Wednesday, August 16, 2017

सत्तरीतले स्वातंत्र्य

modi in israel के लिए चित्र परिणाम

मागल्या महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या इस्त्रायल दौर्‍यावर गेलेले होते. त्या संपुर्ण दौर्‍यात त्या देशाचे पंतप्रधान नेत्यान्याहू सलग मोदींच्या समवेत यजमान म्हणून उठबस करीत होते. कारण इतक्या सात दशकानंतर भारताचा पंतप्रधान प्रथमच त्या इवल्या देशाला भेट द्यायला गेलेला होता. नेत्यान्याहू यांनीही विमानतळावरच मोदींचे स्वागत करताना ते बोलून दाखवले. ‘तुम्हारा स्वागत है, मेरे दोस्त’ असे हिंदी शब्द उच्चारून त्यांनी सात दशकापासून आपण तुमची प्रतिक्षा करीत होतो, असेही शब्द उच्चारले. त्याचा अर्थ शब्दश: घ्यायचा नसतो. कारण अजून मोदींनी वयाची सत्तरी गाठलेली नाही, किंवा नेत्यान्याहू सुद्धा सत्तर वर्षे त्या देशाचे पंतप्रधान नव्हते. पण जो देश आपला सर्वात विश्वासू मित्र ठरू शकेल, असा देश व समाज म्हणून भारताकडे इतकी वर्षे आशेने बघत होता, असा त्यांच्या बोलण्यातला आशय होता. योगायोग असा, की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षांनी त्या देशाने स्वातंत्र्य मिळवले. आकाराने इस्त्रायल भारताच्या तुलनेत किरकोळ प्रांत आहे. मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेला तो देश आहे. पण फ़रक मोठा आहे. त्या देशाने स्वातंत्र्य मिळवले आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळालेले आहे. भारताने स्वातंत्र्यासाठी लढा दिला हे सत्य आहे. पण राजकीय परिस्थितीने ते आयते भारताच्या पदरात पडले, ही वस्तुस्थिती आहे. ब्रिटीशांना महायुद्धानंतर हा खंडप्राय देश कब्जात राखणे शक्य नव्हते, याचा लाभ आपण मिळवला. फ़ाळणीने रक्तलांच्छित स्वातंत्र्य आपल्याला मिळाले. तिथेही योगायोग आहे. इस्त्रायल याही देशाला फ़ाळणीच्या यातनातूनच जन्म घ्यावा लागलेला आहे. पुन्हा दोन्ही देशातील फ़ाळणी धर्माच्याच अत्याग्रहामुळे झालेली आहे. त्याला अजून पॅलेस्टाईनचा आजार सतावतो आहे आणि भारताला काश्मिर पाकिस्तानच्या रुपाने आजारी रहावे लागलेले आहे.

इस्त्रायल हा दोन हजार वर्षापुर्वी आक्रमकांच्या पायदळी तुडवला गेलेला देश व समाज होता. त्यातून तग धरून रहाण्यासाठी तिथल्या टोळ्या व लोकांना परागंदा व्हावे लागलेले होते. जगातल्या प्रत्येक देश व समाजात त्या ज्यु लोकांना हेटाळणी व अन्याय अत्याचार सहन करीत शेकडो वर्षे काढावी लागलेली होती. याला फ़क्त भारत हाच एक देश अपवाद होता. शेकडो वर्षे इथे आलेल्या ज्यूंना कोणी धर्माच्या वा संस्कृतीच्या भिन्नतेसाठी नाडले वा छळलेले नाही. म्हणून त्या लोकांना भारतीय व भारताविषयी कमालीचा आस्था आहे. त्यामुळेच मग ज्यु धर्म व समाजाचा एक स्वतंत्र सार्वभौम देश असावा, अशी कल्पना पुढे आली आणि त्यातून आजचा इस्त्रायल नावाचा देश अस्तीत्वात आला. ज्या भूमीवर इस्त्रायल होता, त्याला एकोणिसाव्या शतकात पॅलेस्टाईन म्हणून ओळखले जात होते. तिथे ब्रिटीशांचेच राज्य होते. त्यांनी तो देश सोडायचे ठरवले, तेव्हा तिथेही फ़ाळणीचे संकट आले. भोवताली अरब देश व त्यांच्या सुसज्ज फ़ौजा होत्या आणि इवल्या भूप्रदेशात वसलेल्या ज्यु लोकांपाशी हत्यारे नव्हती की फ़ौज नव्हती. अशा स्थितीत असेल तो भूप्रदेश अरबी आक्रमण व सैन्यापासून राखण्यावर, त्या देशाचे स्वातंत्र्य वा अस्तित्वात येणे अवलंबून होते. त्या प्रतिकुल स्थितीवर मात करताना शेकडो ज्युंनी आत्माहुती दिली, त्यातून त्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. नुसते ब्रिटिश सोडून गेले, म्हणून इस्त्रायल अस्तित्वात आलेला नव्हता. पण अशा मिळवलेल्या स्वातंत्र्यामुळे तिथल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याची किंमत कळू शकली. आपल्या पायावर त्या प्रतिकुल स्थितीतही तो देश अजून ताठ मानेने उभा राहू शकला आहे. भारताने व भारतीयांनीही आपल्या सारखे ताठ मानेने स्वाभिमानाने जगावे व जगाशी वागावे असे त्या देशाला वाटत असेल, तर म्हणूनच नवल नाही. म्हणून त्यांना भारताविषयी आत्मियता आहे.

मजेची गोष्ट अशी, की जवळपास समान वय वा वर्षे असूनही त्या इवल्या देशाने जितकी प्रगती केली व आपला दबदबा जगात निर्माण केला, तितके भारताला गेल्या सात दशकात आपले वर्चस्व निर्माण करता आलेले नाही. याची कारणेही म्हणूनच शोधण्याची गरज आहे. या मोदी दौर्‍यात नेत्यान्याहू यांनी एका भाषणात असे म्हटले, की जगाची महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील सर्वात प्रगत अशा सिलीकॉन व्हॅलीमध्ये इंग्रजीखेरीज दोन भाषा जास्त ऐकू येतात. त्यातली एक हिब्रू व दुसरी हिंदी भाषा आहे. यातून त्यांनी काय सांगितले? तर जितका इस्त्रायली माणुस प्रतिभाशाली व बुद्धीमान आहे, तितकाच भारतीय समाजही प्रगल्भ आहे. भारतीय प्रगल्भता व क्षमता इस्त्रायलच्या पंतप्रशानाला समजू शकली असेल, तर भारतीय नेतृत्वाला कशाला उमजलेली नाही? आज जगात इस्त्रायलचा दबदबा नुसत्या शस्त्रास्त्रे वा सज्जता या दोन गोष्टीसाठी नाही. तर स्वयंभूता व स्वावलंबीपणातून त्यांचा दबदबा निर्माण झालेला आहे. वाळवंटी प्रदेशात जगभरचे ज्यु परागंदा कफ़ल्लक जमाव आणुन वसवले आणि त्यांनी त्या देशाला सुफ़लाम व सुखदाम बनवलेले आहे. त्यामागची शक्ती व साधने प्रतिभावंत माणसे आणि स्वाभिमानाची प्रेरणा इतकीच होती. भारत तिथेच मागे पडला. हजारो वर्षे आपल्या जुन्या परंपरांचा अभिमान बाळगून त्यांना जगात सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी निर्धन व भुकेकंगाल लोकांनी केलेला प्रयास व निर्धार म्हणजे इस्त्रायल होय. आणि त्यांचा पंतप्रधान जेव्हा तशीच कुवत व प्रतिभा भारतात असल्याची ग्वाही देतो, तेव्हा आपण पाचसहा दशके विकसनशील वा अप्रगत देश कशाला राहिलो, त्याचा शोध घेणे अगत्याचे असते. सवाल साधनांचा नसतो तर प्रेरणांचा, दिशेचा व इच्छाशक्तीचा असतो. इस्त्रायली नेतृत्वापाशी ती जिद्द व इच्छाशक्ती होती आणि भारतीय नेतृत्वामध्ये त्याचाच अभाव होता.

आज स्वातंत्र्याची सत्तरी साजरी करताना म्हणूनच आपण कुठे होतो आणि कुठे येऊन पोहोचलो, त्याचे सिंहावलोकन करण्याची गरज आहे. जगातून हाकलून लावलेले वा परागंदा झालेले ज्यु मिळून एक सुजलाम सुफ़लाम देश वाळवंटात निर्माण करू शकले. कारण त्याच्याशी त्यांच्या अस्तित्वाचा विषय जोडलेला होता. स्वप्नाळू असून त्यांचा टिकाव लागला नसता. भारतापाशी साधनसंपत्ती अफ़ाट होती. पण मानसिक व वैचारिक गरीबीने आपल्या देशाला पछाडलेले होते. परदेशी विचारांच्या उकिरड्यात नाक खुपसून बसलेल्यांनी, या देशाच्या परंपरा व अभिमानालाच खच्ची करण्याची दिशा निश्चीत केलेली होती. गरीबीवर मात करण्यासाठी कटोरा घेऊन जगभर फ़िरणे, हे आपले परराष्ट्र धोरण झालेले होते. आपल्या देशाची सुरक्षा, विकास वा संपन्नता यापेक्षाही इतरांनी त्यांच्या गरजांसाठी केलेल्या प्रगतीची उसनवारी करण्यालाच प्राधान्य देण्यात आपली आरंभीची दोनतीन दशके खर्ची पडली. स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला मौज करण्याचा अधिकार असल्याची भ्रामक कल्पना आपल्या देशात अगदी तळागाळापर्यंत अशी भिनवली गेली, की नागरिक म्हणुन कुठलीही जबाबदारी नसण्याला स्वातंत्र्य मानले गेले. महात्मा गांधी यांनी स्वदेशीची चळवळ उभारून ब्रिटीशांना आव्हान दिलेले होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रथम त्याच स्वदेशी व त्याचा अभिमान यावर गदा आणली गेली. उपलब्ध साधनांच्या बळावर संपत्ती निर्माण करण्यापेक्षा कटोरा घेऊन फ़िरण्याला स्वातंत्र्याचे लाभ मानले गेले. तिथून आपला देश व समाज मागासलेपणाच्या गर्तेत लोटला गेला. भारताच्या गरजा, त्याची प्रेरणा व प्रतिभा यांचा उपयोग करून देशाला उन्नत करण्याची कल्पनाच विसरली गेली. पाश्चात्य वा सोवियत विकासाची निव्वळ नक्कल करण्याला प्राधान्य पुरस्कार दिला गेला. जणू भारत ही उपजत असलेली कल्पना पुसून भारताची कल्पना रंगवण्यावर भर दिला गेला.

‘आयडिया ऑफ़ इंडिया’ नावाचा भंपकपणा इतका माथी मारला गेला, की भारत नावाची उपजत संकल्पनाच मारून टाकली गेली. राष्ट्रवाद हा टिंगलीचा विषय करण्यात आला आणि कुठल्याही समाजाला ज्या स्वाभिमानाच्या पायावर राष्ट्र उभारता येते, तो पायाच खच्ची करून टाकण्यात आला. स्वातंत्र्यपुर्व काळात असाच समाज खच्ची झालेला होता. त्यात गांधीजी वा अन्य चळवळींनी पुन्हा ज्या स्वाभिमान व स्वदेशीचे प्राण फ़ुंकलेले होते, ते निस्तेज करण्याला नव्या भारताचे स्वप्न मानले गेले. तिथून सगळी गडबड झाली. आज सत्तर वर्षे होत असताना भारतापाशी किती पायाभूत व्यवस्था उभ्या आहेत? जगातल्या कुठल्याही लहानमोठ्या देशाकडून तंत्रज्ञान आयात करावे लागते. १९७७ सालात जनता पक्षाचे राज्य आले, तेव्हा त्यात उद्योगमंत्री असलेले जॉर्ज फ़र्नांडीस म्हणाले होते, देशात स्वतंत्रपणे टाचणी वा सूईचेही उत्पादन करण्याइतके तंत्रज्ञान आपण विकसित केलेले नाही. स्वातंत्र्योत्तर तीस वर्षांनी देशाची ही अवस्था होती. देशव्यापी दुष्काळात हजारोंनी लोकांचा बळी पडल्यावर गुरांनी खावे असले धान्य आयात करताना परदेशी संशोधनाच्या आधारावर इथे कृषी विद्यापीठांची निर्मिती झाली. अमेरिकेच्या मदतीने हे चालले आणि न्युझिलंडच्या मदतीने इथे दुधाचे उत्पादन उभारावे लागले. कृषीप्रधान देशाला अन्नोत्पादन व दूधासाठी परदेशी सहाय्य मिळवावे लागले. ह्याला प्रगती म्हणताच येत नाही. कारण आता अशा प्रगतीचे दुष्परिणाम आपण आरोग्याच्या रुपाने मोजतो आहोत. फ़र्नांडीस यांनी उद्योगमंत्री ह्या अधिकारात अनेक बड्या कंपन्यांना कान धरून सिमेन्टच्या उत्पादनात आणाले, म्हणून आज भराभरा बांधकाम व्यवसाय पुढारलेला दिसतो. पण १९७०-८० च्या दशकात सिमेन्ट काळ्याबाजारात मिळणारी वस्तु होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर तीनचार दशकांनी सिमेन्टचेही पुरेसे उत्पादन का होऊ शकलेले नव्हते?

याच कालावधीत मग इस्त्रालयशी भारता़ची जवळिक वाढली आणि शेतीचे आधुनिक तंत्र तिथून आयात होऊ लागले. अपुरे पाणी व तुटपुंजी जमिन, यावर लोकसंख्येला पोटभर अन्न व काम मिळण्यासाठी त्या इवल्या देशाने आपल्या विकासाची दिशा आपणच गरजेनुसार शोधली. आज तो जगातला अत्याधुनिक देश बनला आहे. यापैकी काय भारताला अशक्य होते? लक्षावधी एकर जमिन वैराण पडलेली होती. अफ़ाट पावसाचा प्रदेश असूनही त्या पाण्याची साठवण करायच्या कुठल्याही योजनेला प्राधान्य मिळू शकले नाही. देशाचे नेतृत्व प्रगत देशांकडे आशाळभूत नजरेने बघत होते आणि मायबाप सरकार काय खाऊ घालणार, अशी लाचार लोकसंख्या बनवण्यात राजकारण व बुद्धीवाद गुंतून पडलेला होता. स्वप्नाळू नेता ही भारताची पहिली समस्या होती आणि त्याच्या गुणगानातून आशाळभूत लोंढे निर्माण करताना, प्रतिभा व देशी कुवतीला प्राधान्य मिळालेच नाही. एकच उदाहरण पुरेसे ठरावे. युपीएच्या कारकिर्दीत देशातील महामार्गाशी संबंधित एक प्रश्न संसदेत विचारला गेला. त्याचे उत्तर डोळ्यात अंजन घालणारे आहे. देशात तोवर झालेल्या एकूण महामार्गाची लांबी बघता त्यातला ६० टक्केहून अधिक महामार्ग वाजपेयी यांच्या कारकिर्दीत उभारला गेला. ती कारकिर्द १९९७ नंतरची म्हणजे स्वातंत्र्योत्तर अर्धशतकानंतरची आहे. म्हणजे तब्बल पाच दशके महामार्गासारख्या पायाभूत सुविधेकडे साफ़ दुर्लक्ष करण्यालाच प्रगती मानले जात होते. धरणे, पाणीसाठे, नद्यांची जोडणी, महामार्ग व सुटसुटीत रस्ते अशा सुविधांकडे दुर्लक्ष करून तात्कालीन नेतृत्व व सत्ताधारी नुसतीच स्वप्ने रंगवत राहिले होते. याचा अर्थ समजून घेतला तरच त्यातली दिवाळखोरी लक्षात येऊ शकते. स्वातंत्र्योत्तर काळात अधिकाधिक अनुदानाची संस्कृती पोसली गेली आणि त्यातून भ्रष्टाचार व अफ़रातफ़रींना प्रोत्साहन मिळत गेले, ही वस्तुस्थिती आहे.

अर्धशतकाच्या कालखंडात विविध अनुदाने व योजनातून गरिबी हटवण्याचे जितके प्रयास झाले, त्यातून नगण्य गरीबी दूर होऊ शकली. उलट वाजपेयी यांच्या काळात ज्या पायाभूत सुविधा वा महामार्ग उभारले गेले, त्यातून कुठल्याही थेट अनुदानाचे लाभार्थी नसूनही अधिक संख्येने लोक दारिद्र्य रेषेखालून वर येऊ शकले. किती चमत्कारीक गोष्ट आहे ना? म्हणजे गरिबांच्या नावाने पैसा अफ़ाट खर्च झाला. पण त्यातल्या भाताचे शीतही गरिबाच्या तोंडाला लागू शकले नाही. तर ते भ्रष्टाचाराचे कुरण होऊन गेले. आताही गॅसचे अनुदान थेट लाभार्थीच्या खात्यात टाकायला सुरूवात झाली आणि अनुदानात कित्येक हजार कोटी रुपयांची बचत झालेली आहे. तर निमकोटींगचा मार्ग पत्करल्याने शेतकर्‍यांना मिळणार्‍या युरीया खताची चणचण संपली आणि त्यावरच्याही अनुदानात बचत झाली आहे. याचा अर्थ असा, की आधीच्या प्रत्येक गरिबी ह्टाव योजनेत पैसा गरिबाच्या नावाने खर्च झाला, पण गरिब मात्र त्यापासून वंचित राहिला. यालाच मग प्रगती व लोककल्याणाचे नाव देण्यात आलेले होते. तिथेच देशाचे व पर्यायाने समाजाचे नुकसान झाले. असल्या लोककल्याणाच्या संकल्पनाच उसनवारीने आणलेल्या व उपजत वृत्तीचे खच्चीकरण, असे त्याचे खरे कारण आहे. आज सत्तरीत भारताचे स्वातंत्र्य आले असताना अतिशय वेगाने पायाभूत सुविधांचे काम सुरू आहे. तेच पन्नास साठ वर्षापुर्वी झाले असते, तर त्याचीच मधुर फ़ळे आजच्या पिढीला चाखता आली असती. आजच्या इस्त्रायलला भारताकडून मदत मागण्याची गरज वाटली असती. त्या इवल्या देशाला थोरला भाऊ म्हणून भारताकडे बघावे लागले असते. चीनसारखा देश धमक्या देऊ शकला नसता, की पाकिस्तानला कुरापती काढायची हिंमत झाली नसती. इवला इस्त्रायल भोवताली वसलेल्या सहासात अरबी आक्रमक देशांना वठणीवर आणू शकतो, तर त्याच्या शेकडो पटीने मोठा असलेल्या प्रतिभावान भारतीयांचा देश अगतिक कशाला असतो?

आज देशाच्या स्वातंत्र्याची सत्तरी होत असताना हे प्रश्न आपण आपल्यालाच विचारले पाहिजेत. मग देशाचा पंतप्रधान काय करतो आहे आणि त्यामागचा हेतू काय आहे, त्याचा अंदाज येऊ शकेल. अर्थव्यवस्थेतले दोष, पायाभूत सुविधा, भ्रष्टाचाराचे उन्मुलन वा सुसज्ज सुरक्षा व्यवस्था, यांच्यासह स्वाभिमानाच्या पायावर उभारलेला समाज महाशक्ती होत असतो. युद्धाच्या भयाने भेडसावलेला किंवा स्वप्नाळू लोकांचा नेत्यांचा देश उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. कल्पनांचे हिंदोळे बांधून झोके घेतल्याने मनोरंजन खुप होते. पण मनोरंजन संपल्यावर पोटात भुकेची आग लागते, तिला विझवायला खरेखुरे अन्न आवश्यक असते. प्रस्ताव-ठराव वा कागदी घोड्यांना नाचवून काही होत नसते. मागल्या पाचसहा दशकात नुसती स्वप्ने रंगवली गेली आणि कागदी योजनांवर पैशाच्या अफ़रातफ़री झालेल्या असतील, तर भारत नावाचा देश आपल्याच पायावर खंबीरपणे कसा उभा राहू शकेल? ज्याच्याकडे वक्रदृष्टी करून बघायची हिंमत कोणाला होत नाही, असा देश व समाजच राष्ट्र म्हणून उदयास येत असतो. इस्त्रायल हे त्याचे उदाहरण आहे. अमेरिका हजारो मैलावर अन्य देशात बसलेल्या आपल्या शत्रूंना पळता भूई थोडी करतो, त्याला त्यांचा अभिमान हा पाया लाभलेला आहे. वैचारिक बुडबुडे उडवणार्‍यांना देश वा समाज उभारता येत नाही. त्यांना स्वातंत्र्य व स्वैराचार यातला फ़रक ओळखता येत नाही, त्यांच्यापासून कुठल्याही समाज व राष्ट्राला धोका असतो. भारताला मागल्या सत्तर वर्षात अशाच षडरिपूंनी छिन्नविछिन्न करून टाकलेले आहे. आता कुठे हा देश अशा दुष्टचक्रातून बाहेर पडतो आहे. इस्त्रायलच्या पंतप्रधानांनाही त्याविषयी आशा वाटली असेल, तर आपण आशावादी असायला काही हरकत नाही. यात आपले अधिकार व हक्क कुठले, याची चिंता सोडून, आपली जबाबदारी कोणती हे शोधायला आपण शिकलो, तरच खर्‍या अर्थाने आपला देश स्वतंत्र व सार्वभौम होऊ शकेल.

24 comments:

  1. भारताने स्वातंत्र्य मिळवलय. या जगात फक्त दोनच गोष्ठी मिळतात. भिक आणि दान. स्वातंत्र्य हि भिक नाही आणि दानही नाही. तुम्ही अजूनही गुलामी मानसिकतेत आहात हे यातून दिसते. बाकी लेख बरा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. अभ्यास करून बोला घुगरे . असे "दोनच " शेडमध्ये जग रंगवण्याचे भलेभले उद्योगधंदे कधीच्या काळचे बंद पडलेत .dont be left behind...be with right! भाऊ अभ्यास केल्याशिवाय एक ओळ ही लिहीत नाहीत .जपून टीका करा

      Delete
    2. पंडित नेहरूंचा आझाद हिंद ला असणारा विरोध तसा जगजाहीर होता. का तर जपान शी असणारे नेताजी चे सख्य. पुढे मात्र त्यांचे खटले चालवून पुण्य कमवायचा प्रयत्न केलेला. नाविकांचे बंड ही इंग्रजांना सावध करून गेले. असल्या परिस्थिती मध्ये दुसरे 1857 सारखे उठाव प्रवरडणारे नव्हते. भारतीय असंतोष मर्यादित ठेवण्या साठी काँग्रेस ची निर्मिती झालेली आणि शेवट पर्यंत त्यांनी ती निभावली. Rss आणि हिंदू महासभा या नाटाकत सहभागी झाल्या नाहीत. आणि कावळा बसायला आणि फांदी तुटायला फसलेल्या भारत छोडो आंदोलन नंतर इंग्रज स्वातंत्र्याची भीक घालुन निघून गेले. काँग्रेस ने त्याचा पुरेपूर फायदा घेतला

      Delete
    3. तुमची चूक नाही
      70 वर्षे जागतिक कर्जे (भिक) मिळवून ती (अनु) दान घेऊन जगायची सवय लागलीय
      ताठ मानेने जगणे लवकर जमणार नाही आपल्याला

      टिका करताना ज्यावर टिका करतोय त्यांच्या बद्दल आदर असावा नाहीतर आपल्यावरही टिका होण्याची किंवा आपण हास्यास्पद होण्याची दाट शक्यता असते

      बाकी आपण सुज्ञ आहातच (?)

      Delete
    4. देशाने स्वातंत्र्य मिळवले आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळालेले आहे. भारताने स्वातंत्र्यासाठी लढा दिला हे सत्य आहे. पण राजकीय परिस्थितीने ते आयते भारताच्या पदरात पडले, ही वस्तुस्थिती आहे - ya vakyavar varil tika aahe. Aani mi kuthehi bhaun var tika keleli nahi. Bakichya lekhavar maza kuthlahi aakshep nahi he mi aadhich lihil aahe. Jara nit vacha aani mag liha. Lokana sudnypana shikvnyaaadhi swatah sudnya vha.

      Delete
    5. Aani jyana as vatate ki aapalyala swatantry aayate milale tr tyani swtantryanantarch british PM ch bhashan aikave. Swtantry kunamule aani kas milawal he kalel.

      Delete
    6. @ghugare
      What do you think when India would have got independence if world war 2 would not have happened????

      Delete
    7. On the base of documents . India is not independent . British is only give Power of transfer. Mens after some time they back . Give rti ask government documents of indifedent .

      Delete
  2. अतिशय मार्मिक . पण भाऊ साठ सत्तर वर्षे देशाला लुटण्यात घालवणाऱ्या सरकारवर याहून मोठे प्रहार व्हायला हवे .

    ReplyDelete
  3. भाऊ,
    भारताच्या गेल्या सत्तर वर्षां तली काही वर्षे सोडलीत तर कशी अधोगती झाली ह्याचा पूर्ण लेखाजोखाच ह्या लेखात आपण मांडला आहात. म्हणजेच मधल्या काळात कॉंग्रेसने पैशाच्या अफरातफरीची कुठली पातळी गांठली होती हे लक्षात येते ! मोदींजींच्या काळात ह्या सगळ्यांचीच कशी हवा तंग केली गेलीय हे ठीकठीकाणांच्या त्यांच्या आक्रस्ताळेपणा व थयथयाटावरून कळून येते.
    तुमच्या उत्तमोत्तम लेखामध्ये ह्याची गणना होईल.

    ReplyDelete
  4. खुप छान विश्लेशन.नेहरू नी त्यांना व आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची स्वपनाळु होुन वाट लावली.

    ReplyDelete
  5. सुन्दर .....माहितीपुर्ण लेख !!

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेख भाऊ !
    देहाला अनेक रोग असतील . ज्वर 'वांती 'फेफरे अन्य अनेक .. तर सर्वांवर उपाय आवश्यक !पण जर असे कळले की या सर्व रोगांचे मूळ अशुद्ध रक्त आहे तर सर्वात आधी रक्तशुद्धी अत्यावश्यक ! ते रक्त म्हणजे आहे राष्ट्रीयत्व

    ReplyDelete
  7. Lekh sampuch naye as vatat hot
    Apratim 😘😘

    ReplyDelete
  8. मी अजूनही त्या दिवसाची वाट बघतेय
    "जेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान अचानक घोषीत करतील कि,
    आज रात्री बारा पासून भारतात कोणतीच जात किंवा कोणताही धर्म आस्तित्वात राहणार नाही..
    आठ दिवसाची मुदत देऊन जुन्या जाती व धर्म बदलुन नवीन जात *'माणुस*' आणि नवीन धर्म *'मानवता'* म्हणुन सर्वांना बंधनकारक असेल.
    असे झाले तरच हा आपला 'देश' जगावर राज्य करेल...
    🙏 धन्यवाद🙏
    🙏🏽 🙏🏽

    ReplyDelete
    Replies
    1. सुरुवात तुमच्या आडनावापासूनच करुयात की मग ! Be the change you want to see!

      Delete
    2. संपूर्ण सहमत

      Delete
    3. हाच मुद्दा आहे
      जे स्वतः निनावी आहेत ते दुसऱ्याच्या नावात जात शोधतात

      Delete
  9. छान विश्लेषण भाऊ ...!!!

    ReplyDelete
  10. Excellent writing sir

    ReplyDelete
  11. छान लेख झणझणीत अंजन आहे

    ReplyDelete
  12. Freedom is not obtained as British did not reveal anything about distribution of land to both parties at time of partition. British alloted 4 times of area of land to India when Hindus population was about7 times. It did not bother to make arrangements for transfer of properties n security of migrants n Muslims looted all properties mass killed Hindus n raped Hindu women. It was a pathetic event. British n Congress should have kept migration with military n police protection when they had seen such atrocities n killings by Muslims at time of Bengal partition. Nehru lost Kashmir n POK in spite of India being stronger than Pak. It indicated beggars are no choosers. Siindh had 3_4 districts where Hindu had majority we should have asked for it n Balochistan.

    ReplyDelete