Saturday, December 31, 2016

पैसा झाला खोटा

noteban के लिए चित्र परिणाम

गेल्या मंगळवारी लोकमत, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्सच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये एकच बातमी आकड्यांसह प्रसिद्ध झाली आहे. ३० डिसेंबरची मुदत संपण्यापुर्वीच ९० टक्के जुन्या नोटा बॅन्केत जमा झाल्या आणि त्यामुळे काळापैसा हुडकून काढण्याच्या मोदी सरकारच्या स्वप्नावर पाणी पडले; असल्याचा निष्कर्ष त्यातून काढण्यात आला आहे. १५.४ लाख कोटी रुपये किंमतीच्या या नोटा चालनातून काढून घेतल्या होत्या आणि नव्या नोटा जारी करताना, त्यातील किमान तीन ते चार लाख कोटी रुपयांचे चलन व्यवस्थेच्या बाहेर जाईल; अशी अपेक्षा सरकारने केली होती. पण मुदतीपुर्वीच त्यातील १४ लाख कोटी पुन्हा जमा झालेले असल्याने फ़ारतर एकदिड लाख कोटीच रक्कम व्यवहाराच्या बाहेर जाईल. सहाजिकच सरकारचा अपेक्षाभंग झाला आणि बहुतांश नोटा परत आल्याने, तो सगळा पैसा नियमित वा पांढरा ठरला आहे; असेच त्यातून सुचवले गेले अहे. तिन्ही वृत्तपत्रातील बातमी बारकाईने वाचली व समजून घेतली, तर त्यामागचा सुत्रधार कोणी एकच व्यक्ती असावी, हे लपून रहात नाही. कारण त्यातले आकडे व युक्तीवादाचह निष्कर्ष सारखाच आहे. त्यातून नोटाबंदीचा मोदी सरकारचा निर्णय फ़सला आणि सामान्य माणसाला मात्र हकनाक त्रास झाला, असे मत बनवून देण्याचा तो प्रयास आहे. किंबहूना त्यातून वाचकाची दिशाभूल करण्याचा प्रयास लपून रहात नाही. कारण ही माहिती नेमकी कोणी दिली वा निष्कर्ष कोणी काढला, त्याचा उल्लेख कुठेही नाही. तीन वृत्तपत्रांचे वेगवेगळे वार्ताहर एकाच आकडेवारीवरून एकाच चुकीच्या युक्तीवाद व निष्कर्षापर्यंत कसे पोहोचू शकतात? त्याचा त्यातून उलगडा होत नाही. कारण निकष व निष्कर्षच मुळात चुकीचा व बिनबुडाचा आहे. सर्व नोटा जमा होणार नाहीत, असे सरकारने केव्हाही म्हटलेले नव्हते आणि ज्या जमा झाल्या, त्या सर्व नोटा पांढर्‍या असल्याचे या दिडशहाण्यांना कोणी सांगितले?

पहिली गोष्ट म्हणजे नोटाबंदीचा हेतू व त्यामागची योजना संपुर्णपणे गोपनीय होती आणि सरकारनेही आपल्या सर्व गोष्टी साफ़ कथन केलेल्या नाहीत. किंबहूना असे दिशाभूल करणारे लोक राजकीय भामटेगिरी करणार, याची खात्री असल्यानेच सरकारने त्यांना अफ़वा पिकवण्याची मोकाट संधी दिलेली आहे. यातल्या काही हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा होणार नाहीत, हे उघड होते. पण ज्या जमा होतील त्या बेहिशोबी नाहीत, असे या वार्ताहरांना कोणी सांगितले? आज फ़क्त नोटा जमा झालेल्या असून, मोठ्या संख्येने व रकमेने भरलेल्या नोटांच्या बदली नोटा देण्यावरच प्रतिबंध आहे. चौदा लाख कोटीहून अधिक चलन परत आलेले असले, तरी सहा लाख कोटीपेक्षा अधिक चलनाच्या मोठ्या नोटा सरकारने बाजारात येऊच दिलेल्या नाहीत. म्हणजेच चौदा लाखपैकी आठ लाख कोटीच्या जुन्या नोटा जमा झाल्या, त्याच्या बदल्यात मिळायच्या नोटा भरणा करणार्‍यांना अजून मिळालेल्या नाहीत. त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा आहे आणि त्यातल्या अनेकजणांना त्यासाठी खुलासा दिल्याखेरीज त्या रकमा पुन्हा काढता येणार नाहीत. सगळी गोम तिथेच तर आहे. सामान्य माणसाने पाचपन्नास हजार रुपये भरले वा दोनतीन लाख रुपयांचा बॅन्केमध्ये भरणा केला असूनही, त्यांना त्या सर्व रकमेच्या नोटा मिळू शकलेल्या नाहीत. मग मोठ्या रकमा भरणार्‍यांची कथा काय असेल? अशी आठ लाख कोटी रुपयांची छाननी अजून व्हायची आहे. त्यानंतरच त्यातली किती रक्कम हिशोबी व पांढरी ते ठरायचे आहे. नुसत्या नोटा बॅन्केत भरल्या, म्हणजे पांढरा पैसा होत असता, तर आजवर लोकांनी अशा नोटांच्या थप्प्या घरात लपवून ठेवल्या नसत्या. नित्यनेमाने आपल्यापाशी जमतील त्या नोटा खात्यात भरल्या गेल्या असत्या. त्यामुळेच ही बातमी देणारा किंवा ठळकपणे प्रसिद्ध करणारा, नोटाबंदीविषयी अज्ञानी असावा किंवा भामटेगिरी करीत असावा.

हल्लीच कुठल्या सभेत पंतप्रधान मोदींनी अशाच लोकांचा उल्लेख केला होता. ‘काही लोकांना वाटले होते आपली बॅन्केत ओळख व वशिले आहेत तेव्हा सहजगत्या नव्या नोटा बदलून घेऊ आणि निसटू. पण बॅन्केत नोटा जमा करण्यापासूनच खरी सापळ्याची सुरूवात होते’ असा मोदींचा सूर होता. त्याचा अर्थ असा, की बॅन्केत बाद नोटा भरण्याची मुभा आहे. पण काढताना मात्र नव्या नोटा सहजासहजी मिळू शकत नाहीत. म्हणजे तुमच्या भरणा रक्कम आणि त्या खात्यातली आजवरची उलाढाल बघून, मगच नव्या नोटा मोठ्या संख्येने काढता येतील. उंदिर असो की बिबळ्या असो, त्याला पिंजर्‍याच्या आत येण्याची सुविधा ठेवलेली असते. पण तितक्या सहजतेने त्याला बाहेर पडण्याची मुभा ठेवलेली नसते. यापेक्षा नोटाबंदीचा सापळा किंचीतही वेगळा नाही. तो ज्यांना समजलेलाच नाही, त्यांना नोटा खात्यात भरल्या म्हणजेच काळापैसा पांढरा झाला, असा भ्रम होऊ शकतो. पण तो भ्रमच असू शकतो. कारण गेले पन्नास दिवस देशभर कल्लोळ कशासाठी चालला आहे, त्याकडे अशा भ्रमिष्ट वार्ताहरांचे लक्षही गेलेले नाही. इतक्या सहज खात्यातला पैसा पांढरा होऊ शकला असता, तर लोकांना चलनटंचाई कशाला भेडसावली असती? व्यापारी, कंपन्या व ठेकेदार अशांना आपल्या कामगारांना पगार देण्याइतक्याही नोटा परत मिळू शकल्या नाहीत. कारण त्यांनाही अजून हव्या तितक्या रकमा काढता आलेल्या नाहीत. मग ज्यांनी भरमसाट रकमा अकस्मात जमा केलेल्या आहेत, त्यांची उद्या पैसे काढताना किती तारंबळ होईल? ती चाळणी आहे. त्यात काळा-गोरा ठरेल आणि मगच नोटाबंदीने किती काळापैसा जाळ्यात सापडला; त्याचा खुलासा होईल. अजून नुसत्या खबरी मिळण्यावर धाडी पडत आहेत. बॅन्क खात्याच्या छाननीनंतर व्हायची झाडाझडती अजून खुप दूर आहे. त्यात कितीजण आपल्या कोट्यवधीच्या रकमांचे रास्त पटणारे खुलासे देऊ शकतात, ते बघायचे आहे.

चौदा लाख कोटीहून अधिक रक्कम खात्यात जमा झाली, म्हणजे व्यवहारात आली असे होत नाही. सध्या फ़क्त सहा लाख कोटीच त्यापैकी व्यवहारात आले आहेत आणि आठ लाख कोटीची टंचाई आहे. त्त्यापैकी ज्याची नित्याची उलाढाल समाधानकारक असेल, त्यांना नववर्षापासून हव्या तितक्या मोठ्या रकमा काढता येतील. पण ज्यांच्या खात्यांना अकस्मात सूज आलेली आहे, त्यांना त्याचा सविस्तर समाधानकारक खुलासा द्यावा लागणार आहे. तो ज्यांच्यापाशी नाही, ते बॅन्केकडे फ़िरकणारही नाहीत. असे मुठभर लोक सध्या पकडले जात आहेत. तामिळनाडूचा राममोहन राव, कोलकात्याचा पारसमल लोढा किंवा दिल्लीचा राकेश टंडन; त्यापैकीच आहेत. असे हजारो शेकड्यानी टंडन, लोढा, राव जानेवारीनंतर छाननीतून समोर यायचे आहेत. तेव्हाच जाळ्यात किती मासे फ़सले आणि कोणाकोणाला भरलेल्या रकमांच्या नव्या नोटा नकोच आहेत, त्याचेही गणित साफ़ होत जाईल. तोपर्यंत असल्या बातम्या पसरवणे हा मुर्खपणा आहे, किंवा निव्वळ अफ़वाबाजी आहे. तसे नसते तर मायावतींना समोर येऊन खुलासा देण्याची गरज भासली नसती किंवा काही माध्यमांना अशा अफ़वाही पसरवण्याची गरज वाटली नसती. किंबहूना त्यासाठीच पाचशेच्या नोटा छापलेल्या असूनही बॅन्कातून वितरीत झालेल्या नाहीत. ती नोटांची टंचाई नव्हती, की छपाई अभावी टंचाई निर्माण झालेली नाही. तोच तर सापळा आहे. लोकांना थोडा त्रास आज झालेला आहे आणि लोकही काहीसे रागावलेले असणारच. पण दोन महिन्यात अशा दोनचार लाख कोटीच्या भरलेल्या नोटांचा काळापैसा चव्हाट्यावर येईल, तेव्हा मोदी त्याचे श्रेय त्याच रांगेत ताटकळलेल्या सामान्य जनतेला देतील. कारण त्या कोट्यवधी लोकांनी हा टंचाईचा त्रास सोसला नसता, तर इतक्या मोठ्या रकमांचा काळापैसा बॅन्कखात्यांच्या जाळ्यात बाद नोटांच्या स्वरूपात जमाही झाला नसता. जेव्हा तो खोटा पैसा बाहेर आलेला कळेल, तेव्हा लोकच म्हणतील,

पैसा झाला खोटा
आनंद झाला मोठा

6 comments:

  1. खरे आहे. फरार छान विश्लेषण सर.

    ReplyDelete
  2. Please translate this into English and publish. Will be useful for circulating at social media and will increase it's reach. Thanks!

    ReplyDelete
  3. सुंदर विश्लेषण भाऊ! सामान्य वाचकांसाठी असे बारकावे उलगडुन दाखवण्याची गरज असते.
    असेच लिहीत रहा,नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

    ReplyDelete
  4. Dear Abhijit, you can easily translate it with Google trànsleter, it's easy.

    भाऊ, तुमचे लेख, अत्यन्त परखड़ अन वस्तुनिष्ठ असतात, कायम आम्हाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात, जमिनीवर ठेवतात, धन्यवाद🙏🙏

    ReplyDelete
  5. मस्त आणि मस्त

    ReplyDelete
  6. आता वर्ष २०१७ संपता संपता अनेक गोष्टींचा खूलासा झाला,
    साधे ऊदाहरण २०१७ अंबानीचे जिओ एकदम फॉर्म मध्ये येने सर्वांना माहीती असेल अंबानीनी किती जिवाची मेहनत केली मोदींच्या निवळनूकीवर पैश्या पासून तर थेट प्राईवेट विमान व हेलीकॉप्टर पर्यंत.
    काळा पैसा तर अजूनही दिसत नाही,
    राहली नोट बंदी दरम्यान पकळलेल्या काळ्या पैश्याचे टिवी प्रसारन त्याचे तर काय झाले तेच कळले नाही अजून. नाही कूठे तक्रार आढळते किवां कूठला खटला. एकून संपूर्ण भांडवलच दिसते मोदीचे

    ReplyDelete