Tuesday, February 11, 2014

तिसर्‍या शक्तीचे भवितव्य



   गेल्या आठवड्यात काही पक्षांनी एकत्र बैठक घेऊन विद्यमान संसदीय अधिवेशनात एक गट म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. काहीजणांनी त्यालाच तिसरी आघाडी असे नाव दिलेले आहे. त्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी पंतप्रधान देवेगौडा भयंकर संतापले. कारण पत्रकार, माध्यमांनी आगामी लोकसभा निवडणूक हा मोदी विरुद्ध राहुल असा आखाडा बनवल्याचा त्यांना संताप आलेला आहे. राहुल-मोदीच्याही पलिकडे आणखी राजकारण आहे; असे त्यांचे मत होते. पण माध्यमांनी ते कुठे नाकारले आहे? माध्यमांनी तिसरा खेळाडू त्या आखाड्यात कधीच उतरवला आहे. पण त्याचा चेहरा देवेगौडा यांना आवडणारा नसल्याने त्यांचा संताप अनावर झालेला असावा. माध्यमांनी देशाच्या अनेक राज्यात आपापले अस्तीत्व टिकवायला धडपडणार्‍या आणि त्यातून दिल्लीच्या सत्तेला वेसण घालू बघणार्‍या सेक्युलर पक्षांना विसरून; नव्याने उदयास आलेल्या आम आदमी पक्षालाच तिसरा खेळाडू बनवल्याने देवेगौडा प्रक्षुब्ध झालेले असावेत. मात्र आपला राग व्यक्त करताना त्यांनी त्या आम आदमी पक्षाचा किंवा केजरीवाल यांचा उल्लेखही टाळला. असो, त्यांचा घुस्सा बाजूला ठेवून आजघडीला त्या तिसर्‍या आघाडी वा तिसर्‍या शक्तीची अवस्था काय आहे? त्यात सहभागी झालले नेते (कारण सहभागी नेतेच होतात आणि त्यांचे पक्ष त्याच नेत्यापुरते असतात) एकत्र आले म्हणजे देशात तिसरी शक्ती उदयास येते काय? या नेत्यांमध्ये कॉग्रेस वा भाजपाला आव्हान देण्याची कुवत आहे काय? किंवा त्यांचा दोन्ही प्रमुख पक्षांना असलेला विरोध खरोखरच समानांतर आहे काय? की त्यांचा ‘तिसरेपणा’ केवळ निवडणूकपुर्व असतो आणि निकाल लागले मग त्यातले तिसरेपण अंतर्धान पावते? इतिहास काय सांगतो?

   वास्तविक यातले बहुतेक पक्ष भाजपाप्रमाणेच आपापल्या कार्यक्षेत्रात व प्रभावक्षेत्रात कॉग्रेस विरोधक म्हणून उदयास आलेले आहेत. पण त्यांना त्या भूमिकेवर कायम टिकून रहाता आलेले नाही. परिणामी त्यांना आपला प्रभावही कायम टिकवता आलेला नाही. जिथे जिथे म्हणून अशा पक्षांनी आपला कॉग्रेस विरोध क्षीण होऊ दिला; तिथे तिथे त्यांनी आपला पाया गमावला आणि त्यांना पांगळे व्हावे लागलेले आहे. दोनतीन दशकांपुर्वी त्यांच्या इतकाच दुबळा असलेला भाजपा, आज थेट कॉग्रेसला आव्हान देऊन पर्यायी पक्ष होण्यापर्यंत मजल मारू शकला. त्याचे श्रेय याच पक्षांच्या धरसोडवृत्तीला व भाजपाच्या कॉग्रेस विरोधावर ठाम रहाण्याला आहे. मागल्या तीनचार दशकात भारतातला मतदार नागरिक कॉग्रेसला पर्याय शोधत असताना, त्याने ज्या ज्या राजकीय पक्षांना संधी दिली त्यांनी सत्तेसाठी किंवा पोरकट कारणास्तव कधीतरी कॉग्रेसची सोबत केली. मग स्थानिक पातळीवर त्याचा दांभिकपणा उघडा पडला आणि त्याची जागा दुसरा पक्ष व्यापत गेलेला आहे. अन्यथा अशाच भागात भाजपाने आपले बस्तान बसवलेले आहे. त्याचाच एक परिणाम म्हणून मग सेक्युलर म्हणून निवडणूकीपुर्वी नाचणारे पक्ष, आपली विश्वासार्हता गमावून बसले आहेत. सहाजिकच अशा पक्षांच्या तिसर्‍या आघाडीची विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे. मग त्यांनी निवडणूकीआधी आघाडी करावी किंवा कसल्याही गमजा कराव्यात. लालू, पासवान, डावे पक्ष त्याचेच बळी आहेत. म्हणूनच अशा पक्षांचा इतिहास हास्यास्पद आहे. तितकीच त्यांची तिसरी आघाडी अविश्वसनीय आहे. मागल्या दहा वर्षात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या सेक्युलर राजकारणात कॉग्रेसला संजीवनी मिळवून देताना, या पक्षांनी स्वत:चा बळी दिलेला आहे.

   दोनच वर्षापुर्वी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत ममतांनी कॉगेसला आव्हान देण्यासाठी मुलायमशी हातमिळवणी करून डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव पुढे केले होते. पण सीबीआयच्या चौकशीचा दणका बसताच मुलायम कॉग्रेस उमेदवाराच्या पाठींब्याला येऊन उभे राहिले. एफ़डीआय धोरणाला संसदेत कडाडून विरोध करणारे मुलायम-मायावती प्रत्यक्ष मतदानाची वेळ आली; तेव्हा निमूट कॉग्रेसच्या गोटात जाऊन उभे राहिले. याला ‘तिसरी आघाडी’ म्हणता येईल काय? असल्या शब्दांनी राजकीय पंडीत व बुद्धीमंतांना उल्लू बनवता येते. पण सामान्य माणसाला डावे-उजवे असला भेदभाव करता येत नसल्याने असली लबाडी पचत नाही. सहाजिकच त्याच्या लेखी तिसरी आघाडी म्हणजे निवडणूका संपल्यावर कॉगेसला जीवदान देणारे छुपे कॉग्रेसजन असतात. त्यापासून कटाक्षाने अलिप्त राहिले त्यांना टिकून रहाता आले. म्हणून लालू, पासवान, देवेगौडा किंवा डावे भूईसपाट होताना, ममता, जयललिता आपले प्राबल्य टिकवून राहू शकले आहेत. यावेळची निवडणूक त्या अर्थाने निर्णायक व्हायची आहे. त्यात जे खरेच भाजपा कॉग्रेसचे सारखेच विरोधक असतील आणि दोन्हीपैकी कोणाबरोबर निकाल लागल्यानंतर जाणार नाहीत, त्यांचाच टिकाव लागणार आहे. ज्यांचा इतिहास त्याबाबतीत शंकास्पद आहे, त्यांना आजवरच्या सेक्युलर पाखंडाची किंमत मोजावी लागणार आहे. किंबहूना मोदींच्या रुपाने तेच खरेखुरे आव्हान या डुप्लीकेट कॉग्रेसी पक्षांसमोर उभे ठाकलेले आहे. मोदींचा प्रचार व त्यातला रोख पाहिल्यास ते नुसत्या कॉग्रेसला नव्हेतर भविष्यात कॉग्रेस सोबत जातील; त्यांनाही पराभूत करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यातच बहुतेक तिसर्‍या आघाडीतील पक्षांचा समावेश होत असेल, तर मग या नेत्यांनी बांधलेल्या तिसर्‍या आघाडीच्या मोटेचे भवितव्य काय असेल?

No comments:

Post a Comment