Friday, April 4, 2014

सेक्युलर पाखंडाचा थरकाप



   सोनिया गांधी यांनी रायबरेली येथून आपला उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी होमहवन केले आणि माघारी दिल्लीला येताच जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांची भेट घेतली. ऐन निवडणूकीच्या वेळी अशा भेटी कशासाठी असतात; ते वेगळे सांगायला नको. पण त्या सोनिया-बुखारी भेटीनंतर जी बातमी आली, ती अतिशय गंभीर आहे. निदान ज्यांना देशातल्या सेक्युलर विचारसरणीचे कौतुक आहे, त्यांच्यासाठी ती बातमी गंभीर आहे. कारण देशातल्या एका कुविख्यात मौलवींना भेटून सोनियांनी काय मसलत केली? तर सेक्युलर मतांची एकजुट झाली पाहिजे. ही एकजुट धर्ममार्तंडांना हाताशी धरून होते काय? धर्मनिरपेक्ष राजकारण आता देशातले धर्ममार्तंड चालविणार; असाच त्याचा अर्थ होत नाही काय? पण तमाम सेक्युलर बुद्धीमंत त्याविषयी मिठाची गुळणी घेऊन गप्प बसणार आणि बसलेले आहेत. कारण धर्मांधांचे चोचले म्हणजेच सेक्युलर राजकारण, हा मुखवटा आता फ़ाटत चालला आहे. किंबहूना त्यामुळेच सोनियांना ही धावपळ करण्याची वेळ आलेली आहे. मागल्या दहाबारा वर्षात सेक्युलर विचारसरणीचे थोतांड राजकारणात माजवण्यात आले आणि त्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री व दंगली यांचे भांडवल करण्यात आले. ते सोंग आता नागडे व्हायची वेळ आलेली आहे. ज्याचा बागुलबुवा करून मागल्या दोन लोकसभा निवडणूका लढवण्यात आल्या, त्याला तडा गेला आहे. पण तो तडा मोदी आणि काही मोजक्या मुस्लिमांच्याच पुढाकारामुळे गेला आहे, ही बाब लक्षणिय आहे. ज्याला लक्ष्य करून भाजपाला बदनाम करण्यात आले आणि मुस्लिमांची मते लुटण्यात आली; त्याच मुस्लिमाला आता विचार करायला भाग पडले आहे. तो मुस्लिम विचार करू लागला, म्हणूनच सोनियांसह तमाम सेक्युलरांची झोप उडाली आहे.

   गुजरातमध्ये दंगल झाली आणि तिथे मुस्लिमांची कत्तल झाली, हे तावातावाने सांगितले जाते. पण तशाच दंगली आजपर्यंत देशातल्या विविध राज्यांमध्ये कॉग्रेस वा सेक्युलर पक्षांची सत्ता असताना झाल्या, त्याबद्दल अवाक्षर बोलले जात नव्हते. मात्र गुजरातमध्ये त्या दंगलीनंतर बारा वर्षात पुन्हा कधी दंगल झाली नाही आणि बाकी सेक्युलर सत्ताधीशांच्या राज्यात पुन्हा पुन्हा दंगली होतच आहेत. हे वास्तव मुस्लिम व अन्य जनतेच्या नजरेस आणून द्यायचा पद्धतशीर प्रयास मोदी व इतर काही मुस्लिमांनी केला. तसतसे सेक्युलर सोंग उघडे पडत गेले. गेल्या वर्षभरात पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मोदी यांनी त्यात पुढाकार घेतला आणि सेक्युलरांचे धाबे दणाणले आहे. कारण जे गुजरातमध्ये झाले आणि तिथल्या मुस्लिमांनी मोदींच्या कारभारातून स्वत:चे कल्याण साधले, त्याच्या कथा बाहेर येऊ लागल्या. लाखो बिहारी व उत्तरभारतीय मुस्लिम गुजरातमध्ये मजूरी करायला जातात, त्यांच्याकडूनच ह्या ‘गुजरातकथा’ आपापल्या गावी व राज्यात पोहोचल्या. त्यातून सेक्युलर थोतांडाचा बुरखा फ़ाटत गेला. त्याचे परिणाम आता संपुर्ण उत्तर भारतात दिसू लागलेत, म्हणून सोनियांना जाग आलेली आहे. वास्तविक त्यांनी वा अन्य सेक्युलर बुवाभगतांनी गुजरात दंगलीचे इतके पाखंड माजवले नसते, तर मुस्लिम समाजाला व मतदाराला अजूनही अंधारात ठेवणे व भयभीत करून त्यांची मते मिळवणे शक्य झाले असते. पण मोदींच्या बागुलबुवाचा अतिरेक झाला व त्याचाच विपर्यस्त परिणाम आता दिसू लागला आहे. अनेक मुस्लिम नेते, पत्रकार व कार्यकर्तेच मोदींकडे येऊ लागले. त्यातून मुस्लिम व्होटबॅन्क नावाचा फ़ुगा फ़ुटायची वेळ आलेली आहे. त्यासाठीच मग सोनियांना सेक्युलॅरिझम वाचवण्यासाठी इमामाला साकडे घालायची नामुष्की आलेली आहे.

   मोदींनी मुस्लिम टोपी घातली नाही याचे काहूर माजवणार्‍यांना आता पळता भूई थोडी झालेली आहे. कारण असल्या अपप्रचारानेच मोदींच्या समर्थकांची एक हिंदू व्होटबॅन्क उभी राहिली. ती व्होटबॅन्क मुस्लिम मतांच्या गठ्ठ्य़ाशी तुल्यबळ झाल्याने, आता भाजपाचे वा मोदींचे पारडे जड भासू लागले आहे. मोदींना अशी हिंदू व्होटबॅन्क उभारण्याचे कष्ट घ्यावे लागले नाहीत. ज्यांनी मोदींची बदनामी करताना, गुजरात दंगलीचा बागुलबुवा करताना देशभर आक्रोश केला; त्यांनीच असा विस्कळीत हिंदूसमाज मोदींच्या बाजूला आणून उभा केला. मुस्लिम आक्रमकतेने अस्वस्थ असलेल्या अशा समाज घटकाला संघटित करायचे संघाचे प्रयास आजवर तोकडे पडले होते, ते काम मोदी विरोधकांनी अगदी सोपे करून टाकले. आज त्याच मोदीवादी हिंदू व्होटबॅन्केचे अस्तित्व जाणवू लागल्यानेच मुस्लिमांत जागरूकता येऊ लागली आहे आणि मुस्लिम तरूण, मौलवी इमामांच्या बेड्यातून बाहेर पडून विकासाचा विचार करू लागला आहे. भाजपाने उभी केलेली स्वत:ची एक व्होटबॅन्क अधिक सेक्युलर मुर्खांनी उभी करून दिलेली हिंदू व्होटबॅन्क; यांच्या बेरजेतून मोदींचे पारडे जड झाले आहे. त्याचे आकडे चहूकडून समोर येऊ लागल्याने सोनियांची झोप उडाली. त्यातून मग त्यांना इमाम मौलवींना शरण जाण्याची वेळ आलेली आहे. मात्र त्यामुळे आता राजकारणाची व इतिहासाची चक्रे उलट फ़िरवली जाण्याची अजिबात शक्यता नाही. कारण मुस्लिमधार्जिणे लांगुलचालन म्हणजे सेक्युलॅरिझम नव्हे, हे सर्वांनाच पटवण्य़ात मोदी यशस्वी होत चालले आहेत आणि धर्मापेक्षा विकासावरच जनतेचे व देशाचे भवितव्य विसंबून असल्याचे जनमानसावर बिंबवण्यात मोदी कमालीचे यशस्वी झाले आहेत. खर्‍या धर्मनिरपेक्षतेला सशक्त होताना बघून सेक्युलर पाखंड भयभीत झाल्यास नवल ते काय?

1 comment:

  1. उशिरा का होईना जनतेलाही कळू लागले आहे ----- स्युडो सेक्युलर म्हणजे काय ?

    ReplyDelete