Thursday, October 8, 2015

षडयंत्र: पुरोगामी आणि प्रतिगामी



मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विद्यमान सर्वोच्च नेते सीताराम येच्युरी यांनी नागपूर येथे एका परिसंवादात बोलताना रा. स्व. संघावर देशाचे चरित्र बदलण्याचा आरोप केला आहे. अर्थातच संघ वा भाजपा असे आरोप फ़ेटाळून लावतो व लावणार. त्यालाच तर राजकारण म्हणतात. अवघ्या जगातले राजकारण असेच चालते. काही लोक सत्तेचे हपापलेले असतात आणि ती सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जातात. भलेबुरे मार्ग वापरतात. तर काही लोक सत्तेपेक्षा समाजातील त्यांना मान्य नसलेल्या गोष्टी बदलून टाकायचे राजकारण खेळत असतात. अशा लोकांना कुठल्याही सत्तापदाचे आकर्षण नसते. सत्तेवर कोणीही बसला म्हणून त्यांना वावडे नसते. तर जो कोणी सत्तेत बसला आहे, त्याने अशा तत्वाच्या आग्रही लोकांना समाजात हवे तसे बदल घडवण्याची मुभा द्यावी, अशी त्यांची अपेक्षा असते. ती अपेक्षा सफ़ल होत नसली, मग हे तत्वाग्रही लोक बेचैन होतात आणि असलेल्या सत्तेच्या विरोधात आवाज उठवू लागतात. अर्थात सत्तेपुढे शहाणपण नाही हे अनुभवातून आलेले वचन आहे. म्हणूनच अशा तत्वाग्रही राजकारण्यांना सत्ताधीश फ़ारसे किंमत देत नाहीत. सोयीनुसार, गरजेनुसार त्यांचा उपयोग करतात आणि मग अडगळीत फ़ेकून देतात. पण ही प्रक्रिया कधी थांबत नाही. आपणच जग व समाज बदलत आहोत, अशा भ्रमात रहाणे तशा तत्वाग्रही लोकांना खुश राखत असते आणि नसेल, तर लढत असल्याचे समाधान देत असते. भारतातील डावे असोत किंवा उजवे असोत, त्यांचा असा संघर्ष दिर्घकाळ चालला आहे. त्यात कधी या बाजूचा विजय होतो, तर कधी त्या बाजूचा विजय होतो. मग त्यातला संधीसाधू त्यांना मस्तपैकी खेळवू लागतो. कालपरवापर्यंत सोनियांसारखी एक सामान्य महिला याच डाव्यांना खेळवत होतीच ना? तेव्हा ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपण येच्युरी यांच्या दाव्याचे विश्लेषण केले पाहिजे.

२००४ सालात भाजपाला व पर्यायाने संघाला नामोहरम करण्याच्या आहारी गेलेल्या डाव्यांना सोनियांनी किती लिलया खेळवले? पुढे चार वर्षांनी त्यांच्या लक्षात आले की आपण अपेक्षित धरलेला बदल होत नसून आपण पुरते उल्लू बनलो आहोत. मग त्यांनी सोनिया व कॉग्रेस विरोधात ‘एल्गार’ पुकारला. अर्थात डावे वगळता कोणालाच कधी एल्गार पुकारता येत नाही. त्यामुळे डावे पुकारतील त्याला एल्गार म्हणायची आपल्याकडे पद्धत आहे. मात्र तो एल्गार इतका फ़ुसका निघाला, की सोनियांच्या युपीएला धडा शिकवायला निघालेल्या डाव्यांना त्यांच्याच बंगाली बालेकिल्ल्यात मतदाराने धडा शिकवला. अर्थात कोणी कितीही धडा शिकवला म्हणून डाव्यांना त्यातून काहीही शिकणे शक्य नसते. कारण ते स्वयंभू सर्वज्ञानी असतात. मग धडा नव्याने शिकण्याचा विषयच कुठे येतो? सहाजिकच मागली सहासात वर्षे धडा न शिकल्याचा परिणाम त्यांना २०१४ च्या मतदानात भोगावा लागला. त्याचा काय उपयोग? आताही येच्युरी आपल्याच मस्तीत नाहीत काय? आपले काहीही चुकले असे त्यांना वाटत नाही. म्हणूनच त्यांचा असला पोरकटपणा चालू आहे. संघ देशाचे चरित्र बदलू बघतोय, असे त्यांचे विधान खोटे नाहीच. पण त्यात नवे काय आहे? आज जे देशाचे चरित्र आहे वा स्वातंत्र्योत्तर काळात जसे भारताचे चरित्र घडवले व बदलले गेलेले आहे, त्यातच उलट बदल घडवून आणण्याच्या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे. त्यात संघाने काही लपवलेले नाही. भारत हे उपखंड हिंदूराष्ट्र होते आणि विद्यमान युगात तशी त्याची पुनर्स्थापना करणे, हेच आपले ब्रीद राहिल, असे संघाने स्थापनेपासून कथन केलेले उद्दीष्ट आहे. प्रश्न असा, की आज त्याची भिती येच्युरी यांना कशाला भेडसावते, इतकाच आहे. संघाला त्याच्या हेतूपासून थोपवण्यात अपेशी ठरल्याची ही वेदना आहे की कबुली आहे?

देशाची सत्ता व सरकार हाती आले, मग देशाचे चरित्र बदलता येत असते काय? तसे येच्युरी व डाव्यांना वाटत असेल, तर मागल्या सहा सात दशकात तेच कार्य चालू होते, याचीही कबुली द्यावी लागेल ना? म्हणजे असे, की स्वत:ला सेक्युलर वा पुरोगामी म्हणवून घेतात, त्यांच्यापाशीच देशाची सत्ता कायम राहिली आहे. वाजपेयींच्या कारकिर्दीतही त्यांना पुरोगामी मित्रपक्षांना सोबत घेऊन सत्ता राबवावी लागली होती. खुद्द वाजपेयीही संघ-भाजपातले सेक्युलर अशीच पुरोगाम्यांची धारणा दिसत आली आहे. मग अशा दिर्घकाळात देशाचे चरित्र पुर्वापार होते तसेच राहिले, की डाव्या बाजूला झुकणारे चरित्र देशाच्या माथी मारण्याचा उद्योग सत्तेच्या मदतीने चालला होता? पंडित नेहरू व त्यांच्या वारसांनी केलेला कारभार बघता देशावर पुरोगामी चरित्र लादण्याचा अट्टाहास झालेला आहे. म्हणून तर इंदिराजींनी आणिबाणीत घटनेत बदल करून प्रत्येक राजकीय पक्षाला सेक्युलर व समाजवादी असण्याची सक्ती केली. त्यामुळे आज ज्याला येच्युरींसारखे डावे प्रतिगामी म्हणून हिणवतात, त्या भाजपा वा शिवसेना इत्यादी पक्षांची कायदेशीर नोंद समाजवादी विचारांचे अशीच झालेली आहे. ते शक्य नव्हते म्हणून स्वतंत्र पक्षाने आपले विसर्जन करून राजकारण सोडले. तो देशाच्या चरित्रातला बदल नव्हता काय? अशा शेकडो गोष्टी दाखवून देता येतील, ज्यातून सहा सात दशकात देशाचे चरित्र डावे पुरोगामी करण्याचे काम झालेले आहे. त्याला पवित्र काम म्हणायचे तर तसेच काही नवे सत्ताधीश करत असतील, तर त्याला षडयंत्र कसे म्हणता येईल? मग आपण वा आपले पुरोगामी पुर्वजही असेच कारस्थान राबवित होते, असेही म्हणा. सहाजिकच त्या दिर्घकालीन बदलातून जे देशाचे डावे चरित्र लादलेले आहे, तेच संघ पुसून टाकतोय, असा आरोप अधिक संयुक्तीक ठरेल ना? येच्युरी यांनी तसा आरोप केला तर संघालाही त्याचा इन्कार करायची सोय उरणार नाही.

कला साहित्य क्षेत्रापासून शिक्षण सामाजिक घडामोडींपर्यंत प्रत्येक बाबतीत मागल्या अर्धशतकात जी डावी घुसखोरी झाली आहे, त्याला चरित्र बदल नाही तर काय म्ह्णायचे? पत्रकारितेपासून बुद्धीवादापर्यंत जी एकांगी पोपटपंची सदैव कानी येते, त्याला लादलेला चारित्र्यातील डावा बदल नाही, तर दुसरे काय नाव आहे? विचार असेल तर तो डावाच असतो आणि अन्य कुठला विचार असूच शकत नाही, अशा भ्रमात वावरणारे बोलघेवडे आपल्या देशात पैशाला पासरी मिळू लागलेत. यालाच चरित्र बदल म्हणायचे ना? देशातली कुठलीही चांगली, प्रगती वा विकासाची गोष्ट घडली, मग तिचे श्रेय नेहरूंना वा त्यांच्या पुरोगामी नेतृत्वाला देण्य़ाच्या नादात संघ वा पुरोगाम्यांनी त्याला विरोधच केला असल्याचा सिद्धांत हिरीरीने मांडण्याचा पोरकटपणा अशा विद्वत्तेमध्ये रुजला आहे. त्याला डाव्या पुरोगामी चरित्राचे रूप म्हणायचे ना? डावेपणा वा पुरोगामीत्व म्हणजे काहीही खुळेपणा करायची मोकळीक, असे जे राजकीय चरित्र होऊन बसले आहे, ते षडयंत्र नाही तर दुसरे काय आहे? त्यालाही पर्याय नव्हता. डाव्यांना पुख्खा झोडण्यासाठी नेहरूंनी मोठमोठी वतने बहाल केली, तशीच गांधीवाद्यांच्याही पोटपाण्याची सोय लावली. एकूण दोन्हीकडून आपलाच उदो उदो होण्याची व्यवस्था नेहरूंनी उभी केली. त्यातून जे चरित्र देशाच्या माथी मारले गेले, तो लादलेला बदल होता. ज्यांनी तो सत्तेच्या बळावर लादला, त्यांच्या मनातच आता तशी भिती असू शकते. कारण सत्तेच्या बळावर चरित्र बदलता येते, असा प्रयोग त्यांनीच यशस्वी केला आहे. आपण जे केले तेच आता मोदींच्या कारकिर्दीत सत्तेबाहेर राहून संघ करतोय, अशी भिती येच्युरी व त्यांच्यासारख्या डाव्यांना पुरोगाम्यांना सतावत असेल, तर त्यात म्हणूनच नवल नाही. ‘आयडिया ऑफ़ इंडीया’ नामे त्यांनी लादलेले चरित्र पुसले जाण्याचा आकांत करण्याचा त्यांचा अधिकार कोणी नाकारू शकत नाही.

4 comments:

  1. स्वतंत्र भारताने शिकलेला इतिहास डाव्यांनी लिहिला आहे हा डाव्यांचा ऐतिहासिक विजय आहे ज्याची त्यांनी इतिहासात नोंद होऊ दिली नाही .

    ReplyDelete
  2. हल्ली कबडीतील नव्या रुलप्रमाणे तीन अयशस्वी रेड झाल्या की रेडर आपोआप बाद होतो.
    सिताराम येचुरी आणि त्यांचे डावे साथीदार असेच बाद होतायत. त्यांना वेगळ्या रितीने बाद करण्याची गरज नाही राहिली ! आपले छान विवेचन!

    ReplyDelete
  3. भाऊ जसे पुरोगामी आणि प्रतिगामी तसेच काही लोक या दोन्हीच्या मधले आहेत... अशे मधले लोक हे खरे प्रतिगामीच पण जगाला दाखवन्यासाठी हे लोक पुरोगामीत्वाचा आव आणतात.... ही त्यांची खरी अंधश्रध्दा....

    ReplyDelete
  4. आणिबाणीत घटना बदल करून सेक्युलर व समाजवादी होण्याची सक्ती करणे , तसे व तत्सम नेहरून पासून आजपर्यंत घटनेत किती व काय बदल झालेत? ह्यावर काही लिहीलेत तर खूप महत्वाची माहिती वाचकांना मिळेल. ह्या पार्श्वभूमी वर कोणत्या संघटना काय भूमिकेतून घटना बचाव म्हणून बोंबलत असतात हे ही कळू शकेल.

    ReplyDelete