Monday, August 3, 2015

माझ्यापुरता निर्णय: चॅनेलगर्दी पुरे झाली



मागल्या दिडदोन वर्षात अनेकदा विविध चॅनेलवर चर्चेत सहभागी झालो. पण मला त्यात कधीच मजा वाटली नाही आणि म्हणून त्याचा उल्लेख फ़ेसबुक पोस्टमध्ये कधीच केला नाही. सहभागी होत असल्याचेही इथे कधी अगोदर नंतर बोललोही नाही. काल सोमवारी एबीपी माझा विशेषच्या चर्चेत सहभागी होतो. त्यात कडेलोट झाला आणि म्हणूनच माझ्यापुरता निर्णय घेतला, की यापुढे अशा पॅनेल चर्चेत भाग घ्यायचा नाही. कारण तिथे छचोर व थिल्लर स्वरूपाच्या चर्चा होतात. त्या टिव्हीसमोर बसून बघण्यात अधिक मनोरंजन आहे. सहभागी होऊन लोकांच्या मनाचा आणखी गोंधळ उडवण्यास हातभार लावण्यापेक्षा आपणही प्रेक्षक होऊन त्यातल्या ठळक ढोबळ चुका सोशल माध्यमातून प्रेक्षकाच्या नजरेस आणून देणे जास्त उपकारक असेल, असे वाटल्याने ह्या निर्णयाप्रत आलो आहे.

कालचीच गोष्ट घ्या. चर्चेचा आरंभ माझ्यापासून झाला. लोकसभेतील कॉग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्याचा विषय होता. पंधराव्या लोकसभेच्या अंतिम अधिवेशनात तेलंगणाच्या निर्मितीचा विषय चालू असताना फ़लक दाखवून व गोंधळ घालणार्‍या डझनभर सदस्यांचे निलंबन तात्कालीन सभापती मीरा कुमार यांनी केल्याचा संदर्भ देत त्याचीच विद्यमान सभापती सुमित्रा महाजन यांनी पुनरावृत्ती केल्याचे मी म्हटलेले होते. नंतर बोलताना कॉग्रेसचे राज्यसभा सदस्य भालचंद्र मुणगेकर म्हणाले ६४ वर्षाच्या संसदीय इतिहासात ही अभूतपुर्व घटना आहे. ह्याला काय म्हणावे? कॉग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि त्यात आजचा भाजपा वा पुर्वाश्रमीच्या जनसंघाला कुठलाच सहभाग नव्हता, असेही मुणगेकर म्हणाले. जनसंघाचे संस्थापक डॉ, श्यामाप्रसाद मुखर्जी नेहरूंच्या पहिल्या मंत्रीमंडळात मग कशासाठी होते? एक उच्चविद्याविभूषित व माजी कुलगुरू इतक्या थिल्लरपणे विषयाची मांडणी करत असतील, तर त्या चर्चेत सहभागी होऊन आपण आपली बुद्धी खराब करून घेणेच नव्हे काय? त्यांच्या अशा थापेबाजीला एन्करने रोखायला हवे, जे कुठेच सहसा होत नाही. त्याच्यावरही कडी म्हणके ललित मोदी याच्यावर कुठले वॉरन्ट व गुन्हा नोंदला आहे अशी मी विचारणा केली असता तेच मुणगेकर उलट मला विचारतात; भाऊ तुम्ही भारतात रहाता काय? हा तर मुर्खपणाचा कळस होता. कारण चर्चेत सहभागी असलेल्या बहुतांश लोकांना ललित मोदी विषयाची बाराखडीही ठाऊक नव्हती. मागल्या दोनतीन महिन्यात माध्यमांनी ज्या थापा मारल्या त्यालाच सत्य समजून सर्व शहाणे ललित मोदीला फ़रारी आरोपी मानुन बसले आहेत आणि पर्यायाने सुषमा स्वराज यांना दोषी ठरवले जात आहे.

ललित मोदी मायदेश सोडून पळालेला व ब्रिटनमध्ये वास्तव्य केलेला परागंदा भारतीय नागरिक आहे, यात शंका नाही. पण तो गुन्हा करून फ़रारी झालेला व इथल्या कुठल्या कोर्टाला हवा असलेला गुन्हेगार नाही. त्याच्यावरच्या आरोपाची सक्तवसुली खाते तपास करते आहे. त्यासाठी त्याच विभागाने त्याला समन्स बजावलेले आहे. पण कुठल्याही कोर्टात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल नाही किंवा वॉरन्ट जारी झालेले नाही. म्हणूनच त्याला मायदेशी आणण्यासाठी युपीएप्रणित कॉग्रेस सरकारने काही प्रयत्न केले नाहीत. पण चिदंबरम यांच्या आगावूपणाने त्याचा पासपोर्ट जप्त करण्याचा मुर्खपणा केलेला होता. त्याच्याच विरोधात ललितने दिल्ली हायकोर्टात न्याय मागितला होता आणि त्यातच सुषमा स्वराज यांची कन्या वकील म्हणून ललितला मदत करत होती. तो पासपोर्ट ललितला पर द्यावा असा निर्णय कोर्टाने दिला आहे. कुठलाही गुन्हा वा वॉरन्ट असते, तर हायकोर्टाने त्याला पासपोर्ट परत देण्याचा आदेश कशाला दिला असता? म्हणजेच जगाच्या पाठीवर कुठेही ललित मोदी असला तरी तो भारताचा अधिकृत नागरिक आहे आणि त्याच्यावर संकट आले तर त्याला सर्वप्रकारची मदत करणे हे भारत सरकारच्या परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांचे कर्तव्यच ठरते. पण मुळात ललित फ़रारी व गुन्ह्यात गुंतलेला गुन्हेगार असल्याची अफ़वा पसरवलेली आहे आणि मग त्याचाच आधार घेवून सुषमा स्वराज यांचा राजिनामा मागण्याचा खोटारडेपणा चालू आहे. याचा अर्थ ललितने आर्थिक गुन्हा वा अफ़रातफ़र केली नाही असे नाही. पण त्यासंबधी उभे असलेले नाटक मात्र तद्दन दिशाभूल करणारे आहे. तसे असते तर इंटरपोलच्या माध्यमातून त्याला मायदेशी आणणे अजिबात अवघड नाही.

इंटरपोलचे महासंचालक रोनाल्ड नोबेल यांनी त्याची ग्वाही दिलेली आहे. तीन वर्षात कुठल्याही भारतीय कायदा यंत्रणेने त्यांना ललित मोदी हवा असल्याचे कळवलेलेच नाही, तर त्याच्या विरोधात कुठल्याही लाल-पिवळ्या रंगाची नोटिस-अलर्ट जारी करण्याचा संबंधच कुठे येतो? तसे त्यांनी अनेक मुलाखतीतून स्पष्ट केलेले आहे. इतके असताना कालच्या माझा विशेषच्या चर्चेत दिल्लीतून सहभागी झालेले अशोक वानखेडे चार वॉरन्ट ललित विरोधात असल्याचे छातीठोकपणे सांगत होते. त्यावेळी घशाला कोरड पडण्यापर्यंत ओरडून मी कुठली व कोणत्या कोर्टाची वॉरन्ट असे विचारण्याचा प्रयास केला आणि त्याचे उत्तर मिळू शकले नाही. उलट मुणगेकर मला विचारतात, तुम्ही भारतात रहाता का? मुद्दा असा, की ललित विरोधात सक्तवसुली खात्याची समन्स जारी आहेत आणि ती त्याने तपासकामात सहभागी व्हावे यासाठी आहेत. समन्सला ललित दाद देत नसेल, तर त्या विभागाने कोर्टात जावून ललितला हजर करण्यासाठी आदेश मिळवायला हवा. ती हालचाल दिड वर्षात अर्थमंत्री चिदंबरम यांनी केली नाही आणि पासपोर्ट जप्त करण्याची पळवाट शोधली. त्यामुळे युपीए सरकार हायकोर्टात तोंडघशी पडलेले आहे. वानखेडे यांना सरकारी खात्याने काढलेले समन्स व कोर्टाचे वॉरन्ट यातला फ़रक उमगत नसावा. अन्यथा त्यांनी चार वॉरन्ट ललितवर असल्याचा दावा कशाला केला असता? मुळात खासदारांच्या निलंबनाचा विषय ललित मोदीच्या गुन्हे वा फ़रारी असण्याकडे जायला नको होता. पण एकुणच चॅनेल पॅनेल चर्चा अशाच भरकटत असतात. म्हणून त्या मनोरंजनात्मक असतात. त्यात सहभागी होऊन आपल्या मेंदूची कोशिंबीर करून घेण्यापेक्षा प्रेक्षक म्हणून त्याची मजा घेणे व त्यातल्या चुका व पोरकटपणाचे विश्लेषण करणे योग्य नाही का?

मजेची गोष्ट अशी झालेली आहे, की अशा पॅनेल चर्चेत नायक-नायिका असल्यासारखे भाजपा व कॉग्रेस प्रवक्त्यांना आमंत्रित केलेले असते. त्यांच्यातल्या प्रेम द्वेषाचे कथानक रंगवताना लागणारी अन्य पात्रे म्हणून पत्रकार वा अभ्यासकांना आमंत्रित केले जात असावे, असे माझे मत झाले आहे. थोडक्यात राजकीय विश्लेषक वा ज्येष्ठ पत्रकार म्हणून माझ्यासारख्यांना वरातीत नाचणार्‍या घोड्यांसारखे वापरले जाते, अशीही मला शंका येते. नाहीतरी इतकी वर्षे मी अशा नाटकात नव्हतो. कारण मी फ़टकळ असल्याने अशा चर्चेत अडचणीचा असतो. सहाजिकच मला आरंभापासून कोणी बोलवत नव्हता. पण ब्लॉग व सोशल माध्यमतील माझ्या विश्लेषणाने जराशी लोकप्रियता मिळवली आणि त्यात अनेक तरूण पिढीचेच पत्रकार अधिक असल्याने, अशा चर्चेत मला आमंत्रण मिळू लागले. तरी मी अनुत्सुक होतो. पण काही व्यक्तीगत मित्र व चहात्यांनी आग्रह केल्याने थोडासा सहभाग घेऊ लागलो. माझ्या सहभागाने काही बदल होईल अशी त्या सन्मित्रांची अपेक्षा होती. पण तसे काहीही होताना दिसत नाही. उलट अशा गोंधळात सहभागी होऊन माझ्याही मेंदू व बुद्धीला अशीच व्हायरस बाधा करण्याचा धोका जाणवू लागला आहे. म्हणूनच त्यापासून दूर रहाण्याचा निर्णय मी माझ्यापुरता घेतलेला आहे. म्हणजे मी वाहिन्यांवर बहिष्कार वगैरे घातलेला नाही. पण अशा उथळ व छचोर चर्चेपासून दूर रहाण्याचा माझा निर्णय आहे. त्यापेक्षा गावातल्या, गल्लीतल्या टपरीवर बसुन होणार्‍या चर्चा अधिक उदबोधक व फ़लदायी असतात असे माझे मत झाले आहे. तेव्हा त्यातले मनोरंजन ओळखून या चर्चा मी यापुढे कॅमेरा समोरून नव्हे तर टिव्हीसमोर बसून अनुभवणार आहे. काही अनुभव सोशल माध्यमात शेअरही करीन.

http://abpmajha.abplive.in/videos/2015/08/04/article672637.ece/ABP-MAJHA--Loksabha-Vishesh-03-08-2015


7 comments:

  1. हाहाहा! भाऊ! योग्य निर्णय! मलाही असेच वाटायचे की भाऊंनी सुद्धा चर्चेत सहभागी व्हावे. परंतु मी पाहिले आहे की चॅनेलच्या प्रस्तूतकर्त्यांना त्यांच्या मताशी सहमत असणारा पत्रकार हवा असतो. आपण तसे नसल्यामुळे आपल्याला ते लोक जास्त बोलूही देत नाहीत. म्हणून माझ्यासारख्यांना आपला अपमान केल्यासारखा वाटतो. आपण घेतलेला निर्णय योग्य आहे.
    वैज्ञानिक इशारा उत्तम आहे!

    ReplyDelete
  2. भाऊ,

    ब्लॉगरच्या सेटिंगमध्ये जाऊन फेसबुक व ट्विटर विजेट सक्रीय करा. त्यामुळे 'टिचकी'सरशी तुमच्या पोस्ट्स आम्हा वाचकांना थेट फेसबुक व ट्विटरवर ब्लॉग लिंकसह शेअर करणे सोयीचे होईल. शोधण्यास काहीही असुविधा असेल, तर मला सांगा. मी मदत करीन.

    धन्यवाद !

    ReplyDelete
  3. भाऊ तुम्ही भाषणात सांगितलेली सायकल आणि म्हैस ची गोष्ट आठवली ...योग्य निर्णय

    ReplyDelete
  4. भाऊ मी भागवत तावरे उपसंपादक आहे . असेच काहीसे विचार मला ए बी पी माझा वर असुदोद्दिन वोवेसी सोबत जेवा खांडेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी क्रॉस घेतला तेवा आले . एकतर या लोकांना हिंदी बोलता येत नाही एका वोवेसी समोर भांबावलेले आणि किती तरी प्रश्न असू शकत होते जिथे वोवेसी निरुत्तर होऊ शकले असते पण ……. त्यांना काय वाटले मला माहित नाही पण मला लाज वाटली
    ९८५०५२९२३२ आपला पायंडा आमच्यासाठी मार्गदर्शक आहे धन्यवाद

    ReplyDelete
  5. भाऊ, आपुला ब्लॉग बरा ! उत्तम निर्णय !

    ReplyDelete
  6. अगदी योग्य निर्णय !! धड करमणूकसुद्धा होत नाही. असो.

    ReplyDelete
  7. Bhau. Blog is so good and pure. We will definitely circulate your each blog on facebook. So that others can read it.

    ReplyDelete