गुरूवारी अण्णा द्रमुकच्या प्रतिनिधीसभेची बैठक झाली आणि त्यात एकूण चौदा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यातला शेवटचा प्रस्ताव चिन्नम्मा म्हणजे जयललिता यांच्या दिर्घकालीन सखी व सहकारी यांना पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व सोपवण्याचा होता. खुद्द या चिन्नम्मा म्हणजे शशिकला नटराजन त्यावेळी बैठकीला हजर नव्हत्या. प्रस्ताव संमत झाल्यावर त्याची प्रत घेऊन मुख्यमंत्री पन्नीरसेल्व्हम त्यांच्या घरी गेले. जयललितांचा कडेकोट बंदोबस्तातला महाल, हेच आज चिन्नमांचे निवासस्थान आहे. थोडक्यात ही राजकीय चतुराई करण्यात आलेली आहे. कारण पक्षाची नियमावली व घटना चिन्नम्माच्या मार्गातली मोठी अडचण आहे. यातून पळवाट काढायला असा प्रस्ताव करण्यात आला आहे. नियमानुसार पक्षाचे सदस्यत्व किमान पाच वर्ष ज्याच्यापाशी आहे, त्यालाच सरचिटणिस हे सर्वोच्चपद मागता मिळवता येऊ शकते. ३४ वर्षे अम्मासोबत राहुनही शशिकला पक्षसदस्य नव्हत्या का? तसे नाही, त्या पहिल्या दिवसापासून अण्णाद्रमुकच्या सदस्य होत्या. अम्माच्या प्रत्येक निर्णयात त्यांची दखल असायची आणि अनेकदा तर त्यांनीच परस्पर अम्माच्या वतीने निर्णय घेतलेले आहेत. अगदी मृत्यूपुर्वी अम्मा कोमात गेलेल्या असतानाही, तसे अनेक निर्णय चिन्नम्मानेच घेतले होते. त्यामुळेच पक्षातील त्यांच्या दबदबा आणि स्थान खुप प्रभावी आहे. पण पाच वर्षे सदस्य असण्याची मोठी अडचण आहे. त्या गेली साडेचार वर्षेच पक्षाच्या सदस्य आहेत. कारण त्यापुर्वी त्यांची पक्षातून हाकालपट्टी झालेली होती आणि ज्या कारणास्तव ती हाकालपट्टी झाली, तेच भूत आता चिन्नमाच्या मा्नगुटीवर नव्याने बसण्याची चिन्हे आहेत. ज्या कारणाने दिर्घकालीन पक्षसदस्यत्व त्यांनी गमावले होते, तेच आता पुढल्या राजकीय वाटचालीत आडवे येणार, अशी चिन्हे आहेत. कारण त्यात आता चेन्नई हायकोर्टानेही हस्तक्षेप केला आहे.
अण्णा द्रमुकमध्ये व राजकारणात जयललितांनी प्रवेश केला, तेव्हापासूनच शशिकला त्यांच्या सहकारी आहेत. ही गट्टी इतकी जमली, की शशिकला यांचे सर्व कुटुंबिय अम्माच्या महालातच मुक्कामाला आलेले होते. शशिकलांचा कोणी नातलग अम्माच्या प्रकृती व औषधोपचारावर देखरेख ठेवत होता. पण पाच वर्षापुर्वी एका मोठ्या राजकीय नेत्याच्या सूचनेवरून अम्माने वेगळ्या डॉक्टरकडून तब्येत तपासून घेतली आणि त्यांच्या उपचारात काही गफ़लती असल्याचे आढळून आले होते. किंबहूना चुकीचे उपचार देऊन त्यांच्या तब्येतीशी खेळ केल्याचे स्पष्ट झाले आणि रातोरात शशिकला यांच्यासह सर्व कुटुंबाला महालातून हाकलून देण्यात आलेले होते. पक्षातुन सुद्धा त्यांची हाकालपट्टी झालेली होती. काही काळानंतर शशिकला यांनी अम्माशी संपर्क साधून माफ़ मागितली आणि त्यांना पुन्हा महालात प्रवेश मिळाला. पुन्हा त्यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. त्यामुळेच नव्याने मिळालेले सदस्यत्व अपुरे व साडेचार वर्षाचेच आहे. पण दरम्यान चार महिन्यांपुर्वी अकस्मात अम्माची तब्येत बिघडली आणि त्यानंतर त्या शुद्धीतही आल्या नाहीत. त्यांना कोणाला भेटू देण्यात आले नाही आणि संशयास्पद रितीने त्यांची तब्येत व त्यातील सुधारणा बिघाड, हे एक रहस्य होऊन गेले. शशिकला व त्यांचे विश्वासू निकटवर्ति वगळता, कोणालाही अम्माच्या रुग्णशय्येपर्यंत जाऊ दिले जात नव्हते. त्यासाठी काही लोकांनी शंका व प्रश्न उपस्थित केले होते, तर काहीजणांनी कोर्टातही धाव घेतली होती. मग प्रकृती सुधारत असल्याच्या बातम्या आल्या आणि मग आठवडाभरात त्यांचे निधनही होऊन गेले. पण या बाबतीतली कुठलीच माहिती वा तपशील कधी समोर येऊ शकला नाही. आजही त्यावरचा रहस्याचा पडदा कायम आहे. तितकेच पाच वर्षापुर्वी शशिकला यांना अचानक महालातून हाकलून लावल्याचे प्रकरणही रहस्यमय आहे.
आता शशिकला यांनी चिन्नम्मा म्हणून पक्षाची सुत्रे हाती घेतली आहेत आणि सत्तेचा रिमोट कंट्रोलही त्यांच्याच हाती आहे. पण ज्या पक्षात इतकी गोपनीयता पाळली जाते, त्यात अम्माच्या उपचाराचा तपशील व मृत्यूचे कारणही गोपनीय राहुन गेले आहे. आता एका पक्ष कार्यकर्त्याने त्या गोपनीयतेला न्यायालयात आव्हान दिले असून, कोर्टानेही त्यावर प्रश्नचिन्ह लावत संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. हायकोर्टाने त्याच याचिकेची सुनावणी करताना पंतप्रधानांसह केंद्र व राज्यसरकारला नोटिसा धाडल्या असून, त्यात दफ़न केलेला अम्माचा मृतदेह तपासासाठी उकरून का काढू नये, असाही प्रश्न विचारला आहे. ही बाब लक्षणिय आहे. कारण डॉक्टरांसह निकटवर्तियांनी अम्माच्या बाबतीत काय घडले, ते जवळपास गुलदस्त्यात राखले आहे. एका अफ़वेनुसार शशिकला यांनी काही वर्षापुर्वी अम्माला औषधातून विषप्रयोग करण्याचे भयंकर कारस्थान केले आणि म्हणूनच त्यांची हाकालपट्टी झालेली होती. त्यातला मुद्दा असा, की गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी व अम्माची एकदा भेट झाली व त्यांनी अम्माच्या चेहर्यावरचे काही डाग बघून शंका व्यक्त केली होती. त्यासाठी जाणत्या डॉक्टरकडून तपासून घेण्याची सुचना अम्माला दिलेली होती. तसे करता, त्यांना अपायकारक ठरू शकतील अशी औषधे दिली जात असल्याचे निष्पन्न झाले होते. अम्माच्या औषध व उपचारावर देखरेख शशिकला यांच्याच नातलगाची होती. म्हणजेच अम्माच्या प्रकृतीशी जीवघेणा खेळ चिन्नम्मानेच चालविला होता, असा त्या अफ़वेचा गर्भितार्थ निघतो. अम्मांनी त्यावरचा पडदा कधी उचलला नाही आणि आता त्याच रहस्याचा पडदा उचलण्याची नोटिस निघाली आहे. कारण हायकोर्टाच्या खंडपीठातील न्यायमुर्ती वैद्यनाथन आणि पार्थीवन यांनी, या मृत्त्यूचे रहस्य उलगडण्यासाठी अम्माचा मृतदेह उकरून काढण्याचा इशारा दिलेला आहे.
अम्माच्या निधनानंतर विनाविलंब त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली आणि मरिना बीच येथे रामचंद्रन यांच्या स्मारकाशेजारीच अम्माचे दफ़न करण्यात आले होते. द्रमुकची विचारधारा हिंदू कर्मकांड मानत नसल्याने, त्यांच्या मृतदेहाला अग्नी देण्यात आलेला नाही. तसे झाले असते तर आज त्याच मृतदेहाची शवचिकित्सा करण्याचा विषयच उदभवला नसता. पण सुदैवाने त्यांच्ये दफ़न करण्यात आलेले असून, कोर्टाने त्यावर ठाम भूमिका घेतली तर नव्याने या रहस्यमय मृत्यू व आधीचे वैद्यकीय उपचार यांचा कसून तपास केला जाऊ शकतो. जर त्यात लपवण्यासारखे काहीच नसेल, तर एव्हाना त्याचा संपुर्ण तपशील पक्षाने, चिन्नम्माने जगजाहिर करायला काही हरकत नव्हती. जयललितांची भाची दीपा हिला तर आत्याला आजारपणातही भेटण्याची संधी नाकारण्यात आली होती आणि नंतर मृतदेहाच्या जवळही फ़िरकू देण्यात आलेले नव्हते. त्यांनीही एकूणच घटनाक्रमावर यापुर्वीच शंका व्यक्त केलेली आहे. उपचारार्थ अम्मांना इस्पितळात दाखल केल्यावर द्रमुकचे प्रमुख करूणानिधी यांनीही त्यातला तपशील जाहिर करण्याची मागणी केली होती. किंबहूना जयललिता हयात वा शुद्धीत तरी आहेत काय, अशी शंकाही काढलेली होती. पण त्याचा काही खुलासा तेव्हा मिळाला नाही आणि अखेरीस मृत्यूची घोषणा होऊन, एकूणच या सर्व रहस्यमय घटनेवर पडदा पाडण्यात आला. कोर्टानेच आता त्यात पुढाकार घेतला तर आधीचे हे सगळे शंकासूर आवेशात पुढे येतील आणि अम्माच्या वारश्यावर स्वार झालेल्या चिन्नम्माच्या मानगुटीवर अम्माच्या मृत्यूचे भूत बसल्याशिवाय रहाणार नाही. कारण हायकोर्टाने राज्य व केंद्र सरकार सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही व्यक्तीगत नोटिस बजावली आहे. ही बाब सर्वाधिक खटकणारी आहे. अफ़वेतही अम्माला विषबाधेचा धोका मोदींनीच दाखवल्याचा उल्लेख आहे ना?
जिवंतपणी कथा आणि मृत्यु नंतर पोलीसी कथा? वा:!
ReplyDelete