बालपणीची एक आठवण आहे. आम्हा मुलांच्या हातून काही वस्तु मोडली, मग आजी कौतुकमिश्रीत रागाने म्हणायची, ‘माजो बाबा काय करी, असलेला नाय करी’. म्हणजे काही नवे निर्माण करत नाही. पण असलेल्याची मात्र नासाडी मोडतोड करतोस, असेच तिला म्हणायचे असे. आजकाल राहुल गांधी काहीसे कॉग्रेस नावाच्या आजीसाठी तसेच वागत आहेत. कारण कॉग्रेस पक्षाचे वय आजीच काय, पणजी इतके मोठे आहे. पण हे लाडावलेले पोर रोजच्या रोज काहीतरी मोडतोड करून नासाडी करीत असते. आताही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हान देण्यासाठी जे काही आकांडतांडव चालविले आहे, त्यातून कॉग्रेस अधिकाधिक गोत्यात आणलेली आहे. उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणूका तीन महिन्याच्या अंतरावर आलेल्या असून, त्यासाठी सर्वात आधी सहा महिने राहुल व कॉग्रेस यांनी कामाला आरंभ केला होता. तेव्हा त्यांना या देशातील सर्वात मोठ्या राज्यात स्वबळावर उभे रहाण्याची उबळ आलेली होती. त्यासाठी त्यांनी लोकसभेत मोदींना इतके मोठे यश मिळवून देणारा रणनितीकार प्रशांत किशोर याला कोट्यवधी रुपये मोजून हाताशी धरला होता. त्याच्याच अभ्यासानंतर या निवडणूकीची रणनिती निश्चीत करण्यात आली. उत्तरप्रदेश पुन्हा जिंकायचा असेल, तर तिथे ब्राह्मण नेता मुख्यमंत्री म्हणून पेश करायला हवा; असा प्रशांतचा आग्रह होता. त्यातही शक्यतो राहुल वा प्रियंकाला पुढे करावे, असाच त्याचा हट्ट होता. पण नेहरू खानदानात फ़क्त पंतप्रधानच जन्माला येत असल्याने, ती मागणी फ़ेटाळून लावण्यात आली आणि दिल्लीतून निवृत्त झालेल्या शीला दिक्षीत यांना पेश करायचा निर्णय झाला. पण त्यांनाच ऐन निवडणूकांचे पडघम वाजू लागले असताना, राहुलनीच तोंडघशी पाडले आहे. मोदींवर खळबळजनक आरोप करण्याच्या नादात, राहुलनी दिक्षीतांनाच लाचखोर घोषित करून टाकले.
थोडक्यात आता मतदानाचा दिवस जवळ येत असताना, आपल्याच उमेदवाराला राहुलनी बुडवले आहे. अर्थात राहुलची मोडतोड इतकीच नाही. त्याचे अनेक किस्से आहेत. या मोहिमेला राहुलच्या किसानयात्रेने आरंभ झाला होता. महिनाभर गावोगाव फ़िरून राहुल गावकरी शेतकरी यांच्याशी संवाद साधतील, अशी कल्पना होती. त्यासाठीच या चर्चेला ‘खाटपे चर्चा’ असे नाव देण्यात आलेले होते. पण चर्चा बाजूला पडली आणि पहिल्या काही दिवसात जिथे म्हणून अशा सभा झाल्या, तिथे सभा आटोपताच लोक खाटा पळवून नेण्यासाठी हाणामारी करताना दिसले. किंबहूना सभेत राहुल काय बोलले यापेक्षा खाटा पळवण्याची हाणामारी, हाच बातमीचा विषय होऊन गेला. अशा रितीने प्रशांत किशोरच्या रणनितीचा राहुलनी यशस्वीपणे बोर्या वाजवून दाखवला. दरम्यान उत्तरप्रदेश विधानसभा बाजूला राहिली. मोदींना कोंडीत पकडण्य़ाचे नवे खुळ राहुलच्या डोक्यात शिरले आणि त्यांनी संसदेतील विरोधी राजकारणाची सुत्रे आपल्या हाती घेतली. सुदैवाने नोटाबंदीमुळे हैराण झालेल्या विरोधी पक्षांनी राहुल वा कॉग्रेसला साथ दिली. पण कुठल्याही बाबतीत आपली नसलेली अक्कल वापरण्याचा अट्टाहास केला, मग बट्ट्याबोळ व्हायचाच. इथेही तसेच झाले. संसद अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत विरोधकांची जमलेली एकजुट बघून राहुल इतके चेकाळले, की त्यांनी कॉग्रेसच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींकडे शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. बाकीचे पक्षही तयार झाले होते. पण इतक्यात कुठून तरी नवी कल्पना पुढे आली. त्याच दिवशी सकाळी राहुलनी पक्षाचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटण्याची आय़डिया काढली. बाकीचे पक्ष त्यामुळे विचलीत होऊन गेले. जो पंतप्रधान संसदेत हजर रहात नाही म्हणून बोभाटा केला, त्याला संसद भवनातल्या ऑफ़िसमध्ये भेटायचे, म्हणजे आपल्याच आरोपावर बोळा फ़िरवणे होते.
सहाजिकच राहुलच्या या चमकारीक वागण्याने अन्य पक्ष बिथरले आणि राष्ट्रपती भवनात येण्यापासून त्यांनी फ़ारकत घेतली. परिणामी पुरता विचका उडू नये, म्हणून आजारी असूनही सोनियांना राष्ट्रपती भवनाचा फ़ेरफ़टका मारण्याची सक्ती झाली. तो विषय निकाली निघाला नाही, इतक्यात गुजरातच्या सभेत जाऊन राहुलनी शिळ्या कढीला ऊत आणल्यासारखा सहारा डायरीचा फ़ुसका बार सोडला. मग पुन्हा कॉग्रेसला तोंड लपवण्याची वेळ आली. कारण आधी केजरीवाल यांनी त्यांना खिजवले होते आणि बोलायला भाग पाडले होते. मोदींवर आरोप केलात तर मेहुणा वाड्रालाला तुरूंगात जावे लागेल; अशी हुलकावणी केजरीवालनी दिली आणि राहुलनी सहारा डायरीचा गौप्यस्फ़ोट केला. त्यामुळे तर आता कॉग्रेसची अधिकच नाचक्की झाली आहे. कारण त्यातून उत्तरप्रदेशातील राजकारणाचा व निवडणूकीचा राहुलने पुरता बोर्या वाजवला आहे. किंबहूना निवडणूका राहिला बाजूला आणि भलतेच खुलासे करण्याची वेळ पक्षावर आलेली आहे. आज तरी अन्य विरोधी पक्षांना सोबत घेतल्याखेरीज कुठलेही राजकारण करण्याइतकी कॉग्रेस समर्थ राहिलेली नाही. अशावेळी इतरांना सोबत राखण्यातले कौशल्य आणि पक्षाच्या संघटनेला बलिष्ठ बनवण्याला प्राधान्य असायला हवे. पण संघटना वा विरोधकांशी सहकार्य म्हणजे काय, तेच राहुलला अजून कोणी समजावलेले नाही. म्हणूनच प्रत्येकवेळी पोषक स्थिती होत आलेली असताना, राहुल त्याचा पुरता बोजवारा उडवताना दिसत आहेत. आताही नोटाबंदीची मुदत संपत असताना, विरोधी पक्षांनी एकत्रितपणे काय भूमिका घ्यावी ते ठरवण्यासाठी स्वतंत्रपणे बैठक बोलावण्यात आली होती. त्यात परस्पर निर्णय घेण्याच्या आगावूपणाने फ़ाटाफ़ुट झाली आहे. अनेक पक्षांनी तिकडे पाठ फ़िरवली आहे. थोडक्यात वरीष्ठांनी जमवाजमव करायची आणि राहुलने सगळी रांगोळ उधळायची, असा खेळ चालू आहे.
२०१४ च्या उदयाला म्हणजे तीन वर्षापुर्वी लोकसभा निवडणूकीचे वेध लागलेले असताना, जयपूर येथे झालेल्या कॉग्रेस चिंतन शिबीरात राहुल यांच्यासाठी कॉग्रेसमध्ये उपाध्यक्ष नामक नवे अधिकारपद निर्माण करण्यात आले. तेव्हापासून पक्षाचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडे गेलेले आहेत. त्याच्या परिणामी त्यांनी कॉग्रेसला काय मिळवून दिले, त्याचा शोध घेण्यासाठी भिंगातून बघावे लागेल. पण राहुलनी पक्षाचे किती व कोणते नुकसान केले, त्याचा हिशोब मांडायचा तर श्वेतपत्रिकाच काढावी लागेल. जणू आपल्या वडिलार्जित वारश्याचा अधिकार वापरून हा शतायुषी पक्ष नेस्तनाबूत करण्याची आपली जबाबदारी असल्याप्रमाणे राहुल वागत आहेत. किंबहूना त्याला कुठले ताळतंत्र राहिलेले नाही. त्यांना पक्षात कोणी रोखूही शकत नाही. ज्येष्ठ अनुभवी कॉग्रेस नेत्यांना हा धोका दिसत नसेल असे अजिबात नाही. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, असा प्रश्न असतो. राहुल चुकतात असेच नव्हेतर मुर्खपणा करतात, असे अनेक नेते खाजगीत बोलूनही दाखवतात. मात्र तसे समोर वा जाहिरपणे बोलायची कोणाची हिंमत नाही. कारण तात्काळ त्याचीच पक्षातून हाकालपट्टी व्हायची. सहाजिकच त्यांनी चांगल्या धोरणांची वा परिस्थितीची नासाडी करावी आणि अन्य नेत्यांनी त्याचेच कोडकौतुक करावे; अशी अवस्था होऊन बसली आहे. परिणामी मोठा पक्ष म्हणून कॉग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी एकजुट करण्याचे इतर पक्षांचेही प्रयत्न धुळीस मिळवले जात असतात. कारण एकजुटीचा लाभ मिळण्याची शक्यता कमी असून, राहुलमुळे कॉग्रेस सोबत जाण्याचे तोटेच अन्य पक्षांना भेडसावत असतात. आता कॉग्रेसच नव्हेतर अन्य पक्षाच्या नेत्यांनाही आपण जुळवून आणलेल्या गोष्टी राहुल कशा उधळून टाकतात, त्याचे खुप अनुभव आलेले आहेत. तेही म्हणत असतील, राहुल बाबा काय करी? असलेला नाय करी!
भाऊ।
ReplyDeleteएक तरूण (?) एका राष्ट्रीय पक्षाला (?) नेतृत्व (?) देण्याची धडपड करतोय, रात्रंदिवस झटतोय, आणि तुम्ही तर त्याला. . . . . . . . .