नोटाबंदीची मुदत संपत आलेली असताना अनेक जागी धाडी पडत असून, अनेक खात्यात भरलेल्या मोठ्या रकमाचे थक्क करून सोडणारे आकडे समोर येत आहेत. त्यातच बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा समावेश आहे. नोटाबंदीला पहिल्या दिवसापासून कडाडून विरोध करणार्यांमध्ये मायावती आघाडीवर होत्या. ज्यांनी त्यानंतर लोकांच्या कष्टासाठी अश्रू ढाळले, त्यातही मायावती पुढे होत्या. संसदेत बोलताना त्यांनी एक प्रश्न विचारला होता, कुठल्या बॅन्केच्या दारात लागलेल्या रांगेत काळापैसावाला उभा आहे ते दाखवा. ऐकणार्याला असे प्रश्न बिनतोड वाटत असतात. कारण खरेच कोणी श्रीमंत वा नोटांची बंडले घेऊन रांगेत ताटकळताना दिसलेला नव्हता. पण रांगा कशासाठी लागल्या होत्या, त्याकडे असा प्रश्न विचारणारे मुद्दाम डोळेझाक करीत होते. लोकांच्या रांगा पैसे भरण्यासाठी लागल्या, त्या कमी होत्या. ज्यांच्यापाशी नोटा बदलून घेतल्याशिवाय संसाराचा गाडा चालण्याइतके पैसे नव्हते, त्यांचीच अशी झुंबड उडालेली होती. कारण अपुरे पैसे ज्यांच्या गाठीला होते आणि अशा मोठ्या नोटा बदलून घेतल्यशिवाय ज्यांचा संसार चालणार नव्हता. त्यांना रांगेत ताटकळण्याखेरीज पर्याय नव्हता. काळापैसा अशा लोकांपाशी नसतोच. ज्यांच्यापाशी बेहिशोबी काळापैसा असतो, तो थप्पी लावलेला असतो. त्याचा वापर संसाराचा गाडा खेचण्यासाठी होत नाही. तर चैनमौज करण्यासाठी वा गैरलागू धंदे करण्यासाठी, असा थप्पीतला पैसा वापरला जात असतो. त्यामुळेच त्यांनी उन्हात वा रांगेत जाऊन उभे रहाण्याचा विषयच नव्हता. त्यांनी आरामात आपल्या मोठ्या रकमा भरणा केल्या आणि काम संपले. जेव्हा केव्हा मिळतील तेव्हा मिळतील, इतकी त्यांच्यापाशी सुबत्ता असते. मायावती त्यापैकीच एक आहेत. म्हणूनच त्यांना कुठे रांगेत उभे रहावे लागले नाही, की नोटा बदलून घेण्याची घाई नव्हती.
दिल्लीतील युनियन बॅन्केत त्यांच्या पक्षाच्या खात्यामध्ये डिसेंबरच्या आठ दिवसात १०७ कोटी रुपयाच्या जुन्या नोटांचा भरणा झाल्याची बातमी आलेली आहे. त्याकडे आयकर खात्याचे लक्ष गेल्याने त्याची बातमी झळकली. पण मुद्दा असा, की इतके दिवस मायावतींनी ह्या जुन्या नोटा भरल्या कशाला नाहीत? रांगेत कोण दिसतो, त्याची विचारणा करण्यात गढलेल्या मायावतींनी, ही रक्कम कधी जाऊन भरली? त्यांना किती तास उन्हात ताटकळत उभे रहावे लागले, त्याचाही खुलासा झाला असता तर बरे झाले असते. पण इतकी मोठी रक्कम भरण्यासाठी आपल्याला काय त्रास झाला, त्याची कुणकुण कोणाला लागू नये याचीच काळजी मायावतींनी घेतलेली होती. म्हणूनच आयकर खात्याची वक्रदृष्टी तिकडे वळण्यापर्यंत या कानाची खबर त्या कानाला लागली नाही. किंबहुना अशा रकमेचा भरणा करण्यासाठी वा नव्या नोटा मिळाव्या, म्हणून किती त्रास झाला, त्याचाही तपशील मायावती संसदेत देऊ शकल्या असत्या. पण राज्यसभेत त्याविषयी मायावती चकार शब्द बोलल्या नाहीत. काय गंमत आहे ना? पण गंमत इथेच संपत नाही. याच मायावती व अन्य विरोधकांनी मोठ्या तावातावाने संसदेत एक सवाल केला होता. नोटाबंदी करताना पंतप्रधानांनी आपले निकटवर्तिय वा पक्षाला सावध केले, अशीही तक्रार मायावतींनी केलेली होती. एकट्या मायावतीच नव्हेतर केजरीवाल यांच्यापासून तमाम पक्षाच्या नेते प्रवक्त्यांनी आणखी एक आरोप मोदींवर केला होता. मोदींनीच आपल्या पक्षाला आधीच जुन्या नोटा बॅन्केत भरण्याच्या सुचना दिल्या, असा तो आरोप होता. कारण दोनतीन दिवस आधी बंगालच्या भाजपाने आपल्या पक्षाच्या बॅन्क खात्यात एक कोटी रुपयांचा भरणा केला होता. त्यामुळेच मोदींनी लबाडी केली, असा आरोप झाला होता. आधी वा नंतर बॅन्केत पैसे जमा केल्याने काय फ़रक पडणार होता?
भाजपाने ८ नोव्हेंबरपुर्वी एक कोटी रुपये बंगालच्या बॅन्केत भरले, म्हणून त्यांना लगेच नव्या नोटा मिळालेल्या नव्हत्या. कारण तेव्हा नव्या नोटा लागू झाल्या नव्हत्या, की जुन्या नोटा रद्दही झालेल्या नव्हत्या. पण त्याविषयी प्रत्येक पक्षाने मोठे काहूर माजवले होते. किती रक्कम होती ती? अवघी एक कोटी रुपये. भाजपाच्या शाखेने एक कोटी रुपये बदलून न घेता खात्यात भरले, तर भ्रष्टाचार होता. मग बंदी घोषित झाल्यावर मायावतींनी आपल्या पक्ष खात्यात १०७ कोटी रुपये भरले, त्याला काय म्हणायचे? ते रुपये पवित्र करून घेणे नव्हते काय? नोटा आधी भरल्याने कायदेशीर वा नंतर भरल्याने बेकायदा ठरणार होते काय? भाजपाने तेव्हा भरलेले एक कोटी आणि आता मायावतींनी भरलेले १०७ कोटी, यात नेमका कोणता गुणात्मक फ़रक आहे? कारण दोघांनाही तात्काळ नव्या नोटा बदलून मिळालेल्या नाहीत. किंवा त्यांनी भरलेल्या नोटा जप्तही झालेल्या नाहीत. भाजपाला आधी रक्कम भरली म्हणून कुठली सवलत मिळाली नव्हती आणि मायावतींनी उशिरा १०७ कोटी भरले म्हणून त्यांच्यावर कुठला अन्याय होण्याची शक्यता नाही. दोघांनाही आपण कुठून रक्कम आणली, त्याचा खुलासा द्यावाच लागणार आहे. त्यातून पंतप्रधानांचा पक्ष असल्याने भाजपाला सवलत मिळू शकत नाही. तशीच मायावतींनी ८ नोव्हेंबर नंतर १०७ कोटी भरले, म्हणून त्यांनाही सवलत मिळणार नाही. पण विरोधकांच्या वागण्यात वा बोलण्यातली तफ़ावत बघण्यासारखी आहे. भाजपाच्या एक कोटी रुपये भरण्याविषयी काहुर माजवून त्यातला भ्रष्टाचार शोधणार्यांना, त्याच्या शंभर पटीने मायावतींनी भरलेल्या रकमेविषयी चकार शब्द बोलण्याची गरज वाटलेली नाही. म्हणजेच विरोधक मायावतींना शंभरावर कोटी कुठून आणले, त्याचा सवाल विचारत नाहीत. पण तेच विरोधक भाजपाला एक कोटी कुठून आणले, असा सवाल छडी उगारून विचारत आहेत.
नोटाबंदीच्या राजकारणात दिशाभूल व पक्षपात कसा चालू आहे, त्याचे हे ढळढळीत उदाहरण आहे. एक कोटी भाजपाचे असले तर भयंकर गुन्हा असतो. पण मायावतींची रक्कम शंभर पटीने मोठी असली, तरी डोळेझाक करण्यासारखी नगण्य बाब असते. मायावतींचा एकही खासदार लोकसभेत निवडून आणता येत नाही आणि उत्तरप्रदेश बाहेर त्यांच्या पक्षाचा फ़ारसा प्रभाव नसला, तरी त्यांच्यापाशी १०७ कोटी रुपये वर्गणीतून जमू शकतात. पण देशात व अनेक राज्यात भाजपाची सरकारे असली आणि देशभर पक्षाच्या प्रभावी शाखा असल्या, तरी त्यांच्याकडे एक कोटी रुपये भरायला कुठून पैसे आले, असा सवाल डोळे वटारून विचारला जाऊ शकतो. याला स्मृतीभ्रंश नाही तर काय म्हणायचे? ज्यांनी म्हणून बंगालच्या भाजपा शाखेने एक कोटी रुपये ८ नोव्हेंबरपुर्वी भरल्याचा जाब विचारला होता, त्यांनी आता तसाच मायावतीना जाब विचारायला नको काय? पण एकाही विरोधी पक्षाने तसा जाब विचारलेला नाही. यातून आपण कुठला निष्कर्ष काढू शकतो? विरोधकांचा निकष कुठला असतो? मोदी वा त्यांच्या पक्षाने काहीही करावे, तो गुन्हा मानला जावा, हाच निकष नाही काय? तसे नसते तर मायावतींना विरोधकांनी या १०७ कोटीविषयी खुलासा नक्कीच विचारला असता. तसे नसेल तर त्याच विरोधकांनी बंगालच्या भाजपाने बॅन्केत एक कोटी रुपयांचा भरणा केल्याविषयी बोलायचे टाळले असते. सामान्य माणसे अशा वर्तनाला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. अगदीच साध्या भाषेत त्याला बेशरमपणाही म्हणतात. त्यामुळेच विरोधकांनी कितीही गदारोळ केला, तरी सामान्य लोकांनी सर्व त्रास सहन करून मोदींना साथ दिली आहे. कारण विरोधक आपल्या त्रासाचा राजकीय लाभ उठवू बघतात, हे लोकांना कळते आणि त्याच पद्धतीने पंतप्रधान काही चांगले व देशहिताचे करीत असल्याची लोकधारणा झालेली आहे.
अनेक वर्षानंतर लोकांना कणखर नेता मिळाला आहे. मिळमिळीत सौभाग्य कुणालाच आवडत नाही, म्हणूनच जगात मोदीचा दरारा वाढुन भारतात पाठिंबा मिळत आहे. भारतीयांना जगात ताठ मानेने जगण्यासाठी हाच नेता उपयोगी आहे हे जनतेने जाणले, म्हणून ते विरोधकांच्या भुलथापाना बळी पडत नाही. जनता विसराळु असली तरी वेडी नाही. त्यांना १ आणी १०७ मधला फरक आणी दलित की बेटीही कळते .
ReplyDelete