Tuesday, August 18, 2015

भूषण पुरस्काराला विरोध: मेथड इन मॅडनेस



बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुरस्काराच्या विरोधात जी वावटळ उठली आहे, ती बघता मला गजेंद्र चौहान यांचे समर्थन करायची अनिवार इच्छा झाली. याचे कारण जर समाजाची अशीच अपरिहार्य दुफ़ळी होणार असेल, तर त्यात तुम्हाला कुठल्या तरी एका बाजूला उभे रहाणे भाग असते. अशा वेळी तारतम्य वा तटस्थता निरर्थक होऊन जातात. पाऊणशे वर्षाचे वयोमान असलेल्या व आयुष्य शिवशाहिरीला वाहिलेल्या प्रतिभावंताला केवळ त्याच्या जन्मजातीमुळे वा त्याचा ओढा आपल्याला मान्य नसलेल्या मताच्या बाजूने असल्याने इतका कडवा विरोध करणारे मैदानात उतरले असतील, तर त्यात मग आपलेही काही कर्तव्य शिल्लक उरते, असे मला प्रामाणिकपणे वाटते. संभाजी ब्रिगेड वा तत्सम लोकांनी बाबासाहेबांच्या विरोधात काहुर माजवणे दुर्लक्षित करता येते. कारण त्यांच्या अजेंडाच ब्राह्मणद्वेष आहे. पण त्यालाच पुरोगामीत्व किंवा शाहू फ़ुले आंबेडकर असे लेबल लावून पुरोगामी दांभिक त्याला बुद्धीवाद म्हणून त्याची प्राणप्रतिष्ठा करायला पुढे आले असतील, तर गप्प रहाणे तशा हैदोसाला अप्रत्यक्ष मान्यता देणेच ठरत असते. म्हणूनच मी नुसता बाबासाहेबांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे समर्थन करत नाही, तर कर्तृत्वहीन गजेंद्र चौहान याच्याही नेमणूकीचे स्वागत करतो आहे. मागल्या काही महिन्यात एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने पुढे आली, की प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्राचा आखाडा बनवण्याचा घाट घातला गेला आहे. त्यात जीएसटी उपयुक्त विधेयकाचाही केवळ विरोधाचे राजकारण म्हणून बळी पडला आहे. त्या वृत्तीला चुचकारत बसले तर हा रोग उद्या जीवघेणे भयावह रुप धारण करण्याची शक्यता आहे. म्हणूनच या प्रवृत्तीच्या विरोधात भूमिका घेणे आवश्यक बनले आहे. अगदी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शब्दाला स्मरून मी अशी भूमिका घेतली आहे.

कॉम्रेड पानसरे म्हणतात, ‘आपल्या धडावर आपलेच डोके असायला हवे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असायला हवे, अन्यथा आपण भरकटत जातो’. आजकाल त्यांचेच अनुयायी म्हणून मिरवणार्‍यांचे डोके कुणाच्या धडावर आहे किंवा त्यांच्या धडावर कोणाची डोकी मिरवत असतात, त्याचाच पत्ता लागत नाही, अन्यथा असे लोक पुरस्काराच्या विरोधात सह्याजीराव कशाला झाले असते? आपण काय करीत आहोत, याचेही भान सुटलेली ही मंडळी कुणाला वेडी वाटतील. पण त्यामध्ये किंचितही वेडेपणा नाही. शेक्सपियर म्हणतो तशी या वेडेपणात एक आखलेली पद्धती आहे, ‘मेथड इन मॅडनेस’. सरकार म्हणून ज्यांना लोकांनी निवडून दिले आहे व ज्यांचा अजेंडा-विचार लोकांनी बहुमताने मान्य केले आहेत, त्यांना त्यानुसार काम करू द्यायचे नाही, अशी ती मेथड आहे. म्हणजे भले अर्धशतकाच्या फ़सवणूकीनंतर तथाकथित समाजवाद पुरोगामीत्वाचे थोतांड जनतेने फ़ेटाळून लावले असेल. पण बुद्धीमंत म्हणून शाप-वरदान देण्याचा आव आणून आम्ही परत तोच अजेंडा सरकारच्या गळ्यात घालू, असा यामागचा उघड हेतू आहे. म्हणूनच मोदी सरकार आल्यापासून वा राज्यात सत्तांतर घडल्यापासून बुद्धीमंत म्हणून मिरवणारे मुठभर लोक सरकारच्या प्रत्येक निर्णयाच्या विरोधात सह्यांची मोहीम काढताना दिसतील. जीएसटी हे विधेयक कॉग्रेसचे सरकार असतानाच बनवण्यात आले. पण भाजपाच्या सरकारने संसदेत मांडताच त्यातले दोष दाखवण्याची पुरोगामी स्पर्धा सुरू झाली. याकुबची फ़ाशी कॉग्रेसच्याच शासन काळातील आहे. पण तेव्हा अवाक्षर न बोलणार्‍यांना आज याकुबच्या प्रेमाचा उमाळा आलेला होता. आधीच्या सरकारांनी पुण्याच्या फ़िल्म प्रशिक्षण संस्थेत कोणाला नेमले, त्यांची नावेही आज कुणाला आठवत नाहीत. पण मोदी सरकारने कोणाला नेमले की गाजावाजा सुरू. ह्यातली मेथड लपणारी नाही.

भले सरकार तुमचे आलेले असेल आणि जनतेने आम्हाला आमच्या अजेंड्यासह फ़ेटाळून लावलेले असेल; पण म्हणून आम्ही जनतेला हवा असलेला कुठलाही बदल होऊ देणार नाही, असा चंग या लोकांनी बांधलेला आहे. त्यासाठी मग नैतिकतेचे मुखवटे लावून तमाशे चाललेले आहेत. यापैकी कोणी लोकांना भावणार्‍या विषयाविषयी आस्था दाखवलेली आढळणार नाही, की लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आवाज उठवल्याचे दिसणार नाही. दुष्काळ व अवर्षणाने महाराष्ट्र होरपळतो आहे. त्याविषयी यातल्या कोणी किती अश्रू ढाळले आहेत? हजारो गावात पेरण्या करपून गेल्या आणि शेती ओसाडली आहे. मराठवाड्यात तर पिण्याच्या पाण्याची ऐन पावसाळ्यात चिंता सतावते आहे. त्यासाठी यातल्या कोणी सरकारला जाब विचारल्याची बातमी कुणाच्या कानी आलेली आहे काय? पण आपली सर्व शक्ती व बुद्धी त्यांनी पुरंदरे नावाच्या व्यक्तीला पुरस्कार देण्याच्या विरोधात पणाला लावली आहे. पुरंदरे या ब्राह्मणाला वा हिंदूत्व मानणार्‍याला सरकारने सन्मानित केले नाही, मग यांच्या पितरांना मुक्ती मिळणार आहे. त्यासाठी आटापिटा चालू आहे. पण दुष्काळात तडफ़डणार्‍या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याबद्दल यातल्या कोणी सरकारला जाब विचारला नाही. कारण स्पष्ट आहे. त्यांना जनतेशी, तिच्या गरजा भावनांची काडीमात्र संबंध नाही. त्यांचे होमहवन कर्मकांड चालू आहे आणि सरकारने त्यातच लक्ष घालावे, अशी त्यांची मागणी आहे. आणि नाही केल्यास सरकार नामे राजाला शाप द्यायला हे ॠषिमुनी सज्ज झाले आहेत. पुरातन जन्मजात ब्राह्मणाला पुरस्कार नाकारून आजकालच्या नव्या पुरोगामी ब्राह्मणांना समाधानी करण्याचा त्यांचा आग्रह आहे. पानसरे ज्याला ब्राह्मण्य म्हणतात, त्याचा अविष्कार त्यांच्याच नावाचा जप करणार्‍यांनी इतक्या उजळमाथ्याने करावा, यापेक्षा त्या विचारांचा दुसरा कुठला पराभव असेल?

याचा अर्थ जाणून मोदी सरकारला कारभार करणे भाग आहे. फ़डणवीस सरकार किंवा शिवसेना-भाजपा यांनी यापुढे यातली मेथड ओळखूनच त्याच्या विरोधात दंड थोपटले पाहिजेत. तुम्ही पुण्य़ केलेत तरी तेच पाप ठरवले जाणार आहे आणि वाघ म्हणा किंवा वाघोबा, खाणार्‍याला नुसते निमीत्त हवे आहे. तर वाघ म्हणून चुचकारत कशाला बसायचे? थेट वाघ्या म्हणूनच प्रतिहल्ला करणे योग्य ठरणार आहे. थोडक्यात असे जे कोणी नैतिकतेचे मक्तेदार म्हणून समाजात मिरवत असतात, त्यांना जनतेने आपल्या मतातून झिडकारले आहे आणि तरीही कुरघोडी करणार्‍यांना अपमानित होतानाच जगाला बघायचे आहे. म्हणूनच यापुढे सरकारने कुठलाही निर्णय घेताना त्याला अशा सह्याजीरावांचा हमखास विरोध असेल याची आधी खात्री करून घ्यावी. अशा नैतिकतेच्या मक्तेदारांचे समाधान होऊ शकेल, अशी कुठलीही कृती आपल्या हातून होणार नाही, याचा पुर्वविचार करूनच नव्या सरकारने निर्णय घेतले पाहिजेत. जेणेकरून अशा सह्याजीरावांचे नाक ठेचले जाईल, याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. कुठल्या पदासाठी वा नेमणूक पुरस्कारासाठी कोण योग्य व पात्र आहे, त्याकडे कनाडोळा करून बुद्धीमंत पुरोगाम्यांचा विरोध कोण अधिक ओढवून घेईल; अशा व्यक्तीलाच योग्यताप्राप्त समजून त्याचे नाव पुढे करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. कारण लोकांनी नुसते मोदी वा त्यांच्या पक्षाला मते दिलेली नाहीत. मतदाराने आजवरच्या थोतांडाला कंटाळून ज्या विचारांना वा दांभिकतेला झुगारले आहे, त्याच्या मताची कदर राखायला हवी आहे. लोकांना नकोश्या झालेल्या भामटेगिरीला कॉग्रेस आश्रय देत होती, म्हणून लोकांनी भाजपाला सत्तेवर आणले असेल, तर तथाकथित पुरोगामी विचारवंत, मान्यवर ह्यांनाच जनतेने झिडकारलेले आहे. तेव्हा अशा प्रवृत्ती व भूमिकेला नामोहरम करणे सरकारने आद्यकर्तव्य ठरते. म्हणूनच गेजेंद्र चौहान हाच सर्वाधिक लायक आहे किंवा बाबासाहेबच पुरस्कारासाठी सर्वोत्तम निवड आहे.

13 comments:

  1. Simply great analysis....

    ReplyDelete
  2. achuk shabdat paristhitiche aakalan! best

    ReplyDelete
  3. लेख आवडला.
    "....त्याकडे कनाडोळा करून बुद्धीमंत पुरोगाम्यांचा विरोध कोण अधिक ओढवून घेईल; अशा व्यक्तीलाच योग्यताप्राप्त समजून त्याचे नाव पुढे करण्याला प्राधान्य दिले पाहिजे...."
    वरील कारणाने आपण गाजेन्द्रांच्या निवडीचे समर्थन करत आहात
    पण हेच कारण बाबासाहेबांसाठी पण लागू करत आहात असे शेवटच्या वाक्याने प्रेरित होत आहे, हे खटकणारे नाही का?

    ReplyDelete
  4. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  5. सबनीस साहेब त्या आधी '' म्हणूनच सरकारने या पुढे निर्णय घेताना ' ' असे वाक्य आहे.

    ReplyDelete
  6. सुन्दर विश्लेषण....

    ReplyDelete
  7. नमस्कार भाऊ. आपले लेख नियमित वाचतो व सर्वच लेख आवडतात. हा ही लेख उत्तम जमून आला आहे. मात्र भावनेच्या भरात आपण गजेंद्र चौहान यांच्यासारख्या कम-अस्सल माणसाचे समर्थन करताना (जे आपणाला तत्वतः मान्य नसावे असे वाटते) त्याच ओघात "बाबासाहेबच पुरस्कारासाठी योग्य आहेत" असे म्हणून बाबासाहेबांसारख्या वयाने, अनुभवाने आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ अशा व्यक्तीला श्री. चौहान यांच्याच पंक्तीत बसवलेत ते सर्वथा अयोग्य आहे असे वाटते. आपण याचा जरूर विचार करावा ही विनंती.

    आपल्या सडेतोड लेखनाबद्दल आपल्याला धन्यवाद देतो व आपले अभिनंदन करतो. कळावे.

    - धनंजय सप्रे

    ReplyDelete
  8. bhau,
    lekh ekdam achuk he...!
    barobar lihilat

    ReplyDelete
  9. बहुमत लोकशाही म्हणजे अल्पमताचा धिक्कार नव्हे पण विचारात घ्यायला अल्पमत सकारात्मक हवे.
    घातक "मुसलमानी" अल्पमताचे चोचले पुरवण्याची घाणेरडी सवय जितकी लवकर मोडेल तितके 'बहुमत-अल्प्मत-सर्व-लोकहित साधेल.

    ReplyDelete
  10. मुळात बाबासाहेब पुरंदरेंना विरोध ते ब्राह्मण असल्याने झालेला नाही. राज व पवार हे आपापला फायदा बघताहेत आज वरचे बहुतांश पुरस्कार हे त्याच समाजाला मिळाले आहेत पण.... तेव्हा कधी जातीचा मुद्दा चरचेला आलेला नव्हता. त्यामुळे ब्राह्मण समाजाने गैरसमज करून घेऊ नये आणि मराठा समाजाने ब्राह्मण म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे पाहून नये. बासाहेब पुरंदरेंच्या लोकप्रियतेचा निष्क्रीय फडणवीस सरकार फायदा लुटताहेत: जे लोक राजा शिवछत्रपती मधील आक्षेपां वर १० वर्षे लढताहेत त्यांचा वाद खरा वाद आहे.
    तो कोर्टाटातही सुरूआहे. ज्यासाठी बाबासाहेब ही चुका दुरुस्त करण्याच्या मानसिकते पर्यंत आले आहेत पण तो मुद्दा भरकटवला जातोय. हे बाबासाहेबोत्तर महाराष्ट्राच्या हिताचे होणार नाही
    राजा शिवछत्रपती ग्रंथ अप्रतिम आहे पण त्यातही जे दोष किंवा चुका आक्षेप असतील त्या दुरुस्त करणे किंवा त्याचा स्पष्ट खुलासा
    बाबासाहेब पुरंदरेंनी करणे गरजेचे आहे. ती चूक बाबासाहेब पुरंदरेंच्या हयातीत दुरुस्त होणे किंवा त्यानी ठाम नकार देणे हेच महत्वाचे आहे आक्षेप वगळता बाबासाहेब प्रती व्यास मुनीच आहेत. त्यांचा गणपती बनून हे बदल बाबासाहेब सांगतील तशी औळ अन् ओळ उतरवून घेण्याची माझी तयारी आहे. बाबासाहेब ग्रंथ सुधारास तयार झाले पाहिजेत. कारण त्यांचं वय. अन्यथा नंतर जातीय महाभारत लिहिणेच म्या बातमीदारा नशिबी असणार. दोन प्रवाहात सलोखा हे महाराष्ट्र भुषण बाबासाहेब पुरंदरेंना ध्येय बनवावे लागेल. हा वाद नसता तर पूर्ण महाराष्ट्र या राज्य भूषणाच्या जयजयकारात रमला असता. आज एका ऋषीतुल्य प्रतिभावंताच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षणी ही वेळ आल्याचे वाईट वाटते
    खरोखर त्यांची भाषा खूप आवडते मला....भवानी तलवार जणू... पण ही तलवार काही ठिकाणी घसरली आहे. ते घाव बाबासाहेब पुरंदरे यांनीच घालवले पाहिजेत जे आक्षेप आहेत त्याबाबत बाबासाहेब बोलले पाहिजेत त्यांनी आपलं सोनं स्वतःच उजळवलं पाहिजे. मीही बालपणापासून त्यांचा भक्त अाहे आणि हा आग्रह धरण्याचा एका डोळस भक्ताला हक्क आहे. बाबासाहेब पुरस्कार बद्दल वंदन करताना माझी अपेक्षा गैर आहे का?
    Shivrajkatkar99@gmail.com 9325403226

    ReplyDelete
  11. भाऊ साहेब आपला मोबाईल नंबर द्या
    शिवराज आप्पासाहेब काटकर
    ९३२५४०३२२६ Shivrajkatkar99@gmail.com

    ReplyDelete
  12. NCP ne paksha sthapan zalyapasun jaat-paat hya goshtila khat pani ghatala ahe
    congress peksha jast jaat-paat mananara ha NCP paksha
    lekh awadala...!

    ReplyDelete
  13. भाऊ,जेम्स लेन प्रकरणाचे गुन्हेगार कोण? यावर तुम्ही लिहिले असल्यास त्याची लिंक किंवा छापील लेखाचा फोटो द्यावा. अजून लिहिले नसल्यास जरूर लिहावे,ही विनंती.

    ReplyDelete