Thursday, December 15, 2016

अडवाणींचा नाराजी-नामा

Image result for advani modi

आता संसदेचे हिवाळी अधिवेशन धुवून गेले असे म्हणायला हरकत नाही. कारण चौथ्या आठवड्यातही काही खास काम होऊ शकलेले नाही. पुन्हा एकदा संसदेत गोंधळ माजला आणि कामकाज स्थगित करावे लागल्यानंतर, बहुधा सर्वात ज्येष्ठ खासदार असलेले लालकृष्ण अडवाणी यांनी नाराजी प्रकट करणे रास्तच आहे. ज्यांनी इंदिरा गांधींच्या काळापासुन संसदेचे काम आतून बाहेरून अनुभवले व बघितले आहे; त्यांना अशा गोंधळाचा संताप आल्याशिवाय रहाणार नाही. त्या इतिहासाचे एक भाग असलेल्या अडवाणींना सर्व काही प्रत्यक्ष अनुभवायला लागत असेल, तर विषाद वाटणे स्वाभाविक आहे. तशी नाराजी त्यांनी पक्षनिरपेक्ष भाषेत म्हणावी, अशी मांडलेली आहे. सत्ताधारी पक्ष व त्याचे संसदीय कामकाजमंत्री यांनी समन्वय साधून सभागृह चालवण्याची कामगिरी पार पाडायला हवी; हा अडवाणींचा आग्रह चुकीचा म्हणता येणार नाही. पण म्हणून त्यांनीही विरोधकांना मुक्त सुटका देऊन एकट्या सत्ताधारी पक्षाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे, निरपेक्ष म्हणता येत नाही. आजची त्यांची निराशा वा विषाद अलिप्तपणे व्यक्त केलेली प्रतिक्रीया आहे, असेही म्हणता येत नाही. कारण मागली तीन वर्षे ते कधीही स्वपक्षातच समाधानी असल्याचे कोणाला दिसलेले नाही. आपल्याला डावलून २०१४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे केला गेल्यापासून, अडवाणी पदोपदी आपली नाराजी व असंतुष्टता व्यक्त करीत राहिलेले आहेत. ‘आपल्याला डावलले गेल्याची नाराजी’ असे स्पष्ट शब्दात त्यांनी कधी बोलून दाखवलेले नाही. पण त्यांचा हेतू कधीच लपून राहिलेला नव्हता. किंबहूना निवडणूका व बहुमत जिंकल्यावर त्यांच्या पिढीसह त्यांनाही सत्तेपासून बाजूला राखले गेल्याची खंत स्पष्ट आहे. म्हणूनच मग संसदेचे कमकाज ठप्प झाल्यावर त्यांनी व्यक्त केलेली नाराजी निरपेक्ष वाटणार्‍या भाषेतील असली, तरी त्यामागचा हेतू शंकास्पद आहे.

आपल्याला पंतप्रधान होण्याची संधी नाकारली गेली, ही त्यांची वेदना आहे आणि ती व्यक्त करण्यासाठी ते निवडणुका येण्याची प्रतिक्षाही करू शकलेले नव्हते. गोव्यात पक्षाच्या अधिवेशनात मोदींचे नाव सार्वमताने प्रचारप्रमुख म्हणून निश्चीत झाल्यावर तडकाफ़डकी अडवाणी अधिवेशन सोडून दिल्लीला निघून गेले होते. महिन्याभरातव त्यांनी भाजपा आता व्यक्तीकेंद्री होऊ लागल्याचा आक्षेप घेत, सर्व पदांचे राजिनामे दिलेले होते. असा त्यांच्या नाराजीला जुना इतिहास आहे. तो व्यक्त करण्याची प्रत्येक संधी अडवाणी शोधत असतात आणि साधतही असतात. विद्यमान नाराजीही त्याचाच नव अविष्कार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेता असून त्यांनी स्वपक्षावर टिकेचे आसूड ओढले तर त्याला खास प्रसिद्धी मिळणार; हेही त्यांना पक्के ठाऊक आहे. किंबहूना म्हणूनच त्यांनी ह्या नाराजीचे प्रदर्शन मांडलेले आहे. मोदी सरकारमध्ये त्यांना कुठले स्थान नाही, हे त्यांचे दुखणे आहे. सभागृहातील वडिलधारे सदस्य म्हणून त्यांनी गेल्या अडीच वर्षात किती व कोणता हस्तक्षेप केलेला आहे? नेहमी अगत्याने लोकसभेत हजेरी लावणार्‍या अडवाणींना तिथे बोलायची संधी कोणी नाकारू शकणार नाही. जेव्हा संसदेतले नवे अननुभवी सदस्य गोंधळ घालतात, तेव्हा ज्येष्ठाने उठून त्यांना दोन खडेबोल ऐकवायचे ठरवले, तर सभापतीही त्यांना रोखू शकणार नाहीत. तेही मोदींना टोमणे मारत बोलणार, याची विरोधकांनाही खात्री असल्याने विरोधी पक्षही तात्पुरती शांतता राखून अडवाणींचे भाषण ऐकून घेण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच विद्यमान स्थितीत वडीलधारे व सर्वात ज्येष्ठ अशा अडवाणींची जबाबदारी होती, की त्यांनी वेळोवेळी हस्तक्षेप करण्यात पुढाकार घ्यायला हवा होता. पण तसा त्यांनी प्रयत्न केल्याचे एकदाही दिसलेले नाही. मग कामकाज होतच नाही, असे विषादाने बोलण्यात कुठला प्रामाणिकपणा असू शकतो?

आज नोटाबंदी व त्याचे भांडवल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांकडून होत असलेली कोंडी बघून अडवाणी सुखावलेले आहेत. मात्र तसे ते बोलू शकत नाहीत की दर्शवू शकत नाहीत. तर उपरोधिक अर्थाने विषाद व्यक्त करून त्यांनी आपली मळमळ ओकलेली आहे. आपणच असे स्वपक्षाच्या सरकारला दोषी ठरवले, मग विरोधातल्या लोकांच्या हाती कोलित दिले जाते, हे समजू नये इतके अडवाणी दुधखुळे नक्कीच नाहीत. सभागृह चालवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते, यात नवे काहीच नाही. पण सवाल विरोधकांनी गोंधळच घालायचा निर्धार केलेला असेल आणि त्यासाठीच सतत निमीत्त शोधले जात असेल; तर या ठराविक सदस्यांना काहीकाळ निलंबित करून कठोर कारवाईचे पाऊल सभापती उचलू शकतात. पण विरोधकांना तेच हवे आहे. म्हणूनच सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा खेळ चालला आहे. आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही आणि सत्ताधारी पक्षाने ते चालवले पाहिजे; अशी ही शुद्ध दिशाभूल आहे. अडवाणीही त्यासाठी आपल्याच सत्ताधारी पक्षाला तसेच जबाबदार धरणार असतील, तर त्यांचा हेतू शुद्ध रहात नाही. विरोधकांच्या हाती कोलित देण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट होतो. आणि हे त्यांनी गेल्या तीन वर्षात अनेकदा केलेले आहे. दिड वर्षापुर्वी आणिबाणीला चार दशकांचा काळ होत असताना दिलेल्या एका सविस्तर मुलाखतीमध्ये; त्यांनी स्वपक्षात कशी गळचेपी व मुस्कटदाबी होत आहे, त्याचा पाढा वाचला होता आणि म्हणूनच देशात आणिबाणी सादृष स्थिती आल्याचेही भाकित केलेले होते. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरात अकस्मात तथाकथित विचारवंत, साहित्यिक, कलाकार यांच्या पुरस्कार वापसीचे नाटक सुरू झालेले होते. आजही तेच बोलले जात आहे, अविष्कार स्वातंत्र्याची खरोखर इतकी गळचेपी होत असती, तर राहुल गांधी इतके बेताल आरोप पंतप्रधानावर करू शकले नसते की त्यांच्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळू शकली नसती.

तर अशा अडचणीच्या वेळीच अडवाणी जी भाषा बोलत आहेत, किंवा मतप्रदर्शन करीत आहेत, ते मोदींना अडचणीत आणण्यासाठीच आहे. हे लपत नाही. पण त्याचा आरोप आपल्यावर येऊ नये, म्हणून उदात्त भूमिका मांडावी लागत असते आणि तेच अडवाणींचे खरे नाटक आहे. आपल्याला आता या संसद स्थगितीने कमालीचे दु:ख झालेले असून, खासदारकीचा राजिनामा द्यावा असेही वाटत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. याला मानभावीपणा किंवा शहाजोगपणा म्हणता येईल. खरोखरच असा निरपेक्ष राजकारणी असतो, त्याला निवडून येण्याविषयीही अगत्य असायचे कारण नसते. लोकसभा निवडणूकीपुर्वी आपल्या मतदारसंघाविषयी अडवाणींनी बालिश हट्टही केला होता. मध्यप्रदेश की गुजरात, अशा जागेसाठी ते रुसून बसलेले होते. अखेर संसदीय मंडळाने त्यांनाच दोनपैकी एक जागा ठरवण्याची मोकळीक दिली होती. साधी खासदारकी मिळवण्यासाठी इतकी नाटके करणार्‍या व्यक्तीने ज्येष्ठतेचा आव आणुन राजिनाम्याच्या गप्पा मारण्याला अर्थ नसतो. त्यासाठीची खरी अलिप्तता वागण्यातून दिसायला हवी. गेल्या तीनचार वर्षात अडवाणीना वयाला शोभणारी प्रगल्भता दाखवता आलेली नाही. अन्यथा ते सत्ताधारी बाकांच्या पहिल्या रांगेत मंत्र्यांच्या बाजूला बसले नसते. तिथे बसण्याचा हट्ट खुप काही सांगून जातो. त्यातला लोभ लपून रहात नाही. वडीलकीची भाषा नुसती बोलून चालत नाही. तसे कृतीतून दाखवून देण्याची गरज असते. आपलाच चेला सभागृहाचा नेता झालेला आहे, तो कोंडीत सापडलेला असेल, तर त्याला चक्रव्युहातून सोडवण्यासाठी भीष्माचार्य कधी उभे राहिले? कधी पुढे सरसावलेले दिसले? मग आज त्यांनी संसद ठप्प होताना विषाद दाखवण्याचा मानभावीपणा करण्याची काय गरज होती? लोकसभेतला वडीलधारेपणा त्यांनी तिथे आपली हुकूमत दाखवून सिद्ध केला असता, तर राजिनाम्याच्या भाषेला वजन आले असते.

3 comments:

  1. देवा ! बरे झाले श्री अडवानीजी प्रधानमंत्री झाले नाहीत.
    आजच्या जगाचा बदलाचा वेग त्यांना पेलवला नसता.
    कदाचीत बच्चा राहुलला काँग्रेस सावरायला संधी मिळाली असती. तसे झाले असते तर श्री अडवानी भा ज पा चे अखेरचे पंतप्रधान ठरले असते.
    या सगळ्या बदलाचे अल्प श्रेय्य संघ नेतृत्वालाही द्यावे लागेल.
    यही है राईट चॅाईस, आहा।

    ReplyDelete
  2. काँग्रेस सरकार असताना अडवाणी विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी किती दिवस सभागृह बंद पडले होते तेव्हा त्यांना हे आठवले नाही का

    ReplyDelete
  3. Bhau Ekdam barobar
    Modiji na aapli Baju mandu dyaychi nahi ani janamansat sanshay smbraham Nirman karnyat virodhi paksha tyanchy pradirgh rajkarni anubhava Mule yashashwi Zara..
    Ani Modi Lok/Rajyasabhet kamit kami upasthit rahile yamadhye nemki kay chal aahe he yenari vel ch sangel..
    1971 Chaya nasabandi pramane media Modi Chaya demonetisation la Notbandi nav Devin...baji 1977 sarkhi baji Marato ani..Modi kase baji ultavtat...
    Ani janmanas konala Sath deto he Patane ani aaple lekh vivid basher bhashantarit karun janjagruti kahi pramanat karnyat Modi ani tranche nikatvarti 2019 jhinktat ki 1979 chi 40 varshani parat hote he kalach sangel..AKS

    ReplyDelete