Sunday, January 26, 2014

त्यात काय खोटे आहे?


   आम आदमी पक्षाचे दिल्लीतील कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी एका पत्रकार महिलेला एक खिजवणारा प्रश्न विचारला आणि त्यामुळे तमाम वाहिन्या ‘आप’वर घसरल्या आहेत. कारण त्या ‘इमानदार’ मंत्र्याने पत्रकारीतेचाच इमानदारीवर प्रश्नचिन्ह लावले आहे. परदेशी नागरिकांविषयी स्थानिक रहिवाश्यांच्या तक्रारीची दखल घेऊन भारती यांनी पोलिसांना बोलावले व तिथे धाडी घालायचा हट्ट धरला होता. पोलिसांनी त्याला नकार दिल्यावर भारती यांनी पोलिसांनाच अपशब्द वापरले. आपल्या सहकार्‍यांना संबंधित महिलांना ताब्यात घ्यायला प्रोत्साहन दिले. त्यामुळे कायदा हाती घेण्याचा आरोप भारती यांच्यावर लागला आहे. वास्तविक त्यांच्या हेतूबद्दल कोणी शंका घेऊ शकत नाही. पण कायद्याच्या अंमलबजावणीचे काही दंडक असतात. ज्यांना अधिकार असतो, त्यांच्या व्यतिरीक्त कोणी कायदा राबवू शकत नाही. तसे केल्यास त्याला अवैध म्हणूनच गुन्हा मानले जाते. भारतींकडून नेमका तोच अपराध घडला आहे. त्याबद्दल त्यांचे वेळीच कान उपटणे मुख्यमंत्र्याचे काम होते. पण आंदोलनाची झिंग चढलेल्या मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपल्या मंत्र्याच्या समर्थनार्थ स्वत:च कायदा धाब्यावर बसवण्याचा पवित्रा घेऊन धाडी न घालणार्‍या पोलिसांच्या निलंबनासा्ठी धरणे धरण्याचा पराक्रम केला. त्यातून मग विचित्र परिस्थिती निर्माण झाली. तेवाढेच नाही तर आजवर त्यांच्याच कौतुकात रमलेल्या माध्यमांकडून त्यांना अडचणीचे प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यातून कावलेले, वैतागलेले ‘आप’नेते पत्रकारांनाही दुरूत्तरे देऊ लागले. मात्र त्याचाही फ़ारसा परिणाम झाला नव्हता. पण जेव्हा त्यातून पत्रकारांच्या दुखण्यावर बोट ठेवले गेले, त्यामुळे पुढला कल्लोळ सुरू झाला आहे.

   सगळीकडून आरोप होत असताना आणि कायदेशीर गोत्यात सापडलेले असताना; सोमनाथ भारती कधी राजिनामा देणार वा त्यांची हाकालपट्टी होणार हा पत्रकारांसाठी चिकित्सेचा विषय झाला आहे. नेमका तोच प्रश्न सातत्याने विचारला गेल्याने भारती खवळले. एका क्षणी त्यांचा तोल गेला आणि ‘मोदींनी असे प्रश्न विचारयाला किती पैसे दिले’ असा प्रतिसवाल त्यांनी महिला पत्रकाराला केला. मग तमाम माध्यमे त्यांच्यावर तुटून पडली आहेत. इथे भारती वा आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकारीतेच्या इमानदारीवर सवाल केल्याने माध्यमांना संताप आलेला असला; तरी त्यांनी औचित्याचा सवाल करणे कितीसे योग्य आहे? कारण भारती यांनी विचारलेला प्रश्न जरी बिनबुडाचा असला, तरी त्यातला आशय खोटा आहे काय? नेमका असाच आरोप काही दिवसांपुर्वी थेट प्रक्षेपण होणार्‍या ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीच्या चर्चेत भाजपाच्या प्रवक्त्या मिनाक्षी लेखी यांनीही त्या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावरही केला होता. मग त्यावर काहूर कशाला माजवले गेले नव्हते. तिथे त्या चर्चेत गोस्वामी यांनी लेखींना फ़ैलावर घेण्य़ाचा आटापिटा केला. पण त्यांचा आक्षेप व्यक्तीगत होता. आपण शुचिर्भूत आहोत, असे भासवताना अन्य माध्यमांचे आपल्याला ठाऊक नाही; असाच गोस्वामी यांचा पवित्रा होता. पण लेखी यांनी आपले शब्द मागे घेतले नव्हते आणि त्यानंतर गोस्वामींनी त्या लेखींना परत कधी आपल्या वाहिनीवर आमंत्रित केलेले नाही. पण मग आज भारतींव,र तुटून पडलेले तमाम पत्रकार लेखींच्या विरोधात गप्प कशाला बसले होते? लेखी आणि भारती यांच्यात भेदभाव कशाला? आणि जी बाब उघड गुपित आहे, त्यावर इतके काहूर कशाला? पत्रकारांचे हितसंबंध असतात, त्याप्रमाणेच त्यांची पत्रकारीता चालते, ही वस्तुस्थिती नाही काय?

आपण सत्य व घडते तेच दाखवतो, असे भासवण्यात आता अर्थ नाही. पत्रकारीता हा सुद्धा धंदा झालेला आहे आणि सुपारीबाजी त्यातही सरावली आहे यात शंका नाही. नसेल तर मग प्रत्येक पक्ष, मोठ्या संस्था वा कंपन्यांकडे मीडिया मॅनेजर कशासाठी असतो? त्याबद्दल एकाही पत्रकार संघटनेने तक्रार केल्याचे ऐकीवात नाही. अशा पदावर मोठे मान्यवर पत्रकारच काम करतात, त्याचा अर्थच माध्यमे व पत्रकार ‘मॅनेज’ केले जातात ना? नसेल तर मोठ्या लठ्ठ पगाराचे असे मीडिया मॅनेजर कशाला नेमले जातील? शेकड्यांनी लहानमोठ्या ‘पीआर’ कंपन्या भरभराटीला आलेल्या आहेत. त्या पत्रकारीतेला कुठल्या पुण्य संपादनात मदत करीत असतात? एखाद्या नेता वा व्यक्तीची उजळ प्रतिमा उभी करण्याला हातभार लावण्यासाठी वा कुणाची प्रतिमा डागाळण्यासाठी माध्यमे राबत नाहीत; असा दावा कोणी करू शकतो काय? आपापल्या हेतूने वा राजकीय पुढाकाराने मागल्या दीड महिन्यात आम आदमी पक्षाचे इतके राजकीय प्रस्थ माजवणे निव्वळ पत्रकारीतेचे इमानदार कर्तव्य होते, असा दावा कोणी करू शकणार आहे काय? केजरीवालांच्या इमानदारी व साधेपणाचे ढोल पिटणार्‍या किंवा त्यांची इतर नेते नक्कल करू लागल्याच्या अफ़वा पिकवणार्‍या पत्रकारांना; गोव्याचे मनोहर पर्रीकर वा त्रिपुराचे माणिक सरकर दिर्घकाळ साधेपणाने सत्तापद उपभोगत आहेत, याचा थांगपत्ताच नव्हता काय? मग हे ठाऊक असूनही केजरीवालांना राजा हरीश्चंद्र म्हणून पेश करणार्‍या माध्यमांनी सत्यवचनाचा दावा करण्यात अर्थ उरतो काय? खुद्द केजरीवाल तीनचार वर्षे आपल्या आंदोलनात मीडिया मॅनेजमेन्टवर लाखो रुपये खर्च करतात हे खुले गुपित आहे. मग हा सगळा तमाशा कशाला? भारती यांना त्यांच्याच पक्षाने पैसे देऊन मिळवलेली अफ़ाट प्रसिद्धी माहित असणार आणि आपल्यापेक्षा मोदी अधिक पैसे देतात काय, अशी शंका आली असेल, तर त्यांनी त्याची जाहिर वाच्यता केल्याने काय बिघडते?


No comments:

Post a Comment