यासिन भटकळला त्याच्या अन्य साथीदारांसह फ़ाशीची शिक्षा झाली आहे. आता त्याबद्दल अनेकांना आनंद होईल, तर काहीजणांच्या घरात शोककळा पसरल्याशिवाय रहाणार नाही. कारण अशा लोकांना कोणाला वा कशाला फ़ाशी सुनावली, त्याच्याशी काडीचे कर्तव्य नाही. त्यांच्यालेखी फ़ाशी ही रानटी शिक्षा आहे आणि म्हणूनच ती माणसाने देता कामा नये. माणसांच्या जगात जगण्यासाठी माणसांचे नियम जे पाळणार नाहीत, त्यांनाही माणूस समजून अभय मिळाले पाहिजे. अशी काही खुळचट कल्पना घेऊन बसलेल्या मुठभरांनी हे जग अतिशय भयावह करून टाकलेले आहे. त्यातूनच यासिन भटकळसारखे जिहादी वा हिंसाचारी उपजत असतात. सहाजिकच आता अशा लोकांना यासिनचा उमाळा येऊन नव्याने जुन्याच याकुब मेमनचे नाटक सुरू होईल. याकुबला फ़ाशी देण्यासाठी न्यायव्यवस्थेला किती उठाबश्या काढायला लागल्या होत्या, हे आपण अजून विसरलेलो नाही. त्यामुळे यासिनला फ़ाशी दिल्याचा आनंद साजरा करण्यापेक्षाही, त्याच्या बचावाला आता किती मानवाधिकारवाले सज्ज होतील, त्याची भिती अधिक आहे. यांच्या मानवाधिकारापेक्षा यासिनचे घातपात परवडले, असे म्हणायची पाळी लोकांवर आणली जाईल. त्यातून यासिनवर कसे व किती अमानुष अत्याचार होऊ घातले आहेत, त्याचा पाढा नव्याने ऐकण्याची मानसिक तयारी आपण केलेली बरी. सवाल एका फ़ाशीचा नाही. कारण आतापर्यंत अफ़जल गुरू वा याकुब मेमन अशा अनेकांना फ़ाशी झालेली आहे. त्यात निकाल व युक्तीवाद स्पष्ट झालेले असल्याने, नव्याने तेच युक्तीवाद होणार नाहीत वा करू दिले जाणार नाहीत, याची कोणीतरी काळजी घेतली पाहिजे. हे असेच नाटक चालू राहिले, तर सामान्य माणसाला सुखरूप जगणेच कठीण होऊन जाईल. दिल्लीत निर्भयांची संख्या वाढतच जाईल. तिथेही तेच नाटक आहे.
चार वर्षापुर्वी दिल्लीतल्या एका मुलीवर भर हमरस्त्यावर धावणार्या बसमध्ये सामुहिक बलात्कार झाला, म्हणून देश संतापून उठलेला होता. अगदी त्यासाठी दंडविधान कायद्यात बदल करण्यापर्यंत पाळी आली. पण असा बदल वा दुरूस्ती होईपर्यंत लोक शांत होऊन गेले आणि कुठलीही कठोर शिक्षा बलात्कार्याला देण्याची तरतुद होऊ शकली नाही. वाजतगाजत एका समितीने नव्या सुधारणा सुचवल्या आणि त्यात अशा अमानूष बलात्काराला फ़ाशीची तरतुद करण्याचे टाळले गेले. फ़ार कशाला आरोपी अल्पवयीन कृत्यावरून ठरवण्याच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. परिणाम समोर आहेत. चार वर्षे उलटून गेल्यावर त्याच राजधानी दिल्लीत तसाच एका मुलीवर सामुहिक बलात्कार झालेला आहे. याचा दोष मग पोलिस वा कायदा सुव्यवस्थेवर टाकून पळ काढला जातो. गल्लीकुच्यात प्रत्येक जागी पोलिसांना उभे करता येत नाहीत. शिवाय पोलिसही बलात्कार करणार नाही, याची कोणी शाश्वती देऊ शकत नाही. म्हणूनच कायद्याच्या राज्यात शिक्षेची तरतुद केलेली आहे. नुसता कायदा कुणाला घाक घालत नाही. कायदा मोडल्यावर शिक्षा होण्याचे भय कायद्याचा धाक निर्माण करीत असते. पण मानवाशिकार व उदारमतवाद यांनी कायद्यालाच लुळापांगळा करून टाकला आहे. जिथे कायदा तत्पर असेल, अशा जागी शिक्षाच निकामी करून टाकली आहे. खरी समस्या तिथेच आहे. म्हणूनच यासिन भटकळ व त्याच्या साथीदारांना शिक्षा ठोठावली गेल्याने समस्या संपलेली नाही. अजून त्याच्या शिक्षेवर किंवा फ़ाशीवर हायकोर्ट व सुप्रिम कोर्टाचे शिक्कामोर्तब व्हायचे आहे. तेही झाले तरी त्याला राष्ट्रपतींकडे क्षमायाचना करण्याचा अधिकार आहेच. काय आधुनिकता आहे ना? सामान्य नागरिकाला सुखरूप जगण्याचा कुठलाही अधिकार नाही. पण गुन्हेगाराला मात्र शोधत जाल तितके अधिकार आहेत. त्यातूनच यासिन भटकळ निपजतात.
यासिन कुठून निपजतात? काही गैर केल्यास वा घातपाती हिंसा केल्यास आपल्याला भयंकर शिक्षा होऊ शकते, अशी खात्री गुन्हेगाराला रोखू शकते. पण आजकाल तशी भिती कोणालाच नाही. यासिनला शिक्षा झाली. त्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने शोध घेऊन त्याला अटक केली व पुरावे साक्षिदार आणुन त्याला दोषी ठरवले. त्याच संस्थेने कालपरवा कोर्टामध्ये पठाणकोट घातपाती हल्ल्याच्या विरोधातला ही खटला दाखल केला आहे. त्यासाठीचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यातला आरोपी कोण आहे? त्याच आरोपीच्या सुखरूप निसटण्याच्या प्रोत्साहनातून यासिन निपजत असतात. पठाणकोटच्या खटल्यातला मुख्य आरोपी जैशे महंमदचा संस्थापक म्होरक्या मौलाना अजहर मसूद हा आहे. तो सतरा वर्षापुर्वी भारताच्याच एका तुरूंगात खितपत पडलेला होता. आज त्याच्यावर आरोपपत्र असले, तरी तो भारताच्या ताब्यात नाही, की इथल्या तुरूंगात नाही. कारण तो पाकिस्तानात अतिशय सुखरूप जागी आहे. पण सतरा वर्षापुर्वी तो भारताच्या तुरूंगात काश्मिरमध्येच होता. तिथे अनेक वर्षे असूनही त्याच्यावरचा खटला मात्र कुर्मगतीने चालत होता. त्यामुळेच त्याच्या जीवाला कुठला धोका नव्हता. मग १९९९ सालाच्या नववर्षदिनी नेपाळहून भारताकडे येणारे प्रवासी विमान पळवून नेण्यात आले. अफ़गाणिस्तानात कंदाहार येथे विमान नेल्यावर सव्वाशे प्रवाश्यांना ओलिस ठेवलेल्या अतिरेक्यांनी, याच अजहर मसूदला सोडण्याची मागणी केली. मागणी मान्य झाली नाही तर विमानासह सर्व प्रवाश्यांना उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली होती. अखेर ती मान्य झाली आणि मसूदला पाठवून देण्यात आले. तितके दिवस खटला लांबला नसता आणि आधीच मसूद फ़ासावर लटकला असता, वा बुर्हान वाणीप्रमाणे चकमकीत ठार मारला गेला असता तर? पुढला अनर्थ घडला असता काय?
यासिनला पकडल्यापासून सव्वातीन वर्षात त्याचा खटला निकाली निघाला आहे. तसाच मसूदचा निकाल लागला असता तर जैसे महंमद स्थापन झाली नसती. किंवा पठाणकोटच्या हल्ल्याचा तपास करून आरोपपत्रही सादर करावे लागले नसते. त्यात हकनाक मारले गेलेल्यांना आजही याच जगात सुखरूप जगता आले असते. पण मानवाधिकार वा न्यायालयिन खोळंब्यामुळे सतत मानवी जीवन धोक्यात आणले गेले आहे. त्या कायद्यांना आज बदलता येत नसेल, तर निदान त्यानुसार चालणारे असे खटले तरी युद्धपातळीवर चालवले जावेत. अधिक वेगाने अशा अतिरेकी जिहादींना शिक्षा ठोठावली जावी. यासिनच्या खटल्याचा निकाल लागण्याचा म्हणून आनंद तात्पुरता आहे. कारण अजून बरेच सव्यापसव्य बाकी आहे. त्याला शिक्षा वा फ़ाशी होण्यापेक्षाही कायदा व शिक्षा अधिक कठोर होऊन, अशा हिंसाचाराकडे मुले वळू नयेत; यासाठी काही होण्याची गरज आहे. अजून यासिनचा भाऊ व साथीदार रियाझ पाकिस्तानात असून, देशातून इसिसकडे जाण्याच्या मोहात सापडलेले मुस्लिम तरूणही शेकड्यांनी आहेत. त्याकडे पाठ फ़िरवून यासिनच्या फ़ाशीचा डंका पिटण्यात अर्थ नाही. कारण एका जिहादीला फ़ाशी देऊन, ती मानसिकता संपणारी नाही. तर त्याकडे आकर्षित होण्याची मनोवृत्ती खच्ची करण्याला महत्व आहे. यासिनच्या फ़ाशीने तसे काही होऊ शकेल असे वाटत नाही. कारण यासिन एकटा नाही. त्याच्या हिंसाचाराचे उदात्तीकरण करणार्यांचा गोतावळा अनेक मोठ्या विद्यापीठापासून प्रतिष्ठीत जागी विराजमान झालेला आहे. बगदादी वा लादेन त्यांचे सुत्रधार नाहीत. अशा हिंसाचाराला पाठीशी घालण्याचे कायदेशीर बौद्धीक मार्ग शोधून देणारे हयात असतील, तोपर्यंत जिहाद वा हिंसाचारापासून जग मुक्त होऊन शकत नाही. म्हणूनच यासिनच्या फ़ाशीने हर्षवायू होण्याचे काही कारण नाही.
उद्या बगदादी पकडल्यावर (तो जिवंत पकडलाच तर) त्यालाही फाशी देऊ नका म्हणतील हे मानवाधिकारवाले. ह्यांचा काही भरवसा नाही.
ReplyDelete