Wednesday, April 16, 2014

टिव्हीवाल्यांची निवडणूक



   सोळाव्या लोकसभा निवडणूकीवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव पडेल, असे खुप सांगितले गेले. पण प्रत्यक्षात तो किती प्रभाव पडला, ते निकालाच्याच दिवशी कळेल. तोपर्यंत फ़ेसबुक, ट्विटर अशा माध्यमांचा धुमाकुळ चालूच रहाणार आहे. पण ज्या वाहिन्यांवरून सतत असली माहिती सांगितली जात असते, त्याच इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा यावेळच्या मतदानावर किती प्रभाव पडतो आहे, त्याची सहसा चर्चा होत नाही. खेड्यापाड्यापर्यंत आता टेलीव्हीजन जाऊन पोहोचला आहे. त्यामुळेच देशाच्या कुठल्याही कोपर्‍यात कोणी मोठा नेता भाषण करीत असेल, बोलत असेल तर त्याचे बोल थेट दुर्गम भागातही याच टिव्हीच्या माध्यमातून जाऊन पोहोचत असतात. म्हणूनच टिव्ही वाहिन्यांनी जणू निवडणूकीचा उत्सव करून टाकला आहे. त्यात विविध पक्षांच्या नेत्यांना समोरा्समोर आणून झुंजवणे, सामान्य लोकांचे मत प्रसारित करणे; यापासून मतचाचण्य़ांचाही खेळ जोरात चालू आहे. त्यामुळेच एखाद्या पक्षाप्रमाणेच आता माध्यमांवरही पक्षपाताचे आरोप होऊ लागले आहेत. मध्यंतरी आम आदमी पक्षाचे संयोजक नेते अरविंद केजरीवाल, यांनी असा पक्षपात करणार्‍या पत्रकारांना सत्ता मिळाल्यास धडा शिकवण्याचे मनोगत व्यक्त केले होते. खरे तर दिल्लीसारख्या एका नगण्य राज्यात दुसर्‍या क्रमांकाची मते व जागा मिळवणार्‍या पक्ष व नेत्याला याच वाहिन्यांनी मागल्या चार महिन्यात राष्ट्रव्यापी पक्ष असल्याप्रमाणे अतोनात प्रसिद्धी दिली. जवळपास अखंड सर्वच वाहिन्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाच्या टोप्या घातलेल्यांना दाखवले जात होते. तरीही एखाद्या दिवशी प्रसिद्धी कमी झाली, तर केजरीवाल त्याच माध्यमांवर भाजपा कॉग्रेसला विकले गेल्याचा आरोप करीत असतात. पण वस्तुस्थिती काय आहे?

   सीएमएस मीडिया लॅब नावाची एक संस्था वाहिन्यांवर प्रसारीत होणारे कार्यक्रम वा बातम्या याविषयी अभ्यास करीत असते. त्यांनीच केलेल्या पहाणीनुसार सर्वाधिक प्रसिद्धी केजरीवाल यांनाच मिळाली आहे. त्यांच्या नंतर क्रमांक लागतो भाजपाचे नरेंद्र मोदी यांचा आणि त्यानंतर राहुल, लालू व राज ठाकरे अशी क्रमवारी आहे. पाच प्रमुख राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या महत्वाच्या कालखंडातील प्रसारणाचा अभ्यास केल्यावर हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. एबीपी न्युज, आजतक. झीन्यूज, सीएनएन आयबीएन आणि एनडीटीव्ही अशा पाच वाहिन्यांच्या संध्याकाळी ८ ते १० या वेळात दाखवल्या गेलेल्या बातम्या व कार्यक्रमाची दखल यात घेतलेली आहे. १ ते १५ मार्च दरम्यान ही पहाणी करण्यात आली. त्यात सर्वाधिक वेळ केजरीवाल यांच्या वाट्याला ४२९ मिनीटे (२८.१९ टक्के) आली; तर पंतप्रधान पदाचे उमेदवार असूनही मोदींच्या वाट्याला त्यापेक्षा कमी ३५६ मिनीटे (२३.९८ टक्के) वेळ आली. कॉग्रेससारख्या आज सत्तेवर असलेल्या पक्षाच्या उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाट्याला तुलनेने खुपच कमी म्हणजे केवळ ७२ मिनीटे (४.७६ टक्के) वेळ आली. त्यानंतर क्रमांक आहे बिहारच्या लालूंचा. त्यांना ४६ मिनीटे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ३३ मिनीटे वेळ मिळाला. वाहिन्या चेहरे व त्यांचे बोल दाखवत असतात. अशा प्रसारणातून जनमानसावर जो प्रभाव पडतो, त्याचे मतात किती परीवर्तन होते; त्याचा हिशोब एक महिन्याने मिळणार आहे. मग खरेच वाहिन्यांचा प्रभाव मतदारावर किती पडतो, त्याची प्रचिती येईल. याला महत्व यासाठी आहे, की आम आदमी पक्ष हा इतरांच्या तुलनेने नगण्य असताना त्याला मिळालेली प्रसिद्धी पक्षपाती म्हणावी अशी आहे.

   कुठल्याही कारणाने का असेना केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने जवळपास वाहिन्यांवरील सर्वाधिक जागा व्यापल्याचा पुरावा मिळतो. किंबहूना वाहिन्या व त्यावरील पत्रकारांचाच हा पक्ष असावा, इतकी त्याला प्रसिद्धी देण्यात आली असे म्हणायला हरकत नाही. डिसेंबरमध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर हाच पक्ष मोदींचा विजयरथ रोखणार; असे सांगून त्या पक्षाला व त्याच्या नेत्याला वाहिन्यांनी अफ़ाट प्रसिद्धी दिलेली आहे. नुसत्या प्रसिद्धीवर न थांबता वाहिन्यांवरच्या पत्रकारांनी झपाट्याने या दिल्लीपुरत्या प्रादेशिक पक्षाकडे देशाच्या कानाकोपर्‍यातले लोक आकर्षित होतील असाही प्रचार केला. त्यामुळेच अवघ्या दोनतीन महिन्यात आम आदमी पक्ष चारशेहून अधिक उमेदवार उभे करू शकला. कुठल्याही कार्यक्रमात  प्रतिनीधीत्वात व आकाराने अधिक असलेल्या डझनावारी पक्षांना प्रसिद्धी मिळत नाही, तितकी देणार्‍या या नवख्या पक्षाला मिळाली. म्हणूनच त्याला टिव्ही पार्टी संबोधणे योग्यच ठरेल. पण म्हणून त्याला लोक मते देऊन यशस्वी करतात काय, त्याचे उत्तर १६ मे रोजी मिळणार आहे. म्हणूनच या निवडणूकीच्या निकालात केवळ आम आदमी पक्षाचे भवितव्य ठरायचे नसून वाहिन्यावरील बातम्या, चर्चा आणि होणार्‍या चर्चा जनमत किती प्रभावित करतात, त्याचाही निवाडा होणार आहे. त्यामध्ये आम आदमी पक्षाचा धुव्वा उडाला, तर त्या पक्षापेक्षाही तो इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेचा मोठा पराभव असेल. कारण या नवख्या पक्षाला अवास्तव प्रसिद्धी दिली जाते; ही इतर पक्षांची नुसती तक्रार होती. उपरोक्त अभ्यासाने त्याचे आकडे समोर आणले आहेत. त्यावर आम आदमी पक्ष वाहिन्यांचाच पक्ष असल्याचे सिद्ध होते. सवाल आहे, तो वाहिन्यांनी केजरीवाल यांच्यावर व्यक्त केलेला विश्वास कितपत खरा ठरतो, एवढाच.

No comments:

Post a Comment