संसदेचे अधिवेशन संपत आले असताना राहुल गांधींनी आपल्याकडे पंतप्रधानांच्या व्यक्तीगत भ्रष्टाचाराचे स्फ़ोटक पुरावे असल्याचा दावा केला होता. किंबहूना ते़च पुरावे आपण लोकसभेत मांडणार म्हणून नरेंद्र मोदी भयभीत होऊन गेल्याचाही आरोप केला होता. त्याच्या पुढे जाऊन, आपण ह्या आरोप पुराव्यासह लोकसभेत बोललो, तर भूकंप होईल असेही ठामपणे राहूलने सांगितले होते. मात्र तसे काही घडले नाही. कारण अखेरपर्यंत संसदेत गोधळ चालू राहिला आणि राहुल भूकंप करू शकले नाहीत. मग त्याच्यापाशी कुठला पुरावा आहे आणि तो संसदेच्या बाहेर जाहिर कशाला करीत नाहीत; असाही प्रतिसवाल विचारला जाऊ लागला. त्यामुळे बिचार्या कॉग्रेस प्रवक्त्यांची अकारण तारांबळ उडाली. कारण राहुलपाशी कुठले पुरावे आहेत आणि कशा स्वरूपात आहेत, त्याचा इतर कोणाला पत्ता नव्हता. सहाजिकच पुरावे कुठे आणि काय आहेत; यासाठीची भुणभूण कॉग्रेस नेत्यांच्या मागे सुरू झाली. त्याच्या दडपणाखालीच बुधवारी राहुलना गुजरातच्या जाहिरसभेत मोदी विरोधातील सज्जड पुरावे समोर आणावे लागले. एकदा ते मांडले गेल्यावर लोकांच्या लक्षात आले, की त्यात नवे काहीही नसून ते शिळेपाके आरोप आहेत. कारण मोदी यांच्या कागदपत्रातील उल्लेखही मुख्यमंत्री असाच आहे. म्हणजेच पंतप्रधान असताना त्यांनी काही भ्रष्टाचार केल्याचा मुद्दा निकालात निघतो. दुसरी गोष्ट ती कागदपत्रे कितपत खरी किंवा विश्वासार्ह आहेत? कोणीही उपटसुंभ काहीही बडबडला, म्हणून त्याला पुरावा मानले जात नाही. कोर्टात कायद्याच्या कसोटीवर सिद्ध होऊ शकणाराच पुरावा असावा लागतो. पण राहुलना अजून तितका कायदा वा तारतम्य उमजलेले नसावे. म्हणूनच त्यांनी मोठा आव आणला आणि आपल्याच पक्षाला तोंडघशी पाडलेले आहे. कारण त्या आरोपात नवे काहीच नसून, हे पुरावे सुप्रिम कोर्टाने यापुर्वीच फ़ेटाळून लावलेले आहेत.
देशात युपीए म्हणजेच राहुल गांधींचीच सत्ता असताना दोन उद्योगसमुहांच्या कार्यालयावर धाडी पडलेल्या होत्या. त्यात जी कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती लागली, त्यापैकीच ही कागदपत्रे आहेत. प्रत्यक्षात ती कागदपत्रे नसून संगणकातील नोंदी आहेत. त्यामध्ये सहारा व बिर्ला अशा दोन कंपन्यांच्या कुणा अधिकार्याने कोणा कोणा राजकीय नेत्यांना पैसे दिले, त्याचे आकडे व नावांचा समावेश आहे. त्यात नऊ वेळा गुजरातचे मुख्यमंत्री मोदीजी असा उल्लेख आलेला आहे. पण त्या नावांच्या यादीत एकट्या मोदींचे नाव नाही. जी इतर नावे आहेत, त्यात दिल्लीच्या तात्कालीन कॉग्रेस मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचाही उल्लेख आहे. खेरीज राहुल गांदींच्याच पक्षाच्या तेव्हाच्या पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांचाही उल्लेख आहे. सहाजिकच या नोंदींवर राहुल गांधींचा विश्वास असेल तर त्यांनी मोदींकडे खुलासा मागण्याच्याही अगोदर शीला दिक्षीत यांच्याकडे त्याविषयी खुलासा मागितला पाहिजे. कारण तीन महिन्यांनी होणार्या विधानसभेतील उत्तरप्रदेशच्या निवडणूकात त्याच शीला दिक्षीतांना याच राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून पेश केलेले आहे. पण राहुलनी गुजरातच्या सभेत मोदींचे नाव वाचून दाखवले व आरोप केले, तरी दिक्षीत नटराजन यांच्याविषयी मात्र मौन धारण केलेले होते. सहाजिकच वाहिन्यांवर जेव्हा त्या आरोपावर चर्चा सुरू झाल्या, तेव्हा मोदी बाजूला राहिले आणि कॉग्रेस प्रवक्त्यांना स्वपक्षीय खुलासे देताना नाकी दम आला. कॉग्रेसमध्ये एकाहून एक दिग्गज कायदेपंडीत आहेत. कपील सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी किंवा मनिष तिवारी, चिदंबरम इत्यादी! जरा त्यांचा सल्ला घेतला असता, तरी याच कागदपत्रांच्या मदतीने मोदींना भ्रष्टाचाराच्या आरोपात सहज गुंतवता आले असते. पण राहुलना सल्ला कोणी द्यायचा वा ते ऐकतात कुणाचे? त्यामुळे आवेशपुर्ण भाषणात त्यांनी शीला दिक्षीतांचा बळी देऊन टाकला.
पहिली गोष्ट म्हणजे जी कागदपत्रे वा लाचखोराची यादी राहुलनी सादर केली आहेत, त्यात नवे काहीच नाही. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ते प्रकरण आधीच सुप्रिम कोर्टात नेलेले आहे. लोकपाल आंदोलनापासून भूषण भ्रष्टाचार विरोधी लढाईचा चेहरा बनले आहेत. काहीकाळ त्यांनी केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पक्षात काम केलेले आहे. पण तिथेही तसाच राजरोस भ्रष्टाचार होताना बघून, भूषण यांना केजरीवाल यांच्याशीच दोन हात करावे लागले. तेव्हा त्यांचीच त्या सर्वात पवित्र राजकीय पक्षातून हाकालपट्टी झालेली होती. या प्रकरणात प्रथम भूषण यांनी हीच कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केलेली होती. पण त्याचा फ़ारसा गाजावाजा झाला नाही. नंतर केजरीवाल यांनी तीच कागदपत्रे घेऊन मोदींवर आरोप केला होता. पण हल्ली केजरीवाल बेताल आरोप करतात अशीच ख्याती झालेली असल्याने, कुठे खुट्ट वाजले नाही. मग भूषण यांनी थेट सुप्रिम कोर्टाच्या खंडपीथासमोर हा मामला नेला होता. पण न्यायमुर्तींनी त्यात शून्य पुरावा आणि अविश्वसनीय कागदपत्रे अशीच शेरेबाजी करून चौकशीची मागणी फ़ेटाळून लावली. आतापर्यंत त्या याचिकेची चारवेळा सुनावणी झालेली असून, येत्या ११ जानेवारीला पुढली सुनावणी आहे. दरम्यान प्रत्येकवेळी कागदपत्रांना दुजोरा देणारा काही भक्कम पुरावा देण्याचे सांगत भूषण यांनी मुदत मागुन घेतली आहे. अन्यथा निरर्थक कागदपत्रे म्हणून ती याचिका कधीच फ़ेटाळली गेली असती. थोडक्यात आजच्या घडीला सुप्रिम कोर्टाने निरर्थक वा अविश्वसनीया असा शिक्का मारलेली कागदपत्रे घेऊन, राहुल गांधींनी मागल्या आठवडाभर नुसता धुरळा उडवला. इतकेच आता सिद्ध झाले आहे. मात्र अशा बिनबुडाच्या आरोपाला पंतप्रधानांनीच उत्तर दिले पाहिजे, असा राहुल व त्यांच्या समर्थक कॉग्रेसजनांचा आग्रह आहे. बहुधा आपल्या आरोपाचे शंकानिरसन करण्यासाठीच भारताच्या पंतप्रधानाची निवड होते, असा त्यांचा समज असावा.
पंतप्रधानाने प्रत्येक आरोपाचा खुलासा देत बसायचे म्हटले, तर देशाचा कारभार कधी हाकायचा? याचे उत्तर राहुलपाशी असू शकत नाही आणि त्याची गरजही नाही. ज्या माणसाला आपल्या पक्षातील वा घरातील अनेक भानगडींच्या प्रश्नांना आजवर उत्तरे देता आलेली नाहीत, त्याच्याकडून अन्य कुठल्या गंभीर प्रश्नांची उत्तरे अपेक्षित नसतात. मेहुणा रॉबर्ट वाड्रा याच्यावर गंभीर आरोप होऊन, अनेक कागदपत्रे समोर आलेली आहेत. त्याचा खुलासा राहुलनी कधी केला आहे काय? नॅशनल हेराल्ड प्रकरणी कोर्टातच खटला चालू आहे आणि त्यात राहुल सोनियांना जामिन घ्यावा लागला आहे. त्याविषयी राहुलनी कधी कुठल्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत काय? जो माणूस आपल्यावर शेकड्यांनी आरोप होत राहिले, त्याचा एकदाही खुलासा करण्याची हिंमत दाखवू शकला नाही. तोच माणूस पंतप्रधानावर खुळचट निरर्थक कागदपत्रे दाखवून आरोप करतो आणि त्याचा खुलासा मिळावा म्हणून गदारोळ करतो, त्याच्याकडे कोण गंभीरपणे बघू शकेल? पण माध्यमातील अनेकांना मोदींच्या विरोधातला बिनबुडाचा आरोपही सज्जड पुरावा वाटत असल्याने, गेल्या चौदा वर्षात असाच धुरळा उडत राहिला आहे आणि प्रत्येकवेळी कोर्टात जाऊनही खोटाच पडत राहिला आहे. पण जित्याची खोड म्हणतात, तसे हे भारतीय माध्यमांना आता व्यसन जडलेले आहे. मोदींवर आरोप करायचे आणि खुलासे मागत रहायचे. हा एक निरर्थक पोरखेळ होऊन गेला आहे. आरंभी मोदींनी त्याकडे फ़ारसे लक्ष दिले नाही आणि आता सामान्य जनताही अशा आरोपांना गंभीरपणे घेईनाशी झाली आहे. तसे नसते तर इतक्या आरोपाच्या रणधुमाळीत मोदी बहूमताचा पल्ला गाठू शकले नसते. मात्र ह्याचा एक लाभ मोदींना नक्कीच मिळाला आहे. हल्ली विरोधातले कुठलेही आरोप झाल्यामुळे सामान्य जनतेला मोदी अधिक स्वच्छ व निर्दोष असल्याची अधिकाधिक खात्री पटते आहे.
भाऊ!
ReplyDeleteअजून भूकंप व्हायचा बाक़ी आहे अस काँग्रेसवाल्यांच सांगण आहे.
तुम्हीतर फारच घाई करता बुवा.
फोटो छानच आहे भाऊ परंतु इतक्या लहान पोराने मोठ्या मुलीला कडेवर घेतलय विशेष आहे !!!
ReplyDelete