Thursday, March 14, 2013

सेक्युलर पतिव्रतेची बांधिलकी



आपला गुलछबू नवरा आपल्यावर किती प्रेम करतो, याचे कौतूक त्याची पत्नी तिच्या मैत्रिणींना सातत्याने सांगायची. मजा अशी, की त्या मैत्रिणी तिच्या पतीप्रेमाला विरोध करीत नसत किंवा त्याबद्दल तिच्यासमोर कधी शंका घेत नसत. पण तिची पाठ वळली वा तिचे लक्ष नसेल; तेव्हा एकमेकींशी फ़िदीफ़िदी हसून त्या तिच्या पतीप्रेमाची टवाळी मात्र हमखास करीत असत. किंबहूना ती पतिव्रता त्यांच्यात नसली; मग तिच्या नवर्‍याची लफ़डी, हाच त्या मैत्रिणींचा कुजबुजण्य़ाचा मुख्य विषय असायचा. काही प्रमाणात हे तिच्याही कानी आलेले होते. पण मैत्रिणींना तिने कधी त्याबद्दल छेडले नव्हते. मग एके दिवशी या पतिव्रतेनेच मंडळातल्या दुसर्‍या मैत्रिणीच्या नवर्‍याला कुणासोबत बघितले आणि त्याची वाच्यता केली; त्यावरून खडाजंगी उडाली. तेव्हा मग हिच्या निष्ठावान नवर्‍याचा विषय खुलेआम आखाड्यात आला. तेव्हा आपल्या नवर्‍याचे प्रताप ऐकून तिचे डोके भणभणले. पण तिचा आपल्या पतीदेवावर अढळ विश्वास व निष्ठा होती. तिने चक्क मैत्रिणींचा नाद सोडला. ती त्यांच्या मंडळात जायची बंद झाली. याला म्हणतात पातिव्रत्य. त्यालाच म्हणतात बांधिलकी. सगळे जग एका बाजूला आणि आपण त्या बांधिलकीसाठी दुसर्‍या बाजूला.



एकेदिवशी तिचा नवरा ऑफ़िसमधून लौकर घरी आला आणि तब्येत थोडी बरी नाही म्हणून आलो, असे त्याने सांगितले. ही पतिव्रता खरेदी शॉपिंगला निघालेली. पतीने तिला निश्चिंत मनाने जायला सांगितले व अधिक तिच्याकडे आपले क्रेडीट कार्ड दिले. मस्त शॉपिंग करून यायला सांगितले. त्याला थकवा असल्याने भरपूर विश्रांतीची गरज होती. नवर्‍याच्या आग्रही व प्रोत्साहक वागण्याने पतिव्रता सुखावली. दाखवायपुरते थांबू का, डोके दाबून देऊ का, असे प्रश्न विचारले तिने. पण पतीनेच निघायचा आग्रह केला, तशी पडत्या फ़ळाची आज्ञा घेऊन, ती लगबगीने घराबाहेर पडली. पण बिचारीचे नशीब चांगले नव्हते. हातात क्रेडीट कार्ड असूनही, कुठे काही खरेदी करण्याजोगे तिला पसंतच पडत नव्हते. तासाभरात दोनतीन मॉल फ़िरून झाले. पण काहीच खरेदी जमली नाही. तेव्हा वैतागून नशीबाला दोष ती घरी परतली. मनात म्हणाली, कधी नाही ती पतिसेवा करू तेवढीच. बिचारा दिवसदिवस राबतो आपल्या चैनीसाठी. आज दुसरे काही काम नाही, तर पतिसेवेचे पुण्य पदरात पाडून घेऊ. मात्र याची तिच्या नवर्‍याला कल्पना नव्हती. शॉपिंग व क्रेडीट कार्ड असल्यावर लाडकी पत्नी तीनचार तास तरी माघारी येणार नाही, अशी त्याला खात्री होती. पण अनपेक्षितरित्या पतिव्रता तासाभरातच घरी परतली; तर दोघांनाही थक्क व्हायची पाळी आली. दोघांचा आपापल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, अशी स्थिती होती.

शयनगृहात त्या पतिव्रतेचे निष्ठावान पतिदेव भलत्याच कुणा अप्सरेसोबत प्रणयक्रिडेत रममाण झालेले होते. पतिव्रतेची सगळी झिंग क्षणात उतरली. आजवर मैत्रिणी सांगत होत्या; त्याचा साक्षात पुरावा तिच्या घरात व तिच्या समोर हजर होता. त्यामुळे रागाने बेभान झालेल्या पतिव्रतेला बोलताही येत नव्हते. तिच्या तोंडातून शब्दही फ़ुटत नव्हता. पण तो पतिदेव कसला बेरक्या. काही क्षणातच सावरला आणि आपल्या लाडक्या पत्नीला म्हणाला, लाडके काय झाले? तू अशी विचलित का झाली आहेस? तुला थक्क व अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही. मी तुझ्याशीच एकनिष्ठ आहे. तुला जे काही दिसते आहे व दिसले आहे; त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आपण बांधिलकी व नितीमुल्ये जपणारी माणसे आहोत ना? मग जे दिसते त्याच्यावर विश्वास कसा ठेवून चालेल? तुझ्या पतीच्या शब्दावर विश्वास ठेव, तुझ्या पातिव्रत्यावर विश्वास ठेव. तुला फ़सवणार्‍या तुझ्या डोळ्य़ावर विश्वास ठेवून आजवर जपलेल्या निष्ठेची व बांधिलकीची नासाडी करणार आहेस का? निष्ठा, बांधिलकी आपल्याला कधी फ़सवत नाहीत. आपले डोळे फ़सवत असतात लाडके.

ती पतिव्रता तशीच उठली आणि तडक महिला मंडळात आली. तिला अनेक दिवसांनी परतल्याचे पाहून सगळ्या मैत्रिणी एकदम गप्प झाल्या. तर त्या शांततेचा भंग करीत आपली ही पतिव्रता म्हणाली. मला माझा पती निष्ठावान असल्याची खात्री पटली. उगाच तुमच्यावर चिडून क्लब सोडला होता. आपल्या सगळ्यांचेच नवरे किती निष्ठावान व बांधिकलीचे आहेत, त्याची आताच घरी खात्री पटली. अनुभवाचे बोल सांगते मैत्रिणींनो. त्या दिवशी रागावून निघून गेले त्याबद्दल माफ़ करा. सगळ्यांनी तिचे उभे राहून पुन्हा क्लबमध्ये स्वागत केले. आता तीही असल्या कुजबुजीमध्ये आडपददा न ठेवता सहभागी झाली. काही वेळाने कुजबुज संपली आणि उद्या वटसावित्रीच्या सणाला काय काय करायचे, त्याच्या नियोजनात मैत्रिणी रंगून गेल्या. 
----------------------------------------- 
असो. ही अर्थात एक भाकडकथाच आहे. पण त्यातला जो बोध आहे तो अस्सल सेक्युलर आहे. ज्या व्रतवैकल्याची सेक्युलर मंडळी हेटाळणी व टवाळी करण्यात धन्यता मानतात, त्याचे अनुकरण मात्र किती अगत्याने करतात, त्याची ही कहाणी आहे. आठवते दोन महिन्यांपुर्वी लोकसभा व राज्यसभेत एफ़डीआयचा मुद्दा गाजत होता. तेव्हा मुलायम व मायावती यांनी तावातावाने त्या परदेशी गुंतवणूकीच्या प्रस्तावाविरोधात भाषणे केली होती आणि त्या निर्णयामुळे देशाची व जनतेची किती घोर फ़सवणूक होणार यावर पांडित्य सांगितले होते. पण जेव्हा विषय मताला टाकायची वेळ आली; तेव्हा मुलायमचा समाजवादी पक्ष कथेतल्या पतिव्रतेप्रमाणे सभात्याग करून बाहेर पडला होता आणि भाषण विरोधी करूनही मायावतींनी सेक्युलर सरकारला अभय देण्यासाठी राज्यसभेत प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले होते. मग त्या भाकडकथेतला गुलछबू नवरा कोण आणि सेक्युलर पतिव्रता किती व त्यांचे वटसावित्रीचे व्रत कुठले; ते आणखी स्पष्ट करून सांगायला हवे का?


3 comments:

  1. मी नाही त्यातली. आणि कडी लाव आतली हा प्रकार आहे.

    ReplyDelete
  2. भाऊ, सेक्युलर पतिव्रता पत्रकारांना अतिरेक्याच्या म्हणजे त्यांच्या "ह्यांचे" नाव डायरेक्ट घेता येत नाही, त्यामुळे ते उखाण्यात घ्यावे लागते. मग 'रस्ता चुकलेले युवक', 'कट्टरपंथी' असे अपरोक्ष उल्लेख करून या पतिव्रता संसार सांभाळत पत्रकारिता करतात. या तुमच्या निरीक्षणाने बहार आणली... तुमची उपमा लैच भारी होती. लैच. !! तुमच्या एका धारदार वाक्यामुळे त्यांच्या 'रवींद्र स्टेडीयम' प्रकरणातील कम्युनिस्टपिडीत महिला झाल्या !! आणि त्याना त्यांचेच वृत्तपत्र गुंडाळून सैरावैरा पळायची पाळी आली असावी. .(पण नगरवधूना पाळी येत नसते म्हणतात.)

    ReplyDelete