Sunday, October 18, 2015

लातोंके भूत बातोसे नही मानते!

“AS OUR ENEMIES HAVE FOUND WE CAN REASON LIKE MEN, SO NOW LET US SHOW THEM WE CAN FIGHT LIKE MEN ALSO.”    -THOMAS JEFFERSON



गेल्या काही महिन्यात पाकिस्तान सरकार आणि त्यांचे लष्करी प्रवक्ते भारताकडून काश्मिरी नियंत्रण रेषेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने करू लागले आहेत. आजवर अशा तक्रारी आपल्याकडून व्हायच्या. मग सीमेलगत वास्तव्य करणार्‍या भारतीयांच्या घरावर पडलेले तोफ़गोळे किंवा क्षेपणास्त्रांचे अवशेष वाहिन्यांवर दाखवले जायचे. हल्ली ते कमी झाले असून, पाकिस्तानकडून अशा तक्रारी ऐकू येत असतात. अर्थात नियंत्रण रेषा ओलांडण्याचा आगावुपणा भारतीय सेना करत नाही. पण जिथे घुसखोरी करून जिहादी घुसवण्याचा उद्योग पाक सेना खेळते, तिथे त्यांना रोखण्याचे सर्व उपाय योजले जायचे. त्याबद्दल पाकिस्तानची तक्रार नव्हती. मग आता अकस्मात कुरबुरी कशाला सुरू झाल्यात? तर पाक सेनेने गोळीबार वा क्षेपणास्त्रे डागून धमाल करायची आणि त्याच गडबडीचा फ़ायदा घेत भारतीय हद्दीत जिहादी घुसवायचे, ह्या खेळाला पायबंद घातला गेला आहे. गोळीबार वा तोफ़ा डागल्या गेल्यावर ईटका जबाब पत्थरसे मिळू लागल्याचा हा परिणाम आहे. गोळीबाराला तसेच विनाविलंब उत्तर भारताकडून मिळतेच. पण रॉकेटचा मारा झाला, तर त्याला चक्क तोफ़ा डागण्याने उत्तर देण्यापर्यंत आता सज्जता केलेली आहे. ते इथून म्हणजे मुंबई दिल्लीतून आपल्याला दिसू शकणार नाही. पण नियंत्रण रेषच्या पलिकडे दबा धरून बसलेल्यांना हे सर्व साध्या दुर्बिणीतून दिसू शकते. अर्थात नुसते काही दिसले म्हणून कोणी घाबरत नाही, की भयभीत होऊन गळा काढणार नाही. आजवरच्या मोकाट मनमानीला कुठेतरी चाप लागल्याशिवाय इतका ओरड पाकिस्तान करणार नाही. त्यांची चिंता समोरून दिसणार्‍या भेदक तोफ़ांनी अधिक वाढलेली आहे. कारण भारतीय हद्दीत नियंत्रण रेषेलगत आता दूर पल्ल्याच्या युद्धसज्ज तोफ़ा येऊन उभ्या ठाकल्या आहेत. पाकचा त्यामुळेच धीर सुटत चालला आहे.

प्रत्यक्ष युद्ध चालू नसते, तेव्हा सीमेवर सेना तैनात केलेली नसते, तर सीमा सुरक्षा दल राखणदारी करीत असते. म्हणूनच तिथे कुठलीही युद्ध सज्जता नसते. मग ती काश्मिरची नियंत्रण रेषा असो किंवा भारत चीन यांच्यातली सीमा असो. तिथे वेगळी निमलष्करी दले तैनात केलेली असतात. सहाजिकच तिथे कुठलीही युद्धसामग्री आणली जात नाही. कुठल्याही सैनिक पथकाचा स्थानिक म्होरक्या असा निर्णय घेऊ शकत नाही. संपुर्ण उत्तर लष्करी विभागाचा सेनापती म्हणजे लेप्टनंट जनरलच असा निर्णय घेऊ शकतो. अर्थात त्यालाही आपल्या वरीष्ठांशी त्यासाठी सल्लामसलत करावी लागत असणारच. कारण युद्धजन्य परिस्थिती असल्याशिवाय इतक्या टोकाची तयारी केली जात नाही. त्यात दोन देशातील संबंध व भांडणे यांचीही दखल घेतली जात असते. मध्यंतरी तीन वर्षापुर्वी हेमराज नावाच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचे मुंडके कापून नेण्यापर्यंत पाकिस्तानच्या लोकांनी आगावूपणा केलेला होता. त्याचा अर्थातच पाकने इन्कार केला होता. भारताचे संरक्षणमंत्री अंथोनी यांनीही पाक गणवेशातील अतिरेक्यांचे कृत्य म्हणून, त्यावर पांघरूण घातले होते. सवाल हल्लेखोरांचा गणवेश कुठला हा नसून, त्यांनी भारतीय हद्दीत घुसून केलेल्या अमानुष कृत्याचा होता. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. कारण तशा तक्रारी पाकिस्तान करते आहे. कारण त्यांनी किंचित उचापत केली तरी त्याला रोखण्याच्या बरोबरच प्रत्युत्तरही दिले जात आहे. त्याच्याही पुढे गेले तर थेट पाकिस्तानी नियंत्रणाखालील प्रदेशात खोलवर प्रतिहल्ला होऊ शकतो, अशी स्थिती निर्माण करण्यात आली आहे. अवजड तोफ़ा वा युद्धयंत्रणा सीमेलगत आणणे, याचा अर्थ इथल्या पत्रपंडीतांना कळणार नाही. पण पाक सीमेवर उभे असलेल्यांना नेमका कळतो. तो असा की होणारी सज्जता उच्च पातळीवरच्या आदेशानुसार होते आहे.

भारत सरकार तोंडाने काहीही बोलत नाही. एका बाजूला दहशतवाद सोडा आणि वाटाघाटींना बसा, असा घोषा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज लावतात आणि दुसरीकडे संरक्षणमंत्री पर्रीकर छोट्या युद्धाशिवाय सैन्याला मरगळ येते, अशी भाषा करतात. त्याचा संदर्भ घेऊन पूछ भागात सीमेलगत तैनात केलेल्या तोफ़ांचा अर्थ शोधण्याची म्हणूनच गरज आहे. ह्या सर्व हालचाली नेमक्या व्याप्त काश्मिरच्या नियंत्रण रेषेजवळ चालू आहेत आणि त्याच दरम्यान व्याप्त काश्मिरात सामान्य जनता रस्त्यावर उतरून भारतात सहभागी व्हायच्या घोषणा देवू लागते. व्याप्त काश्मिरात मागल्या दोन दशकात सतत जिहादी छावण्या उभारून मुजाहिदीन घडवले गेले, असे आपण ऐकत आलो. तिथल्या काश्मिरी नागरिकांना दुय्यम वागणूक देवून पायदळी तुडवण्यात आले. त्याची फ़ळे आता पाकिस्तानला भोगायची वेळ आलेली आहे. जीवाची वा गोळीबाराची पर्वा न करता तिथले लोक पाकिस्तानपासून मुक्ती मिळवायला सज्ज झाले आहेत आणि म्हणूनच नियंत्रण रेषेवर उभे रहाताना पाक सेनेची तारांबळ उडते आहे. कुठल्याही सेनेला लढताना समोरचा शत्रू हाताळणे सोपे असते. त्यापेक्षा मागून हल्ला करू शकणारा घातपाती धोकादायक असतो. आजवर ती समस्या भारताच्या काश्मिरात आपल्याला सतावत होती. आज तशीच समस्या व्याप्त काश्मिरात पाक सेनेला भेडसावते आहे. तीच समस्या पाक सेनेला बलुचिस्तानात सतावते आहे. त्याचे उत्तर शोधता येत नाही म्हणून मग तिथल्या बंडखोरांना दहशतवादी ठरवून त्यामागे भारताचा हात असल्याच्या तक्रारी पाकिस्तान करू लागला आहे. मग अशाच स्थितीत युद्धाला तोंड लागले, तर व्याप्त काश्मिर वा बलुचिस्तानात स्थानिक जनता पाक सेनेशी दगाफ़तका करील, हे खरे भय आहे. त्या भयाने ग्रासलेल्या पाकला सीमेलगत मोठमोठ्या तोफ़ा तैनात झालेल्या दिसल्या, तर घाम फ़ुटणारच ना?

थोडक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर असोत, ते जेफ़रसनच्या तत्वाचा अवलंब करताना दिसतात. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहिरनामा लिहीणार्‍या थॉमस जेफ़रसन याचे प्रसिद्ध वचन म्हणते, ‘आपण सभ्य माणसासारखे बोलू शकतो, हे आपल्या शत्रुला ठाऊक झाले आहे. आता त्याला जरा कळू देत की आपण मर्दासारखे लढूही शकतो’. काही शत्रू असेही असतात, ज्यांना कंबरेत लाथ घालूनच समजावता येते. मग ते वाटाघाटीच्या टेबलावर येऊन निमूटपणे बोलू लागतात. पाकिस्तान त्यापैकीच एक शत्रू वा शेजारी देश आहे. त्याला सभ्य भाषा उमजत नाही. सभ्यपणाने बोलण्याला ते भित्रेपणा समजतात, तर लढायची सज्जता दाखवून त्यांना बोलण्यास भाग पाडले पाहिजे. सध्या सगळ्या बाजूने तशी लष्करी सज्जता व मुत्सद्देगिरी संयुक्तपणे चालली आहे. ती भाषा पाकिस्तानलाही समजू लागली आहे. म्हणूनच काश्मिरात अंग आखडून अमेरिकेचे उंबरठे झिजवण्यात नवाज शरीफ़ धन्यता मानत आहेत. प्रथमच असे दिसते आहे, की पाकिस्तानी राजकीय नेते आणि पाक सेनेचे म्होरके एका भाषेत बोलू लागले आहेत. अगदी स्पष्ट भाषेत सांगायचे, तर भारताने व्याप्त काश्मिर ताब्यात घेण्याची लढाई छेडली, तर स्थानिक जनतेला रोखणे अशक्य असल्याने पाक सेनेलाही घाम फ़ुटला आहे. सगळे जग सिरीया व इराकसह पश्चिम आशियाच्या रणकंदनात गुरफ़टलेले असताना काश्मिरसाठी रडणार्‍या पाककडे बघायला कोणाला सवड मिळणार नाही. याचीही चिंता पाकिस्तानला भेडसावते आहे. त्याला थेट सीमेलगत येऊन ठेपलेल्या भारतीय दूर पल्ल्याच्या तोफ़ा हेच खरे कारण आहे. मजेशीर गोष्ट इतकीच, की पुरस्कार परत देण्याघेण्यात रमलेल्या पत्रकार व माध्यमांना सीमेवरील ह्या घडामोडींचा थांगपत्ता नाही. उरलेले शहाणे गुलाम अली वा काळे फ़ासण्याच्या खेळात गर्क आहेत.

6 comments:

  1. अगदी बरोबर आहे.

    ReplyDelete
  2. भावू मला थोडा एकांगी लेख वाटला. पाकिस्तानचा एक उत्तम पत्रकार आणि बरेच काही असलेला नज्म सेठी ह्याचे program जरूर बघा. आपस कि बात ह्या नावाचा प्रोग्राम आहे. zemtv.com ह्या साईट वर आहेत. हल्ली तो बराच भारता विरुद्ध बोलतो पण तो हे विश्लेषण करतो तसा एकही माणूस आपल्याकडे नाहीये हे सत्य आहे. अत्यंत धूर्त माणूस आहे पण तरीही आपण नक्की पहा. इतके सरळ नाहीये कि पाकडे घाबरले आहेत. उलट काही ठिकाणी आपणच गोत्यात अलोये असे वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. Najam sethi pan ekach chashmyatun jewdhe disu shakte tevdhach sangto
      Pan kruti la krutine utter dile tar farak kay padto

      Delete
    2. तरीही तो मला बराच विश्वासू वाटतो आणि त्याचे विश्लेषण बरेच सत्याला धरून असते. हे मान्य करावे लागेल. एकाचे दोन करून सगळेच सांगतात पण भारतात म्हणजे एकाचे १०० करून सांगतात त्यामानाने हे परवडले ना.

      Delete
  3. प्रथम आपल्याकडे एखाद्या राष्ट्राला "शत्रु राष्ट्र" म्हणुन जाहीर करण्याची धमक आहे का ते तपासावे तसे नसेल तर तितके ठोस पुरावे नसावेत असा अर्थ घ्यावा का? अन् आपण जेवढे देशातील जनते समोर पाकिस्तानचे कारणामे सांगतो ते खरे असेल तर शत्रु राष्ट्र जाहीर करुन कारवाई करावी.

    ReplyDelete