Tuesday, January 27, 2015

संरक्षणमंत्री पर्रीकर कशाविषयी बोलले?



गेला आठवडाभर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतात येणार म्हणून माध्यमांची जशी धावपळ चालू होती. तशीच दहाबारा वर्षापुर्वी पकिस्तानचे लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ़ आग्रा शिखर परिषदेसाठी येण्याच्या निमीत्ताने भारतीय पत्रकारांची लगबग चालू होती. त्याच काळात इंग्रजी पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मुशर्रफ़ यांची घेतलेली एक मुलाखत आठवते. त्यात राजदीपने त्यांन पाक हेरखाते आय एस आय विषयी अडचणीचे प्रश्न विचाराले. तेव्हा मिश्कील हास्य करून मुशर्रफ़ यांनी असे प्रश्न विचारायचे नसतात, असे राजदीपला सुनावले होते. तुम्ही आमच्या हेरखात्याबद्दल विचारणार असाल, तर तुम्हाला भारताच्या हेरगिरीविषयी सुद्द्धा उत्तरे द्यावी लागतील, अशा कानपिचक्या त्यांनी या उतावळ्या पत्रकाराला दिलेल्या होत्या. त्या चुकीच्याही नव्हत्या. कारण प्रत्येक देशाचे हेरखाते छुपेपणाने काम करत असते आणि ते काम कायदेशीर स्वरूपाचे नसते. म्हणूनच अशा बाबतीतले प्रश्न कधी कुठल्या राष्ट्रप्रमुखाला विचारले जात नसतात. तसेच मायदेशातील हेरखात्याचे काम चालते, त्याविषयी कुठल्याही देशातील सरकार जाहिररित्या वाच्यता करीत नसते. पण पोलिसी तपास व पाळत आणि गुप्तहेर खात्याचे काम; याविषयी चित्रपटाच्या कथेमधील मनोरंजक थरारक गोष्टींच्या पलिकडे अक्कल नसलेले अनेकजण आजकाल अशा विषयावत नसलेली अक्कल पाजळत असतात. त्यांना मुळातच गुप्तहेर खाते असतेच कशाला, याचा थांगपत्ता नसतो. तर त्याचे काम वा अपयश याविषयी कळायचे कसे? त्या कामात ‘असेट’ म्हणजे अत्यंत मोलाचे हस्तक शत्रू गोटात असतात, याबद्दल कितीसे या लोकांना ठाऊक असते? मग तशा शब्दाचा सुरक्षेच्या संदर्भात उल्लेख आला, तरी यांचा मेंदू चालावा कसा? सुरक्षेच्या क्षेत्रात हजार सैनिकांपेक्षा शत्रू गोटात असलेला एक हस्तक अधिक भेदक असतो. म्हणून त्याला ‘असेट’ म्हणतात.

साध्या इंग्रजीत असेट म्हणजे संपत्ती वा मालमत्ता. पण सुरक्षा व गुप्तचर कामात शत्रू गोटात वावरणार्‍या हस्तकांनाही ‘मालमत्ता’ म्हणजे असेट म्हटले जात असते. सहाजिकच सैनिकी व गुप्तचर कामात जेव्हा अशा शब्दाचा वापर होतो, तेव्हा त्याचा वेगळा अर्थ समजून घ्यावा लागतो. शिवाय कुठल्याही गुप्तचर खात्याच्या कामाला सरकार कायदेशीर मान्यता देऊ शकत नाही. याचे कारण असे असते, की जे काम कायद्याच्या कक्षेत होऊ शकणार नसते, पण करणेही भाग असते; अशी कामे उरकून घेण्यासाठी गुप्तचर खात्याची उभारणी केलेली असते. उदाहरणार्थ परदेशी राजदूत वा मुत्सद्दी तुमच्या देशात येऊन वास्तव्य करतात आणि नागरिकांची मिसळतात. त्यांच्यावर उघड पाळत ठेवता येत नाही. त्यांना राजकीय संरक्षण मिळालेले असते. अशावेळी त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम कायदेशीर मार्गाने होऊ शकत नाही. तेच काम गुप्तचर विभाग करत असतो. अगदी बेकायदेशीर वागून ती कामगिरी पार पाडत असतो. हे काम करणारे कायद्याच्या कचाट्यात सापडले, तरी सरकार त्यांच्या बचावाला उभे रहात नाही. कारण त्यांचे कृत्य सरकारी कर्तव्याचा भाग असला, तरी बेकायदा कृत्य असते. मग तो अधिकारी वा हस्तक पाक हेरखात्याचा असो किंवा भारतीय हेरखात्याचा असो. २६/११ च्या हल्ल्यातला एक आरोपी संशयित डेव्हीड हेडली हा अमेरिकेच्या ताब्यात आहे आणि कितीही जंग जंग पछाडले तरी त्याला भारताच्या हवाली कशाला केले जात नाही? लखवी वा सईद हफ़ीजला भारताच्या हवाली करायचा सल्ला अमेरिका पाकिस्तानला देते. तीच अमेरिका हेडलीला भारताच्या ताब्यात कशाला देत नाही? तर हेडली हा गुन्हेगार असला, घातपाती असला व त्याने तोयबांना मदत केलेली असली, तरी ती अमेरिकन हेरखात्याची मालमत्ता म्हणजे ‘असेट’ आहे. म्हणूनच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर असेट शब्द कशाला वापरतात, ते समजायला हवे.

राजदीपला मुशर्रफ़ यांनी कानपिचक्या दिल्या आणि नसते प्रश्न विचारू नकोस असे बजावले. तेव्हा त्यांनी भारतीय रॉ नामक हेरसंस्थेचा उल्लेख केला होता. आपल्या हेरांच्या कारवायांबद्दल बोलायचे टाळणारे मुशर्रफ़, रॉबद्दल मात्र बोलायला उत्सुक होते. त्याचा अर्थ काय होता? भारताचे हेर व हस्तक पाकिस्तानात काय उत्पात घडवतात, त्याची माहिती हवी तर देतो, असेच मुशर्रफ़ म्हणत होते. आणि त्यात नवे काहीच नाही. साडेचार दशकांपुर्वी भारताने बांगला देश युद्धात पाकिस्तानला पुरते नामोहरम करून टाकले, याची आपण मोठ्या अभिमानाने आठवण काढतो. पण त्या यशात जितका भारतीय सेनेच्या शौर्याचा हिस्सा होता, तितकाच भारतीय हेरखात्याने पाकिस्तानात पेरलेल्या हस्तकांचाही हिस्सा होता. थोडक्यात पाकिस्तानातल्या भारतीय ‘असेट’मुळे ते युद्ध सोपे झाले होते. आणि आता उघड झालेल्या माहितीनुसार थेट पाकिस्तानी लष्करशहा याह्याखान यांच्या अवतीभवती हे भारतीय हस्तक तेव्हा वावरत होते. सहाजिकच सेनाधिकार्‍यांच्या बैठकीत हल्ल्याचे निर्णय व्हायचे, त्याच्या पुर्वसूचना भारतीय सेनेला आधीपासून मिळालेल्या असायच्या. म्हणूनच पाक हल्ले निकामी करताना भारतीय फ़ौजेला अधिक भेदक आक्रमक पवित्रा घेता आलेला होता. असे जे हस्तक शत्रूच्या ‘आतल्या गोटात’ पोहोचलेले असतात, त्यांना डीप असेट असेही संबोधले जाते. त्यामुळे मुंबईच्या एका समारंभात मनोहर पर्रीकर बोलले, त्यातले असेट उभारणे वा जोपासणे म्हणजे काय, ते आधी समजून घेतले पाहिजे. मगच त्याविषयी प्रश्न विचारता येतील. हे असेट म्हणजे नुसती लष्करी साधनसामग्री हत्यारे वा उपकरणेच नसतात. ज्यामुळे भारतीय सेना व युद्ध सज्जतेची भेदकता अधिक धारदार होते, अशा कुठल्याही गोष्टीला सुरक्षेच्या विषयात असेट मानले जाते. अशा कुठल्या असेट विषयी पर्रीकर तिथे बोलले?

असेट म्हणजे काय? हा प्रश्न म्हणूनच मोलाचा आहे. कुठल्या पंतप्रधानाने त्या असेटविषयी बोटचेपी भूमिका घेऊन देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली, त्याचे नाव म्हणून दुय्यम आहे. कोणत्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीत गुप्तहेर खात्याला वार्‍यावर सोडून देण्यात आले? कोणत्या भेदक कारवायांच्या योजना गुंडाळून ठेवल्या गेल्या, याला अधिक महत्व आहे. कारण ती भेदकता गमावल्यानेच पाकिस्तान वा देशाचे अन्य शत्रू आज शिरजोर होऊ शकलेत किंवा कसे; याचे उत्तर महत्वाचे आहे. भारताला आज पाकिस्तानच्या घातपाती व जिहादी अघोषित युद्धाचे जे चटके सोसावे लागत आहेत, त्याची पाळेमुळे त्याच नाकर्तेपणामध्ये असली तर? सुरक्षा व्यवस्थेतील असेट दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे शत्रू गोटात पेरलेले आपले हस्तक आणि मोक्याच्या क्षणी भेदक प्रतिकार करू शकणारी सुसज्ज शस्त्रास्त्रयंत्रणा. संरक्षणमंत्री पर्रीकर यानी अतिशय मोजक्या शब्दात त्याच ओझरता उल्लेख केला आहे. त्याचा नेमका संदर्भ कुठेच आलेला नाही. एक विमानवाहू नौका रशियाकडून घेण्याची प्राथमिक बोलणी २००४ पुर्वी जॉर्ज फ़र्नांडीस मंत्री असताना सुरू झाली आणि ती नौका प्रत्यक्ष भारताच्या ताब्यात येईलर्यंत पुढली दहाबारा वर्षे लागली. डीप असेट तोही असू शकतो. तसाच शत्रू गोटात आपला हस्तक खोलवर मोक्याच्या जागी नेऊन बसवण्याची प्रक्रियाही तशीच दिर्घकालीन असू शकते. एक आदेश जारी करून ठरलेल्या मुदतीत असा हस्तक कुठे नेऊन बसवता येत नाही. अशा गोष्टी दुरगामी सुरक्षा धोरणाच्या अंमलातूनच साधता येत असतात. भारतीय सुरक्षा व्यवस्था अलिकडल्या काळात मरगळलेली दिसते, किरकोळ जिहादी तिला भेदू शकतात, त्याचे कारण ‘डीप असेट’ दुर्लक्षित केले गेले किंवा उभारलेच गेले नाहीत. याकडे पर्रीकरांनी लक्ष वेधले असावे काय? अतिशहाण्या चर्चा करणार्‍यांना हे प्रश्न कशाला पडलेले नाहीत?

2 comments:

  1. Ram Nath Kao was then director of RAW.It is said that when it was East Pakistan and Sheikh Mujibur Rehman won the election and became PM(AwamiLeague) had more seats, a coup was feared, the info came from RAW and was conveyed by smt Indira Gandhi to Shaikh sab personally. Shaikh sab said R N Kao knows more about my country than I do. This is the way it should be.Keeping tabs on friends and foe is part of the game every country does that.

    ReplyDelete