Saturday, September 6, 2014

मातोश्री भेटीमागची ‘शहा’निशा



दोन दशकांपुर्वी महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होता आणि त्याने कधी एखाद्या प्रसंगी मातोश्रीवर फ़ेरी मारली, तर लगेच एक आरोप व्हायचा, तो घटनाबाह्य सत्ताकेंद्राचा. कारण शिवसेनाप्रमुख मातोश्रीवर बसून राज्याची सुत्रे हलवतात आणि ते घटनेनुसार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले कोणी नाहीत, असे हट्टाने सातत्याने बोलले व सांगितले जायचे. गुरूवारी इतक्या वर्षानंतर भाजपाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष मातोश्रीवर जाणार किंवा नाही, यावरून संपुर्ण दिवस वाहिन्यांवर चर्चा रंगल्या, तेव्हा त्यात हिरीरीने भाग घेणार्‍या अनेक ज्येष्ठ संपादक पत्रकारांची खुप कींव आली. कारण त्यातले बहुतांश वीस वर्षापुर्वी मोठ्या उत्साहाने घटनाबाह्य सत्ताकेंद्रावर पांडीत्य सांगणारे बुद्धीमंत पत्रकार होते. खरेच भाजपाच्या कुठल्याही राष्ट्रीय नेत्याने मुंबईत आल्यावर शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर जायलाच हवे काय? आणि जाणार नसेल, तर तो शिवसेनेचा मानभंग समजला जातो काय? मुळात कुणीही मातोश्रीवर जावेच कशाला? अमित शहा पक्षाध्यक्ष झाल्यावर प्रथमच मुंबईत येणार म्हटल्यावर मातोश्रीत जाणे इतके अगत्याचे कधी झाले? सेना भाजपा युती झाल्यापासून सर्वच भाजपा अध्यक्षांनी तो पायंडा निर्माण केला होता आणि आता अमित शहा त्याचे पालन करीत नसतील, तर तो शिवसेनेचा जाणूनबुजून केलेला अपमान असल्याचे युक्तीवाद ऐकून खरेच मनोरंजन झाले. अशा पायंड्याचे दाखले देणार्‍या कितीजणांना निदान गेल्या दोन दशकातले भाजपाचे पक्षाध्यक्ष आठवतात, असा मग प्रश्न विचारावासे वाटते. अडवाणी वा नितीन गडकरी, राजनाथ सिंग यांचे अध्यक्षपद अनेकांना ठाऊक असेल. त्यांच्या मातोश्री भेटी आठवतही असतील. पण व्यंकय्या नायडू, जनकृष्णमुर्ती वा बंगारू लक्ष्मण मुंबईत आल्यावर मातोश्रीवर गेल्याचे कोणी ऐकले आहे काय?

गुरूवारी मातोश्रीचा अखंड जप चालू होता, तेव्हा ती जपमाळ ओढणार्‍या कितीजणांना मुळात अशा तीन भाजपा अध्यक्षांची कारकिर्द तरी आठवते काय? नसेल तर हा मातोश्रीवर पायधुळ झाडण्याचा पायंडा कुणाच्या सुपीक डोक्यातून उपजला? कारण यापैकी कुणालाच भाजपाचे वरीष्ठ नेते वा पक्षाध्यक्ष कधी व कोणत्या कारणस्तव मातोश्रीवर जायचे त्याचाही थांगपत्ता नाही. भाजपा नेतेच कशाला? इतर कोणी मातोश्रीवर कशाला जायचे, त्याचेही साधे ज्ञान यापैकी कोणाला नसावे, अन्यथा त्यावरून इतका गदारोळ वाहिन्यांवर व्हायचे काहीच कारण नव्हते. मातोश्रीवर अनेकजण बाळासाहेब यांच्या करिष्म्यामुळे जात असत. त्याचा राजकारणाशी वा अन्य कुठल्याही मतलबाशी संबंध नाही. उदाहरणार्थ जगभर गाजलेला अमेरिकेचा रॉकस्टार मायकेल जॅक्सन आपल्या मुंबई भेटीत चक्क दोनदा मातोश्रीवर गेला होता. श्रीलंकेचे दोनतीन मोठे स्टार क्रिकेटपटू जयसूर्या वगैरे असेच मातोश्रीवर गेलेले होते. मग त्यामागे तामिळी वाघांचे बाळासाहेबांनी समर्थन करण्याचे राजकारण शिजले म्हणायचे, की तेव्हाचे तिथले राष्ट्राध्यक्ष असलेल्यांचे दूत म्हणून त्यांनी मातोश्रीवर हजेरी लावली होती? अमिताभपासून अनेक कलावंत मातोश्रीवर जायचे, त्यातून कसले पायंडे निर्माण झाले होते? पाकिस्तानचे एक पत्रकार शिष्टमंडळ इथे मुंबई भेटीला आले असताना, मंत्रालयात त्यांचा वार्तालाप ठेवलेला होता. तिथे त्यांनीही अगत्याने ठाकरे यांचा उल्लेख केला होता व बाळासाहेबांचा पाकिस्तानात खुप दबदबा असल्याचे प्रांजळपणे सांगितले होते. संधी मिळाली असती, तर त्यांनीही मातोश्रीवर जायचा प्रयास केलाच असता. मग त्यातून कुठला पायंडा निर्माण झाला असता? जावेद मियादाद मातोश्रीवर गेला आणि इमरान खान गेला नाही, तर त्याला पायंडा मोडला आणि भारत पाक संबंध बिघडले, असा अर्थ लावला जाणार आहे काय?

कुठल्याही घटनांचा अर्थ लावताना त्यामागचे संदर्भ तपासून घ्यायचे भान सुटल्याचा हा परिणाम आहे. वाजपेयी कधीच मातोश्रीवर गेले नसतील, त्यांना शिवसेनेचा अवमान करायचा होता असा अर्थ कोणी कधी लावला नाही. राष्ट्रपती निवडणूकीत प्रतिभाताई पाटिल व नंतर प्रणब मुखर्जी मातोश्रीवर गेलेले होते. म्हणून त्यालाही असाच पायंडा म्हणायचे काय? बाळासाहेब हे व्यक्तीमत्व राजकारणाच्या पलिकडे पोहोचलेले होते. त्यामुळेच मुंबईतला एक मोठा माणुस म्हणुन त्यांना प्रत्यक्ष भेटायला अनेकजण उत्सुक असायचे. दुसरीकडे उतारवयात आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे नंतरच्या दिवसात त्यांचे घराबाहेर पडणे कमी झाले होते. त्यामुळेच बहुतेक व्यक्ती वा कुठल्याही पक्षाचे नेते त्यांना मातोश्रीवर भेटायला जात. तो कुठलाही कसलाही पायंडा नव्हता किंवा प्रतिष्ठेचा विषय नव्हता. म्हणूनच खरोखरच आवश्यकता नसेल, तेव्हा भाजपाचे दिल्लीतील नेतेही मुंबईत येऊन मातोश्रीकडे फ़िरकले नव्हते. मातोश्री हे काही स्मृतीस्थान नाही, तिथे एका व्यक्तीचे वास्तव्य होते, त्यामुळे मातोश्रीला महात्म्य प्राप्त झालेले होते. त्यांच्या निर्वाणानंतर शिवसेनेची सुत्रे उद्धव ठाकरे यांनी आपल्या हाती घेतली व त्यांचेही वास्तव्य मातोश्रीतच आहे. पण शिवसेनाप्रमुख हे बिरूद लावायचे धाडस खुद्द या पुत्रालाही झालेले नाही. यातच दोन वर्षापुर्वीची मातोश्री व आजची मातोश्री, यातला फ़रक स्पष्ट होतो. पण तो फ़रक ओळखायला हवी तेवढी बुद्धी व विवेकाचा दुष्काळ सध्या बोकाळला आहे. म्हणून अमित शहा यांच्या मातोश्री भेटीचा इतका बागुलबुवा माजवण्यात आला. जणू मुंबईला येऊन भाजपाचा नवा अध्यक्ष मातोश्रीवर जात नाही, म्हणजे सेना भाजपा युती संपली, किंवा शिवसेनेला तिची जागा दाखवून दिली. यासारखा राजकीय विश्लेषणाचा थिल्लरपणा दुसरा असू शकत नाही. म्हणूनच नुसत्या एका आमंत्रणाने व भोजन समारंभाने त्याचे पितळ उघडे पडले.

भाजपा तर शिवसेनेचा दिर्घकालीन राजकीय मित्र आहे. त्यामुळे त्याच्याकडून मातोश्री म्हणजे शिवसेनाप्रमुखांचा अपमान होणेच अशक्य आहे. पण ज्यांनी शिवसेनेच्या राजकारणाचा सातत्याने विरोधच केला, अशा अन्य पक्षाच्याही कुणा नेत्याने मातोश्री वा बाळासाहेबांना अपमानित करण्याचे धाडस कधी केले नाही. कारण तो शिवसेनेचा नव्हेतर मराठी अस्मितेचा अपमान समजाला जात होता आणि जातो. त्याची किंमत दोन वर्षापुर्वी विद्यमान मुख्यमंत्री यांच्यासह कॉग्रेस पक्षाला महापालिका मतदानात मोजावी लागली होती. ‘निकालानंतर ठाकरेंचे नामोनिशाण शिल्लक उरणार नाही’ असे पृथ्वीराज अनवधानाने बोलून गेले. पण त्याचीच प्रतिक्रिया म्हणून लोक घराबाहेर पडले आणि बाळासाहेब ठाकरे या नावाची किमया बघायला मिळाली होती. तीच किमया त्यांच्या वास्तव्यामुळे मातोश्रीला लाभली होती. मातोश्री म्हणजे तिथे वास्तव्य करणार्‍याचे वरदान, सदिच्छा घ्यायला अनेकजण जात. त्याचा राजकारण वा व्यवहाराशी संबंध असायचा असे नाही. अनेकदा आधीच ठरलेले राजकारण भाजपा व सेनानेते निव्वळ कानावर घालून मान्यता घेण्यासाठी बाळासाहेबांकडे जात. त्याला मातोश्रीवर जाणे म्हटले जायचे. त्याचा संबंध आजच्या जागावाटपाशी जोडण्याचा प्रयासच म्हणून मुर्खपणाचा होता. कारण अजून उद्धव ठाकरे त्या उंचीवर पोहोचलेले नाहीत, त्यांनी तसा दावाही केलेला नाही. त्यामुळेच प्रत्येक भाजपाच्या दिल्लीतील नेत्याने मातोश्रीवर हजेरी लावावी, अशी त्यांची अपेक्षाही असणार नाही. म्हणूनच त्यांनी आमंत्रणाचे अगत्य दाखवले आणि अमित शहांनी स्विकारण्याचा समंजसपणा दाखवला. मातोश्री भेटीचे जे वादळ उठवण्यात आलेले होते, त्याची शहानिशा मग संपुष्टात आली. उतावळेपणाने माध्यमांना हास्यास्पद व्हायची वेळ आली. जितक्या लौकर पत्रकार व माध्यमे असला उथळ पाण्याचा फ़ार बोकाळलेला खळखळाट कमी करतील, तितकी त्यांची विश्वासार्हता वाढेल.

3 comments: