Sunday, August 17, 2014

जातीयवादी एकलव्य आणि सेक्युलर द्रोणाचार्य



शीर्षक वाचले तरी अनेकांच्या भुवया कपाळात घुसणार याची खात्री आहे. किंबहूना म्हणूनच असा उपरोधिक मथळा दिलेला आहे. कारण त्यातला संदर्भ खुप नेमका व तितकाच सूचक आहे. ज्या द्रोणाचार्यांनी कुरू वंशातील उच्चवर्णिय राजकुमारांना ज्ञानदान केले, पण कनिष्ठ जातीचा म्हणून एकलव्याला शिकवायचेच नाकारले होते, त्यावर हल्लीच्या जमान्यातही चर्चा होत असते. जातीभेद वा जातीवर्चस्व दाखवण्यासाठी एक संदर्भ म्हणून त्या गोष्टीचा उदारमतवादी वा सेक्युलर मंडळी आग्रहाने वापर करीत असतात. पण त्यापासून जो बोध इतरेजनांना द्यायचा त्यांचा प्रयास असतो, तो बोध त्यापैकी किती पुरोगामी स्वत: घेतात, यावर मात्र प्रश्नचिन्हच लागलेले असते. द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिकवायचे नाकारले, हा तर सामाजिक भेदभाव होताच. पण ज्याला आपण शिकवलेही नाही, त्याच्याकडे पुन्हा गुरूदक्षिणा मागून त्याची घोर फ़सवणूक केली, असाही एक घटक ही पुराणकथा सांगण्यामागे असतो. त्यातला अन्यायच सूचित करायचा असेल आणि तसा अन्याय झुगारण्याची आकांक्षाच असेल, तर मग आपण द्रोणाचार्य होऊ नये, याचीही काळजी अशा पुरोगामी लोकांनी घ्यायला हवी ना? म्हणजे आपणही अशीच कुणाची फ़सवणूक व शोषण करू नये, इतकी अपेक्षा अशा पुरोगामी पंडितांकडून करणे गैर ठरेल काय? कुठली गुरूदक्षिणा द्रोणाचार्यांनी मागितली होती? आपला लाडका शिष्य अर्जुनापेक्षा जगात कोणी उत्तम धनुर्धर शिल्लक राहू नये, म्हणून त्यांनी एकलव्याकडे अंगठा कापून मागितला होता. धनुर्धराने अंगठा कापणे म्हणजे आपल्यातला धनुर्धरच मारून टाकणे होय. थोडक्यात एकलव्याने आपली गुणवत्ता कौशल्यच बळी द्यावे; अशी ती मागणी होती. आणि कशाच्या बदल्यात अशी मागणी केली? जे कार्य गुरू म्हणून केलेच नाही, त्याची किंमत म्हणून केलेली ती मागणी होती.

स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी भाषण केले वा आपल्या धोरणांचे विवेचन केले. त्यासंदर्भात ज्या चर्चा चालू आहेत, त्याकडे बघितले मग मोदींकडून अपेक्षा बाळगणारे त्याच ‘लबाड’ द्रोणाचार्याचे वंशज वाटतात. कारण यात बहुतांश मोदींच्या विरोधात अखंड अपप्रचार केलेले किंवा त्यांच्या अपयशाचीच मनोमन प्रार्थना करणार्‍यांचा समावेश आहे. मात्र त्याउप्परही मोदी यशस्वी झाल्यानंतर ही मंडळी त्याच मोदींकडून ‘अपेक्षा’ व्यक्त करत सुटली आहेत. हा माणूस पंतप्रधान होऊ नये व त्याच्या हाती सत्तासुत्रेच जाऊ नयेत, यासाठी तुम्ही प्रयत्नशील होता, त्याच्यापासून तुम्ही कुठल्या तोंडाने अपेक्षा बाळगू शकता? त्या अपेक्षा बाळगणे म्हणजे द्रोणाचार्याने मानभावीपणे एकलव्याकडून गुरूदक्षिणाच मागण्यासारखे नाही काय? स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मोदींनी भगवा फ़ेटा कशाला परिधान केला? तो करायला नको होता. त्यांनी धार्मिक दंगे या विषयावर अमूक बोलायला नको होते. त्यांनी नेहरूंचे वा आणखी कोणाचे नाव घ्यायला हवे होते. नियोजन आयोगाला तिलांजली देऊन समाजावादाला गाडायला नको. शेकडो तक्रारी वा अपेक्षा आहेत. पण हे सर्व मोदींनी कशाला करायला करायला हवे? त्यांच्याकडून अपेक्षा बाळगताच कशाला? ज्याच्यामुळे देशाचा विनाश होईल, अशा शापवाणी उच्चारण्यातच ज्यांचे आयुष्य गेले, त्यांनी त्याच विनाशपुरूषाकडे कसलीही अपेक्षा बाळगणेच गैर नाही काय? किंबहूना त्यांना असा अधिकार दिलाच कोणी? ज्या द्रोणाचार्याच्या नावाने अहोरात्र विषमतेचे पांडित्य ही मंडळी सांगतात, त्यांनी स्वत:च त्याचे ‘निषेधार्ह’ अनुकरण करावे काय? ज्यांनी मोदींच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या किंवा सहाय्य केले, त्यांचे अपेक्षा बाळगणे समजू शकते. पण ज्यांनी मोदींना शापच दिले, त्यांनीच मोदींकडून हक्काने अपेक्षा बाळगणे किंवा अपेक्षाभंग झाल्याच्या तक्रारी करणे शुद्ध मानभावीपणा नव्हे काय?

मोदी म्हणजे हिंदूत्ववादी आणि त्यांनी पंतप्रधान झाल्यावर मात्र आपल्या हिंदूत्ववादाला तिलांजली दिली पाहिजे. किती अजब अपेक्षा आहे ना? याचा साधासरळ अर्थ असा, की मोदींनी ज्या बळावर इतके मोठे यश मिळवून अजिंक्य होऊन दाखवले, तो अंगठाच या सेक्युलर द्रोणाचार्यांना कापून हवा आहे. त्यांच्या अपेक्षा मोदी पुर्ण करायला गेलेच तर काय होईल? ज्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या बळावर मोदींनी इतके मोठे यश संपादन केले आहे, तोच तर मोदींचा ‘अंगठा’ आहे. आता मोदीं अपुर्व धनुर्धर झालेच आहेत, तर त्यांना आपला शिष्य म्हणून मान्यता द्यायला हे भंपक द्रोणाचार्य पुढे सरसावले आहेत. मात्र त्याच्या बदल्यात मोदींनी आपले सर्वस्व यांच्या पायावर अर्पण करून आत्मघात करावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र हा नवा एकलव्य असल्या द्रोणाचार्यांना चांगला ओळखून आहे. म्हणूनच तो त्यांना अंगठा कापून देण्यापेक्षा ‘अंगठा’ दाखवतो आहे. सहाजिकच अशा पाखंडी आचार्यांचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे मग लालकिल्ला येथील भाषणातले दोष दाखवण्याची स्पर्धा चालली आहे. कारण हा एकविसाव्या शतकातला एकलव्य नुसता अंगठा दाखवून थांबलेला नाही, तर सेक्युलर पाखंडाला उखडून टाकत पुढे पुढेच सरसावतो आहे. त्याने सेक्युलर पाखंड व दांभिकतेची पाळेमुळेच खणून काढायची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे ही सेक्युलर आचार्य मंडळी कमालीची विचलीत होऊन गेली आहे. कालबाह्य व निरूपयोगी ठरलेल्या नियोजन आयोगाला यापुर्वीच बरखास्त करायला हवे होते. पण ते काम हाती घेण्याचा इशारा मोदींनी आपल्या भाषणातून देताच, या सेक्युलर वर्चस्ववाद्यांची तारांबळ उडाली आहे. त्यातून त्यांना नेहरूवादाचा खात्मा होताना दिसू लागला आहे. समाजवाद गाडला जाण्याच्या भितीने पछाडले आहे. त्यामुळेच मग अच्छे दिन कधी येणार, कुठे आहेत, असले शेलके सवाल इतक्या लौकरच विचारले जात आहेत.

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी झाली, त्याला स्वातंत्र्यदिनी नेमके तीन महिने पुर्ण झाले. त्याच दिवशी देशातले सत्तांतर झालेले नसले तरी तथाकथित सेक्युलर सत्तेची गुढी उतरण्यावर शिक्कामोर्तब १६ मे रोजी झाले होते. त्यानंतर गेल्या तीन महिन्यात काय काय झाले? मोदी सरकारने काय केले, असे सवाल करणार्‍यांना खरेच किती व कोणता बदल झाला, हे जाणून घ्यायची इच्छा आहे काय? तशी प्रामाणिक इच्छा असती, तर त्यांनाही कोणते व कुठे बदल होत आहेत, ते बघता आले असते व दिसले असते. किंबहूना त्यांनाही नेमके कोणते बदल होत आहेत, त्याची पुर्ण जाणिव आहे. पण हे बदल नेमके त्यांच्याच पाखंडी दांभिकतेवर आघात करणारे असल्याने त्याविषयीची माहिती दडपली वा लपवली जात आहे. देशातली महागाई, भ्रष्टाचार वा गैरकारभार यांना रोखण्यासाठी मूलभूत पावले उचलली गेली आहेत, त्याबद्दल माहिती द्यायची कोणी? माध्यमांनीच ती दिली पाहिजे ना? पण ती माहिती दडपून हेच द्रोणाचार्य नसते सवाल विचारून लोकांनी दिशाभूल करण्यात कशाला गर्क आहेत. आपले कर्तव्य विसरून मोदींना त्यांच्या कर्तव्याचे डोस पाजायचा कांगावा चालू आहे. कारण हेच सेक्युलर पाखंडी लोक भ्रष्टाचारावर पोसलेले आहेत आणि त्यांच्यावरच नव्या सरकारच्या कारवाईचा घाला आलेला आहे. त्याविषयीच्या बातम्या देणार तरी कशा? त्यापेक्षा मग एकलव्य दगाबाज निघाला आणि तो गुरूदक्षिणा देत नसल्याचा गदारोळ केला जात आहे. असले द्रोणाचार्य किती भंपक असतात, त्याचा एक नमूना योंगेंद्र यादव आणि राजदीप सरदेसाई अशा दोन बुद्धीमंतांच्या प्रतिक्रियेतून मिळू शकतो. सरदेसाई म्हणतात, मोदींनी मोठ्या संकल्पना मांडल्या, पण अंमलबजावणी कधी व्हायची? तर त्याच भाषणावर यादव म्हणतात, उस्फ़ुर्त भाषण मस्तच, पण त्यात मोठ्या संकल्पनांचा दुष्काळ होता. ही असल्या भंपक विद्वानांची ‘एकवाक्यता’. एकाच भाषणात एकाला भव्य संकल्पना दिसते आणि दुसर्‍याला संकल्पनांचा दुष्काळ आढळतो. वास्तवात मोदींनी सत्ता हाती येताच यांची भ्रष्ट पाळेमुळे खणायला घेतली आहेत. कशी ते उद्या तपासू या.

Friday, August 15, 2014

१६ ऑगस्टच्या जखमेवरची खपली



आज १६ ऑगस्ट २०१४, बरोबर तीन वर्षापुर्वी आज सकाळपासून किती धमाल उडालेली होती. त्याच्या आदल्या दिवशी स्वातंत्र्यदिन म्हणून लालकिल्ल्यावरील पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे भाषण जितके गाजले नव्हते, त्याच्यापेक्षा दुसर्‍या दिवशी त्याच राजधानी दिल्लीत जनलोकपाल कायद्याची मागणी करणारे अण्णा हजारे काय करणार, याची उत्सुकता देशवासियांना होती. त्यामुळेच काल जशी पंतप्रधान मोदींच्या भाषणाची अपरात्रीपर्यत चर्चा चालू होती, तशी तीन वर्षापुर्वीची परिस्थिती नव्हती. उलट मनमोहन सिंग यांचे भाषण विसरून लोक व वाहिन्यांचे पत्रकार अण्णांच्या मागे होते. त्यामुळेच दुपार उलटताच सगळे कॅमेरे अण्णा टिमवरच रोखलेले होते. स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी अण्णांनी अचानक राजघाटचा रस्ता धरला आणि सगळे पत्रकार तिकडे धावले. तिथे पोहोचलेले अण्णा व त्यांचे जनलोकपाल सहकारी महात्माजींच्या समाधीसमोर मौन धारण करून तासभर तरी बसून होते. समोर एकटेच अण्णा व त्यांच्या मागे पाच पावलावर ‘मै अण्णा हू’ अशी टोपी धारण केलेले मनिष शिसोदिया बसलेले होते. अण्णांच्या हालचालीवर शिसोदियांचे बारीक लक्ष होते. बाकीची गर्दी त्यांच्याही मागे पाचदहा पावलावर पसरली होती. राजघाटावर पुर्ण शांतता होती. पण आपल्या घरात पोहोचणार्‍या चित्रासोबत वाहिन्यांच्या बातमीदारांचा गोंगाट यथेच्छ चालू होता. मग अकस्मात अण्णा तिथून उठले आणि गर्दी पांगली. पण रात्री लोक झोपले तोपर्यंत स्वातंत्र्यदिन विसरून सर्वत्र अण्णा व त्यांची टिम उद्या काय करणार, अशीच कुजबुज चालू होती.

सकाळ उजाडली तीच मुळी अण्णा जिथे मुक्कामाला होते तिथे पोलिस येऊन पोहोचल्याची बातमी घेऊन. स्वातंत्र्यदिनाच्या दुसर्‍या दिवशी रामलिला मैदानावर अण्णा टिमने जनलोकपाल कायद्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती आणि त्याला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती. तरीही अण्णा तिथेच उपोषणाचा हट्ट धरून बसले होते. त्यातून उदभवणारी परिस्थिती टाळण्यासाठी पोलिसांनी अण्णांना ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. अण्णांप्रमाणेच त्यांच्या टीमच्या इतर सहकार्‍यांनाही पोलिसांनी उचलले होते. त्यांच्यात कुठला संपर्क होऊ नये अशीही काळजी घेतली होती. त्या घटनेने इतकी उत्कंठा देशभर निर्माण केली, की क्षणोक्षणी सरकणार्‍या घटनाक्रमाचे विविध ठिकाणाहून अथक प्रक्षेपण सुरू झाले होते. आधी अण्णांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तिथून मग सुरक्षेच्या कारणास्तव तिहार तुरूंगात आणले गेले. त्यामुळे दिल्लीत एकूणच काहूर माजले. अण्णांच्या उपोषणाने वा आंदोलनाने जितके दिल्लीचे जनजीवन विस्कळीत होऊ शकले नसते, त्याच्या अनेकपटीने पोलिस व सरकारी धोरणाने दिल्लीत अराजक व अनागोंदी माजली. कारण अण्णांच्या अटकेने जनमत क्षुब्ध झाले. हजारो लोक अण्णांना पाठींबा द्यायला रस्त्यावर उतरले. ज्या तिहारमध्ये अण्णांना ठेवलेले होते, तिथे लोकांचा लोंढाच येऊ लागला. आरंभी त्यातल्या काहींना अटक करण्यात आली, त्या गर्दीला एका स्टेडीयममध्येच डांबण्यात आले. त्यातच दिवस मावळायला आला आणि अखेरीस सरकारची तारांबळ उडाली. तेव्हा अण्णांना मुक्त करायचा निर्णय घेतला गेला. पण अण्णांनी तुरूंगाच्या बाहेर पडायलाच नकार दिला. रामलिला मैदानावर जायची परवानगी नसेल आणि तिथे गेल्यावर पुन्हा अटक होणार असेल, तर तिहारलाच आणले जाणार ना? मग तिहार सोडूच कशाला, अशी अण्णांची भूमिका होती. त्यातून मग तिथल्या तुरूंगाधिकार्‍याची कोंडी झाली. आपल्या कार्यालयातच त्याला उपोषणकर्त्या अण्णांची व्यवस्था लावावी लागली होती. पुढे दुसर्‍या दिवशी सरकारी खर्चाने व पोलिसांच्या पुढाकाराने रामलिला मैदानावर अण्णांची व्यवस्था लावली गेली. तेरा दिवस मग तिथून थेट प्रक्षेपणाचा ‘पिपली लाईव्ह’ नावाचा सिनेमा लोक घरबसल्या बघत होते.

तीन वर्षे होत आली त्या घटनेला आणि आपण सर्वकाही विसरून गेलोत. आपणच कशाला त्या आंदोलनाचे म्होरके नेते अरविंद केजरीवाल, मनोज शिसोदिया, शांती भूषण, प्रशांत भूषण वा कुमार विश्वास अशा कुणालाच आज जनलोकपाल आठवतही नाही. केजरीवाल तर भ्रष्ट राजकारणाच्या चिखलात उतरून इतके माखले आहेत, की त्यांना निवडणूकीखेरीज कशाचेच स्मरण उरलेले नाही. अण्णा पदरात पडलेल्या जनलोकपाल कायद्याने समाधानी आहेत आणि त्याच कायद्याला ज्योकपाल म्हणणारे ‘केजरी’वाले दिल्लीची सत्ता पुन्हा कशी मिळवायची त्या विवंचनेत गुंग आहेत. दरम्यान तेव्हा लाईव्ह ‘रामलिला’ रंगवणारे आशुतोष यांच्यासारखे अनेकजण राजकारणात आलेत आणि अण्णांसह शांतीभूषण यांनाही दूषणे देण्यात गर्क आहेत. ती चळवळ व आंदोलन गुंडाळले गेल्यावर त्यात उडी घेऊन राजकीय पक्ष स्थापन करताना त्यात आलेले योगेंद्र यादव यांच्यासारखे स्वयंभू नेते देशाच्या विभिन्न समस्यांवर बहुमोल मतप्रदर्शन करणारे चिंतक बनलेले आहेत. तीन वर्षापुर्वी अण्णा टिम म्हणून आपण देशाच्या स्वातंत्र्यदिनालाही झाकोळून टाकले होते, याचे स्मरण त्यापैकी कोणालाच आज उरलेले नाही. अण्णांचा कल्याणशिष्य भासवणारे मनिष शिसोदिया आता तितक्याच अगत्याने केजरीवाल यांच्या मागेमागे फ़िरत असतात. एखादी घटना वा प्रसंग तेव्हा किती मोठा व ऐतिहासिक भासतो ना? पण काळाच्या ओघात असा प्रसंग कुठल्या कुठे विस्मृतीत लुप्त होऊन जातो, त्याचा हा ताजा नमूना. विवाह समारंभात वा लग्नमंडपात सर्वांचे लक्ष वधूवरांनी आपल्याकडे आकर्षित केलेले असते. पण आठवडाभरात तेच नवदांपत्य दुसर्‍या कुणा आप्तस्वकीयांच्या विवाह समारंभाला हजेरी लावते, तेव्हा त्यांच्याकडे कोणी ढुंकून बघत नसते, तसाच हा प्रकार नाही काय? अवघ्या तीन वर्षापुर्वी तिरंगा घेऊन जागोजागी फ़डकवणारे अण्णा टिमचे तेच म्होरके नेते आज कुठे आहेत? ‘मै हू अण्णा’ म्हणून मिरवणार्‍या त्या टोप्या कुठे आहेत?

आज १६ ऑगस्ट आहे आणि तीन वर्षापुर्वीच्या त्या सनसनाटी वा ऐतिहासिक घटनाक्रमाचे साधे स्मरणही कोणाला होऊ नये, ही जनलोकपाल आंदोलनाची शोकांतिका म्हणावी काय? कारण आता त्यातले म्होरके व सहकारी अनेक गटात विखुरले आहेत. त्यात उडी घेताना आपल्या भवितव्यालाही लाथा मारणारे शेकडो तरूण कुठल्या कुठे गायब होऊन गेलेत? राजकीय वा सामाजिक चळवळ आणि आंदोलन यांच्यामागे वैचारिक वा संघटनात्मक पाया नसेल, तर त्यातून एक तात्कालीन उद्रेक निर्माण होतो, पण साध्य काहीच होत नाही. जखमेच्या खपलीसारख्या त्याच्या आठवणी तेवढ्या शिल्लक उरतात. एकच वर्षापुर्वी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या पाक सीमेवर लालकिल्ला देखावा म्हणून उभा करून भाषण केले होते आणि आता खर्‍या लालकिल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून भाषण केले. गतवर्षी देखावा उभा केल्यामुळे मोदींची यथेच्छ टिंगल झाली होती. आज ती टिंगल त्याच टवाळखोरांना आठवत नाही. तीन वर्षापुर्वी अण्णा टिमचे अवास्तव कौतुक करणार्‍यांना त्यातले काही आठवत नाही. म्हणून तर काळाला सर्वात निस्पृह न्यायाधीश म्हणतात.

बौद्धिक कुपोषणाचे पुरोगामी बळी



माओवादी वा नक्षलवादी हे शब्द आता सरसकट वापरले जातात. चार दशकापुर्वी ही काहीतरी दूर्गम भागार्तली भानगड आहे, असा लोकांचा समज होता. १९६७ सालात नऊ राज्यात कॉग्रेसने सत्ता गमावली आणि तिथे विविध विरोधी पक्षांच्या जुळवलेल्या आघाड्यांची सरकारे आली. तेव्हा प्रथम बंगालमध्ये असेच संयुक्त विधायक दलाचे सरकार आलेले होते. त्यात मार्क्सवादी गट मोठा असला, तरी आघाडीचे समिकरण जमवण्यासाठी बंगला कॉग्रेस नामक फ़ुटीर कॉग्रेस गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून स्विकारावे लागले होते. तर मार्क्सवाद्यांचे ज्योती बसू त्यात उपमुख्यमंत्री होते. वर्षभरातच हे सरकार कोसळले आणि तिथे मध्यावधी निवडणूका घ्याव्या लागल्या होत्या. त्यामुळे राजकीय समस्या सुटली नाही आणि पुन्हा एकमेकांच्या विरोधात लढलेल्या त्याच बिगर कॉग्रेसी पक्षांना एकत्र येऊन आघाडी सरकारच बनवावे लागले होते. मात्र अशा पद्धतीने सत्ता राबवताना मार्क्सवादी पक्षात मोठी उलथापालथ होऊन गेली होती. विरोधातले राजकारण करताना इन्किलाब झिंदाबादच्या घोषणा देणार्‍या डाव्यांना सत्ता हाती आल्यावरही राज्यघटनेच्या चौकटीतच आपली लालक्रांती बंदिस्त करावी लागली होती. त्यामुळे अशा कम्युनिझमने निराश हताश झालेला एक छोटासा गट बाजूला झाला. त्याने मार्क्सवादी लेनिनवादी असे नाव धारण केले होते. त्याने आपल्याच सहकारी कम्युनिस्टांच्या राज्यसरकारला आव्हान उभे केले. सशस्त्र क्रांतीचा पुकारा करून त्यांनी नक्षलबाडी या गावात बंडाचा झेंडा उभा केला. त्यातून मग नक्षलबाडीचे हिंसक तत्व मानणार्‍यांना नक्षलवादी संबोधले जाऊ लागले. त्या क्रांतीकारी गटाचे नेतृत्व भूमिगत राहून करणार्‍या नेत्याचे नाव होते, कॉम्रेड चारू मुजूमदार. त्याच्याखेरीज तेव्हा त्या चळवळीत पुढे असलेली मोजकी नावे होती, जंगल संथाळ, कोंडापल्ली सीतारामय्या, इत्यादी.

ह्यातला मुजूमदार किरकोळ व नाजूक प्रकृतीचा नेता होता. त्याच्या मागावर कायम पोलिस असायचे. त्यामुळे भूमिगत असूनही त्याला सतत वास्तव्याच्या जागा बदलाव्या लागत होत्या. १९७० च्या दशकात केव्हातरी हा फ़रारी नक्षलवादी नेता पोलिसांच्या हाती लागला, तेव्हा अनेकांना धक्काच बसला होता. कायम आजारी व हृदयविकाराचा रोगी असून तो भूमिगत जीवन जगत होता. त्याच्यासोबत कायम आरोग्याची काळजी घेणारी शुश्रूषा सेविका व औषधांचे साहित्य असायचे. त्यामुळे अटक झाली तरी त्याला तुरूंगात डांबणे अशक्य होते. अटकेनंतर त्याला म्हणे थेट इस्पितळात दाखल करावे लागले होते. दुर्दैव कसे असते बघा. अनेक वर्षे व दिवस सतत विपरित परिस्थितीशी झुंजत परागंदा भूमिगत अवस्थेत जगलेल्या या नेत्याला इस्पितळात तेव्हाची आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र कष्टाची व धावपळीची सवत जडलेल्या त्याच्या शरीराला ती चैन मानवली नाही. अटक होऊन सुखरूप आरोग्यसेवेत ठेवलेल्या कॉम्रेड मुजूमदार यांनी अवघ्या आठवड्याभरात इहलोकीची यात्रा संपवली. कुणालाही थक्क करून सोडणारीच ही बाब आहे. ज्याची प्रकृती नाजूक होती आणि खरेच त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाणे आवश्यक होते, त्याला तीच सोसली नाही. त्याच आरोग्यसेवेच्या सुविधांनी त्यांचा बळी घेतला होता काय?

कधीकधी सुखदायी वाटणार्‍या गोष्टी कष्ट उपसणार्‍या देहाला सोसत नसतात. अपायकारक ठरू शकतात. आपल्या देशातील राजकीय अभ्यासक विचारवंत यांची काहीशी अशीच अवस्था गेल्या काही वर्षात झाली आहे. त्यांचे गैरलागू गोष्टी व चुकीच्या अनुभवाने इतके कुपोषण झालेले आहे, की वैचारिक सकस खाद्य मिळाले तर त्यांना तेच अपायकारक वाटू लागते. नाकर्ते सरकार व राज्यकर्ते यांच्या नालायकीला झाकण्यासाठी सातत्याने सेक्युलॅरिझम वा पुरोगामी पाखंड जोजवत बसायची अशी घातक सवय या लोकांना जडली आहे, की काम करणारा निर्णय घेणारा राज्यकर्ता बघून त्यांचा जीव घाबराघुबरा होऊन गेला आहे. तब्बल तीन दशकांनी एक पंतप्रधान जाहिर सभेत बुलेटप्रूफ़ कवच नाकारतो किंवा विकास कार्यात जनतेला सहभागी करून घेण्याची शुद्ध निखळ लोकशाही भूमिका मांडतो, तर या शहाण्यांना त्यात घातक हुकूमशहा दिसू लागतो. इतकी वर्षे सत्ता उबवणारे राज्यकर्ते कुठलीही योजना यशस्वीरित्या राबवू शकले नाहीत, पण मोठमोठ्या योजनांच्या थापा मारत होते. त्याबद्दल याच लोकांना किती कौतुक होते ना? नरेंद्र मोदी नावाचा पंतप्रधान असल्या भव्यदिव्य योजनांचे बुडबुडे उडवण्यापेक्षा सामान्य जनतेलाही साध्य करणे शक्य आहे, अशा काही कल्पना मांडतो, तर त्याच शहाण्यांना त्यात निरर्थकतेचा धोका दिसू लागला आहे. बौद्धिक कुपोषणाचेच हे परिणाम नाहीत काय?

पंतप्रधान म्हणून मोदींनी काय काय बोलयला हवे होते, याची मोठी यादीच असे लोक नंतर वाचत होते. सवाल इतकाच, की जगातल्या आणि देशातल्या सर्वच प्रश्नांचा व विषयांचा उहापोह पंतप्रधानाने त्या एकाच भाषणातून करायचा असतो काय? स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना कुठल्या मुद्दे व विषयांना पंतप्रधानाने स्पर्श करावा आणि कुठले विषय टाळावे? मुळात असे देशाला उद्देशून करायचे भाषण जनतेला स्फ़ुर्ती देणारे व आशा जागवणारे हवे. तोच त्यामागचा हेतू असतो. बौद्धिक खाद्य म्हणून शहाण्यांना चर्चांचे फ़ड गाजवायला खुराक म्हणून असे भाषण योजलेले नसते. किंबहूना सामान्य जनतेला धीर देणारे व प्रोत्साहित करणारे शब्द त्यात असावेत अशीच अपेक्षा असते. म्हणूनच आपल्या बौद्धिक भुक व भिकेचा वाडगा घेऊन त्या भाषणाच्या दारात उभे रहाणार्‍यांची निराशा अपरिहार्यच असते. विविध समस्यांनी गांजलेली सामान्य जनता व सीमेवर प्राण पणाला लावून देशाची सुरक्षा करणारा सैनिक; यांना हिंमत देण्यासाठी देशाच्या सर्वोच्च नेत्याने हे भाषण करायचा प्रघात आहे. त्यात अर्थकारण, परराष्ट्र धोरण वा तत्सम गंभीर राजकीय अजेंडा शोधणारे निव्वळ मुर्ख असतात. जत्रेतल्या जनसागराला रमवण्यासाठी पोवाडे वा तत्सम गीते सादर होतात, त्यात शास्त्रीय संगीताचे तराणे घराणे शोधणार्‍यांना दुसरे काय म्हणायचे? हे बौद्धिक कुपोषणाचे परिणाम आहेत. कुपोषिताला सकस पौष्टीक आहार मानवत नाही, त्याचेच हे लक्षण आहे. टिव्हीवरल्या निर्बुद्ध चर्चेमुळे तो चारू मुजूमदारचा मृत्यू आठवला, आणि आजच्या बौद्धिक यातनांचे निदान झाले.

नरेंद्र मोदींनी साफ़ निराशाच केली






   काही वर्षापुर्वी टिव्हीवर एक झकास जाहिरात खुप वेळ दाखवली जायची. फ़्रीजची ही जाहिरात त्या कंपनीने बनवलेल्या अप्रतिम तंत्रज्ञानावर भर देणारी होती. ते तंत्रज्ञान सामान्य लोकांना कसे कळावे? त्यासाठी मग त्यांनी सामान्य माणसाच्या फ़्रीजविषयक समजूतीला लक्ष्य केले होते. एक गृहिणी घरचा नवा फ़्रीज बिघडलाय म्हणून कंपनीला फ़ोन करून मेकॅनिक मागवते. घरी आलेला तो दुरुस्तीकर्ता सगळा फ़्रीज तपासतो. यात वस्तू थंड होत असतात, आतले दिवे लागलेले असतात. पाणीही थंडच असते. एक एक गोष्ट तपासून त्या महिलेला दाखवून तो तिची समस्या विचारतो. तर ती म्हणते, बाकी सर्व ठिक आहे. ‘फ़्रीज आवाजही नही करता.’ जुना झालेला वा बेफ़िकीरीने वापरलेला फ़्रीज म्हातारा होऊ लागला, की त्याची मोटर वा यंत्रणा गुरगुरू लागतात. त्याचा आवाज चालू असणे म्हणजेच मग फ़्रीज उत्तम चालणे, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण नव्या तंत्रज्ञानाने यंत्रणा इतकी चोख केलेली आहे, की फ़्रीजचा आवाजच येत नाही. आणि आवाज येत नाही म्हणजेच तो फ़्रीज उत्तम स्थितीत आहे. बिचारा मेकॅनिक गृहिणीला हे समजावतो. तिच्या चेहर्‍यावरही समाधान पसरते आणि विषय संपतो. आठदहा वर्षापुर्वीची ती जाहिरात आता कुठे दिसत नाही. पण ती मानसिकता मात्र कायम असावी. लोक समजूतीच्या बाहेर पडत नाहीत आणि प्रामुख्याने बुद्धीमान विचारवंत असले, मग तर समजूतीच्या कोषातून बाहेर पडणेच अशक्य असते. समजा त्याच जाहिरात कथानकात गृहिणीऐवजी कुणी विचारवंताशी त्या मेकॅनिकची गाठ पडली असती, तर त्याने फ़्रीजची घरघर म्हणजेच त्याच्या उत्तम चालण्याची हमी, असेच त्यालाही पटवून दिले असते आणि नव्या तंत्रज्ञानाला झुगारून लावले असते. भारताचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर विविध वाहिन्यांवरील चर्चा ऐकल्यावर ती जाहिरात आठवली.

आपल्या या पहिल्या भाषणाच्या आधी तिथे जी सुरक्षेची सज्जता केलेली होती, त्यात मोदींनी ऐनवेळी बदल केला. गेली दोन दशके तरी देशाचा पंतप्रधान तिथून भाषण करताना बुलेटप्रूफ़ काचेमागे उभा राहून देशाला संबोधित करतो. मोदींना तर जिहादींपासून धोका असल्याचे प्रतिदिन आपण रोज ऐकत असतो. त्यामुळेच मोदींनी बंदिस्त सुरक्षा कवचामागून भाषण केल्यास नवल नव्हते. आजवरचे आठदहा पंतप्रधान तेच करत आले. पण मोदींनी जनतेला आपला आत्मविश्वास दिसावा, म्हणून ती प्रथा मोडीत काढली आणि ऐनवेळी ते कवच बाजूला करायला लावले. अर्थात तसे करण्याआधी त्यांच्या सुरक्षा सल्लागारांचा सल्ला त्यांनी घेतला असणार यात शंका नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मोदींनी नेहमीप्रमाणे औपचारिक भाषण देणे टाळून उत्स्फ़ुर्त संवाद साधला. त्यांच्या भाषणात मोठ्या भव्यदिव्य कल्पनांचा भडीमार अजिबात नव्हता. बुद्धीमंतांना चघळायला वैचारिक खाद्य द्यावे, तसे त्यांचे भाषण अजिबात नव्हते. पण अतिशय छोटे वाटणारे विषय व मुद्दे घेऊन त्यांनी जनतेला आवाहन करायचा पवित्रा घेतला. उदाहरणार्थ देशात वाढलेल्या महिला असुरक्षीतता व बलात्कार विषयाला हात घालून, त्यांनी मुलीपेक्षा पालकांनी आपल्या मुलांवर नजर ठेवण्याचा मुद्दा मांडला. शेवटी बलात्कार वा मुलींवर अत्याचार करणाराही कुणाचा तरी मुलगा-भाऊ आहे. त्याला बहकू देणारा पालक देशापुढे समस्या उभ्या करतो, हे भीषण वास्तव आहे. त्याला कायद्याने पायबंद घातलाच पाहिजे. पण घरातच बेताल होऊ लागलेल्या मुलांना वेसण घातली गेली, तर कायदा यंत्रणेवर इतके अवलंबून रहावे लागणार नाही. तिच्यावरील बोजा कमी होतो. त्याहीपेक्षा असे विषय गुन्हे असण्यापेक्षा सामाजिक विकृती असतात आणि त्याच्यावरचे उपाय समाजाकडूनच होणे अगत्याचे असते, त्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बलात्कार, महिला सुरक्षा वा महिलांचे सशक्तीकरण असल्या बाबतीत नुसते कायदे करणे वा सरकारने योजना आखणे, एवढीच मर्यादा मानली गेली आहे. त्यात समाजाची जणू काहीच जबाबदारी नाही, अशा समजूतीमध्ये सरकारवर खापर फ़ोडण्याची स्पर्धा चालते. पण यातले गुन्हेगार वा समाजकंटक आपल्यातच वावरत असतात. त्यांना सर्वात आधी आपणच रोखू शकतो. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी त्याला लगाम लावणे, कायद्यापेक्षा सामान्य जनतेलाच शक्य आहे. त्यात जनतेने पुढाकार घ्यायला हवा, हे साधे आवाहन आजवर कुणा नेत्याला करावेसेही वाटले नव्हते. मोदींनी तिकडे लक्ष वेधले व असेच त्यांनी अनेक बाबतीत केले. योजना, विकास वा जनतेचे हित ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, ते त्याच जनतेचे उत्तरदायित्वही आहे, याचाच आपल्याला विसर पडून गेला आहे. सरकार काय करणार, असा प्रश्न नित्यनेमाने विचारला जातो. पण ज्यांच्यासाठी अशा गोष्टी सरकारने कराव्यात अशी अपेक्षा आहे, त्या जनतेने स्वत:साठी काहीच करायचे नसते काय? आपल्या मुली बहिणीवर अत्याचार होऊ नये ही अपेक्षा चुकीची नाही. पण आपल्याच मुला, भावाकडून असे अत्याचार होऊ नयेत, त्याची जबाबदारी कोणाची? अत्याचार करणारा पुरूष आपल्या घरातला असू नये, हे प्रत्येक कुटुंबाचे सामाजिक दायित्व नाही काय? कितीदा बुद्धीमंतांपासून पुढार्‍यांपर्यंत कोणी त्याची जाणीव जनतेला करून दिली आहे? ही म्हटले तर किरकोळ बाब आहे. त्यामुळे उद्यापासून घराघरातल्या मुलगे वा पुरूषांना सदबुद्धी होण्याची अजिबात शक्यता नाही. पण असे काहीही घडल्यावर लगेच सरकारला गुन्हेगार मानणार्‍या नागरिकांना यापुढे निदान आपला चेहरा आरशात बघायची इच्छा तरी होईल ना? दोनपाच टक्के लोकांनी जरी त्याची जाणिव ठेवून घरात मुलगे वा पुरूषांचा बंदोबस्त करायचे ठरवले, तरी एका चांगल्या दिशेने लहानसे पाऊल टाकले जाईल ना?

असे अनेक मुद्दे मोदींनी इतक्या सहजतेने आपल्या भाषणातून मांडले, की सरकार आणि जनता ह्या दोन भिन्न बाजू नसून एकमेकांना पुरक आहेत, याचे भान त्यांनी निर्माण करायचा प्रयास केला. एकाने करावे आणि दुसर्‍याने बघत बसावे, असे काम होत नाही. सरकार व जनता यांनी परस्पर पुरक भूमिकेतून कामाला लागले तर मोठ्या वाटणार्‍या गोष्टी वा आव्हाने सोपी होऊन जातील. विकास हे आंदोलन होऊन जाईल. जेव्हा विकास वा योजनांमध्ये जनतेचाच सहभाग असा वाढत जाईल, तेव्हा त्यातला भ्रष्टाचार आपोआप कमी होत जाईल. सरकार जे जनतेसाठी व जनतेचे असेल, तर त्याच्यापासून जनतेला अलिप्त राहुन चालणार नाही. तिचाही सरकारी कामात सहभाग असायलाच हवा. अशा आशयाचे हे भाषण देशवासियांना भारावून गेले तर नवल नव्हते. मात्र सामान्य जनतेला सहजगत्या उमजू शकणारे तेच भाषण वाहिन्यांवर चर्चेला बसणार्‍यांना मात्र अर्थशून्य वाटले. त्या बुद्धीमंतांची पंतप्रधानांनी निराशा केल्याचे चर्चेतून दिसत होते. पण अशा जाणत्यांची निराशाच अपेक्षीत नव्हती काय? एक वर्षापुर्वी भाजपाने मोदींना आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यापासूनच ही विचारवंत मंडळी निराश झालेली नव्हती काय? मोदी देशाचे पंतप्रधान होऊच शकत नाहीत. लोकशाहीत पंतप्रधान पदाचा उमेदवार आधीच जाहिर करायचा नसतो. मोदींमध्ये पंतप्रधान व्हायची गुणवत्ताच नाही, अशाप्रकारचे पांडित्य आपण गेले वर्षभर ऐकले आहे. मात्र त्याला झुगारून मतदाराने मोदींच्याच हाती देशाची सत्तासुत्रे सोपवली. परिणामी अभ्यासकांची आधीच निराशा झाली आहे. मग असा अपात्र पंतप्रधान त्यांच्या अपेक्षा पुर्ण तरी कसा करणार? बहुतांश सामान्य लोकांना कित्येक वर्षानंतर प्रथमच लालकिल्यावरून कोणी खमक्या पंतप्रधान बोलला असे वाटले, समाधान झाले. पण वर्षभर निराश असलेल्या बुद्धीमंतांची मात्र मोदींनी साफ़ निराशाच केली. त्याला पर्याय तरी कुठे होता? या शहाण्यांनी मोदींकडून नेमकी तीच अपेक्षा बाळगलेली नव्हती काय? सामान्य जनतेला उमजू शकणारे बोलणारा पंतप्रधान बुद्धीमंतानी कसा पचवावा ना?

Thursday, August 14, 2014

मनात नाही इच्छा, घागर उताणी रे गोपाळा



   दहीहंडी हा मुळातच सण म्हणता येणार नाही. गोकुळष्टमीच्या निमित्ताने हौस म्हणून काही लोकांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा खेळ, अलिकडल्या काळात राजकारण्याच्या बाजारू वृत्तीचा बळी झाला. मुंबई व तिथल्या चाकरमानी लोकांची ही हौस होती. मुंबईच्या कष्टकरी वस्तीतल्या व्यायामशाळांतील धडधाकट लोकांना त्यांच्या शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करण्याची संधी, असे या खेळाचे स्वरूप होते. पन्नास वर्षापुर्वी अशा हंड्या फ़ोडायला फ़िरणार्‍या गोविंदांची पथके, ही प्रामुख्याने व्यायामशाळांचीच असायची. आपापल्या विभागातली इतर सामाजिक सांकृतिक मंडळे कुणा शेठजीला हाताशी धरून वा वर्गणी काढून, त्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस म्हणून काही रक्कम हंडीला जोडायची. साधारण तीनचार थरापर्यंत मनोरा बनवून हंडी फ़ोडायचा हा खेळ असायचा. दोन चाळीच्या मधल्या बोळात अशा हंड्या बांधल्या जात आणि गोविंदा पथके त्या फ़ोडायला फ़िरत असत. त्यात शौर्य व धाडसाला प्राधान्य असायचे. गोविंदा मंडळ असा कुठलाही प्रकारच नव्हता. साधारण दुसर्‍या मजल्याच्या उंचीवर बांधलेली हंडी खुप उंच मानली जायची. कारण तेवढी उंची गाठायलाच पाच सहापेक्षा अधिक थर लावावे लागत. त्यातल्या बक्षीसाच्या रकमेला कुठले महत्व नसायचे. तर थर लावण्याच्या धाडसाला प्रोत्साहन असायचे. असे गोविंदा गल्लीबोळात फ़िरायचे आणि लोकांनी आपापल्या चाळीतून त्यांच्यावर कळशी बादलीतून पाणी ओतून त्यांना भिजवायचे, असे त्या खेळाला सार्वजनिक सामुहिक स्वरूप यायचे. जिथे पाणी ओतायची कंजूषी व्हायची, तिथे गोविंदाही रहिवासी बघ्यांना खिजवत ‘घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा’ अशी खिल्ली उडवायचे. तो खरा गोविंदाचा खेळ होता. आज त्यातली ती मौज कितीशी शिल्लक उरली आहे? आता मजा बाजूला पडली आहे आणि त्यात नको इतका जीवघेणेपणा आलेला आहे.

पंचवीस तीस वर्षापुर्वी या खेळाला अनेक बाजूंनी विकृती चिकटत गेल्या. आधी अशा हंडीला अधिकाधिक रोख रकमेची बक्षीसे लावून त्याला जुगारी रंग चढवला गेला. गोविंदा पथके रस्त्याने नाचत भिजत परिसरात फ़िरायचे बाजूला पडले आणि त्यांना दूरचे पल्ले व हंड्या शोधण्यासाठी गाड्या आवश्यक भासू लागल्या. मग ट्रक वा बसमधून गोविंदा दौरे करू लागले. त्याच दरम्यान थरावर थर चढणार्‍यांना त्यांची कसरत करू देण्यापेक्षा, तेव्हाच विचलीत करण्याचा हिणकस प्रकार सुरू झाला. कळशी वा बादलीतून त्यांच्यावर पाणी ओतणे मागे पडले आणि प्लास्टीकच्या पिशव्या वा फ़ुग्यात भरलेल्या पाण्याचा मारा सुरू झाला. गोविंदाचा आडोसा घेऊन रस्त्यावरून जाणार्‍या पादचारी नागरिकांवर पाण्याचे रंगाचे फ़ुगे फ़ेकण्याचा भलताच हिडीस रंग त्याला येत गेला. हंडी फ़ोडायला थर लावणार्‍यांचे अंग ओले आणि त्यात खांद्यावर उभे रहाणार्‍यांचे पाय घसरणे अपरिहार्य. अशावेळी त्यांचे लक्ष आपल्या मनोर्‍यावर केंद्रीत असायला हवे. तर भोवताली जमलेले लोक वा इमारतीतून गंमत बघायला गर्दी केलेले बघ्ये त्यांच्यावर अशा फ़ुग्यातून पाणी फ़ेकू लागल्याने, दोनतीन थर लागतानाच कोसळण्याला घातक स्वरूप त्याला येत गेले. जणू त्यांनी हंडी फ़ोडायची म्हणजे आपल्या जीवाची बाजी लावायची असते, असा काहीसा समज तयार होत गेला. अशा पथकांनी थरावर थर उभे करायचे आणि तिथे जमलेल्या प्रेक्षकांनी व्यत्यय आणून त्याला अधिक जीवघेणा प्रकार करायचा, असा बदल होत गेला. त्यात कसरत, कौशल्य व धाडसाला संधी देण्याचा मूळ हेतू कुठल्या कुठे हरवून गेला. जुन्या ग्रीक पुराणात जश्या चवताळलेल्या श्वापदासमोर माणसाला सोडून द्यायचे हिंस्र खेळ व्हायचे आणि सभोवार प्रेक्षागारात बसलेला जनसमुदाय पाशवी आनंद घेत, त्या जीवघेण्या खेळाची अमानुष मौज लुटायचा, तसे दहीहंडीसे स्वरूप होत गेले.

आज दहीहंडी आपण बघतो तिने पुर्णपणे त्या अमानुष पाशवी खेळाचे रुप धारण केलेले आहे. तिथे पकडून आणलेले कैदी वा शत्रू सैनिकांना श्वापदापुढे फ़ेकले जायचे. इथे पैसे व त्यातली मोठमोठ्या रकमेची बक्षीसे तरूणांना वा हिंमतबाजांना आखाड्यात ओढून आणतात. काही ठिकाणी कुणा नेत्याच्या प्रतिष्ठेसाठी मंडळे उभी राहुन असे गोविंदा निर्माण झालेत. पौगंडावस्थेत अंगात मस्ती असते आणि जगाला गुंडाळून ठेवण्याची नवी उर्मी मनापासून शरीरात उसळी मारत असते. तेव्हा ‘काही तरी तुफ़ानी करूया’ असे प्रत्येकाला वाटत असते. देहात तेवढी ताकद वा मनात तेवढी हिंमत नसली, तरी अशा उर्मी जमावात उसळी मारून बाहेर येतात. उंदराचाही सिंह व्हावा असा कालखंड असतो. त्यांना कोणीतरी पुढे ढकलायची प्रतिक्षा असते. अशा लोकांना आपल्या राजकीय प्रतिष्ठेसाठी पदरमोड करणारा कोणी भांडवलदार हवा असतो. ती जबाबदारी उचलणारे उपटसुंभ नेते गल्लीबोळात उदयास आले आणि अग दहीहंडी नावाचा गल्लीतला एक साधा खेळ, मोठा उत्सव बनून गेला. त्याचा राजकीय लाभ ओळखून मग अनेक नेते त्यात उतरले आणि अमानुषतेने कळस गाठला. त्यात आयुष्यातून कायमचे उठणार्‍यांचा टाहो कोणाच्या कानी कसा पडायचा? हीच जगरहाटी आहे. मग ती अमानुषता दहीहंडीच्या बाबतीतली असो किंवा मेणबत्त्या पेटवून कुठल्या समभावी समविचारी खुळेपणाचे पाखंड माजवणारी असो. इथे उंचीवरून कोसळणार्‍या व त्यात जखमी होणार्‍याची कुणाला फ़िकीर नाही. तर मानवतावादाच्या आहारी जाऊन ‘अमन की आशा’ नावाचा होणारा खेळ सारखाच असतो. तिथे तुकाराम ओंबळे कशामुळे मारला जातो? दोन्हीकडले धोके आपापल्या समजूतीचा अटटाहास चालवण्यातून होत असतात. जितकी अमानुषता उंच हंडीच्या हट्टापायी पोसली जाते, तितकीच अमानुषता मानवी हक्काच्या नावाखाली जिहाद पोसण्यातूनही चालूच असते.

कोणाची अमानुषता आहे त्यानुसार त्याचे समर्थक व विरोधक यांची विभागणी होत असते. आज दहीहंडीच्या विरोधात तावातावाने बंदीच्या मागणीचे समर्थन करणारे जिहाद दहशतवादाचे बळी पडतात, तेव्हा मैदानात येतात काय? रझा अकादमीच्या धिंगाण्यानंतर यातले किती लोक त्या महिला पोलिसांच्या बेअब्रू वा जाळपोळीची चिंता करीत अशा मेळाव्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी पुढे सरसावले होते? थोडक्यात आपली सगळी माणुसकी वा हळवेपणा आपापल्या समजुती व पुर्वग्रहाच्या आधारावर कार्यरत होत असतात. जिथे आपल्या समजूती लोकांच्या जीवाशी खेळणार्‍या असतात, तिथे आपल्या जाणिवा व संवेदना सुप्तावस्थेत जात असतात. मातम नावाचा प्रकार चालतो, तेव्हा कोवळ्या वयातली शिया पंथीय मुले स्वत:लाच रक्तबंबाळ करून घेण्यार्‍या जखमा सोसत मिरवणूका काढतात. त्याची यापैकी कितीजणांनी दखल घेतली आहे? कोणी त्यासाठी कोर्टात वा बालकल्याण मंत्रालयाकडे धावल्याचे आपल्या कानावर आले आहे काय? मानवी मनोर्‍याच्या उंचीबाबत घसा कोरडा होईपर्यंत बोलणार्‍या एकाला तरी त्या मनोर्‍यावर फ़ेकले जाणारे पाण्याचे फ़ुगे जीवघेणे अस्त्र असते, याची आठवण तरी आहे काय? त्या फ़ुग्यांवर बंदीची मागणी एकानेही केलेली नाही. कारण दहीहंडी समर्थक वा विरोधक यापैकी कोणाला त्या मनोर्‍यासाठी वापरल्या जाणार्‍या बालकांच्या सुरक्षेची फ़िकीर नाही, की कदर नाही. त्यांना आपापल्या समजूती व अट्टाहासाची प्रतिष्ठा अधिक मोलाची आहे. त्यातून आपल्या भूमिकेची बाजी मारण्याची ही शर्यत आहे. त्यासाठी दहीहंडी हे एक निमीत्त झाले इतकेच. जितके यातले आयोजक राजकारणी स्वार्थी आहेत, तितकेच त्यातले विरोधक मतलबी आहेत. गोविंदाच्या जुन्या गाण्याच्या चालीवर म्हणायचे तर ‘त्यांच्या मनात नाही इच्छा, घागर उताणी रे गोपाळा’

Wednesday, August 13, 2014

उघडा डोळे आणि बघा नीट



मतचाचण्या वा मतदानपुर्व अंदाज यांचे आता एक शास्त्र झालेले आहे. ज्यांना त्यातून येणार्‍या उत्तरातच रस असतो, त्यांना आकड्यांशी मतलब असतो. पण ज्यांना त्यामागची कारणमिमांसा करायची असते, त्यांना त्यातली कार्यप्रणाली समजून घेणे भाग असते. सहा कोटी मतदार कसे कोणाला व कशासाठी मतदान करतील, याबद्दल आडाखा बांधताना, चाचणीत काही हजार मतदारांची चाचपणी होत असते. सहाजिकच त्यात सर्वप्रकारच्या सामाजिक घटकांचा नमूना घेतला जाईल, याची अत्यंत जपून निवड करावी लागते. तरच समाजाचे प्रातिनिधीक मत मिळवता येते आणि त्यानुसार जय पराजयाचे अंदाज मांडता येतात. ते जसेच्या तसे खरे ठरण्याची अजिबात शकता नसते. पण त्यातून लोकमत कुठल्या बाजूला झुकते आहे वा त्याचे वारे कुठल्या दिशेने वहात आहेत, त्याचा अंदाज मिळत असतो. लोकसभा निवडणूकीच्या वेळी ज्या असंख्य चाचण्या झाल्या व त्याचे निष्कर्ष मांडले गेले, त्यापैकी एकादा अपवाद करता कोणालाच नेमके मोदींचे यश जोखता आलेले नव्हते. याचा अर्थ असे सर्वच चाचण्या घेणारे भामटे वा मुर्ख होते, असा अजिबात होत नाही. त्यापैकी अनेकांना मोदींच्या यशाची पुर्वकल्पना आलेली होती. कारण हाती येणारे चाचणीचे आकडे त्याची ग्वाही देत होते. पण अशी चाचणी घेणारे व त्याचा राजकीय अन्वय लावणारे आपापल्या समजूती व पुर्वग्रहामुळे सत्य स्विकारायला धजावत नव्हते. आघाडीचे युग आहे आणि भारतातला सेक्युलर मतदार मोदींसारख्या हिंदूत्ववाद्याला यश देऊच शकत नाही, अशा समजूतीचा बुद्धीवर इतका दबाव आलेला होता, की समोर येणारे प्रत्यक्ष चाचणीचे आकडे मनाला पटणारे असूनही बुद्धीला पटत नव्हते. म्हणून हातचे राखून आकडे कमी करून दाखवले जात होते. कारण तेच आकडे प्रस्थापित सेक्युलर बुद्धीवादाला पटणारे व पचणारे होते. मतमोजणीच्या आधी आलेला शेवटचा अंदाज एनडीटीव्हीच्या प्रणय रॉय याचा होता. वास्तविक भारतात मतचाचण्याचे युग आणणारा तोच यातला आद्यपुरूष. त्याने अखेरच्या क्षणी एनडीएला बहूमताच्या दारात आणून उभे केले होते. पण भाजपाला स्वत:चे बहूमत मिळेल असे काही मान्य केले नव्हते. तेव्हाच त्याबद्दल लिहीताना मी साफ़ सांगून टाकले होते, की प्रणय रॉय एनडीएला काठावरचे बहूमत देत असेल, तर मोदी भाजपाला थेट बहूमतापर्यंत घेऊन जाणार याची खात्री बाळगा. असे मी कशाच्या आधारावर म्हणत होतो? तर सगळेच चाचणीकर्ते खोटे पडू नये, अशा दबावाखाली सावधपणे आपापले अंदाज व्यक्त करीत होते. त्यातला सर्वात जाणता एनडीएला बहुमत दाखवतो, म्हणजेच त्याच्यापलिकडे मोदींनी मजल मारलेली आहे, असा माझा अंदाज होता आणि तोच खरा ठरलेला आहे.

त्याच काळात एबीपीने काढलेले व मांडलेले अंदाजही फ़सलेच होते. पण निदान उलटेपालटे झाले नव्हते. तेव्हा निलसन व एबीपीने भाजपा अधिक जागा देताना बहूमत दाखवले जाऊ नये, अशी काळजी घेतली होती. पण वास्तवात त्यांच्या हाताशी आलेल्या आकड्यात एनडीए व भाजपा मोठ्या यशाकडे जाताना स्पष्ट दिसत होते. तरीही मानसिक व सेक्युलर बुद्धीवादाच्या दबावाखाली त्यांनीही आपापले आकडे हात आखडून दाखवले होते. ती अशा लोकांची खरी चुक वा गुन्हा असतो. आज त्यांच्यापैकी कोणीही आपण तेव्हा हात आखडला असे मान्य करणार नाही. कारण खोटेपणा मान्य करायला कोण तयार असतो? पण त्यावेळी आपली चाचणी बरोबर आकडे दाखवत होती आणि त्याप्रमाणेच मोदींना इतके मोठे यश मिळू शकले, याची एबीपी व निलसन यांना पक्की खात्री आहे. त्यामुळे सेक्युलर बुद्धीवाद व राजकीय दबाव यांना घाबरून अकारण महायुतीच्या यशाला छोटे दाखवायला ही मंडळी आज तयार नाहीत. विधानसभा निवडणूकीत आघाडी हमखास पराभूत होणार आणि महायुती नक्की जिंकणार, याची अशी मतचाचणी घेणार्‍यांना (लोकसभा) अनुभवातून झालेली खात्रीच आहे. म्हणूनच त्यांना लोकसभा मतदानाच्या वेळी नसलेली सत्यकथनाची हिंमत आलेली आहे. त्यातून मग त्यांनी महायुतीला १८० पासून २१० पर्यंत जागा देऊ केल्या आहेत. मात्र अशा जागा कशाच्या आधारे मिळतात, ते समजून घेऊन मांडायला हव्यात. त्यामागची कार्यप्रणाली, तर्कशास्त्र वा मतदार प्रवृत्ती यांची योग्य मिमांसा त्यांना करता आली पाहिजे. पण दुर्दैवाने राजू खांडेकर, प्रसन्ना जोशी वा प्रताप आसबे यांच्यासह कार्यक्रमात सहभागी झालेल्या कोणालाच त्या विषयाची साधी तोंडओळख सुद्धा नाही. सहाजिकच उत्तर बरोबर असले, तरी त्यांनी मांडलेले गणित चुकताना दिसते आहे. त्यातून त्यांच्या चाचणीविषयी शंका घेतल्या गेल्या व त्यांना खोटे पाडण्यापर्यंत गदारोळ जाऊन पोहोचला आहे.

त्या कार्यक्रमात कॉग्रेसचे जनार्दन चांदूरकर संतप्त होऊन उठून निघाले व त्यांनी एबीपीवर दिशाभूल करीत असल्याचा आरोपही केला. त्यांना समजावण्याचा केविलवाणा प्रयास करताना राजू खांडेकर यांनी दिलेले लंगडे स्पष्टीकरणच एकूण संयोजकांच्या अज्ञानाचे प्रदर्शन होते. लोकसभेत युतीला ५० टक्के मते मिळाली होती आणि आता विधानसभेला त्यातली आठ टक्के मते कमी होत आहेत. मात्र युतीची कमी झालेली मते कॉग्रेस आघाडीकडे येताना दिसत नाहीत. त्यामुळे मोदी लाट ओसरल्याचे ते प्रतिबिंब असल्याचे खांडेकर म्हणाले. ह्यालाच मी अज्ञान म्हणतो. युतीची कमी होणारी मते कॉग्रेस वा राष्ट्रवादीकडे जाण्याचा विषयच येत नाही. कारण ती त्यांची मतेच नव्हती. ही आठ टक्के मते मनसे, शेकाप, भारीप किंवा आप वगैरे किरकोळ पक्षांची असतात, ज्यांचा लोकसभा मतदानावर प्रभाव पडत नाही. मग त्यांचा मतदार पर्याय म्हणून निर्णायक ठरणार्‍या अन्य उमेदवाराकडे तात्पुरता वळलेला असतो. १९८९ पासून १९९९ पर्यंत वसईमध्ये आमदार निवडताना हिंतेंद्र ठाकूर यांनाच मते देणारा बहुतांश मतदार लोकसभेला राम नाईक यांच्या झोळीत आपले वजन टाकत होता. कारण त्याला हितेंद्रने कुठला लोकसभा पर्याय दिलेला नसायचा. परंतू २००४ सालात तिथे कॉग्रेसने गोविंदा या अभिनेत्याला उमेदवारी दिली आणि हितेंद्र वर्गमित्र म्हणून गोविंदाच्या समर्थनाला उतरताच वसईतच नाईक यांना मोठा दणका बसला. २००९ मध्ये मनसेकडे वळलेल्या मतांनी युतीला फ़टका बसला, तो मतदार यावेळी युतीकडे परतला. मात्र लोकसभेला तिकडे गेलेला काही मतदार विधानसभेत पुन्हा मनसेकडे परततो आहे. त्यामुळेच युतीची आठ टक्के कमी होताना दिसणारी मते मनसेसारख्या अन्य किरकोळ पक्षाकडे विधानसभेत झुकणार आहेत. कॉग्रेस वा राष्ट्रवादीकडे त्यांनी जाण्याचा प्रश्नच येत नाही. युतीच्या त्या कमी होणार्‍या मतांचा मोदींच्या लोकप्रियता घसरण्याशी काडीमात्र संबंध नाही. भारतातला मतदार अत्यंत चतूर चाणाक्ष आहे. ग्रामपंचायत वा तालुका पंचायत आणि लोकसभा विधानसभा यासाठी निवड करताना त्याच्यात जे तारतम्य आढळते; त्याचा मागमूस विश्लेषणकर्त्या अभ्यासकात नसल्याने असे गोंधळ उडतात.

बिचारे खांडेकर, प्रसन्ना आपल्या चाचणीविषयी छातीठोकपणे ग्वाही देऊ शकलेले नाहीत. पण मी आज त्यांचे आकडे चोख असल्याची ग्वाही देऊ शकतो. कारण त्यात जनमानसाचे नकारात्मक प्रतिबिंब चोख पडलेले आहे. त्यांनी सेना भाजपया पक्षांना मिळू शकणार्‍या जागांचे दाखवलेले आकडे चुकीचे असतील. पण युती म्हणून त्याच पक्षांना एकत्रित मिळू शकणार्‍या जागांची संख्या शंभर टक्के तशीच येईल अशी मला खात्री आहे. त्या चाचणीने एक सिद्ध होते, की युती पक्षांनी कितीही मुर्खपणाने दिवाळखोर वागून दाखवले, तरी मतदार आघाडीला सत्तेवर येऊ देणार नाही. म्हणूनच सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात स्वबळावर लढले तर त्यांना मिळणार्‍या जागा आणि युती आघाडी करून लढल्यास मिळणार्‍या जागा, हे आकडे बोलके आहेत. एकदिलाने लढल्यास युती २१० आणि एकमेकांच्या विरोधात लढले तरी १८०, याचा अर्थ स्पष्ट आहे. शिवसेना भाजपाला भले एकत्र येऊन लढायचे नसेल, तरी त्यांनाच कान धरून एकत्र सत्ता संभाळायला बसवायचे, असा निर्णय मतदाराने आधीच केलेला आहे. त्यासाठी मग कुठूनही कॉग्रेस वा राष्ट्रवादी यांना इतरांच्याही मदतीने बहूमताचा पल्ला गाठता येऊ नये, असे निकाल मतदार लावतो आहे. सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात लढून आघाडीची बेरीज ८०-८५ आणि युती-आघाडी असे लढले तरी पल्ला ५५ जागांच्या पलिकडे जात नाही, हा एबीपी चाचणीतला महत्वाचा निष्कर्ष आहे. पण मांडायला बसलेत, त्यांना त्याचे आकलन झालेले नाही. किंवा ऐकायला बसलेत त्यांना बोजवारा उडालेल्या कार्यक्रमामुळे कशाचाच उलगडा होऊ शकलेला नाही. त्यातली गोळाबेरीज इतकीच आहे, की युती पक्ष आपल्या कर्तृत्वाने वा लोकप्रियतेमुळे इतके मोठे यश मिळवण्याच्या परिस्थितीत अजिबात नाहीत. त्यापेक्षा सत्ताधारी राष्ट्रवादी व कॉग्रेस यांच्या भ्रष्ट, नाकर्त्या व नालायक सरकारपासून मुक्ती मिळवणे ही जनतेसाठी अगतिकता झाली आहे. आसबे आपल्या लेखातून त्याची ग्वाही देऊन म्हणतात, ‘काय बिशाद लोक आघाडीला मते देतील, असा पण करूनच सरकारने कारभार केला.’ त्यांनी आपले एबीपी सहकारी प्रसन्ना व खांडेकरांना सादरीकरणापुर्वी लेखातला हा मुद्दा समजावला असता, तरी कार्यक्रमाचा इतका विचका झाला नसता. चांदुरकरांनाही इतका आवेश दाखवण्याची वेळ आली नसती. असो. तीन महिन्यानंतर एबीपी निलसन खरे ठरले, तर त्याचे श्रेय मात्र स्वत:कडे न घेता त्यांनी भाऊ तोरसेकरला द्यावे, इतकीच नम्र विनंती. कारण इच्छा नसताना त्यांची बाजू मला मांडावी लागली आहे. अपेक्षा इतकीच, की आपलीच मतचाचणी समजून घ्यायला, उघडा डोळे आणि बघा नीट

Tuesday, August 12, 2014

घरकी मुर्गी दाल बराबर?

"You can avoid reality, but you cannot avoid the consequences of avoiding reality."
- Ayn Rand

जगप्रसिद्ध चिंतक व लेखिका आयन रॅन्ड म्हणते ‘तुम्ही वास्तवाकडे पाठ फ़िरवू शकता, पण वास्तवाकडे दुर्लक्ष करण्याच्या परिणामांपासून तुमची सुटका नसते.’
---------------------------------
अमूक<<<<
हिंदू आणि हिंदुत्ववाद्यांमध्ये फरक कोणते आहेत?
मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही.
म्हणून हा प्रश्न विचारतोय..
--------------------------------
हिंदू आणि हिंदुत्ववाद्यांमधला फरक

हिंदू माणूस समाजवादी, मार्क्सवादी, लेनिनवादी, माओवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, फुलेवादी इत्यादी असू शकतो. म्हणजे धर्माने आणि परंपरेने हिंदू असूनही तो वेगळं राजकीय- सामाजिक वा निष्ठा वा कार्यक्रम वा विचारसरणी स्वीकारतो.

हिंदुत्ववाद्याला मात्र हे शक्य नाही.
रा.स्व. संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप थोडक्यात संघ परिवारातूनच हिंदुत्ववादी निवड करतो. त्याच्यापुढे दुसरा पर्यायच नसतो.
================================
तमूक<<<<
 मी हिंदुत्ववादी नसल्यामुळे हिंदू धर्माला माझा काहीएक उपयोग नसावा. एकंदरीतच मी कुठल्याही धर्माचा असतो तरी इतकाच यूसलेस आणि असाच अडाणी असलो असतो याबद्दल मला खात्री आहे.
-----------------------------------

(फ़ेसबुकवरल्या या दोन मित्रांच्या उपरोक्त विधानानंतर अशा विषयावर मनात आलेले विचार मांडणे अगत्याचे वाटले म्हणून हा उपचार. त्यांची नावे टाळली आहेत, कारण त्यातून व्यक्तीगत हेत्वारोप होतात आणि मुद्दा बाजूला पडतो.)

  बहुसंख्य हिंदू म्हणून जगणार्‍यांना वा हिंदू म्हणून ओळखल्या जाणार्‍या व प्रामुख्याने अशा विषयात बोलणार्‍यांना आपण हिंदू असणे म्हणजे जगाच्या संदर्भात नेमके काय, आहे त्याचा पत्ता नसतो. त्याची ही अशी प्रचिती येत असते. हिंदू असण्याचा अभिमान असला, मग तुम्ही हिंदूत्ववादी होता, असाही एक समज आहे. पण असला समज बोलघेवडेपणाच्या पलिकडे जाणारा नसतो. कुठल्याही वाद वा अस्मितेची कसोटी तेव्हाच लागते, जेव्हा तिची सत्वपरिक्षा घेतली जात असते. या संदर्भात जे हिंदू आहेत पण हिंदूत्ववादी नाहीत म्हणजे काय, याची आपण तपासणी सुरू केल्यास नेमके काही हाती लागू शकते. उदाहरणार्थ उपरोक्त दोन मित्र वा अनेक तत्सम लोक संघप्रमुख मोहन भागवत यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना असे मतप्रदर्शन करीत आहेत, हे वेगळे सांगायला नको. त्यांच्या म्हणण्याचा साधा अर्थ इतकाच, की हिंदू असलो तरी अभिमानाने त्याची जाहिरात करावी किंवा त्यासाठी तलवार उपसून लढायला बाहेर पडावे, अशी त्यांच्यात कुठलीही उर्मी नाही. सहाजिकच तशी उर्मी वा खुमखुमी असेल त्याला हिंदूत्ववादी म्हणता येईल, असाच त्यांच्या म्हणण्याचा गर्भितार्थ आहे. किंबहूना आपण हिंदूत्ववादी नसून नुसतेच हिंदू आहोत, म्हणुन धर्माचा पगडा आपल्यावर लादला जाऊ शकत नाही, असेही ठासून सांगण्याचे अगत्य त्यांच्यात आहे. परिणामी आपल्याला हिंदू म्हणा किंवा नाही म्हणालात, तरी फ़रक पडत नाही असेच त्यांना सुचवायचे आहे. त्यांनी बोलून दाखवले तितक्या उत्साहात अनेक हिंदू बोलूनही दाखवणार नाहीत. पण त्यांना जितक्या उत्साहात स्वेच्छेने असे घोषित करावेसे वाटले, तितक्या उत्साहाने किती बिगरहिंदू आपल्या धर्माविषयी आपण उदासिन आहोत, असे सांगायला अगत्याने पुढे येतील? सगळी समस्या तिथूनच सुरू होते.

याच विषयावर चर्चा वाहिन्यांवर सुरू होत्या, त्यामध्ये अमुक म्हणतो तसे अनेक उदारमतवादी हिंदू अगत्याने भागवत यांच्यावर आक्षेप घेत होते. पण सेक्युलर म्हणून त्यात सहभागी झालेला कोणीही बिगरहिंदू तितकी सैल भूमिका घेत नसतो. त्या प्रत्येकाला आपल्यावर हिंदू असा शिक्का मारण्याचा आलेला संताप लपत नव्हता. जितक्या अगत्याने त्यांना आपण हिंदू नाही हे सांगण्याचा उत्साह होता, तितका किती हिंदूंमध्ये हिंदू असण्याचा उत्साह आढळतो? अशा हिंदूंचा उपयोग तरी काय, असाही प्रश्न मग लक्षात घेण्यासारखा आहे. तमूक हा मित्र म्हणतो, ‘आपण हिंदू म्हणून निरूपयोगी आहोत.’ या मित्राचा दावा शंभर टक्के त्याच्या धर्मापुरता खरा व योग्यच आहे. पण त्याचे पुढले विधान मात्र संदिग्ध आहे. ‘एकंदरीतच मी कुठल्याही धर्माचा असतो, तरी इतकाच यूसलेस आणि असाच अडाणी असलो असतो.’ यात गफ़लत आहे. कारण तमूक अन्य कुठल्याही धर्मात जन्मलेला वा सध्या तरी सहभागी झालेला नाही. आणि असता तर त्याला असे खुलेपणाने बोलायची मुभा मिळाली असती काय? तसे असते तर बिचार्‍या तस्लिमा नसरीनला देशोधडीला लागायची वेळ आली असती काय? तिच्या मायदेशातच नव्हेतर आपल्या भारत नामे सेक्युलर देशातही तिला तशी मुभा आपण देऊ शकलेलो नाही. मुस्लिम असूनही इस्लाम झुगारण्याचे वा मुस्लिमत्व नाकारण्याचे धाडस तस्लिमाच्या जीवावर कशाला उठले आहे? आपण लंब्याचवड्या सेक्युलर गप्पा मारताना तस्लिमाने पत्करलेल्या धोक्याचा विचार तरी करतो काय? जे स्वातंत्र्य वा अधिकार अमूक वा तमूक हिंदू म्हणून उपभोगू शकतात, तेवढे तरी स्वातंत्र्य आपल्याच सेक्युलर देशात हमीद दलवाई वा तस्लिमाला मिळू शकले आहे काय? त्यांनाही तेच स्वातंत्र्य हिंदू असते, तर उपभोगता आले असते. त्यांना त्याची किंमत कळू शकली, ती आम्हाला हिंदू असून उमगलेली नाही. आणि असे उदारमतवादी असलेल्या हमीद वा तस्लिमा यांच्याबद्दलच म्हणता येत नाही, अगदी ज्यांच्यावर पुन्हा कट्टरता वा धर्मांधतेचा आरोप होतो, त्या शाही इमाम बुखारी यांच्याही बाबतीत तेच म्हणावेच लागते. हिंदू असण्याची महत्ता सेक्युलर मित्रांना उमजलेली नाही, कारण त्यांचे हिंदू असणे कसोटीला लागलेले नाही.

ज्यांची हिंदूत्ववादी म्हणून हेटाळणी वा उपहास करण्यात सेक्युलर मित्रांना धन्यता वाटते, ते बिगरहिंदूंच्या इतके कडवे धर्मवादी वा स्वाभिमानी असते, तर काय झाले असते? बुखारी त्याचे उत्तर देतात. ‘भारत हा देश इथल्या सेक्युलर पक्षांमुळे नव्हेतर बहुसंख्य हिंदूंमुळे सेक्युलर राहू शकला आहे.’ तसे नसते तर काय झाले असते, त्याचा अर्थ बुखारींना नेमका कळतो. म्हणूनच कडवे इस्लामी असून त्यांनी भारतीय हिंदूंचे कौतुक केले आहे. त्याचा अर्थ इतकाच, की हिंदू म्हणून जे कोणी असतात, ते आपल्या धर्माचे आग्रही नसतात, म्हणूनच इतर धर्मियांना आपापल्या धर्माने वा उपासना पद्धतीने जगण्याची सुट वा मुभा मिळू शकते. त्याचा अर्थ काय, त्याचा तपशील हवा असेल, तर इतिहासात जाण्याची गरज नाही. बांगलादेश, अफ़गाणिस्तान वा पाकिस्तानातून आजही जीव मुठीत धरून भारतात आश्रयाला येणार्‍या हिंदूंकडे आपल्याला बघता येईल. त्यांनाही तिथे आपापल्या मायभूमीत अमूक वा तमूक प्रमाणेच धर्माचे अवडंबर माजवायची हौस नाही वा त्यांनी हिंदूत्ववादाचा आग्रह धरलेला नाही. पण त्यांचे हिंदू असण्यापेक्षा मुस्लिम नसणे, त्यांच्या जीवावर उठलेले आहे. त्यांच्याकडेही पाठ फ़िरवू. त्याच्यापलिकडे इराक नावाच्या देशात सध्या जो धुमाकुळ माजलेला आहे, तिथल्या बिगर मुस्लिम वा शिया पंथीयांचे काय करायचे? त्यांच्यावर मृत्यूची छाया इतकी गडद कशाला झालेली आहे? त्यांचे कुठले धर्म वा उपासना पद्धती असतील किंवा नसतील, त्याच्याशी त्यांच्या जगण्याच्या ‘सवलती’चा संबंध जोडला गेलेला आहे ना? त्यांना आपली उपासना पद्धत आपल्या पुरती निवडण्याचा किंवा नावडण्याचा तरी अधिकार आहे काय? नसेल तर कशामुळे त्यांना इतका क्षुल्लक अधिकार नाकारला गेलेला आहे? इराकमध्ये तुमच्या आमच्यासारखे हिंदूच बहुसंख्य असते तर त्यांच्यावर अशी जीवघेणी वेळ आली असती काय? अमूक वा तमूक यांच्यासारखे हिंदू आहेत, तसेच जरी इराकमध्ये बहुसंख्येने असते, तर त्या याझदी वा शिया मुस्लिमांना सुखरूप जगता आले असते ना? मग त्यांच्यावरचे खरे संकट कोणते आहे? तर तिथे कोणीच हिंदू नाहीत वा भलेबुरे कुठलेच हिंदू बहुसंख्य नाहीत, हेच संकट नाही काय? शाही इमाम बुखारी तेच सांगतात. भारतात बहुसंख्य हिंदू आहेत, हीच अन्य धर्मियांसाठी सुरक्षेची हमी आहे. ती कुठल्या सेक्युलर राजकीय पक्षाने बहाल केलेली सुरक्षा नाही, तर बहुसंख्य हिंदू असणे, ही सेक्युलर जीवनाची असण्याची हमी असते.

यासाठी कोणी हिंदूत्ववादी होण्याची गरज नाही किंवा प्रत्येकाने स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्याचीही गरज नाही. पण बहुसंख्य हिंदू असणे, हीच सेक्युलर रहाण्याची हमी असते. किंबहूना तीच हिंदू असण्यातली महत्ता असते. कारण हिंदू असण्याचे पहिले लक्षण तुम्ही दुसर्‍यावर आपले धर्मविचार लादण्याची शक्यता नगण्य होऊन जाते. उलट जिथे हिंदू बहुसंख्य उरत नाहीत, तिथे सेक्युलर समाज शिल्लक उरत नाही. तीच तर तुमच्या हिंदू असण्याची महत्ता आहे. तीच तर सेक्युलर युगाची मोठी उपयुक्तता आहे. ज्याच्याअभावी काश्मिरमधून हिंदू असलेल्यांना जीव मूठीत धरून पळ काढावा लागला आहे. अमूक वा तमूक हिंदू असून हिंदूत्ववादी नसल्याचे अभिमानाने सांगतात, ती हिंदू असण्यातली चैन आहे. तशी चैन तस्लिमाला तिच्या मायदेशात करता येत नाही किंवा हमीद दलवाईना आपल्या जन्मदेशात अनुभवता येत नाही. ज्या गोष्टी सोयी वा सुविधा सहजासहजी उपलब्ध होतात, त्याची किंमत कोणाला असते? म्हणतात ना घरकी मुर्गी दाल बराबर?