नऊ महिन्यापुर्वी पाकिस्तानने बलुचिस्तानच्या सीमेवर कुलभूषण जाधव नावाच्या भारतीय व्यक्तीला अटक केलेली होती आणि तो भारताचा पाकिस्तानातला हेर असल्याचा दावा केलेला होता. त्याला भारतीय हेरखात्याने पाकिस्तानात घातपात व उचापती घडवण्यासाठीच पाठवला होता, असाही त्यातला दावा होता. पण या विषयातल्या पाकिस्तानातूनच आलेल्या बातम्या एकमेकांना छेद देणार्या किंवा विरोधाभास सांगणार्या होत्या. कारण एका बातमीत कुलभूषणला इराणी सीमेवर पकडल्याचा दावा होता, तर पाकसेनेच्या गोटातून दिल्या गेलेल्या बातमीत, त्याला अफ़गाण सीमेलगत पकडल्याचे स्पष्ट करण्यात आलेले होते. दुसरी गोष्ट मार्च महिन्याच्या आरंभी ताब्यात घेतलेल्या कुलभूषण जाधवविषयी, पुढले दोन आठवडे पाकने मौन पाळले होते आणि नंतरच त्याच्या धरपकडीची बातमी देण्यात आली. तिसरी गोष्ट पाकचे तात्कालीन सेनाप्रमुख राहिल शरीफ़ यांनी त्याविषयी आपले इराणच्या अध्यक्षांशी बोलणे झाल्याचे सांगितले होते. पण रुहानी यांनी तत्काळ त्याचा साफ़ इन्कार केलेला होता. म्हणजेच पाकच्या गोटातून जाधवविषयी आलेली प्रत्येक बातमी परस्परविरोधीच होती. मात्र त्या एका व्यक्तीने पाकिस्तानात किती उत्पात घडवले, त्याची लांबलचक यादीच पाक माध्यमे सातत्याने देत होती. आता त्यातला खोटेपणा चव्हाट्यावर आला आहे आणि तो पाकच्याच एका मोठ्या वर्तमानपत्राने उघडकीस आणला आहे. याबाबत पाक संसदेचे वरचे सभागृह सिनेटमध्ये, याच विषयावर परराष्ट्र सल्लागार सरताज अझीज यांच्याकडे खुलासा मागण्यात आला. त्यांनी कुलभूषण विरोधात कुठलाही भक्कम पुरावा पाकिस्तानच्या हाती नसल्याचे सांगुन टाकले आहे. तशी बातमीच ‘द डॉन’ नामक वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेली आहे. आता त्या बातमीदारावर पाक भारताचा हस्तक असा आरोप होणार आहे काय?
तीन महिन्यांपुर्वी संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे जोरदार भाषण झाले होते आणि त्यांच्यासमोर पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांचे भाषण फ़िके पडलेले होते. अर्थात तेही भाषण शरीफ़ यांनी आपल्या सरकारच्या धोरणानुसार केले नव्हते. तर पाकसेनेच्या हुकूमाची तामिली करणारेच केले, असाही दावा झाला होत. त्याच्याही पुढे जाऊन त्या भाषणात शरीफ़ यांनी भारताचा हेर कुलभूषण जाधव याचे नाव घेऊन भारतावर पाकिस्तानात दहशतवाद माजवल्याचा आरोप थेट केला नाही; म्हणून अनेक पाक बुद्धीमंत नाराज झालेले होते. शरीफ़ यांची तेव्हा तशी हिंमत कशाला झाली नाही, त्याचाच खुलासा आता सरताज अझीज यांनी सिनेटमध्ये केलेला असावा. कुलभूषण जाधव हा भारतीय आहे आणि तो नौदलाचा अधिकारीही होता, यात दुमत होण्याचे कारण नाही. पण तिथून निवृत्ती घेतल्यावर जाधव एक कंपनी स्थापन करून इराणच्या छबाहार बंदरात व्यवसाय करत होता. त्याचाच लाभ उठवून त्याला धंद्याचे आमिष दाखवून कुणा पाक हस्तकाने आपल्या सीमेनजीक बोलावून घेतले आणि पाकसेनेने झडप घालून जाधवला ताब्यात घेतलेले असावे. मग त्याच्यावर नानाविध काल्पनिक आरोप ठेवून कांगावा सुरू केलेला असावा. पाकिस्तानभर कुठेही झालेल्या घातपाती घटनांची लांबलचक यादी बनवून, त्याचे खापर जाधवच्या माथी मारले गेले आणि तसा कबुलीजबाब देणारे त्याच्या वक्तव्याचे चित्रण करण्यात आले. तेच प्रसार माध्यमांना पुरवून पाकिस्तान नऊ महिने नुसता गदारोळ उठवत राहिला आहे. पण अजून तरी जाधवला न्यायालयात हजर करण्याची पाकला हिंमत झालेली नाही. कारण कुठल्याही कोर्टात पुराव्याची गरज असते. पराचा कावळा करण्यासाठी निदान पर तर हवा ना? तोही नसेल तर कुलभूषण जाधवला कोर्टात हजर करणार कसे? तेच अझीज यांचे झाले आहे.
कराचीपासून बलुचिस्तान, पेशावर, वजिरीस्थान वा पंजाबच्या कुठल्या शहरात घातपात घडवण्याइतकी संघटनात्मक यंत्रणा जाधव याच्यापाशी असल्याचे कोर्टाला पाक कुठून दाखवू शकणार? तेच शक्य नसल्याने नुसत्या आरोपांची आतषबाजी दिर्घकाळ चालू होती. त्याच दरम्यान राष्ट्रसंघाचा मेळावा झाला आणि तिथेही नवाज शरीफ़ त्याबद्दल अवाक्षर बोलू शकले नाहीत. कारण हातात काही नव्हतेच. भारतीय हेरखाते पाकिस्तानात दहशत माजवते, घातपात करते; हा आरोप करण्यासाठी कोणीतरी भारतीय पाकमध्ये पकडण्याची गरज होती. अधिक तो भारतीय सेनादलाशी संबंधित असावा, ही अपेक्षा होती. त्यामुळेच जाधवला सापळ्यात ओढून ताब्यात घेतले गेले आणि मग त्याचा बागुलबुवा सुरू झाला. पण आता तोच डाव उलटला आहे. ही बातमीही पाकच्या मोठ्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केल्याने पाकची कोंडी झाली आहे. कारण ह्याच वर्तमानपत्राने व त्याच वार्ताहराने काही महिन्यापुर्वी असाच एक गौप्यस्फ़ोट केला. तेव्हा शरीफ़ सरकारची नाचक्की झालेली होती. पाकसेनेने उचापती थांबवायला हव्यात, नाहीतर जगात एकाकी पडण्याची तयारी ठेवावी; असा इशारा पाक हेरखात्याच्या प्रमुखांना सरकारी यंत्रणेने एका बैठकीत दिल्याची ती बातमी, सिरील अल्मेडा या वार्ताहराने दिलेली होती. खातरजमा करूनच तशी बातमी प्रसिद्ध केल्याचा निर्वाळा संपादकांनी दिलेला होता. मग शरीफ़ सरकारने त्याचा इन्कार करून संबंधित पत्रकाराला परदेशी प्रवासाला निर्बंध घातले होते. त्यातून पाकची बहुतांश माध्यमे व पत्रकार खवळले होते. तो निर्बंध मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आलेली होती. आताही अल्मेडाचीच ही बातमी असून, पुन्हा सरकारने तसे काही नसल्याचा दावा केला आहे. बातमी साफ़ फ़ेटाळून लावलेली आहे. पण शरीफ़ सरकारचा हा इन्कार, म्हणूनच बातमीला मिळणारा दुजोरा ठरतो ना?
भारताने बलुचिस्तान स्वातंत्र्याला पाठींबा देणे आणि सर्जिकल स्ट्राईक करणे; यामुळे पकिस्तान पुरता बिथरलेला आहे. अधिक आता जागतिक व्यासपीठावर कोणीही मित्र देश पाकच्या समर्थनाला उभ रहात नाही, अशी पाकची कोंडी झाली आहे. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी मग भारतच पाकिस्तानात दहशत माजवत असल्याचे नवेच कुभांड पाकिस्तानने उभे करण्याची योजना केली. त्यातले अनभिज्ञ पात्र, यापेक्षा कुलभूषण जाधवचा त्यात काहीही संबंध नाही. त्याची पुर्वसुचना सिनेटच्या सदस्य नेत्यांना दिली गेली असती, तर त्यापैकी कोणी हा प्रश्न सरताज अझीज यांना सभागृहात विचारला नसता आणि त्यांना अंग झटकण्याची वेळ आली नसती. तसे काही झाले नसते, तर त्याची बातमी झाली नसती आणि आता तोंड लपवण्याची नामुष्की पाक सरकारवर आलीच नसती. आपले पितळ उघडे पडू नये म्हणून पाकला किती कसरती कराव्या लागलेल्या आहेत. तेव्हा या जाधवला भेटण्याची भारतीय राजदूताला परवानगी मिळावी, अशी विनंती भारताने केलेली होती. पण पाकने ती कधीच मानली नाही. कारण स्पष्ट होते. त्याच्याकडून काही वास्तविक तपशील भारताला मिळू शकला, तर जाधवच्या निर्दोष असण्याचे पुरावे भारत गोळा करू शकेल. यासाठी पाक नेहमीच अशा गोष्टीची कुठली माहिती वा पुरावे भारताला देत नसतो. नुसता आरोपांचा धुरळा उडवला जात असतो. यापुर्वी सीमा ओलांडून गफ़लतीने पाकमध्ये गेलेल्या अनेक सामान्य नागरिकांनाही हेर-हस्तक ठरवून पाकने त्यांचा अनन्वीत छळ केलेला आहेच. जाधव तसाच एक हकनाक बळी मानता येईल. पण कधीतरी सत्याला वाचा फ़ुटतेच, तसे अझीज यांनी बंद भिंतीआड सत्य बोलून टाकलेले आहे. कितीकाळ पाकिस्तान जाधवला डांबून ठेवते ते बघायचे. कारण कुलभूषण जाधव प्रकरण हे पाकसाठी आपलेच दात आणि आपलेच ओठ होऊन बसले आहेत.
छान भाऊ
ReplyDelete