Friday, February 19, 2016

आयडिया ऑफ़ इंडीयाचे थोतांड

गुरूवारी विविध राष्ट्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंनी एकमुखी निर्णय घेतला की प्रत्येक संस्थेच्या आवारात उंचावर भव्य तिरंगा कायम फ़डकता ठेवायचा व उभारायचा. त्याची सुरूवात नेहरू विद्यापीठातून करावी. तात्काळ त्यावर सेक्युलर आक्षेप सुरू झाले. विद्यापीठात मोक्याच्या जागी ठळकपणे तिरंगा लावण्याने समाजात दुफ़ळी व धृवीकरण होईल, अशी भिती पुरोगाम्यांना वाटल्याचे मतप्रदर्शन सुरू झाले. त्याचा अनेकांना धक्का बसला. कारण अजून आपण नेमके पुरोगामी असणे म्हणजे काय तेच समजून घेतलेले नाही. राष्ट्रध्वजामुळे देशाची एकात्मता धोक्यात येण्याची ही ‘आयडिया’ कुठून जन्माला आलीय?
याची सुरूवात दोन अडीच वर्षापुर्वीच झालेली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आल्याच्याही आधीपासून त्याचे वेध लागलेले होते. म्हणूनच भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वालाही खबर नव्हती, तेव्हापासून विरोधकांनीच मोदींच्या पंतप्रधान पदाला विरोध सुरू केलेला होता. भाजपातही कोणी मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे बोलतही नव्हता, तेव्हा कडव्या कट्टर मोदी विरोधकांनी त्याची नांदी केली होती. कारण स्पष्ट आहे, विविध मतचाचण्या घेतल्या जात असतात आणि त्याचा तपशील सर्वात आधी माध्यमाच्या मुखंडांना मिळत असतो. २०११ पासून युपीए सरकारची लोकप्रियता ढासळू लागली, तेव्हापासून मोदी या माणसाकडे लोकमत झुकत असल्याचा पहिला सुगावा माध्यमांना अशा चाचण्यांमधून लागला होता. मग त्याच माध्यमाच्या म्होरक्यांनी भाजपाला डिवचून मोदी हा विषय बनवला होता. भाजपातले नेते मोदींच्या मुस्लिमविरोधी प्रतिमेने विचलीत होते, त्याना अधिक अस्वस्थ करण्यासाठी नेमका तोच प्रश्न विचारून हैराण केले जात होते. उलट सेक्युलर पक्ष, त्यांचे नेते व प्रवक्ते भाजपाला मोदींना पुढे आणाच, म्हणून आव्हानही देवू लागले होते. मोदी उमेदवार झाले तर भाजपाचा बोजवारा उडालाच म्हणून समजा, अशा वल्गना माध्यमातून व विरोधकांकडून चालू होत्या. भाजपातही त्याच्या विरुद्ध युक्तीवाद करण्याची हिंमत कोणी दाखवत नव्हता. मात्र बहुतांश वरीष्ठ सेक्युलर पुरोगामी नेते व विचारवंतांना मोदी बाजी मारतील, याची पक्की खात्री होती. म्हणून ती वेळच येऊ द्यायची नसेल तर उमेदवारीच्या शर्यतीतच मोदींना बाद करण्याच्या डावपेचातून हा प्रकार २०११ साली सुरू झाला होता. जेव्हा त्याचा उपयोग झाला नाही, तेव्हा दुसरी सेक्युलर फ़ळी मैदानात आणली गेली. ज्यात अमर्त्य सेन, अनंतमुर्ति वा तत्सम राजकारणबाह्य चेहरे पुढे करण्यात आले होते. मोदी आल्यास विनाश होईल, देश सोडून पळून जावे लागेल, अशी भाषा तथाकथित नामवंत छुप्या सेक्युलरांनी सुरू केली तो एकूण रणनितीचाच भाग होता. इतके होऊनही डावपेच उलटत गेले आणि अखेरीस मोदींच्या हाती देशाची सुत्रे गेली.
म्हणूनच आज नेहरू विद्यापीठात वा अन्यत्र ज्या देशद्रोही वा अन्य घातपाती कारवाया उफ़ाळून आल्या आहेत, त्याची दिर्घकालीन पार्श्वभूमी तपसून बघणे भाग आहे. मोदी राजकारणात नव्हते आणि भाजपा राष्ट्रीय राजकारणात मोठा पक्षही नव्हता, तेव्हापासूनच्या प्रदिर्घ कारस्थानाचा आज दिसतो आहे, तो एक टप्पा आहे. त्यात तात्कालीन कारणे दिसत असली, तरी तो निव्वळ आभास आहे. भारत नावाचे राष्ट्र आपल्या मजबूत पायावर उभे राहिले, तर जगातल्या सर्व महाशक्तींना आव्हान ठरू शकेल, हे वेगळे सांगायला नको. म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताला आपल्या पायावर उभे राहू द्यायचे नाही, यासाठी प्रयास सुरू झाले होते. शत्रू हा कधी उघड तर कधी छुप्या मार्गाने तुमचा घात करीत असतो. त्यातला छुपा मार्ग अतिशय सुरक्षित पण दिर्घकालीन असतो. ज्यामार्गे स्वकीयातच दुष्मन घरभेदी निर्माण करण्याची योजना असते. भारतासारख्या खंडप्राय देशाला दुबळा राखण्याची ही योजना तेव्हाच्या दोन महाशकतींनी आपापले हितसंबंध बघून योजलेली होती. त्यातला एक गट अमेरिकावादी तर दुसरा गट सोवियत कम्युनिस्टवादी होता. दोघांचे डावपेच भारताला परावलंबी राखण्याचे होते आणि त्यासाठी त्यांनी भारताला आतून पोखरण्याच्या विविध योजना कार्यक्रम आखलेले होते. दिसायला ते भारताच्या प्रगतीला चालना देणारी मदत असेच होते. पण वास्तवात बघितले, तर त्यातून अमेरिका वा सोवियत रशिया यांच्याशी निष्ठेने वागणारे हस्तक निर्माण करण्याचा घाट होता. सहाजिकच त्या स्पर्धेत देशी राजकारण व समाजकारण बाजूला राहिले आणि रशिया विरुद्ध अमेरिका अशा परकीय हस्तकांकडे देशातील सामाजिक नेतृत्वाची सुत्रे जात राहिली. त्यांच्यातच बौध्दिक व वैचारिक संघर्ष होत राहिले व त्यालाच बुद्धीवाद अशी मान्यता देण्याच्या मर्यादा घालण्यात आल्या. त्यामध्ये कुठेही अस्सल स्वदेशी तत्वज्ञान विचारांना स्थान रहाणार नाही, याची झकास काळजी घेतलेली होती. त्यामुळे भारतीयत्वाची लाज वाटणे हा एकूण बुद्धीजिवींच्या बुद्धीचा पाया बनवला गेला. भारतीय असण्यातला कमीपणा हा प्रतिष्ठेचा विषय बनवण्याच्या विषवल्लीचे परिणाम आज अनुभवायला मिळत आहेत.
दोन गटात विभागल्या गेलेल्या या परकीय हस्तक बनवण्याच्या योजना कार्यक्रमांना बौद्धिक वा सांस्कृतिक देवाणघेवाण असे भासवले जात होते. पण प्रत्यक्षात भारतीय बुद्धीमान तरूणांच्या मनात व मेंदूत आपल्याच वारसा किंवा संस्कृतीविषयी घृणा व न्युनगंड जोपासण्याचे काम त्यातून चालू झालेले होते. कुठलाही देश वा समाज आपली जीवनमूल्ये, नितीमूल्ये यांचा अभिमानावर उभा रहात असतो, किंवा त्यांच्याअभावी रसातळाला जात असतो. भारताचा स्वातंत्र्यलढा गांधीजींनी स्वदेशी अभिमानाच्या पायावर उभा केलेला होता. तीच जीवनमूल्ये खच्ची करण्याचे सांस्कृतिक कार्यक्रम पुढे नेहरूंनी आधुनिक भारत उभारण्याच्या नावाने राबवलेले दिसतील. त्यातून मग वास्तव भारत ही संकल्पना गायब झाली आणि ‘आयडिया ऑफ़ इंडीया’ हा परवलीचा शब्द झाला. आपण आज तमाम चर्चा परिसंवादात हाच शब्द सातत्याने ऐकत असतो. वास्तविक भारत, त्याच्या समस्या किंवा प्रश्न यावर चर्चा होत नाही. तर ‘आयडिया ऑफ़ इंडीया’चे काय होणार, याविषयी आवेशपुर्ण चर्चा होत असतात. जे वास्तवात आहे त्याचे नाव भारत नावाचा देश आहे. त्याची आयडिया म्हणजे काय? तर कल्पना! असलेला भारत निकालात काढायचा आणि त्यापेक्षा भलताच भारत उभा करायचा म्हणजे, आयडीया ऑफ़ इंडीया! तो उभा करायचा असेल, तर मुळात भारत म्हणून जी काही ओळख आहे, ती साफ़ उध्वस्त टाकली पाहिजे. कुठल्याही समाजाची ओळख म्हणजे त्या लोकसमुहाच्या अभिमानास्पद अशा सामुहिक आठवणी व स्मृती असतात. त्याच लज्जास्पद असल्याचे सतत बोलत व मनावर बिंबवत राहिले, मग त्याचा तिटकारा येऊ लागतो आणि त्यापेक्षा वेगळ्या अभिमानाची काल्पनिक प्रतिके असा स्मृतीभ्रंश झालेला माणुस शोधू लागतो, स्विकारू लागतो. आज विविध विद्यापीठात बुद्धीमान हुशार मुलांना वंदेमातरम वा भारतमाताची जय अशा घोषणा घातक वाटतात. कारण त्यातला अभिमानच त्यांना लज्जास्पद वाटतो आहे. तसे त्यांना वाटण्याचे संस्कार मागल्या सहा दशकात पद्धतशीररित्या केलेले आहेत. वास्तव भारतापेक्षा त्यांना ‘आय़डिया’ आपली वाटू लागल्याचा तो परिणाम आहे.
सोवियत कम्युनिस्टांचे इथले बगलबच्चे व अमेरिकन हेरखात्याच्या पैशावर संस्थांवर पोसलेल्या विविध भारतीय बुद्धीमंतांनी हा चमत्कार घडवून आणलेला आहे. आज पुरोगामी, उदारमतवादी, सेक्युलर किंवा डावे म्हणून आपण ज्यांना एकवटलेले बघतो. ते मुळात एकाच विचारसरणीचे एकजीव घटक नाहीत. ते मूलत: दोन विभीन्न विचारसरणीचे, पण पक्के भारतद्वेष्ट्या गटातले आहेत. अमेरिका व सोवियत युनियन यांच्यातल्या वैरापायी हे त्यांचे हस्तक दिर्घकाळ भारतामध्ये एकमेकांच्या उरावर बसल्यासारखे खेळत होते. पण १९९० च्या सुमारास सोवियत साम्राज्य कोसळून पडले आणि त्यांच्या इथल्या पित्त्यांना कोणी वाली राहिला नाही, तरी त्यांच्या अंगी भिनलेला भारतद्वेष संपला नव्हता. म्हणूनच अशा जुन्या सोवियतनिष्ठ कम्युनिस्टांनी अमेरिकन भारतद्वेषी गोटात आश्रय शोधला. त्यामुळे आज हे सगळे एकत्र दिसतात. कारण परस्पर विरोधी असले तरी त्यांचे उद्दीष्ट एकच व समान आहे. फ़ोर्ड फ़ौंडेशन, रॉकफ़ेलर फ़ौंडेशन अशा नावाखाली अमेरिकन हेरखात्याने अशा भारतद्वेषाची पेरणी इथे केली, तर त्यांना शह देण्यासाठी सोवियत सत्ताधारी इथल्या डाव्या विचारांच्या लोकांना वापरत राहिले. तेव्हा त्यांच्यात कडाक्याची भांडणे होती आणि सोवियत हस्तकांच्या विरोधात इथले समाजवादी ‘राष्ट्रवादी’ (आजची संघाची, भाजपाची) भाषा बोलत होते. आता दोघे एकत्र येऊन समान भारतद्वेषी भूमिका मांडत आहेत. त्यामागे हिंदूत्वाचा वा धर्माचा विरोध अजिबात नाही. कारण हिंदूराष्ट्र कधीच होऊ शकणार नाही आणि हिंदू समाजच त्याचे राजकारण करणार नाही, हे अशा पुरोगाम्यांना पक्के ठाऊक आहे. मात्र राष्ट्र या संकल्पनेसाठी हिंदू समाज सर्वस्व पणाला लावू शकतो, हे त्यांना माहिती आहे. म्हणून आता हिंदूत्वापेक्षा राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद यांची खिल्ली उडवण्याची मोहिम हाती घेतलेली आहे. हे सर्व अचानक झालेले नाही. अमेरिकन व सोवियत पैशाने रुजवलेली व पोसलेली ही विषवल्ली आहे. तिचा इतिहास समजून घेतल्याखेरीज या दुखण्याचे रोगनिदान होऊ शकत नाही की, त्यावरचे उपाय उपचार करणेही शक्य नाही. पुढल्या काही लेखातून त्याचे पोस्टमार्टेम म्हणूनच करावे लागणार आहे.

11 comments:

 1. Bhau, this is absoluely true.These people were abusing RSS and questionig its patriotism as there was not national flag on its
  headquarter.And now they are arguing that that is not the criterion of nationalism or patriotism.

  ReplyDelete
 2. भाऊ खरोखरच अप्रतिम .

  ReplyDelete
 3. भाऊ तुम्हाला ति्वार वंदन तुम्हाला सरस्वती ची कृपा आहे भाऊ हा लेख वाचतांना डोळ्यातून पानी आले अगदी मन सुन्न झाले असा हा ऐतिहासिक लेख आहे एक भाऱतवासीला विचार करण्यासाठी या भामट्यांनी देशाची दयनीय अवस्था करुण टाकली खूप अपमानित केले आता ही विषवल्ली कशी ठेचावी हे पुढे लेखातुन लीहावे धन्यवाद

  ReplyDelete
 4. भाऊ, या विषयावर पूर्णपणे 1947 पासून घटनाक्रम मांडला तर फार सोपे होईल. नव्या पिढीला समजेल आणि राष्ट्रप्रेम खडखडीत जागे होईल.हे तुम्हीच करू शकता.

  ReplyDelete
  Replies
  1. aplya matashi sahamat ahot. purn ghatna kram kalalyas samajnyas adhik soyiskar padel

   Delete
  2. नंदु वालव्हेकर यांनी दिलेल्या मतावर विचारपूर्वक १९४७ पासुन घटनाक्रम ठरवुन नवीन पिढीला एक दिशा उद्याची नव्या युगाची हा लेख लिहावा हि विनंती•

   Delete
 5. Bhau You are great..My message /humble request to my friend close to Sangh ...

  Pl read today s Tarun Bharat and article by Bhau Torasekar...
  If you hav so much influence on Sangh parivar ask them to convert Bhau Torasekar daily articles on blog in hindi English Tamil Kannad Bangali Odisi languages at least it will do revolution. Sanghatlya Bhatana sakade ghal nahitar ladu modak puranpoli jilebi khaun peshyan chya 3rd 4th pidhi sarkhi shivshahi Nasht karatil Modi raj vat. .jo ek aaj ashecha kiran aahe...Translation must be done daily immediately on publishing the blog by Bhau..
  As you hav no space given by Idiators in media to express on debates ..
  Take benefits of social media. ..
  And let south and East be part of National demand as of west and north..
  Bhau tumhala trivar Salam
  Amool Shetye

  ReplyDelete
 6. जर इतकीच इच्छा असेल तर एक असे न्यूज चैनेल उभारायला मदत करा,ज्यामध्ये भाऊ सर्वेसर्वा असतील.नितीन गडकरी,मनोहर जोशी,असे दिग्गज आजही उपलब्द्धेे आहेत,जे हा खर्च पेलू शकतील. शिवसेनेने आजपर्यंत राम जेठमलानी,धूत,चंद्रिका केनिया,संजय निरूपम,प्रितीश नंदी,संजय राऊत,भारतकुमार राऊत यांच्यापेक्षा भाऊंना संधी दिली असति,तर आज सेनेची राष्ट्रीय पातळीवर वेगळी प्रतिमा उभी राहिली असती.मित्रांनो, आजही आपण प्रत्येकाने थोडासा जरी हातभार लावला,तरी देशाचे एक उत्क्रुष्ट चैनेल जगासमोरा खरा भारत दाखवेल.

  ReplyDelete
 7. भाऊ,
  अप्रतिम लेख!
  प्रत्येक घरात फ्रेम करून लावण्यासारखा.
  दुर्दैवान आपला देश, धर्म आणी संस्कृती बद्दल भारतीयांच्या मनात न्यूनगंड निर्माण करण्यात देशद्रोही यशस्वी झालेत पण आपण सर्वजण मिळून हि परिस्थिती बदलू शकतो .

  ReplyDelete