Tuesday, October 8, 2019

थकले रे नंदलाला

Image result for sushilkumar shinde rahul

नाच नाचुनी अती मी दमले
थकले रे नंदलाला

निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला
उपभोगाच्या शतकमलांची, कंठी घातली माला

विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला
अनय अनीती नुपूर पायी, कुसंगती कर ताला
लोभ प्रलोभन नाणी फेकी, मजवर आला गेला

स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना, सादही गोठून गेला
अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला

साठ वर्षापुर्वी आधुनिक वाल्मिकी मानले गेलेल्या गदिमांनी लिहीलेले हे काव्यगीत. त्या काळात जागोजागी वाजत होते. खुप प्रसिद्ध होते. योगायोग कसा असतो बघा. त्याच्या आसपासच्या कालखंडात गदिमा हे कॉग्रेसचेच विधान परिषदेतील आमदार होते आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी तो उमेदवारीचा काळ होता. मात्र आपल्याच पक्षात कार्यरत असलेल्या एका प्रगल्भ प्रज्ञावंताच्या या काव्यातला आशय समजायला शिंदे यांना साठ वर्षे उलटून जावी लागली.



कालपरवा विधानसभा उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करायला गेलेल्या सुशीलकुमारांनी काय वक्तव्य केले? त्यांच्या वक्तव्याची चर्चा वाहिन्यांवर आणि बातम्या वर्तमानपत्रात वाचल्या आणि लगेच आठवले, ते ‘जगाच्या पाठीवर’ चित्रपटातले हे आशयगर्भ गीत. यातले शब्द गदिमांनी लिहीले, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर फ़क्त त्या चित्रपटाचे कथानक होते. पण आजच्याच नव्हेतर गेल्या तीनचार दशकातल्या कॉग्रेस पक्षाच्या वाटचालीचे वर्णन जणू त्यांनी या मोजक्या शब्दात करून ठेवलेले नव्हते का? तेव्हा किंवा आजही अनेकजण कधीतरी ते गीत ऐकत असतील आणि त्यावर फ़िदा होत असतील. पण शब्दांच्या व स्वरांच्या पलिकडे एक आशय असतो, त्याचे काय? शिंदे यांनी त्या आशयाकडे बघितले नसेल तर किती लोकांना यातले काव्य व मतितार्थ उमजलेला असतो? सुशिलकुमार आपल्या भाषणात म्हणाले, राष्ट्रवादी असो किंवा कॉग्रेस असो, दोन्ही पक्ष आता थकून गेले आहेत आणि एकत्र येऊन आपल्याला काही करावे लागेल. अन्यथा दोघांनाही भवितव्य नाही. त्याच दिवशी दसरा मेळाव्यात शिवाजीपार्क येते बोलताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांची खिल्ली उडवली. ‘कशाला थकलात? काय करून दमलात?’ असाही जाहिर सवाल केला होता. खरेच, असे कोणते महान कार्य करून शिंदे वा तत्सम कॉग्रेस कार्यकर्ते थकून गेलेत? कशामुळे पक्ष थकून गेलाय? मागल्या दोन दशकात कॉग्रेससाठी असे काय पराक्रमाचे काम शिल्लक उरले होते, किंवा नेमून दिलेले होते? नुसतेच नाचगाणे चालू नव्हते का? नुसते नाचून दमलात. गांधी घराण्याच्या आणि वंशजांच्या मनोरंजनासाठी नाचून थकण्यापेक्षा, या पक्षाने वा त्याच्या नेत्यांनी नेमके काय कर्तृत्व गाजवले आहे? सुशिककुमार शिंदे यांनी दिल्लीच्या राजकारणात काय केले? राहुल वा प्रियंकाची मर्जी संभाळण्याच्या पलिकडे असे कोणते काम पार पाडले? जुन्या काळात राजे रजवाड्यांच्या मनोरंजनासाठी नाचगाण्याचे कार्यक्रम व्हायचे, त्यापेक्षा अलिकडल्या कॉग्रेस पक्षात नेत्यांना अन्य काही कार्य उरले होते काय? म्हणूनच शिंदे थकले म्हटल्यावर गदिमांचे हे काव्य आठवले.

नुसते गदिमांचे शब्द आठवले नाहीत. जसेजसे शब्द आठवत गेले आणि उलगडत गेले, तसतसा त्यातला सुसंगत आशय उलगडत गेला. किती नेमके शब्द असावेत? ‘निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला, आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला’. यातला कुठला शब्द असा आहे, की जो शिंदे, चिदंबरम, मनमोहनसिंग वा तत्सम कॉग्रेसश्रेष्ठी म्हणवणार्‍यांना लागू होत नाही? स्वच्छ पांढरे कपडे कायम परिधान करणार्‍या शिंदे यांनी कधीतरी ‘कटीस नेसलेल्या’ वस्त्रांकडे डोळसपण बघितले होते काय? राहुलबाबा वा सोनियांनी गृहमंत्रीपदी बसवले, म्हणून सहा वर्षापुर्वी जयपूर संमेलनात संघाच्या शाखेवर दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते; असले धडधडीत असत्य बोलण्याला प्रामाणिकपण म्हणतात, की निलाजरेपण म्हणतात? त्याला बुद्धीमान निवेदन म्हणतात, की कुणाच्या तालावर कठपुतळीसारखे नाचणे म्हणतात? त्यामुळे सुशिलकुमार थकले तर कुठल्या नाचामुळे थकलेत, तेही समजू शकते. त्याच नाचाचे वर्णन गदिमांनी मोजक्या शब्दात केलेले नाही काय?  लोकशाहीत सत्ता जनतेच्या भल्यासाठी असते. पण त्या सत्तेची पदे व अधिकार राबवताना शिंदे किंवा मनमोहन सिंग यांना एकदा तरी ती सामान्य जनता आठवली होती का? ज्या कॉग्रेस पक्षाची मशागत लाखो कार्यकर्त्यांनी चारपाच पिढ्या खपून केली, त्यांच्यासह जनतेकडे पाठ फ़िरवून सत्तालालसेचे चोचले पुरवण्यात सगळे नेते रममाण झालेले नव्हते काय? राहुलचा खुळेपणा किंवा प्रियंकाच्या नवर्‍याने केलेला दिवाळखोर भ्रष्टाचार; यांच्यावर पांघरूण घालण्यापेक्षा अशा नेत्यांनी गेल्या दोन दशकात केले काय? खुर्शीद म्हणतात, पक्षाचा नेताच पळून गेलाय आणि पक्ष निर्नायक झालाय? बाकी शिंदेजी पक्ष थकलाय तो जनतेत जाऊन काम करायला. पण दिसतेय काय? तोच थकलेला पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरायला थकला आहे. पण चिदंबरम वा शिवकुमार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेत, त्यांच्या अटकेला विरोध करताना थकलेला नाही. पवारांवर इडीने गुन्हा दाखल केला, तर तिथे धुमाकुळ घालायला त्यांच्या पक्षाला थकवा आलेला नाही. थकवा फ़क्त जनतेच्या खर्‍याखुर्‍या समस्यांच्या सोडवणूकीसाठी आलेला आहे. बाकी नाचून थकवा अजूनही येत नाही ना?

शिंदेजी, गदिमांच्या त्या गीतातील शेवटचा अंतरा तर तुमच्या व खुर्शीद यांच्या कबुलीचे केलेले भाकितच नाही काय? किंबहूना आज कॉग्रेसला ज्या आजाराची बाधा झालेली आहे, त्याचे रास्त निदानच गदिमांनी साठ वर्षापुर्वी करून ठेवलेले आहे ना? ‘स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला’. सोनिया असोत की शिंदे पवार असोत. त्यांना स्वत:भोवती गिरक्या घेताना जनता दिसेनाशी झाली. मतलबाच्या गिरक्या घेताना लोकांचे प्रश्न समजेनासे झाले. ‘अंधपणा की आला’ ना? सत्तेच्या मस्तीत २००४ ते २०१४ राहुलपासून शिंदे यांच्यापर्यंत किती कॉग्रेस नेते डोळे उघडून सूर्य बघू शकत होते? एकमेकांची पाठ थोपटण्यातून या गिरक्या वेगवान होत गेल्या आणि आंधळेपणाने सत्ता राबवताना, त्यालाच डोळसपणा ठरवण्यात तुम्ही सगळेच रमलेले नव्हता का? अजून कुठे जाग आलीय? गदिमा पुढे म्हणतात, ‘तालाचा मज तोल कळेना, सादही गोठून गेला’ नाचतानाही तालाचा तोल कळावा लागतो आणि त्याचा तोल गेला, मग कोसळण्याला पर्याय नसतो. पण जाताना संभाळतात, त्यालाच तोल म्हणतात, हे कोणी कोणाला सांगावे? सगळेच सैरभैर मस्तवाल झालेले असल्यावर शुद्धीत बोलायचे कोणी? आणि चुकून कोणी शुद्धीत बोलायला धजावला, तरी त्याची खैर नव्हती ना? जेव्हा अशी स्थिती येते, तेव्हा साद आणि प्रतिसादही गोठून जातो. जनतेचा प्रतिसाद गोठलाय, कारण कॉग्रेस जनतेला साद कशी घालावी, तेच विसरून गेलीय. राफ़ायल म्हणून आठ महिने आक्रोश केला आणि आता तेच विमान भारताच्या ताफ़्यात सामील होत असताना राहुलबाळ गायब आहे. साद गोठला त्याचा तोच मतितार्थ नाही का? याची एकूण गोळाबेरीज गदिमा शेवटच्या अंतर्‍यात शेवटच्या ओळीत सांगतात. ‘अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला’. राष्ट्रवादी असो की कॉग्रेस, आज अंधारात उभे आहेत आणि आंधळेही झालेले आहेत. काही दिसत नाही आणि दिसत असले तर बघता येत नाही. सहाजिकच जगण्यालाही जीव घाबरून गेलाय ना? मग उत्स्फ़ुर्तपणे सुशिलकुमारांच्या तोंडून शब्द बाहेर पडले....

थकले रे नंदलाला

25 comments:

  1. Wa wa bhawu atishay uttam. GaDiManchi lekhani ani tumache nirupan. me sadhya 45 chya asapas ahe. khup warshanni he geet ale samor. Anay ani Nisug shabdancha arth mala shodhawa lagala. Marathi madhye shikun mazi hi awastha ahe nawin pidhi sathi ajun 10 warshat GaDiMa he prakrut kinwa ardhamagadhi madhye lihit hote ase watel. sadhya jase Dyaneshwari samjayala awaghad ahe tashich 50-60 warshat marathichi durawastha zali ahe khari.

    aso wishay bharkatala pan hyanni lawakar niwrutta vhave hech khare. khup gaal sachalay mokala howu det

    ReplyDelete
  2. अफाट!!!! दुसरा शब्दच नाही. तसे हे गाणे अध्यात्मिक आहे पण त्याचा इतका चपखल व्यावहारिक अर्थ आणि अन्वय तुम्हीच लावू शकता. ग्रेट !!!!

    ReplyDelete
  3. भाऊ जबरदस्त। मानलं तुम्हाला अत्यंत परखड विश्लेषण

    ReplyDelete
  4. भाऊ तुमच्या पुढे नतमस्तक

    ReplyDelete
  5. Wonderful भाऊ काका !👍

    ReplyDelete
  6. नेमकेपना चपखल

    ReplyDelete
  7. Bhai kay talaash bhudhimatta ani vicharsarni kharach sashtagnaman mala tumhala rating denyachi patrata mulich nahi pan manatun stutipurna ++++++++++(unlimited) dev tumhala udand aayush devo hich prarthana kripya bhai chya aivaiji bhai v talaash vaiji tallakh vachave chiki baddal khamasva

    ReplyDelete
  8. 100 नंबरी विवेचन!भाऊ तुम्हाला सलाम!

    ReplyDelete
  9. थकले रे नौदलाला -- बिनतोड!

    ReplyDelete
  10. 'ये शिंदे कौन है' असे वाक्य मागे केजरीवाल यांनी वापरले होते. आता अनेक काँग्रेसवाले म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांचे सहकारी हेच म्हणतील.

    ReplyDelete
  11. श्री भाऊ उपमा कशा वापरायच्या ते तुमच्याकडून शिकावं, तुमचे लेख मंजे मेजवानीच, पण मला नाही वाटत कोणी कन्ग्रेसी हे वाचत असेल

    ReplyDelete
  12. हे गाणे माझे अत्यंत आवडीचे आहे व आशा भोसलेंनी ते अत्यंत जीव ओतून म्हटले आहे , पण ह्या गाण्यातील तुम्ही सांगीतलेला अर्थ मला नव्याने कळत आहे. तसेच ह्या लोकांशी तो इतक्या चपखल लागू होईल हे तुम्ही उलगडून सांगीतल्यानेच समजतंय !

    ReplyDelete
  13. भाऊ,सर्व प्रथम आपले सर्वांचे दैवत व शब्दांवर विलक्षण प्रभुत्व असलेले ग.दी.मा. यांना शिर साष्टांग दंडवत.तौयांचे हे अजरामर गीत आजही काळाच्या कसोटीवर उतरले आहे व सध्याच्या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या दयनीय अवस्थेचे चपखाल पणे वर्णन करते.नेहमी प्रमाणे आपला लेख अभ्यासपुर्ण व या दोनही पक्षाच्या ह्रासाचे वर्णन करणारा.काँग्रेस पक्षाच्या तथाकथित ज्येष्ठ नेत्यांनी गांधी परीवाराला खुश करण्याकरता हिंदू धर्म व हिंदू चालीरीती यांना कायम कमी लेखण्यात व गांधी परीवाराची चापलुसी करण्यात आपली कारकिर्द घालवली.राष्ट्रवादीचा 'जाणता राजा'सैरभर झाला आहे व भाजपला दारात उभं करु नका असे सांगत सुटले आहेव काँग्रेसचे राजपुत्र तर श्रम परिहार(?) करायला परदेशात जातात ते देखिल महाराष्ट्र व हरीयाणा येथिल विधान सभा निवडाणुका हातातोंडाशी आल्या असताना हे पराभूत वृत्तीचे व शस्त्र खाली टाकल्याचे लक्षण आहे. हे दोनही पक्ष स्वकर्तुत्वाने लयास जाणार हे आटळ आहे. देव करो व तो दिवस लवकरच येवो.नमस्कार मोहन चौघुले.

    ReplyDelete
  14. Bhau....ekdam jordar

    ReplyDelete
  15. जबरदस्त लेख. सगळ्याच बाबींचा तुमचा अभ्यास कमालीचा वाखाणण्यासारखा आहे. शतश: प्रणाम तुम्हाला, तुमच्या ज्ञानाला आणि पत्रकारीतेला 🙏🙏🙏

    ReplyDelete
  16. थकले रे मंद लाला

    ReplyDelete
  17. भाऊ, लेख छानच जमलाय. उल्लेखिलेल्या कविते च्या संदर्भात एक योगायोग. गादिमांच्या कविते सारखीच मागणी संत सूरदास करतात. 'अब मैं नाच्यौ बहुत गुपाल।
    काम-क्रोध कौ पहिरि चोलना, कंठ बिषय की माल॥
    महामोह के नूपुर बाजत, निंदा सबद रसाल।
    भ्रम-भोयौ मन भयौ, पखावज, चलत असंगत चाल॥
    तृष्ना नाद करति घट भीतर, नाना विधि दै ताल।
    माया कौ कटि फेंटा बाँध्यौ, लोभ-तिलक दियौ भाल॥
    कोटिक कला काछि दिखराई जल-थल सुधि नहिं काल।
    सूरदास की सबै अबिद्या दूरि करौ नँदलाल॥

    ReplyDelete
  18. सुंदर भाऊ, अतिशय सुंदर. या निलाजऱ्या कॉंग्रेस जनांचे गांधी घराण्यावरील आंधळे प्रेम व सत्तेतून आलेला माज हे सर्व गदिमांच्या गाण्यात चपखल बसवलेत.

    ReplyDelete