Wednesday, February 27, 2019

युद्धस्य कथा रम्य:

imran addressing nation के लिए इमेज परिणाम

संस्कृतमध्ये असे एक वचन आहे. त्याचा अर्थ असा, की युद्धाच्या कथा ऐकायला वाचायला खुप मनोरंजक व थरारक असतात. कारण त्या आपल्या आयुष्यातल्या नसतात. ते कथाकथन असते. त्यातले नाट्य कोणालाही भावते. प्रामुख्याने त्या परिस्थितीचा अनुभव ज्यांच्या वाट्याला आलेला नसतो, त्यांच्यासाठी त्या कथा आकर्षक असतात. पण प्रत्यक्षात ज्यांनी युद्ध भोगलेले आहे, अशा लोकांसाठी त्या कथा रम्य किंवा मनोरंजक नसतात. तर अंगावर शहारे आणणार्‍या असतात. राजकीय पुढार्‍यांना किंवा समाजाला चिथावण्या देणार्‍यांना त्यात कितीही मर्दुमकी दाखवता येत असली, तरी व्यवहारात असे लोक अतिशय सुरक्षित बंदोबस्तामध्ये बसलेले असतात. सामान्य सैनिक वा राखणदार त्यात आपला जीव किंवा संर्वस्व पणाला लावत असतो. म्हणूनच मागल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानातून जी युद्धाची भाषा राजरोस बोलली जात होती, तिला अकस्मात लगाम लावला गेला आहे. मंगळवारी पहाटे भारताने पाक भूमीत घुसून जो हवाई हल्ला केला, त्यानंतर पाकिस्ताननेही भारतीय हद्दीत विमाने पाठवून नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तीन विमानांना भारतीय हद्दीतून तात्काळ पळवून लावले गेले. त्यातले एक विमान भारतीय प्रतिहल्ल्याचे शिकार झाले आणि एक भारतीय विमानही पाठलाग करताना पाकिस्तानी प्रदेशात पाडले गेले. एक भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात सापडला आहे. इतके झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची नरमलेली भाषा अनेकांना चकीत करणारी आहे.

मंगळवारच्या भारतीय हल्ल्यानंतर तावातावाने बदल्याची भाषा करणारे पाकिस्तानी नेते व सेनाधिकारी; किरकोळ हुलकावणी देणारा हल्ला केल्यावर अधिक जोशात येतील अशी अपेक्षा होती. उलट इमरानखान यांनी पुलवामा येथील घातपाती हल्ल्याची चर्चा व तपास करण्याची भाषा बुधवारी वापरली,. ती तर्काला धक्का देणारी आहे. आम्हीही प्रतिहल्ला केला. असाच भारताला चोख धडा शिकवू; असे बोलणे त्यांच्याकडून अपेक्षित होते. कारण भारताचा निदान एक पायलट त्यांच्या ताब्यात गेलेला आहे. पण तसे झालेले नाही आणि युद्ध नको असली शरणागतीची भाषा इमराननी वापरलेली आहे. त्याची मिमांसा म्हणूनच अगत्याची आहे. जगभरातून भारतीय हल्ल्याचे अनेकांनी समर्थन केले आणि पाकचा मित्र चीननेही पाकिस्तानला सबुरीचा सल्ला दिलेला आहे. आजवरचा पाठीराखा अमेरिकाही भारताच्या बाजूने बोलत आहे. त्यामुळेच पाक एकाकी पडला आहे आणि स्वत:ची लढण्याची कुवतही पाकिस्तान ओळखून आहे. मुशर्रफ़ यांनी पुलवामानंतर त्याचीच ग्वाही दिलेली होती, उठसुट अण्वस्त्रांच्या धमक्या देणारा पाक असा बादलून गेला, त्यामागे वस्तुस्थितीची जाणिव आहे. भारताच्या मुकाबल्यात आपला दोन आठवडे टिकाव लागणार नाही आणि बघता बघता पाकचे तुकडे होऊन जातील, हे त्यामागचे भय आहे. पाकिस्तान नावाचे अराजक आपल्याच अंधाधुंदीच्या ओझ्याखाली चिरडू लागले आहे. भारतापासून पाकिस्तानला धोका आहे आणि लष्करच पाकिस्तानला एकसंघ राखू शकते; ही समजूत घालून देण्यात आल्यामुळे गरीबी व दरिद्री अवस्थेतही पाकिस्तानी जनता लष्कराच्या पाठीशी राहिली आहे. त्याच बळावर पाक सेनाधिकारी सतत राजकीय सत्ता आपल्या मुठीत राखू शकले आहेत. राजकारण्यांना आपल्या बोटावर खेळवू शकले आहेत.

पाकसेनेला भारतीय हवाई हल्ला रोखता आला नाही आणि भारताला उत्तरही देता आले नाही, असे पाक जनतेच्या मनात रुजले तर पाकच्या लष्करी सत्तेचा तो अस्त असेल. म्हणूनच तात्काळ कुठलाही विचार न करता वा आखणी केल्याशिवाय पाक हवाई दलाने भारतीय हद्दीत तीन लढावू विमाने पाठवली. आपणही भारतीय हवाई हद्दीचा भंग केल्याचा देखावा उभा केला. त्यात कुणाचा बळी गेला नाही, की कुठले नुकसान झालेले नाही. तशी आखणी व रणनितीच नसेल तर दुसरे काय व्हायचे? आपणही प्रतिहल्ला केला, इतकेच त्यांना दाखवायचे होते आणि त्यात पाकिस्तान यशस्वी झाला. आपल्याच जनतेची दिशाभूल करायचा त्यातला हेतू लक्षात घेतला, तर इमरानखान युद्ध नको म्हणून गयावया कशाला करीत आहेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. युद्ध झालेच तर आठवडाभरही पाकिस्तानचा टिकाव लागणार नाही. कारण युद्ध खर्चिक असते आणि पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट आहे. अमेरिकेने भिक घालणे थांबवले आहे आणि चिनच्या कर्जाखाली पाकिस्तान चिरडलेला आहे. चिनी गुंतवणूकीला युद्ध झाल्यास मोठी हानी सोसावी लागेल आणि त्यात चिनी पैसा बुडीत जाण्याचा धोका कळलेला चीनही पाकला सबुरीचा सल्ला देतो आहे.

पाकिस्तान एक अराजक आहे आणि त्याचे चारपाच तुकडे पडले, तर भारताला हवे आहेत. पण तशा स्थितीत चीनचे कित्येक अब्ज डॉलर्स कुणाकडून वसुल करायचे; अशी भ्रांत चिनलाही सतावते आहे. सहाजिकच पाकने भारताला हैराण करावे अशी चीनची तीव्र इच्छा असली, तरी आपल्या पदराला खार नको असाही सावधपणा आहे. त्यानेच कान पकडलेला असल्याने इमरानखान यांनाही युद्ध नको आहे. कारण युद्धात पराभव होतानाही लढायची खुमखुमी मिळणार असली, तरी त्याचा खर्च उचलणारा कोणी सावकार शिल्लक उरलेला नाही. शिवाय अशा युद्धात पाकचा टिकाव लागला नाही, तर पाकसेनेचा तिथे असलेला दबदबाही संपणार आहे. त्यामुळेच लष्करालाच युद्ध नको आहे आणि त्यांची कठपुतळी असलेल्या इमरानलाही युद्ध नको आहे. पण त्याचवेळी आजवर पोसलेले जिहादी व अन्य उचापतखोरही आवाक्यात राहिलेले नाहीत. म्हणून दहशतवादही थांबवता आलेला नाही. आधी हल्ला आणि नंतर लगेच युद्ध नकोच्या गयावया, यामागची अशी चमत्कारीक मिमांसा आहे. आजवर विणलेल्या जाळ्यात पाकिस्तान आता स्वत:च फ़सलेला असून, त्यातून सुटायचा मार्गही त्यांना मिळेनासा झाला आहे. म्हणून पुढले काही दिवस पाकिस्तान किती माकडचेष्टा करतो, हे युद्धापेक्षाही मनोरंजक असेल.

11 comments:

  1. Pakistan chya unplanned air strike madhe bharatachich jast causality zaleli distey.

    ReplyDelete
  2. शीर्षक सुधारावे रम्या असे हवे. युद्ध सुरु झल्यावर पहिला बळी जातो तो सत्याचा असे म्हणतात. शुद्धलेखन बळी जाऊ नये .

    ReplyDelete
  3. अतिशय योग्य विश्लेषण....
    पाकिस्तानी लष्कर परेशान आहे...

    ReplyDelete
  4. भारताची रणनीती ही जैशे महंमद चा तळ उध्वस्त करण्यापर्यंत मर्यादित राहील असे वाटत नाही. मसूद अझहरला आमच्या ताब्यात द्या नाहीतर त्याला पाकिस्तानात जिथे त्याला लपविला असेल तेथे घुसून मारायचा प्लॅन दिसतो आहे. फक्त मसूद अझहर नाही तर हाफिज सैद , दाऊद इब्राहिम पण हवा आहे. इम्रान खान आणि तेथील लष्कर यांनी या तिन्ही गुन्हेगारांना भारताच्या हवाली केले तरच आगामी युद्ध थांबू शकेल अथवा पाकिस्तान बरोबर युद्ध अटळ दिसते आहे. अशी जागतिक , पाकिस्तानची कंगाल स्थिती आणि सभोवतालची अनुकूल परिस्थिती परत आपल्या वाट्याला येणार नाही. त्यामुळे आत्ता नाही तर परत कधी नाही. उद्यापर्यंत काहीतरी घडण्याची सुरुवात दिसेल. भारतातील अत्यंत नालायक अशा विरोधी पक्षांनी कालच्या बैठकीत पंतप्रधानांच्या पाकिस्तानवरील आक्रमणाच्या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. आत्ताच वेळ आहे जगाला सर्व भारतीयांनी आणि सर्व पक्षांनी एकमुखाने सामोरे जाण्याची. पण हे खांग्रेसी आणि इतर बांडगुळे येणाऱ्या निवडणुकीतील पानिपताच्या भीतीने घाबरले आहेत. वस्तुस्थिती अशी आहे कि बलुचिस्तान , खैबर पख्तुन्वा आणि सिंध ह्या प्रांतातील लोक भारताच्या पाकिस्तानवरील आक्रमणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय सैन्याचे या तिन्ही ठिकाणी तेथील जनतेकडून जोरदार स्वागत केले जाईल अशीच लक्षणे आहेत. पंतप्रधान मोदी याना जास्तीत जास्त सामर्थ्य आणि मनोबल मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढे यश आपलेच आहे हे सांगण्याची गरज नाही.

    ReplyDelete
  5. पाकिस्तानच्या विविध वाहिनींवर श्रीमान राज ठाकरे झळकताना पाहून वेदना झाल्या. प्रत्येक पाकिस्तानी वाहिनी श्रीमान राज ठाकरे यांचे ' पुलवामा ' विश्लेषण सांगत होती. एक पक्की खात्री झाली की श्रीमान राज ठाकरे यांनाही पाकिस्तानकडून अर्थ रसद मिळत असावी. त्यामुळे ' रसदीला ' जागले पाहिजेच. इथे लोकांना नुसते आकाशाकडे बोट दाखवून स्वतःची नसलेली पाजळण्याची संधी आणि येथे टाळ्या पिटणारे मिळतातच. ही ' नवभंगार ' सेना लवकरच इतिहासजमा होणार हे निश्चित. मग कृष्णकुंजवर बसून ' स्वगत ' म्हणत बसण्याचे दिवस जवळ आले आहेत हेच खरे.

    ReplyDelete
    Replies
    1. त्या विडिओ ची लिंक share करा please

      Delete
  6. Perfect analysis of the situation, Bhau!

    ReplyDelete
  7. तुम्ही राजकारण समजवून छान सांगता. धन्यवाद

    ReplyDelete
  8. भाऊ इम्रान खानच्या चर्चेच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी म्हणून त्याचे इथले मीडियातील हस्तक प्रचंड केविलवाणे झाले आहेत, इंडिया टुडे वर राजदीप सारदेसाईच्या चर्चा किंव्हा लोकसत्ताचा आजचा अग्रलेख वाचला तर याची साक्ष मिळेल,भाऊ गेली काही आपण जे सातत्याने प्रतिपादन करत आहात ते आज जसेच्या तसे आज सत्यात उतरत आहे आपणाला सलाम

    ReplyDelete
  9. इतके सटीक विश्लेषण बर्याच दिवसांत वाचण्यात आले नव्हते. आभार!

    ReplyDelete
  10. भाऊराव,

    काय गंमत आहे, नाहीका! काय एकेकाची भाषा होती. मेहबूबा म्हणाली की '३५ अ कलमाला हात लावला तर जम्मू-काश्मीरचे लोक तिरंग्याऐवजी कोणता झेंडा हाती घेतील ते माहित नाही' (संदर्भ : https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/mehbooba-mufti-warns-nda-says-jammu-and-kashmir-will-dump-the-tricolour-if-article-35a-attacked/articleshow/68157228.cms). पाकिस्तानवर एक हल्ला झाला काय आणि आवाजी एकदम बंद!

    इम्रानखानचं एकवेळ समजू शकतो. पण मेहबूबा मुफ्ती कुणाच्या जोरावर एव्हढा माज दाखवंत होती? तिला पार जोकर बनवलं मोदींनी.

    लकडीशिवाय मकडी वळंत नाही, हेच खरं.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete