दुसर्या महायुध्दानंतर जगात शीतयुध्द सुरू झाले असे मानतात. म्हणजे त्या युध्दानंतर जगातला सत्तेचा तोल बदलला होता. सोवियत युनियन आणि अमेरिका अशी दोन नवी सत्ताकेंद्रे उदयास आलेली होती. त्यातच युरोप उध्वस्त झालेला असताना सोवियत फ़ौजांनी पुर्व युरोपातील अनेक लहानमोठ्या राष्ट्रांवर आपल्या फ़ौजांचे बळ वापरून स्थानिक कम्युनिस्टांनी हुकूमशाही लादलेली होती. त्यात बाकीचा पश्चीम युरोप भरडला जाऊ नये, म्हणुन पाश्चात्य राष्ट्रांनी अमेरिकेच्या छत्रछायेखाली नाटो नावाची संस्था स्थापन केली. मग पुढली चार दशके जगातल्या कम्युनिस्ट प्रभावाला रोखण्याची जबाबदारी घेऊन अमेरिका धडपडत राहिली. तिच्या सीआयए नामक हेरसंस्थेने जगातल्या कुठल्याही नव्या देशात कम्युनिझम येऊ नये, म्हणून किती उचापती केल्या त्याच्या कहाण्या सांगितल्या जायच्या. थोडक्यात रशियातून कम्युनिझम संपवण्याचा चंग अमेरिकेने बांधलेला होता आणि त्यासाठी लागेल तो भुर्दंड उचलण्यास अमेरिकन राज्यकर्ते राबत होते. पण कितीही जंग जंग पछाडून अमेरिकेला वा तिच्या हेरसंस्थेला ते कधी साध्य झाले नाही. प्रत्येक बाबतीत सोवियत राज्यकर्ते टिकून चोख उत्तर देत राहिले. पण चार दशकानंतर दुसर्या महायुध्दात उदयास आलेले नेतृत्व मागे पडले. रशियात नवे नेतृत्व नवे उदयास आले. अमेरिकन हेरसंस्थेला जे शिवधनुष्य पेलता आले नव्हते, तेच काम सोवियत युनियनचा म्होरक्या होऊन मिखाईल गोर्बचेव्ह यांनी पुर्ण करून दाखवले होते. १९८० च्या दशकात ब्रेझनेव्ह या कणखर सोवियत नेत्याचा मृत्यू झाला आणि पुढल्या अल्पकाळात चेर्नेन्को व अंद्रापाव्ह असे दोन सोवियत नेते सर्वोच्च पदावर येऊन काही महिन्यातच परलोकवासी झाले. त्यांच्यासोबत क्रांतीकाळातील व युध्दानंतरची पिढी सोवियत रशियातून संपली. नव्या युगाचे गोर्बाचेव्ह सत्तेत आले. त्यांनी पाचसहा वर्षात सोवियत युनियन मोडीत काढून दाखवले होते.
सोवियत कम्युनिस्ट पक्षात सरचिटणिस हाच राष्ट्रप्रमुख असतो आणि सर्व सत्ता त्याच्याच हाती एकवटलेली होती. त्यामुळेच गोर्बाचेव्ह त्या पदावर येताच, त्यांनी अनेक सुधारणा हाती घेतल्या. त्यातल्या दोन प्रमुख म्हणजे पेरेस्त्रोयका आणि ग्लासनोस्त या होत्या. त्यातून त्यांनी सोवियत साम्राज्यात लोकशाही, निवडणूका, मुक्तविचार अशा गोष्टी आणण्याचा पवित्रा घेतला. तो मुळच्या सोवियत भूमिकेला छेद देणारा होता. पण सत्ताधिकार एकवटला असल्याने नेता म्हणेल तेच सत्य, अशी धारणाच प्रभावी होती. मग गोर्बाचेव्ह यांना कोण रोखू शकत होता? काही कुरबुरी झाल्या, पण हळुहळू त्यांच्या इच्छेनुसार सोवियत युनियनवर पसरलेला पोलादी पडदा वितळू लागला. बांधून ठेवलेल्या भावना वा पशूला थोडी मोकळीक मिळाली, तरी ते हुंदडू लागतात. तसेच होऊन बघताबघता सोवियत युनियनचा डोलारा डळमळीत होत गेला. तो कधी व कुठून ढासळू लागला, तेही नेत्यांच्या लक्षात आले नाही. एका बाजूला खुद्द रशियात सत्ताकारण विस्कळीत होऊ लागले आणि दुसरीकडे परस्पर कराराने सोवियत छायेत जगणार्या देशात बंडाच्या आरोळ्या सुरू झाल्या. त्या रोखण्यासाठी रणगाडे व सेनेलाही आणले गेले. पण उपयोग झाला नाही आणि जनक्षोभासमोर सेनेने बंदुका खाली ठेवल्या. अर्थात गोर्बाचेव्ह यांनी त्याला सैलपणाचे चालना दिली नसती, तर हे शक्य झाले नसते. मुद्दा तो नाही. अमेरिकन उचापतखोर हेरसंस्था सीआयएला जे चार दशकात शक्य झाले नाही; ते गोर्बाचेव्ह यांनी सोवियत नेतृत्व हाती घेऊन प्रत्यक्ष करून दाखवले होते. आज तीन दशकांनंतर त्यांचे कुणाला स्मरण राहिलेले नाही. पण जगातला एक नेता त्यापासून भलताच धडा शिकलेला दिसतो. स्वातंत्र्योत्तर सात दशकात भारतामध्ये कॉग्रेसला संपवण्याचे मनसुबे विविध राजकीय विरोधकांनी अखंड राबवून शक्य झाले नव्हते, ते राहुल गांधी आज करून दाखवत आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळात समाजवादी, कम्युनिस्ट यांच्यापासून स्वतंत्र पक्ष वा जनसंघ अशा विविध पक्षांनी कॉग्रेसला सत्ताभ्रष्ट करण्याचे राजकारण केले. त्यासाठी आघाड्या व युत्याही केल्या. पण त्याचा उपयोग होऊ शकला नव्हता. कुठल्या तरी मार्गाने कॉग्रेसचे पुनरुज्जीवन होत राहिले. १९६० च्या उत्तरार्धात संयुक्त आघाडीचे राजकारण करून कॉग्रेसला नऊ राज्यातून उखडण्याचे डाव समाजवादी विचारवंत डॉ. लोहियांचा नेतृत्वाखाली खेळले गेले होते. त्यासाठी उजव्या डाव्या अशा सर्व विचारांचे राजकीय पक्ष एक्वटले होते. पण अवघ्या चार वर्षात मरगळल्या कॉग्रेसला इंदिराजींनी नवी संजिवनी देऊन पुन्हा सत्तेत आणून बसवले. त्यात त्यांनी कॉग्रेसमध्ये संघटनात्मक स्वरूपात काही बदल असे केले, की त्यातली संघटना संपून गेली आणि प्रभावी व्यक्तीमत्वाच्या प्रभावाखाली चालणारा असा तो पक्ष होऊन गेला. विचारसरणी वा तत्व बाजुला पडले आणि क्रमाक्रमाने नेहरू गांधी खानदानाचे संस्थान, असे त्या पक्षाचे स्वरूप होऊन गेले. त्यामुळेच इंदिराजींनंतर राजीव तर त्याहीनंतर सोनिया गांधींच्या छत्रछायेखाली कॉग्रेसने वाटचाल केली. अशा घराणेशाहीला आव्हान देण्याची कोणाची हिंमत राहिली नाही आणि कोणी तशी हिंमत केलीच, तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. ज्याच्या हाती नेतृत्व असा कोणीही इंदिराजींच्या वारस म्हणजे कॉग्रेस, अशी स्थिती आली. त्यालाच आज कॉग्रेस म्हणून ओळखले जाते. त्याचा स्वातंत्र्य लढा किंवा राजकीय तत्वज्ञानाशी काडीमात्र संबंध उरलेला नाही. अशा कॉग्रेसला आव्हान देण्याचे प्रयास राजीव गांधींच्या काळात प्रथम विश्वनाथ प्रताप सिंग व भाजपा अशा लोकांनी करून बघितले. पण त्याचा उपयोग झाला नाही. म्हणूनच सोनिया कॉग्रेसला पुन्हा सत्तेपर्यंत घेऊन आल्या. किंवा अन्य विरोधी पक्षांना खेळवून कॉग्रेसला तात्पुरती का होईना सत्तेची संजिवनी देऊ शकल्या. आता राहुलच्या हाती कॉग्रेस गेलेली आहे.
लोहियांपासून व्हीपी सिंग यांच्यापर्यंत झालेल्या कॉग्रेस मुक्तीच्या प्रयत्नांना अपयश आलेले होते. मग ते नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नवख्या नेत्याला कशामुळे शक्य होते आहे? त्याचे उत्तर राहुल गांधी असे आहे. कारण आजवरच्या प्रयत्नांना कॉग्रेसमधून कोणी साथ दिलेली नव्हती. पण नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात येण्याचे पडघम वाजू लागले आणि तेव्हाच नेमका राहुलच्या हाती कॉग्रेसची सुत्रे सोपवण्याचा निर्णय झाला होता. त्याचा मोठा राजकीय लाभ नरेंद्र मोदींना देशाची सत्ता आपल्या हाती घेताना झाला. कारण कॉग्रेसला उखडून टाकल्याशिवाय अन्य कुणाला देशातील सत्ता व राजकारणावर मांड ठोकणे शक्य नव्हते. पण हे करताना नुसती बाहेरून केलेली तयारी पुरेशी नव्हती. आतून कोणीतरी कॉग्रेस खिळखिळी करण्याची जबाबदारी घ्यायला हवी होती. मोदींना त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. सोनिया गांधींच्य पुत्रप्रेमाने मोदींचे काम सोपे झाले आणि आजवरच्या बिगरकॉग्रेसी दिग्गजांना त्यांच्या डावपेचात जी त्रुटी जाणवली होती, त्यावर मोदी सहजपणे मात करू शकले. मोदी दोन वर्षे देशाची सत्ता हस्तगत करायला झटत होते आणि राहुल गांधी कॉग्रेसच्या हातातली सत्ता व पक्ष संघटना खिळखिळी करायला अखंड राबत होते. त्याचा एकत्रित परिणाम आपण २०१४ च्या लोकसभा निकालातून बघितला. मग मोदींना त्या आघाडीवर काम करण्याची गरज उरली नाही. एकदा कॉग्रेसचा बोर्या निवडणूकीत वाजवल्यानंतर राहुलनी देशातून कॉग्रेसची संघटना उध्वस्त करण्याची मोहिम हाती घेतली आहे. एकेका राज्यातून कॉग्रेस नष्ट नेस्तनाबुत करण्याचा राहुल यांचा मनसुबा आता लपून राहिलेला नाही. गोर्बाचेव्ह यांनी मोडून टाकलेले सोवियत साम्राज्य हताश होऊन बघण्यापलिकडे तेव्हा ज्येष्ठ सोवियत नेत्यांच्या हाती काही उरलेले नव्हते. आजच्या वरीष्ठ कॉग्रेस नेत्यांची अवस्था काहीशी तशीच नाही काय?
No comments:
Post a Comment