Tuesday, October 28, 2014

मोदींची लोकप्रियता कुठून आली?



शिवसेनेला लोकांनी झिडकारले किंवा सेनेला त्यांची जागा मतदाराने दाखवून दिली, अशा गमजा आज भाजपाचे नेते व समर्थक करीत आहेत. निवडणूकीचे निकाल तसे भासवत असल्याने त्यांना आज कोणी रोखू शकत नाही. पण त्यातून शिवसेनेला नामोहरम करताना आपण काय करीत आहोत, याचे भान भाजपावाल्यांना उरलेले नाही. मोदींमुळे आपण मराठी ही प्रादेशिक अस्मिता मोडून काढण्यात यशस्वी झालो, असे भाजपाला वाटते आहे आणि त्यासाठी राजकीय डावपेच खेळत सेनेला अधिकच नामोहरम करण्याचे राजकारण चालू आहे. त्यासाठी जे युक्तीवाद करीत आहेत, त्यांना मोदी लोकप्रिय कसे व कशामुळे झाले, त्याचेही स्मरण राहिलेले नाही. गेल्या दोन वर्षात मोदी राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झाले. पण त्याआधी दहा वर्षे मोदी गुजरातमध्ये कुठली अस्मिता गोंजारत निवडणूका जिंकत होते? ती अस्मिता राष्ट्रीय होती की प्रादेशिक होती? २००२ सालात गुजरातमध्ये ज्या भीषण दंगली झाल्या, त्यातून तमाम सेक्युलर डाव्या पुरोगामी माध्यमांसह राजकारण्यांनी मोदींना लक्ष्य केले होते. भाजपाला राष्ट्रीय पातळीवर खच्ची करण्यासाठी या पुरोगाम्यांनी पद्धतशीरपणे गुजरातच्या दंगलीचा बागुलबुवा केला होता. वाजपेयी यांच्यासारखा नेताही त्यात गडबडून गेला. भाजपाचे राष्ट्रीय वा अन्य प्रांतातले नेते मोदींच्या समर्थनाला उभे रहायला धजावत नव्हते. मोदी संपुर्णपणे आपल्या राजकारणात एकाकी पडलेले होते. अशावेळी मोदींच्या मदतीला कोण घावून आला? तीच प्रादेशिक अस्मिता त्यांच्या मदतीला आलेली होती. आपल्यावरच्या प्रत्येक आरोप व बदनामीला गुजरातचा अवमान ठरवताना मोदी काय म्हणायचे? ‘सहा कोटी गुजराती’ लोकांचा अपमान. ती राष्ट्रीय अस्मिता होती, की प्रादेशिक अस्मिता होती? त्या अस्मितेचे प्रतिक होऊन मोदी ठामपणे प्रत्येक आरोप व टिकेच्या समोर खंबीरपणे उभे राहिले. त्यातून मोदी नावाची जादू तयार झाली.

आपल्यावर कुठलाही आरोप होऊ दे, दंगल हत्याकांड वा खोट्या चकमकीचा आरोप झाला, तेव्हा तेव्हा मोदींनी तो गुजराती समाजाचा व राज्याच्या अस्मितेचे अपमान ठरवून वक्तव्ये केली. स्वत:चा पक्षही आपल्या पाठीशी उभा राहिला नाही, तेव्हा मोदींनी प्रादेशिक अस्मितेचा आश्रय घेतला होता. सोनियांपासून माध्यमांपर्यंत कोणीही मोदींवर आरोप करावा, की मोदी गुजरातचा अवमान अशीच प्रतिक्रीया द्यायचे. त्याच भुलभुलय्यातून मोदी गुजराती अस्मितेचे प्रतिक बनून गेले. आरोप करणार्‍यांना त्याचेच भान राहिले नाही, की आपण कुणाला खिजवतो आहोत आणि कुणाला दुखावतो आहोत. विरोधकांचा रोख भले भाजपा किंवा मोदी असेल, पण त्या प्रत्येक आरोप, खटले व चौकशीतून गुजराती माणुस दुखावला जात होता. दुसरीकडे त्या आरोपाला व अपमानाला राष्ट्रव्यापी प्रसिद्धी मिळत असल्याने, प्रत्यक्षात मोदी हे नाव देशाच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचले. अधिक त्या आरोपाला मुस्लिम धार्जिणेपणाचा रंग असल्याचे मोदींची हिंदू नेता अशी प्रतिमा उभी रहात गेली. त्यासमोर मोदीं झुकण्यास तयार नव्हते, म्हणून अस्वस्थ हिंदूंना ते आपलेसे वाटत गेले. आपल्या वक्तव्ये व भाषणातून अतिशय सूचक अशी आपल्या हिंदू अस्मितेची झलक मोदी दाखवायचे. म्हणून मोदी गुजरात बाहेरच्या हिंदूंच्या अस्मितेचे अस्पष्ट प्रतिक म्हणून पुढे येत गेले. मोदींचा तो ठामपणा त्यांच्याच पक्षाच्या गुजरात बाहेरच्या नेत्यांना उद्धटपणाही वाटत होता. पण दुसरीकडे त्यातून आपण देशभर हिंदू अस्मितेचे प्रतिक होत चाललोय, याचेही भान मोदींना होते. त्याच पायावर आजच्या नरेंद्र मोदींची लोकप्रियता उभी राहिलेली आहे. भाजपाला महाराष्ट्रात मिळालेले यश, असे अस्मितेच्याच पायावर उभे आहे. मात्र ते मिळाल्यावर भाजपावाले त्याच प्रादेशिक अस्मितेची अवहेलना करण्यात गर्क झालेत. त्यांना आपण कुठल्या पायावर उभे आहोत, याचेही भान सुटलेले आहे.

अन्यथा बहूमत हुकले आणि सर्वात मोठा पक्ष होण्यापुरती मजल मारल्यावर इथल्या भाजपा नेत्यांनी शिवसेना व मराठी अस्मितेची हेटाळणी कशाला केली असती? ती अस्मिता कुणा शिवसेनेच्या नेत्याचा अहंकार असल्याच्या भ्रमात कोणी राहू नये. ती अस्मिता शिवसेना नावाच्या एका राजकीय पक्षाची प्रतिष्ठा आहे, अशा समजूतीत रहाणे, भविष्यात महागात पडू शकते. कारण मराठी अस्मिता ही कुठल्या एका पक्षाची वा नेत्याची जहागिरी नाही. पण जोपर्यत असा कोणी नेता वा कुठला पक्ष त्याच अस्मितेचे प्रतिक बनलेला असतो, तोपर्यंत अस्मितेचे गारूड त्याच्या भोवती असते. त्याच्यावर होणार्‍या हल्ल्याने तो किती दुखावला जातो, त्याला राजकीय महत्व असेल. पण दुरगामी परिणाम ती अस्मिता ज्या मनात जपलेली व जोपासलेली असते, तिच्यावर होत असतात. मोदी यांनी तिलाच आपले प्रभावी अस्त्र बनवले आणि म्हणूनच त्यांनी आपली संघाची परंपरा बाजूला ठेवून सरदार पटेल व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचा आश्रय मोठ्या खुबीने घेतला आहे. इथे आज तरी शिवसेना वगळता मराठी अस्मितेच्या समर्थनाला कोणी कधी राजकीय पक्ष उभा राहिला नाही, त्याचा लाभ बाळासाहेब, शिवसेनेला मिळाला. त्यांचा वारसा उद्धव ठाकरे यांच्याकडे आलेला आहे. त्यांना त्यातला ठामपणा वा ताठरपणा दाखवता आला नाही, तर मराठी अस्मिता दुसरा पर्याय शोधू शकते. कारण अस्मिता कोणाची लाचार नसते. ती स्वयंभू असते. ती कुठल्या पक्ष वा नेत्यासाठी थांबून रहात नाही. आपले पर्याय स्वत:च निर्माण करते आणि भविष्याकडे वाटचाल करीत असते. जेव्हा तिचा लाभ उठवणारे नेतेच तिला पायदळी तुडवून स्वार्थ बघू लागतात, तेव्हा अस्मितेने त्यांनाही धुळीस मिळवल्याचे इतिहासात खुप दाखले आहेत. म्हणूनच ज्यांना आज शिवसेनेची अवहेलना करण्यात पुरूषार्थ वाटतो आहे, त्यांना इतिहास समजला नाही, इतकेच म्हणता येईल.

निवडणूकीचे यश फ़ार तर पाच वर्षापुरते असते. अस्मिता तितकी अल्पायुषी नसते. याच मुंबईने त्याचा अनुभव घेतला आहे. किंबहूना त्यातूनच मराठी अस्मितेने शिवसेनेला जन्म दिला होता. त्यातूनच एका व्यंगचित्रकार पत्रकाराला धडाकेबाज नेता म्हणून पुढे आणले. आज मोदींकडे चलनी नाणे म्हणून बघणार्‍यांना तो इतिहास ठाऊक नसावा. अन्यथा त्यांच्याकडून शिवसेनेला नामोहरम करण्याचे राजकारण खेळले गेले नसते. इथेच कशाला दक्षिणेत जेव्हा राष्ट्रीय अस्मितेच्या नावाखाली तामिळी वा अन्य भाषिक अस्मितेला खच्ची करण्याचे राजकारण खेळले गेले, त्यातून तिथे कॉग्रेसचा पाया क्रमाक्रमाने उखडला गेला. तामिळनाडूच्या पाठोपाठ आंध्रप्रदेशातील तेलगू अस्मिता किंवा बंगाली अस्मिता बघा. तिथल्या अस्मिता झुगारून डाव्यांना यश मिळवता आले नाही किंवा ममताला यश मिळू शकले नाही. शिवसेनेकडे तितके प्रगल्भ राजकीय नेतृत्व नसेल. म्हणुन मराठी अस्मिता पायदळी तुडवण्याचे प्रयास यशस्वी होणार नाहीत. जेव्हा जेव्हा असा प्रयत्न झाला, तेव्हा अस्मितेने नव्या रुपात अवतार घेतला आहे. आजची शिवसेना लेचीपेची झाली असेल, तर तिला झुगारून नवा अवतार मराठी अस्मिता धारण करू शकते. त्याचीच चुणूक मुंबईच्या मतदानाने दाखवली आहे. ते यश उद्धव ठाकरे या व्यक्तीचे नाही, किंवा शिवसेनेच्या विजयी उमेदवाराचे नाही. ते मराठी माणसाच्या मनातल्या सुप्त इच्छेचे प्रकट रूप आहे. मग त्याचीच अवहेलना होत असेल, तर ती अस्मिता आणखी रौद्ररुप धारण करून सामोरी येऊ शकते. कोणाला हे दिवास्वप्न वाटू शकेल. कुणाला तो कल्पनाविलासही वाटू शकेल. पण ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आणि त्याचे रुपांतर शिवसेनेत होताना डोळसपणे बघितले आहे, त्यांनाच त्याचा उलगडा होऊ शकतो. कारण शिवसेना हा पक्ष नव्हे ती मराठी अस्मिता असते. तिच्या नेत्यांना त्याचे भान नसेल, तर ती वेगळे नावरुप धारण करून पुढे येईलच. पण अवहेलना सहन करणार नाही.

3 comments:

  1. Aatacha kalat jo paryant Ha shivsenepeksha Uddhavala namvine chalu aahe.Tumhi mhanata tasha asmiteche prati aatatari Shivsenet disat nahi... pan tumhi mhanata te visleshan agadi yogya aahe pan ajun asmitech pratik shivsena nakki nahi...

    ReplyDelete
  2. भाजपाला (हरियाणा व) महाराष्ट्रात एकहाती सत्ता हवी होती व त्याची तशी खात्री होती म्हणून त्यांनी युती मोडली. महाराष्ट्रात प्रचारामध्ये मोदींनी शिवसेने बाबत सभ्यता पाळली. पण शिवसेनेने मोदींवर कमरेखाली वार केले. मराठी अस्मितेमुळे भाजपाचे महाराष्ट्रात स्वप्नभंग झाले हे खरे. पण हि बाळासाहेब ठाकर्यांची पुण्याई का उद्धव ठाकर्यांचे कर्तुत्व हे सांगणे कठीण आहे. आणि शहा व मोदी, मोदींचा अपमान विसरले नाहीत. आता त्यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलेला दिसतो आहे. याला सूडाचे राजकारण म्हणा किंवा व्यक्तीगत अस्मितेचे राजकारण म्हणा. प्रथमदर्शनी उद्धव ठाकर्यांनी युती मोडल्यानंतरही स्वत:ची कुवत बघून थोडा संयम बाळगायला हवा होता असे वाटते. मराठी अस्मिता नेहरूंच्या (कॉंग्रेसच्या) दावणीला बांधण्यात महाराष्ट्राचे प्रांतिक नेतृत्व (यशवंतराव इ) अनेक वर्षे यशस्वी झाले होते. प्रांतिक नेतृत्वाच्या प्रगल्भतेवर हे अवलंबून राहील कि मराठी अस्मिता कोणामागे राहील. अशी प्रगल्भता दाखविणे मोदींच्या नेतृत्वाखालीही शक्य आहे. तसेच ते बाळासाहेब ठाकरें सारख्या एखाद्याच्या नेतृत्वाखालीही शक्य आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांची उंची गाठू शकतात का मोदी नेहरूंची उंची गाठू शकतात हे बघायचे.

    ReplyDelete
  3. भाऊ, आपले विश्लेषण अगदी योग्य आहे. मराठी अस्मीता कोणाचीही बटिक राहणार नाहे. मधे राज ठाकरे यांनी मराठी अस्मीतेला खतपाणी घातले होते, परंतु नंतर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शिवसेना आणि मनसे शिवाय इतर कोणताही पक्ष सध्यातरी मराठी अस्मिता जागवनारा दिसत नाही. भविष्यात असा कोणी निपजला तर लोक नक्कीच त्याच्या पाठीशी असतील.

    ReplyDelete