Sunday, October 19, 2014

निरुपयोगी शब्दांनी भरलेला इतिहास


पाच वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तेव्हा भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या कुटुंबात राजकीय संघर्ष उभा राहिला होता. त्यांचाच पुतण्या धनंजय मुंडे तेव्हापर्यंत आपल्या चुलत्याला राजकारणात सहाय्य करीत होता. आधी संपलेल्या लोकसभा निवडणुकीत गोपिनाथराव संसदेत निवडून गेले आणि तिथे पक्षाचे उपनेते झाले होते. मग परळीतील त्यांच्या स्थानिक नेतृत्वाच्या वारशाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा तो वारसा आपल्यालाच मिळावा, म्हणून धनंजय आग्रही असावा. परंतु मुंडे यांनी आपले वजन कन्या पंकजा पालवे-मुंडे यांच्या पारड्यात टाकले. तिथे भाजपाची विधानसभा उमेदवारी पंकजाला मिळाली आणि चुलतभाऊच दुखावला गेला. परंतु त्याला नंतर विधान परिषदेत निवडून आणताना गोपिनाथरावांनी संतुलन साधले होते. म्हणून पुतण्या समाधानी नव्हता. त्याचाच लाभ राष्ट्रवादी कॉग्रेसने म्हणजे नेमके सांगायचे तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उठवला. संधी साधून धनंजय मुंडे यांना चिथावण्या देण्यात आल्या आणि जसजशी भाजपाची राजकीय पत खालावत गेली, तसा पुतण्याला फ़ोडण्य़ाचे राजकारण खेळले गेले. बीड जिल्ह्यात मुंडे यांचे वर्चस्व खोदून काढताना पुतण्यालाच हाताशी धरला आणि परळी नगरपालिकेतही मुंडे यांना अपशकून करण्यात आला होता. कुटुंबातील धुसफ़ुस कितीही असली, तरी धनंजय इतक्या टोकाला गेला हे कितपत योग्य होते? आधी बीडच्या स्थानिक संस्थांमध्ये मुंडेंना त्रास दिल्यावर इतरत्र त्यांचे खच्चीकरण करण्याचेही उद्योग झाले आणि त्यासाठी अशाच त्यांच्या सहकार्‍यांना फ़ुस लावली गेली. त्या संघर्षात फ़ुस लावणारे तात्कालीन विजय जरूर मिळवू शकले. धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेचा राजिनामा देऊन पुन्हा राष्ट्रवादी उमेदवार म्हणूनही निवडून येऊन दाखवले. म्हणून त्यांचा उदो उदो करायचा काय? लबाडी करून वा घातपाताने त्यांनी यश संपादन केले होते. प्रतिकुल परिस्थितीत जो आपल्याला सहाय्य करतो, त्याला लाथाडून हंगामी लाभासाठी कुणाचीही मदत घेऊन मित्राला, आप्ताला दगाफ़टका करण्याला राजकारण म्हणता येत असेल, तर धनंजय मुंडे यांना काकापेक्षा सवाई राजकारणी म्हणावे लागेल. पण त्या छोट्या लढाया असतात आणि त्यात खरे बळ कसोटीला लागत नसते. अनुकुल परिस्थितीत लढताना विजय सोपा असतो, खरी कसोटी लागते, ती प्रतिकुल परिस्थिती असताना. आज राजकीय वारे बदललेले आहेत आणि दोन वर्षापुर्वी विजयी मुद्रेने फ़िरणार्‍या धनंजय मुंडेची चर्या आपल्याला बघता येऊ शकेल. तो सगळा विजयी आवेश वा त्याचा मागमूस तरी कुठे दिसतो आहे काय?

जर धनंजय मुंडे यांनी वा अजितदादांनी तेव्हा केलेले राजकारण स्पृहणीय असेल, तर मग आज युती तोडण्यामागचे डावपेच भाजपा खेळला, त्यालाही कौतुकास्पद म्हणायला अजिबात हरकत नाही. पण अट एकच आहे, ज्यांना आज भाजपा बहूमतापर्यंत मजल मारण्याच्या शक्यतांनी उकळ्या फ़ुटल्या आहेत, त्यांनीही तेव्हा तितक्या आवेशात धनंजयची पाठ थोपटलेली असायला हवी. उलट तेव्हा ज्यांनी धनंजयला दगाबाज म्हटलेले असेल, त्यांना आज युती मोडण्यासाठी आयात उमेदवार आणणार्‍यांचे कौतुक करता येणार नाही. जी कहाणी धनंजयची तीच शिवसेनेच्या कल्याणच्या एकमेव माजी खासदार परांजपे याचीही आहे. या तरूणाचे सेनेत वितंडवाद सुरू आहेत असा सुगावा लागताच, त्याला राष्ट्रवादीने आपल्या गोटात ओढण्याची चपळाई दाखवली होती. यावेळी सेनेला सोडून त्याने राष्ट्रवादीची तिथून उमेदवारीही केली. तेव्हा त्याला आपल्या गोटात ओढून आणल्याने आपली पाठ थोपटून घेणार्‍या जितेंद्र आव्हाडांचा तो आवेश कुठे आहे? आव्हाडांचा तो विजय खरा होता, की आजचा राष्ट्रवादीचा संपुर्ण मुंबई ठाण्यातला दारूण पराभव स्पृहणिय आहे? राजकारणातला किंवा प्रामुख्याने निवडणूकीतला विजय खुपच अल्पकालीन असतो. ज्यांना विजय पचवता येत नाही, त्यांच्यासाठी अपयश आत्महत्येइतके दारूण असते. महाराष्ट्रातील युती तुटण्याकडे मी त्याच नजरेने बघत असतो. आज ज्यांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटत आहेत, त्यांच्या त्या उत्सवात मला तेच आव्हाड, अजितदादा किंवा धनंजय मुंडे दिसतात. त्यांचे तेव्हाचे विजयोन्मादात बोललेले शब्द आठवतात. पक्षाने आदेश दिला, तर बीडमधून लोकसभेला काकांच्या विरोधात उभे रहाण्याची धनंजय मुंडेची भाषा सर्वजण विसरून गेलेत. तसेच परळी नगरपरिषदेत राष्ट्रवादीला आणुन बसवल्यानंतरची धनंजयची विजयी मुद्रा सगळे विसरून गेलेत. राजकारणाचा अभ्यासक म्हणून मला असे चेहरे, त्यावेळचे शब्द वा प्रसंग विसरून चालत नाहीत. अर्थात तेव्हा मी केलेले विश्लेषण आव्हाड, परांजपे, धनंजय वा अजितदादांना तरी कुठे आवडणारे होते? प्रामाणिक राजकीय विश्लेषण हा ‘थॅन्कलेस जॉब’ असतो. त्यात पराभवाची चव चाखल्यावर ते विश्लेषण पटते, पण वेळ गेलेली असते. आणि ज्यांच्यासाठी ते विश्लेषण धोक्याचा इशारा असतो, त्यांना उन्मादाने ग्रासलेले असते. मग असे विश्लेषण कुणाच्या कामाचे असते? ज्यांना अभ्यास करायचा त्यांच्यापुरता त्याचा उपयोग असतो. युधीष्ठीरासारख्या धुरंधर बुद्धीमंताला जर पत्नीला जुगारातला पण म्हणून लावू नये याचे भान उरत नसेल, तर सामान्य विजयाने बेभान झालेल्यांकडून ती अपेक्षा कशी करता येईल?

पाच वर्षापुर्वीची आणखी एक आठवण अशीच आहे. लोकसभेचे निकाल लागताच मोठा विजय संपादन केल्यावर कॉगेस राष्ट्रवादीने आपले मतप्रदर्शन करायला विलंब लावला होता. पण एकही जागा जिंकू शकली नाही, अशा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वात आधी पत्रकार परिषद घेतली होती. आपण एकही उमेदवार निवडून आणू शकलो नाही, हे सांगण्यापेक्षा आपण शिवसेना व त्यांचा मित्र भाजपाला कसा दणका दिला, ते सांगायचा उतावळेपणा मनसेला संयम शिकवू शकला होता काय? राजने तेव्हा अमिताभचा खास प्रसिद्ध डायलॉग तिथे पत्रकारांना सुनावला होता. ‘तुमने हमको बहूत मारा. हमने तुमको सिर्फ़ एकही मारा. लेकीन सॉलिड मारा, है की नही?’ असे ते शब्द होते. तिथून पुढे विधानसभेतही राज ठाकरेंनी आपल्याला मिळालेल्या पाठींब्याचा अर्थ समजून घेतला नाही. लोकभावना त्यांच्या बाजूने असली, तरी त्यांच्यावर सेनेत अन्याय झाला अशी होती. ती सहानुभूती कोरा चेक नसतो. साडेतीन वर्षे त्यावरच मनसेने मस्ती दाखवली. अगदी अलिकडे त्यानी लोकसभा लढवताना तीच भाषा वापरली होती. ‘औकतच दाखवतो’ ही भाषा सूडाची होती आणि तिथेच सगळी सहानुभूती संपलेली होती. तोच प्रकार नारायण राणे यांच्या बाबतीत म्हणता येईल. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या कोकण पट्ट्यात या नेत्यावर अन्याय होत असल्याच्या भावनेने लोक त्यांच्या मागे गेले होते. पण राणे यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली, तिथून त्यांची घसरगुंडी सुरू झाली. आज आपले राजकीय अस्तित्व टिकवायची लढाई राणेंना एकाकी लढवावी लागते आहे. शिवसेनेवर त्यांचा राग कोणी खोटा म्हणू शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी गेल्या दहा पंधरा वर्षात ज्याप्रकारच्या हालचाली केल्या, त्याचे कोणी समर्थन करू शकत नाही. यातूनच सेनेवर काही प्रमाणात विपरित प्रसंग ओढवले. पण तिच्याशी सामना करणे एक भाग झाला आणि लबाडीने डावपेचाने सेनेला संपवण्याचे खेळ दुसरा विषय असतो. पण जेव्हा यश मिळत जाते व सोपेपणाने मिळते; तेव्हा त्याची झिंग अपरिहार्य असते. ती झिंग चढली मग तोल केव्हा, कसा व कुठे जातो, याचे ताळतंत्र उरत नाही. आरंभी मिळणारे यश माणसाला जुगारी बनवते आणि आणखी बेफ़ाम करते. म्हणूनच युती मोडताना राष्ट्रवादीतल्या मातब्बर नेत्यांना आमंत्रित करून वा उमेदवारी देऊन भाजपा यशस्वी होईल सुद्धा. पण त्याचे दुरगामी परिणाम त्याच पक्षाला हानीकारक असतील. अर्थात ते पक्षनेत्यांना वा त्यांच्या निस्सीम भक्तांना आज सांगून फ़ायदा नाही आणि उद्या वेळ गेलेली असल्याने फ़ायदा नसेलच. पण इतिहासाची नोंद म्हणून असे तोटे टिपून ठेवावे लागतात.

आज नुसत्या एक्झीट पोलच्या आकड्यांनी इतका उन्माद दिसत असेल, तर निकाल त्याचप्रमाणे लागल्यावर बेभान अवस्था कुठवर जाईल, त्याची कल्पनाही करवत नाही. हेच शब्द निकालानंतर अजितदादा, धनंजय मुंडे, नारायण राणे, राज ठाकरे वा परांजपे यांना मोलाचे वाटतील. कारण त्यांना खुप आधीच असे शब्द कोणीतरी ऐकवलेले आहेत. पण इतक्या उशीरा त्यांना त्याचा उपयोग राहिलेला नाही. दोनचार वर्षांनतर आजच्या उन्मादीत भक्तांनाही त्याचा उपयोग नसेल. इतिहास अशाच निरुपयोगी नोंदी व शब्दांनी भरलेला असतो.

8 comments:

 1. It is always true. To improve yourself and to have growth, there is always need of honest followers, advisers and correct interpretors. There is system for the same in our political culture since long having 'Dharmaguru' to point out the correctness of the decision taken or to be taken. The advice may be supporting you decision or against your decision but if that is beneficial then that is to be accepted as medicine to protect your heath.

  It is unfortunate that it has become rarer and rarer every day. Expectations of honest well-wishers that real and honest workers shall always get the opportunity in election and there proportion shall always be maintained in the administration as well as in the executive otherwise, the concept as 'Party with Difference' would be interpreted in different sense.

  ReplyDelete
 2. भाऊ, निकाल पाहिल्यानंतर पहिल्यांदा माझ्या मनात जी भीती डोकावली होती, तीच या लेखात आपण मांडली आहे.

  ReplyDelete
 3. bhau,sena jitke seats det hoti tyapeksha jaasta seats bjp ni swatahachya jivaavar nivadun aanlyat.senepeksha double seats tyaanna milalyat.yaavarun he tar spashta hote ki bjp was more powerful than sena.mag ase asunahi apman sahan karat tyaani yuti tikavanyasathi 119 seats chi bhik maanya karayla havi hoti asa tumhi kasa mhanu shakta?te tar 128 seats ladhayla pan tayar hote pan senene maaj kela.tumchyapeksha double powerful partyla ardhya seats pan dyaayla kaahich harkat navhati.bjp ni yuti todli tar kaay chukla?seneni bjp la enough seats dilya nahit ,jyamule yuti tutali.

  ReplyDelete
  Replies
  1. आपला युक्तीवाद ग्राह्य मानायचा तर १९९८ च्या लोकसभेत अधिक जागा लढवून भाजपाने ४ तर सेनेने ६ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर पुढल्या वेळी भाजपाची ताकद घटल्याचा दावा करून विधानसभा व लोकसभेच्याही जागा आणखी कमी करायचा हट्ट धरायला हवा होता. तो धरला नाही याला मुर्खपणा समजावे आणि आज त्याच कारणास्तव सेनेची अडवणूक करण्याला चाणक्यनिती मानावे लागेल. आपण तसे जरूर समजा. मला ती दगाबाजी वाटते. कारण त्यातून विश्वासार्हता कमी होत जाते.

   Delete
  2. भाऊ विथ ड्यू रिस्पेक्ट मला हे पटत नाही. सेनेने आधी पण कमलबाई वगैरे अत्यंत हीन भाषेत अपमान केलेत. शिवाय मुद्दाम हून अपशकून आधीच केला. भाजपा इतका बनेल असता तर आधीच सगळे नीट जमवून सत्तेत आले असते. बर शिवसेनेवर जास्त टीका न करण्याचे धोरण होते. ते सरळ सरळ एक संदेश देत होते किं आपण आपली ताकद अजमावून बघा आणि मग एकत्र येऊ. पण उद्धव ह्यांना ते समजले नाही. बर आत्ता देखील धोरणीपणा दाखवून बिनशर्त पाठिंबा देवून आपली इमेज बऱ्यापैकी सुधारू शकले असते. पण तेही केले नाही. बर सेना नेत्यांनी मुंबई मध्ये असे काय काम केले आहे? म्हणजे आत्ता कोंग्रेस विरुद्ध जे जनमत आहे तेच मुंबई मध्ये असू शकते. आणि त्याचा कधी ना कधी तरी फटका बसणारच आहे. त्याच्यावर पण कोणीच बोलत नाहीये. त्यामुळे भाजपावरच फक्त टीका हे काही पटत नाही. पण भाजपा जर का चुकून जरी राष्ट्रवादी बरोबर गेला तर नक्कीच पुढच्या वेळी लोक भाजपला मत देणार नाहीत.

   Delete
 4. 1998 cha formula 32-16 hota...aani BJP ne Senela nantar 6 jaga wadhawun dilya...mhanun formula 26-22 jhala.

  ReplyDelete
 5. 32-16 cha formula jar 26-22 hou shakto tar 119 che 128 ka nahi hou shakat?dusari goshta mhanje 1998 chya elections nantarche pudhche elections 1.5 varshani zalele.tyamule paristhiti wegali hoti.yaaveli modi wave clear hoti.sahaajikach bjp chi jaast jaganchi maagani raasta hoti.yuti tikavanyacha kartavya fakt bjp cha navhata.seneni bilkul samjudadaarpana dakhavla naahi.senenihi gujrat,delhi ithe swatahache umedvar bjp virudhd ubhe kelele.mag he yutidharmala dharun hota ka?pan tithe bjpla tumchya demands unreasonable vaatalya aani tyanni tumhala titakya seats dilya nahit.tumhi swatahache umedvar ubhe kelech na.thodishi hushari daakhavali asti aani bjp la 128 seats dilya astya tar senecha CM vhaayche chances hote.pan ajab logic laavun yuti todali aani aataa tyanchyapeksha ardhya jaagaa milalya.yaamule senevar ajun 5 varsha virodhat basaaychi welahi yeu shakate.koni kiti seats ladhaychya he kaahi scriptural injunction navhe ki ekda tharla te permanently tharlach.seneni inflexibility daakhavun swatachya paayaavar dhonda maarun ghetla he ata prove jhalay.tumhi kitihi amanya kela tarihi maharashtrachya janateni toch sandesh dilaay

  ReplyDelete
 6. BHAU APALE VICHAR CHANGALE AHET PN SARVACH ASTIL ASE NAHI DHANANJAY MUNDE YANNA KHUP JAWALUN OLAKHTO KARAN DHANANJAY AAMCHYA MATDAR SANGHAT PRATINIDHITV KARTO PAN TYALA RAJKIY WARSA MILALAA PAN TO SHUNYA MADHUN RAJKARANNACHI SURUWATT KHUP AADHI KELI HOATI TEWHA TYANE PANCHAYAT SAMITI NANTAR BEED ZILLHA PARISHAD UPADHYAKSH BHAJYUMO ANI NANTAR PARALI AAMDARKI WAR DAWA HOATA PAN PANKAJA MUNDE YANCH TAS NAWHAT TYA KUTHE RAJKARNAT HOATYA PARALI 2014 ELE SPEECH MADHHE TYA DHANANJAY LA MHANALYA TULA MI RETATE HI KAY MAG MASTI NAHI TAR KAY AHE SAHANBHUUTI CHI LAT GHEUN TYA KAY RAJKARAN KARAT AAHET TYA PEKSHA PARALI V MATDARASATHI KAY KEL TAR SANGTA YENAR NAHI TYANNA

  ReplyDelete