Tuesday, October 21, 2014

न द्यायच्या पाठींब्याची रहस्यकथा



राजकारण हा मुरब्बी माणसांचा खेळ आहे असे म्हटले जाते. हे मुरब्बीपण म्हणजे काय असते? त्याचे उत्तर ज्यांना हवे असेल, त्यांनी शरद पवार यांचा बारकाईने अभ्यास करावा. आताच जे विधानसभेचे निकाल लागले आणि पाच महिन्यांपुर्वी लोकसभा निवडणूकीचे निकाल लागले, त्यानंतर पवारांची राजकीय पत किती शिल्लक उरली? त्यांच्या हाती कुठलाही डाव खेळायला वा जिंकायला, कुठलेच पत्ते शिल्लक उरले नाहीत, असे तमाम अभ्यासकांना वाटत होते. पण निकाल पुर्ण होण्याआधीच पवारांनी असा एक पत्ता फ़ेकला, की महाराष्ट्राचे संपुर्ण राजकारणच त्याभोवती घुटमळू लागले आहे. निकालानंतर युती पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले, तरी सत्तेसाठी एकत्र येतील, हेच सर्वांचे गृहीत होते आणि त्याला पर्यायही दिसत नव्हता. मात्र अंतिम निकाल समोर येण्यापुर्वीच पवारांनी असा एक पर्याय समोर आणून ठेवला, की बाकीच्या सर्वच पक्षांना त्यांनी बुचकळ्यात टाकले. सेक्युलर म्हणून कॉग्रेस वा राष्ट्रवादी भाजपाला पाठींबा देणार नाहीत आणि भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कॉग्रेस शिवसेनेचा केजरीवाल करू शकेल, असेच आडाखे बांधले जात होते. अन्यथा थोडी घासाघीस होऊन सेना-भाजपा एकत्र येतील, असेही गृहीत होते. पण जागा वाटपावरून या पंचवीस वर्षे जुन्या मित्रात आलेले वितुष्ट अधिक गुंतागुंतीचे होईल, ही कोणाचीच अपेक्षा नव्हती. कारण भाजपाचे बहूमत हुकते आणि आवश्यक संख्येसाठी अपक्ष आमदारही पुरेसे होत नाहीत हे स्पष्ट झाले होते. इतक्यात पवारांनी विनाविलंब आपल्या सहकार्‍यांशी सल्लामसलत करून थेट भाजपाला ‘बिनमांगा’ पाठींबा देऊन टाकला. तिथून राजकारणाला एकदम वेगळे वळण लागले. युती पुन्हा जुळण्याला खोडा घातला गेला आणि शिवसेनेची मातब्बरी संपल्याचाही देखावा उभा राहिला. सेनेची भाजपाला गरजच उरली नाही, असेही बहुतेकांनाच नव्हेतर भाजपा नेत्यांनाही वाटू लागले.

पण राजकीय गणित इतके सोपे नसते. पवारांच्या हाती कुठलाच पत्ता उरला नाही, अशी समजूत असलेल्यांचा पवारांनी पुरता भ्रमनिरास करून टाकला. याला खरा खेळाडू म्हणतात. जो हातात कुठलाही महत्वाचा पत्ता नसतांनाही डावाची सुत्रे आपल्या हाती घेतो. आपणच सेनेला मागे टाकून अधिक जागा जिंकतोय आणि बहूमताचे दारही ठोठावतोय, अशी चिन्हे तेव्हा भाजपाला दिसत होती. त्यामुळे भाजपा मस्तीत आलेला होता आणि शिवसेनाही निराशाग्रस्त होती. तेव्हाच परस्पर बाहेरून पाठींब्याची पवारांनी घोषणा करून टाकली. त्यात नवे काहीच नव्हते. मतमोजणीच्या आदल्या दिवशीच पवारांचे विश्वासू सहकारी प्रफ़ुल्ल पटेल यांनी ट्वीट करून, सरकार स्थापनेत राष्ट्रवादीची भूमिका असेल, अशी घोषणाच केली होती. तेव्हा कॉग्रेस वा राष्ट्रवादीला मिळून शंभर जागा मिळण्याची हमी कोणी देत नव्हता. मग सरकार स्थापनेत मोठी भूमिका म्हणजे काय? असा प्रश्न विचारत बहुतेक जाणत्यांनी पटेल यांची खिल्ली उडवली होती. पण दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पवारांनी अंतिम निकाल येण्यापुर्वीच जी चाल खेळली, त्याचा मनसुबा आदल्याच दिवशी फ़ायनल झाला होता. म्हणून तर पटेलांनी ट्वीट केले होते. त्याचा अर्थ भाजपाचे बहूमत हुकले, तर बाहेरून पाठींबा असाच होता. पण अशा बाहेरून पाठींब्याचा राष्ट्रवादीला कुठला लाभ होणार आहे? असे विचारले, मग राज्यात स्थीर सरकार हवे, हा खुलासा दिला जातो, जो पटणारा नाही. दुसरे कारण आपली पापे झाकण्यासाठी राष्ट्रवादी भाजपाला पाठींबा देते, असेही सांगितले जाऊ शकते. पण असे खुलासे वा स्पष्टीकरणे द्यायला पवार हे पत्रकार वा संपादक नाहीत. ते मुरब्बी धुर्त राजकारणी आहेत. ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना’ हे त्यांचे राजकारण राहिलेले आहे. त्यामुळेच हातात बॅट घेऊन पॅड बांधून पवार मैदानात उतरतात, तेव्हा ते फ़लंदाजी करणार नाहीत, असे आपण ठामपणे म्हणू शकतो.

ज्याक्षणी ही पाठींब्याची बातमी आली, त्याचक्षणी ती संशयास्पद होती. त्यात भाजपाचे स्थीर सरकार होण्याशी पवारांना कर्तव्य नव्हते. किंवा त्यामुळे आपल्या सहकारी मित्रांच्या पापावर पांघरूण घालण्याचा कुठलाही डाव नव्हता. त्यातला साधा हेतू भाजपा व सेनेतील दुरावा वाढवणे, इतकाच मर्यादित होता. झालेही नेमके तसेच. पवार यांच्या घोषणेनंतर तासाभराने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा विषयच येत नाही, कारण भाजपाशी आपला संपर्क राहिलेला नाही, अशी ग्वाही देऊन टाकली. आपल्या समोर कुठला प्रस्ताव नाही, असे उद्धव म्हणाले आणि तिकडे भाजपा नेत्यांना सेनेची गरज नसल्याची धुंदी चढली. त्यामुळेच भाजपाकडून आपल्याला स्वबळावर सत्ता बनवता येईल, असेही विधान बोलले गेले. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी कॉग्रेसला विरोधी नेता व्हायच्याही जागा मिळालेल्या नाहीत, असे म्हणत विरोधी पक्ष शिवसेना होईल, असे सूचित केलेच होते. सेनेशिवाय सरकार बनवता येते आणि शिवसेनेला भाजपाने कवडीची किंमत देण्याचे कारण नाही, अशी स्थिती पवाराच्या त्या पाठींब्याने निर्माण केली. थोडक्यात आधीपासून दोन मित्रात असलेले वितुष्ट अधिक वाढेल याची काळजी पवारांनी आपल्या चालीतून घेतली होती. आता गंमत बघा, तसे कुठलेही पाठींब्याचे पत्र पवारांनी भाजपाला दिले नाही आणि त्यासाठी इतके फ़ुसके कारण पुढे केले, की त्यासाठी उद्या त्यांना खरेच भाजपाच्या समर्थनासाठी उभेही रहाण्याची वेळ येणार नाही. म्हणजेच वटणार नाही असा चेक देऊन पवारांनी सगळी खेळी केली. पण त्यातून त्यांनी जवळ येऊ शकणार्‍या दोन मित्रात खोलवर दरी मात्र निर्माण करून ठेवली. त्यामुळे दोन्ही मित्रांकडून आणखी कटू शब्द बोलण्याची वेळ आणून, त्यांचे वैर निकाल अंतिम होण्यापुर्वीच अधिक वाढवून ठेवले. मात्र त्यापैकी कोणी पवारांना दोषी ठरवू शकत नाही, की मतलबी ठरवू शकत नाही.

याला म्हणतात उस्तादोंका उस्ताद. यातली खरी चाल आता भाजपाच्या डोक्यात येऊ लागली असावी. म्हणूनच नेता निवडीचा खेळ दिवाळी नंतर पुढे ढकलला गेला आहे. निकालाच्या दिवशी संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर प्रवक्ते जे. पी. नड्डा यांनी दुसर्‍याच दिवशी राजनाथ सिंग निरीक्षक म्हणून मुंबईला जाणार असल्याची घोषणा केली होती. सगळे नवनिर्वाचित आमदारही मुंबईत गोळा झाले असताना मंगळवारी अकस्मात दिवाळी नंतरच मुंबईला जाऊ, अशी घोषणा खुद्द राजनाथ सिंग यांनी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पाठींब्याची ऑफ़र दुर्लक्षून भाजपाचे नेते किरीट सोमय्या अपक्षांसह आपल्याकडे १३५ आमदार असल्याची भाषा बोलत आहेत. थोडक्यात सेनेची मनधरणी करायची भाजपाला गरज नाही, असे भासवले जात असतानाच राष्ट्रवादीच्या पाठींब्याविषयी भाजपा प्रवक्ते मौन धारण करत आहेत. कारण पवारांनी बिनशर्त पाठींबा देऊ केलेला असला, तरी त्याची किंमत पवारांपेक्षा भाजपाला मोजावी लागणार, हे त्यांच्या लक्षात येऊ लागलेले असावे. पण सेनेच्या दारातही आपण जाणार नाही, असे भासवणे भाग आहे. पण मदत सेनेचीच विश्वासार्ह असेल, याचीही खात्री आहे. आज पवारांवर विसंबून सेनेला झिडकारले आणि उद्या बाहेरचा पाठींबा बाहेरच्या बाहेर काढला गेला तर, ही टांगली तलवार आहे. थोडक्यात पवारांनी मोक्याच्या क्षणी ‘न द्यायचा पाठींबा’ देऊन सेना-भाजपासाठी सोपे असलेले काम अवघड करून ठेवले आहे. कारण त्यामुळे भाजपा-सेनेत दुरावा अधिक वाढला. पवारांचे काहीच गेलेले नाही. पण त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यामध्ये मात्र झुंज लावून दिली आहे. याला मुरब्बीपणा म्हणतात. जेव्हा पवार संपले असे म्हटले जात होते, तेव्हा एक पत्ता त्यांनी असा फ़ेकला, की बाकीच्या खेळाडूंना त्यावर कुठला पत्ता टाकावा, तेच सुचेनासे होऊन गेले आहे. सगळा डावच न द्यायच्या पाठींब्यात फ़सून बसला आहे.

4 comments:

  1. भाऊराव,

    भरपूर जागा जिंकल्या पण महाराष्ट्र भाजपचं कर्तृत्व फारसं नाही. सगळं मोदींमुळे झालंय. मोदी वगळता भाजप शून्य आहे. मग कोणाच्या जोरावर एव्हढ्या गमजा चालल्या आहेत?

    भाजपचे तुकडे तर पडणार नाहीत यातून?

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. आज भाजप पवारांसोबत गेली तर भविष्यात भाजपचे तुकडे पडतील.

    ReplyDelete