Thursday, January 15, 2015

मनसेचे भवितव्य काय असेल?



मनसेला खिंडार पडल्याच्या बातम्या मोठ्या मजेशीर आहेत. अशाप्रकारे हल्ली अनेक पक्षांना खिंडार पडतच असते आणि परिणामी दुसर्‍या कुठल्या पक्षाचा बुरूज उभा रहात असतो. ही भारतीय राजकारणाची खरी शोकांतिका होऊन बसली आहे. मनसे या राज ठाकरे यांच्या पक्षाची गेल्या दोन निवडणूकात पुरती शोकांतिका होऊन गेली. त्यासाठी त्यांना अन्य कुठल्या पक्षाला वा अन्य नेत्यांना दोष देता येणार नाही. कारण त्यांच्या पक्षाला अवघ्या दोनतीन वर्षात जनतेचा जो पाठींबा मिळालेला होता, त्याची कारणेच त्यांना उमगली नाहीत. खरे सांगायचे तर राजकीय विश्लेषकांनाही अशा लोकप्रियतेची वा अपयशाची कारणे उमगलेली नाहीत. १९ मे २०१४ पर्यंत कोणी मोदीलाट असा शब्द वापरायला तयार नव्हता. कोणी बोललाच तर त्याची हेटाळणी व टवाळी करण्यात राजकीय अभ्यासक धन्यता मानत होते. पण आजकाल त्यांच्याच तोंडी मोदीलाट ओसरली काय अशी चर्चा असते. जी लाट त्यांना ओळखता आली नाही वा तिचा सुगावा लागला नव्हता, ती ओसरण्याची चिन्हे तरी अशा जाणत्यांना कशी कळावीत? मग असे भामटे विश्लेषक एक हमखास शब्द आपल्या विवेचनात वापरतात. करिष्मा असा तो शब्द आहे. ज्या निकाल वा मतदानाने असे जाणते खुळे पडतात, तिथे जिंकणार्‍याचा करिष्माच निकाल फ़िरवून गेला, असा बचाव मांडला जातो. पण प्रत्यक्षात असा कुठलाही करिष्मा नसतो. मतदानात सामान्य नागरिक आपली समजूत व प्राप्त परिस्थितीत उपलब्ध पर्याय, यातून उमेदवार वा पक्षाची निवड करत असतो. त्यात मग ज्याची संख्या वाढली, त्या पक्षाचा वा नेत्याचा करिष्मा असा निष्कर्ष हे जाणते काढतात. त्या शब्दाला नेत्याने किती भुलावे, यावर त्याचे राजकीय भवितव्य अवलंबून असते. राज ठाकरे यांची तिथेच फ़सगत झाली. त्यांना आरंभी मिळालेले यश, हा आपला करिष्मा वाटला आणि पुढले भविष्य विस्कटून गेले.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सुत्रे हाती घेतल्यापासून बाळासाहेबांचा प्रस्थापित असलेला जो नेतागण होता, त्याचे बस्तान ढिले होत गेले. त्यातून जे नाराज होते आणि ज्यांना नव्या व्यवस्थेमध्ये भविष्य दिसत नव्हते, त्यांनी राज ठाकरे यांची साथ दिली. काही प्रमाणात त्याचा प्रभाव जनमानसावरही पडला. उद्धव ठाकरे सतत पित्याच्या छायेत होते आणि पर्यायाने त्यांच्या भोवताली असलेल्या मोजक्या सल्लागारांच्याच कथनावर निर्णय घेत राहिले. पण पित्याच्या निर्वाणानंतर आणि लोकसभा यशानंतर युती तुटली, तेव्हा त्यांची खरी कसोटी लागली. त्यांनी निकटवर्तियांच्या सल्ल्यावर विसंबून रहाण्यापेक्षा कार्यकर्ते व लोकांमध्ये जाऊन थेट संपर्काचा कारभार सुरू केला. त्यातच युती तुटल्याने आपले सर्वस्व पणाला लावायची संधी त्यांना मिळाली. शिवाय राज्यात कॉग्रेस राष्ट्रवादी विरोधात लाट असल्याचा लाभही त्यांना मिळू शकला. त्याचा एकत्रित परिणाम सेनेला प्रथमच स्वबळावर राज्यव्यापी निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि मराठी बाण्याचा गवगवा झाल्याने राज ठाकरे यांच्या मनसेपेक्षा शिवसेनेला महत्व आले. मराठी बाण्यासाठी कसोटीच्या वेळी त्या मानसिकतेचे लोक बाकीच्या गोष्टी विसरून सेनेच्या मागे एकवटले. त्याचा सर्वाधिक फ़टका राज ठाकरे यांच्या पक्षाला बसला. त्यांना मुळात मोदीच्या झंजावातामध्ये कोणती राजकीय भूमिका घ्यावी, याचा अंदाजच करता आला नाही. तिथून मनसेची दुर्दशा सुरू झाली होती. मग लोकसभेत निवडून आल्यास मोदींचे समर्थन करण्याचे एका बाजूला बोलायचे आणि दुसरीकडे भाजपा-सेना युतीविरोधात उमेदवारही उभे करायचे, अशी चुक झाली. पुढे युती तुटल्यावर सेनेसोबत जायला हरकत नव्हती. त्यासाठी प्रयत्न करायला हवा होता. पण राज ठाकरे फ़सले होते, करिश्मा नावाच्या एका गुंतवळ्यात. त्यातून बाहेर पडून मतदाराची मानसिकता समजून घेण्याचीच त्यांना गरज वाटली नाही.

आरंभीच्या यशातून करिष्म्याची झिंग चढल्यावर आपल्यामुळेच तिकडे मतदार झुकतो अशी समजूत झाली. अर्थात राज ठाकरे कशाला? आजकाल भाजपाच्याही अनेक नेत्यांना त्याच भ्रमाने पछाडलेले आहे. मोदींच्या शब्दावर लोक मते देतात, या भ्रमातून बाहेर पडायची इच्छाच आता भाजपाचे नेते गमावून बसले आहेत. चारपाच वर्षे राज ठाकरे याच भ्रमात गुरफ़टले होते. लोक कुणालाही मते देतात, तेव्हा नेत्याच्या व्यक्तीमत्वाने भारावून देतात, हे नाकारता येणार नाही. पण ते व्यक्तीमत्व काही आश्वासकही असते आणि बाकीचे निराशेचे प्रतिनिधी असतात. म्हणूनच ज्या व्यक्तीमत्वाकडे लोक आकर्षित झालेत, त्याला पुढल्या मतदानापर्यंत लोकांनी मते म्हणजे संधी दिलेली असते. ती संधी म्हणजे त्या नेत्याची वा पक्षाची ताकद नसते. त्याला मिळालेल्या जनतेच्या शुभेच्छा असतात. त्यांचा वापर नेता व पक्ष किती प्रमाणात चांगलेपणाने करून उत्तम बदल घडवतो, याकडे जनता बारीक लक्ष ठेवून असते. नालायक कॉग्रेसला लोकांनी २००४ व २००९ मध्ये दोन संधी दिल्या, तेव्हा त्या पक्षाची ताकद वाढलेली नव्हती. पण आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करण्यापेक्षा कॉग्रेसने सुडबुद्धीने त्याची पुरती नासाडी करून टाकली. अल्पांशाने राज ठाकरे व मनसे यांच्याही बाबतीत असेच म्हणता येईल. पहिल्या प्रयत्नात १३ आमदार अधिक नाशिक महापालिकेची सत्ता मनसेला मिळाली. पाच वर्षात त्यांनी काय करून दाखवले? नाशिककरांनी मनसेकडे कशाला पाठ फ़िरवली, त्याचे उत्तर यातून मिळू शकते. मागल्या खेपेचे सर्वच आमदार यावेळी पराभूत कशाला झाले? शिवसेनेला पाडून जिंकलेल्या परळ व दादर अशा दोन जागी शिवसेनेकडून मनसे उमेदवार कशाला पराभूत झाले? आपल्याला मराठी मतदार इतका तडकाफ़डकी कशाला सोडून गेला, ते राज ठाकरे यांनी शोधून काढणे अगत्याचे आहे. त्यांना राजकारणात टिकून रहायचे असेल तर.

प्रविण दरेकर, गीते वा पाटील असे माजी आमदार भाजपात गेल्याने मनसेचे फ़ारसे नुकसान होणार नाही किंवा भाजपाला मोठा लाभ मिळेल असेही नाही. अशा येणे वा जाणे यातून देखावे छान उभे रहातात. पण त्यातून कुठल्याच पक्षाची एक टक्काही मते वाढत नाहीत वा घटत नाहीत. त्या आयाराम गयाराम यांचा व्यक्तीगत प्रभाव त्या परिसरापुरता असेल, तेवढा लाभ मिळू शकतो. काही प्रसंगी तितकाही मिळत नाही. बबनराव पाचपुते यांच्या निमीत्ताने त्याचाही अनुभव आपल्या समोर आहे. पण मनसेची चिंता वेगळी आहे. नुसते नेते पक्ष सोडून गेलेले नाहीत. पक्षाची संघटनाही पुरती मरगळली आहे. नेत्यांनी पराभवाचे आत्मपरिक्षण करून नव्याने पक्षाला उभारी देण्याविषयी कुठलीही पावले उचलेली दिसत नाहीत. पुर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना मुळ पक्षात विलीन होण्याची अतीव इच्छा असताना राजने त्यासाठी कुठली हालचाल केलेली दिसत नाही. त्यातूनच नेत्यांमध्ये चलबिचल वाढलेली आहे. शेवटी सामान्य कार्यकर्ता व सत्तेच्या मधाचे बोट लागलेला नेता, यातला हाच फ़रक असतो. ज्याला सत्तेची चटक लागली, त्याला सत्तेपासून वंचित ठेवता येत नसते. असे लोक पक्ष उभारत नाहीत, की त्याला विजयापर्यंत घेऊन जात नाहीत. कसल्याही पदाची अपेक्षा न बाळगता झेंडा मिरवणारे खरे पक्षाचे निष्ठावंत असतात आणि त्यांच्याच खांद्यावर पक्ष उभा असतो. आपल्या पराभूत उमेदवारांची उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशन काळात बैठक घेऊन जे साधले, तसे काही राजनी मागल्या तीन महिन्यात केल्याचे कानावर येऊ शकलेले नाही. मनसेला यातून सावरायचे असेल, तर कोण गेले त्यापेक्षा जे राहिलेत, त्यांची हिंमत वाढवण्याच्या दिशेने पावले उचलायला हवीत. मग ती पुनश्च हरिओम करण्याची असोत वा पुन्हा शिवसेनेत विलीन व्हायच्या दिशेने असोत. नुसते गप्प बसून काहीही साधणार नाही.

No comments:

Post a Comment