Thursday, August 6, 2020

नसती हास्यास्पद तारांबळ

राजस्थानच्या निमीत्ताने जितकी कॉग्रेस चिंतीत झालेली नाही, त्यापेक्षा अधिक पुरोगामी पत्रकारांना धडकी भरलेली आहे. गेल्याच आठवड्यात टेलिव्हीजन जमान्यात कायम झळकत राहिलेली महिला पत्रकार संपादक बरखा दत्त हिचा एक लेख हिंदूस्तान टाईम्स दैनिकात प्रसिद्ध झाला. त्यातून तिने थेट राहुल गांधींना निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. एकतर पुढे येऊन कॉग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा स्विकारावे, किंवा ठामपणे बाजूला होऊन कुणा अन्य नेत्याने अध्यक्षपदाची धुरा संभाळण्याचा मार्ग मोकळा करावा. राजकीय विश्लेषण करताना पत्रकाराने इतके कुठल्या पक्षाविषयी अस्वस्थ वा चिंताक्रांत होण्याचे काय कारण आहे? कॉग्रेस पक्ष लागोपाठ दोन लोकसभा निवडणूकीत जवळपास नामशेष झाला आहे आणि त्याच्या नादाला लागल्याने उर्वरीत पुरोगामी वा विरोधी पक्षांची सुद्धा धुळधाण उडालेली आहे. त्याचे सर्व श्रेय राहुल गांधी यांना एकहाती द्यावेच लागेल. त्यातून कॉग्रेस पक्षालाच सावरण्य़ाची इच्छा नसेल तर अन्य कुणाला तरी पुढाकार घेऊन भाजपाला पर्याय उभा करावा लागेल. पण कॉग्रेस पक्षच विरोधात उभा राहिला पाहिजे, असा हट्ट कशाला? की बरखा दत्त वा तिच्यासारख्या अनेक पत्रकारांचे सर्व भवितव्य कॉग्रेस पक्षाशी निगडीत आहे? आणि अन्य कुठल्या पक्षाने त्याचे स्थान घेतले तर आपले भवितव्य बुडीत जाण्याच्या भयाने या लोकांना पछाडले आहे? नसेल तर कॉग्रेस वा राहुल गांधींना निर्वाणीचा इशारा देण्यामागचे अन्य कारण काय असू शकते? सचिन पायलट वा ज्योतिरादित्य शिंदे अशा तरूण पिढीच्या नेत्यांनीही पक्षविरोधी पाऊल उचलताना तसा इशारा कधी दिला नाही. मग अशा पुरोगामी पत्रकारांची घालमेल कशासाठी चालू आहे? की त्यांचे पुरोगामीत्व केवळ कॉग्रेसमध्ये त्यांच्या गुंतलेल्या हितसंबंधांशीच निगडीत आहे?

देशात जेव्हा कॉग्रेस हाच सर्वव्यापी पक्ष होता आणि त्याला कोणीही राजकीय पर्याय नव्हता. तेव्हाही पत्रकारिता चालू होती आणि असा आगह कोणी धरल्याचे ऐकीवात नाही. कॉग्रेस विरोधात अनेक वर्षे विविध विचारधारांचे पक्ष एकत्र येत राहिले. आघाड्या करून कॉग्रेसला पराभूत करण्याचे मनसुबे रचत राहिले. पण पत्रकार कधी पर्यायाच्या चिंतेने घायकुतीला आल्याचे बघायला मिळाले नव्हते. हा प्रकार १९९६ सालात प्रथमच भाजपा लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्यानंतर सुरू झाला. भाजपाला बहूमत तेव्हा किंवा २०१४ पर्यंत मिळू शकलेले नव्हते. पण त्याला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी धडपडणारी पत्रकारिता त्यानंतरच्या काळात उदयास आली. पण तिनेच नरेंद्र मोदी हा नवा पर्याय उभा करून दिला, ही वस्तुस्थिती आहे. पण केवळ एका गुजरात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केल्याने नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत किंवा भाजपा बहूमतापर्यंत पोहोचलेला नाही. त्यासाठी त्या पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व त्यांचा पाठीराखा असलेल्या रा, स्व. संघाने पद्धतशीरपणे दिर्घकाळ प्रयत्न केले होते आणि मेहनतही घेतलेली होती. १९६७ सालात विविध पक्षांच्या संयुक्त विधायक दल अशा आघाडीचा प्रयोग कॉग्रेसला पर्याय म्हणूनच सुरू झाला होता. १९७७ सालात त्याचेच रुपांतर जनता पक्षात झाले. मात्र अशा प्रत्येक प्रयत्नात विविध पक्षांच्या नेत्यांचे अहंकार आडवे येऊन कॉग्रेसला पर्याय उभा राहू शकला नाही. उलट त्यातून मतदाराचा मात्र भ्रमनिरास होत गेला. त्यामुळेच एक विचारधारा व एकच संघटना असलेला एक विरोधी पक्ष मेहनतीने उभा करण्याचा चंग भाजपाच्या नेतृत्वाने बांधला. त्यातून आजचा भाजपा कॉग्रेसला पर्याय म्हणून उभा राहिलेला आहे. तो झटपट टु मिनीट्स नुडल सारखा नाही. त्यामागे योजना, मेहनत व भूमिका होती. त्याचे भान अशा पत्रकारांना अजून आलेले नाही.

मुद्दा भाजपाला पर्याय असावा असा आहे. तो पर्याय फ़क्त कॉग्रेसच असला पाहिजे असा हट्ट कामाचा नाही. तसे बघायला गेल्यास मतदारानेही तथाकथित पुरोगामी मानल्या जाणार्‍या पक्षांनाच कॉग्रेसचा पर्याय म्हणून पुढे यायला मदत केलेली होती. जनता पक्ष, जनता दल हे पुरोगामी बाजूला झुकलेले पक्ष व संघटना होत्या. पण त्यांना कॉग्रेस पक्षाला पर्याय होण्यापेक्षा एकमेकांनाच पर्याय होण्याची घाई झालेली होती आणि त्यात मतदाराचा पुर्ण भ्रमनिरास होऊन गेला. त्यामुळे त्यापासून अलिप्त राहून निवडणूकीपुरती इतरांशी तडजोड करीत आपले बळ वाढवणारा भाजपा लोकांना विश्वासार्ह वाटत गेला. तोच कॉग्रेसला पर्याय होऊ शकतो अशी खात्री पटत गेली. त्यातूनच आजचा भाजपा एकपक्षीय बहूमतापर्यंत पोहोचला आहे. त्या मतदाराने कॉग्रेसला नाकारण्याआधी राजकारण पुरोगामीच वा सेक्युलर असावे, ही भूमिका नाकारलेली होती आणि म्हणूनच हिंदूत्वाचे कितीही शिक्के मारून भाजपाला इथली माध्यमेही रोखू शकली नाहीत. पण याचा अर्थ मतदाराचा कल वा कौल फ़क्त हिंदूत्वाला आहे असेही नाही. त्याला उत्तम कारभार देऊ शकणारा सत्ताधारी पक्ष आणि त्याला कामासाठी धारेवर धरणारा भक्कम विरोधी पक्ष हवा आहे. तो पुरोगामी वा कॉग्रेसच असला पाहिजे असा हट्ट बिलकुल नाही. म्हणून हे पुरोगामी पत्रकार आपल्याच जाळ्यात फ़सलेले आहेत. त्यांनी उध्वस्त कॉग्रेसचा जिर्णोद्धार करण्याचा हव्यास सोडून अन्य कुठल्याही पुरोगामी पक्षाला देशव्यापी पर्याय म्हणून उभा करण्यासाठी थोडे कष्ट घेतले, तरी चांगला पर्यायी पक्ष अस्तित्वात येऊ शकेल. उदाहरणार्थ जुन्या समाजवादी विचारसरणीचे वा उदारमतवादी म्हणवून घेणारे अनेक नेते व त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित झालेले प्रादेशिक पक्ष अर्धाडझन आहेत. त्यांच्या एकत्रीकरणानेही कॉग्रेसपेक्षा चांगला पक्ष उभा करता येणे शक्य आहे.

खरे तर २०१४ पुर्वी तसा प्रयत्नही झाला होता. मुलायम सिंग, लालू, देवेगौडा, इत्यादी नेते एकत्र आले आणि त्यांनी नव्याने जनता दलाचे पुनर्वसन करण्याची भूमिका मांडलेली होती. त्याविषयी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुलायमना दिलेले होते. पण त्यावेळी त्यांचा पक्ष उत्तरप्रदेशात सत्तेत होता आणि तोच त्या भूमिकेतला सर्वात मोठा राजकीय गट होता. त्यात अन्य कोणी भागिदार नको या संकुचित विचाराने मुलायम टाळाटाळ करीत राहिले आणि तो विषय तिथेच गतप्राण होऊन गेला. अन्यथा निदान पाचसहा राज्यात ज्याची चांगली शक्ती संघटना आहे, असा तिसरा देशव्यापी पक्ष आकाराला येऊ शकला असता. आज कॉग्रेसपेक्षा तोच भाजपाला पर्याय होऊ शकेल अशी राजकीय शक्ती ठरली असती. किंबहूना आजही तशी शक्यता जरूर आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०१४ मध्ये ३१ टक्के व २०१९ सालात ३७ टक्केच मते मिळवलेली आहेत. भाजपाच्या आघाडीला मिळालेली मते ४३ टक्के व ४७ टक्के इतकी आहेत. म्हणजेच बाकी ५७ किंवा ५३ टक्के मते विरोधातच आहेत वा होती. त्यांना एकत्र करण्याच्या प्रक्रीयेने भाजपाला व मोदींना पर्याय उभा राहू शकतो. पण त्यासाठी कष्ट करावे लागतात. लेख लिहून वा सेमिनार भरवून पुख्खा झोडल्याने राजकीय पर्याय उभे रहात नाहीत. सहाजिकच मग उपलब्ध असलेला जवळचा पर्याय म्हणून कॉग्रेसकडे वळावे लागते. एकगठ्ठा १५-१६ टक्के मते कॉग्रेस आजही मिळवते, म्हणून अशा पुरोगाम्यांना तोच एकमात्र पर्याय आहे असे वाटते. कॉग्रेसही त्यांना गाजर दाखवून भुलवित असते. पण जितके हे पुरोगामी पत्रकार विचारवंत आयतोबा आहेत, तितकेच कॉग्रेस नेतेही आयत्या बिळावर नागोबा व्हायला उतावळे असल्यावर पर्याय कुठून उभा रहायचा? मग त्याचाच त्रागा होऊन कधी राहुल तर कधी सोनियांना इशारे देण्याचा खुळेपणा चालू असतो.

 

7 comments:

  1. खुप छान analysis केल आहे. सहमत आहे

    ReplyDelete
  2. भाऊ, तुमचे म्हणणे पटले की, भाजपालासुद्धा पर्याय हवाय पण तो केवळ पुरोगामी नको बुवा कारण, महाराष्ट्रात सध्या बघतोयच परत अल्पसंख्य लांगूलचालन सुरु आणि भ्रष्टाचार तर पाचवीला पूजलेला.

    ReplyDelete
  3. राजकीय पक्षांनी काय करावे याचा उपदेश करायच्या ऐवजी सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन एकच वर्तमानपत्र काढावे. त्याचा प्रचंड खप होईल.

    ReplyDelete
  4. काय भाऊ हल्ली लेख कमी लिहिता , video जास्त करता. खरंतर video पेक्षा तुमचे लेख वाचायला जास्त आवडतात.

    ReplyDelete
  5. नमस्कार भाऊ, ९ आँगस्ट २०२० सकाळ पेपर मध्ये दौलत बेग ओल्डी हा चीन चार भूभाग असल्याचे सांगितले आहे. लिंक देतो इथे. https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel_ipad.aspx?currPage=1#currPage=1

    ReplyDelete
  6. नमस्कार श्री. भाऊ

    वीडियो मुळे लेख कमी होत आहेत. लेख सुद्धा लिहा ही विनंती. कारण लेख पटकन वाचुन काढता येतो. तुमच इतक्या वर्षांचा प्रदिर्घ अनुभव आहे त्यातुन आम्हाला खुप ज्ञान मिळते. मराठी सोबत हिन्दी/ इन्ग्रजी मध्ये सुद्धा वीडियो/लेख बनवण्याचा विचार व्हावा ज्या योगे तुम्ही खुप मोठ्या जनसन्ख्येपर्यंत पोचाल. परखड पत्रकारिता दुर्मीळ होत असताना तुमचे विचार सगळ्या भारतीयांपर्यंत पोचावेत ह्यासाठी ही सुचना. अवश्य विचार व्हावा.
    श्रीमती स्वाती जी आम्हाला ग्लोबल स्तरावरचे चढ उतार समजावून सान्गतात. त्याचेही प्रमाण वाढले तर खुप छान होईल. याची आज खुप गरज आहे.

    धन्यवाद

    ReplyDelete
  7. Respected Sir, I have watched O.P.chaudhary's talk shows with you. Your command over hindi is quite enough to do analysis of matters n news having national importance, therefore we viewers request you to do analysis on own YouTube chennel devote to above mentioned matters.If you do so it will be gamechanger because your analytical and explaining skill is outstanding. I can't praise your skill n journalism in words. So please bhau launch a hindi youtube channel. 🚩🚩🚩🙏🙏🙏

    ReplyDelete