Monday, August 3, 2015

याकुबची फ़ाशी आणि माया कोडनानी

   याकुब मेमन आता फ़ाशी गेला आहे आणि म्ह्णून त्याचा विषय संपला असे होत नाही. किंबहूना तसे होऊ दिले जाणार नाही. म्हणूनच जेव्हा याकुबची फ़ाशी थांबणे शक्य असल्याचे स्पाष्ट झाले, तेव्हापासून राजीव गांधींचे मारेकरी, गुजरात दंगलीच्या आरोपी माया कोडनानी यांच्या फ़ाशीचा विषय पटलावर आणला गेला आहे. आता काय युक्तीवाद सुरू झाला आहे? याकुबला फ़ाशी म्हणजे न्याय असेल, तर गुजरात दंगलीत नरोडा पाटिया येथील हत्याकांड प्रकरणी दोषी ठरलेल्या भाजपाच्या तेव्हा असलेल्या मंत्री माया कोडनानी यांनाही सामुहिक हत्याप्रकरणी फ़ाशी व्हायला हवी. चटकन अनेकांची इथे दिशाभूल होते आणि तोच तर अशा युक्तीवादाचा मुख्य हेतू आहे. कारण याकुबची फ़ाशी अनेक दिव्ये पर करून अंतिम टप्प्यावर पोहोचली. टाडा कोर्टापासून सुप्रिम कोर्टापर्यंत त्याच्या फ़ाशीसाठी व विरोधात युक्तीवाद झालेले आहेत आणि त्यानंतरच फ़ाशीवर शिक्कामोर्तब झालेले होते. त्याहीनंतर राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज फ़ेटाळला गेला आणि इतके झाल्यावरही मागल्या आठ्वड्यातला मोठा तमाशा रंगवला गेला. तेव्हा कोणीही याकुबच्या गुन्ह्याविषयी बोलत नव्हता. तेव्हाचा सगळा युक्तीवाद फ़ाशीची शिक्षा अमानुष असल्याचा होता आणि मुंबईतल्या स्फ़ोटाच्या गुन्ह्याविषयी कोणाची तक्रार नव्हती. मुद्दा एकच लढवला जात होता, तो फ़ाशीची शिक्षा नसावी इतकाच. म्हणजेच जे कोणी याकुबचे सहानुभूतीदार म्हणून आठवडाभर किल्ला लढवत होते, त्यांना कुणालाही फ़ाशी होऊ नये असेच वाटत असल्याचा निदान आवेश होता. आणि त्यात किंचित जरी प्रामाणिकपणा असेल, तर आताही त्या सर्वांनी तितक्याच आवेशात पुढल्या प्रत्येक वेळी कोणालाही फ़ाशीची शिक्षा होत असेल, तर तिच्या विरोधात कंबर कसून उभे रहायला हवे. तेव्हा फ़ाशीशी शिक्षा झालेला आरोपी हिंदू वा मुस्लिम किंवा भाजपावाला किंवा सेक्युलर असला तरी त्याच्या बाजूने उभे रहायला हवे ना?

कुठलाही प्रामाणिक माणूस जेव्हा तत्वाचा आव आणतो, तेव्हा त्याने व्यक्ती-धर्म वा अन्य कुठल्या निकषावर आपल्या तत्वाला मुरड घालून चालत नाही. याकुबच्या बाबतीत ज्यांना पुळका आलेला होता, त्यांचा विषय पुरावे साक्षीशी नव्हता, तर फ़ाशीची शिक्षा लांच्छनास्पद असल्याची भूमिका होती. पण तीच भुमिका किती फ़सवी व भंपक बनवेगिरी होती, त्याची साक्ष त्याच मंडळींनी याकुब फ़ासावर लटकण्याच्या आधीच द्यायला सुरूवात केली होती. त्यांनी माया कोडनानीला फ़ाशी देण्याची मागणी गुजरात सरकारने केलेली नाही, असा आक्षेप घ्यायला सुरूवात केलेली होती. म्हणजे त्यांना फ़ाशीशी कर्तव्य आहे काय? असते तर त्यांनी माया कोडनानीला सरकारने फ़ाशीची शिक्षा मागितली नाही, त्याचे स्वागतच करायला हवे होते. कारण तिथे तरी त्यांच्या फ़ाशी विरोधाला एका सरकारचे समर्थन कृतीतून मिळालेले आहे. परंतु तसे झाले नाही आणि आता याकुब फ़ाशी गेल्यावर कालचेच फ़ाशी विरोधक कोडनानीला फ़ाशीची मागणी करायचा आग्रह धरू लागले आहेत. यातून एक गोष्ट लक्षात येते, की त्यांचे याकुबप्रेम जितके पक्के तितकाच, माया कोडनानीविषयी असलेला तिरस्कार भक्कम आहे. मग त्याचा अविष्कार करताना ही मंडळी कायदा, न्याय, तत्वज्ञान यांचा उपयोग कंडोमसारखा करीत असतात. मजा मारायला वापरायचे आणि काम संपले की उकिरड्यावर फ़ेकून द्यायचे. मात्र आपला कंडोम अत्यंत पवित्र व पुण्यवंत असल्याचाही दावा करायचा, इतकी बदमाशी त्यातून साफ़ नजरेला येते. आधी त्यांनी आपले याकुबप्रेम झाकायचा उद्योग केला व फ़ाशी विरोधाचे नाटक रंगवले आणि आता फ़ाशीचा आग्रह धरून कोडनानी विषयक द्वेषाची साक्ष दिलेली आहे. पण कोडनानी प्रकरण त्याच्याही पलिकडले आहे. गुजरात सरकारने तिला फ़ाशीची मागणी करू नये असा पवित्रा घेऊन पुरोगामी लोकांच्याच इच्छा पुर्ण केलेल्या नाहीत काय?
 
मागली तेरा वर्षे गुजरातच्या दंगलीचे राजकारण चालले आणि त्याचे पडसाद देशभर उमटत राहिले. सतत मोदींना लक्ष्य करताना प्रमुख आरोप कुठला होता? गुजरात सरकार दंगल पिडीतांना न्याय देत नाही, गुन्हेही नोंदले जात नाहीत. मग ही सर्व हजारो मुस्लिम पिडितांना न्याय देण्याची जबाबदारी भारतातल्या पुरोगाम्यांनी थोर कार्यकर्ती तीस्ता सेटलवाड यांच्यावर सोपवलेली होती. मागल्या तेरा वर्षात तीस्ताने गुजरातच्या दंगलग्रस्तांच्या नावाने करोडो रुपयांची उलाढाल मस्त तेजीत केलेली होती. खरे तर गुजरात सरकारने तिचा धंदा उत्तम चालवण्यासाठीचे धोरण म्हणून दंगलपिडीतांच्या बाबतीत अनास्था दाखवली म्हणावे, इतकी परिस्थिती होती. गुजरातच्या दंगल व हिंसाचारात सरकार नेहमी दंगलखोरांच्याच पाठीशी उभे राहिले, असा पुरोगाम्यांचा दावा राहिला आहे. त्याच भूमिकेतून तेरा वर्षात गुजरात व अन्यत्रच्या निवडणूकामध्ये पुरोगाम्यांनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्या होत्या. मग आज अकस्मात त्यांना कुठल्या फ़ाशी वा शिक्षेसाठी गुजरात सरकारची मदत कशाला हवी आहे? सरकारने तरी असे काही करून तीस्ताच्या पोटावर पाय कशाला आणावा? पण इतके होत असताना तीस्ता कुठे आहे, असा सवाल या पुरोगाम्यांनी विचारायला हवा आहे. तीस्ताचा शोध घ्यायचे सोडून त्यांनी गुजरात सरकारच्या दारात फ़ाशीची भिक मागत वाडगा घेऊन कशाला उभे रहावे? माया कोडनानीला पकडण्यासाठी आकाशपाताळ एक करणारी तीस्ता सध्या आहे तरी कुठे? गुजरातचे नरोडा पाटियाचे बिचारे पिडीत डोळ्यात अश्रू आणून न्यायाची प्रतिक्षा करीत असताना तीस्ता त्यांना सोडून कुठे गायब झाली आहे? तर मागल्या तेरा वर्षात जो तेजीत धंदा केला, त्यातल्या अफ़रातफ़रीचे हिशोब जुळवण्यात तीस्ता व्यस्त आहे. स्वत:लाच जामिन मिळवण्यासाठी तीस्ताची सध्या तारांबळ उडाली आहे. मग कोडनानी फ़ाशी जाते की जन्मठेप भोगते, याच्याशी तिला कर्तव्य काय?

मुद्दा इतकाच की इथे सगळी दिशाभूल होत असते. तीस्ताचे अनुयायी व याकुब बाबाचे भक्त यांचा मागल्या तेरा वर्षातला एकच आरोप होता, की गुजरात सरकार माया कोडनानीला वाचवते आहे. तिला पकडू देत नाही की तिच्यावर गुन्हा दाखल करू देत नाही. प्रत्यक्षात गुजरात सरकारने नेमलेल्या पोलिस पथकाकडूनच कोडनानी यांच्यावर आरोप दाखल झाले व त्यांना दोषी ठरवण्यात आलेले आहे. पण त्याचे किंचितही श्रेय कुणी पुरोगामी लोक गुजरात सरकारला देत नाहीत. तर तीस्ताला त्याचे श्रेय देत असतात. मग आताही त्यांना जी फ़ाशीची शिक्षा हवी आहे, त्यासाठी त्यांनी गुजरात सरकारला साकडे घालण्यापेक्षा तीस्ताला नवस बोलावेत. पण तसे होणार नाही. दुटप्पीपणा हेच पुरोगामीत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे याकुब भक्ती करताना फ़ाशी अमानुष असल्याने रद्दबातल व्हायचा आग्रह धरायचा आणि कोडनानीचा खटला आला, मग मात्र फ़ाशीच्या मागणीसाठी आग्रही व्यायचे असे होणारच. त्यालाच तर पुरोगामीत्व म्हणतात. गंगा गये गंगादास जमना गये जमनादास अशी आजकाल पुरोगामीत्वाची सोपी व्याख्या झालेली आहे. अन्यथा कालपर्यंत याकुबचा फ़ास रोखायला धावणार्‍यांना आज कोडनानीचा फ़ास आवळायची उताविळ कशाला झाली असती? पण संधी साधून सामान्यजनांच्या मनाचा गोंधळ उडवायचा यासाठीच पुरोगामी बुद्धी वापरली जात असते. म्हणून तर सहा वर्षे याकुबच्या फ़ाशीची घोषणा होऊनही जी मंडळी गप्प होती. ती अखेरच्या क्षणी मैदानात आली. आता ती फ़ाशी उरकली गेल्यावर त्यांना नसलेली फ़ाशी व्हायलाच हवी, अशी उबळ आलेली आहे. त्यात कुठली मानवतावादी भूमिका नाही की न्यायाची चाड नाही. निव्वळ आपल्या राजकीय स्वार्थांसाठी कुणाच्याही जीवाशी, भावनांशी व फ़ाशीच्या दोराशी खेळ चालू आहेत. जितक्या थंड माथ्याने टायगर-याकुब मेमन स्फ़ोट घडवतात वा पानसरे दाभोळकरांचे खुन पाडले जातात, तितक्याच थंड चित्ताने असले हिडीस युक्तीवाद होतात. त्यापासून सामान्यजनांनी आणि अगदी याकुबच्या कुटुंब व धर्मबांधवांनीही जागरूक रहाण्याची गरज आहे.


7 comments:

  1. परखड.... वाचनीय लेख

    ReplyDelete
  2. Swarthamule sagle dhrutrashta banle aahet.

    ReplyDelete
  3. khupach sundar lekh aani utkrushta shabdrachana

    ReplyDelete
  4. भाऊ तुम्ही एकदम आमच्या मनातल बोलून जाता राव..... अप्रतिम.... त्यांच्या डोक्यात झिणझिण्या आल्या असतील... जर त्यांनी वैधानिक इशारयाकडे दुर्लक्ष करून हा ब्लॉग वाचला असेल...

    ReplyDelete
  5. नेमकं आणि सणसणीत !

    ReplyDelete
  6. but what about to those who suffered in 1993 mumbai riots victim they also waiting for justice.leave hanging of maya kodnani at least keep her behind bar. this small information about her .On 17 April 2013, the Gujarat government decided to seek death penalty for Maya Kodnani by filing an appeal in the High Court against the Special Court’s judgement in the case. On 14 May 2013, the Gujarat government subsequently withdrew its decision to seek the death penalty. In November 2013, she was granted an interim bail of 3 months for treatment of intestinal tuberculosis. On 30 July 2014 Gujarat High Court has granted bail to her on grounds of ill health. your are tottaly biased.

    ReplyDelete