Friday, January 24, 2014

मतचाचण्यांचा खेळ

   या आठवड्यात दोनतीन वाहिन्यांनी आगामी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मतचाचण्या घेतल्या. त्या प्रत्येकाचे निकालावषयीचे अंदाज मात्र भिन्न भिन्न आहेत. त्यात काहीच गैर नाही. कारण प्रत्येक चाचणीचे निकष व पद्धती वेगळी असते. त्याखेरीज जी माहिती हाती येते, त्यावरून जागांचा अंदाज बांधणे राजकीय प्रगल्भतेवर अवलंबून असते. हाती आलेली माहिती स्पष्ट नसते. मतदार एका पक्षाचा कट्टर विरोधक असतो, तर दुसर्‍या कुठल्या पक्षाचे नाईलाज म्हणून समर्थन करीत असतो. अशावेळी त्याला नवा उत्तम पर्याय आवडला, तर असा मतदार तिकडे वळू शकत असतो. त्यामुळेच चाचणी घेतली जाते तेव्हा समोर जे पर्याय व परिस्थिती असते; त्यानुसार त्याने मतप्रदर्शन केलेले असते. त्यामुळेच अशा मतदाराचे मत कुठल्या पक्षाकडे जाईल त्याचा अंदाज बांधणे अवघड व जिकीरीचे काम आहे. सहाजिकच हाती आलेली माहिती व तिच्यानुसार सांगण्यात आलेले जागांचे अंदाज, वाहिनीनुसार बदलू शकतात. पण सर्वसाधारणपणे मतांची जी टक्केवारी दखवली जात असते, तिला महत्व असते. कारण दाखवल्या जाणार्‍या चाचण्यात अशी टक्केवारी अत्यंत मोलाची असते. त्यातून जनमानसाचा कल दिसत असतो. त्याला कौल म्हणता येत नाही. विशेषत: ज्यावेळी निवडणूका दूर असतात, तेव्हा मतांचा कौल नेमका मिळूच शकत नाही. कारण अशा अवेळी मतदाराने आपला कौल नक्की केलेला नसतो. त्यामुळेच प्रत्येक चाचणी व तिचा अभ्यास करणार्‍या व्यक्तीनुसार त्याचे अर्थ बदलत जातात. म्हणूनच गुरूवारी दाखवण्यात आलेल्या मतचाचण्यांचे आकडे एकमेकांशी जुळणारे नव्हते. मात्र सर्वच चाचण्यांकडे पाहिल्यास उत्तर भारतात मोदी व भाजपा आघाडीवर असल्याचे निष्पन्न होते.

   भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी सहा महिन्यापासून आपली मोहिम सुरू केलेली आहे. तेव्हापासून त्यांनी उघडपणे मैदानात उडी घेतलेली असली तरी त्याच्याही खुप आधीपासून मोदी त्या कामाला लागलेले होते. अतिशय सावधपणे त्यांनी आपली मोहिम योजून एक एक पावले टाकलेली आहेत. त्यामध्ये काय अड्चणी येऊ शकतील व कुठल्या बाजू जमेच्या आहे्त; त्याचाही त्यांनी आडाखा खुप आधीपासून बांधलेला आहे. त्यामुळेच अशा मतचाचण्यात मोदी यांचा जो प्रभाव आज दिसतो, तितका प्रभाव सहा आठ महिन्यांपुर्वी दिसत नव्हता. उलट मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार केल्यास भाजपाचे कसे नुकसान होईल, त्याची हमी प्रत्येक राजकीय अभ्यासक देत होता. मोदींना भाजपाने पंतप्रधान पदाचे उमेदवार केल्यास त्यांच्याकडे मित्र पक्ष येऊ शकत नाहीत आणि अनेक समाजघटक दुरावतील; असे भय दाखवले जात होते. पण आज सहा महिन्यानंतर परिस्थिती उलटी असल्याचा निर्वाळा तेच अभ्यासक देऊ लागले आहेत. कारण ताज्या चाचण्यानुसार मोदी हाच भाजपाला अपुर्व यश मिळवून देणारा नेता असल्याचे सांगितले जाते आहे. वाजपेयी हा भाजपाचा सर्वमान्य नेता होता, तो पल्ला मोदी गाठू शकत नाहीत, अशी हमी देणारे आता मोदींमुळेच भाजपाच्या जागा व मते वाढत असल्याचे सांगत आहेत. याचेही कारण समजून घ्यावे लागेल. मोदींविषयी जो राजकीय आकस व पुर्वग्रह राजकीय अभ्यासकांच्या मनात आधीपासून आहे, त्यामुळे त्यांना समोरचे सत्य बघताना त्रास होतो. ज्याला गुजरातच्या दंगलीमुळे मुख्यमंत्री म्हणून नालायक ठरवण्य़ात बारा वर्षे खर्ची घातली, तोच देशातला सर्वात लोकप्रिय नेता मानायला अशा बुद्धीमंतांचे मन तयार होत नाही, त्यामुळे ही गफ़लत होते आहे.

   मोदींनी भाजपा सोडून गेलेल्या येदीयुरप्पांना पक्षात परत आणले. तर त्यांच्यावरचा भ्रष्टाचाराचा आरोप भाजपाला त्रासदायक ठरू शकतो; असेही म्हटले जाते. मग भ्रष्टाचारासाठी शिक्षा झालेली असताना व जामीनावर बाहेर आलेले असताना, लालूप्रसादांना अधिक मते का मिळू शकतात? अशी कोडी सोडवली तर खरे अंदाज शोधता येतील. बुद्धीमंत व पत्रकारांच्या भ्रष्टाचाराच्या कल्पना व सामान्य लोकांच्या कल्पना, यात जमीन अस्मानाचा फ़रक असतो. त्यामुळेच त्यांच्यातला जो निर्णायक घटक मतदार असतो, त्यानुसारच निवडणूकीचे निकाल लागत असतात. मोदी, येदीयुरप्पा वा लालू हे पत्रकारांमध्ये खुप बदनाम असतील. पण सामान्य लोकांच्या मनात त्यांच्याविषयी कुठले किल्मीष नसेल, तर मते त्यांनाच मिळणार. तेच वारंवार होत आले. आणि त्याचेच प्रतिबिंब मतचाचण्यातही पडते. मोदी यांची लोकप्रियता गेल्या दोनतीन वर्षात देशाच्या अन्य राज्यात दिसतही होती. पण अभ्यासकांना ती मानायची नव्हती. त्यामुळे त्यांना आता थक्क व्हायची पाळी आलेली आहे. वास्तवात त्यांना अजून थक्क व्हावे लागणार आहे. कारण मतदानाला अजून शंभर दिवस शिल्लक आहेत. त्या काळात येणारी लाट अधिक प्रभावी होण्याची चिन्हे दिसत आहेत. गुरूवारच्या चाचण्या बघता गुजरातपासून ओडिशापर्यंत मोदींचा प्रभाव असाच वाढत राहिला; तर महाराष्ट्र व दक्षिण भारतातून अवघ्या पन्नास साठ जागा मिळाल्या तरी मोदी स्वबळावर बहूमताचा पल्ला गाठू शकतील अशीच चिन्हे दिसू लागली आहेत. त्यात विध्याचलाच्या वरचा भारत मोलाची भूमिका बजावण्याची १९७७ सारखी स्थिती उलगडताना दिसत आहे. चाचण्या अभ्यासल्या तर त्याचा इतकाच निष्कर्ष निघू शकतो. त्यात कॉग्रेस अस्ताला जात असताना तिसर्‍या व सेक्युलर पक्षांची जागा नवा आम आदमी पक्ष व्यापू लागल्याची चाहुलही लागते आहे. हा माझा निष्कर्ष अनेकांना आज आवडणारा नाही. पण जसजसे दिवस जातील तसतसे चित्र अधिक स्पष्ट होत जाणार आहे. तितकी कळ अशा नाराज मित्रांनी काढावी. माझे लेख व निष्कर्ष इथेच कायम असणार आहेत. त्याची सत्यासत्यता शंभर सव्वाशे दिवसांनी तपासता येईलच.

1 comment: