविधांचे नियोजनबद्ध वितरण व वाटप करून मोदींनी असा कुठलाही असंतोष वा गैरसोय होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली. शिवाय हाल होऊनही लोक त्यांच्याच पाठीशी राहिले. त्यामुळे ह्या डुप्लिकेट आगलावू तेलकट अफ़वेचा काहीही परिणाम साधता आलेला नाही. म्हणून तर दोनतीन दिवसातच ती आग विझलेली आहे. मात्र हे डुप्लिकेट मालाचे व्यापारी पुरते तोंडघशी पडलेले आहेत. अर्थात त्यामुळे ते काही धडा घेतील वा सुधारणा होईल, अशी अपेक्षा बाळगणे मुर्खपणा आहे. ते पुढल्या संधीची प्रतिक्षा करणार व संधी मिळताच नवा डुप्लिकेट माल बाजारात आणायची संधी शोधणार आहेत. तो त्यांचा स्वभाव आणि धर्म दोन्ही आहेत. डुप्लिकेट उत्पादनाची बाजारपेठ अशीच चालते आणि क्वचितच पकडली जाते. मोदी तर अस्सल माल इतका भरपूर बाजारात पाठवत रहातात, की डुप्लिकेट मालाचा कुठल्याही बाजारात उठावच होऊ नये. ही अशा डुप्लिकेट बाजारपेठेची खरी समस्या आहे. कारण राहुल गांधी सोडून त्या अफ़वांवर कोणीच विश्वास ठेवत नाही.