Friday, January 2, 2015

सांगा, अफ़जलखानाचा कोथळा कोणी काढला?



पुर्वी शाळेत इन्स्पेक्शन असायचे. हल्ली शाळेत इन्स्पेक्शन होते किंवा नाही, कोणजाणे. तेव्हा अशाप्रसंगी शाळेत खुप पळापळ असायची. सफ़ाई, स्वच्छता आणि ठराविक हुशार मुलांना आधीच सज्ज राखलेले असायचे. कारण त्या इन्स्पेक्शनवर शाळांच्या मान्यता अवलंबून असायच्या. थोडक्यात शाळेची परिक्षाच असायची. असे इन्स्पेक्शन करणारे बाकीची शाळा बघून झाल्यावर काही वर्गात जाऊन मुलांना प्रश्नही विचारायचे. त्यातून शिक्षणाची खरी अवस्था कुठेपर्यंत आहे त्याचा अंदाज यायचा आणि त्यानुसार शेरेबाजी व्हायची. आता तर मुळात खरेच मुले शाळेत येतात किंवा नाही, याची पटपडताळणी घेण्याच्या मोहिमा चालवाव्या लागतात. म्हणजे शाळेत बाकी शाळा असते आ्णि पगार घेणारे शिक्षकही असतात. पण विद्यार्थीच नसतात. अशा शाळा नुसत्या सरकारी अनुदान उकळण्यासाठी चालवल्या जातात आणि त्यातून ठराविक शिक्षकांच्या रोजगाराची हमी मिळत असते. अशा बातम्या सतत आल्यावर शाळेचे इन्स्पेक्शन होतच नसावे, असे गृहीत धरायला हरकत नाही. म्हणूनच पुर्वी शाळांचे इन्स्पेक्शन व्हायचे असे म्हणावे लागते. तर अशा काळातला एक किस्सा खुप प्रसिद्ध आहे. एका शाळेत तसे इन्स्पेक्शन असते आणि साहेब आलेले असतात. एका वर्गात ते जातात आणि तिथे इतिहासाचा तास असल्याने त्याच संदर्भात मुलांना प्रश्न करतात. वर्गशिक्षकही तिथे असतात. एका मुलाला साहेब विचारतात, अफ़जलखानाचा कोथळा कोणी काढला? ज्या मुलाला प्रश्न विचारलेला असतो, तो बिचारा बिचकत वर्गशिक्षकाकडे घाबरून बघत कसाबसा उभा रहातो. चाचरत उत्तर देतो. ‘मी नाही’. त्याच्या या उत्तराने साहेब अचंबित होतात. मास्तरांकडे बघतात. मास्तरही वटारलेल्या डोळ्यांनी त्या पोराला दम देत असतात आणि होकारार्थी उत्तर द्यायला सुचावत असतात. त्यामुळे तर साहेब थक्कच होतात आणि मास्तरांकडे खुलासा मागतात. मास्तर काय उत्तर देतात?

‘साहेब, अख्ख्या गावात याचासारखा दुसरा मवाली कारटा नाही. कुठलीही खोडी असो किंवा कुरापत असो, ह्यानेच काढलेली असते. म्हणूनच देवाशप्पथ सांगतो, त्या तुमच्या अफ़जलखानाचा कोथळा काढलाच असेल, तर ते काम या सावताच्या गण्याशिवाय दुसर्‍या कोणाचे नसणार. तुम्ही निघाच. चांगला चिंचेच्या फ़ोकाने सोलून काढतो हरामखोराला. मग बघा कसा अफ़जलखानाचा कोथळा काढल्याचे कबुल करील. तुम्ही साहेब चिंता करू नका.’ मास्तरांच्या अशा उत्तराने साहेबांना चक्कर यायची तेवढी बाकी असते. त्यांना बोलायला काही सुचत नाही आणि सोबत असलेल्या हेडमास्तरांना घेऊन साहेब बाहेर पडतात. त्यांच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघून हेडमास्तरही त्यांना ग्वाही देतात, ‘खरेच साहेब चिंता करू नका. आमचे हेच मास्तर पोरांना शिस्त लावतात, त्यामुळे अफ़जलखानाचा कोथळा ज्याने कोणी काढला असेल त्याचा शोध घेऊन आणि ज्याच्या दफ़्तरात लपवलेला असेल तोही आमचे मास्तर शोधून काढतीलच. काळजी नसावी.’ मास्तर आणि हेडमास्तरांची ही मुक्ताफ़ळे ऐकल्यावर साहेबांची अवस्था काय झाली असेल, त्याचा तपशील इथे देण्याची गरज नाही. पण मुद्दा लोकांच्या लक्षात येण्याइतका साफ़ आहे. ज्यांना एखाद्या विषयातले काहीही कळत नसेल आणि आपणच यातले जाणकार आहोत असे दाखवायचा प्रयास केला; मग अशी अवस्था होत असते. सुदैवाने असे कुठे खरेच घडलेले नाही. पण नित्याच्या जीवनात अनेक अतिशहाणे बुद्धीमंत असेच आपल्या अकलेचे नको तितके प्रदर्शन मांडत असतात. आजच्या उथळ पाण्याच्या जगात त्याचा खळखळाट फ़ार व्हायलाही वेळ लागत नाही. तशी स्थिती नसती, तर माजी पोलिस महानिरिक्षक एस. एन. मुश्रीफ़ यांच्या ‘व्हु किल्ड करकरे’ पुस्तकावर इतर अतिशहाण्यांनी आपल्या अकलेचे इतके जाहिर प्रदर्शन मांडले नसते. पण ते मांडलेले आहे, म्हणूऩच त्याची चिरफ़ाड आवश्यक झाली आहे.

तसे हे पुस्तक नवे नाही आणि त्याच्या अनेक आवृत्त्या निघून अनेक भाषात भाषांतरही झालेले आहे. पण त्यातला सगळा संशयकल्लोळ नुसत्या वृत्तपत्रिय बातम्या व माध्यमातील लेखांच्या हवाल्यावर उभा केल्याचे खुद्द लेखकच प्रस्तावनेत सांगतो. इथपर्यंत सुद्धा मान्य करायला हरकत नाही. पण मुश्रीफ़ ज्या बातम्या माध्यमांचा हवाला देऊन आपल्या मांडणीत लोकांना अशा माहितीवर विश्वास ठेवायला सांगतात, त्याच माध्यमांवर मुश्रीफ़ यांचा स्वत:चा तरी विश्वास आहे काय? कायद्याच्या निकषावर होणार्‍या कारवाईत नेहमी साक्षीदाराच्या विश्वासार्हतेला सर्वाधिक महत्व असते. २६/११ च्या खटल्यातही अनेक साक्षीदारांवर खुद्द, न्या. ताहिलीयानी यांनीही शंका घेतल्या आणि त्यांच्या साक्षीतील काही भाग गैरलागू ठरवला व वगळला होता. मग तोच न्याय मुश्रीफ़ यांच्या एकूण पुसकाला लागत नाही काय? त्या पुस्तकाचे गुणगान करायला आलेल्या न्या. कोळसे पाटिल यांनी त्याच निकषावर पुस्तकाचे परिशीलन करायला नको काय? की त्यांनी त्या शाळेच्या हेडमास्तर प्रमाणे बेताल बोलणार्‍या मास्तराचीच री ओढावी? याच पुस्तकात आपला सिद्धांत मांडताना मुश्रीफ़ वारंवार माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावतात. भारतीय माध्यमे नेहमी गुप्तचर खात्याने पुरवलेल्या किंवा प्रसवलेल्या खोट्या माहितीच्या आधारावर सनसनाटी माजवतात, असे मुशीर सातत्याने सांगतात. आणि आपल्या सिद्धांतासाठॊ त्याच माध्यमे व वृत्तपत्रातील बातम्यांचे उतारे साक्षीदार म्हणून हजर करतात. थोडक्यात वकीली करताना मुश्रीफ़ ज्यांना म्हणून साक्षीदार बनवून समोर आणतात, त्यांनाच उरलेल्या वेळी खोटारडे म्हणत असतात. मग खोटारडे साक्षीदार आणून मांडलेली बाजू खरी कशाच्या आधारे ठरवायची? माध्यमे व वृत्तपत्रे गुप्तचर खात्याच्या इशार्‍यावर खोटेपणा करतात, तर जितक्या बातम्या मुश्रीफ़ पुराव्यादाखल आणतात, त्या खर्‍या कशावरून?

People have been bombarded with a lot of false and fabricated information, especialy as regards the CST-CAMA-Rangabhavan Lane part of Mumbai attack, by the IB and the Crime Branch Mumbai though the media.

हे मुश्रीफ़ यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील १२ पानावरचे वाक्य आहे. त्यातून ते कशाचा हवाला देतात? ज्या घटनेवर आधारीत त्यांचा करकरे हत्येचा सिद्धांत आहे, त्या संदर्भात माध्यमातून वृत्तपत्रातून आलेली बहुतांश माहिती, ही चक्क गुप्तचर (IB) खात्याने पसरवलेल्या अफ़वा व वावड्या आहेत. ह्याचा अर्थ पुस्तकभर जे शेकडो वृत्तपत्रिय उतारे मुश्रीफ़ देतात, त्यात आलेल्या बातम्यांची विश्वासार्हता किती उरली? माध्यमे, वृत्तपत्रे आणि नियतकालिकातील त्या संदर्भातल्या बातम्या एवढाच एक साक्षीदार घेऊन आपली केस उभी करणारे मुश्रीफ़, प्रस्तावनेतच आपल्या साक्षीदारावर खोटेपणाचा शिक्का मारतात. पण त्याच्याही पुढला मुद्दा आहे, की ज्या बातम्या त्या काळात छापून आल्या, त्या मुळातच गुप्तचर खात्याने उठवलेल्या वावड्या होत्या, असाही त्यांचा दावा आहे. मात्र त्यातील जितक्या मुश्रीफ़ना खर्‍या आणि सोयीच्या असतील, तितक्या वाचकाने खर्‍या मानाव्यात; असा त्यांचा आग्रह आहे आणि न्या. कोळसे पाटिलही त्या खर्‍या मानून बसले आहेत. मुश्रीफ़ यांचा मूळ सिद्धांत असा आहे, की करकरे यांना ठार मारण्यासाठीच सगळे कारस्थान शिजवले गेले आणि घडवून आणले गेले. त्यामागे पकिस्तान असण्यापेक्षा भारतीय गुप्तचर खातेच मारेकरी आहे. आणि त्याच खात्याला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी मुश्रीफ़ साहेब त्याच खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या अफ़वांवर विश्वासही ठेवायची वाचकावर जबरदस्ती करीत आहेत. मग सांगा अफ़जलखानाचा कोथळा कोणी काढला? कोणी का काढेना? तो ज्याने काढला किंवा जिथे लपवून ठेवला होता, तो मुश्रीफ़ांनी हुडकून दाखवला की नाही? चला वाजवा टाळ्या!

1 comment:

  1. भाऊसाहेब , हे सर्व इतक्यावर थांबत नाही . माझे स्पष्ट मत आहे कि करकरेंना उगाच मोठे केले गेले . ते विशिष्ठ पुरोगामी राजकारण्यांच्या हातातले बाहुले होते. मालेगाव केस मध्ये त्यांनी खोटे पुरावे उभे केले असा दाट संशय आहे. काळाच्या ओघात सत्य बाहेर येईलच. करकरेंचा नेहरू व्हायला वेळ लागणार नाही

    ReplyDelete