Saturday, July 18, 2020

कोरोनानंतरच्या जगाची रुपरेखा

CORONAVIRUS LATEST UPDATES IN INDIA | CORONAVIRUS VACCINE ...

कोरोना विषाणूचा बंदोबस्त केल्यानंतरचे जग कसे असेल, त्याचा उहापोह मागल्या चार महिन्यांपासून चालू आहे. अगदी अर्थशास्त्रापासून राजकीय प्रशासकीय गोष्टी कशा असतील, त्याची चर्चा चालली आहे. पण सर्वात पहिले उत्तर कोरोनाला रोखण्यासाठी मिळाले पाहिजे, याचेही भान अशा चर्चा करणार्‍यांपाशी नाही, हे स्पष्ट झालेले आहे. किंबहूना अशा चर्चा रंगवणार्‍यांना कोरोनाच्या संकटाची व्याप्ती तरी कळली आहे किंवा नाही, अशी शंका येते. कोरोना हे पहिले असे सांसर्गिक संकट नाही किंवा पहिलाच जागतिक साथीचा आजार नाही. तशा अनेक साथी आजवर आलेल्या आहेत आणि त्यांनी मानव जातीसमोर अस्तित्वाचा यक्षप्रश्न उभा केलेला आहे. त्यावेळीही मानवाची अशी तारांबळ उडालेली होती. अगदी गंडेदोरे बांधण्यापासून वैद्यकीय उपचारापर्यंत अनेक मार्गांचा अवलंब करून जगात प्रत्येक देशातल्या जनतेने त्यांचा सामना केलेला आहे. मात्र त्या प्रत्येक प्रसंगी जुन्या गोष्टींचा त्याग करून नव्याने उभे रहाण्याखेरीज माणसापुढे अन्य कुठलाही पर्याय नव्हता. नवे पर्याय व नवे उपाय माणसाला इथपर्यंत घेऊन आलेले आहेत. यापुर्वी काय केले त्याकडे पाठ फ़िरवून नव्याची कास धरावी लागलेली आहे. मग कोरोनावर मात करताना किंवा त्यानंतरच्या नव्या जगाची उभारणी करताना तरी जुने निकष कशाला उपयोगी ठरू शकतील? पण त्याचा मागमूस नव्या जगाचा विचार करणार्‍यांमध्ये आढळून येत नाही, ही खरीखुरी शोकांतिका आहे. म्हणून मग असे वाटते, की या जाणकार म्हणवणार्‍यांना अजून कोरोनाची व्याप्तीच उमजलेली नाही. सहाजिकच भविष्यातले वा कोरोनानंतरचे जग कसे असेल, त्याची कल्पनाही त्यांच्या मनात येऊ शकणार नाही. ती कल्पना करण्याची हिंमत वा इच्छाही अशा लोकांपाशी असू शकत नाही. काय आहे कोरोना?

कोरोना हा अगदी नवा विषाणू आहे? कमीअधिक प्रमाणात त्याची लक्षणे वा त्रास जुन्या कुठल्या तरी आजाराशी जुळणारा असला, तरी त्याची पसरण्याची कुवत अपार आहे. त्याने एका फ़टक्यात किंवा अवघ्या काही महिन्यात माणसाने मागल्या शतकात मेहनतीने उभे केलेले अवघे जग विस्कटून टाकलेले आहे. महाशक्ती वा प्रगत देश असल्या कल्पनाही धुळीला मिळवलेल्या आहेत. भारतासारखा तुलनेने गरीब देश त्याच्याशी समर्थपणे सामना करीत असताना प्रगत युरोप व अमेरिकेने त्याच्यापुढे गुडघे टेकलेले आहेत. विविध अत्याधुनिक साधने व उपकरणेही तोकडी पडली असताना विपन्नावस्थेतला भारतातला कोट्यवधी नागरिक तुलनेने सुखरूप राहिलेला आहे. अतिशय विचारपुर्वक केलेली गुंतवणूक वा उभारलेले उद्योग व्यापार या रोगाने जमिनदोस्त करून टाकलेले आहेत. युरोपात तर जवळपास जुनी पिढीच कोरोनाने मारून टाकलेली आहे. त्यांनी शोधून काढलेली औषधे व उपचाराच्या सुविधा निकामी ठरवल्या आहेत. हजारो वर्षापुर्वीचा मानव जसा अगतिक व हताश निराश होता, तशी अवस्था या आजाराने करून टाकली आहे. मग त्याच्यावर मात करण्यासाठी नव्या पद्धती व नवे उपाय शोधण्याला पर्यायच उरलेला नाही. जी स्थिती त्या आजाराची बाधा झालेल्या माणसाला वाचवण्याच्या बाबतीत आहे, त्यापेक्षा त्यामुळे उध्वस्त झालेल्या विविध व्यवस्था नव्याने उभारण्याची समस्याही किंचीत वेगळी नाही. ती कालची अर्थव्यवस्था, उत्पादन पद्धती वा वितरण वा व्यापार शैली यांच्यासह जीवनशैली यांना आता नव्या जगात स्थान नसेल. कित्येक वर्षात व पिढ्यातून तयार झालेल्या आपल्या सवयी कोरोनाने घातक ठरवल्या आहेत. त्यांना बदलताना जगण्याच्या अन्य क्षेत्रातील निकष व नियमही आमुलाग्र बदलावे लागणार आहेत. दोन माणसांमधले अंतर कायम जपायचे, म्हणजे जगण्यातला व्यवहारच बदलून जातो ना?

दाटीवाटीच्या वस्त्या व कामाच्या जागांपुरता हा बदल पुरेसा नाही. मानवी स्पर्श, संपर्कच रोगाला आमंत्रण असेल तर समाजजीवन कसे चालणार आहे? ते जुन्या पद्धतीने चालणार नसेल तर एकूण व्यापार, व्यवहार व उद्योगही बदलण्याला पर्याय उरत नाही. आजवर माणूस जसा जगत आला, त्याच आधारावर बाकीच्या व्यवस्था उभारलेल्या आहेत. सहाजिकच त्या जगण्याच्या शैली व सवयीलाच फ़ाटा द्यायचा असेल, तर त्यावर बेतलेल्या विविध व्यवस्था व रचनाही निरूपयोगी होऊन जातात. माणसाच्या आयुष्यातील जीवनावश्यक वस्तु वा सेवांमुळे व्यापार चालतो. सवयी बदलल्या तर त्या जीवनावश्यक वस्तु व सेवांचे स्वरूपही बदलून जाणार ना? मग तेच बदलणार असेल तर आपोआप त्याचा बाजार बदलतो आणि उत्पादनाच्या प्रणाली बदलाव्या लागतात. अशा अनेक पद्धती, प्रणालींवर समाजाचे व जगाचे अर्थशास्त्र बेतलेले आहे. त्याच्या विकासातून वा उलगडण्यातून त्याचे नियम निर्माण झालेले आहेत. ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही. मग ज्या पायावर आधारीत ही शास्त्रे व त्यांचे नियम निकष उभारले गेले आहेत, तो पायाच पुरता बदलून जाणार आहे. मग जुन्या निकष नियमानुसारचे अर्थकारण चालणार कसे? आज जाणकार म्हणवणारे म्हणूनच जुन्या पायावर नव्या जगाच्या कल्पना मांडतात, ते चमत्कारीक वाटते. त्यांचे दावे मनोरंजक तितकेच हास्यास्पद वाटतात. त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे चिनी एप्सवर भारताने अचानक घातलेली बंदी होय. ती घोषणा केल्यावर किंवा चिनी मालावरच्या बहिष्काराची भाषा झाल्यावर यापैकी बहुतांश अर्थ जाणकारांनी टवाळी केली होती. चीनला काहीही फ़रक पडणार नाही अशी ग्वाही दिलेली होती. व्यवहारात त्याचे काय परिणाम दिसले? बघता बघता चीनला घाम फ़ुटला आहे. ते प्रतिबंध चीनला भयभीत करून गेले आहेत. इथे अर्थशास्त्री कशाला चुकले? त्यांना कोरोनानंतरच्या परिस्थितीचे आकलन झालेले नाही.

कोरोनापुर्वीचे जग आणि आजच्या जगातला मोठा फ़रक कोंणता? अर्धे जग चीनमध्ये उत्पादित मालावर विसंबून होते आणि चीनही त्या अर्ध्या जगाला माल पुरवण्यासाठी उत्पादन करण्यावरच आपली अर्थव्यवस्था उभारून बसला होता. पण त्याच ग्राहकाची माया आटली आणि चिनमधल्या उत्पादक व्यवस्थेला कामच उरले नाही. आज चिनच्या अनेक प्रांतामध्ये सामान्य नागरिक वा व्यावसायिकाला मोठी रक्कम खात्यात असूनही बॅन्केतून काढता येत नाही. कारण उत्पादन व निर्यात घटल्याने चिनच्या अनेक बॅन्कांमध्ये आपल्याच खातेदारांना द्यायला रोखीची चणचण भासू लागली आहे.जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून आपल्याच देशातले अर्थशास्त्री चीनचे गुणगान करीत होते. बहिष्काराने फ़रक पडणार नव्हता, तर चिनला रोकड कशाला कमी पडू लागली आहे? त्याचे उत्तर कोरोना आहे. जितका माल चीन उत्पादित करतो, त्यातला बहुतांश जगाला विकण्यावर चिनी जनतेची गुजराण होत असते. उत्पादित मालाला ग्राहक उरला नाही, कारण कोरोनाने त्याला दिवाळखोर केलेले आहे. त्याचा हिशोब वा परिणाम नव्या निकषांवर मोजावा लागणार आहे. त्याचाच पत्ता नसेल वा ते निकषच तयार नसतील, तर भविष्याचे आडाखे बांधता येणार नाहीत. बांधले तरी त्यात मोठी गफ़लत होऊन जाते. म्हणूनच चिनी एप्सवर बंदी घालण्याची हेटाळणी करणारे तोंडघशी पडलेले आहेत. अशाच लोकांनी कोरोनानंतरच्या जगाची कल्पना मांडणे म्हणूनच हास्यास्पद आहे. कोरोनाने जागतिक आरोग्य संघटनाच जमिनदोस्त करून टाकली आहे आणि त्याच रोगाने राष्ट्रसंघाला निरूपयोगीही ठरवून टाकलेले आहे. मग उरलेल्या संस्था वा विविध देशातल्या संस्था व्यवस्था यांची काय हुकूमत शिल्लक असेल? दुसर्‍या महायुद्धापुर्वी जी अराजकाची स्थिती होती, तसाच काहीसा प्रकार घडतो आहे आणि त्याच्या नियंत्रणाचे सगळे नियम व निकष नव्याने बनवावे लागणार आहेत. हे कसे ठरणार? कोण ठरवणार आहे?

दुसर्‍या महायुद्धाने जगाचा चेहरामोहरा पुर्णपणे बदलून टाकला असे आपण म्हणतो. पण बदलला म्हणजे नेमके काय घडले होते? जे व्यापाराच्या निमीत्ताने युरोपातले पुढारलेले समाज जगाच्या अन्य भागात पोहोचले होते, त्यांनी तिथे आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या. त्यांनी आधुनिक यंत्रतंत्र यांच्या सहीत शस्त्रबळाने इतरांना गुलाम करून ठेवले होते. स्थीर शासन प्रणाली बहाल करून सरंजामशाही व राजेशाही निकालात काढली होती. ती वसाहतीची साम्राज्ये दुसर्‍या महायुद्धाने खालसा करून टाकली. वसाहतींवर राज्य करताना युरोपियनांनी जी शासनपद्धती व उत्पादन व्यवस्था उभारली, त्यातून स्थानिकांमध्ये स्वतंत्र होण्याची इर्षा निर्माण केली. त्यांना नंतर शस्त्राने धाकात ठेवणे अशक्य झाल्याने ती साम्राज्ये लयास गेली. एक एक वसाहतीला स्वातंत्र्य देण्यातून त्या साम्राज्यांचा शेवट होत असतानाच अमेरिका व कम्युनिस्ट साम्राज्ये उदयास आली आणि वैचारिक वा आर्थिक बळावरची साम्राज्ये उभी राहिली. त्यातून जी वेगळी नवी जागतिक व्यवस्था उदयास आलेली होती, ती अलिकडे कालबाह्य झालेली होती. पण कोसळून पडत नव्हती. तिला कुठून तरी मोठा धक्का दिला जाण्याची आवश्यकता होती व तेच काम कोरोनाने उरकले आहे. आर्थिक व व्यापारी वैचारिक बळावर जगाला मुठीत ठेवण्याचे युग आता संपले आहे वा कोरोनाने संपवले आहे. त्यामुळे त्या कालबाह्य व्यवस्थेतील अर्थकारण, राजकारण वा त्याला चालवणार्‍या रचना आता उपयोगाच्या राहिलेल्या नाहीत. कोरोनानेच त्याची साक्ष दिली आहे. अमेरिकेच्या श्रीमंती वा आधुनिक जीवनशैलीला त्याने उध्वस्त केले आहे. त्याच पठडीतून जगावर राज्य करायची महत्वाकांक्षा बाळगून मागल्या दोन दशकात वाटचाल केलेल्या चीनवर दिवाळखोर व्हायची पाळी आलेली आहे. ती व्यवस्था जपणे किंवा तिचीच डागडुजी करून चालू ठेवण्याचे प्रयास कामाचे नाहीत. हाच कोरोनाचा संदेश आहे.

आयातनिर्यात, व्यापार किंवा भांडवल यांच्या व्याख्याही नव्याने बनवाव्या लागणार आहेत. बाजारपेठ वा ग्राहकाची नवी व्याख्या होणार आहे, तसाच उत्पादक या शब्दाचा अर्थही बदलून जाणार आहे. या आर्थिक अराजकामध्ये स्वयंभूपणे उभा राहू शकेल आणि आपली लोकसंख्या व उत्पादक ग्राहक यांचे योग्य समिकरण मांडून जगासमोर उभा ठाकणार, त्यालाच पुढल्या काळात जगाचे नेतृत्व करायला मिळणार आहे. भविष्यातल्या अर्थकारणाला नवी दिशा भारतच देऊ शकेल असे जगातले अनेक अनुभवी लोक उगाच बोलत नाहीत. कारण नव्या जगातले खरेखुरे भांडवल डॉलर, रुपया वा चलनी नाणे नसेल. तर जीताजागता कष्ट उपसू शकणारा मानव समाज हे भांडवल आहे. ती लोकसंख्या भारतापाशी आहे आणि ती अपुर्‍या साधने व उपायांनिशी कोरोनाला समर्थपणे टक्कर देऊन उभी आहे. आज भारतात कोरोनाने कहर केला असे म्हटले जात असतानाही अमेरिकेपेक्षा दैनंदिन बाधितांचा येणारा आकडा कमी आहे आणि कोरोना मृत्यूचे जगातले सर्वात किमान प्रमाणही भारतातच आहे. याचा अर्थ अशा रोगट संकटाशी समर्थपणे दोन हात करण्याची जीवनशैली भारतापाशी आहे. रोगप्रतिबंधक शक्तीचा तो साक्षात्कारच आहे. एकीकडे चीनपाशी मोठी सज्ज उत्पादक व्यवस्था आहे, पण विश्वासार्हता गमावलेली आहे. दुसरीकडे जगाची निकड असलेल्या कोरोनाच्या लसीचे स्वस्त व कमाल उत्पादन वेगाने करू शकणारी क्षमता भारतापासी उपलब्ध आहे. त्यातून मिळणारी विश्वासार्हता व्यापारी पद्धतीने कुशलतेने वापरली तर जगाला जीवनावश्यक वस्तूंचा सतत पुरवठा करू शकणारी उत्पादन व्यवस्था अल्पावधीत उभी करण्याची पात्रताही भारतापाशी आहे. यांची एकत्रित गोळाबेरीज केली, तर कोरोनानंतरच्या जागतिक रचनेची कल्पना करता येईल. जिओ नामक कंपनीमध्ये मंदीच्या मोसमात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक कशाला आली, त्याचे उत्तर शोधायला गेल्यास भविष्याची चाहूल लागू शकेल.

15 comments:

  1. भाऊ, अगदी पर्फेक्ट विश्लेषण. हे अर्थशास्त्री कसले? पढतमूर्ख आहेत हे. ते रघुरामराजन राहूलसारख्या मूर्ख निकम्म्या माणसाजवळ चर्चा करतो तेंव्हाच त्यांच्या ज्ञानावर शंका येते.

    चीनच्या अँप बंदी बाबतीतही हे पढतमूर्ख असेच चुकले कारण यांचे पुस्तकी ज्ञान त्याच्याच आधारावर यांच्या उड्या असतात. चीन जरी स्वस्त वस्तूंच्या आधारे जगातील निम्मी बाजारपेठ काबीज करुध बसला असला तरी सध्या कोरोनामुळे जग बंद आहे तर चीनच्या मालाला मागणी कोठून असणार त्यात कोरोना विषाणूच्या बाबतीत WHO ला हाताशी धरुन जो घोळ घातलाय त्यामुळे चीनच्या विरोधात जगात रोष आहे हे आपल्या तज्ञांच्या लक्षात आलेच नाही. यांना तज्ञ का म्हणावे.

    ReplyDelete
  2. भाऊ खूपच सुंदर आणि नेटक्या शब्दात जागतिक चित्र उभे केले आहे.

    ReplyDelete
  3. चीनच्या डाव्या विचारसरणी ने आधी 30-40 वर्षात जगातील लोकशाही देशांना, त्यांच्याच लोकशाहीच्या नियमांचा वापर करुन कळत-नकळत पोखरले. देशाच्या एका शहरात उद्भवलेल्या कोरोनाला आटोक्यात आणले.(तसे करणे कुणालाही सहज शक्य असते.) परंतू त्याची खरी माहिती WHO ला किंवा जगाला दिली नाही.

    परिणाम हा झाला की 2020 च्या पहिल्या दोन महीन्यात जगातील विविध देशांच्या सर्वच्या सर्व शहरात एकच वेळी कोरोना पसरला. चीनचा एका शहरात असलेल्या कोरोना चा अनुभव आणि जगातील इतर देशांचा एकच वेळी अनेक शहरात सुरु होणार्या कोरोनाचा अनुभव यात त्यामुळे जमीन आसमान चा फरक आहे.
    यात चीनच्या अंदाजानुसार संपूर्णजग अशक्त झाले आहे. परंतू त्याचप्रमाणे संपुर्ण जग चीन विरुद्ध एक झालेले पण दिसते.

    सर्वकाही चीनच्या धोरणात्मक अपेक्षेनुसार होत आहे. तरी, या आपल्या विरोधात झालेल्या नवनिर्मित जागतिक एकीकरणाचा आणि त्यात दडलेल्या चीनविरोधी जागतिक रागाचा, चीनने केलेला अंदाज तेवढा फक्त चुकलेला आहे.

    ReplyDelete
  4. श्री भाऊ आजचा लेख अगदी समर्पक आहे, उदयच्या जगात भारतावर खुप मोठी जबाबदारी येणार आहे आणि मला खात्री नाही तर पूर्ण विश्वास आहे की आपण ते समर्थपणे पार पाडून दाखवू कदाचित त्यासाठी 2ते 5 वर्षांचा कालावधी लागू शकतो

    ReplyDelete
  5. जिओमधील परदेशी कंपनीची गुंतवणूक ही नेमकी कशाची निदर्शक आहे याबाबत वेगवेगळे दृष्टीकोन असू शकतात आणि ते सगळे एकांगी असण्याची शक्यता आहे.काही काळानेच चित्र स्पष्ट होईल.भारत ही आतापर्यंत तरी युरोपियन देशाना मोठी बाजारपेठ वाटत आली आहे.भारतीय लोक परदेशी विचार, तंत्रज्ञान किंवा उत्पादने यांचा स्वीकार पटकन आणि परिणामांचा विचार न करता कसा आणि किती मोठ्या प्रमाणावर करतात ते मोबाईलच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.त्यामुळे या गुंतवणुकीचा अन्वयार्थ लावताना काही काळ ' लक्ष ठेवा आणि पाहा (wait and watch)' अशी सावधगिरीची भूमिका असावी एवढाच मुद्दा .

    ReplyDelete
  6. खूप चांगला लेख..सगळी माध्यमे फक्त TRP कसा वाढेल तेंच बघत आहेत..पुढचा विचार किंवा त्यावर कृती वा चर्चा म्हणजे आत्मनिर्भर कसें व्हावे ह्यावर कोणीच बोलत नाही..

    ReplyDelete
  7. ब्लॉग आवडला.

    कालबाह्य झालेल्या अर्थव्यवस्था बदलणं हे तेवढं सोपं काम नव्हतं. तर त्या नेस्तनाबूत करण्यासाठी कोरोनाची आयतीच चालून आलेली संधी साधत आपल्या सरकारनं जाणूनबुजून काही गोष्टी देशावर लादण्याचा प्रयत्न केलाय का?
    कुमार केतकर म्हणतात तसं हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो का?
    यात चीनचा बळी घेण्याचा आंतरराष्ट्रीय कट असू शकतो का?

    ReplyDelete
  8. भाऊ, तुमची माहिती व सामग्री खुप महत्वाची आहे. या महितीचे सर्व भाषा मधे अनुवाद करुण संपूर्ण देशाशी प्रसिद्ध करा.

    ReplyDelete
  9. भाऊ, तुम्ही बरोबर सांगत आहात. पण हे सर्व घडण्या साठी भारतीय जनमानसा ने ही कंबर कसायला हवी.

    ReplyDelete
  10. भाऊ,आपले लेख चिंतनातून प्रकट होतात त्यामुळे आम्हा सामान्यांना न दिसू शकणा-या अनेक घटनांचा अर्थ आपल्या लेखांमधून आम्हाला उमजत असतात. आपण लिहित रहावे आणि आम्ही वाचत रहावे.धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  11. श्री.भाऊ तोरसेकर, अत्यन्त समर्पक विस्तृत विश्लेषण केलेलं आहे,आर्थिक पंडित चीन किती प्रगत आहे, वा त्याला टक्कर कोणी देऊ शकणार नाही अशी भलावण बरेच मराठी, भारतीय तज्ञ चीनची भलावण करतात. मी स्वतः चीन मध्ये ३,४ वर्षे शिपिंग प्रोजेक्ट साठी जात असे, त्यानी इन्फ्रास्ट्रुचर चांगले केले हे खरंच पण आपला भारत देश २०१४ नंतर पुणं बदलला आहे व अलीकडच्या लडाख प्रश्नावर जे ताडाखेबाज उत्तर तेथील रस्ते, पूल व लष्करी सामग्री ची गेले बरच वर्षे निर्माण हेच आहे. करोना संकटाला भारत समर्थ आहे.
    नमस्कार, संजय बिनीवाले, पुणे

    ReplyDelete
  12. Bhau
    Pl.write on Meghalaya ladies Police officer Brinda who fight against drug Mafia

    ReplyDelete
  13. १)लेख खूप आवडला.२)करोनाची तुलना टीबीशी थोडी करता येईल.संसर्गजन्य आहे. प्रतिबंधक लस नाही.पटकन निदानाची पध्दत नाही. मृत्यू टाळता येईल अशी औषधे नाही.३)तो युध्दासारखा चीनने पसरवला हे स्पष्ट आहे.४) यापुढे दूरतेने , उत्पादन विकेंद्रीत, ऑटोमेशन चे, लघुउद्योगाचे, जागतीकीकरण मर्यादित, बाजूला ठेवून होईल.५) धर्म नीतिनियमाची, लोकसंख्या नियंत्रणाची, आताचे खंबीर नेतृत्व, यांची आवश्यकता आहे.५) लेखात चीनची आर्थीक माहिती महत्त्वाची वाटली.यावर असेच लिहीत रहावे ही विनंती.शेअरिंग

    ReplyDelete
  14. This thought process and guidance make you stand out Bhau. Very nice analysis.

    ReplyDelete