Monday, December 12, 2016

नव्या नोटांमधील चीप

new currency notes seized के लिए चित्र परिणाम

नोटाबंदीला सुरूवात होऊन नव्या नोटा वितरीत होऊ लागल्यावर एक अफ़वा किंवा गावगप्पा पसरली होती. नव्या दोन हजारांच्या नोटांमध्ये सरकारने कुठलीतरी विचित्र चीप बसवली आहे. तिचा उपयोग करून या नव्या नोटा कुठे कशा फ़िरत आहेत, त्याचा सहज माग काढता येऊ शकतो. मात्र काही दिवसातच ती अफ़वा म्हणून त्याकडे दुर्लक्ष झाले होते. लोक कुठून तरी नव्या नोटा मिळवून आपले रोजचे खर्च भागवण्यासाठी धावपळ करण्यात गर्क होऊन गेले. ज्यांना त्यापेक्षा अधिक सवड होती, त्यांनी नोटाबंदीतून काळापैसा कसा बाहेर येणार नाही, ते लोकांना समजावण्याचे महत्कार्य हाती घेतले. तर काहीजणांनी मोदींचा हा निर्णय इतिहासातल्या तुघलकाशी कसा जुळता आहे, त्याचे विश्लेषण आरंभले होते. पण नोटाबंदीला एक महिना पुर्ण होत असताना अकस्मात नव्या नोटांचाही साठा केलेल्या जागी धाडी पडू लागल्या आणि अतिशय वेगाने मोठमोठ्या आकड्यातल्या रकमा जप्त झाल्याच्या बातम्या झळकू लागल्या. तेव्हा पुन्हा एकदा ती नव्या नोटांमधील चीप तेजीत आली आहे. निदान सोशल मीडियात तरी अशा धाडींचे कारण बहुधा नोटेतली चीप असावी, असे अनेकांना वाटू लागले आहे. कारण जितक्या संख्येने धाडी देशाच्या कानाकोपर्‍यात पडत आहेत, त्यासाठी माहिती कुठून मिळते, याविषयी लोकांना शंका आहे. तशी शंका येणे स्वाभाविक आहे. ज्यांनी आयुष्यात नित्यनेमाने राजरोस चालणारा भ्रष्टाचार व बिनदिक्कत मागितली जाणारी लाच बघितली आहे, त्यांना अशी तात्काळ तत्पर कारवाई चटकन पटणारी नाही. म्हणजे लोकांनी पुन्हा नव्या नोटांमध्ये काळापैसा जमवणे तर्कशुद्ध आहे. त्यात कोणाला काही गैर वाटलेले नाही. पण इतक्या वेगाने काळ्यापैशावर पडलेल्या धाडी लोकांना थक्क करत आहेत. असाच या शंकेखोरीचा अर्थ आहे. चांगले काही बघायची व ऐकायची सवय संपल्याचा तो परिणाम आहे.

सत्तेवर कोणीही येवो, त्याचा हेतू कितीही चांगला असो, सरकारी यंत्रणा इतकी सडलेली व कुजलेली आहे, की कुठल्याही चांगल्या हेतूला किडच लागली पाहिजे. तशी किड लागत नसेल आणि गैरकारभार होतच नसेल, तर आपण सवयीनुसार अस्वस्थ होऊन जातो. जी काही यंत्रणा आहे, तिने प्रत्येक चांगली भ्रष्टाचार रोखण्याची सोय वा सुविधा निकामी केलीच पाहिजे, हा आपण स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षात संपादन केलेला आत्मविश्वास आहे. त्यामुळे एका बाजूला नोटाबंदीने लोकांची धावपळ चालूच असताना, देशभर नव्या नोटांमधला काळापैसा पकडला जातोय, हे आपल्या मनाला पटणे अवघड आहे. नव्या नोटांच्या स्वरूपात जमा केलेला वा इतक्या अल्पावधीत जप्त केलेला काळापैसा, आपल्याला म्हणूनच थक्क करीत नाही. कारण तसेच व्हावे हे आता आपण गृहीत धरून चाललो आहोत. पण सरकारी यंत्रणा वेळीच हातपाय हलवून भ्रष्टाचाराला वेसण घालू शकते, हे रुचणारे नाही. म्हणून मग यासाठी खबर कुठून आली, त्याची शंका आपल्या मनाला सतावते. पण इतक्या मोठ्या गर्दी व रांगांच्या गुंत्यातून त्या लोकांनी कोट्यवधीच्या नव्या नोटा सहजासहजी कशा मिळवल्या, त्याचे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. मग अशा नोटा बॅन्केतील कुणाला तरी हाती धरून गफ़लती करून मिळवल्या असणार आणि हेच तर चालणार, हे आपले गृहीत आहे. गर्दीसमोर वा लोकांचे जमाव बॅन्केच्या सभोवताली असताना आतल्यांना अशा घाऊक नोटा बदलून देण्याची भिती वाटली नसेल, तर खरे नवल आहे. पण त्यांच्या त्या निर्भयपणे गफ़लती करण्याच्या धाडसाचे आपल्याला नवल वाटलेले नाही. उलट कर्तव्याला जागणारा कोणी कर्मचारी अधिकारी धाडी घालतोय, त्याविषयी आपण साशंक आहोत. किती चमत्कारीक गोष्ट आहे ना? भ्रष्टाचार व गफ़लतीशी मस्त गुण्यागोविंदाने नांदणे, आपल्या किती अंगवळणी पडले आहे ना?

ह्या धाडी अतिशय कार्यतत्पर वा कर्तव्यदक्ष अधिकारी घालू शकतात. कुठल्याही शासकीय यंत्रणेत मुठभर तरी कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी असू शकतात. तेही आपल्या जबाबदारीला ओळखून काम करू शकतात. त्यासाठी नवनवे मार्ग शोधून काळापैसा हुडकू शकतात. यावरचा आपला विश्वास किती उडाला आहे, त्याचीच साक्ष अशा चीप थिअरीतून मिळत असते. चांगुलपणा वा काही चांगलेही घडू शकते, याबद्दल आपण किती निराश आहोत, त्याचा हा पुरावा आहे. अशा धाडी भक्कम पुरावे व माहिती असल्याशिवाय कधी पडत नाहीत. त्यामुळेच अशा धाडी नेहमी दुर्मिळ बातमी म्हणून आलेल्या आहेत. म्हणजे आपला आजवरचा तसा अनुभव आहे. त्यापेक्षा अधिक आपण अपेक्षाही करू शकत नाही. त्यापेक्षा अधिक काही घडते आहे आणि वेगाने अशा धाडी पडत आहेत. त्यांची संख्या वाढते आहे, त्यातून आपला जणू अपेक्षाभंग झाला आहे. म्हणूनच त्यामागे काही चमत्कारीक युक्ती वा तंत्र मोदी सरकारने वापरले असावे काय, अशी शंका उदयास आलेली आहे. अन्यथा इतकी नेमकी माहिती व त्याला अनुसरून होणार्‍या धाडी अशक्यच असतात ना? पण तेही शक्य असते. थोडासा चांगुलपणावरचा विश्वास आणि अशा चांगल्या प्रामाणिक लोकांवरचा विश्वासही मोठे चमत्कार घडवू शकतो. सध्या अशा वेगाने व मोठ्या संख्येने पडणार्‍या धाडीतली तीच तर खरी चीप वा तंत्र आहे. त्यासाठी निवडक प्रामाणिक लोकांना अधिकार देण्यात आलेले असू शकतात आणि तितक्याच प्रामाणिकपणे भ्रष्टाचार निपटून काढला जाण्यासाठी इच्छुक उत्सुक असलेल्या जनतेतील काही लोकांच्या खास सहकार्याने हा चमत्कार घडलेला असू शकतो. कोण आपल्या आसपास काळापैसा जमवतो आणि लाचखोरी करतो, हे आपल्यालाही ठाऊक असते. मग अशी ती माहिती संबंधित खाती वा अधिकार्‍याकडे आपणही देऊ शकतो ना?

संशयित हालचाली, शंकास्पद व्यवहार आपल्याच आसपास होत असतात आणि त्याची माहिती कुणाला कळवून उपयोग नाही. कारण असे गैरव्यवहार सरकारी यंत्रणेला विश्वासात घेऊनच उरकले जातात. याविषयीचा आपल्यात मुरलेला आत्मविश्वास अशा भ्रष्टाचाराची शक्ती बनलेला आहे. त्याला तडा देणे अशक्य नाही. आपल्यातलेच काही प्रामाणिक कर्तव्यदक्ष नागरिक आज अशी आसपासची माहिती संबंधितांना देऊ शकतात. तिथेही कर्तव्यदक्ष अधिकारी आणुन बसवलेले असल्यानेच तात्काळ त्यानुसार धाडी पडलेल्या असू शकतात. रेड्डी विवाह सोहळ्यात शंभर कोटीच्या नव्या नोटा गुपचुप आणल्या गेल्या. त्यातल्या एका ड्रायव्हरने आत्महत्या केली आणि तिथून ते प्रकरण चव्हाट्यावर आले. त्या ड्रायव्हरच्या मृतदेहात कुठली चीप नव्हती. अनेक मोठ्या वकील व कंपन्यात पडणार्‍या धाडीतही असेच कोणी नेमकी माहिती संबंधितांकडे पाठवित असल्याने वेगाने पडत आहेत. अनेक बॅन्क अधिकारीही गुपचूप नोटा फ़िरवल्याने पकडले गेलेत आणि अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. हा चमत्कार नोटेतली चीप नाही करू शकत. तो चमत्कार तुमच्या आमच्यात अजूनही कुठेतरी शिल्लक असलेल्या किरकोळ चांगुलपणाने घडवला आहे. त्याला प्रतिसाद देणार्‍या काही मुठभर प्रामाणिक अधिकारी कर्मचार्‍यांना मोक्याच्या जागी आणून, खास अधिकार देण्यातून त्या धाडी वेगाने पडत आहेत. मोदी सरकारने नोटांमध्ये चीप बसवलेली नाही आणि तिची गरजही नाही. तुमच्या आमच्या मनात एक सुक्ष्मशी चांगुलपणा वा प्रामाणिकपणाची चीप जन्मत:च बसवलेली असते. ती ऍक्टिव्ह किंवा क्रियान्वित करायला आपण घाबरत बिचकत असतो. मोदींच्या कृतीतून त्यांनी काही लाख लोकांच्या मनातली तीच चीप कार्यान्वित केली आणि अशा धाडसत्राचे यश मिळते आहे. आपण आपल्यातली ती चीप कधी चाचपून तरी बघितली आहे काय?

2 comments:

  1. भाऊ!
    अति उत्तम लेख.
    ७० वर्षे जपलेला न्यूनगंड लगेच जाणार नाही, हीच विरोधकांची आशा व इच्छा होती.
    त्या एका शक्यतेवरच ते जनतेला बिथरवू पहात होते.
    पण सामान्य जनतेने अमुलाग्र परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला आहे.
    आता सरकारची जबाबदारी अधिक वाढली आहे. ही तर सुरवात आहे. खरी कसोटी याही पुढे आहे.

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    खरोखर त्या ड्रायव्हरने आत्महत्या केली होती का? ही हत्या समजून तपास व्हायला हवा.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete